.post img {

Pages

Sunday, 10 September 2017

रॉकेट... (कथा)

कथा : रॉकेट
लेखक : विशाल पोतदार
इमेल : vishal6245@gmail.com
Contact: 9730496245



********* भाग 1 *********

दिवाळीची धामधूम सुरू होती. बाजारपेठेतली सगळी दुकानं फुलली होती. मुलं नुकतीच शाळेला सुट्टी लागल्यामुळं खूष होती. त्यांचा वेगवेगळ्या खेळांचे डाव मांडले गेले होते. 

चिन्याचे मन अजूनही त्या एसटी स्टँडवरच्या फटाका स्टॉलपाशीच घुमत होते. त्याची आई त्या स्टॉल समोरच भाजी विकायला बसत होती. आज तोही तिच्यासोबत आला होता. मुळात आईला मदत करण्याच्या निमित्ताने तो स्टॉल बघायला आला होता. कित्ती वेगवेगळ्या प्रकारचे फटाके. लक्ष्मी फटाका, डबल बार, चिमणी फटाका, फटाक्याच्या लडी, बंदुकी असे बरेच काही. त्याला नेहमी वाटायचे की लक्ष्मी फटाका उडवला की त्यातून देवी बाहेर यावी आणि चिमणी फटाका उडवला की त्यात आत लपलेली चिमणी उडून जावी. शेजारचा राहुल्या खूप गमती सांगायचा फटाक्याच्या. चिन्याला मात्र आजपर्यंत छोट्या छोट्या टिकल्या मिळाल्या होत्या. मुळात त्या बंदुकीतून वाजवायच्या असतात. पण त्याच्या नशिबात ते दगडाने वाजवणे होतं. त्याला माहित होतं की, आपल्या आईकडे एवढं पैसे नाहीत, म्हणून त्यानंही कधी फटाक्यांचा हट्ट पकडला नव्हता.

तो फटाक्याच्या स्टॉल जवळ जाऊन पाहू लागला. आज मात्र त्याला एक वेगळाच प्रकारचा फटाका दिसला. 

त्याने स्टॉल वाल्याला विचारले, "तो कसला फटाका हाय हो?" स्टॉल वाला म्हणाला "ते रॉकेट हाय, लावलं की फूरररर करत आभाळात जातंय. पायजेल काय?"

चिन्या त्याच्या तोंडाकडं बघत बसला. काय बोलावं सुचत नव्हतं.

दुकानदार चांगलाच खवळला. "अय पोरा. घ्याचं नसल तर फूट हितनं, मगापासून नुसता बघतुय." 

चिन्याने लगेच आईकडे धाव घेतली. एक बाई, त्याच्या आईकडून भाजी विकत घेत होतं. भाजी घेतली होती, मात्र पैसे देताना 2 रुपय साठी घासाघीस करत होती. चिन्याला कधी ती जाड बाई जातीय आणि मी आईशी बोलतुय असं झालेलं. एकदाची आईने हार मानली आणि त्या बाईला दोन रुपय परत केलं. बाई जग जिंकल्याचा अविर्भावात निघून गेली.

चिन्या लगेच लाडात येऊन आईपाशी गळ घालू लागला. "आई... मला फटाकं पायजे. तू म्हणलेली मोठा झालो की घेणार म्हणून. आता मला पायजे." 

"आरं, पर पैसं नाय मिळालं आज, बघ भाजी कायच खपली न्हाय, तशीच्या तशी हाय. या मोठ्या घरातल्या बाया पण दोन रुपय साठी घासाघीस करत्यात. घरात करंज्या लाडू करायचंय अजून. तेवढया पुरतं दोनशे रुपय मिळालं कालपासनं."

"पण मला पायजे फटाकं. गण्यादादाला कसं दिलं तेच्या अप्पानीं, काल पासून वाजवत हुता त्यो. मी जरा दाखव म्हणलं तर वाकडं तोंड दाखवलं. नुसतं ते रॉकेट तरी घे. लावलं की आभाळात जातं ते."

आई, "आभाळात जाऊन काय खायला घेऊन येतं का ते? ते काय पॉट भरणार हाय काय आपलं? हितं आपल्या रातच्या जेवणाची पंचायत, आणि म्हणे रॉकेट घे."

