.post img {

Pages

Monday 3 May 2021

संहिता (२०१३) - आयुष्याची स्क्रिप्ट मांडणारा चित्रपट

#विशालाक्षर
#cinemagully

चित्रपट - संहिता (२०१३)
कथा, पटकथा - सुमित्रा भावे
दिग्दर्शक -सुमित्रा भावे, सुनिल सुकथनकर
अभिनय - देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, ज्योती सुभाष, उत्तरा बावकर, डॉ.शरद भुथाडीया, सारंग साठे

चित्रपट- 

"माणूस स्वतःच्या आयुष्याची संहिता स्वतः का नाही लिहू शकत?"

संहिता चित्रपट संपता संपता हा प्रश्न एका पात्राच्या तोंडी येतो. पण खरे तर पूर्ण चित्रपटच या प्रश्नाच्या उत्तराचा धुंडोळा घेत राहतो. 

सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर ही दिग्दर्शक द्वयी जेव्हा सिनेमा बनवते तेव्हा ती प्रेक्षकाच्या मनाशी अद्वैत होऊन जाते. 'संहिता' त्यापैकीच एक! संहिता म्हणजेच स्क्रिप्ट, चित्रपट बनण्याच्या प्रक्रियेतील अगदी सुरुवातीची गोष्ट. स्क्रिप्ट परफेक्ट होण्यासाठी लेखक दिग्दर्शक, मेंदू आणि मनाच्या मंथनाची कित्येक आवर्तनं करत असतात. त्यात सुमित्राजींनी या चित्रपटाचा विषयच संहिता निवडून या प्रक्रियेत प्रेक्षकालासुद्धा सामील करून घेतलं आहे.

साल १९४६ आणि वर्तमान अशा दोन वेगवेगळ्या कालखंडातील कथा इथे समांतर दाखवल्या जातात. माहितीपटासाठी (डॉक्युमेंटरी) राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली दिग्दर्शिका, रेवती हिचं वैयक्तिक आयुष्य विस्कटत चाललं आहे. तिला लग्नाच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतंत्र आयुष्य जगायचंय. त्या स्थित्यंतरातून जाताना, ती स्वतःच्याच मनाशी झगडत आहे. त्यातच तिचं एका माहितीपटाचं शूट चालू असताना, शिरीन नावाची वृद्ध निर्माती एका जुन्या कथासंग्रहातील आवडत्या कथेवर संहिता लिहून चित्रपट दिग्दर्शन करण्यास गळ घालते. ती कथा खरं तर लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या शिरीनच्या साथीदाराची फेव्हरेट असते. मरणासन्न स्थितीत असणाऱ्या त्याची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी या साठी धडपडणारी शिरीनची आर्तता पाहून, नाही-होय करत रेवती ते आव्हान स्वीकारते. कधीही चित्रपट दिग्दर्शन न केलेली रेवती . त्या कथेविषयी अजून काही बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्यासाठी रेवती कथेच्या मूळ लेखिकेला भेटते आणि त्यांच्या चर्चेतून समांतर उभी राहते हेरवाड संस्थानाचे राजा सत्यशील, राणी मालविका आणि गायिका भैरवी यांचं नात्यांच्या अव्यक्त भावभावनात गुंतलेली कथा. सत्यशील आधी भैरवीच्या सुरांच्या आणि नकळत तिच्या प्रेमात पडतो. दरबारी वातावरणात वाढल्याने औपचारिक स्वभाव बनलेली, त्याची पत्नी मालविका आपलं प्रेम पुन्हा शोधू लागते. तिथून नात्यांचा गुंता व्हायला सुरुवात होते. पुढे रेवती ती संहिता कशी पूर्ण करताना अभिनेत्री हेमांगीला भेटते ज्यामध्ये तिच्याही आयुष्याची एक उपकथा असते. हे सर्व करता करता रेवती स्वतःलाच स्वतः नव्या रूपाने कशी सापडत जाते ह्याची ही पूर्तता.

