.post img {

Pages

Thursday, 29 July 2021

मारवा (कथा)

दहा बाय बारा फुटांची ती रूम एका अस्वस्थतेने भरून गेली होती. एकेक सेकंदही युगांचा वाटावा अशी लांबलचक शांतता पसरली होती. बाहेर लख्ख सूर्यप्रकाश असला, तरी इथे मात्र काळवंडून आलं होतं. कोपऱ्यातल्या कॉटवर एका सत्तरीतल्या पुरुषाचा देह निश्चल असा पहुडलेला. जीवनाचे अंतिम क्षण मोजत असलेला त्याचा चेहरा गहन विचारात असल्यासारखा निर्विकार होता. ऑक्सिजन मास्कमधून, जड झालेला श्वास ठळकपणे जाणवत होता. बाजूच्या स्क्रीनवर हृदयाच्या ठोक्यांचा आलेख अजून तरी मोडक्या तोडक्या लयीत चाललेला. त्या आलेखातूनच देहाला जिवंतपणाचा काय तो पुरावा द्यावा लागत होता. 

त्याची पत्नी कॉटला टेकून बसलेली. तिच्या अवस्थेचा थांग कुणी लावावा! एखादी भयानक गोष्ट घडणार याची कल्पना आपणास बऱ्याचवेळा असते, त्या परिस्थितीस तोंड द्यायला माणूस तयारही असतो. परंतू खरेच ती वेळ आल्यावर सगळे काही अचानक घडल्याप्रमाणे आपण गांगरून जातो. अशाच मनोवस्थेतून जाणाऱ्या त्या स्त्रीची नजर नवऱ्याच्या चेहऱ्यावरून किंचितही ढळत नव्हती. तिने मनात कितीही सकारात्मक समजूत करून घेतली असली, तरी डोळ्यांना अटळ क्षण उमजलेच आणि अश्रू अनिर्बंध वाहू लागले. त्यातून आठवणींचा प्रवाह धरण फुटल्यासारखा रानोमाळ धावू लागला. थोडा थोडका नाही, तर तब्बल पस्तीस वर्षांचा एकत्र प्रवास! नववधू म्हणून मिरवण्यापासून ते वार्धक्यातली ही वेळ, सगळंच्या सगळं कालच घडल्यासारखं ताजं होतं. यावेळेला मात्र त्या क्षणांना दुःखाची किनार होती. 

अचानक तिची नजर समाधिस्थ अशा तानपुऱ्याकडे गेली. त्यालाही या बेसूर वेळेतला ताण जाणवला असेल का? तिचे मन अगदी ढवळून निघाले आणि काहीतरी महत्वाची गोष्ट आठवल्याचे भाव चेहऱ्यावर आले. अचानक उठून ती तानपुऱ्याकडे जाऊ लागली. कदाचित तहान लागली असावी असे वाटून शेजारच्या बाईंनी पाण्याचा ग्लास पुढे केला. पण त्याकडे लक्ष न देता ती तानपुऱ्याजवळ आली. तानपुऱ्याच्या निद्रिस्त तारांवरुन हळुवारपणे हात फिरवताना, मनात सुरांच्या लाटा बोलावणं धाडत होत्या. तिने काहीतरी निर्धार केला आणि तानपुरा घेऊन कॉटजवळ बसली. एक पाय मुडपून तानपुरा कानाला लावून गायनाचा पवित्रा घेतला. 

तिच्यातला हा अचानक झालेला बदल पाहून, तेथील उपस्थित अचंबित झाले. दुःखाने हिला मानसिक धक्का तर नाही ना बसला? हीच काळजी सर्वांच्या चेहऱ्यावर उमटू लागली. एव्हाना त्या स्त्रीने सुरांचा अंदाज घेण्यासाठी डोळे मिटले होते. तानपुऱ्याची तार छेडत अलगद 'सा' लावला आणि जितक्या उत्कटतेने अश्रू येत होते, तितक्याच तन्मयतेने सूर उमटू लागले. आलापामार्फत हळुवार पावलांनी सुरांची मैफिल त्या खोलीत प्रवेशत होती.

◆◆◆ ● ◆◆◆

“अय्या.. कसली भारी आहे हो ही जागा! कशी शोधून काढलीत ती?"

"शोधलं बाई पन्नास जणांना विचारून."

"मानलं हो तुम्हाला! मी काहीतरी वेडसर कल्पना मांडावी. अन काही दिवसात ती पूर्ण देखील व्हावी!“

चारुलता आणि जयंतच्या लग्नाचा आज वाढदिवस. लग्नानंतरची दहा वर्षे चुटकीसरशी कुठे गुडूप झाली कळतही नव्हते. यावर्षीचा लग्नाचा वाढदिवस वृद्ध लोकांसमवेत साजरा करायचा असा चारूचा आग्रह होता. आपल्या जोडीदारासमवेत आयुष्याची तीस-चाळीस तर कुणी पन्नास वर्षे व्यतीत केल्याचा प्रवास कसा असेल, त्यांचे नाते किती समरसलेले असेल, ही भावनाच तिला सतत ओढून घ्यायची. आपल्या बायकोच्या या अशा वेड्या कल्पना जयंतला खूप हव्याहव्याशा वाटत. खूपसे प्रयत्न केल्यानंतर, तिच्या कल्पनेप्रमाणे ऍनीव्हर्सरी साजरी करण्याजोगे एक ठिकाण सापडलेच.