चिन्या हिरमुसला. पण त्याला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. अपंगत्व आल्यामुळे वडील घरीच असत, त्यामुळे आईला सगळे कष्ट करावे लागतात. त्याला फटाक्यासाठी नाही म्हणताना आईच्या डोळ्यांत अलगद आलेले पाणी त्याच्या नजरेतून चुकले नव्हते.

आईने त्याला जवळ घेतलं आणि उठून म्हणाली, "बर चल आता घरी. तुला लाडू करून देणार ना मी. माझं शहाणं बाळ. पैसं असतं तर घेतलं असतं ना फटाकं. तुला मागच्या वर्षी शाळेत घालायचा होता ते पण नाय जमलं. आता यंदा तरी घालू. मग पैसं नको साठवायला?". 

तिचं भरलेलं डोळं पाहून चिन्यापण रडवेला झाला होता. त्यानं आईचं डोळं पुसलं. आणि म्हणाला, "मग लाडू तर देणार ना संध्याकाळी?"

आई, "हो तर. मोठ्ठा बुंदीचा लाडू देणार. माझं शानं बाळ."

"मला बाळ नाय म्हणायचं आता. किती वेळा सांगायचं."

आई हसली. तिचं बाळ आता मोठं होऊ लागला होतं.

"हो रे माज्या चिनू. मोट्टा झाला आता तू."

********* भाग 2*******

संध्याकाळची वेळ, चिन्याच्या घरी..

"आई.. आई... हा बघ माझा फटाका.."

"कुठाय?"

चिन्याने खिशातून पांढरेसे दिसणारे दोन दगड काढले. कोपऱ्यातल्या अंधारात जाऊन फाट फाट असे एकमेकांवर वाजवले, तश्या चार पाच ठिणग्या उडाल्या.

"कसाय? मला अंगणात सापडलं."

आई हसू लागली आणि उठून चिन्याचे मुके घेतले. आणि त्याच्या बाबाला म्हणाली, "बघा आपलं पोरगं, किती हुशार हाय."

बाबा म्हणाला, "मग हायच माझा चिन्या लाखात एक. बर चिन्या, तुला माहीत हाय काय? ह्या दगडाला गारगोटी म्हणतात. ह्या गारगोटीच्या ठिणगीनं आपल्या पूर्वजांनी आग कशी तयार करायची याचा शोध लावला आणि तेव्हापासून माणूस प्रगती करत गेला."

"मग काडीपेटीनं का करत नव्हते आग?"

"अरे काडीपेटी आत्ता आली. मी सांगतोय ते हजारो वर्षापूर्वीचं आहे."

चिन्याला बऱ्याच वेळा बाबा काय म्हणतात हे समजतच नसे. पण त्याला एवढं माहीत होतं की बाबा शाळत असताना खूप हुशार होते. पण दहावी पर्यंत शिकल्यावर आजोबांनी त्यांना शाळेतुन काढून फॅक्टरीमध्ये कामाला लावलं. त्याच फॅक्टरी मधल्या एका यंत्राचा अपघात होऊन बाबांचा एक पाय गेला. तेव्हापासून आईला भाजी विकून घर चालवावं लागत होतं. चिन्याने आपला गारगोटीचा फटाका वाजवत बाहेरचा रस्ता धरला. त्यानं विचार केला की हे आता शेजारच्या गण्या दादाला दाखवावं. गण्याच्या घरात पाय ठेवतो तर त्याला चंदूमामा दिसला. गण्या खुर्ची वर वाकडं तोंड करून बसला होता. चंदुमामा मुंबईला राहयचा आणि दिवाळीत हमखास भाऊबीजेला बहिणीकडे म्हणजेच गण्याच्या आईकडे यायचा.

