.post img {

Pages

Sunday, 20 August 2017

आपल्या गणेशाचे आगमन- १० दिवस त्याची पूजा कि विटंबना?

शिर्षक ऐकून चकीत झालात ना? कदाचित तुम्हाला माझा राग ही येईल. बऱ्याचवेळा आपली देवावरची भक्ती प्रेमापेक्षा भितीमुळे असते. मी जर असे नाही केले तर देव रागवेल, कोपेल यामुळे मला ही विधी केलीच पाहिजे असा आपला आग्रह. त्यामानाने गणेशाला आपण घाबरत नाही, प्रेमानेच पाहतो. भगवान श्री गणेश सर्वांचं लाडकं दैवत. अगदी मित्राप्रमाणे आपण त्याच्यावर प्रेम करतो. त्यामुळेच आपण गणेश चतुर्थीचा सण एकदम उत्साहात धुमधडाक्यात साजरा करतो. 

बर आता आपल्या लाडक्या गणरायाचा सण येतोय. 13 सप्टेंबर ला आपण गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करू (आपल्या भाषेत गणपती बसवू), तेही आधी शेजाऱ्यांपेक्षा मोठी आणि छान मूर्ती ठरवून (TV किंवा fridge सारखे बुकिंग करून). गणपती मंडळांबद्दल बोलायलाच नको. हमखास शेजारच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी खुन्नस. आमच्या मंडळाचा गणपती मोठा पाहिजे. आमच्या मंडळाचे डेकोरेशन अख्ख्या गावा मध्ये/ शहरामध्ये मध्ये भारी पाहिजे. इकडं स्वतःच्या मंडळामधील गणेश मूर्ती ची मनोभावे पूजा/आरती करणारे भक्त, दुसऱ्या मंडळाच्या मूर्तीकडे खुनशी नजरेने का पाहतात, हे अजून न उलगडलेलं कोडं आहे. नक्की गणपती हा एकच व्यक्ती आहे ना भाऊ? तुझा गणपती, माझा गणपती, त्याचा गणपती, लालबागचा राजा, वडाळ्याचा राजा, अमुक राजा, तमुक राजा. हे येते कुठून?


माझ्या गणरायाचं प्रॉडक्ट करून टाकलेय का तुम्ही? इच्छापूर्ती करणारी मशीन आहे का ती? नवसाची लाईन वेगळी, डायरेक्ट (प्रीमियम) दर्शनाची वेगळी (दर ठरल्याप्रमाणे). ह्या नट-नट्यांनी कोणते हो असे मोठे पुण्य केलेले असते कि त्यांना तिथे थेट प्रवेश दिला जातो? सामान्य माणूस म्हणजे कस्पटासारखा का? अजून एक सांगा मला, श्री गणेश कैलासातून आयटम सॉंग्स ऐकायला येतो का हो? येतानाच तो ठरवतो का, की 20 फूट डॉल्बी असणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पाठी मी सदैव उभा राहीन. कालच Whatsapp वरती एक जोक वाचला, कि पार्वती गणेशाला सांगत असते मागच्या वेळेस "शांताबाई" गाणे शिकून आलास, यावेळी "सोनू सोनू" शिकून येऊ नकोस. अजून सांगायला ही लाज वाटेल एवढे किळसवाणे प्रकार केले जातात या पवित्र गणेशाच्या नावाखाली. १० दिवस आणि मिरवणुकीच्या दिवशी शेजारी हॉस्पिटल्स असले तरी जीवाच्या आकांताने डॉल्बी बॉक्स कोकलत असतात. जेव्हा त्या आजारी लोकांना त्रास होत असेल तेव्हा देव हि व्याकूळ होत असेल.

विसर्जना नंतर दुसऱ्या दिवशीचं विर्सजन स्थळाचे दृष्य मन दुख्ही करणारे असते. गणेश मूर्तींचे अर्धवट विरघळलेले अवशेष खूपच विदीर्ण दिसतात. ज्या गणेश मूर्तीची १० दिवस आराधना करतो, ती तिथे कचऱ्यासारखी पडलेली असते. निर्माल्याच्या कचऱ्याचा ढीग असतो. हे पाहून आणि ऐकून जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर विसर्जन करतानाच काळजी घ्या. कृत्रिम तलाव जवळपास असतील तर त्यात विसर्जन करा. शक्यतो मातीची च मूर्ती स्थापन करा.


