.post img {

Pages

Thursday 8 October 2020

सुंगी मुंगीची गोष्ट - भाग 2

(नमस्कार.. पुन्हा एकदा आपल्या भेटीस घेऊन आलो आहोत.. सुंगी मुंगी..
इवल्याशा सुंगीच्या पहिल्या भागास आपण रसिकांनी खूप मोठा प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनस्वी आभार.. 
सादर करत आहोत सुंगी मुंगीची गोष्ट (भाग 2) -बर्फाळ सफर..
लेखक -विशाल पोतदार)
    
    एकतर सुंगीच्या कडकडी स्वभावामुळे मुंगाई आणि मुंगोबा अगदीच काळजीत असायचे. आणि मागच्या वेळेस तापत्या दुधातून वाचल्याचा पराक्रम कानी आला, तेव्हा मुंगाईने नांगीत पकडून तिचा चांगलाच समाचार घेतला होता. सुंगीने आईच्या नांगीतून आपली इवलीशी मान कशीबशी सोडवत, फक्त हो ला हो म्हणण्याचं काम केलं.
    
शेवटी मग तिच्या खोड्यांवर लक्ष राहावं, म्हणून मुंगाईने, सुंगीची जिवलग मैत्रीण 'बुंगी'ला पाचारण केले. बुंगीला कडक शब्दात आदेश दिला, "दिवसभर सुंगीबरोबर राहायचं. आणि जर सुंगीने नेहमीसारखा काही अवली प्रकार करण्याचा प्रयत्न केलाच, तर सरळ तिला घरी ओढत आणायचं. कळलं?" बुंगीनं घाबरत घाबरत हो म्हटलं असलं, तरी मनात मात्र सुंगीबरोबर मज्जा करण्याचे साखरकण घोळू लागले.
    
     दुसऱ्या दिवशी, मुंगाईने सुंगी आणि बुंगीला मुद्दामच गॅस शेगडीपासून लांबच्या कोपऱ्यात, अन्नशोध मोहिमेचे काम दिले. शिवाय दोघींनाही लवकर परतण्याची ताकीद दिली. सुंगी-बुंगी मुंगाईपुढं निमूट असल्या, तरी एकदा का दृष्टीआड झाल्या रे झाल्या की दुडूदुडू पळत निघाल्या. 
    
    त्या कोपऱ्यात पोहोचणारच, इतक्यात सुंगी-बुंगीच्या दृष्टीसमोर पाटलीनबाईंचा फुग्यासारखा फुगलेला मुलगा लपतछपत आईस्क्रीम खात येताना दिसला. त्याचं अर्धं लक्ष आईस्क्रीममधे, तर अर्धं लक्ष आतून आई येतेय की काय याकडे लागलं होतं. ते पाहून लगेच सुंगीच्या जिभेवर आइस्क्रीमची चव रेंगाळू लागली. मागच्यावेळी तिने ते थोडंसं घरी न्यायचा प्रयत्न केला, तर ते रस्त्यातच वितळून गेला होतं. आज मात्र सुंगीला आईस्क्रीम मनसोक्त खायचं होतं. तिने बुंगीला आईस्क्रीमच्या चवीबद्दल इतकं चढवून सांगितलं की बुंगीच्या तोंडाला आत्ताच त्याची चव जाणवू लागली. आता दोघींच्याही डोक्यावरचे अँटेना आईस्क्रीमकडे वळले आणि मिशन आईस्क्रीम सुरू झालं. दोघीही त्या भांड्यावर सरसर चढल्या आणि आईस्क्रीम चाखण्यात गुंग झाल्या. आईस्क्रीममुळे पोटाच्या बाहेरून आणि आतूनही गारेगार वाटत होतं. बुंगीचं गपागपा हादडनं चालू होतं, तर सुंगीचा वरच्या टोकावरून आईस्क्रीम चाटत घसरत खाली येण्याचा खेळ सुरू होता.  
    
    पण अरे हे काय? पाटलीनबाई आईस्क्रीमची वाटीच उचलून कुठेतरी नेऊ लागल्या. आणि सुंगी-बुंगीला आपण खूप उंडू लागल्यासारखे वाटू लागले. बाजूला रडत हातपाय आपटत त्या पोराचं आकांड तांडव चालू होतं. सुंगी-बुंगी घाबरून एकमेकीकडे पाहू लागल्या. त्यातून दोघीही खाली उडी घेणार होत्या, इतक्यात पाटलीनबाईंनी ती वाटी फ्रिजरमधे ठेऊन दिली. सुंगी-बुंगीपुढं अचानक अंधार पसरला. अगदी आत्ता थोड्या क्षणापूर्वी मजेत असणाऱ्या त्या निरागस जीवांची भीतीने गाळण उडाली.