चंदूमामा गाण्याचा सख्खा मामा असला तरी चिन्याचे खूप लाड करायचा. चिन्याला खूप काही नवीन नवीन गोष्टी सांगयचा. मागच्या वेळेस तर चेंडूने खेळताना चिन्याला सांगितले की, आपण लोक पण अश्या खूप मोठ्या चेंडू वर राहतो. म्हणजे आपली पृथ्वी गोल आहे. चिन्याला तर वाटले मामा येडा बिडा झाला काय, मग खाली राहणारी लोकं पडली नसती काय. पण तशी कल्पना करून त्याला खूप मज्जा आली. चिन्याला पडलेले असे बरेच प्रश्न त्याला यावेळी चंदुमामाला विचारायचे होते. आत्ता मामाला पाहताच तो गण्याला गारगोटी दाखवायचा विसरलाच. चंदुमामा~~ अशी जोरात आरोळी ठोकत जवळ गेला. मामानं पण त्याला जवळ घेत चिन्याच्या पाठीत थाप दिली. 

तेवढ्यात गण्यादादा विव्हळला, "ये मामा, चॅनेल बदल की.. पिच्चर लाव की, काय बातम्या लावल्याय. तू आला की असाच करतो."

चंदुमामानं रागानं गाण्याकडे बघितलं, " आरं, सुधार जरा. देशात काय चाललंय बघ जरा. हेच्यानंच तू दहावी नापास झालास. बघ आपला देश एकदम १०४ उपग्रह आकाशात सोडाय लागलाय. आणि तू पिच्चर च्या पाठीमागं लाग."

गण्यानं तोंड आणखीनच वाईट केलं. चिन्याला खूप मजा वाटली. ईतर वेळी गण्या त्याला खूप चिडवायचा आणि कधी कधी मारायचा. पण मामा पुढं तो चिडीचूप होता.

न्युज चॅनेल वर बातमी चालू होती, "आपण थेट श्रीहरीकोटा वरचे चित्र पाहतोय. थोड्याच वेळात १०४ उपग्रह अवकाशात झेप घेतील ..... 

१०..९..८..७..६..५..४..३..२..१.....

आणि अशा रितीने आपल्या इस्रो ने एकाच उड्डाणात १०४ उपग्रह आकाशात सोडून एक नवा विश्वविक्रम केला आहे. आपला तिरंगा एका नव्या डौलाने फडकत आहे."

चिन्याला हे तर अगदी फटाक्यातल्या रॉकेट सारखे वाटले. तो म्हणाला, "मामा हे रॉकेट हाय ना?".

"हो रे, तुला कसं माहीती ?"

"आजच मी फटाक्याच्या दुकानात बघितलं. त्यो म्हणला फुरररर करत आभाळात जातंय. पण आईकडं पैसं नव्हतं फटाकं घ्याला."

मामाच्या डोळ्यात उदासीन भाव आला. त्याला चिन्याच्या घरची परिस्थिती माहीत होती.

"अरे चिन्या, ते फटाक्यातलं रॉकेट खोटं खोटं असतं. ते इथल्या इथंच वर जातं. आत्ता टीव्ही मध्ये बघितलं ते खरं खरं असतंय. हे आभाळात सोबत उपग्रह नेऊन आपल्यासाठी खूप कामं करतं. आपण टीव्ही बघतो, फोन वर बोलतो ते त्या रॉकेट मुळं"

चिन्याला तर फटाक्या पेक्षा तर टीव्हीतलं रॉकेट च जाम आवडलं होतं.

"मामा, मला हेच पायजे. कसं मिळल मला?"

"आरं, ते असं तसं कुठं विकत नाही मिळत. ते आपले शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर तयार करतात. खूप कष्ट करतात ते."

"कसं करायचं कष्ट. मला पण पायजे ते. मी सगळ्याला दाखवेन ते. फुर्रर्र......"

"नक्की मिळल तुला.. मग मी सांगल तसं करणार का?"

"हो.... हो... तू सांगल तसंच करेन... "

"बर.. आता एक काम कर. आईला सांग चंदुमामा येतोय घरी थोड्यावेळाने. या दिवाळीपासून त्यालापण ओवाळायचे भाऊबीजेला."

चिन्या खूष होऊन उठला.. आणि गारगोटी ठाक ठाक वाजवत.. ठिणग्या उडवत घरी पळत गेला..

*************  भाग 3 **************

श्रीहरीकोटा इस्रो प्रक्षेपण स्थळ..

