.post img {

Pages

Saturday, 22 May 2021

The Disciple - चित्रपट समीक्षण


#विशालाक्षर

#Cinemagully 

#The_Disciple


चित्रपट -The Disciple

लेखन, दिग्दर्शन -चैतन्य ताम्हाणे

अभिनय - आदित्य मोडक, अरुण द्रविड, किरण यज्ञोपवीत, सुमित्रा भावे


भारतात युगेनुयुगे गुरूशिष्यपरंपरा चालत आली आहे. बाकीच्या क्षेत्रात ती संपुष्टात आली असली तरी शास्त्रीय संगीतात ती अजूनही जोपासली गेली आहे. त्याचे मोठे कारण म्हणावं तर, कदाचित संगीत घराण्यांनी अलिखित गुप्तता करारानुसार जतन केलेला गायन शैलीतील exclusiveness. गायकांच्या शैलीच्या आख्यायिका आणि तत्वज्ञान अढळ होत जातं आणि त्या परंपरेत एकलव्य किंवा कर्ण न होता अर्जुनाची जागा मिळावी यासाठी शिष्यांचा संघर्ष सुरू होतो. गुरूइतकी लोकप्रियता आणि गायकीची उंची प्राप्त करण्याच्या प्रवासात अर्जुनाचीही तितकीच घालमेल होते. यातलाच एका शिष्याचा प्रवास म्हणजे The Disciple. 


चैतन्य ताम्हाणेची स्लो poetic फ्रेम मला 'कोर्ट' मध्येही आवडली होती. त्यात पटकन काही गाठण्याचा आणि conclusion वर येण्याचा चेव नसतो. पटकथाही अगदी त्याच गतीने पुढे सरकते. या चित्रपटातही त्याने हीच किमया साधलीय. संवादाचं चित्रीकरण जितके नैसर्गिकरीत्या मांडता येईल तितकं सहज आहे. 


या चित्रपटात त्याला नक्की काय सांगायचं होतं हा प्रश्न बऱ्याच जणांकडून trolling च्या माध्यमातून येतोय. मला वाटतं की यात शरद नेरूळकरची अस्वस्थता 'शिष्य' कसा असू नये यावर भाष्य करते. ज्ञानासाठी आयुष्यभर गुरूवर अवलंबून राहिलं की आपल्यात काहीतरी कमी आहेच हा मोठा न्यूनगंड राहतो. गुरूकडून फक्त प्रवासासाठी शिदोरी मिळवायची असते, पुढचा प्रवास  एकट्याचाच असतो हे ध्यानात असावं. चित्रपटाच्या पोस्टर मधून हे अधिक स्पष्ट होतं. यातील माईंची गायकी अजोड होती, कारण त्यांनी स्वतःसाठीचं तत्वज्ञान स्वतः उभारून जगलं होतं. ते तत्वज्ञान बिंबवण्याचा प्रयत्न करत शरद नेरुळकर, इतका यांत्रिक शिष्य बनत गेला की मनातली अस्वस्थता त्याच्यातल्या कलेला एका सीमारेषेपुढे जाऊच देत नाही. इतकंच काय तो चांगला रसिकही बनू शकला नाही.


शरद नेरुळकरच्या पात्रात स्वतः उत्तम गायक असणारा आदित्य मोडक आणि त्याच्या गुरुंच्या रुपात असणारे अरुण द्रविड (जे स्वतः किशोरीताईंचे शिष्य आहेत.) या दोघांनीही उत्तम अभिनय साकारला आहे. दिग्दर्शकाने इथे deadpan शैलीचा जबरदस्त उपयोग करून घेतला आहे. (Deadpan म्हणजे चेहऱ्यावर काहीही भाव न दाखवता बॅकग्राऊंड आणि संवादातून तो इफेक्ट आणने. मला ही संकल्पना लोकसत्तामधील संध्या गोखले यांच्या लेखातून समजली.) माईंच्या आवाजरूपाने चित्रपटात वावरणाऱ्या सुमित्रा भावेंनी जो प्रभावीपणा आणलाय तो अतुलनीय. आज त्या आपल्यात नाहीत पण त्यांचं हे शेवटचं सादरीकरणही कलासाधनेचे तत्वज्ञान सांगता सांगता यावं यासारखं सुदैव ते कुठलं.!