    दोघींनाही समजत नव्हतं की हे थंडीनं गोठवून टाकणारं ठिकाण आहे तरी कसलं? चारी बाजूला बर्फाच्या रांगाच रांगा दिसत होत्या. इथून बाहेर पडणे लांबच, पण साधा पाय जरी खाली ठेवला तरी खूप जोराच्या कळा येत होत्या. वाटीच्या काठावर थोडं कमी थंड असल्याने, दोघींनी तिथे बसकन मारली. इतर वेळी चुरचुरू बोलणारी बुंगी मात्र आता ढसढसून रडू लागली. सुंगीने कसंबसं खोटंनाटं समजूत काढत, तिला शांत केलं. हळूहळू थंडी वाढतच होती. दोघींच्या अँटेनावर आता बर्फ जमा झाला होता. बुंगी तर एकदम आकसून गेली होती. नेहमी संकटात भराभर विचारचक्र चालवणाऱ्या सुंगीचं डोकं, आत्ता मात्र थंडगार पडलं होतं. काहीवेळ असाच गेला. अजून कुणीही ते दार उघडत नव्हतं. बुंगीला आता श्वास घेणंही मुश्कील झालं होतं. अगदी काही क्षणातच त्या दोघीही बर्फात गोठून जाणार होत्या.

    सुटण्याची एखादी छोटीशी तरी संधी मिळेल अशा आशेत सुंगी आजूबाजूस नजर रोखून बसली होती. इतक्यात घरातली वीज गेली आणि फ्रीजच बंद पडला. सुंगीला काहीतरी आवाज थांबल्याचे जाणवले. थंडपणा थोडासा कमी वाटू लागला. काहीतरी बदल घडणार हे जाणवू लागलं. तर काय? पण एक संकट जातं तर दुसरं अगदी लगेच समोर हजर असतंच. भांड्यातलं आईस्क्रीम वितळून दोघींच्या अंगावर ओघळू लागलं. आणि अगदी काही वेळातच वरती जमलेला बर्फ वितळून, सुंगी-बुंगीपेक्षाही मोठे मोठे पाण्याचे थेंब धप्प धप्प पडू लागले. सुंगीला आता मोठ्या संकटाची चाहूल लागली होती. काहीतरी मार्ग काढणे क्रमप्राप्त होतं. तिने मागच्या बाजूस निरखून पाहिलं आणि एक कल्पना सुचली. तिने लग्गेच बुंगीला तिच्या मागोमाग यायला सांगितलं, पण बुंगी मात्र मघाच्या थंडीमुळे आणि भितीमुळे हलूच शकत नव्हती. सुंगी वाटीवरून खाली उतरली आणि बुंगीला आपल्या पाठीवर घेतलं. सुंगी आता दोघींचा जीव हातात घेऊन फ्रिजच्या मागच्या बाजूस दौडू लागली. मधे कुठे खूप थंड बर्फ तर अधूनमधून थंड पाणी पार करत जिवाच्या आकांताने मार्गक्रमण करत होती. आता वरून खूपच जास्त आणि मोठाले थेंब पडत होते. दोनदा बुंगी खाली पडली आणि पुन्हा सुंगीच्या पाठीवर चढली. पायाखालचा बर्फ आता बऱ्यापैकी वितळून ते पाणी मागच्या बाजूला वाहत होतं. सुंगीला धावून धावून दम लागला असला तरी आता थांबणं म्हणजे जणू मृत्यूच होता. तिनं मघाशीच पाहिलं होतं की बर्फाचे होणारं पाणी मागे एका बिळातून बाहेर पडत होतं. पाण्यातून मार्ग काढत तिला बुडायच्या आत काहीकरून त्या बिळापाशी पोहोचायचं होतं.

आता अगदी नगण्य अंतर राहिलंच होतं आणि ती तेवढं अंतर जीवापाड धावली. तशातच तीनं बुंगीला घट्ट पकडून बसण्यास ओरडून सांगितलं. बुंगी आपल्या या धाडशी मैत्रिणीला घट्ट बिलगून बसली. पुढे काय होईल, त्या वाचतील की नाही काही माहीत नव्हतं पण हा आशेचा एकमेव किरण सोडूनही चालणार नव्हतं. सुंगीने फ्रिजच्या पाणी जाण्याच्या बिळात उडी घेतली. त्या थंड पाण्याच्या नळीतून सुंगी-बुंगी वेगानं खाली येत होत्या. आणि अगदी काही क्षणातच धप्पकन एका तलावासारख्या वाटणाऱ्या भांड्यात पडल्या. त्या भांड्याच्या भिंतीवरून वर चढत सुंगी-बुंगीने एकदाचं बाहेर डोकावलं आणि बाहेरचं जग पाहून दोघींची कळी खुलली. 

दोघीही एकदाच्या बाहेर आल्या आणि त्यांना खुशीत हसावं की रडावं हे देखील कळत नव्हतं. मघाशी घाबरून रडणाऱ्या बुंगीचे अँटेना आता आनंदाने नाचत होते. घरी गेल्यावर मुंगाई नांगीत पकडणार असली तरी सुंगीचं मन मात्र आईस्क्रीमच्या आठवणीत वितळत चाललं होतं. आणि पुन्हा कधीतरी आईस्क्रीम खायला कसं येता येईल हा विचार मनात घोळू लागला.
    
    ©विशाल पोतदार

No comments:

Post a Comment