.post img {

Pages

Sunday 20 December 2020

मावळत्या क्षितीजावरची पहाट (पटकथा)

 आपल्या लेखन कार्यशाळेनंतर मी माझ्याच कथेवर आधारित एक Screenplay लिहिला आहे...आपला अभिप्राय जरूर द्यावा..😊


Shortfilm Title – मावळत्या क्षितिजावरची पहाट

लेखक – विशाल पोतदार


 पात्र –


1. वसुधाताई रानडे

 - वय 70

 - लेखनाची आवड

 - रहायला मुंबई पासून 150-200 km असणाऱ्या छोट्या शहरात (चित्रीकरण location वर अवलंबून)


2. नमिता - 

- वय 27-28 

- वसुधाताईंची नात (मुलीची मुलगी)

- राहायला मुंबईला


3. सुनंदा -

- वय 40 च्या आसपास

- वसुधाताईंच्या घरी कामवाली बाई म्हणून कामास


4. दिनकर रानडे - वय 80 (मृत)

- वसुधाताईंचे पती


5. पाच ते सहा वृद्ध स्त्री पुरुष (काही डायलॉग नसतील)


Approx Total Screen Time- 25 minutes


*************************************


Scene 1- 


Time - संध्याकाळचे (७-८ वाजता)

Place - वसुधाताईंचे घर 

(घर छोटेच पण देखणे. गेटला लावलेली एक पत्र पेटी. घराच्या ओसरीमध्ये एक मोठा झोपाळा.)

Background- 

15 दिवसांपूर्वी त्यांचे पती दिनकर रानडे यांचं दीर्घआजाराने निधन झाले असून, वसुधाताई दुःखाने अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत आहेत. 50 वर्षांच्या नात्यानंतर आलेला दुराव्यामुळे मनात एक सल आणि चीड आहे. दिनकररावांचे क्रियाकर्म झाल्यानंतर, वसुधाताईंना काही दिवस सोबत म्हणून त्यांची नात नमिता तिथे थांबली आहे. 


Scene-

नमिता आणि वसुधाताई झोपाळ्यावर बसल्या आहेत. वसुधाताई मेथीची भाजी निवडत आहेत तर नमिता मोबाईल मध्ये काहीतरी करतेय.भाजी निवडता निवडता वसुधाताई शून्यात हरवतात. पतीची आठवन येऊन त्यांचे डोळे पाणावतात. नमिताचं लक्ष आजीकडे जाते आणि तिच्याही चेहऱ्यावर ते दुःख आणि करुणा येते. मोबाईल बाजूला ठेवून ती वसुधाताईंकडे सरकते आणि खांद्यावर हात ठेवत जवळ घेते. वसुधाताई नमिताच्या खांद्यावर डोकं ठेवतात. डोळ्यातून अश्रूंच्या धारा येत असतात पण हुंदका फुटत नाही. 


नमिता :- आजी चल ना तुही मुंबईला आता. तुझ्याशिवाय पाय निघवत नाही गं. आई-बाबा तर तुला सांगून थकले. माझंही नाही का ऐकणार?


वसुधाताई डोळे पुसत बाजूला होतात आणि नकारार्थी मान हलवतात.


वसुधा- नमू नको हा विषय आता. आता माझं आयुष्य सरेल ते याच घरात. इथंच सुरुवात होती आमच्या संसाराची आणि इथेच शेवट व्हावा..


नमिता हताश होते. उठून आजीच्या समोर गुडघा टेकवून बसते आणि आजीच्या मांडीवर डोकं ठेवते. वसुधाताई तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवतात.

Scene 2 


Time : सकाळी 7-8 वाजता

Place- अंगण


Scene-

गेटच्या बाहेर एक रिक्षा नमिता बाहेर येण्याची वाट पाहतेय. नमिता ट्रॉलीबॅगसह उभी असून वसुधाताईंना समजवण्याचा सुरात काही तरी बोलतेय (Mute  dialogues). वसुधाताई तिला होकार देतायत. नमिता त्यांना घट्ट मिठी मारून रडू लागते. वसुधाताई मोठ्या कष्टाने मिठी सोडवून तिला गेटपर्यंत घेऊन जातात आणि नमिता रिक्षात बसून निघून जाते.