पुण्यापासून जवळपास पन्नासएक किलोमीटरवर डोंगरालगत वसलेल्या गावात, 'हिरवळ'' नावाचा एक छोटेसे वृद्धाश्रम होते. प्रवेशद्वारावर रेखाटलेले टॉम आणि जेरीचे हसरे चेहरे पाहिल्यावर, 'आपण एखाद्या नर्सरी स्कुलमध्ये तर जात नाही ना?' हा प्रश्न पडावा. आत प्रवेश केल्यावर आपले बोट पकडून आत नेण्यास मध्यम उंचीची फुललेली चाफ्याची झाडे उत्सुकतेने उभी होती. आत जाता जाताच वड, पिंपळ आणि अजून अनोळखी अशी ४-५ मोठाली झाडे ओळीने आपली थंडगार सावली देत उभी होती. पुढे गेल्यावर दोन मजली डौलदार कौलारु वास्तू दिसली. डाव्या बाजूस एका जमिनीच्या तुकड्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांचे वाफे होते. एक वृद्ध जोडपं वाफ्यातल्या वांग्याची तोडणी करत होते. वृद्धाश्रमाच्या अंगणात एक इवलेसे दगडी तुळशी वृंदावन डेरेदार पिंपळाच्या पायाला मिठी मारून बसले होते. 

हे सर्व अनुभवत दोघांची पावले तिथे लहान मुलाच्या उत्सुक चालीने रेंगाळत राहिली. इतक्यात त्यांना  केबिनमध्ये चाळीशीतले एक गृहस्थ काहीतरी लिहीत असलेले दिसले. जयंतने त्यांच्याजवळ वृद्धाश्रमाविषयी विचारपूस केली. त्यांनीही तितक्याच आत्मीयतेने माहिती द्यायला सुरुवात केली, " माझं नाव सुधीर जाधव.. या “हिरवळ”चा सध्याचा संचालक. "हिरवळ" माझ्या आजोबांनी ३० वर्षांपूर्वी चालू केले होते."

"अच्छा.. 'हिरवळ' नाव किती सुंदर सुचले हो त्यांना आणि शब्दशः इकडे हिरवळही मोहक आहे अगदी." चारुलता.

"अहो खरं तर आजी हे जग सोडून गेल्यावर एकटेपणावरचे औषध म्हणून त्यांच्या मनात ही कल्पना आली. त्यांनाही सवंगडी मिळाले आणि काहीतरी समाजकार्यही झाले. त्यांनी रुजवलेली हिरवळ आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय इतकेच."

दोघांच्याही चेहऱ्यावर या कार्याबद्दलचे आदराचे भाव होते. जयंतने विचारले,

"इथे बरेचसे पैंटिंग्ज आणि मुर्त्यासुद्धा दिसल्या हो. छान कलेक्शन आहे तुमचं."

"अच्छा. ते होय? आमच्या मेम्बर्सनी बनवलेले आहेत. कसं असतं ना, प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यात, संसाराच्या ओढातानीत दबून गेलेले काही छंद असतात. ते जोपासण्यासाठी त्यांना आम्ही उद्युक्त करतो इतकंच."

एवढ्या संवादात सुधीरशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. इथे आल्यापासूनच दोघांच्याही डोळ्यात समाधान तरळत होते. इतकी वर्षे घराची जी व्याख्या त्यांच्या स्वप्नात रेंगाळत होती, ते घर अगदी जस्सेच्या तसे समोर होते. चारुलताला वाटले, की बॅग भरावी आणि इकडेच यावे रहायला!

दुपारी पिंपळाच्या सावलीत मस्तपैकी पंगत बसली. जेवणापेक्षा गप्पा, हसणे खिदळणेच जास्त होते. वाऱ्याच्या लयीत डुलत, सळसळ आवाज करत पिंपळही पंगतीतल्या हास्यात सामील होत होता. एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्या, दिलखुलास चेष्टामस्करी आणि अगदी के एल सेहगलपासून ते रफी, किशोरपर्यंतचे संगीताचे विषय त्यांच्या बोलण्यात होते. त्या वातावरणात काहीतरी वेगळीच जादू होती. एरव्ही संकोचून मोजकेच हसणाऱ्या जयंतला आज खदाखदा हसताना पाहून चारूलता मात्र भलतीच सुखावली. जेवणानंतर तिथल्या स्त्रियांनी चारुला ठसकेबाज नऊवारी नेसवली. कुणी आपली बोरमाळ, कुणी लक्ष्मीहार तर कुणी आपली नथ घालायला लावून छान नटवले. सर्वजणी जणू काही स्वतःचे तारुण्य पुन्हा तिच्यात पाहत होत्या. ती बाहेर आली आणि तिचे खुलून आलेले सौंदर्य पाहून जयंतच्या हृदयाचा ठोकाच चुकला!  

दिवस संपताना आता तेथून पाऊल निघत नव्हते. पण अवनी शाळेतून येइपर्यंत घरी पोहचायला हवे होते. 'येताना माझ्यासाठी केक घेऊन यायचे' या अटीवर लेकीने आपल्या आई वडिलांना फिरायला जाण्याची मुभा दिली होती. 

तिथून निघताना चारुलता म्हणाली,

"माझ्या मनात अजून एक कल्पना आहे."

"हाहाहा.  तुझं मन शांत बसतं का कधी? काही ना काही नवीन चालूच असतं."

"बरं नाही सांगत. जा..."

"अगं गंमत केली. सांग सांग."

दोघेही चालत बाईकपर्यंत आले. हिरव्यागार गवतामध्ये छोटी छोटी रानफुलं उमलली होती. त्या रानफुलांकडे पाहत दोघे काहीवेळ बाईकला टेकून उभे राहिले. जयंतच्या आग्रहानंतर तिने आपली कल्पना मांडली. त्याला क्षणभर विश्वासच बसला नाही की हिची अशीही काही इच्छा असेल. कल्पना भलेही प्रवाहात बसणारी नसेल, पण त्यावर तो जाम खूष झाला. काही वेळातच बाईक पुण्याच्या दिशेने निघाली.

