.post img {

Pages

Thursday, 30 March 2023

शबरीचा राम (स्फुट)

#विशालाक्षर
#स्फुट
#शबरी_चा_राम

"रघूनंदना... डोहाकडच्या वाटेने येणारी तुझी आकृती क्षणोक्षणी स्पष्ट दिसत राहते.. अगदी मातंग ऋषींनी वर्णल्याप्रमाणे, 'विनयी राजहंस'च तू. पण ऐनवेळी माझ्या डोळ्यांचा पान्हा दाटून यायचा, आणि तू धूसर होत काही क्षणातच पुसला जायचास. हे जीर्ण शरीर, तुझ्या आगमनाची शहानिशा करायला, धावत पळत तिथं जायचं . पण... पण.. तिथे मात्र तुझी पाऊलखुणही उरलेली नसायची.

आजही तसंच झालं बघ. पहाटेच तुझ्यासाठी बोरं तोडून ठेवताना, ते झाडही माझ्याकडे पाहून कुत्सित हसलं. "शबरे.. तुला तो राम ओळखतो का तरी? तो कसा तुझ्या झोपडीत येईल?" मी तर त्याला ठणकावलेच बघ, "बोऱ्हाट्या.. माझ्या गुरुवर्यांचा शब्द असा थोडीच फुका जाईल? वाट पाहत मी मरून गेले, तर चितेला अग्नी द्यायला, माझा रामच येईल बघ." आणि आज.. आज.. पुन्हा तुझं आगमन होताना दिसलं. आज सोबत अजून कुणीतरी राजबिंडं होतं. म्हटलं रोजच्याप्रमाणे अजून एक नवा भास. अजून एक प्रतारणा...? एवढा विचार करून मागं फिरले. आणि तुझा तो स्तब्ध करणारा आवाज या क्षीण होत चाललेल्या वृद्ध कानांवर पडला. आणि या डोळ्यातून पाझरणारा झरा थांबणारा नव्हता..

"रामा... रामा.. खरंच हा तू आहेस? आणि हा लक्ष्मण का? का रे इतका वेळ लावलास? माझा राम आला. अरे बोऱ्हाट्या, हे बघ माझा राम आला. माझा बाळ..माझा देव.. आला. इथे बस.. नको.. थांब.. अरे आसनावर टाकायला काहीच मिळत नाहीये.. अरे हे काय असा खालीच कसा बसलास? इथे तुझ्या राजप्रासादाला न्याय देईल असं काही नाही रे.."

"माई.... राहू दे तो मान मरातब.. तुझी माया हवीय फक्त... आणि भूक लागलीय गं आता.. काहीतरी दे ना खायला. "

"ही बघ टोपलीभरून बोरं सकाळीच तोडून ठेवलीत. हे घे... थाम्ब थाम्ब.. खाऊन पाहू दे आधी अर्धं.. तू म्हणशील ही खुळी की काय.... उष्टी बोरं देतेय.. अरे पण..त्या बोऱ्हाट्यावर कसा विश्वास ठेवू. एखादं आंबट बोर असेल तर ते तुला कसं देऊ? माझ्या रामाला सगळं चांगलंच मिळायला हवं."

"माई.... इतकं प्रेम ओथंबून आलेला प्रेमाचा उष्टा घास.. ह्यासाठी नशीब लागतं गं.. गोड आहे बघ बोर खूप.."

"पण तू साजरी केलीस ही झोपडी.. तुझे पाय लागले आणि सुरुकुतलेली झोपडी फुलली. बोऱ्हाट्याला शिव्या देते मी, पण मनाने चांगलय खूप ते. माझी सोबत करून आहे इतकी वर्षं. तेही तुझ्याच वाटेवर नजर लावून अजूनही बहरतंय. तुझ्या सेवेसाठी.! ही शबरी आज ना उद्या जाईल. पण तिची उष्टी माया. ती राहील बघ. तुझ्या वाटेवर.!!"

"आई... येऊ आता..?"

"रामा... राहता येईल का रे इथे तुला? नाही.. माफ कर.. असं कसं म्हटले मी.. तुझी गरज तर पूर्ण जगाला आहे.. जा बाळा.. सुखी राहा.."

"मी एकटा कुठे चाललोय...? तुला हृदयात घेऊन चाललोय ना.. सोबत नेहमीच आहे... कायमचा आहे.. आता आसवं ओघळण्याआधी आज्ञा दे... येतो..!"

निरोप देणारे ते सुरूकुतले हात फुलांपेक्षाही जास्त दरवळत होते. आणि त्या वृद्ध डोळ्यांत आनंदी आसवांचा पूर आला होता.. शबरी.. राममय झाली.. राममय झाली..!!

©विशाल पोतदार

#राम #रामनवमी #रामलला #शबरी #मराठीसाहित्य #मराठीलेखक


No comments:

Post a Comment