.post img {

Pages

Saturday 8 December 2018

सुखाचा लपंडाव (कथा)

आज खूप दिवसातून ते दोघं रात्री ड्राईव्ह साठी बाहेर पडले होते. रात्रीचे 11 वाजलेले. मोकळा रस्ता, कडेच्या पिवळ्या लाईट्स मुळे रस्त्यालाही पिवळसर झळाळी मिळत होती. मोठे मोठे पॉश शोरूम्स झोपी गेले होते, पण प्रत्येक चौकात एखादी अंडा बुर्जी किंवा वडापावची टपरी मात्र चालू होती. एवढ्या रात्रीसुद्धा 10-12 लोकांची गर्दी प्रत्येक टपरीभोवती होतीच. रस्त्याची शांतता चिरत त्यांची कार मरीन ड्राईव्ह च्या दिशेने चालली होती, नाही म्हणायला एखादी दुसरी टॅक्सी त्यांना पास करत होती. मुंबई मध्ये रात्री बारा नंतर चालणारंही एक समांतर जग आहे, त्यात थर्ड शिफ्ट मध्ये काम करणारे लोक, चोर, उंडरवर्ल्ड, फिल्म इंडस्ट्री, रेड लाईट एरिया आणि पब्ज मधील पार्टी-वेडे ह्या एकमेकांच्या विरुद्ध टोकाला असलेल्या लोकांचा वावर असतो.

समीरला गाडी नेहमी शंभरच्या काट्यावर चालवायला आवडायची. रस्त्यावरच्या बाकीच्या वाहनांशी जणू त्याने अघोषीत रेसच पुकारलेली असायची. मेघाचं मात्र विरुद्ध होतं. समीरनं गाडीचा वेग वाढवायला सुरुवात केली रे केली की तिचं रागावणं सुरू व्हायचं. खिडकीतून येणारा वारा घेत, पाठीमागे पळणारा बाहेरचा नजारा पाहायला तिला आवडायचा. बिल्डिंग्ज गेल्या की काही वेळाने झोपडपट्टी दिसायची. मुंबई नेहमीच तिला अजीब भेळमिसळ वाटायची. तिच्या मते मुंबई मध्ये मूळ तीन जाती आहेत, गरीब, मध्यमवर्ग आणि श्रीमंत. प्रत्येक जण एकमेकाला खेटून बसलेले असले तरी एकमेकाला अनभिज्ञ असतात. मेघा आणि समीर जवळच होते पण या क्षणी तो तिला अनभिज्ञ का वाटत होता? आज ती दाराला रेलून बसली होती, आणि कधी नव्हे ते मुंबईत आज, गाडीच्या खिडकीतून गार वारा येत होता.  त्याला वाटलं की मेघाची झोप लागली असेल, म्हणून वळून पाहिलं. वाऱ्याने केस खराब होतील म्हणून तिने उजव्या खांद्यावर घेतले होते. बाजूने चेहऱ्याआड केस येत असल्यामुळे त्याला ते ही समजत नव्हतं. तेवढ्यात तिने त्याच्याकडं नजर फिरवली आणि त्यानेही पटकन समोर पाहिलं. त्याला हेच कोडं आजपर्यंत सुटलं नव्हतं की, आपण तिच्याकडं पाहतोय हे तिला लगेच कळतं तरी कसं? आता तिची नजर बाहेर होती, नेहमींसारखं मागे पळणारे जग पाहत होती आणि येणारं थंडगार वारं हातावर झेलत होती.

****************   २ *****************

अलका आणि शंकर आपल्या 3 वर्षाच्या मुलीसोबत म्हणजेच गीता सोबत खेळत बसले होते. खेळ साधा होता, हाताचं मधलं बोट ओळखायचं. एका हाताची पाचही बोटं दुसऱ्या हातात अशी पकडायची की त्याचा थोडासाच भाग  दुसऱ्याला दिसला पाहिजे. मग दुसऱ्या व्यक्तीने त्यातलं मधलं बोट ओळखून दाखवायचं. शंकरकडं अश्या खेळांचा भरणा असायचा. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागूनच असलेल्या एका फ्लाईओव्हरच्या खाली त्यांनी संसार थाटला होता. त्यांचा संसार म्हणजे, रॉकेलवर चालणारा स्टोव्ह, एक पातेलं, एक ताट, दोन वाट्या, एका दोरीला अडकवलेली २-४ मळकट कपडे आणि एका जुनाट साडीने बनवलेला आडोसा.  त्यांचा खेळ इतका रंगात आला होता की आता गीता सुद्धा बरोबर मधलं बोट ओळखू लागली होती. तिला ते जमायला लागल्यावर मात्र ती कंटाळली आणि दुसरा कुठला तरी खेळ खेळायला हट्ट करू लागली. अलकाला माहीत होतं की तीचा नवरा पोरीबरोबर रात्रभर म्हटलं तरी बसेल. तिनं मग गीताला दटावुनच जेवायला बसायचं म्हणून सांगितलं. शंकर तिची धडपड पाहून हसला. तिला बरोबर माहीत होतं की हा घरी येतो तेव्हा किती भूक लागलेली असते. तिने गीताला समजावलं की बाबा जेवला की आपण आणखी खेळायचं.