                        ◆◆◆ ● ◆◆◆

झाकोळल्या खोलीत तानपुरा कंप पावत होता आणि बंदिश आकार घेत आता लयकारीमधे पोहोचली. तिथल्या सर्वांनी आजपर्यंत कित्येक सांगीतिक मैफिलींचा अनुभव घेतला होता. पण ही वेळ कधीही कल्पना न केलेली अशी होती. प्रसंग दुःखाचा आहे हे माहीत असूनही, ते सूरही दुर्लक्ष करता येणारे नव्हते. न राहवून सावंतांनी कॉटच्या शेजारी असलेला तबला घेतला आणि त्या गायनाला विलंबित तालात बांधण्याचा प्रयत्न करू लागले. 

                              ◆◆◆ ● ◆◆◆

पंचवीस वर्षांनंतरही हिरवळचा आत्मा जसाच्या तसाच होता. आजही इथे कलेला अनन्यसाधारण महत्व होते. मैत्री आणि हास्य हा इथला गाभा होता.

इथले बरेचसे मेंबर्स काही ना काही कला जोपासत होते. तबला विशारद शशांक सावंत, मूर्तिकार रामभाऊ काटेकर, चित्रकार यशोदा मोडक हे तर इथे आपली कलाच समृद्ध करण्यास आले होते.

सुधीररावांनंतर, त्यांचा धाकटा मुलगा अमेय हिरवळची सगळी व्यवस्था पहायचा. तसा तो तर लहान असल्यापासूनच इथल्या सगळ्या म्हाताऱ्यांचा लाडका होता. सर्वांची अगदी जातीने काळजी घ्यायचा. प्रत्येक मेम्बरचे पथ्यानुसार जेवण, वेळेवर औषधे घ्यायला लावणे आणि सकाळी प्राणायाम योगासने करून घेणे याबाबतीत तो एकदम काटेकोर असे. 

लग्नाच्या दहाव्या वाढदिवशीच ठरवल्यानुसार, यंदा जयंतराव आणि चारूलता हिरवळ मध्ये दाखल झाले. दोघांनीही वृद्धापकाळात प्रवेश केला असला तरी, आता या नवीन संसारात त्यांचे आयुष्य कात टाकत होते. जयंतरावांनी या पंचवीस वर्षात संगीताची कडक साधना केली. वेगवेगळ्या रागात नवनवीन आयाम पार करत, देशातल्या विविध मैफिलींत आपल्या गायकीची छाप सोडली होती. कार्यक्रमांमुळे बहुतांश दिवस त्यांना कुटुंबापासून दूरच राहावे लागायचे. घरी असल्यावर रियाज आणि व्यासंगातून राहिलेला वेळ चारुलता आणि अवनीच्या वाट्याला यायचा. या माणसाला कधीही अहंकाराचा वारा शिवला नसल्याने, त्यांचा स्वभाव म्हणजे भुसभुशीत मऊशार जमीनच!  

चारुलतालाही शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड! परंतू इच्छा असूनही जयंतरावांच्या कार्यक्रमांना हजर राहता येत नसे. मग जयंतरावांचा पहाटेचा रियाज हीच तिच्यासाठी खास अशी मैफिल असायची. तिने आपल्या नावे आलेल्या टाचक्या वेळेची कधीही तक्रार केली नाही. उलट परिस्थितीचा नूर जोखत संसार हसरा ठेवला. त्यांच्यातली आंतरिक ओढ इतकी सहज स्फुरलेली होती, की दोघांनीही नात्याला अपेक्षेच्या जंजाळात कधीच अडकवले नाही. दोघांमधील प्रेम वयानुसार मुरत होते, रुजत होते, फुलत होते.  

साठीत पाऊल ठेवल्यावर जयंतरावांना प्रवास आणि धावपळ जमेनासे झाले. रसिकांसाठी गात असताना गायनामधे मनसोक्त विहार केला. आनंद मिळवला पण आतून एक रुखरुख वाटत होती. गायनाच्या दुनियेत इतकं खोल जावं वाटत होतं की तिथे श्वासच बंद व्हावेत. त्यानंतर त्यांनी सादरीकरणातून निवृत्ती घेतली. आणि स्वतःसाठी गायचं हे ठरवूनच टाकले.  

अवनीचे लग्न झाल्यावर घरी आता दोनच डोकी राहिली. मनासारखा जावई मिळाल्याने तिची चिंता मिटली आणि दोघांनाही 'हिरवळ'च्या कल्पनेची प्रकर्षाने आठवण होऊ लागली. लवकरात लवकर तिकडे शिफ्ट होण्याचे वेध लागले. पण ही गोष्ट अवनीला पटवून देणे, हेच मोठे दिव्य असेल हे कधी ध्यानीमनी आलेच नाही. तिच्या मते, माझ्या आईवडिलांनी निराधार असल्यासारखे वृद्धाश्रमात का रहावे? अवनीच्या नवऱ्यानेतर दोघांनाही आपल्यासोबत मुंबईला येऊन राहण्याविषयी बजावले. जयंतरावांनी लेक आणि जावयाला, त्यांची "हिरवळ" वृद्धाश्रमाची पंचवीस वर्षांपूर्वीची भेट कथन केली. हिरवळसारख्या वातावरणात राहणे ही त्या दोघांची उतरवयातली ड्रीम लाईफ होती. पोरीला हे सगळं पटवून देताना, जणू काही प्रेमविवाह करण्यासाठी आईची परवानगी मागतोय असा फील येत होता. सरतेशेवटी अवनी मॅडम आपल्या मातापित्याला वृद्धाश्रमात राहू देण्यासाठी कशाबशा राजी झाल्या. 

