.post img {

Pages

Saturday, 17 August 2024

कणादच्या बाबाची डायरी 3






१३ फेब्रुवारी २०२५)
सध्या तुझं गाडी प्रेम खूप वाढत चाललंय. कुठलीही खेळण्यातली गाडी घ्यायची आणि ती हाताने चालवत फिरवायची, एवढं काम सारखं करतोस.

काल आईने तुला डाळिंबाचे दाणे खायला दिले आणि ती किचनमध्ये गेली. बाहेर आल्यावर पाहते तर वाटी बऱ्यापैकी संपली होती. नंतर तिने तू काहीतरी करतोयस हे पाहिलं तर तू चक्क ते डाळिंबाचे दाणे गाडीच्या खिडकीतून आत भरत होतास. पूर्ण गाडी डाळिंबानेच भरली होती. 

मी गुजरातमध्ये कामानिमित्त गेलो होतो, त्यामुळे आईने डाळिंब भरतानाचा तुझा व्हिडिओ पाठवला आणि मो इतका हसलो की बस्स.!

१६ फेब्रुवारी)
आज तू मुंगीला 'गी' असं म्हटलास. कावळा दिसल्यावर काव एवढंच म्हणालास. तू शब्द बोलू लागलायस याचा आनंद वेगळाच आहे रे.!

२५ एप्रिल २०२५)
आपण आंबे आणायला गेलो होतो. मी आणि आई दुकानदाराला।रेट विचारत होतो. इतक्यात मागे पाहतो तो तू त्यातला एक आंबा घेऊन खायला सुरुवात केली होतीस. तो दुकानदार आणि आम्ही खूप हसलो. तो म्हणाला बच्चे ने लिया है. खाने दो, हम नही गिनेंगे.


१० मे)
आज तू पूर्ण वाक्य बोललास... "पाऊस आला..."


१६ मे २०२५) 
आज आई तुला झोपवत असताना, मी आत काहीतरी करत होतो. अशावेळी तू जनरली पप्पा .. पप्पा म्हणून हाक देत असतोस. पण आज तू "विशू.. विशू.. म्हणून हाक दिलीस.." माझी खूप इच्छा होती की तू मला नावाने हाक मारावीस. आज खूप खूप प्रेम दाटून आलं कणाद..!

२९ मे २०२५)
तुझे आत्ताचे शब्द -
नीना गाडी : अम्ब्युलन्स
नाना : केळ (बनाना)
सफरचंद : अँपु
ताई - तांमी
चमचा : चमचम
खाऊ : हाऊ
औषध लाव - औषन नेने औषन
झुझू - ट्रेन
तुकूतू - कोंबडी
इआ - पोतदार
चिचा - टीचर
हेलिकॉप्टर - हॉक्टर
विमान - मिमान
रिमोट - मिमोट

२० जून)
आता मला तू "बाबा" म्हणायला लागलायस. आधी इतके सांगूनही पप्पा म्हणायचास आणि आता अचानक बाबा म्हणायला लागलास. मी खूप खूष.!

२१ जून)
कालपासून "हो" म्हणायच्या ऐवजी ओके म्हणतोस.


No comments:

Post a Comment