नमिता डोळ्याआड होताच, वसुधाताई घरात येतात. मोकळ्या घराकडं एकदा उद्विग्नतेने नजर फिरवतात. (कॅमेरा किचन, हॉल, फॅमिली फोटोजकडे एकेक शॉट घेतो. फॅमिली फोटोज मध्ये वसुधाताई, त्यांचे पती, मुलगी, जावई, नमिता यांचे ग्रुप आणि सोलो फोटो असतील. लेखनाचं एक लाकडी टेबल, खुर्ची, टेबलवर चांगले पेन असलेले पेनहोल्डर, डायरी, स्टेपल करून ठेवलेले काही लिहिलेले कागद, चष्म्याचे बॉक्स, त्यांचा तरुणपणातला एक जुना फोटो हे साहित्य असावे.)


वसुधाताई बाहेर येऊन विषण्ण होऊन बसतात. नजर खाली झुकलेली असते. झोपाळा मंद झोका घेत राहतो. झोपाळ्याच्या कड्यांचा कर्र कर्र आवाज शांतता चिरत राहतो. कॅमेरा झोपाळ्याच्या लयीत झुलत त्यांच्यापासून झूम आऊट होत राहतो. 


Scene 3-


सकाळी उजेड येईल अशा खिडकीशेजारी ठेवलेला पलंगावर वसुधाताई झोपलेल्या आहेत.  झोपून उठतात आणि तोंड धुवून बाहेर जायला निघतात. त्यांच्या हालचालीमध्ये एक संथपणा जाणवतो. 


Scene 4-

ईतर वृद्ध स्त्रियांसोबत पार्क मध्ये चालताना दिसतात. बाकीचे सर्वजण आनंदात असतात आणि वसुधाताईंना पण हसवण्याचा प्रयत्न करतात परंतु हसल्यासारखे करून दुसऱ्याच क्षणी चेहरा दुखी होऊन जातो.


Scene 5- 

Time - सकाळी 7-8

पार्क मधून परतल्यावर गुडघेदुखीने लंगडत संथपणे गेट उघडतात. जुनाट गेटचा कर कर आवाज येतो.  गेटच्या बाहेरूनच कॅमेरा त्यांचे आत जातानाचे दृष्य टिपतो.


Scene 6-

जलद रीतीने वसुधाताईंची निरस दिनचर्या दाखवली जाते. ज्यात रोज सकाळी इतर बायकांसोबत पार्क मध्ये चालणे, घरातली छोटी कामे करणे, खिडकीतुन बाहेर पाहत बसने इत्यादी गोष्टी दाखवत 10-15 दिवस जातात. (Daily calendar ची पाने उलटत ते दिवस दाखवू शकतो).


Scene 7 -

Time - रात्री 11-12 

रात्री झोप लागत नाही म्हणून वसुधाताई उठतात आणि टेबल लॅम्प सुरू करून खुर्चीवर बसतात. रुममधील आणि बाहेरील वातावरण एकदम शांत आणि किर्रर्र. बॉक्स मधून चष्मा काढून डोळ्यांना लावतात आणि समोरचे पेपर काढून लिहिलेल्या शब्दांवर नजर टाकतात. पेपर्सखाली असलेली जाड डायरी काढतात. जवळपास अर्धी डायरी लिहिलेली असते. लिहिलेल्या मजकुरात शेवटचं पान उलगडतात आणि लिहिण्यासाठी विचार करतात. पण काहीच सुचत नाही. घड्याळात जलद गतीने गेलेला 1 तास दिसतो. कॅमेरा डायरीच्या पानाकडं वळतो. ,वसुधाताई रागाने फक्त उभ्या तिरक्या रेषा ओढताना दिसतात आणि शेवटची रेष पेन दाबून उठवतात. (या दृष्यात त्यांची दुःखामुळे शब्दांनी सोडलेली साथ व त्यामुळे येणारी चीड तसेच अगतिकता दिसून यावी.)