इतक्या वर्षांच्या दगदगीच्या आयुष्यात एकांताचे मोजकेच क्षण हाती आले होते. कित्येक शब्दांचे ढग दाटूनही, न बरसताच आल्या वाटे परतायचे. पण आता हिरवळमधे शब्द सरींसारखे कोसळत होते. दोघे तासनतास गप्पा मारायचे. गायन, तत्वज्ञान, नात्यांच्या छटा अशा कितीतरी गुजगोष्टी होत होत्या. शिवाय तेथील नवीन मित्र मैत्रिणींमध्ये जगताना रोज वेगळीच धमालच असायची.

आता मैफिली पूर्ण बंदच केल्याने, जयंतरावांना भरपूर मोकळा वेळ मिळायचा. पूर्ण आयुष्यात खूप दगदग झाली होती. आता मोकळ्या वेळेत त्यांना चैन पडायचा नाही. मग विशारद झालेली दोन मुले जयंतरावांकडे पुढची तालीम घेण्यासाठी येऊ लागली. त्यांना शिकवताना जयंतराव आपली संगीताची पूर्ण ओंजळच रीती करत. मागील तीन महिने हंसध्वनी रागाची तालीम सुरू होती. आज हंसध्वनीला विराम देऊन पुढच्या आठवड्यापासून जयंतरावांचा आवडता, मारवा राग सुरू होणार. आजची तालीम संपली. जाण्याआधी त्यांच्या विद्यार्थ्याने, त्याला एका ऑनलाईन सोलो कार्यक्रमासाठी विचारणा झाल्याचे सांगितले. सादरीकरण करण्याइतपत आपली तयारी आहे की नाही हीच त्याला शंका होती. आपले विद्यार्थी आता सादरीकरण करू लागतील, ही कल्पना करून जयंतरावांना आनंदही झाला आणि गुरूमनाला काळजीही वाटली. 

"बाळा, कार्यक्रम घ्यायला काहीही हरकत नाही. उलट सादरीकरण करताना तुम्ही ते अजून गंभीरपणे आत्मसात करता. शेवटी बघ, कला जितकी आपली, तितकीच रसिकांसाठीही असते. रोज सुरांची पूजा करतोस, आता त्याचा प्रसाद वाटायला जातो आहेस असं समजून गा. तयारी काय रे, त्यासाठी आयुष्य कमी पडतं आपलं. किशोरीताई आमोणकरांसारखी गानसरस्वतीसुद्धा सादरीकरणाआधी बेचैन व्हायची. "आज मला राग दर्शन देईल की नाही" ही बेचैनी! आणि या समर्पित भावनेमुळे त्यांच्या गायनातून राग स्वतः साक्षात्कार द्यायचा. आणि हो, दिवसभराचा व्यवहार सुरू होण्याआधी, पहाटेच्या रियाजात संगीताशी आपलेपणाने संवाद साधायचे थांबवायचं नाही. संयमाने सुरांची आळवणी करायला सुरुवात कर. ते स्वतः ज्या क्षणी समाधीतून जागृत होऊन तुमच्या कणाकणात वावरतील, तेव्हा तुमचीही समाधी लागली असेल. हे आयुष्य मिळाल्याची कृतकृत्यता वाटते रे अशावेळी. हे अनुभवण्यासाठी घाई उपयोगाची नाही आणि त्याच्या प्रयत्नासाठी वेळही दवडू नकोस.

तुझ्या सादरीकरणासाठी खूप आशीर्वाद. तुझा मारूबिहाग राग खूप छान झाला होता. तोच घे. आपण घेतलेली बंदिश नको. माझ्याकडे अजून एक बंदिश आहे ती घेऊ."

महेशला आज गाण्याविषयी वेगळीच दृष्टी मिळाली होती. त्याचवेळी खिडकीआडून हा संवाद ऐकलेल्या चारुलताचे डोळे डबडबले होते. आपल्या नवऱ्याविषयीचा आदर अजूनच दुणावला होता.

महेश निघून गेल्यानंतर चारुलताने लगेचच रियाजाच्या खोलीत पाऊल टाकले. भरलेले डोळे पाहून जयंतराव चमकलेच! जागीच उठले आणि तशाच चमकल्या शब्दांत विचारले,

"चारू काय झालं गं?"

"काही नाही हो.. तुम्ही आता जे महेशला सांगितलेत ते ऐकून भरूनच आलं. खरंच असा अनुभव कुणी घेऊ शकते गाताना?"

"उगीच मी वेडा होऊन खस्ता खाल्ल्या का गं या गाण्यासाठी? गाणं.. ते आहेच अतर्क्य असे अनुभव देणारे."

"मी इतकी वर्षे शास्त्रीय संगीत मन लावून ऐकतेय. श्रवणातच माझं मन भरून जायचं. पण तुम्ही बोललात ही सुरांची बाजू माहीतच नव्हती मला. मला शिकायचंय गाणं. (स्वतःशीच हसून) बघा ना.. तीस-पस्तीस वर्षे तुम्ही सोबत असताना, मला गाणं शिकावंसं वाटलं नाही. आणि आता वाटलं, तेही पन्नाशी ओलांडल्यावर!"

"अगं कला वय बघत नाही, इच्छा पाहते. तुझी इच्छा आहे ना.. बस्स! इतकंच काय, या वयातही तू संगीतातली कुठलीही उंची गाठू शकतेस."

"मला शिष्य म्हणून स्वीकाराल? तुम्ही म्हणाल तितका वेळ मी बसेन. पण मला शिकायचंय."

