.post img {

Pages

Monday 11 April 2022

आडवळणाची मंदिरे

#विशालाक्षर
#आळंदी
#आडवळणाची_मंदिरे

मी आणि स्नेहल जेव्हाही एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रास जातो तेव्हा मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन तिथला परिसर भटकतो. तिथे छोटेखानी अनोळखी मंदिरे, मठ, जुन्या धर्मशाळा सापडतात. मुख्य मंदिरात जरी हजारो लोक असतील तरी अशा छोट्या मंदिरात चिटपाखरूही नसते. परंतू तिथे काहीतरी वेगळेपण मिळते. साठून राहिलेली निरंजनासारखी शांतता, विलक्षण मूर्ती, तेवत असलेली समई असते. कुठे नाजूक लाकडी सभामंडप, तर कुठे रांगड्या दगडांचे बांधकाम दिसते.

आळंदीत असे दोन मठ पहायला मिळाले.

स्वामी हरीहरेंद्र मठात दगडी द्वार, आत लाकडी स्ट्रक्चर आणि महादेवाची पिंड आहे. गाभाऱ्याच्या बाहेर दोन अर्धाकृती मूर्ती दिसल्या. त्या बहुतेक द्वारपाल किंवा स्वागत करणाऱ्या स्त्रिया असाव्यात. त्या डोळ्यातले जिवंत भाव मी कधीच विसरू शकणार नाही. आजपर्यंत इतके म्युझियम्स पाहिले, मंदिरे पाहिली पण ही मूर्ती कधीच विस्मरणात जाऊ शकणार नाही अशी आहे. त्या मठातच बाजूला काढलेल्या दोन खोल्यांमध्ये तेथील पुजारी काकांचा संसार होता. मनात वाटले की येथे राहायला मिळणे यातच खूप नशीब सामावलेय. मी त्यांनाही त्या मूर्तीबद्दल विचारले पण त्यांना इतकेच माहीत होते की हरीहरेंद्र स्वामींनी ५०-६० वर्षांपूर्वी कुठून तरी आणली होती. मी जेव्हाही आळंदीला जातो तेव्हा ही मूर्ती मला मठाकडे खेचते.

दुसरा मठ सापडला तो... कन्हैयाश्रम.. 
आश्रमाच्या नावाची पाटीच या आश्रमाची जर्जरता सांगत होती. कुणी इथली देखरेख ठेवत नसल्याने आवारात झाडांच्या पानांची गादीच पसरलेली. पक्षांची कुजबुज स्पष्ट ऐकू येत होती. तिथल्या वेलीही इतक्या जुन्या होत्या की एखाद्या झाडाचे खोड वाटावे असे जाडसर आणि त्यांनी घातलेले वेटोळे तर अजगरासारखे होते. ते वातावरणच इतके शांत होते की गेटच्या आत गेले की गजबजल्या आळंदीची हद्दच संपते जणू! मंदिरात फक्त विठ्ठलाची छोटीशी मूर्ती होती. भिंतीचा रंगानेही झिजून तिथला निरोप घेतला होता. स्वामी राहायचे त्या खोल्यांची पडझड होऊन हिंदी चित्रपटातले खंडहर असते तसे दिसत होते. 

आम्ही त्याच्या मागच्या बाजूस गेलो, तर तिथे जुन्या काळात आलेली पत्रं तारेत खोचून अडकवून ठेवलेली दिसली. वाटलं की या गठ्ठ्यात किती भावना, किती स्टोरीज स्तब्ध होऊन राहिल्या असतील. पाहिले तर सगळी पत्रं १९९७ ची होती. तब्बल २५ वर्षांपूर्वीची असल्याने, 'दुसऱ्यांची पत्रे वाचू नये' हा गिल्ट मनातून काढून टाकला आणि पत्रे वाचू लागलो. त्यावेळी तेथे एक आनंदाश्रम नावाचे महाराज राहत होते. तेथे त्यांचे अजून एक नाव लिहिले होते, पण ते इतके अवघड होते की लक्षातच राहिले नाही. त्यातील पत्रात महाराजांच्या तब्येतीची विचारपूस करणारे भक्त होते, काहींच्या पत्रात तीर्थक्षेत्राला जाताना त्यांना सोबत घ्यावे म्हणून केलेला हट्ट होता. एक पत्र २० वर्षाच्या मुलीचे होते. बाबांवर तिची खूप श्रद्धा होती. लग्न न करता फक्त अध्यात्मिक अनुभव घेणे ही तिची ओढ होती. मग तिने ब्रम्हाकुमारीज जॉईन करून ब्रम्हत्वाची कशी अनुभूती घेतली याचा वृत्तांत अगदी समोर बसून कथन केल्यासारखा त्या पत्रात लिहिला होता. मग मनात विचार आले की आता ती मुलगी ४५-४७ ची स्त्री असेल. अजून ती त्या मार्गातच असेल का? ह्या पत्राने तिची अनुभूती बांधून ठेवली. पण २५ वर्षे तिचे आयुष्य कुठल्या वळणाने गेले असेल. मी येथे नाव सांगत नाही पण मी फेसबुकवर सर्च करून पाहिले तर अजून त्या ब्रह्मकुमारीज मध्ये आहेत. तंत्रज्ञानाचा तिथे समर्पक उपयोग वाटला.

एक गोष्ट विलक्षण जाणवली, की २५ वर्षांचा पावसाळा,वादळवारा, कित्येक स्थित्यंतरे पाठीशी घालून ती पत्रे शाईसहित दोन तपे तगली होती. एखाद्या दुपारी माझ्या हाती यावीत हे विधीलिखित होते. त्या विधीलिखितापुढे सगळी प्रॅक्टिकल कारणे स्तब्ध होतात आणि जे घडायचे ते घडते. सर्व शृंखला ठरलेल्या.

असे वेगळे अनुभव देणारी आडवळणाची वर्दळ नसलेली ठिकाणे म्हणून तर फिरू वाटतात. तिथे स्वतःसहित बरंच काही नवीन सापडते.

© विशाल पोतदार

No comments:

Post a Comment