.post img {

Pages

Tuesday 3 May 2022

सुंगी मुंगीची गोष्ट (पुस्तक)


प्रकरण १) सुंगीचे मुंगीनगर

सुंगी नावाची एक इवलीशी मुंगी होती. सुंगी तशी आकाराने साखरेच्या दाण्यापेक्षाही लहानगी पण अंगात खोड्या मात्र भरभरून होत्या. घरातून बाहेर पडली रे पडली, की टणाटणा पळत पसार झालीच म्हणून समजायचं. खेळता खेळता रोज काहीतरी नवीन संकट ओढवून घेणं हा तिचा आता नित्यनेमच झाला होता. अहो, जाडजुड रेड्यावर बसून यमराज जरी तिच्या समोर उभे ठाकले असते, तरी त्या रेड्याच्या कानाचा चावा घेऊन तिने त्याला थयथय नाचवले असते.
पाटलीनबाईंच्या बंगल्यामागे वसलेल्या मुंगीनगर नावाच्या वारुळात सुंगीचे घर होते. बंगल्याच्या चारही बाजुंनी असलेल्या मोकळ्या जागेत विविध प्रकारची झाडे-वेली दिमाखात उभी होती. घरासमोर आंबा, फणस, चाफा अशी डौलदार झाडे तर किचनच्या मागे झाडांच्या आधाराने फुललेल्या मोगरा, काकडी, पडवळ यांच्या वेली होत्या. आणि तिथेच वसलेले हे मुंगीनगर छोटे असले तरी, पाटलीनबाईंच्या बंगल्यासारखे गोंडस होते बरं का! 
मुंग्यांच्या कित्तीतरी पिढ्यांनी माती जमवून जमवून हजारो खोल्यांचे हे शेकडो मजली वारूळ बांधले होते. मुंगीनगर कसे दिसायचे माहितीये? अगदी आईस्क्रीमचा कोन उलटा ठेवल्यावर जो आकार होईल ना, अगदी तस्सेच! त्याच्या सभोवताली मुंग्यांच्या फौजांना येण्याजाण्यासाठी प्रशस्त वाटा होत्या. वारुळाच्या आतमध्ये आले की मुख्य सभागृह लागायचे. आणि त्यामागे मुंग्यांच्या कुटुंबांना रहायला केलेल्या खोल्यांची लांबलचक ओळ होती.
त्या सभागृहात राणी मुंगी सर्वांसोबत चर्चा करून रोजच्या कामाचे नियोजन करत असे. नियोजन केल्यावर सर्वांना कामाच्या जबाबदाऱ्या वाटणे, आणि कामाची अंमलबजावणी चाले. बरं ही राणी मुंगीचे पद मात्र सध्या सुंगीची आई म्हणजेच 'मुंगाई'कडे होते.  
मुंगाई अतिशय कडक शिस्तीची आणि प्रामाणिक बाई! शिवाय प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ती स्वतः प्रयत्न करत असल्याने सर्वांची आवडती होती. स्वतःची आईच राणीमुंगी असली तरी सुंगीला मात्र कामातून किंवा शिक्षणातून काही सूट नव्हती बरे! त्यामुळे सुंगीला आळस करत का होईना सोपवलेली कामे पूर्ण करावीच लागे. मुलांची शाळा सुटल्यावर त्यांना अन्न आणायच्या कामाला पाठवले जायचे. आणि सुंगीही कधी एकदा शाळा सुटते आणि हुंदडायला जाते याचीच वाट पहायची.
तर असे हे मुंगीनगर! गंमत जंमत असणाऱ्या या निराळ्या दुनियेतील अतरंगी सुंगीचे किस्सेही तितकेच रंगतदार होते.