"तूझ्या श्रवणातली तन्मयता जेव्हा जेव्हा पहायचो, तेव्हा माझ्याच मनात पन्नासवेळा येऊन गेलं होतं, की तू गायन शिकण्याचा प्रयत्न करावास. पण वाटलं की मी कला लादतोय की काय तुझ्यावर. बर चल.. गेलेल्या वेळेवर चर्चा करून काय उपयोग. उद्यापासून गायन शिकणे सुरु. रोज एक ते दीड तास तरी बसायचे. पहिले आपण स्वरज्ञान पक्के करून घेऊ आणि मग हळूहळू रागदारीकडे वळू."

संध्याकाळ झाली आणि काळोख चढाओढ करत खोलीत पसरू लागला. चारुलता तुळशीपुढे निरांजन लावण्यासाठी निघून गेली. इतक्या वर्षांनंतरही, पिंपळाखालचे तुळशी वृंदावन आहे असेच होते. पिंपळाचे खोड आता वृद्धत्वाकडे झुकत चालले असले तरी पानांची सळसळ अजूनही हसरीच होती. जयंतराव खिडकीतून तुळशीकडे पाहत होते. निरांजन लावता क्षणीच चारुलताचा चेहरा अस्पष्टसा दिसू लागला. पण त्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट होता. हे कोरे क्षण दोघांच्याही मनात खूप काही लिहून ठेवत होते.

"हिरवळ"मध्ये येऊन आता यांना चार वर्षे झाली. जयंतराव बाहेरचे कार्यक्रम स्वीकारत नसले तरी मुलाखत, सांगीतिक चर्चेसाठी जाणकार लोकांचे येणेजाणे व्हायचेच. हिरवळमधील मित्रांच्या आग्रहाखातर प्रत्येक दिवाळीस एक मैफिल व्हायचीच आणि त्यास पुणे मुंबईचे रसिक हमखास हजेरी लावत. या चार वर्षांत त्यांनी थोडासा ठेहराव घेत संगीताच्या विविध छटांवर चिंतन केले होते. ईश्वराच्या अवतारांप्रमाणे, प्रत्येकवेळी रागाचे नवीनच रुपात दर्शन व्हायचे आणि लहान मुलाच्या उत्सुकतेने जयंतराव अचंबित होत. चारुलता त्यांच्या या न संपणाऱ्या शोधप्रवासाची एकमेव साक्षीदार होती. शिकवताना त्यांच्यातला तोच प्रवाह तिच्या नेणिवेत अखंड वाहत होता. आता चारुलताचे गायन वेग पकडत होते. पहिल्या वर्षी सुरांना स्पर्श करत त्यांना जाणून घेतले आणि नंतर भूप, दुर्गा, यमन, बागेश्री या रागांशी ओळख होत गेली. रागाचा मूड बंदिशीच्या शब्दांनी नव्हे तर फक्त सुरांमधूनच व्यक्त करता आला पाहिजे ह्याबाबत जयंतराव खूप आग्रही असायचे. तालाच्या आधाराने रागाचा संथपणे विस्तार करण्याचे कसब ती आत्मसात करत होती. वयोमानानुसार तिला खाली मंद्र सप्तकात सूर आणताना थोडे अवघड जायचे, पण मध्य सप्तकातले सूर उत्तम लागत होते. 

हिरवळमधील इतर सदस्य त्या नवरा बायकोचे नव्याने होऊ घातलेले गुरूशिष्याचे नाते कुतूहलाने पाहत होते. 

काही दिवसांपासून जयंतरावांना पोटदुखीने घेरले. कधी पहाटे उठल्यावर किंवा जेवल्यानंतर लगेच सर्रकन कळ येऊ लागायची. पचनात बिघाड झाला असेल म्हणून सावंतांच्या सांगण्यानुसार घरगूती उपाय चालू केले. चारुलताला त्यांनी सांगितले नसले तरी दोन-तीन वेळा पोटात दुखलेले पाहिल्यावर, तिने आपल्या गुरूला चांगलेच दमात घेतले.

"अहो पाच दिवस झाले, पोटात दुखतंय आणि मला न सांगता सावंतांचं ऐकून काही तरी घरगुती उपाय बसलात? सावंत तबल्यावर उत्तम साथ करतात म्हणून काय आजारात डॉक्टर बनून साथ करणार का तुम्हाला? आज मी काही ऐकायची नाही. डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि येत नसाल तर मग अमेयला सांगते."

"बाई, त्याला कशाला सांगतेस? एवढ्याश्या कारणासाठी तो आश्रम डोक्यावर घेईल आणि मग सावंताचंही काही खरं नाही."

अमेय त्यांच्या मागेच उभा होता. "काका मी इथेच आहे बरं! ऐकतोय सगळं. जर असं कुणी तब्येतीची हेळसांड करताना दिसलं तर मी आश्रम डोक्यावर घेणारच ना. ते काही नाही, आज काहीही करून दवाखान्यात जाऊन यायचे. मी थोड्या वेळात गाडी अरेंज करतो."

पुण्यात डॉक्टरांकडे दाखवून आले. त्यांनीही चार पाच टेस्ट करून घेतल्या आणि आतड्याला थोडी सूज असल्याचे त्यांनी निदान केले. अजून एमआरआय टेस्टचा रिझल्ट यायचा बाकीच होता. तरी नंतर चारुलताला फोन करून डॉक्टरांनी काही सूचना केल्या, विशेषतः सतर्कता म्हणून जयंतरावांनी काही दिवस तरी रियाज टाळावा हेच सांगितले. इकडे जयंतरावांना चारूच्या गायनात काही खंड पडू द्यायचा नव्हता. 

