.post img {

Pages

Wednesday 16 August 2023

दिवार में एक खिडकी रहती थी (पुस्तक रसग्रहण)

#विशालाक्षर
#पुस्तक_रसग्रहण
#दिवार_में_एक_खिडकी_रहती_थी

मी वाचलेली पहिलीच हिंदी कादंबरी.. तीही विनोदकुमार शुक्ल यांचीच मिळावी हे भाग्य. मला नेहमी असंच वाटतं की पुस्तकं आपल्याला नशिबाने लाभतात. जी पुस्तके मिळत जातात त्यावरून आपलं आयुष्य कुठल्या पायवाटेवरून चालले आहे याची खात्री होते.. 

"दिवार में एक खिडकी रहती थी" हे विलक्षण शीर्षक, पुस्तक हातात घ्यायला भाग पाडतं. स्वप्नांच्या जगातली खिडकी रघुवर प्रसाद आणि सोनसी या नवदाम्पत्याच्या आयुष्यातला एक साधासा प्रवास, विलक्षण बनवते. परंतू लेखक येथे स्वप्न आणि वास्तव जगत यातली रेषा इतकी पुसट ठेवतात की आपण ते वर्गीकरणच करू शकत नाही. लेखक पहिल्या पानावरच एक कविता लिहितात.." उपन्यास में एक कविता रहती थी..." खरंच या कादंबरीत कविता लपलेली आहे. ती कविता म्हणजे आपल्या नेहमीच्या वाचक डोळ्यांना एक वास्तव आणि स्वप्नाच्या काठावर नेऊ शकणारी खिडकी आहे. 

यात नात्यांमधे एक ओलावा आहे. मुळं जोडली गेलेली असली की आपल्या माणसाचा त्रास वाटत नाही. म्हणूनच कदाचित सोनसीची सासू चार दिवस राहून परतू लागते तेव्हा दोघींच्या डोळ्यात आसवं जमा होतात. त्यांची रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत सोनसी दारातच थांबते.  ही अशी आयुष्ये इव्हेंटफूल नसली तरी समाधानी असतात. कुठलेही तरंग नसलेल्या शांत तळ्यासारखं.

रघुवर प्रसाद एक शिक्षक आहे. तो दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहू शकतो. घरून विद्यालयात जाण्याकरीता ते टेम्पोने जातात. त्या टेम्पो प्रवासाचा एक सुंदर पॅराग्राफ...

“टैम्पो में हमेशा की तरह गाँव की औरतों और बूढ़ों की भीड़ थी। एक बूढ़ा डंडा लिये हुए बैठा था। विद्यार्थी नहीं थे इसलिये रघुवर प्रसाद ने अंदर घुसने की कोशिश की। टैम्पो वाले ने जगह बनाने के लिये कहा। टेम्पो में जगह होती तो मिलती। ऐसा नहीं था कि बाहर मैदान से थोड़ी जगह ले लेते और टैम्पो में रख देते तो जगह बन जाती। बिना जगह के वे टैम्पो में घुस गये। जब टैम्पो चली तब उनको लगा कि दम नहीं घुटेगा। लड़्कियों-औरतों के बीच बैठे हुए आगे जब उनको कोई विद्यार्थी देखेगा तो अटपटा नहीं लगेगा, क्योंकि विद्यार्थी सोचेगा कि रघुवर प्रसाद के बैठने के बाद औरतें बैठी होंगी। औरतों के बाद रघुवर प्रसाद बैठे होंगे ऐसा विद्यार्थी क्यों सोचेगा।…"

काही दिवसांनी त्याच मार्गावर रघुवर प्रसादला हत्ती वरून जाणारा साधू दिसतो आणि त्याला तो साधू रघुवरला विद्यालयात ने-आण करण्यासाठी स्वतः गळ घालतो. हत्तीच्या माध्यमातून लेखक, आयुष्यात येणाऱ्या भव्यदिव्य आणि औत्सुक्यपूर्ण गोष्टींची जाणीव करून देतात.. त्याबाबत काही सुंदर ओळी....

“हाथी के जाने से एक बड़ी जगह निकल आयी थी। यह तो था कि हाथी आगे-आगे निकलता जाता था और पीछे हाथी की खाली जगह छूटती जाती थी।”

शुक्ल जी भाषा मांडतात, ती जाणिवेच्या एका वेगळ्याच प्रतलाला स्पर्श करणारी आहे. रोजच्याच obious म्हणून सोडल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकल्यावर खूपच आतल्या झोनमध्ये नेऊन ठेवतात.

“रघुवर प्रसाद कल की तैयारी में किताब खोलकर बैठ गये। पत्नी खाना बनाते-बनाते पति को देख लेती थी। हर बार देखने में उसे छूटा हुआ नया दिखता था। क्या देख लिया है यह पता नहीं चलता था। क्या देखना है यह भी नहीं मालूम था। देखने में इतना ही मालूम था कि इतना ही देखा था।”

रघुवर आणि सोनसीमधलं प्रेम निरांजनाइतकं प्रशांत आहे. त्यातली गोडी खूप भावते. त्यांच्या अवतीभोवती मन रेंगाळत राहतं. सोनसी जेव्हा काही दिवसांकरीता माहेरी जाते तेव्हा चिठ्ठी लिहिण्याबाबतचे  संवाद आकाशातल्या चांदण्यांशी गप्पा मारणारे असतात. त्याची चिठ्ठी वाचताना सोनसीला वाटते की रघूवरने दोन्ही हातांनी चिठ्ठी लिहिली असल्यामुळे त्याच्या आलिंगनात बसूनच आपण चिठ्ठी वाचतोय. कमाल आहे हे सगळं..!!

इतकं सांगितल्यावर देखील असं वाटतंय की पुस्तकाबाबतचा नक्की फील मी ऍक्युरेट सांगूच शकलेलो नाही.....  

फक्त सूर्यास्त झाल्यानंतरचा काळोख किती गडद होता हे सांगण्यासाठी लेखकाच्या ओळी देतो...

"अंधेरा घना था. एक सूर्यके डूबनेसे इतना अंधेरा नही होगा. कमसे कमी दो सूर्य डुबे होंगे.."

या ओळी सूचणं म्हणजे कहरच..!!


©विशाल पोतदार

#विनोदकुमार_शुक्ल

No comments:

Post a Comment