.post img {

Pages

Wednesday, 20 October 2021

उधम सिंग (2021) - चित्रपट समीक्षण

#cinemagully

चित्रपट- सरदार उधम (2021)
दिग्दर्शक - शुजित सरकार
पटकथा - रितेश शाह, शुभेन्दू भट्टाचार्य
सिनेमॅटोग्राफी - अविक मुखोपाध्याय
अभिनय - विकी कौशल

'सरदार उधम' या चित्रपटाचे सगळीकडे अफाट कौतुक होतेय. सोशल मीडिया भरून वाहतोय आणि हा चित्रपट इतकं कौतुक डीझर्व करतो. बॉलिवूडमध्ये खूप कमी चित्रपटात इतके काटेकोर दिग्दर्शन झालेय. प्रेक्षक म्हणून या टीमचे आभार मानावेत असा हा चित्रपट घडवला आहे.

स्वातंत्र्यसंग्राम या विषयाशी आपल्या भावना जुडल्या आहेतच. पण ही टीम फक्त त्या भावनांच्या भांडवलावर विसंबून राहत नाही तर प्रत्येक फ्रेम, प्रत्येक सिक्वेन्स हा खूप विचारपूर्वक रचून त्याचे execution कुठलीही तडजोड न करता पार पाडते.

आजपर्यंत जालियनवाला बाग हत्याकांड इतिहासाच्या पुस्तकातून एक दोन पॅराग्राफइतकेच माहीत होते. त्याबद्दल हळहळही वाटली होती. पण या चित्रपटात हत्याकांडानंतरची काळरात्र दाखवणारा प्रसंग मनात खोलवर जाऊन घणाघाती वार करतो. दिग्दर्शन, अभिनय, वेशभूषा, कलादिग्दर्शन एकत्र पछाडल्यासारखे काम करतात तेव्हा अशी दृश्यात्मकता तयार होते. कुठलीही लढाई किंवा हिंसा घडताना ती थरारक वाटते पण त्यांनतरची शांतता भयाण असते. प्रेतांच्या खचात, काही जखमी जीव भयंकर वेदना सहन करण्यापेक्षा आपला जीव अजून का गेला नाही या विवंचनेत तडफडत असतात. अचानक उधम सिंग येऊन एकेक जखमी व्यक्ती उचलून उपचारासाठी नेऊ लागतो. जितके होतील तितके जीव वाचवता वाचवता त्याचा शुभ्र सदरा हळूहळू रक्तवर्णीत होत जातो, तो गलीतगात्र होतो आणि त्याचसोबत त्याचं कोवळं मन क्रांतिकारी बनतं.

पूर्ण चित्रपटात पटकथा कुठेही भरकटत नाही. कथेच्या गरजेइतकेच फ्लॅशबॅक घेतलेले आहेत. पटकथेचा एक उत्तम नमुना वर विशद केलेल्या प्रसंगात दिसतो. उधमसिंग हत्याकांडाच्या ठिकाणी त्याच्या प्रेयसीला शोधण्यासाठी आलेला असतो. परंतू एकेक जीव वाचवताना त्याच्या मनातून तिला शोधणेही विसरून जाते. त्या सामाजिक दुःखापुढे वैयक्तिक जखम बाजूला ठेवली जाते. क्रांतिकारी बनण्याची हीच तर खरी निशाणी!

जुन्या काळातील सेटअप पूर्ण चित्रपटात सलग ठेवणे खूप challanging आहे आणि इथे सिनेमॅटोग्राफी अगदी काटेकोर आहे. 'चित्रपट चांगला बनण्यास गाणं हवंच', हा बॉलिवूडचा थंब रुल शुजित सरकारनी मोडीत काढला आहे.

इतक्या सर्व क्रिएटिव्हिटीला विकी कौशलने फिनिशिंग टच दिलाय. सध्या त्याच्यासारखे ताकदीचे अभिनेते पुढे येतायत हे आपलंच नशीब आहे. इंग्रजी चाचपडत बोलणारे उधम सिंग, त्वेषाने देशभक्ती आणि फ्री स्पीच वर बोलतो तेव्हा विकी कौशल पूर्णपणे पात्रात रूपांतरित झालेला असतो. जालियनवाला बाग घटनेआधीचे तरुण उधमसिंग आणि शेवटचे मध्यमवयीन उधमसिंग जणू काही दोन वेगवेगळ्या वयोगटातील अभिनेत्यांनी केला की काय असे वाटते. मसान नंतरचा विकी कौशलने हा दुसरा बेंचमार्क सेटल केला आहे. छोट्याशा भूमिकेतील बनिता संधू खूपच गोड दिसते. महत्वाची ब्रिटिश पात्रे वठवणारे शॉन स्कॉट, Kirsti Averton, स्टीफन हॉगन यांचे कास्टिंग खूप महत्वाचे होते आणि तेही अगदी योग्य ठरले आहे. फक्त भगतसिंगच्या रोलसाठी अजून उठावदार आणि तयारीचा अभिनेता असायला हवा होता.

प्रामाणिकपणे सांगायचे तर याआधी मला उधमसिंग यांचे नावही माहीत नव्हते. पण आता विसरणारही नाही हे नक्की. अजून लिहायचंच म्हटलं तर यावर खूप लिहिता येईल. असे चित्रपट बनत राहिले तर बॉलिवूड कात टाकेल हे नक्की. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड जरूर मिळेल आणि मिळावे ही मनोमन इच्छा.

©विशाल पोतदार

No comments:

Post a Comment