चित्रपटात येणारा अजून एक मुद्दा म्हणजे, कला साधनेचे प्रवाह. काहीजणांसाठी ते फक्त वैयक्तिक पातळीवरची ईश्वरसाधना असते तर काहींसाठी ते रसिकांना आवडेल असं सादरीकरण करून मिळवलं जाणारं अर्थार्जन तसेच प्रसिद्धी. तिसऱ्या प्रवाहातील कलाकार दोन्ही टोकांच्या भूमिकेतून मधला मार्ग काढत, साधना आणि सादरीकरण आत्मसात करून तारेवरची कसरत करत मार्गस्थ असतात. त्यातला कुठल्याच प्रवाहाचे वर्गीकरण आपण वाईट किंवा चुकीचे असे करूच शकत नाही. गुरूशिष्यपरंपरा गौरवशाली असली, तरी त्यात शिष्याला तत्वांच्या साखळदंडात बांधून ठेवलं जाऊ नये. गुरू ईश्वरासमान न राहता जर मित्रासमान राहिला तर कला अधिक दूरचे टप्पे गाठू शकेल. मी सध्या हार्मोनियम शिकतोय (सध्या बेसिकच आहे). माझी गुरू वयाने माझ्यापेक्षा लहान आणि माझी चांगली मैत्रीणच आहे. शिकताना वातावरण टेन्शनचं न राहता आमची हार्मोनियमसंदर्भात खूप वेगवेगळी चर्चा घडते. तिने बसवलेल्या बंदिशीवर रसिक म्हणून माझी प्रतिक्रिया घ्यायला तिलाही कमीपणाचं वाटत नाही. मी माझ्या माझ्या रसिकभावनेपोटी शिकत असलो तरी मला या प्रोसेसमुळं संगीत शिकणं अधिक सुंदर वाटतं.


चित्रपटात अजून काही गोष्टी टाळता किंवा add करता आल्या असत्या. शरद नेरुळकरचे हस्तमैथुन करताना दाखवलेली दृश्यं (अनेकवचनी!) माझ्यामते तरी इतकी ठळकपणे यायला नको होती. कदाचित कथेत त्याने लग्नाचा त्याग केला असला तरी त्याची लैंगिक भूक मनात असणारच हे दाखवायचे असले तरी ते अजून ओझरते मांडता आले असते. फिल्म फेस्टिव्हल्स किंवा एकटे पाहणाऱ्याप्रेक्षकापर्यंत ठीक आहे पण कुटुंबासोबत पाहताना ह्या सीन्सचे काही सेकंद, युगांप्रमाणे भासले नाही तर नवलच. (कुटुंबासोबत पाहणार असाल तर फास्टफॉरवर्ड कुठे करायचं ते आधीच पाहून ठेवा.) रिऍलिटी शोजमधून शास्त्रीयसंगीत गायक बनू इच्छीणाऱ्याचं कलात्मक अधःपतन होत जातं असं सूचक दाखवलं आहे. परंतु मला अनेक शोज मधून शास्त्रीय संगीत गायक आपली शैली जपून इतर फॉर्म्समधे गाताना दिसतात. मी शास्त्रीय संगीताचा निस्सिम चाहता असलो तरी सुगम संगीत, भावसंगीत, रॉक, पॉप, जॅझ, ऑपेरा ही संगीताची अशुद्धता नसून वेगळी तसेच सुंदर रूपेच आहेत असं मला वाटतं. या चित्रपटात एखादी ५-६ मिनिटांची सुंदर बंदिशही यात यायला हवी होती. पूर्ण चित्रपटात शरदची अस्वस्थता दाखवता दाखवता शास्त्रीय संगीताबद्दलच एक निगेटिव्ह चित्र तयार होत राहते.


बरेच लोक अशा चित्रपटांना दुर्बोध म्हणून खिल्ली उडवतात. परंतु मला वाटतं की चित्रपटांनी एक ठराविक भूमिका मनात ठरवूनच त्याची का मांडणी करावी? उत्तरं देत बसण्यापेक्षा प्रश्न किंवा संभ्रम समोर आणण्यासाठी चित्रपट प्रभावी माध्यम का ठरू नये? प्रत्येक वेळी कला 'हा सूर्य हा जयद्रथ' अशी भूमिका घेऊनच नाही मांडली जाऊ शकत. Abstract चित्र साकारताना त्या चित्रकाराचे विचार इतके random असतात की तो त्याला कान नाक डोळे नाहीच देऊ शकणार. जर अधिक सोपं करून दाखवावं तर त्यात कलात्मकता राहतच नाही. म्हणून असे दुर्बोध म्हणवले जाणारे चित्रपटदेखील आपण स्वीकारायला हवेत. 


© विशाल पोतदार 


टीप- हा चित्रपट netflix वर available आहे.


 https://m.facebook.com/story.php?story_fbid=3970212863028056&id=1144393408943363



No comments:

Post a Comment