.post img {

Pages

Monday 2 October 2017

नेताजी... सर्वप्रथम स्वतंत्र भारतीय...!!

शीर्षक ऐकून जरा धक्का बसला असेल ना..??

का नाही..!!

आपण म्हणाल नेताजी तर स्वातंत्र्य मिळाल्या आधीच देवाघरी गेले.

हो खरय..!!

मतीथार्थ हा आहे कि, या सूर्याने इंग्रजांची गुलामी मुळात कधी मानलीच नाही. कधी घाबरला नाही आणि झुकला नाही. तो झटत होता मनाने हार मानलेल्या ३८ कोटी लोकांसाठी.

आपले कॉंग्रेस जन, जे मातृभूमीच्या प्रेमापेक्ष्याही गांधी आज्ञा मोठी समजत होते.  त्याचवेळी सुभाषचंद्र एकच तत्व जीव तळमळून सांगत होते, " ज्यावेळी कुठलाही देश मातृभूमी पेक्षा हि व्यक्ती ला मोठी मानेल.. तो देश जगाच्या स्पर्धेत गरुडझेप कधीही घेऊ शकणार नाही."

सुभाषबाबुनी त्यांच्या वडिलभाऊ मेजादांकडे काढलेले उद्गार, " गांधीजी खूप खूप श्रेष्ठ महात्मा आहेत. पण सुभाष च्या नशिबी कधी तो महात्मा भेटलाच नाही रे. भेटला तो सराईत राजकारणी."

तुम्ही म्हणाल कि हा लेख गांधीविरोधी आहे का ?

नाही अजिबात नाही..

पण विश्वास पाटील यांचे महानायक वाचताना जेव्हा नेताजींच्या कर्तुत्वावर, मायभूमीतच ग्रहण लागलेले दिसते तेव्हा मन गलबलून जाते. नावडतीच्या राजकुमाराला जेव्हा वडिलांच्या मांडीवरची जागा नाकारली जाते, तेव्हा त्याला देव आकाश्यात ध्रुव तारा बनवतो... तसाच तो सुभाषचंद्र..!!

मायाभूमिसाठी पूर्ण जग पालथे घालणारा. मुंगी मारण्याचीही उमेद न राहिलेल्या भारतीय युद्ध्कैद्यांमध्ये स्वातंत्र्याचे प्राण फुंकून आझाद हिंद सेना उभारणारा..

भारताचा ध्रुव तारा...अढळ...प्रखर...!!

सक्रीय राजकारणामध्ये जर जेष्ठ नेत्यांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेऊन जर हा ध्रुव तारा जपला असता तर आज भारताची झळाळी सूर्यासारखी बनली असती !!

मला माहिती आहे कि आपला भारत सध्या कुठेही पाठीमागे नाहीये. पण हे हि तेवढच सत्य आहे कि सर्वात पुढे हि नाहीये !! आणि तो अग्रेससिवेनेस फक्त सुभाषचंद्र बोस या व्यक्तीच्या अंगी होता !!

त्याकाळी ब्रिटन मध्ये जाऊन आय सी एस ची परीक्षा देणे म्हणजेच एक खूप दिव्य काम होते. जर चुकून कुणी पास झाले तर त्याचे पूर्ण आयुष्य एका राज्यापेक्षाही जास्त मानाचे होई. अगदी राजे रजवाडे सुद्धा अश्या मुलाला आपल्या राजकन्येचा विवाह करून द्यायला उत्सुक असत, अशी हि आई सी एस एक्झाम सुभाषचंद्र बोस नामक तरुण नुसता पासच होतो असे नाही तर गुणवत्ता यादी मध्ये झळकतो. घरच्यांनी समजले कि याच्या आयुष्याला तर आत्ताच कलाटणी मिळाली.. पण नाही..

या युवकाला मुळात इंग्रजांच्या हाताखाली व गुलामगिरीत कामच करायचे नव्हते.. त्याच्या पिंडामध्ये गुलामी लिहिलीच नव्हती. सुभाषबाबूनी या पंच्पाक्वन्नानी भरलेल्या आय सी एस च्या भरल्या ताटाला धुडकावले. त्यापेक्ष्या मी माझ्या मायभूमीला स्वतंत्र करून तिची मीठ भाकरी खाईन अशीच भीष्म प्रतिज्ञा केली !!

देशबंधू चीतरंजन दास यांना स्वातंत्र्य चळवळीचा गुरु व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आयुष्याचा सदगुरु मानले व काँग्रेस मध्ये स्वातंत्र्य लढ्यात स्वताला झोकून दिले.. घरच्यांना तर कळून चुकलेले कि या गरुडाला संसाराच्या घरट्यात बांधणे शक्यच नाही. त्यांचे भाऊ मेजदा.. हे तर त्यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभा राहिले.