आज मारवा रागाची तालीम सुरू होती. रागविस्तार करून झाल्यावर मात्र चारु चुकू लागली. डॉक्टरांनी गायला मनाई केल्यामुळे, जयंतरावांना तो गाउन ही दाखवता येत नव्हता आणि त्यामुळे त्यांची बेचैनी वाढू लागली.

"नाही गं. काहीतरी चुकतंय. पुन्हा घे बरं आलाप."

"अहो आता तिसऱ्यांदा घेतेय पण काय चुकलं ते तरी सांगा?"

"मारवा रागामध्ये मध्ये 'प' स्वर वर्ज्य असतो, मग तो येतोच कसा तुझ्या आलापामधे? रागाचा मूळ स्वभावच चुकवलास तर कसं होईल चारू? अजूनही अधेमधे  'रे' शुद्ध लागतोय. 'रे' कोमल हवा, हे सुद्धा चार वेळा सांगितले. तो वादी स्वर असल्याने तुझ्या रागविस्तारात वारंवार यायला हवा. त्याचवेळी त्याची हळूवारता तुझ्यात आणि मारव्यात भिनेल."

चारू काहीशी हताश झाली. 

"बरं... आता आणखी थोडा रियाज करते. पण का नाही हो जमत हे? सर्व नियम माहीत असताना, गाताना ती चुक लक्षातच येत नाही. माहीत नाही, का असं होतंय. तुमचा मारवा ऐकताना उत्कटतेपर्यंत पोहोचल्यासारखा वाटतो. मी मात्र मधेच कुठे अडखळतेय. काय करू हो?"

"चारू.. या प्रश्नावर तांत्रिक असं काहीच उत्तर नाही. गुरुत्व पत्करण्याचा शाप हाच असतो. काही गोष्टी फक्त अनुभवलेल्या असतात, सांगीतिक भाषेत मात्र सांगता येत नाहीत. जसं की सोनचाफा आणि मोगऱ्याच्या सुवासातला फरक शब्दांतून सांगता येईल का गं? आणि इथे फक्त बघ्याची भूमिका घ्यायची जीवावर येते. असो.. इथून पुढे फक्त तू आणि राग, दोघांनीच काय ते पाहून घ्यायचं. फक्त एक सांगू शकतो.. आपलं मन जर गायनात उपस्थित नसेल तर गाणं मृगजळासमान भासतं. तू कितीही जवळ जाण्याचा प्रयत्न कर, ते तेवढीच पावले तुझ्यापासून दूर असेल. मला असं वाटतं की आजकाल तूझं पूर्ण अवधान गाण्यात नाहीये. माझ्या आजारपणाचा विचार करतेस हेही दिसतं मला. पण म्हणून तू गाण्याशी प्रतारणा नाही करू शकत. तू सगळं जग विसरून त्यात रम. मी किंवा तू आज किंवा उद्या जाणारच आहोत, मग कशाला व्यर्थ चिंता करतेस? मी जरी उद्या सोबत नसलो तरी संगीत तुझ्या जगण्याचे कारण बनेल."

चारुचे डोळे काठोकाठ भरले. 

"करते मी प्रयत्न. नक्की."

"चारू... तुला भान विसरून मारवा गाताना पहायचंय गं एकदा. सूर असे लागायला हवेत की क्षण स्तब्ध होतील. वाराही सुरेल होऊन तुझ्या आलापाला साथ देईल. त्यात इतकं झोकून दे, की एखाद्या मरणोन्मुख जीवात क्षणभर का होईना जान ओतावी त्या सुरांनी. आयुष्य कधीतरी संपणार आहेच, त्याची अजिबात भीती नाही. पण यावेळी....."

"थांबा... उगाच काहीबाही बोलू नका. काही नाही होत तुम्हाला. साधा अल्सर आहे. माझ्यासाठी तुम्ही अजून खूप वर्षे पाहिजे आहात."

"हे बघ मला मरणाचं दुःख किंवा भय नाहीये. डॉक्टर काही बोलत नसले तरी त्यांचा चेहरा सांगून गेला की त्यात काहीतरी किचकट प्रॉब्लेम आहे. उलट असं वाटतं, की ज्या माणसाला आपला शेवटचा दिवस कधी आहे याची कल्पना असते ना, तोच माणूस भारी आयुष्य जगू शकतो आणि मी तेच करणार. मग तू ठरव, की मी अजून भरपूर जगेन या खोट्या आशेत नॉर्मल जीवन जगायचं, की मी कधीतरी जाणार आहेच या जाणिवेत माझ्यासोबत आयुष्यात राहून गेलेली सुरांची एकत्र सफर करायची."

चारूलता ने तानपुरा बाजूला ठेवला आणि जयंतरावांच्या बाजूला येऊन बसली. हातात हात दिला आणि आपला त्या सफरीला होकार कळवला.

"माझी विद्यार्थिनी मोठी आणि समजूतदार झाली म्हणायची आता."

चारू छानशी हसली. "काहीतरीच काय हो?"

"अजून एक सांगू? मला एक गोष्ट सतत टोचणी लावून राहते. मी गाण्यात रमलो असताना, तुझ्या वाट्याला नकळत व्यवहार आणि संसाराची पूर्ण जबाबदारी दिली ना गं मी?"

"संसार सांभाळण्याचं काही नाही हो.. पण पूर्ण जग तुमच्या मैफिलींचा अगदी समोरून आनंद घ्यायचे, मला मात्र कॅसेट वर ऐकावं लागायचं. हेवा वाटायचा त्या रसिकांचा. पण आता तर तुमचा प्रत्येक क्षण माझ्याजवळ आहे. यापेक्षा काहीही नको मला. आतापासून या हृदयाचा प्रत्येक कोपरा या सुरांच्या हवाले! एक सांगा. इतक्या सर्व रागांमधे तुम्हाला मारवा इतका का आवडतो?"