Scene 8-


सकाळी - 6-6.5 (सूर्योदयापूर्वी)


सकाळी पार्कमध्ये जायला निघताना गेट उघडतात (त्यांनी चष्मा घातलेला नसतो). बाहेर येऊन गेट बंद करणार तोच, पत्रपेटीत एक लिफाफा दिसतो. ईतक्या सकाळी आलेला लिफाफा पाहून त्यांच्या नजरेत एक कुतूहल येते. पत्रपेटीतून लिफाफा काढून पाहतात तर वर कुठलाच पत्ता लिहिलेला नसतो. अधाशा सारखे तो लिफाफा फोडतात आणि आतले पत्र उघडतात. वाचायला सुरुवात करताच त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव येतात.


 (टीप- ते पत्र त्यांचे दिवंगत पती यांनी पाठवलेले असते. मृत्यूनंतर आलेले हे पत्र पाहिल्यानंतर त्यांच्या मनात जी चलबिचल, भीती, थोडासा आनंद ह्या भावना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर हवेत. प्रेक्षकांना 'हे पत्र कुणाकडून आले' याबाबत गूढ रहायला हवं.)  


पत्राची घडी घालतात आणि लंगडतच पण गडबडीने चालत घरात येतात. टेबलवर चष्मा शोधू लागतात, पण तो लवकर सापडत नाही. इकडे तिकडे चष्म्याची शोधाशोध करतात. काही वेळानंतर चष्मा सापडतो आणि त्या पत्राची घडी वाचनासाठी उघडतात. पत्र वाचताना चेहऱ्यावरचे भाव बदलत जातात. सुरुवातीला आश्चर्य, पुन्हा डोळ्यातून पाणी असे करत पत्र वाचून काढतात. पत्र वाचून झाल्यावर त्याची घडी घालून टेबलवर समोर ठेवतात आणि शून्यात पहात बसतात. काय करावं सुचत नसते. काही वेळ विचार करून निर्धाराने चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल येते. त्यानंतर पत्राची घडी करून लिफाफयामध्ये ठेवतात. कुठे ठेवायचं हा विचार करून त्यांच्या ट्रंकमध्ये मध्ये ठेवतात.


Scene 9-


दुसऱ्या दिवशी आवरल्यानंतर वसुधाताई ठेवणीतली सुंदर साडी नेसतात. सुनंदा खुणेनेच त्यांना छान म्हणून कॉम्प्लिमेंट देते पण तिच्या चेहऱ्यावर थोडंसं आश्चर्य असतं. सुनंदाने पाहिल्याने वसुधताईंना थोडंसं अवघडल्यासारखे होते.


वसुधाताई : (नजर चुकवत) नाही गं असंच. खूप दिवस झाले पडून होती ना म्हणून नेसली.


सुनंदा: आसच हासत ऱ्हावा बघा. लय दिवसातनं तुमाला आसं बघितलं.


त्यानंतर वसुधाताई घराबाहेर जातात. Camera दाराकडे स्थिर राहतो आणि वसुधाताईंची बाहेर जाणारी आकृती अस्पष्ट होत जाते.


Scene 10-


वेळ- रात्री 10-11 वाजता


वसुधाताई झोपण्यापूर्वी लेखनाच्या टेबलवर येतात. खुर्चीत बसून त्यांची अर्धी लिहीलेली डायरी उघडतात. ( शेवटच्या पानावरती scene 7 मध्ये पानावर रागाने रेषा मारलेल्या दिसतात.) नवीन पान उघडून लिहायला सुरुवात करतात. शब्द सुचत असण्याचे समाधान चेहऱ्यावर उमटते. (लिहिण्याचा scene 4-5 सेकंद सुरू राहतो).


