.post img {

Pages

Saturday 2 January 2021

Where is Friend's Home (1987)- Iranian. master piece

#विशालाक्षर
#cinemagully
#foreign_language_films

चित्रपट - Where is friend's home (1987)
दिग्दर्शक- अब्बास कायरोस्तामी

चित्रपट ओळख-

एखाद्या उत्तम चित्रपटासाठी अतिशय गुंतागुंतीचं कथानकच हवं असं काही नसतं. Where is the Friend's Home...  साध्या content वर असामान्य असा हा पर्शियन चित्रपट.. 

एका शाळकरी मुलाला (अहमद), शेजारच्या गावात राहणाऱ्या मित्राची (अब्दुल रझा) त्याच्याकडे चुकून राहिलेली वही परत करायचीय. एकतर मित्राचं घर माहीत नाही आणि शिवाय त्या गावात त्याच्या नावाची घरेही पुष्कळ आहेत. अब्दुलला वही पोहचवली नाही तर शिक्षक उद्या शाळेतून काढतील ही भीती पोटात घेऊन, अहमदची अब्दूलचं घर शोधण्याची धडपड सुरू होते.

हे कथाबीज ऐकलं तर एखाद्याला वाटेल, की इतक्या छोट्याशा प्रसंगावर लघुपट ठिकेय पण चित्रपट बनू शकतो? पण त्यासाठी जर प्रसंग खुलवण्याची कला असेल तर तेही सहजशक्य आहे. हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अगदी प्रेमात पाडतो.

अहमदला या छोट्याशा प्रवासात ओळखी-अनोळखी व्यक्ती भेटतात. त्यांचे संवाद कथानकास पुढे नेणारे नसले तरी भटकता भटकता, मुद्दाम अनामिक वळण घेऊन काहीतरी अनियोजीत गोष्ट पाहून सुखावून जावं असे आहेत. एक म्हातारा पुढच्या पिढीस विनाकारण कामं सांगून त्यांना कसं विनम्र बनवलं पाहिजे याच्या गप्पा मारतो तर दुसरा म्हातारा आयुष्यभर जीव ओतून केलेल्या कामाचं आता आधुनिकीकरण झाल्याने ते कसं कालबाह्य होतंय या चिंतेत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या विवंचना तत्वज्ञान किती वेगळं, किती टोकाचं असतं! व्यक्तिचित्रं रंगवण्यात दिग्दर्शक आणि लेखक जेव्हा सूक्ष्मतेने काम करतात तेव्हा असे layers असणारी कलाकृती जन्माला येते.

इराणी चित्रपट मुळात इतके realistically घडवलेले असतात की आपण त्या पात्रासोबत तो प्रवास जगतोय इतकं जवळचं वाटतं. या चित्रपटात खूप कमी पार्श्वसंगीत वापरून त्याऐवजी परिसरातले आवाज (वारा, पाऊस, पक्षी, वाहणारा नळ, वस्तू हलवल्याचा आवाज, इत्यादी..) संवादाचं काम करतात. इराणमधील पांढऱ्यामातीची बैठी घरं, चिंचोळ्या गल्ल्या, आणि दऱ्याखोऱ्यातील विस्तीर्ण लँडस्केप्स पाहत, कथानक हवंहवंसं वाटू लागतं. चित्रपट संपला तरी आपलं मन बराच वेळ इराणमधून इकडे काही परत येत नाही.

अहमदच्या जागेवर स्वतःला ठेऊन मी मलाच जोखतो. या परिस्थितीत मी किती वेळ मित्राचं घर शोधण्याचा अट्टाहास केला असता? आपलं intention चांगलं असलं तरी बऱ्याचवेळा चांगुलपणा खूप तोकडा पडतो. कित्येकवेळा मी फक्त मदत करतोय असं दाखवून काढता पाय घेतला असेल. एखाद्याला मदत करण्यातसुद्धा आपली लक्ष्मणरेषा ठरलेली असते. दुसऱ्यासाठी जगणं असं गरजेचं नाही, पण जिथे छोट्या छोट्या गोष्टीत आपली गरज आहे तिथं अगदी जीव ओतावा, हेच जगणं.

(हा चित्रपट कोकेर triology मधील पहिला भाग. दुसऱ्या भागावर लवकरच लिहीन.)


4 comments:

  1. चित्रपटाची समिक्षा वाचून चित्रपट बघण्याची उत्कटता लागलीये... खूप छान विश दा 👌👌👌

    ReplyDelete