प्रकरण २) उकळत्या दुधावरील पराक्रम
पाटलीनबाई अधूनमधून विषारी पाउडर मारून मुंग्यांना मारायचं काम करीतच राही. शिवाय त्यांचा मुलगा गोलू खेळता खेळता वारुळावर बॉल मारत असे. अशामुळे मुंग्यांची इमारत पुन्हा पुन्हा ढासळे. कितीतरी मुंग्या त्यामुळे आपला जीव गमावत.  सुंगीला त्या तडफडणाऱ्या मुंग्या पाहून खूप वाईट वाटे. आजतर सुंगीसुध्दा त्या खडूवरून जाता जाता वाचली. पाटलीनबाईवरच्या रागाने तिच्या मनात आता 'बदला घ्यायची' खूणगाठ पक्की केली होती. पण ती पडली इवलीशी! ती कसा एवढ्या बलाढ्य पाटलीन बाईंशी लढणार.
एकदा काय झाले! पाटलीन बाईंच्या किचन मध्ये पडलेल्या बिस्कीटचे कण आणायचे काम चालू होते. त्यात सुंगीदेखील होती. काम करून ती थोडे इकडे तिकडे अशीच भटकत होती, इतक्यात तिथे धाडधाड असा आवाज करत पाटलीनबाई आल्या. त्यांना पाहताच सुंगीला जाम राग आला. ती जिथे उभी होती तिथेच पाटलीन बाईंनी आपला हात ठेवला. सुंगी रागाच्या भरातच त्या हातावर चढली आणि जोरदार चावा घेतला. तिला झटकायला पाटलीनबाईंचा दुसरा हात येतच होता, इतक्यात सुंगी खांद्याकडे चढू लागली. पाटलीन बाई आता चिडून तिला मारायचा प्रयत्न करू लागल्या, पण इतक्यात सुंगी त्यांच्या पदरावरून मानेवर पोहचली. आणि सर्व ताकदीनिशी कडकडून चावा घेतला. चावून विजयाच्या खुषीत पुढचे पाय उचलणार, तोच बाईंनी तिला जोरात झटकले.
सुंगी उडून हवेतच पाच सहा कोलांट्या उड्या खात पडत होती. वरूनच तिला आपण शेगडीवर ठेवलेल्या दुधाच्या पातेल्यात पडणार असे दिसत होते. भीतीने ती ओरडली आणि डोळे विस्फारले. आता ती शेगडीच्या बाजूला पडते, दुधात पडते की शेगडीच्या आगीवर काही कळत नव्हते. शेवटी ती पातेल्याच्या काठावर पडली. सामान्यतः संकटातून वाचल्यावर आपला जीव भांड्यात पडतो, इथे मात्र सुंगी भांड्यात पडल्याने जीव वाचला. 
पाटलीनबाई मान चोळतच हॉलमधे जाऊन टीव्हीपुढे बस्तान मांडून बसल्या. सुंगीला वाटलं, पटकन इथून बाहेर उडी घेऊ आणि घरी जाऊन बसू. पण तेवढ्यात पायाला चटके बसू लागले. आता मात्र तिला येऊ घातलेल्या गरम संकटाची जाणीव झाली. 
आता उष्णता वाढत होती आणि बाहेर पडण्याची काहीतरी कल्पना पटकन काढणं क्रमप्राप्त होतं. त्या कडेवरून एकदा तिने पूर्ण फिरून कुठून उतरता येतंय का ते पाहिलं. खाली शेगडीच्या ज्वालेकडे पाहूनच उडी मारायचा विचार गिळला. पायाला जास्तच चटके बसू लागल्यावर, मात्र ती रडकुंडीला आली.  
इतका वेळ सुटकेसाठी पातेल्याच्या बाहेर पहात होती, पण रडताना सहज तिची नजर दुधावरच्या शुभ्र अशा सायीवर पडली. सायीचे विस्तीर्ण असे पांढरे शुभ्र पटांगण पसरले होते. त्यावर काही बुडबुडे तर कुठे सुरकुत्या दिसत होत्या. तिच्या मनात आलं, "मरायचंच आहे तर त्या पांढऱ्या पटांगणातच मरू."  मनात मुंगीदेवीची प्रार्थना केली आणि त्या पातेल्यात घेतली एकदाची उडी. खाली पडेपर्यंत हवेत ऊब जाणवली आणि काही क्षणातच त्या मैदानात उतरली. खरं तर ती साय गादीसारखी मऊ मऊ होती. इवलेसे पाय हलकेसे रुतून गुदगुल्या होत होत्या. तिला मघापासूनच्या त्रासाचा थोडाफार का होईना विसर पडला.
तिथे फिरताना मात्र तिला जाणवलं की जितकं मधोमध राहू तेवढा गरमपणा कमी वाटतोय. आता असेही आपल्यासोबत जे काही घडेल त्याची वाट पाहत राहणे हेच तिच्या हाती होतं. पण हळूहळू गादी जास्तच गुबगुबीत होऊ लागली. सुंगी स्वतःवरचं संकट विसरून त्या गादीवर पळत येऊन घसरणे, उड्या मारणे, लोळणे, डोक्यावर उभं राहणे इत्यादी खेळात रममाण झाली. खेळता खेळताच तिनं गादी चाखून पाहिली तर जामच चविष्ट लागली. आजपर्यंत तिनं इतकं चवदार असं दुसरं काही खाल्लं नव्हतं. मग काय? आवडतंय म्हटल्यावर हिने ती गादी खायला सुरुवात केली. थोडं खाल्ल्यावर पडलं ना छिद्र. त्या छिद्रातून धुरासारखं काहीतरी बाहेर येऊ लागलं. आत काय आहे हे डोकावून पाहताना, आतल्या पांढऱ्याशुभ्र गरम दुधात तिचा पाय गेला. त्यात पडून गटांगळ्या खाणार, इतक्यात तिनं कसाबसा तोल सांभाळला. आता मात्र ती मधे येऊन गपगार बसली. स्वतःच्या बालिशपणाची कीव आली. इतक्या मोठया संकटात आपला खाण्याचा मोह सुटेना याचा रागच आला.  आता तिनं शांत पावित्रा घेतला. यातून वाचायचं असेल तर संधीची वाट पाहावी लागेल. छोटीशी देखील संधी सोडता कामा नव्हती. ती चारी बाजूला बारीक लक्ष ठेऊन बसली. आता तिच्या मनातला अल्लड, आताताईपणा जाऊन समंजस, धाडसीपणा रोवला जात होता. 
काही वेळ शांतपणे गेला. अचानक काहीतरी अजबच घडायला सुरुवात झाली. दूध उतू जायला सुरुवात झाली आणि आतून कुणीतरी ढकलल्यासारखे ते सायीचे पटांगण मधोमध फुगू लागलं. फुगलेल्या पटांगणासोबत सुंगी जशी वर येत होती तसे भीतीने पाय लटपट कापत होते. तो अजस्त्र फुगवटा फोडून आता काहीतरी बाहेर येणार आणि तिला खाणार असंच वाटू लागलं. पण सुंगी आता हार मानणार नव्हती. एक पाय टेकवत दुसरा पाय उचलत ती तग धरून राहिली. एका क्षणी ती पटांगणासोबत इतकी वर आली की आजूबाजूचं सर्वकाही दिसु लागलं. तेवढ्यात हॉल मधून पाटलीनबाईदेखील पळतच आल्या. सुंगीने तोल सावरत वेगानं पातेल्याच्या बाहेर जीवानिशी उडी घेतली. काहीक्षण ती हवेतच होती. खाली कुठे पडणार..? जिवंत राहणार की मरणार..? काही सांगता येत नव्हतं. पण वाचण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद मात्र होता. 
शेवटी तो क्षण आला जेव्हा ती शेगडीशेजारच्या डब्यावर दोन तीन कोलांट्या घेत पडली. त्या पाटलीनबाईंनी धावत येऊन शेगडी बंद केली आणि नवऱ्याला खेकसली, "अहो.. दूध उतू गेलं. . एखादं काम ही धड करता येत नाही बाई या माणसाला."
सुंगीचा आनंद त्या किचनमध्ये मावत नव्हता. लंगडत लंगडत घर गाठलं. दाराशीच आई बाबा उभे होते. आता ती पुन्हा लहानगी होऊन रडू लागली. बाबांनी तिला जवळ घेतलं, "कुठे होतीस गं सुंगे? तुला शोधण्यासाठी आम्ही किचनमधला डबानडबा धुंडाळला बघ." 
बाबांच्या कुशीत रडता रडताही सुंगीच्या डोळ्यातून हसू ठिबकत होतं. आणि एवढं होऊनही शहाण्या मुंगीसारखी गप्प बसेल, ती सुंगी कसली? तिच्या मनात अजून फक्त 'एकदाच' आपल्या खास मैत्रीण बुंगीलाही पटांगणावरचा फुग्यावर हुंदडायचं आणि त्यावर ताव कसा मारायचा याची आखणी तयार होऊ लागली. 
प्रकरण ३) सुंगी-बुंगीची बर्फाळ सफर
एकतर सुंगीच्या कडकडी स्वभावामुळे मुंगाई आणि मुंगोबा अगदीच काळजीत असायचे. आणि मागच्या वेळेस तापत्या दुधातून वाचल्याचा पराक्रम कानी आला, तेव्हा मुंगाईने नांगीत पकडून तिचा चांगलाच समाचार घेतला होता. सुंगीने आईच्या नांगीतून आपली इवलीशी मान कशीबशी सोडवत, फक्त हो ला हो म्हणण्याचं काम केलं.
शेवटी मग तिच्या खोड्यांवर लक्ष राहावं, म्हणून मुंगाईने, सुंगीची जिवलग मैत्रीण 'बुंगी'ला पाचारण केले. बुंगीला कडक शब्दात आदेश दिला, "दिवसभर सुंगीबरोबर राहायचं. आणि जर सुंगीने नेहमीसारखा काही अवली प्रकार करण्याचा प्रयत्न केलाच, तर सरळ तिला घरी ओढत आणायचं. कळलं?" बुंगीने घाबरत घाबरत हो म्हटलं असले तरी, मनात मात्र सुंगीबरोबर मज्जा करण्याचे साखरकण घोळू लागले.
दुसऱ्या दिवशी, मुंगाईने सुंगी आणि बुंगीला मुद्दामच गॅस शेगडीपासून लांबच्या कोपऱ्यात, अन्नशोध मोहिमेचे काम दिले. शिवाय दोघींनाही लवकर परतण्याची ताकीद दिली. सुंगी-बुंगी मुंगाईपुढं निमूट असल्या, तरी एकदा का दृष्टीआड झाल्या रे झाल्या की दुडूदुडू पळत निघाल्या. 
त्या कोपऱ्यात पोहोचणारच, इतक्यात सुंगी-बुंगीच्या दृष्टीसमोर पाटलीनबाईंचा मुलगा गोलू लपतछपत आईस्क्रीम खात येताना दिसला. त्याचं अर्धं लक्ष आईस्क्रीममधे, तर अर्धं लक्ष आतून आई येतेय की काय याकडे लागलं होतं. ते पाहून लगेच सुंगीच्या जिभेवर आइस्क्रीमची चव रेंगाळू लागली. मागच्यावेळी तिने ते थोडंसं घरी न्यायचा प्रयत्न केला, तर ते रस्त्यातच वितळून गेला होतं. आज मात्र सुंगीला आईस्क्रीम मनसोक्त खायचं होतं. तिने बुंगीला आईस्क्रीमच्या चवीबद्दल इतकं चढवून सांगितलं की बुंगीच्या तोंडाला आत्ताच त्याची चव जाणवू लागली. आता दोघींच्याही डोक्यावरचे अँटेना आईस्क्रीमकडे वळले आणि मिशन आईस्क्रीम सुरू झालं. दोघीही त्या भांड्यावर सरसर चढल्या आणि आईस्क्रीम चाखण्यात गुंग झाल्या. आईस्क्रीममुळे पोटाच्या बाहेरून आणि आतूनही गारेगार वाटत होतं. बुंगीचे गपागपा हादडणे चालू होतं, तर सुंगीचा वरच्या टोकावरून आईस्क्रीम चाटत घसरत खाली येण्याचा खेळ सुरू होता.  
    