कुशल नेतृत्व गुण व स्वातंत्र्याची जबरदस्त इच्छा... यामुळे सुभाष बाबू देशामधील तरुणांमध्ये एक आदर्श बनले.. लोकप्रिय झाले. त्यांच्या एका हाकेवर पूर्ण देशातील तरुण आझादी साठी बेफाम होत. त्याच लोकप्रियतेवर १९३८मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडून आले. त्याच वेळी त्यांनी इंग्रजांविरोधी अतिशय उत्कट असे आंदोलन छेडण्यासाठी देशाला साद दिली. पण कुठल्याही धाडसी आंदोलनाला गांधीजी व ओघानेच त्यांच्या शिष्यांचा विरोध होता, पण सुभाष बाबू कुणापुढे झुकणारे नव्हते.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये जर एक एक बाण टाकला तर इंग्रज सहज झेलू शकतात पण जर ३८ कोटी जनतेतील १ करोड लोक जरी या उत्कट लढ्यात सामील होऊन सशस्त्र आणि सत्याग्रह या दोन्ही मार्गांनी लढले तर अगदी मुठभर इंग्रजांना पळायला पण वेळ मिळाला नसता. हे सुभाष बाबूंना कळून चुकले होते पण मवाळ नेत्यांना "विशेषता" महात्मा गांधीना हे उमजत नव्हते. स्वातंत्र्य जर अहिंसेने आणि शांततेने मिळाले तरच ठीक नाहीतर ते त्यासाठी कितीही वाट पाहायला तयार होते.

१९३९ मधील कॉंग्रेस अधिवेशनामध्ये गांधीवादी उमेदवाराला हरवून पुन्हा एकदा अध्यक्ष बनले. त्यावेळी अहंकार दुखावलेल्या गांधीजीनी "सुभाष चा विजय हि माझी हार आहे" असे वक्तव्य करून सुभाष बाबूंच्या आणि देश्याच्या काळजाला घरे पाडली. व कॉंग्रेस सोडण्याचीही तयारी दाखवली तेव्हा भारत चिंतातूर झाला.
सुभाष बाबूंना इंग्रजांशी लढताना अंतर्गत लढाई नको होती म्हणून स्वतःच कॉंग्रेस च्या अध्यक्षपदावरून दूर झाले..!!

दुसरे महायुध्द जसे जवळ जवळ येऊ लागले तसे सुभाष बाबूंच्या मनामध्ये रोमांच उभे राहिले... त्याच वेळी युद्धजन्य परिस्थितीचा त्यांना आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी देशाबाहेर पडायचे ठरवले..

त्यावेळी त्यांचे एकच ध्येय होते.. " या महायुद्धाच्या भट्टी मध्ये मला स्वातंत्र्याचे लखलखित सोने बाहेर काढायचे  आहे..."

तो प्रवास म्हणजे एका ध्येयाने झपाटलेल्या देशभक्ताने केलेले अचाट साहस होते..

त्यासाठी जेव्हा त्यांनी युरोपात धडक मारली. पहिले त्यांनी बर्लिन गाठले. ज्याच्या नुसत्या नावानेच जगातील भल्या भल्या देशातील नेत्यांचा  थरकाप होत असे, अश्या क्रूरकर्मा हिटलर ला भेटायला एका गुलामगिरीत असलेल्या नेत्याचे धाडस कसे व्हावे याचाच सगळ्यांना अचंबा वाटत होता.

सुभाष बाबूंना माहित होते कि इतिहासाच्या पानात त्यांच्या हिटलर कडे मदत मागण्याच्या निर्णयावर बोट ठेवले जाईल, तरी सुद्धा त्यांनी तो धोका पत्करला. कारण या महायुद्धात हिटलर शिवाय कुठलेही पान हलणार नव्हते. आणि जर्मनी.. इटली आणि जपान यांचा मुख्य शत्रू होता इंग्लंड..!!

हिटलर सोबत जेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा ते जराही विचलीत झाले नाहीत किवा घाबरले नाहीत. एका स्वतंत्र राष्ट्राचा प्रमुख ज्याप्रमाणे वाटाघाटी करेल त्याच त्वेषाने त्यांनी जर्मनी कडे मदत करण्याचे आवाहन केले. व जेव्हा जर्मनी किवा त्याचे मित्र राष्ट्र जर इंग्रजांचा पराभव करेल त्यावेळी भारताचे स्वातंत्र्य जाहीर करण्याचे मान्य करून घेतल.. भारतातर्फे  कुणीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाटाघाटी करण्याची ती पहिलीच वेळ असावी.

