.post img {

Automatic Size

Thursday, 22 August 2019

मारवा (कथा)

दहा बाय बारा फुटांची ती बेडरूम एका अस्वस्थतेने भरून गेली होती. बाहेर लख्ख सूर्यप्रकाश असला, तरी इथे मात्र काळवंडून आलं होतं. कोपऱ्यातल्या कॉटवर एका सत्तरीतल्या पुरुषाचा देह निश्चल असा पहुडलेला. जीवनाच्या अंतिम क्षणी मात्र त्याच्या चेहऱ्यावर गहन विचारात असल्यासारखा निर्विकार भाव उरला होता. ऑक्सिजन मास्कमधून जड झालेला श्वास ठळकपणे जाणवत होता. बाजूच्या स्क्रीनवर हृदयाच्या ठोक्यांचा आलेख अजून तरी तोडक्या मोडक्या लयीत चाललेला. त्यातूनच त्या देहाला काय तो जिवंतपणाचा पुरावा द्यावा लागत होता. 

त्याची पत्नी कॉटला टेकून बसलेली. तिच्या अवस्थेचा थांग कुणी लावावा! एखादी भयानक गोष्ट घडणार याची बऱ्याचवेळा आपणास कल्पना असते, त्यास तोंड द्यायला तयारही असतो परंतू खरेच ती गोष्ट घडल्यावर सगळे काही अचानक घडल्याप्रमाणे आपण गांगरून जातो. अशाच काहीशी दोलायमान मनोवस्थेतून जाणाऱ्या त्या स्त्रीची नजर नवऱ्याच्या चेहऱ्यावरून किंचितही ढळत नव्हती. 

तिने मनात कितीही सकारात्मक समज करून घेतले असले, तरी डोळ्यांना अटळ क्षण उमजलेच आणि अश्रू अनिर्बंध वाहू लागले. अश्रुंतून आठवणी अलगद बाहेर पडू लागल्या. थोडा थोडका नाही तर तब्बल ४० वर्षांचा एकत्र प्रवास! नववधू म्हणून मिरवण्यापासून ते वार्धक्यातली ही वेळ, अगदी सगळंच्या सगळं डोळ्यांसमोर आत्ता घडल्यासारखं ताजं होतं. यावेळेला मात्र त्या क्षणांना दुःखाची किनार होती. 

अचानक तिची नजर समाधिस्थ अशा तानपुऱ्याकडे गेली. त्यालाही या बेसूर वेळेतला ताण जाणवला असेल का? तिचे मन अगदी ढवळून निघाले आणि काहीतरी महत्वाची गोष्ट आठवल्याचे भाव चेहऱ्यावर आले. उठून अचानक ती तानपुऱ्याकडे जाऊ लागली. कदाचित तहान लागली असावी असे वाटून शेजारच्या बाईंनी पाण्याचा ग्लास पुढे केला. पण तो नाकारून ती तानपुऱ्याजवळ आली. तानपुऱ्याच्या तारांवर हळुवार हात फिरवताना मनात सुरांच्या लाटा तिला बोलावणं धाडत होत्या. तिने मनात काहीतरी निर्धार केला आणि तानपुरा उचलून समोर ठेवला. एक पाय मुडपून तानपुरा कानाला लावून गायनाचा पवित्रा घेतला. 

तिच्यातला हा अचानक झालेला बदल पाहून, तेथील उपस्थित अचंबित झाले. दुःखाने हिला मानसिक धक्का तर नाही बसला? हीच काळजी सर्वांच्या चेहऱ्यावर उमटू लागली. एव्हाना त्या स्त्रीने सुरांचा अंदाज घेण्यासाठी डोळे मिटले होते. तानपुऱ्याची तार छेडत अलगद 'सा' लावला आणि जितक्या उत्कटतेने अश्रू येत होते, तितक्याच तन्मयतेने गळ्यातून आता पुढचे सूर मंद गतीने उमटू लागले. सुरांची मैफिल आलापामार्फत हळुवार पावलांनी त्या खोलीत प्रवेशत होती.