Scene 11-


वेळ - सकाळी 7 वाजता

सकाळी त्या बाहेर निघण्याचे 5-6 दिवसाचे quick scene होतात. रोज सकाळी बाहेर पडताना त्यांची नजर पत्रपेटीकडे जात असते. काही दिवस कुठलं पत्र आलेलं दिसत नाही आणि एके दिवशी लिफाफा आलेला दिसतो. लिफाफा पाहताच चेहरा खुलतो. तो बाहेर काढतात तोच सुनंदा गेटमधून आत येत असते,


सुनंदा- काकू कुणाचं वं पत्र..?


त्या अनपेक्षित प्रश्नानं वसुधाताई चाचपडतात.. 


वसुधाताई- अगं... कुणाचं नाही... न.. नमिताचं...


सुनंदा- बर बर.. 


सुनंदा आत गेल्याची खात्री झाल्यावर पटकन लिफाफा फोडून पत्र वाचू लागतात. पुन्हा चेहऱ्यावर हसू येते. पत्र वाचून झाले की आत येऊन लपवत लपवत ते पत्र ट्रंकमध्ये ठेवतात (सुनंदा किचन मध्ये स्वयंपाक करत असते). 


Scene 12- 


यानंतर त्यांची बदललेली लाइफस्टाइल दाखवण्यासाठी खालील scene दाखवले जातात.


12.1) वसुधाताई राधाकृष्णाच्या एका मंदिरामधून बाहेर येतात. इकडे तिकडे पाहत कुणी ओळखीचे माणूस आसपास नाही याची खात्री करतात. मग गजरेवाल्यापाशी थांबून गजरा विकत घेतात. त्या गजऱ्याचा ओंजळीत ठेवून मनसोक्त सुवास घेतात आणि तो केसात माळतात.


12.2) सकाळी सकाळी walk ला जाताना पत्रपेटीमध्ये लिफाफा दिसतो. चेहरा आपसूकच खुलतो.. आणि लिफाफा फोडून वाचू लागतात.


12.3) एका संध्याकाळी वसुधाताई नाट्यगृहातून नाटक पाहून येताना दिसतात. बाहेर आल्यावर कुणी ओळखीची व्यक्ती पाहत तर नाही ना याचा कानोसा घेतात. (त्यांच्या मनात, 'नवरा गेल्यावर काही दिवसातच नाटकाला जाऊ लागली' , असं कुणी म्हणेल का ही भीती असते). कुणी ओळखीचं नाही हे पाहून तिथून घरी येण्यास रिक्षा पकडतात.


12.4) रात्रीच्या वेळी बल्बच्या प्रकाशात, वसुधाताई लेखनाच्या टेबलवर बसतात. यावेळी त्यांना खूप सारं सुचत असल्याने पटपट लिहीत असतात.


12.5) पुन्हा एके दिवशी पत्रपेटीत लिफाफा दिसतो आणि वाचताना चेहऱ्यावर प्रत्येकवेळसारखी तीच उत्सुकता आणि आनंद दिसतो.


12.6) वसुधाताई पाणीपुरीच्या गाड्याजवळ येतात आणि ऑर्डर देतात. सुरुवातीला इकडे तिकडे पाहत एक पाणीपुरी खातात. खूप दिवसानंतर घेतलेल्या त्या चवीचा डोळे मिटून आनंद घेतात. त्यानंतर कुणाची पर्वा न करता मनसोक्त पाणीपुरी खातात. अजून एका प्लेटची ऑर्डर देतात, पण पाणीपुरीवाला त्यांना एकच बास म्हणून सुचवतो. पण त्या जबरदस्ती दुसरी प्लेट घेतात. पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांचा मोर्चा कुल्फीवाल्याकडे वळतो आणि एक कुल्फी घेऊन घरी जात जात आस्वाद घेतात.