समांतर कथानकं मांडणं म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन दोहोला आव्हान देणारंच ठरतं. कारण दोन्ही कथांचे एकेक पापुद्रे उलगडत, अलगद दोन्हींचा गाभा बरोबर शेवटीच यावा यासाठी कलात्मक कसरत करावी लागते. हे अवघड असतानाच सुमित्राजींनी त्यात अजून एक आव्हान स्वतःहून पेरलं, ते म्हणजे वर्तमानातील पात्रांमध्ये असलेले अभिनेतेच समांतरकथेतील पात्रं वठवताना दिसतात. म्हणजे रेवती आणि मालविका हे देविका दफ्तरदार, राजा सत्यशील आणि रेवतीचा नवरा यामध्ये मिलिंद सोमण, हेमांगी आणि भैरवी हे पात्र राजेश्वरी सचदेव पार पाडतात. पण ही दोन कथानकं त्याच अभिनेत्यांना घेऊन करताना प्रेक्षकांच्या डोक्यात त्याची वेगळी अस्तित्व जपतात आणि योग्य वेळ येताच एकमेकांत विरघळूनही जातात. मला वाटतं हेच या चित्रपटाचं सौंदर्य होतं. ज्योती सुभाष, देविका दफ्तरदार प्रत्येक रोल मधे एक सहजता आणतात.

सुमित्राजींचे चित्रपट मुळात वेगळ्या मांडणीचे असल्याने त्यांच्या प्रोजेक्ट्सना तितकंसं आर्थिक पाठबळ मिळत नव्हतं हे सर्वश्रुत आहेच. पण तरीही या चित्रपटातील संस्थानाचं राजेशाही वातावरण साध्या मांडणीतूनही लख्ख उजळून येतं. हे त्यांच्या कलेचं कर्तृत्व..!!

संगीत हा चित्रपटाचा अविभाज्य घटक म्हणावा लागेल. भैरवीच्या नावातूनच संगीताची तार जोडली जाते. भैरवी राग हा कुठल्याही प्रहरी ऐकला तरी सुंदरच वाटतो, तशीच ती नितांतसुंदर भैरवी गायिका. आणि तिच्या कंठातून आलेल्या एका वरचढीत एक उपशास्त्रीय रचना आपल्याला मंत्रमुग्ध करत राहतात. आरती अंकलीकर टिकेकर यांना गायनासाठी आणि शैलेंद्र बर्वे यांना संगीतासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचं नवल वाटत नाही. फक्त एकच वाटलं की आरती अंकलीकर यांचा भारदस्त आवाज रराजेश्वरी सचदेव हिच्या व्यक्तिमत्वाला काहीसा सूट होत नाही. पण ही गोष्ट गौणच आहे.

चित्रपट संपल्यावर इतकं जाणवलं की प्रत्येक माणसाची संहिता जरी वेगळी असली तरी कुठल्या ना कुठल्या धाग्याने ती एकत्र गुंफलेली असते. आपण कितीही स्वतंत्र किंवा स्वत्वाचा पुरस्कार केला तरी आपल्याला नात्यांसमवेत जगायचं असतं. नात्यांना डावलून आपण आपले passions पूर्ण करू, त्याचा आनंद घेऊ, पण आपला परस्परव्यवहार कोरडा राहिला तर जीवनात प्रेमाचा उमाळा आणि त्याचा ओलावा काय जाणवणार. अगदी जगातल्या सर्वोत्तम रोमँटिक कविता वाचलेल्या मालविकापेक्षाही कमी शिकलेली भैरवी सत्यजितच्या मनाचा ठाव घेते. पालक-मुलाच्या आंतरिक नात्यांचे अप्रतिम पैंटिंग काढणारा हेमांगीचा बॉयफ्रेंड मात्र स्वतःच्या मुलीची मानसिकता समजून घेऊ शकत नाही. चित्रपटात म्हटल्याप्रमाणे कथा तयार करताना आपण ब्रम्हा असतो. आपण स्वतः ती पात्रं निर्माण करतो. पण खऱ्या आयुष्यात समोर येईल त्या संहितेत जितकं शक्य होईल तितकं खरं आणि प्रामाणिक राहून हा चित्रपट पूर्ण करावा. आपल्यासमोर आयुष्याचा आणि नात्यांचा धागा आहे. तो विणून सुंदर कापड नाही बनवलं, तर कधीही न सुटणारा गुंता होऊन जाऊ शकतो.

सुमित्राजी या जगातून गेल्या नाहीत. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेममधे त्या आहेत. त्यांची प्रत्येक कलाकृती कलाकारांच्या मनात सृजन आणि सर्जनशीलतेची दृष्टी देत राहतील एवढं नक्की.

तळटीप - चित्रपटातील एक व्यक्ती दोन्ही कथेत आहे. ते पात्र कुठलं आहे हे सुचवण्यासाठी सुमित्राजी फक्त एक hint देतात. पण चित्रपटात जाहीर करण्याचा मोह मात्र आवरतात. चित्रपट निरखून पाहण्याची परीक्षाच घेतात जणू.


©विशाल पोतदार

No comments:

Post a Comment