पण अरे हे काय? अचानक पाटलीनबाई आल्या आणि आईस्क्रीमची वाटीच उचलून कुठेतरी नेऊ लागल्या. आणि सुंगी-बुंगीला आपण खूप उंडू लागल्यासारखे वाटू लागले. आईने आईस्क्रीम नेले म्हणून बाजूला रडत हातपाय आपटत गोलूचे आकांड तांडव चालू होते. सुंगी-बुंगी घाबरून एकमेकीकडे पाहू लागल्या. त्यातून दोघीही खाली उडी घेणार होत्या, इतक्यात पाटलीनबाईंनी ती वाटी फ्रिजमधील फ्रिजरमधे ठेऊन दिली. सुंगी-बुंगीपुढं अचानक अंधार पसरला. अगदी आत्ता थोड्या क्षणापूर्वी मजेत असणाऱ्या त्या निरागस जीवांची भीतीने गाळण उडाली.
दोघींनाही समजत नव्हते की हे थंडीने गोठवून टाकणारे ठिकाण आहे तरी कसले? चारी बाजूला बर्फाच्या रांगाच रांगा दिसत होत्या. इथून बाहेर पडणे लांबच, पण साधा पाय जरी खाली ठेवला तरी खूप जोराच्या कळा येत होत्या. वाटीच्या काठावर थोडे कमी थंड असल्याने, दोघींनी तिथे बसकन मारली. इतर वेळी चुरचुरू बोलणारी बुंगी मात्र आता ढसढसून रडू लागली. सुंगीने कसेबसे समजूत काढत, तिला शांत केलं. हळूहळू थंडी वाढतच होती. दोघींच्या अँटेनावर आता बर्फ जमा झाला होता. बुंगी तर एकदम आकसून गेली होती. नेहमी संकटात भराभर विचारचक्र चालवणाऱ्या सुंगीचे डोके, आत्ता मात्र थंडगार पडले होते. काहीवेळ असाच गेला. अजून कुणीही ते दार उघडत नव्हते. बुंगीला आता श्वास घेणेही मुश्कील झाले होते. अगदी काही क्षणातच त्या दोघीही बर्फात गोठून जाणार होत्या.
सुटण्याची एखादी छोटीशी तरी संधी मिळेल अशा आशेत सुंगी आजूबाजूस नजर रोखून बसली होती. इतक्यात घरातली वीज गेली आणि फ्रीजच बंद पडला. सुंगीला काहीतरी आवाज थांबल्याचे जाणवले. थंडपणा थोडासा कमी वाटू लागला. काहीतरी बदल घडणार हे जाणवू लागलं. तर काय? पण एक संकट जातं तर दुसरं अगदी लगेच समोर हजर असतेच. भांड्यातले आईस्क्रीम वितळून दोघींच्या अंगावर ओघळू लागलं. आणि अगदी काही वेळातच वरती जमलेला बर्फ वितळून, सुंगी-बुंगीपेक्षाही मोठे मोठे पाण्याचे थेंब धप्प धप्प पडू लागले. सुंगीला आता मोठ्या संकटाची चाहूल लागली होती. काहीतरी मार्ग काढणे क्रमप्राप्त होते. 
इतक्यात फ्रिजच्या बाहेरून गोलूचा आवाज येत होता. सुंगी कान देऊन ऐकू लागली.
"आई, लाईट गेली आहे. आईस्क्रीम वितळण्यापेक्षा मी खातो आता."
सुंगीला उमजले की गोलू आता कोणत्याही क्षणी फ्रिज उघडू शकतो. वाचण्याची ही एक आणि एकमेव संधी मिळणार होती. सुंगीने पटकन बुंगीला पाठीवर घेतले आणि आईस्क्रीमच्या भांड्यावर चढू लागली. ओघळणाऱ्या आईस्क्रीममुळे पाय घसरत होते. जिद्द हरेल ती सुंगी कुठली. ती तसेच पाय रोवत वर जात राहिली. वाटीच्या टोकाच्या कडेला ती पोहचली होती इतक्यात गोलूने फ्रिजचे दार उघडले आणि पुन्हा फ्रिजर उघडला. सुंगीने वाटीच्या काठाला घट्ट पकडून ठेवले. हात चुकूनही सुटला असता तर पुन्हा फ्रिजमध्येच पडली असती. गोलू आईसक्रीम बाहेर काढत होता. काही क्षणातच सुंगी-बुंगीला बऱ्याच वेळानंतर उजेड दिसू लागला. त्याने वाटी फ्रिजच्या बाहेर काढली रे काढली तशी सुंगी आणि बुंगीने पटकन खाली उडी घेतली.
दोघीही एकदाच्या बाहेर आल्या आणि त्यांना खुशीत हसावं की रडावं हे देखील कळत नव्हतं. मघाशी घाबरून रडणाऱ्या बुंगीचे अँटेना आता आनंदाने नाचत होते. घरी गेल्यावर मुंगाई नांगीत पकडणार असली तरी सुंगीचं मन मात्र आईस्क्रीमच्या आठवणीत वितळत चाललं होतं. आणि पुन्हा कधीतरी आईस्क्रीम खायला कसं येता येईल हा विचार मनात घोळू लागला. 