12.7) एका लायब्ररीमध्ये जाऊन 2 पुस्तकं घेतानाचे दृष्य दिसते. त्यानंतर घरी झोपाळ्यावर बसून शांत वाचत बसण्याचे दृष्य दिसते. सुनंदा तिथे त्यांना चहा आणून देते.


12.8) काही सेकंद रात्री डायरी लिहितानाचे दृष्य.


12.9) सकाळी सकाळी walk ला जाताना पत्रपेटीमध्ये लिफाफा दिसतो. चेहऱ्यावर हास्य येते.. आणि लिफाफा फोडून पत्र वाचू लागतात.


12.10) वसुधाताई एका साडीच्या दुकानात साडी निवडत आहे. एक साडी आवडते आणि घेऊन हसत बाहेर येतात.


12.7) बीचवर किंवा एखादया सनसेट पॉईंटवर बसून वसुधाताई सूर्यास्त पाहत असतात. पर्समधून एक लिफाफा काढून वाचायला घेतात. हवेने कागद जास्त फडफडत असल्याने त्या वाचू शकत नाहीत म्हणून परत ते पर्स मध्ये ठेऊन देतात. (सूर्य अस्त होताना पाठमोऱ्या वसुधाताईंच्या मागे कॅमेरा zoom out होतो.)


Scene 13 :


वेळ - सकाळचे ८

जागा- वसुधाताईंचं घर

'सहा महिन्यानंतर....' हे शब्द screen वर दाखवावे.


(बाहेर पाऊस पडतोय) सुनंदा नमिताला कॉल करते.. काही तरी रडत सांगत असते आणि बातमी ऐकून नमिताच्या हातचा फोन गळून पडतो... (ती बातमी वसुधाताईंच्या अचानक attack येऊन आलेल्या मृत्यूची असते)..


Scene 14


Time- दुपार

Place - वसुधाताईंच्या घराच्या गेट जवळ


वसुधाताईंच्या मृत्यूनंतर पूर्ण क्रियाकर्म झाल्यानंतर दोन-तीन नातेवाईक नमिताची विचारपूस करून तिचा निरोप घेऊन निघून जातात. त्यातली एक स्त्री तिला मिठी मारते. दोघीही डोळ्यातले पाणी पुसतात. आणि ते नातेवाईक निघून जातात.


ते निघून गेल्यानंतर नमिता गेट बंद करू लागते. तेवढ्यात तिला पत्रपेटीत एक लिफाफा दिसतो. तीच्या चेहऱ्यावर उत्सुकता येते. लिफाफा फोडून पत्राची घडी उघडते. पत्र पाहताच आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले जातात. कॅमेरा पत्रावर फोकस करतो. तर पत्राच्या सुरुवातीला 'शेवटचे पत्र' असं मोठ्या अक्षरात लिहिलेले असते. त्यात काही ओळी फोकस होऊन प्रेक्षकांना दिसतात.

'वसू, शेवटचं पत्र असलं तरी आपल्या प्रेमाची ही नवी सुरुवात आहे.'

'पुस्तक लिहून लवकर पूर्ण कर'

'माझ्या आयुष्यात काहीही regret राहिले नाहीत.'

'माझी आधीची पत्रं उगाच जपून ठेऊ नकोस. जगाला हे समजण्या पलीकडचं आहे.’

'सदैव तुझाच -दिनकर'


नमिताचे डोळे डबडबतात. ती पळतच घरात चालत येते. आत येताच इकडे तिकडे पत्रांची शोधाशोध करायला लागते. काही सापडत नाही. हताश होऊन बेडवर बसते तर तिची नजर कोपऱ्यात असणाऱ्या ट्रंककडे जाते. उठून त्या ट्रंकपाशी जाते आणि खाली बसून ती उघडते. उघडते तशी तिला 8-10 लिफाफयांची थप्पी दिसते. तशीच ती पत्रं घेऊन बाहेर झोपाळ्यावर बसते. सगळ्या लिफाफ्यांमधून पत्रं बाहेर काढते.