**************** ३  ***************

समीरनं शेवटी अबोला तोडला, "मेघा, आता तरी बोल ना." मेघाने फक्त रागाने पाहिलं, तिच्यापुढं २ तासा पूर्वीचा प्रसंग उभा राहिला. समीर आज ऑफिस मधून खूपच कंटाळून आला होता. दिवसभर फोन आणि मीटिंग्ज अटेंड करून संध्याकाळ पर्यंत त्याचं डोकं खूपच तापलेलं असायचं आणि लॅपटॉप समोर बसून डोळे पण झोपेच्या गावी आलेले असायचे. तो ऑफिस मधून आला आणि सोफ्यावर पाहिलं तर सगळीकडं पसारा होता. आयांश ने त्याची सगळी खेळणी बाहेर काढली होती आणि सोफ्यावर ट्रेन, विमान,  जिप्सी आणि ईतर वाहने पार्क केली होती. सोफ्याच्या आजूबाजूला वेगवेगळे रोबोट ची खेळणी मांडली होती. समीरला बसायला सोडा, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तेवढ्यात त्याला ऑफिस मधून फोन आला. तो रिसिव्ह करणारच तेवढ्यात आयांश ने रोबोटचं बटण ऑन केलं आणि तो रोबो त्याच्या मशीनच्या भाषेत केकाटू लागला. समीरच्या खांद्याला लॅपटॉप बॅग, हातात इरिटेट करणारा मोबाईल आणि समोर हा आयांशचा खेळ ह्या सगळ्याचा त्याच्या डोक्यात उद्रेक झाला. तो आयांश च्या हातून रोबोट घेण्यासाठी पुढे सरसावला तोच त्याचा पाय कुठल्यातरी खेळण्याच्या शार्प भागावर पडला आणि पायात जोरात कळ आली. हातातून मोबाईल बाजूला भिरकावला गेला. तसाच पाय धरून खाली बसला आणि त्यानं तिथून आरोळी ठोकली,

"मेघा###"

"समीर आलास? आवर तुझं आलेच मी." किचन मधून मेघाने साद दिली.

"नाही####…. पहिली इकडं ये आणि हा आयांशचा धुडगूस बघ."

मेघा पटकन बाहेर आली. आयांशने त्याच्या पप्पाचे रागावलेले रूप पाहिलं आणि तो रडवेला झाला. त्यानं पटकन रोबोट ओढून घेतला. मेघाने लगेच तो त्याच्या हातातून काढून घेतला आणि बंद केला. मग आपल्यावर अन्याय झाल्यासारखा आयांशने भोकाड पसरलं.

"किती पसारा केलाय. यार माणूस इतकं दमून आल्यावर पाय ठेवायला तरी जागा असावी. सोफ्यावर इतका पसारा, पायात पसारा, एवढा मोठा आवाज…? शीट…!!"

"सॉरी समु, अरे मघाशी स्वयंपाक करायला घेतला तर हा गप्प बसायला तयार नाही. सगळी खेळणी काढून दिली तेव्हा शांत बसला. बस आता सोफ्यावर, काढलंय सगळं. पण एवढा का ओरडतोयस, बघ आयु घाबरला ना."

त्यानं रागानेच बॅग सोफ्यावर फेकली. घामाने भिजलेला शर्ट काढायला लागला.

"अगं, पण हे रोजचंच आहे. तुला एवढं पण मॅनेज नाही का करता येत. ऑफिस मध्ये आधीच डोकं भनभनलेलं असतं. तुला कळायला हवं ते…."

"अरे मी आत किचन मध्ये होते ना. कळलंच नाही तुझं यायचं टाईम झालं ते. आणि आपलंच बाळ आहे ना एवढं नाही का सहन करू शकत तू?"