प्रकरण ३) पतंगस्वारी

एकदा सुंगी आणि बुंगी दोघी साखरेचे दाणे घेऊन घरी परतत होत्या. वजन आवरत नसले तरी सुंगीने मोठाले दोन दाणे घेतले होते. त्या ओझ्याने ती झोक देत चालत होती आणि बुंगी तिला हसत होती. इतक्यात 'गोलू' तिथे पतंग घेऊन आला आणि किचनकट्ट्यावर पतंग ठेऊन दोरा आणायला बाहेर आला. सुंगीने क्षणभर थांबून त्या पतंगाकडे उत्सुक नजरेने पाहिले. आपल्याला तर माहिती आहेच. एखादी नवीन गोष्ट दिसलीच, की त्यावर स्वार व्हायला सुंगी एका नांगीवर तयार असायची. बुंगी मात्र नेहमी नको नको म्हणत घाबरत का होईना तिच्या मागे जायची. 
तो पतंग एखाद्या पटांगणावर हळद पसरून ठेवल्यासारखा पिवळाधमक होता. आता या चमकदार पतंगापासून दूर राहील ती सुंगी कसली! सुंगीने ते साखरेचे दाणे बाजूला ठेऊन पतंगाकडे कूच केली. पळत येऊन गूळगुळीत पतंगावर मस्त घसरायची मजाच काही और होती. सुंगीचा खेळ पाहून बुंगीलाही धीर आला आणि तीही पतंगावर आली. आता दोघींचा पतंगाच्या गोलाकार बांबूच्या काडीवर चढून खाली उडी मारायचा खेळ सुरू झाला. खेळुन खेळून पाय दुखू लागले आणि बुंगीला आता घरी जायची आठवण झाली. गडबडीत ती पतंगावरून खाली उतरली, पण सुंगी काही निघायचं नाव घेईना. शेवटी बुंगीने मुंगाईला नाव सांगण्याचा विषय काढताच सुंगी खाली उतरू लागली. पण इतक्यात गोलू मांजा घेऊन तिथे अवतरलाही. त्याने पतंग उचलला आणि पतंगासोबत सुंगीही उचलली गेली. बुंगी तिला जोरजोरात हाक मारत इकडे तिकडे पळत होती. गोलू मांजा पतंगाला जोडत जोडत बाहेर पटांगणात येण्यासाठी निघाला. सुंगी दूरदूर जात होती आणि हळूहळू बुंगीही दिसेनाशी झाली आणि त्यासोबत तिचं घरही दुरावले. 