कॅमेरा पत्रातील खालील लाईन्स वर फोकस करतो आणि इथे दिनकरराव रानडे यांच्या आवाजात background मध्ये पत्र वाचले जाते.


पत्र 1 - 'वसू, दुःखात असशील.. पण सावर..'

'हे माझं दुसऱ्या जगात गेल्यानंतरचं पहिलं पत्र...'  

'खरं तर इतक्या वर्षाच्या संसारात मला काही शब्द सुचलेच नाहीत पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मात्र शब्दांनी साथ दिली.' 

'शेवटच्या महिन्यात मात्र आता आयुष्याच्या क्षितिजावरचा मावळणारा सूर्य स्पष्ट दिसतोय.'

'तूच विचारायचीस ना एवढं बरं नसताना ही काय लिहितोस एवढं. मग त्यातलीच ही पत्रं (प्रेम पत्रं) तुला वेळोवेळी मिळत जातील. आणि हो, लगेच नेहमींसारखं डिटेक्टिव्ह होऊन ते कुठून येतात याचा माग घेऊ नकोस.' 

'छानपैकी आज तुझी आवडती साडी नेस..'

'आनंदी रहा.. मी सदैव तुझ्यासोबत आहे.'


पत्र 2-

'वसू, आता पहिली गोष्ट एक कर म्हणजे माझ्या कप्प्यात एक नवीन डायरी आणि पेन आहे. ते घे आणि तुझी अर्धी राहिलेली कादंबरी पूर्ण कर. कादंबरी ला नाव मात्र मी सांगेन तेच दे... "मावळत्या क्षितीजावरची पहाट".'


पत्र 3 - (कॅमेराने फोकस केलेल्या ओळी)

'आज, छानसं एखादं नाटक पहायला जा..'

'सोबत यायला कुणी भेटलं नाही तर मी सोबत आहे असं समज.'

'लेखन चालू आहे ना?'

(इथे फ्लॅशबॅक मध्ये वसुधाताई नाटक थिएटर मध्ये एन्ट्री करताना दिसतात आणि त्यांच्यासोबत दिनकरराव देखील दिसतात).


पत्र 4- -(कॅमेराने फोकस केलेल्या ओळी)

'आज त्या राधा कृष्णाच्या मंदिरात ये.'

'आणि हो नेहमीचा मोगऱ्याचा गजरा माळायला विसरू नको.'

(इथे फ्लॅशबॅक मध्ये दिनकरराव वसुधाताईंच्या केसात गजरा माळताना चा scene.)


 नमिता पत्रं वाचून हेलावून जाते. तिचे डोळे पाणावले आहेत तरी आजी आजोबांच्या एकमेकाशेजारी लावलेल्या फोटोकडे पहाते आणि क्षणभर चेहरा हसरा होतो. नंतर पेटीकडे पाहते तर त्यात एक डायरी दिसते आणि ती उघडून पाहिल्यावर, शीर्षक दिसते 'मावळत्या क्षितीजावरची पहाट'.. नमिता निशब्द होते...


Scene 15-

शेवटच्या scene मध्ये नमिता समुद्र किनारी सूर्यास्त बघत बसली आहे. वाऱ्याने केस उडत आहेत. तिच्या हातात पुस्तक आहे. त्याच्या मुखपृष्ठावर शीर्षक आहे. 'मावळत्या क्षितीजावरची पहाट - लेखिका वसुधा रानडे'.


नमिताच्या नजरेसोबत कॅमेरा समुद्राकडे वळतो. लांबवर समुद्राच्या पाण्यात एक वृद्ध कपल हातात हात घेऊन समुद्राकडे चालत असताना दिसतात.


समाप्त

*****************

लेखक – विशाल पोतदार 

मोबाईल क्रमांक – 9730496245

इमेल ID – vishal6245@gmail.com

1 comment:

  1. wow apratim katha aani sunder screenplay......YouTube var yeu dya

    ReplyDelete