◆◆◆ ● ◆◆◆

“अय्या.. कसली भारी आहे हो ही जागा! कशी शोधून काढलीत ती?"

"शोधलं बाई पन्नास जणांना विचारून."

"मानलं पाहिजे बाबा माझ्या नवऱ्याला! मी काहीतरी वेडसर कल्पना मांडावी. अन काही दिवसात ती पूर्ण देखील व्हावी!“

चारुलता आणि जयंतच्या लग्नाचा आज वाढदिवस. चुटकीसरशी दहा वर्षे कुठे गुडूप झाली कळतही नव्हते. यावर्षी लग्नाचा वाढदिवस वृद्ध लोकांसमवेत साजरा करायचा हा चारूचा आग्रह होता. आपल्या जोडीदारासोबत आयुष्याची तीस-चाळीस तर कुणी पन्नास वर्षे व्यतीत केल्याचा प्रवास कसा असेल, त्यांचं नातं कसं असेल ही भावनाच तिला सतत ओढून घ्यायची. बायकोच्या डोक्यातल्या या अशा वेड्या कल्पना जयंतला खूप हव्याहव्याशा वाटत. खूपसे प्रयत्न करून, तिच्या कल्पनेप्रमाणे वाढदिवस करण्याजोगे एक ठिकाण त्याला शोधून सापडलेच.

पुण्यापासून जवळपास पन्नासएक किलोमीटरवर डोंगरालगतच्या गावात, आठ दहा एकर जागेत वसलेले 'हिरवळ'' नावाचे एक छोटेसे वृद्धाश्रम. प्रवेशद्वारावर रेखाटलेले टॉम आणि जेरीचे हसरे चेहरे पाहिल्यावर, 'आपण एखाद्या नर्सरी स्कुलमध्ये तर जात नाही ना?' हा प्रश्न पडावा. आत प्रवेश केल्यावर आपले बोट धरून आत नेण्यास मध्यम उंचीची फुललेली चाफ्याची झाडे तयारच होती. आत जाता जाताच वड, पिंपळ आणि अजून अनोळखी अशी ४-५ मोठाली झाडे प्रेमाने आपली सावली पसरून उभे होते. त्या ओथंबून आलेल्या हिरवाईने चारुला आपल्या आजोळची आठवण झाली. पुढे गेल्यावर दोन मजली डौलदार कौलारु वास्तू ध्यानस्थ बसल्यासारखी वाटली. डाव्या बाजूस एका जमिनीच्या तुकड्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांचे वाफे होते. एक वृद्ध जोडपं वाफ्यातल्या वांग्याची तोडणी करून पाटीत ठेवत होते. वृद्धाश्रमाच्या अंगणात एक इवलेसे रेखीव तुळशी वृंदावन डेरेदार पिंपळाच्या पायाला मिठी मारून बसले होते. 

हे सर्व अनुभवत दोघांची पावले तिथे लहान मुलाच्या उत्सुक चालीने रेंगाळत राहिली. इतक्यात त्यांना छोटुशा केबिन मध्ये ग्रे टी-शर्ट घातलेला एक मुलगा काहीतरी लिहित असलेला दिसला. त्याच्याजवळ त्यांनी वृद्धाश्रमाविषयी आत्मीयतेने विचारपूस करण्यास सुरुवात केली. तो अगदी उत्साहात सांगू लागला, "नमस्कार.. मी सुधीर.. या “हिरवळ” चा संचालक. हे वृद्धाश्रम माझ्या आजोबांनी ३० वर्षांपूर्वी चालू केले. आजी आजोबांनी त्यांचा संसार याच घरात उभा केला पण नंतर बदली झाल्याने काही काळ ते पुण्यातच स्थायिक झाले. हार्ट ऍटॅकमुळे आजी अचानक हे जग सोडून गेली आणि आजोबांचे जगच एकटे पडले. एकटेपणात जगण्यापेक्षा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन, आजीच्या आठवणींसोबत जगण्यासाठी आजोबा इकडे शिफ्ट झाले. आधी त्यांनी ही वनराई फुलवण्यात मन रमवले. त्यानंतर वृद्धाश्रमाच्या बहाण्याने इथे नवीन सवंगडीच गोळा केले. आजोबांना देवाज्ञा होऊन आता वीसेक वर्षे लोटली. त्यांनी सुरू केलेली हिरवळ आम्ही तशीच जपण्याचा प्रयत्न करतोय इतकेच."