नेहमीप्रमाणे सुंगीला पुन्हा एकदा संकटात फसल्याची जाणीव झाली. तिला खाली उडी मारणे हा एक उपाय दिसत होता पण 'उडी मारल्यावर चुकून गोलूच्या पायाखाली आलो तर?' या विचाराने पतंगाच्या काडीलाच घट्ट पकडून बसली. पटांगणात जमलेल्या मित्रांच्या घोळक्यात गोलू मोठ्या दिमाखात पतंग घेऊन आला. सुंगीला काय करावे सुचत नव्हते. ती मनोमन इतकीच प्रार्थना करत होती की गोलूने पतंग पुन्हा किचनकट्ट्यावर न्यावा. पण ते घडणार नव्हतंच मुळी. तरी सुंगी शेवटचा प्रयत्न म्हणून गोलूच्या हातावर चढण्याचा प्रयत्न करू लागली, इतक्यात गोलूने पतंगाला झोक देऊन उडवायला सुरुवात केली. आता मात्र सुंगीला आपण खूप खूप मोठ्या संकटात सापडल्याची जाणीव झाली. 

आजपर्यंत सुंगी मस्ती करता करता खूप साऱ्या संकटातून बचावली होती. परंतू आताची परिस्थिती जमिनीबाहेरची होती. पतंग आता चांगलाच उंचावर गेला. वर वर जाताना तो जोरदार हेलकावे खायचा आणि सुंगीची त्यावरची पकड ढिली व्हायची. तिने पतंगाच्या धनुष्याकृती काडीला जिवाच्या आकांताने पकडून ठेवले. अचानक जोराचा वारा वाहू लागला. पतंग जिवाच्या आकांताने इतका फडफडू लागला की, सुंगीही त्यासोबत उलटीपालटी होई आणि पुन्हा वर येई. वाऱ्याचा आवाज तर प्रचंड मोठा होता. पतंग उलटा झाल्यावर तिने पाहिले की खाली भला मोठ्ठा 'गोलू' तर आता अगदी इवलासा दिसत होता. त्याचा तर तिला भयंकर राग येत होता. या इवल्याशा दिसणाऱ्या गोलूला तर आपण सहज नांगीत पकडू असाही एक भन्नाट विचार सुंगीच्या मनात डोकावून गेला आणि सुंगी हसू लागली.
 
पतंग अजून उंचावर आला आणि अचानक फडफडायचं थांबून तो हळूवार तरंगू लागला. थंडगार हवेमुळे सुंगीला गुदगुल्या होत होत्या. इतका वेळ भीतीने आजूबाजूला नीटसे न पाहू शकलेल्या सुंगीने आता धिटाईने डोळे उघडले. ती पतंगाच्या खालच्या बाजूला काडीच्या आधाराने बसली होती. पहिल्यांदा खाली पाहिलं आणि प्रचंड भीतीने हुडहुडी भरली. तरी तिने धाडस करून नीट पाहिले. तिला आता खालचे पूर्ण गाव अगदी इवलेसे दिसत होते. जणू काय तीच भली मोठ्ठी झाली होती. अगदी दूरवर वितळणाऱ्या गुळाच्या खड्यासारखा मावळता सूर्य दिसत होता. झाडांचे इवलेसे गुच्छ दिसत होते तर डोंगराची रांग एखाद्या कस्पटासारखी वाटत होती. उजव्या बाजूला नजर गेली आणि वेटोळेदार इवलीशी सोनेरी नदी पाहून सुंगीला पाटलीन बाईंच्या गळ्यातील सोनसाखळी आठवली. नेहमी अजस्त्र वाटणाऱ्या गायी म्हशी आता एखाद्या टपोऱ्या मुंगळ्यासारख्या भासत होत्या. या नयनरम्य नजाऱ्यात सुंगी जिवावरचे संकट विसरून काही क्षण का होईना आनंदित झाली. 

ती थोडीशी निवांत झालीच होती, अचानक पतंगाला एक हिसका बसला. सुंगीने आजूबाजूला पाहिले तर एक घार उडता उडता त्या मांजाला धडकली होती. घारीने आजपर्यंत त्या मांजात अडकून कितीतरी पक्षांना जीव गमावताना पाहिले होते. ते आठवून ती आणखीनच खवळली आणि पुढे येऊन पतंगालाच टोच्या मारू लागली. सुंगी त्या आघाताने आता चांगलीच डगमगू लागली. जर तिचा पतंगापासून संपर्क तुटलाच तर वाऱ्यासोबत भरकटत कुठे जाईल कळालंही नसतं. तिला इतकंच माहीत होतं, जिथे मुंगाई-मुंगोबा नसतील तिथे ती कधीच आनंदी राहू शकणार नव्हती. तिने रडकुंडीला येऊन डोळे मिटले. काही वेळ तिने तग धरला आणि जाणवले की घार आता चोच मारायची थांबली होती. तिने मन घट्ट करून डोळे उघडून पाहिले, घार अगदी जवळ येऊन सुंगीला काळजीने निरखत होती. घारीने चोचीवर सुंगीला घेतले आणि भर्रर्रर्रर्रकन वळाली. सुंगी आता संभ्रमात होती की नक्की घारीने तिला चोचीवर का घेतलं असावे. ती आता कुठल्या वेगळ्याच प्रदेशात घेऊन गेली तर कसे होणार, या काळजीने तिचे काळीज धडधडू लागले. एव्हाना बुंगीने घरी जाऊन मुंगाई मुंगोबाला झाला प्रकार सांगितलाही असेल. त्यांची सुंगी यावेळी कदाचित कधीही न परतू शकणाऱ्या संकटात सापडली होती. इकडे सुंगी घारीच्या चोचीवरून वर सरकत डोक्यावर येऊन बसली. मघापासून पतंगाच्या टणक काडीला घट्ट पकडून तिचे पाय ठणकत होते. घारीच्या मऊशार केसांची गादी आता सुखावह वाटत होती. 
घारीला सुंगीची मदत तर करायची होती पण दोघींना एकमेकींची भाषा कुठे येत होती. अचानक घारीला काहीतरी सुचले आणि मोठ्ठे गोलाकार वळण घेऊन ती पतंगाच्या मांज्याच्या उलट्या दिशेने झेपावली. जसजसे जवळ जाईल तसे, सुंगीला आता गोलू ठिपक्याच्या आकारापासून मोठा दिसु लागला. घारीची मांज्याच्या दिशेने परतण्याची शक्कल तर कामी आली पण सुंगीला नक्की कुठे सोडावे कळत नव्हते. मग सुंगी दौडतच तिच्या चोचीवर आली आणि नांगीने पाटलीनबाईंच्या किचनची खिडकी दाखवली. 
आता घारीनेही अलगदपणे त्या खिडकीजवळ उतरून चोच टेकवली. सुंगी उतरून पुढे पाहतेय तर बुंगी, मुंगाई आणि मुंगोबा डोळ्यात प्राण आणून खिडकीतच बसले होते. सुंगीला आपण घरी परतलोय यावर विश्वासच बसत नव्हता. तिचे डोळे पाणावले. मुंगोबाच्या कुशीत शिरण्याआधी घारताईच्या चोचीला गोंजारले. घारीला निघू वाटत नसले, तरी तिलाही आपल्या पिलांकडे परतायचे होते. तिने आपले अफाट पंख पसरले आणि उड्डाण केले. तिच्या पंखांची थंडगार हवा सुंगीच्या गालाला स्पर्शली. एक नवीन मैत्रीण मिळाल्याची खुषी तिच्या डोळ्यात सामावत नव्हती.
आता मुंगाई शिक्षा म्हणून आपल्याला कडकडून नांगीत पकडणार असं वाटलं होतं, म्हणून सुंगी मुंगोबाच्या बाजूबाजूने चालत होती. पण मुंगाईने जवळ येऊन तिला घट्ट मिठी मारली आणि चक्क हुंदके देऊन रडू लागली. शेवटी तीही एक अगतिक आईच होती ना.!सुंगीलाही अगदी भरून आलं. 
तिला आकाशातून पाहिलेल्या गमतीजमती कधी एकदा बुंगीला सांगतेय असे झाले होते.