हा लेख फक्त टीका करण्यासाठी नाही लिहिला गेलाय. आणि सर्व मंडळांना किंवा लोकांना मी एकाच पारड्यात तोलनार नाहीये. पण आज चांगल्या गोष्टी सांगण्यापेक्षा वरचे प्रकार जास्त घडत आहेत, ही खूप शर्मनाक गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात एक बातमी ऐकली कि, कोकणातल्या एका गणेश मंडळाने पूरग्रस्त भागात अतिशय राबून मदत केली व अजूनही खूप उपक्रम राबवण्याचे त्यांचे इरादे आहेत. असे आदर्श गणेश मंडळ हि अस्तित्वात आहेत, त्यांना माझा सलाम. फक्त हि संख्या आज खूपच कमी आहे.

थोडंसं आपण गणराया बद्दल ऐकू..


श्री गणेश.. आदिशक्ती पार्वती आणि महादेवांचे सुपुत्र.. सोळा कला आणि अष्टविद्या विभूषित.. दयाळू, मायाळू.. सुखकर्ता.. दुःखहर्ता.. माझा गणू..


त्याच्या प्रत्येक चिन्हामध्ये गुण आणि शील भरभरून आहेत.


मोठे कान :- चांगले ऐकणारे व्हा, फक्त आपलेच म्हणणे सत्य असा दुराग्रह करू नका. 
छोटे डोळे:- प्रत्येक गोष्ट स्वतः जाणून पारखून नंतरच स्वीकारा (केवळ परंपरेने चालत आलेय म्हणून नव्हे). 
मोठे पोट:- दुसऱ्याचे अपराध पोटात सामावून त्याला सुधारण्याची संधी दया. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना दुर्लक्षित करू नका.
वाहन उंदीर:- कुणालाही क्षुद्र समजू नका. जगातील कुठलीही व्यक्ती महान गुण धारण करू शकते किंवा पेलू शकते.
मोदक:- आपल्या हृदयात नेहमी मधुरतेचा झरा वाहता ठेवा.

तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असाल तरी तुमचा देव तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही त्याच्या मध्ये असणारे गुण धारण कराल. त्याचे नाव बदनाम करून कधीतरी तो त्या मूर्ती मध्ये वास्तव्य करेल काय.

या पृथ्वीवरचे त्याचं आगमन आणि 10 दिवसाचे वास्तव्य आपल्याला त्याच्या करता सुखकारक आणि पवित्र नाही का करता येणार. आपल्या मंडळाचा मोठेपणा दाखवायच्या नादाने, त्याची क्षणोक्षणी विटंबना करत नाही ना याचा विचार करायची गरज आहे मित्रांनो. गणपती ची आरती करताना प्रसादावर लक्ष न ठेवता, मनोभावे नमन करू. 

तुम्ही म्हणाल मग, उत्सव साजरा करायचा नाही का? जरूर करू उत्सव. अगदी स्वतःला विसरून, आपली कला जागृत करून सुंदर अशी सजावट करू. वेगवेगळ्या कल्पना उपयोगी आणून सामाजिक संदेश देऊ. खुळ्या कल्पनांना थारा नको देऊया. दुसऱ्या मंडळाविषयी खुन्नस नका बाळगूया. पारंपारीक कलाकारांना कला सादर करायची संधी देऊ. खेळाच्या स्पर्धा भरवू. समाजातील गरजू लोकांना हातभार लावू. सर्वांचे मंगल होईल. कल्याण होईल. श्रीगणेश खूप प्रसन्न होऊन प्रत्येकाच्या मनात १०च दिवस नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत वास करतील.

हा लेख वाचणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्याही मंडळामध्ये सामील असेल त्यात आणि माझे थोडेही म्हणने पटले असेल तर हि माहिती पुढे पोहचवा. शेअर करा हि कळकळीची विनंती.


No comments:

Post a Comment