चारूलतासमोर सगळे चित्र उभे राहिले, "ओहह.. आपल्या दुःखातून इतरांसाठी नंदनवन तयार केले त्यांनी.. " चारुलता.

इकडे तिकडे पाहत जयंतने विचारले.

"इथे काही पैंटिंग्ज आणि मूर्ती दिसल्या. कलेक्शन सुंदर आहे हो तुमचं."

 "अच्छा. ते होय? आमच्या मेम्बर्स नी बनवल्या आहेत. कसं असतं ना. प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या मनात, संसाराच्या ओढातानीत दबून गेलेले काही छंद असतात. आम्ही फक्त त्यांना ते जोपासण्यासाठी उद्युक्त करतो."

एवढ्या संवादात सुधीरशी त्यांची चांगलीच गट्टी जमली. इथे आल्यापासूनच दोघांच्याही डोळ्यात समाधान तरळत होते. इतकी वर्षे घराची जी व्याख्या त्यांच्या स्वप्नात रेंगाळत होती, ते घर अगदी जस्सेच्या तसे समोर होते. चारुलताला वाटले, की भरावी बॅग आणि यावे इकडेच रहायला. नंतर स्वतःच्याच विचारावर हसू आले कारण या “वृद्धा”श्रमात राहायला अजून कमीत कमी २५-३० वर्षे तरी वाट पहावी लागली असती. तोपर्यंत हे इथे असेल की नसेल हेही कुणाला ठाऊक?

दुपारी पिंपळाच्या सावलीत मस्तपैकी पंगत बसली. जेवणापेक्षा त्या सवंगड्यांच्या गप्पा आणि हास्यमैफिलच जास्त होती. वाऱ्याच्या लयीत डुलत, सळसळ आवाज करत पिंपळही त्या पंगतीतल्या हास्यात सामील झाला. एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्या, दिलखुलास चेष्टामस्करी आणि अगदी के एल सेहगलपासून ते रफी, किशोर यांच्यापर्यंत संगीताचे विषय त्यांच्या बोलण्यात होते. त्या वातावरणात काहीतरी वेगळीच जादू होती. एरव्ही संकोचून मोजकेच हसणाऱ्या जयंतला आज खदाखदा हसताना पाहून चारूलता भलतीच सुखावली. जेवणानंतर तिथल्या स्त्रियांनी चारुला ठसकेबाज नऊवारी नेसवून, कुणी आपली बोरमाळ, कुणी लक्ष्मीहार तर कुणी आपली नथ घालायला लावून छान नटवले. जणू काही सर्वजणी स्वतःचे तारुण्य पुन्हा तिच्यात पाहत होत्या. ती बाहेर येताच मात्र जयंतीच्या हृदयाचा ठोका चुकला. आणि त्याची नजर काही त्या मुखवरून हटत नव्हती. लग्नाचा यंदाचा वाढदिवस इतका भन्नाट साजरा होईल हे दोघांना स्वप्नातही वाटले नव्हते. शेवटी दिवस संपताना आता तेथून पाऊल निघणार नव्हते. पण अवनी शाळेतून घरी येइपर्यंत पोहचायला हवे होते. येताना मला केक घेऊन या अतिवर आपल्या आई वडिलांना फिरायला होण्याची मुभा लेकीने दिली होती. तिथून निघायच्या आधी जयंत म्हणाला,

 "चारू, म्हातारपण दुसरं बालपण असतं हे यांच्यावरून खरं वाटतं बघ."