४) भूतींगी  

काही दिवसांपासून मुंगीनगरात एका विचित्र रंगाच्या जादुई मुंगीने मुंगीनगरात दहशत माजवली होती. ती अचानक कुणालातरी दिसायची आणि हल्ला करून त्या मुंगीकडे असणारे सर्व अन्न लुटून नेत असे. नंतर तिच्यासोबत चार पाच भलेदांडगे मुंगळे दिसू लागले. ज्या मुंग्या त्यांचा प्रतिकार करत त्यांना जखमी केले जायचे. काहींनी तर आपला जीवही गमावला होता. काही दिवसातच तिची दहशत वारुळात वाढू लागली. ती प्रत्येकवेळी संपूर्ण वेगळ्या रंगाची दिसत असल्याने कुणाला तिचे खरे वर्णन माहीतच नव्हते. हळूहळू सर्वांच्या तोंडी तिचे नाव 'भूतींगी' असे पडले. 
राणी मुंगी म्हणून मुंगाईची आपल्या मुंगीनगराची काळजी वाढली होती. पण ती अगदी जिद्दीने लढणारी असल्याने, भूतींगीचा लवकरच बंदोबस्त केला जाईल ही आशा पूर्ण मुंगीनगराला वाटत होतीच. 
बऱ्याच दिवसांपासून एक सैनिकी मुंगी ठोंगीही कुठे दिसेनाशी झाली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ५ छोट्या मुंग्या गायब झाल्या होत्या. तसेही ठोंगी प्रत्येकाशी उर्मटच बोलायची, त्यामुळे बाकीच्यांना तिच्या जाण्याचे सोयरसुतक नव्हते. मुंगाईने सर्वाना आदेश दिला, की काहीही झाले तरी ठोंगी या कुटुंबातील सदस्य आहे, त्यामुळे बाकीच्या मुंग्यांसोबतच तिलाही शोधले जावेच.
तसे काही दिवस शांत जायचे आणि सर्वांमध्ये थोडी भीती कमी झाली की भूतींगी पुन्हा कुठल्यातरी नव्या बिळातून हजर व्हायची. कुणी म्हणायचे की ती वारुळाच्या सर्वात मागील कप्प्यात राहते. पण तो कप्पाच इतका भयावह किटकांनी भरलेला होता की तिकडे जायला कुणी मागायचे नाही. 
इकडे सुंगीसह सर्वच मुले भूतींगीबाबत मोठ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत. पण मुलांना तिचे कारनामे सांगितले तर ती भीतीने गांगरून जातील म्हणून त्यांना अगदी मोजकेच कळू दिले होते. 
काल सुंगी पतंगाच्या संकटातून घरी सुखरूप परतली आणि मुंगाई आणि मुंगोबाच्या मनातला आनंद आकाशाएवढा होता. तरी मुंगाई तिला शिक्षा करणार हे देखील सर्वाना माहीत होते. यावेळी मुंगाईने सुंगीला घराची पूर्ण साफसफाई करून ठेऊन, सर्वांनी आणलेल्या अन्नाचे वर्गीकरण करून ठेवायचे काम दिले. बुंगी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी कधी एकदा सुंगी कामातून मोकळी होतेय याची वाट पाहत होत्या. कारण एकच! आकाशातील गमतीजमती ऐकायच्या. एकदाची सुंगी कामातून मोकळी झाली. दमल्याने अँटेना अगदी मुरगळुन पडले होते. तेवढ्यात बुंगी तिथे अवतरली आणि सुंगीचा मूड पुन्हा ताजा तवाना होऊ लागला. सुंगीने खेळायला जाण्यासाठी म्हणून मुंगाईकडे गरीब चेहरा करून पाहिले. मुंगाईलादेखील तिच्याकडे पाहून हसूच फुटले. नेहमी काहीतरी पराक्रम करून येणाऱ्या पोरीने गरीब चेहरा केल्यावर मजा आणि प्रेम दोन्ही वाटायचे. मुंगाईने हसतच तिला परवानगी दिली.
आता सगळ्या मैत्रिणींच्या घोळक्यात सुंगी एकटी उभी होती. त्यांची छोट्या मुंग्यांची गॅंग आपली कामे संपली की जमून वेगवेगळे खेळ खेळायची. कधी कधी अँटेना एकमेकांत अडकवून खेचण्याचा खेळ, तर कधी डोळे बांधून नुसत्या वासावर पदार्थ ओळखण्याची किमया! आणि सुंगी प्रत्येकवेळी काहीतरी नवीन खेळ शोधून काढायची. आणि आता सुंगी दोन-तीन वेळा नवीन खेळापायी तिचा जीव धोक्यात आलेले सर्वांना माहीत होतेच. त्यामुळे सर्व मुंग्यांच्या आई बापानी आपल्या पोरांना निक्षून सांगितले होते, की सुंगी सोबत उगीच धाडशी खेळ खेळायचे नाहीत. पण चला आपण धाडस करू शकत नसलो तरी त्यातल्या गमतीजमती ऐकू शकतो ना! 