"ऑल सेन्सर पॉईंट्स चेक.. PSLV क्रिटिकल पॅरामीटर्स चेक. फ्युएल इग्निशन चेक.... launch initiated..
१०..९..८..७..६..५..४..३..२..१.... लाँच..."

काही वेळानंतर..

प्रेस कॉन्फरन्स..

इस्रो चीफ, "आज इस्रोला त्याच्या सर्व कार्यक्षमतेवर अभिमान वाटतो आहे. देशाने ठेवलेल्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलोय यात आम्ही धन्य आहोत. काही वर्षापासुन अनेक देश मंगळ ग्रहावरती मानव पाठवण्याच्या मिशन मध्ये अयशस्वी झाले. परंतु आपल्या देशाने स्वताची अशी विशेष feedback system devalope करून हे मिशन यशस्वी होईल याची खबरदारी घेतली आहे. आणि अजून १३ महिन्यानंतर आपले ३ अंतराळवीर मंगळावर भारताचे पाऊल उमटवतील.. या प्रोजेक्टच्या चीफ इंजिनिअरने वयाच्या ३२ व्या  वर्षी हा अतिशय अवघड प्रोजेक्ट लीड करून एक वेगळा तरुणांमध्ये नवा आदर्श निर्माण केलाय."

"सर, त्याचं नाव? आणि आम्ही त्यांना काही प्रश्न विचारू शकतो?"

"हो.. का नाही.. त्याचे नाव चिन्मय देसाई.. आणि तो तिथे त्याच्या फॅमिली सोबत उभा आहे.."

पत्रकार धावत चीफ इंजिनिअर च्या जवळ..

"सर, अभिनंदन... आज या सुवर्णक्षणी तुम्हाला कसे वाटत आहे?"

"देशासाठी आपले ज्ञान उपयोगी यावे यापेक्षा मोठा अजून काही अभिमान नाही.. आज या क्षणी माझे कुटुंब इथे हजर राहू शकले हाच माझ्यासाठी गौरव आहे.. ही माझी आई, मामा आणि माझी पत्नी मृदुला. या प्रत्येकाने खूप त्याग करून माझ्या हृदयातल्या रॉकेट ला थोडी थोडी ठिणगी पुरवलीय. माझ्या मामानेतर माझ्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलून आईला भाऊबिजेची अनोखी भेट दिली होती. लवकरच दिवाळी जवळ येत आहे.. तेव्हा तुम्हा सर्वांनापण खूप शुभेच्छा.. "

किती वेळ थांबवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करत आईने चिन्मय ला मिठीत घेतले, "चिन्या... माझ्या बाळा.. आज किती मोठा झालास? तुझ्या बाबांपर्यंत वर पोहचल ना तुझं रॉकेट. ते पण किती खूष असतील आज."

"मग आई आता या दिवाळी मध्ये तर मला फटाके घेणार ना?"

आईने दोन फटके दिले.. "आता माझ्या नातवाला देणार फटाकं.." सगळे हसले आणि मृदुला लाजली..
चिन्मय ने मृदुलाकडे पाहिले.. "आणि हो मृदुला, तू नेहमी विचारायचीस कि माझ्या डेस्कवर मी नेहमी दोन गारगोटी ची दगडं का ठेवतो ते? मी तुला उडवा उडवीची उत्तरे द्यायचो.. आज आईला विचार.. ती सगळ सांगेल तुला गारगोटी संदर्भात.."



रॉकेट वर वर जात होते आणि चिन्याची पराकाष्ठाच चंदुमामाच्या डोळ्यासमोर उड्डाण घेत होती. त्याला खूप खूप रडायचं होतं, खूप काही बोलायचं होतं. पोरानं एका छोट्याश्या ठिणगीची पूर्ण देशासाठी ज्योत बनवली होती. लहानपणीचा आईचे डोळे पुसनारा चिन्या आता देशाचा पुत्र झाला होता..

Note: ही एक काल्पनिक कथा असली, तरी देशात अश्या बऱ्याच ठिणग्या केवळ पैशाअभावी विझून जातात. आपण सर्व थोडा थोडा हातभार लावून अश्या खूप जीवन ज्योती तयार करू शकतो...


No comments:

Post a Comment