"अगं. किती आणि काय बोलावं या मारव्याबद्दल... 'प' सारखा अचल स्वरच वर्ज्य करायचं धारिष्ट्य दाखवल्यामुळे, अपूर्णतेचा स्पर्श घेऊनच जन्माला आलाय हा. गायन झाले तरी 'हरवलेलं काहीतरी अजून गवसायचंच आहे' याची जाणीव होते. ती पूर्ण करता करता गायक अजून गात राहतो आणि त्यात स्वतःलाच गवसतो. अगं मी कितीवेळा याच्यासमोर हरून भर मैफिलीत हताश होऊन बसतो, पण काही वेळाने हा मायेने जवळ घेतो आणि स्वतःच स्वतःला माझ्या गळ्यातून गाउन घेतो. सर्व म्हणायचे, 'पंडीतजी, क्या बेजोड गाया आपने.' अगं कुठलं आणि काय बेजोड? काही क्षणापूर्वी हरून कफल्लक झालेल्या गायकाला हे कौतुक ऐकायला मिळणं म्हणजे काय असेल तो मारवा...! चारू.. पूर्ण गायकी उधळावी या रागावर...!"

जयंतरावांना अश्रू थांबवत नव्हते. आभाळालाच भगदाड पडल्यावर, तो कोसळायचा राहील का? जयंतरावांच्या आताच्या शब्दांमुळे, तिच्या मनातले हजारो स्तरांचे आभाळ बाजूला सारून आकाश निरभ्र झाले. उत्तर गवसले. चारुलताने त्यांचा हात हाती घेतला आणि निःशब्द बसून राहिली. शब्द उंबरठ्यावरच अडखळतात, तेव्हा स्पर्शच योग्य ते बोलू शकतो. 

तसे आतापर्यंतचे आयुष्यही मारव्यासारखेच तर गेले होते. त्यांच्या लग्नाची पस्तीस वर्षे आनंदात जाऊनसुद्धा अजूनही काहीतरी शोधायचे राहिलेय असे वाटायचेच. पण कुठेतरी तिलाच जाणवले, की खरे तर नात्यात अपूर्णता असणे चांगलेच. अपूर्णता नात्याला काहीतरी उद्देश्य देत राहते.

"चारू... कुठं हरवलीस? काय विचार करतेयस?"

"अहो... मी कुठे. मारवा उलगडताना तुम्हीच हरवलात. पण आज उत्तर सापडलं हो. मी गाईन. मी त्याच्यासमोर असंख्यवेळा हरायला तयार आहे, पण तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की चारूचे मन आज गाण्यात नव्हते! कधीतरी मारवा माझ्याही गळ्यातून गाईल बघा."

चारुलता मात्र भरल्या मनामुळे काहीही बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यासमोर भरल्या पावलांनी सांज येत होती. पृथ्वी बिचारी झोपेच्या राज्यात प्रवेश करत असता, सूर्य आपली मिठी हळुवार सैल करत प्रस्थानाच्या तयारीत होता.

दिवसेंदिवस जयंतरावांची तब्येत अधिकच खालावत चालली होती. काही दिवसांतच डॉक्टरांनी आतड्याच्या कॅन्सरचे निदान झालेले कळवले. ते कळेपर्यंत कॅन्सर वाव मिळेल तसा पसरत चालला होता. अवघडात अवघड तानही लीलया सोडवणाऱ्या ह्या गायकाला, आज एकेक शब्द बोलताना वेदनांशी झुंजायला लागत होते. ही बातमी ऐकताच अवनीही आता त्यांना मुंबईला घेऊन जाण्यास आग्रही झाली. पण डॉक्टरांनीही आता काहीच उपाय होऊ शकणार नसल्याचे सांगितले होते. जयंतरावांनी स्पष्ट शब्दांत अवनीला सांगितले की, त्यांचं आता जे काही व्हायचं ते इथेच या हिरवळीत व्हावं. अवनीही त्यांच्या इच्छेचा मान ठेऊन जड पावलांनी परतली.

रोज पहाटे उठणाऱ्या जयंतरावांचे डोळे उघडण्यास हल्ली सात तरी वाजायचे. उठल्यावर 'चारू.. रियाज केलास?' हाच पहिला प्रश्न असायचा.

बोलतानाही काहीसा त्रास होत असला तरी गाण्याविषयी बोलणं काही थांबायचे नाही. "चारू..... रियाज.... थोडाच वेळ करतेयस सध्या.... मला आवाज... येतो बर का.. तुला आधीच सांगितलंय ना मी? एकदा तानपुरा हातात घेतलास... की तू मलाच काय स्वतःलासुद्धा विसरून जायचं."

"अहो.. डॉक्टरांनी काय सांगितललंय..? जास्त बोलायचे नाही. बोलल्याने पोट आणखी दुखू लागतं ना? मी करतेय हो रियाज. थोडा कमी होतो इतकेच."

"अगं... या वेदना म्हणजे, गाण्यात कधीतरी चुकारपणा किंवा आळस केल्याची शिक्षा असेल. आता कळतंय की सूर गळ्यातून येत नसतात, तर पोटातून येतात. पण तुझ्या रियाजाच्या आवाजाने खूप सुख वाटतं बघ. बडा ख्याल गाताना मात्र अजून सुरांच्या जागा चुकतात काही ठिकाणी.. पण शिकशील.. मला खात्री आहे.. आणि हो.. अवनीच्या बाळालाही संगीताचे धडे तूच द्यायचे. गाणं ऐकलं की लगेच डोळे किलकिले करत अंदाज घेतं बघ ते."