"छान म्हणजे माझ्याच चुका काढ आता. तो टाईम तुला मॅनेज करता येत नाही का? सहनशक्ती च्या पुढं गेलं म्हणूनच बोललो. ऑफिस मध्ये काय दिव्य करावं लागतं माझं मला माहित. दिवसभर घरीच असतेस तर जेवण लवकर नाही करू शकत तू?"

"अरे कुठला विषय कुठं नेतोयस समु. झालाय ना आता शांत तो, पसारा पण साफ केलाय आता. मला वाटलं नव्हतं एवढ्याश्या विषयावरून एवढा ओरडशील. आपल्या घरात मूल आहे, म्हणजे हे न टाळण्यासारखं आहे. आणि घरी असते म्हणजे काहीच कामं असतात असं नाही रे. याला सांभाळून सगळं करावं लागतं."

समीर फक्त रागानं तिच्याकडं पाहत होता. त्याचा राग आजकाल खूपच स्वस्त झाला होता. कुठल्या गोष्टीवरून वाढेल सांगता येत नव्हतं.

"हे बघ. तुला तुझी चूक मान्य करायची नसेल तर राहूदे. मला आता वाद घालायची इच्छा पण नाही आणि ताकद पण नाही. बाकीच्या बायका पण मुलं सांभाळून सगळं व्यवस्थित ठेवतातच नं. "

मेघाच्या मांडीवर आयांश होता आणि रडणं चालूच होतं. तिने आयांशला त्याच्या जवळ नेऊन ठेवलं. " सोपं आहे ना, मग त्याला झोपवून दाखव त्याला. कधीतरी त्याला वेळ देतोस का तू? सतत तुझं ऑफिस आणि फोन चालूच असतो."

"मेघा स्टॉप ईट. माझं डोकं अजून तापवू नको. मी ऑफिसमध्ये काही खुशीने जात नाही, बाळाच्या आणि आपल्या भविष्यासाठी करतो. मला यात ऑप्शन असता तर मी कशाला ऑफिस ऑफिस करत बसलो होतो. हल्ली रोजच, मी बरोबर घरी यायच्या वेळेमध्ये हा पसारा असतो. तुलाच मुळात बाळाचं मॅनेज करता येत नव्हतं तर कशाला आपण चान्स घेतला कुणास ठाऊक. "

मेघा दुखावली. तिनं भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडं पाहिलं आणि मग खाली पाहू लागली. एवढ्याश्या कारणावरून समीर असं काही बोलेल हे तिच्या गावीही नव्हतं. ती शांत स्वरातच म्हणाली,

"मग ठीक आहे. मी उद्यापासून जॉब शोधते मी,  तू त्याला सांभाळ. त्याची जबाबदारी दोघांची पण आहे. तुझ्या सांगण्यावरूनच मी जॉब सोडला होता."

"काहीपण बोलू नको. तुलाही माहितीये की तुझ्या पगारात आपल्या होम लोन चा ई एम आय सुद्धा जाणार नाही. तुझंच म्हणणं होतं ना हाय फाय सोसायटी मध्ये टू बी एच के फ्लॅट पाहिजे. त्या लोन चा इ एम आय सुद्धा हाय फाय च असतो, मग मला बैला सारखं एवढं काम करावंच लागेल ना. यु नो? आय एम जस्ट फेड अप."

अलीकडे तो या लोन च्या खूपच बर्डनमध्ये आला होता. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं एवढं मोठं पाऊल घेतलं होतं. पण त्यांच्या या स्वप्नपूर्ती मध्ये त्याची दमछाक होत होती. पण तिचा समीर एवढा तुटक बोलणारा कधीच नव्हता किंवा असं बोलायचा त्याला बिलकुल हक्क नव्हता. जे होतं ते दोघांचं होतं, तिने काय एकटी साठी थोडीच घर किंवा कार मागितली होती.

समीरच्या मांडीवर आयांश होता. त्याचे किलकिले डोळे आई आणि बाबाकडे पाहत होते, डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता. "माझे आई बाबा एकमेकांवर का रागावतायत??"