जपान मध्ये जेव्हा जवळपास ४०-४५००० भारतीय युद्धकैदी नैराश्येच्या अवस्थेत व मातृभूमीच्या आठवणीत कंठत होते तेव्हा रासबिहारी बोस यांनी ते कैदी भारताच्या आझादीकरता सुपूर्त करावी असे जापनीज सरकार ला विनंती केली, त्यांनी ती मान्य पण केली. पण अश्या या लढण्याच्या अवस्थेत नसणाऱ्या सेनेला उभारी दयायला कोणाला जमणार. कोण होऊ शकेल सेना नायक.

त्यावेळी जपान च्या समोर एकच नाव आले. ते म्हणजे सुभाष चंद्र बोस...!!

सुभाष बाबू पण याच गोष्टीची वाट पाहत होते. त्यांनी आपल्या हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या वक्तव्य व प्रखर देशभक्ती याच्या जोरावर. एक एक सैनिक जोडला व स्थापन केली " आजाद हिंद सेना.."

भारताचे स्वताचे पहिले वाहिले लष्कर...!!

नेताजींचे राज्यकारण जेवढे श्रेष्ठ होते त्याच एवढे त्यांच्याकडे देशकारणाचा दूरदृष्टीकोन होता, काँग्रेस अध्यक्ष असताना त्यांनी सर विश्वेशारेय्या यांच्या अंतर्गत एक पंचवार्षिक योजनेचे नियोजन करणारी कमिटी बनवली आणि देश्याच्या सर्वांगीण विकासासाठी चरखा (कुटीर उद्योग) हेच फक्त सर्वस्व नसून Manufacturing, Heavy Industry आणि Oil & gas यामध्ये देश अग्रेसर होणे किती गरजेचे आहे हे ठाम पणे सांगून त्यासाठी कार्यक्रम आखला.

त्यांचा एकच आग्रह होता, ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा झोपेतून जागे झाल्यासारखे धडपडले नाही पाहिजे, तर त्यासाठी आत्तापासूनच विकासाची चक्रे फिरवली पाहिजेत.

सुभाष बाबूंच्या मनात इंग्रजाविरोधी जेवढा राग होता तेवढेच त्यांचे मन प्रेमळ होते. सुभाष बाबू जेव्हा कॉंग्रेस मध्ये कार्यरत होते तेव्हा त्यांच्या घरी मुली व मुलींच्या घरच्या लोकांचे लग्नासाठी विनंती करणारी हजारो पत्रे यायची. पण हा देशभक्तीचा पर्वत त्या आकर्षनापुढे नमणारा नव्हता. त्यांच्या विभाभाभी म्हणायच्या या इंग्रजांमुळे इथे बिचाऱ्या मुलींची किती पंचायत झाली आहे.. पण एकदा तुरुंगामध्ये भयंकर आजारी असल्यामुळे सरकार ने त्यांना उपचारासाठी युरोपामध्ये पाठवले. व उपचार घेत असताना त्यांनी "इंडियन स्ट्रगल" हा ग्रंथ लिहायला घेतला तेव्हा त्यांची सेक्रेटरी व स्टेनो म्हणून काम करणारी 'ऑस्ट्रियन परी' एमिली शी त्यांचे  प्रेम सबंध जुळले. जे महाकठीण काम हिंदुस्तान च्या हजारो सौंदर्यवती युवती करू शकल्या नाहीत ते या निखळ आणि निरागस एमिलीने करून दाखवले. तिला माहित होते कि हा सूर्य आहे.. पकडून पण ठेवता येणार नाही आणि तिच्याच्याने सोडवणार पण नाही.. पण तिने ते आव्हान स्वीकारले व सुभाष बाबू विवाह बध्द झाले. एमिलीने कधीही त्यांच्या ध्येया आड आपले प्रेम येऊ दिले नाही. उलट तेच आपले पण ध्येय मानले. त्यातच सूर्य आणि चंद्राच्या मिलनातून एक चांदणी जन्माला आली. नेताजींची कन्या अनिता बोस, ज्या सध्या जर्मनी मध्ये वास्तव्य करतात. अश्या महापुराष्याच्या पोटी जन्म घेणे म्हणजे परम कोटी चे भाग्य समजतात.

२३ जानेवारी १८९७ रोजी जन्मलेले हे बाळ... पुढे इंग्रजांना सळो कि पळो करून भारताच्या नभांगणात अमर झाले..

लेखक विश्वास पाटील आपल्या कादंबरीच्या रिसर्च साठी जेव्हा जपान ला जाऊन अशा माजी लष्करी अधिकाऱ्यांना भेटले जे स्वत नेताजिंसोबत रणांगणामध्ये वावरले आहेत. ते अधिकारी सुभाष बाबूंच्या आठवणी सांगताना भारावून गेले होते आणि नकळतच त्यांचे हात कपाळाकडे सलाम करण्यासाठी जात होते...!!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरणी हा लेख अर्पण..!!

जय हिंद..!!





No comments:

Post a Comment