सर्वांनी प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर सुंगीने आकाशातील मज्जा सांगायला सुरुवात केली. वरवर जाताना कसे थंडगार वारे लागत होते. खाली दिसणारे सर्व कसे अगदी इवलूसे दिसत होते. आणि विशेषतः पाटलीनबाईंचा गोलू तर साखरेच्या दाण्याइतका लहान दिसत होता. बुंगीने त्या गोलूला साखरेच्या दाण्यासारखे उचलून न्यायला कशी मजा येईल ही कल्पना केल्याबरोबर सगळे अगदी अँटेना हलेपर्यंत खोंखों हसत सुटले. त्यानंतर सुंगीला आलेले अनुभव सर्वजण तन्मयतेने ऐकत होते. सुंगीने जेव्हा तिला खूप आकांताने रडू वाटले होते, तो क्षण ऐकताना मघापासून मजा करणाऱ्या जीवांनाही भरून आले. बाहेरचे जग जितके मजेदार असते तितकेच भयानकदेखील ठरू शकते हे उमजत होते. खरे तर तिकडून परतल्यापासून सुंगीला जाणवले होते की काहीतरी वेगळा कायम लक्षात राहण्यासारखा आनंद घ्यायचा असेल तर धाडस ठेवायलाच हवे. सुंगीने जेव्हा घारताईचे नाव काढले तेव्हा पुन्हा सगळ्या आनंदाने उड्या मारायला लागल्या. कारण घारताई अधूनमधून त्या खिडकीत यायची आणि सुंगीसाठी काहीतरी खायला ठेऊन जायची. सुंगीसोबत कित्येकदा ही दोस्त मंडळी घारीला पहायला गेली होती. आणि ती सर्वांचीच खास दोस्त झाली होती. 
सुंगीच्या पतंगरावरील मज्जा सांगून झाल्या. सर्वजण उठून आपल्या खोलीत पळणारच इतक्यात बुंगीला खेळाची कल्पना सुचली. 
गोलू जर आपल्याएवढा झाला तर आपण त्याला खांद्यावरून पळवत नेत, आपल्या बिळाच्या शेवटी नेऊन टाकायचा. असे म्हणत त्यांनी सर्वात जाड असलेल्या चिंगीला उचलून घेतले. आणि गोलू गोलू करत पळायला लागल्या. चिंगीलाही मजा वाटून खुदूखुदू हसू लागली. सुंगी त्या सर्वांच्या पुढे होती. रात्र झाल्याने मुंगाई झोपायला आता बोलवत येईल हे तिला वाटतच असल्याने सर्वाना पटापट पळायला ती सांगत होती.
तसे त्यांचे बिळ किचनकट्ट्याच्या खाली एका फरशीच्या खाली पसरले होते. कित्येक पिढ्यांनी सततचे कष्ट घेऊन कित्येक खोल्या, अन्न साठवण्याचे गोदाम, लांबलचक हॉल काढला होता. आता ह्या मैत्रिणी खेळत खेळत मधल्या नळीतून दोन तीन वळणे घेऊन आत आल्या. आता एकदम अंधार होता. सुंगीला आपण खूपच आत आल्याचे जाणवले. तिने पटकन सर्वांना शांत केले आणि परत चलण्यास बजावले. सध्या सुंगीचा मैत्रिणीत इतका दबदबा होता की त्या सगळ्याजणी तिचं ऐकायच्या. मस्ती करायचा अजून मूड असला तरी त्या मागे फिरू लागल्या. 
परतताना सगळ्या मुंग्या कलकलाट करत निघाल्या होत्या. परंतु का कुणासठाऊक सुंगीला तो भागच थोडा विचित्र असा वाटत होता. आपल्या आसपास कुणीतरी आहे, असे राहूनराहून वाटत होते. तिने भिंतीकडे पाहिले तर विविध रंगात भीतीदायक चिन्हे काढली होती. खाली काहीबाही खाऊन टाकलेली घाण होती. सुंगीचे मन अस्वस्थ होऊ लागले. बाकीच्यांना तिच्या भावना सांगितल्या तर सगळे उगाच घाबरतील म्हणून तरी ती धिटाईने चालली होती.
इतक्यात बाजूला एक तिरके बीळ गेलेले दिसले. त्या बिळाच्या दाराशीच लालसर पावले उमटली होती. सुंगीलातर इतक्या आतील भागात कुणी राहतेय याची मुंगाई किंवा अजून कुणी बोललेले आठवत नव्हते. पण सगळे मोठे लोक, मुलांना इकडे जाण्यास मनाई करत हे नक्की. म्हणजे इथे काहीतरी असणार हे नक्की.
थोडे थांबून सुंगीने त्या बिळाशी अँटेनाने जरा कानोसा घेतला. नक्की कोण असावे इथे? तिला वाटले इथे कुणीतरी खाणे आणून लपवत असावे. आपल्यातलेच कुणी असावे. तिच्या मैत्रिणी गप्पाटप्पा करत पुढे निघून गेल्या होत्या. सुंगीला ते जाणवले आणि ती तिथून निघणारच इतक्यात आत काहीतरी हालचाल होताना जाणवली. ती कानोसा घेत होती. आणि त्या हालचाली आणि सोबत किंचाळणे तीव्र जाणवू लागले. ती निघणारच इतक्यात तिला एक अत्यंत अक्राळविक्राळ मुंगी तिच्याकडे धावतच येताना दिसली. तिचे अंग सोनेरी रंगाचे आणि डोळे लालसर होते. अँटेनाही अगदी चमकत होता. तिच्यामागून ३-४ धडधाकट मुंगळेही होते. त्यांना पळत येताना पाहून सुंगीच्या तोंडचे पाणीच पळाले. 'मीच का नेहमी संकटात सापडते?' सुंगी मनाशी विचार करत होती. खरे तर तिने आतापर्यंत जिवाच्या आकांताने पळायला हवे होते. पण ती जागीच स्तब्ध झाली होती. त्या राक्षसी मुंग्या तिच्यावर झडप घालण्याइतक्या जवळ येणारच इतक्यात ती भानावर आली. आणि मनात आले की आपल्या घारताई सारखे उडता आले असते तर किती बरे झाले असते. पण ते तर शक्य नव्हते. तिने आता पायातले पूर्ण बळ वापरून पळायला सुरुवात केली. मागून ते दौडतच तिचा घास घ्यायला येत होते. सुंगी आता थांबणार नव्हती. तिच्या मैत्रिणींना ती ओरडून पळा पळा म्हणत होती. बुंगीचे मागे लक्ष गेले आणि तिला सुंगीची हाक ऐकू आली आणि सर्वाना घेऊन ती देखील पळू लागली. दुसरे वळण पार केले. आता फक्त एकच वळण घेतले की त्यांचे घर दिसणार होते. प्रकाश दिसणार होता. मुंगाईच्या कुशीत जाऊ शकणार होती. पण तोपर्यंत जर या राक्षसी मुंग्यांच्या हाती सापडलो तर? ती कल्पना देखील करू शकत नव्हती. तिच्या मैत्रिणी तिसऱ्या वळणापार गेल्या होत्या. बुंगी तिथेच थांबून सुंगीला प्रोत्साहन देत होती. पण आता सुंगी आणि त्या मुंग्यांमधील अंतर कमी होत होते. सुंगीला फ्रिजमध्ये जीव वाचवण्यासाठी घेतलेली धाव आणि दुधाच्या सायीवरून घेतलेली उडी आठवली. मनात आले तर ती कोणत्याही संकटातुन वाचू शकते हे पुन्हा जाणवले. तिने वेग वाढवला आणि जसे ते तिसरे वळण आले तसे तिने जोरदार उडी घेतली. बुंगीने आणि तिने त्याच वेगात घराकडे मोर्चा वळवला. तिने मागे पाहिले तर त्या राक्षसी मुंग्या त्यांच्याकडे चवताळून पाहत तिसऱ्या वळणापाशी उभ्या होत्या. तिथून त्या पुढे येत नसल्या तरी ती दहशत साफ जाणवत होती.
सुंगी आणि बुंगी आपापल्या घराशेजारी आल्या. बाकीच्या मैत्रिणींना मागे नक्की काय होते हे माहीत नव्हते. त्या आपापल्या घरी निघून गेल्या. परंतु सुंगी-बुंगीला ते नवीन रहस्य घाबरवून सोडत होते. उद्या त्यावर चर्चा करेपर्यंत कुणाशी याबद्दल बोलायला नको हे दोघीनी ठरवले आणि घरात आल्या. सुंगी मुंगोबाच्या कुशीत शिरली. तिला आता कुठलीच जागा यापेक्षा सुरक्षित वाटत नव्हती.

