.post img {

Pages

Monday, 2 October 2017

व्हेंटिलेटर.... नात्यांचा उपचार करणारा चित्रपट..

बऱ्याच दिवस या चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर पाहात होतो. प्रियांका चोप्रा हिची निर्मिती, खूप सारे कलाकार, आशुतोष गोवारीकर यांचं अभिनयातील पदार्पण, आणि बोमन इराणी यांचा छोटासा रोल या मुद्द्यांमुळे वाटत होतं की खूपच पॉलिशड् आणि मध्यम वर्गाच्या भावनांच्या पलीकडचा असावा.

व्हेंटिलेटर पाहिल्यावर लक्षात येते की हा खूपच आपलासा आहे. हास्य आणि भावनांची एकदम रसरशीत मिसळ आपल्याला चाखायला मिळते. हॉस्पिटल मध्ये कोणी व्हेंटिलेटर वर असणे म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या व्यक्तीला Life Support वर ठेवणे. ते काढल्यावर व्यक्तीची जगायची क्षमता अगदी नगण्य असते. कुटुंबावर मग धर्मसंकट आणणारा प्रश्न डॉक्टरांकडून विचारला जातो,  व्हेंटिलेटर काढून टाकायचा कि सुरु ठेवायचा. मिनिटा मिनिटाला हॉस्पिटल चे।हजारो रुपयांनी बिल वाढत असते आणि भावनेला सुद्धा किंमत लागत जाते. याच प्रश्नाभोवती फिरणारा हा चित्रपट.

हॉस्पिटल मध्ये आजारी कोण आहे, हे महत्वाचे नसते तर कोण कोण त्या रुग्णाला पाहायला आले हे महत्वाचे असते. असे म्हणतात की रुग्णाला आजारापेक्षा पाहायला येणाऱ्या नातेवाईकांचा जास्त त्रास असतो. या चित्रपटात हीच गोष्ट अगदी मिश्किल पद्धतीने दाखवण्यात कथाकार आणि दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत.

या चित्रपटात कलाकार जास्त असले तरी प्रत्येक पात्र तेवढंच महत्वाचं आणि वेगळेपण दाखवून जाणारे आहे. सर्व कलाकार असे आहेत की जे मराठी चित्रपट सृष्टीत दुय्यम फळीतील (सहाय्यक कलाकार) मानले जातात. जितेंद्र जोशी, आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी यांचे रोल्स आपण मध्यवर्ती म्हणू शकतो. आशुतोष गोवारीकर यांचे मराठी पदार्पण चांगलं झालं आहे पण आपण त्याला एकदमच अप्रतिम वगैरे नाही म्हणू शकत नाही.

चित्रपट पावणे तीन तास लांबीचा असला तरी तो वेळ तुम्हाला कधी संपलेला कळणार पण नाही. इथे लेखन आणि संवादासाठी पूर्ण क्रेडिट द्य्यावे लागेल. दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी तर कमालच केलीय. इतक्या सारया कलाकारांना हँडल करणे म्हणजे दिग्दर्शकालाच व्हेंटिलेटर वर जायची पाळी यायची. पण कलाकारांच्या म्हणण्या नुसार त्यांनी एवढ्या शांत डोक्याचा दिग्दर्शक कधीही पाहिला नाही (खुद्द आशुतोष गोवारीकर हेच म्हणाले). ब्रेकिंग न्यूज म्हणजे यातला प्रत्येक कलाकार ऑडिशन घेऊनच Casting  केली आहे. नंतर प्रोमोशन च्या वेळेस प्रत्येक कलाकाराने ऑडिशन घेतल्यावर आपल्याला किती राग आला होता व काम करताना ऑडिशन चे कळालेले महत्व मान्य केले आहे.

चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन हा संवाद, छायाचित्रण, अभिनय, दिग्दर्शन यांचा उच्चांक गाठतो. हा सीन पाहताना तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळून जातील. 

चित्रपटाचा गूढार्थ हा आहे की नात्यांना व्हेंटिलेटर वर जाईपर्यंत तानू नका. घरात मतभेद वाद यासारखे छोटे छोटे रोग होतच असतात, त्याला प्रेम आणि क्षमावृत्ती हे औषध वेळीच घ्यावे लागते. नाहीतर घर हे व्हेंटिलेटर वर जाते आणि काही लोक व्हेंटिलेटर न काढता आजार आपसूक बरे व्हायची वाट पाहतात किंवा काही लोक व्हेंटिलेटर काढून नातं मृत व्हायला परवानगी देतात.

प्रियांका चोप्रा सारखी सातासमुद्रापार अभिनय पोहोचवलेली अभिनेत्री मराठी चित्रपट निर्मिती करतेय हे पाहून मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रसिकांचा अभिमान वाटतो.


टीप: वरील लेख मराठी चित्रपट "व्हेंटिलेटर" यावर आधारित आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि आवडल्यास ब्लॉग "Follow" करा.

No comments:

Post a Comment