जीवनात आयांश आला होता तेव्हापासून, खर्च अफाट वाढलाच होता, पण त्या दोघांचं आयुष्य खूप बिझी झालं होतं. त्याच्यावर प्रेमासाठी असो की आजूबाजूच्या लोकांशी प्रतिष्ठेची स्पर्धा असो, आयांशसाठी महागातली महाग गोष्ट पुरवली जात होती. पण त्या मध्ये दोघांची मनं भरडली जात होती. समीरचा पगार पन्नास हजाराच्या आसपास असूनसुद्धा महिन्याच्या शेवटी बॅलन्स दोन ते तीन हजार राहायचा. जवळ सगळ्या सुखसुविधा असून पण मनात एक अपूर्णता राहत होती. आणि आज मनातल्या वादळाचा उद्रेक झाला होता.

शब्द हे मधमाशांचं पोळ्या सारखे असतात कधी मधासारखे गोड तर कधी मधमाशीच्या डंखाईतके जहाल. या परिस्थितीत समीर आणि मेघाचे शब्द गोडवा देण्यापेक्षा एकमेकाला डंख मारणारे होते. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला वाटलं असतं की किती सुखी कुटुंब आहे हे. पण त्यांचं प्रेम आतून पोखरत चाललं होतं. घरात निरव शांतता पसरली होती, दोघांची नजर आयांशकडे होती. आयांश यायच्या आधी ते एकमेकांसोबत तासंतास निशब्द बसायचे, पण प्रत्येक क्षण बोलका असायचा. आत्ता १० ते १५ मिनिटं अशीच निशब्द गेली, पण प्रत्येक क्षण नकोसा होता.

आयांश रडून रडून झोपी गेला होता. समीर ने त्याला सोफ्यावर झोपवले आणि त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला. मेघाचे डोळे डबडबले होते. ती सोफ्याच्या जवळ आली आणि आयांशच्या पोटावर हात ठेवून खालीच बसली. समीर थोडा शांत झाला.

समीर ने मेघाकडं पाहिलं, "आता भाजीही जळून गेलीय,चल बाहेर काहीतरी खाऊन येऊ."

"आयु ला कसं नेणार?"

"त्यानं खाल्ले आहे का काही?"

"हो, वरण भात खाल्लाय."

"मग, शेजारी नितुताई कडे ठेऊ आयुला थोडावेळ. नाहीतरी ती जागी असेलच रात्री 2 पर्यंत. हिमांशू सेकंड शिफ्ट वरून यायचा आहे."

"ठिकेय. जाऊ."

****************  ४   ***************

शंकर आणि अलका एकाच ताटात जेवायला बसले. गीता शंकरच्या मांडीवर बसून ताटात त्याने करून दिलेले छोटे छोटे घास वेचत होती. आजचा मेनू म्हणजे दुपारची राहिलेली भाकरी आणि मसाल्याविरहित केलेली भाजी. अलकाला कधी कधी एका केटरर्स मध्ये भांडी घासायचं काम यायचं. त्यादिवशी मग त्यांची खायची चैनी असायची. शिल्लक राहिलेल्या जेवनामधील पुलाव, पुरी, कुर्मा असे चांगले चांगले पदार्थ घरी आणायची. गीताला आणि शंकर ला गुलाबजाम खूप आवडायचा. पण केटरर्स मध्ये गुलाबजाम कधीच शिल्लक राहायचा नाही. अलका शक्कल लढवून दोन गुलाबजाम एखाद्या प्लास्टिक च्या पिशवीत ठेवायची आणि या दोघांसाठी घेऊन यायची.

एक घास बाबाचा एक घास आईचा, असे करत गीता ला घास भरवले. आणि मग तिनं पुन्हा खेळायचा हट्ट धरला. अलकाने तिला दटावले, "गीते, झुपू दे आता बाबाला. दमून आलंत ना ते?"

"खेलायचं म्हजी खेलायचं…..$####…" गीता.

शंकर ला हसू आलं. गीता म्हणजे त्याची कॉपी च होती, दिसण्यापासून ते अगदी खेळायच्या वेडा पर्यंत सगळं सेम. तो कसा नाही म्हणणार त्याच्या परीला. त्याने मग दुसरा कुठला खेळ खेळायचा याचा विचार करायला सुरुवात केली.

****************  ५  ****************

समीर आणि मेघा थोडा वेळ मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर बसले. समीरला मरीन ड्राईव्ह च्या कठड्यावर वेळ घालवणं म्हणजेच एक माईंड थेरपी वाटायची. माणूस कितीही टेन्शन मध्ये असला तरी तिथे मन मोकळं होऊन जायचं. समीर ला सॉरी तर म्हणायचं होतं पण इगो आडवा येत होता. मेघाच्या मनातही काहीसं असंच होतं.

"चल भूक लागलीय आता." मेघा.