प्रकरण ५)
सुंगी घरी आली तेव्हा अत्यंत भेदरलेली होती. मुंगोबाच्या कुशीत शिरली त्यावेळीच त्यांना जाणवले की सुंगी काहीतरी जीवावर बेतणारा पराक्रम करून आली असणार. परंतु तिचे नेहमीचे घाबरणे आणि आजची थरथर खूप वेगळी भासत होती. त्याबद्दल आता सकाळी विचारू हा विचार करून सुंगीला कुशीत घेऊन स्वतःही झोपी गेले. 
सकाळी मुंगाईने सुंगीला बाजारात जायला सांगितले. साखरेचे दाणे आणि इतर खायचे सामान आणायचे होते. एरव्ही बाजारात जायचे म्हटले की सुंगी टणाटणा उड्या मारत पळायची. पण सुंगी आज बाहेर पडायलाच नानू करत होती. मुंगोबाने मुंगाईला काही न बोलण्याबद्दल खुणावले. आणि सुंगीला म्हणाले,
"सुंगे.. बाळा उठ बरं.. चल मी पण येतो. आपण दोघे बाजारात धमाल करू. अगं तिकडे म्हणे कुणीतरी फुलातला मधही आणलाय. तुला पाहिजे तेवढा देणार. हं? "
त्यांच्या या भुयारी शहरात बाजारदेखील भरायचा. वस्तू विकत घेताना, समोरची मुंगी आपल्याकडील एखादी वस्तू विकणाऱ्याला देत.
मुंगोबाने मधाचे नाव काढताच सुंगी सोबत यायला तयार झाली. सुंगीला त्या राक्षसी मुंगीविषयी मुंगोबाला विचारायचे तर होतेच. तशीही आता चांगली संधी मिळाल्याने सुंगी निघाली. बाहेर पडल्यावर तिने मुंगोबाला हळूहळू कालची राक्षसी मुंगीची घटना कथन केली. मुंगोबाच्या चेहऱ्यावर अत्यंत काळजी आणि सुटकेचा निःश्वास असे दोन्ही भाव आले. त्यांनी सुंगीच्या डोक्यावरून हात फिरवला. बोलण्यात एकदम काळजी आली.
"सुंगे.. आता तुला हे सांगायलाच हवे. ती भूतींगी आहे. तिने खूप मुंग्यांना लुटले आहे, अपहरण करून कुठेतरी"









1 comment: