यंदा एक काम करू, पावसातून कोसळलेल्या शब्दांना, पक्का बांध घालू,
खूप साठतील ना गं मग?
तेवढंच आपल्याला कवितेसाठी भांडवल,
आणि लेखणीला निमित्त..
तुला किती, अन मला किती?
अर्धे अर्धेच..अजून काय?
बर तुला घे त्यातले बरोबर शेलके शेलके वेचून ..
गडद आभाळ, हसऱ्या श्रावनधारा, ओलावा अन संथ नदीकिनारा..
मी घेतो, ते नेहमीचेच थातुरमातुर,
रिमझिम, पाणावले डोळे, सिगारेट अन आठवणी वगैरे..
पाऊस थांबला की,
येशील ना गं ऐटीत,
वही घेऊन तुझ्या शेलक्या कवितेची,
हिरव्या गालिचाची,
ओढ्याची, नदीची..
प्रत्येक ओळीत बरसता पाऊस घेऊन,
कधी रिमझिम,
नुसताच ओलेता..
कधी मुसळधार,
आसमंत भरून..
आणि कधी वेडा,
अगदी माझ्यासारखा..
मी फक्त ऐकेन,
माझ्या शब्दांना खिशात ठेऊन,
मी काय आणि माझे शब्द काय..
तुझ्या पावसाच्या,
वळचणीतले..
नकळत.. अगदी तुझ्याही नकळत भिजणारे..
©विशाल पोतदार (Mob.9730496245)
No comments:
Post a Comment