"हो ना.. नक्की शिकवणार त्याला. पण आता झोपा बरं थोडा वेळ तरी. औषध आपलं काम करणार नाही मग."

सकाळ मंदपणे सरकली. दुपारचं जेवण करताना घास गिळला की लगेच पोटात दुखू लागले. मोजून चारच घास खाल्ले आणि थोड्यावेळाने डोळ्यावर हलकीशी झापड आली आणि चारुलताच्या मांडीवर त्यांनी डोकं टेकलं. औषधांच्या गुंगीचे साम्राज्य शरीरभर पसरू लागले. खोलीत पांढरीफटक शांतता पसरली होती आणि दुसऱ्या खोलीतून रेडिओवर लागलेली प्रभा अत्रेंची ठुमरी ऐकू येत होती.

चारुलताला अचानक जयंतरावांचा श्वास जड होऊ लागल्याचे जाणवले. खूप काळजी वाटू लागली. अमेयला बोलवावे म्हणून पटकन बाहेर आल्या. अगदी वाऱ्याच्या वेगाने पळावे वाटत होते पण पायातले अवसान गळून पडले होते. त्यांना पळत येत असल्याचे पाहताच तोच पटकन बाहेर आला.

काही वेळातच डॉक्टरांना बोलावले आणि गरज लागल्यास असावी म्हणून अँम्ब्यूलन्सही होती. पण जयंतरावांनी हॉस्पिटलमध्ये जायला स्पष्ट नकार दिला. काहीही झाले तरी आता जगून, त्याच वेदना वारंवार अनुभवायच्या नव्हत्या. संथ होत चाललेली नाडी पाहून डॉक्टरांनीही आग्रह केला नाही. जयंतरावांचे श्वास चालू ठेवण्याचे सोपस्कार देवावर सोपवण्याशिवाय उपाय नव्हता. आता फक्त परतीची वाट होती.

अँम्ब्यूलन्स आलेली पाहताच सगळ्यांनी जयंतरावांच्या खोलीकडे धाव घेतली. सगळे काळजीत होते. आजपर्यंत या वास्तूमधून त्यांनी बऱ्याच मित्रांना आयुष्यातून निरोप दिला होता आणि त्याच हिरवळीतले अजून एक पिकले पान आज गळून पडत होते.

                        ◆◆◆ ● ◆◆◆

आज सुरांना अवचित जागा सापडत होती. चारुलताच्या गळ्यातून जणू हार्मोनियम आणि तानपुरा जीव हरपून गात होते. तिच्या हृदयाची स्पंदने आणि मारवा एकरूप झाले होते, कारण तिच्याही आयुष्यातुन एक अचल स्वर शेवटचा श्वास घेत होता. 

"पिया~~~~ घर नही~~~~ आ~~~ये~~रे~~
मेरे~~~~~ पल~~ पल~~ छिने~~~ जाये ~~"

प्रत्येक शब्दात आणि आलापामध्ये जीवनाची पस्तीस वर्षे उलगडत चालली होती. जलपर्णीने नदीला झाकोळून टाकावे, तश्या त्या आठवणी मनातल्या दुःखाला बंदिस्त करू पाहत होत्या. 

बडा ख्याल आता शेवटच्या तानेवर येऊन ठेपला. चारुलताच्या आवाजात एक धार आली. आज मूर्की, मिंड अशा हरकती सफाईदार येत होत्या. समाधिस्थ शिवाची वाट पाहत कित्येक युगे नंदीने द्वारावर बसून रहावे, असेच ते सूर ठेहराव घेऊन रेंगाळत होते.

एव्हाना सावंतांनी तबल्यावर धरलेला ताल, सुरांचे सांत्वन करू पाहत होता. तिथे उभे असलेल्या लोकांचे जीव कानात येऊन ठेपले होते. अवनीही धावत पळत आली आणि आईच्या गाण्याचा आवाज ऐकून भरल्या डोळ्यांनी दारातच थबकली. हवा जोरदार वाहू लागली आणि पावसाच्या तुषारांनी अवेळी हजेरी लावली. चारुलताचा जीव आता कंठात आला होता. इतके सुरेल गाऊन तिच्या गुरूला आज ते कुठे ऐकू जाणार होते? तो तर रियाजाच्या बैठकीला शेवटचा नमस्कार घालून निघालाही असेल. 

अगदी काही सेकंदात ती बंदिश संपणार होती. तिने शेवटची तान घेण्यासाठी सूर चढवला आणि तिची समाधी लागली. सगळं काही विस्मरण होऊन आसपासचे जग निरव झाले आणि त्याच क्षणी जयंतरावांच्या डोळ्यात एक चेतना आली. चारुकडे भरल्या डोळ्यांनी पाहिले. त्या डोळ्यातच एक प्रेमभरी हाक होती. चारुलता त्याच क्षणी गायची थांबली, आणि पूर्ण वातावरण अंधाराप्रमाणे निपचित झाले. तिचे मन अजूनही समाधिस्थ होते. इथले कटू सत्य पाहण्यासाठी त्याला परतूच वाटत नव्हते. इतक्यात तीव्र वेदनांशी झुंजत, अडखळत्या शब्दांनी जयंतराव शेवटचं एकच वाक्य बोलू शकले.

"शाब्बास चारू... शाब्बास... मारवा पूर्ण झाला... "

काही क्षणातच श्वासातला सूर अनंताच्या प्रवासात निघून गेला आणि चारुच्या आयुष्यातला "सोबत" हा अध्याय संपला.

©विशाल पोतदार

No comments:

Post a Comment