"कुठे खायचं?"

"चालेल कुठंही. स्नॅक्स चालेल."

"ठिकेय. आनंदनगर च्या इथलं हायवे लागून आहे त्या मॅक डी मध्ये जाऊ."

त्यांची कार पुन्हा एकदा या दोन सायलेंट प्रवाश्यांना घेऊन चालली. हवा मात्र आहे तशीच बोलकी आणि हळुवार होती. मुंबईच्या उष्ण वातावरणाने देखील काही क्षण स्वतःचा स्वभाव बदलला होता, पण हे दोघे मात्र बदलायला तयार नव्हते.

मॅक डी मधून दोघांनी बर्गर आणि कोल्डड्रिंक्स घेतले. मेघाला समीर नेहमीसारखा कुठल्यातरी विचारात गढलेला दिसला. ती मनातच हसली. तो लगेच बर्गर चा ट्रे घेऊन टेबल कडे येऊ लागला. तिथं येईपर्यंत त्याच्या मनात वेगळाच विचार आला.

"आपण बाहेर तिथं त्या फ्लाईओव्हर खालच्या कट्ट्यावर बसायचं का?"

तिनं विंडो मधून ती जागा पाहिली. फ्लाईओव्हर च्या खाली बसायला काही कट्टे केले होते. जागा जास्त स्वच्छ नव्हती पण समीरला नेहमी असं कट्टयावर बसून खायला आवडायचं. बर्गर आणि कोल्ड्रिंक सांभाळत दोघे रस्त्याच्या पलीकडे फ्लाईओव्हर च्या खाली आले आणि कट्टयावर बसले. दोघांचा राग आता बऱ्यापैकी निवळला होता. कधीकधी शब्दांपेक्षा वातावरण आणि एकत्र असणं सुद्धा खूप काम करतं. समीर मेघाला सॉरी म्हणणार, तेवढ्यात त्याची नजर तिथेच बाजूला खेळत असलेल्या तिशीतल्या तरुणांकडे गेली. तो काहीतरी वेड्यासारखं करत होता. कधी माकडासारखं चालत होता, तर कधी कोल्ह्यासारखं ओरडत होता. आणि काहीतरी शोधल्यासारखं करत होता. समीरला तो वेड्यासाखा वाटत होता. त्याने मेघाला नजरेनेच खुणावले. एवढ्या रात्री असा वेडा माणूस शेजारी. इकडे आला तर काय, या विचाराने मेघा घाबरली आणि समीरला चिकटून बसली. दोघेपण त्याला न्याहाळत होते. कपडे खूप मळलेले, कदाचित दहा बारा दिवस बदलले नसतील. चेहऱ्यावरून तरी असा सभ्य आणि प्रेमळ दिसत होता. पण खूपच विचित्र वागत होता. त्यांची नजर तिथून वळणार पण तेवढ्यात झोपडीच्या मागून एक छोटीशी मुलगी बाहेर उडी मारत आली आणि त्याला वेड्या माणसाला पकडल्यासारखं केलं. त्यानेही मग सापडल्याच्या दुःखाचा अविर्भाव आणला आणि मग तो त्या मुलीसाठी घोडा बनला. ती मुलगी त्याच्या एखाद्या राजकन्येच्या आवेशात घोडा उर्फ माणसाच्या पाठीवर बसली. आणि तो घोडा चालू लागला.

"त्याच्या गुडघ्याला खडे टोचत असतील ना?" मेघाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"हम्मम्म.." समीर

"म्हणजे तो वेडा माणूस नाही तर… तिचा वडील आहे वाटतं…" मेघा.

"हो ना…"

तेवढ्यात तिथे साडीच्या बनवलेल्या झोपडीमध्ये झोपलेली स्त्री बाहेर आली आणि ओरडली, "काय वं? ती ल्हान हाय ते हाय, तुमी बी ल्हान होता काय? पोरी उतर बाबाच्या पाटीवरनं, लागल का नाय त्यांच्या गुढघ्याला."

पोरगी पाठीवरून उतरली आणि त्या माणसाने गुढघ्याला लागल्याचं नाटक केलं. ती मुलगी डॉक्टर असल्यासारखी, गुढघ्याला औषध लावल्यासारखं करू लागली. आणि तिचा बाप दुखल्यासारखं करू लागला. त्यानं पोरीला उचलून घेतलं आणि पटापट मुके घेतले.

तीची आई पण त्या दोघाजवळ आली. तो म्हणाला,

"बघ आपली पुरगी डाक्टर हुनार."

"व्हय. हुईल की.. आयवर गील्या नव्हं …मग हुशार असणारच…"

"व्हय व्हय.. तिची आय अती हुशार हाय.. " त्याने टोमणा मारून हसायला सुरुवात केली.

तिनं नुसतंच डोळं मोठं करून त्याला एक फटका मारला. आणि दोघेपण पण हसू लागली. आणि क्षणांत आपल्या मुलीकडे गर्वाने पाहू लागली.

समीर आणि मेघा जवळपास दहा पंधरा मिनिटं त्या तिघांच्या विश्वात हरवले होते. समीरचा हात मेघाच्या खांद्यावर होता आणि मेघाचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं.

"मेघा, आपल्या जीवनात सगळं आहे तरी पण यांच्या विश्वा इतकं आपलं विश्व खूष का नाहीये गं? कुठं चुकतंय कळत नाही."

"माहीत नाही रे. पण कदाचित हा एकमेकांसाठी असणारा वेडेपणा असेल. ती बाई त्याच्या झोपडीत पण सुखी आहे. आपण छोट्या घरात भाड्याने राहायचो त्यावेळी मला वाटायचं माझ्या मनाला खूपच ऍडजस्ट करतेय. पण आज जाणवतंय की सुखी राहण्यासाठी मन ऍडजस्ट नाही , त्या मन मोठं करायला हवं होतं. चांगल्या लाईफस्टाईल साठी आणि आयांशच्या भविष्यासाठी तुला किती झटावं लागतंय हे कधी मी पाहिलंच नाही रे. I am sorry समू.."

तिच्या डोळ्यातले पाणी पाहून त्याला कससच झालं.
"ये वेडाबाई रडतीयेस काय? खरं तर आपण दोघेपण चुकलो. तो बाप बघ, तो सुद्धा राबून येऊन कुटुंबाच्या विश्वात रममाण झालायच ना? तिथे त्याच्या गुढघ्याला खडे टोचत होते आणि इथं माझ्या इगो ला टोचत होतं. एखाद्या पुरुषाला आपण घराचा सर्वे सर्वा आहे असा गर्व वाटू लागतो… तिथंच घरातला आनंद हरवू लागतो. तेच माझ्यासोबत झालं."

**************  ६   *****************

शंकर आणि अलकाची ची नजर समीर- मेघा कडे गेली आणि एवढा वेळ ते आपल्याकडं पाहतायत  हे उमजून त्यांना लाजल्यासारखं झालं.

अलका म्हणाली, "हिकडं काय बघतायत वं ते दोघं.? अगं बाय. आपल्याकडं यायला लागलीत की वं.."

"काय भुतं असल्यासारखी घाबरतीस तू पण? माणसंच हाईत, फकस्त मोठ्या घरातली दिसतायत."

*************** ७    *************

समीर ने कार स्टार्ट केली. 12 वाजले, आणि घडाळ्याचे काटे बरोबर एकमेकांसमोर आले होते. त्याला घड्याळाकडे पाहून विचार आला, हे घड्याळाचे दोन्ही काटे स्वतःसोबत सगळ्या जगाला पळायला लावतात. हे दिवसभरात चोवीस वेळा एकामेकाला भेटतात, पण क्षणभरच. त्यांना प्रेमाचा एक क्षणही पुरेसा असतो, त्यातच पूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. या बारा वाजता यांची ही शेवटची भेट. पण हा खेळ आयुष्यभर सुरू राहील …न रडता आणि न थकता..

समीरने मेघाला जवळ घेतलं आणि कपाळाला किस केलं.

"आय लव्ह यू मेघ…."

"आय लव्ह यू टू समू…"

गाडी वेग घेऊ लागली आणि मेघाने दोघांच्याही आवडीचं, फैयाझ हाश्मी नी लिहिलेलं गाणं लावलं.

~~~~ आज जाने जिद ना करो~~~~
वक्त की कैद मे जिंदगी है मगर…
चंद घडिया है यही जो आजाद है…
इनको खोकर मेरी जान ए जां..
उम्र भर तरसते ना रहो…

कितना मासुम संगीन है समा..
हुस्न और ईश्क की आज मेराज है..
कल की किसको है खबर जान ए जां...
रोक लो आज की रात को….


(समाप्त)

*************** ७ *****************
टीप - माझी कथा वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
मोबाईल - ९७३०४९६२४५
ब्लॉग - https://vishalwords.blogspot.in

No comments:

Post a Comment