"हो ना. ऐका ना. माझ्या मनात अजून एक कल्पना आहे."

"हाहाहा.  तुझं मन शांत बसतं का कधी? काही ना काही नवीन चालूच असतं."

"बरं नाही सांगत. जा..."

"अगं गंमत केली. सांग सांग. तुझ्या कल्पनांना सत्यात आणण्यातच तर आयुष्य इतकं धमाल चाललंय."

"बरं.. ठिकेय सांगते. पण यावर तुम्ही खूप हसाल."

"सांग तरी.... किती वेळ लावतेस."

दोघेही चालत चालत बगिचामध्ये आले होते. हिरव्यागार गवतामध्ये छोटी छोटी रानफुलं उमलली होती. त्या रानफुलांसारखे ते दोघे तिथल्या बाकावर दोघे हातात हात घेऊन शांत बसले. जयंतच्या खूप आग्रहानंतर तिने आपली कल्पना मांडली. त्याला क्षणभर विश्वासच बसला नाही की हिची अशीही काही इच्छा असेल. त्याच्या मनातलीच भावना तिने व्यक्त केली होती.

                        ◆◆◆ ● ◆◆◆

झाकोळल्या खोलीत तानपुरा कंप पावत होता आणि बंदिश आकार घेत आता स्वर लयकारी मध्ये पोहोचले. तिथे असलेल्या सर्वांनी आजपर्यंत कित्येक मैफिलींचा आनंद घेतला होता. पण अशा नाजूक परिस्थितीत भावनेने ओथंबलेली कलाकृती कधी अनुभवली नव्हती. प्रसंग दुःखाचा आहे हे माहीत असूनही, ते सूरही दुर्लक्ष करता येणारे नव्हते. न राहवून सावंतांनी कॉटच्या शेजारी असलेला तबला घेतला आणि त्या गायनाला विलंबित तालात बांधण्याचा प्रयत्न करू लागले. 

                              ◆◆◆ ● ◆◆◆

पंचवीस वर्षांनंतरही हिरवळचा आत्मा आजिबात बदलला नव्हता. आजही इथे कलेला अनन्यसाधारण महत्व होते. मैत्री आणि हास्य हा इथला गाभा होता. जवळपास १५ पुरुष आणि १० स्त्रिया वृद्धत्व साजरे करत रहात होते. पिंपळाच्या आडून उगवणारा सूर्य पहात रम्य सकाळ व्हायची आणि शेकोटीकडेला होणाऱ्या गप्पाटप्पानी झोपायला मध्यरात्र व्हायची. 

इथले बरेचसे मेंबर्स काही ना काही कला जोपासत होते आणि ज्यांच्याकडे काही कला नाही ते रसिकाची भूमिका उत्तम पार पाडायचे. शशांक सावंत उत्तम तबला वाजवायचे. काटेकर काका सुंदर मूर्ती घडवायचे. हिरवळ मधल्या गणेशोत्सवामध्ये त्यांच्याच हातची गणेशमूर्ती असायची. खेडवळ अशा हौसामावशींना तर अन्नपूर्णा प्रसन्न होती. अस्सल गावरान तसेच हॉटेलमधले कित्येक नवनवीन पदार्थ त्यांच्या हातांना जमायचे. त्यांच्या हाताखाली दोन बायका देऊन, हिरवळचे स्वयंपाकघर त्यांच्या अखतारीत दिले होते. प्रत्येकाच्या पथ्यानुसार जेवण असले तरी त्यात एक मायेची गोडी असायची. ऐंशी वर्षांच्या लालचंदभाईंचे फॅशन स्टेटमेंटच वेगळे होते. नेहमी जीन्स टीशर्ट आणि स्टायलिश चष्म्यामध्ये दिसणारे लालचंदभाई झोपताना तरी साधे कपडे घालतात की नाही हा प्रश्न पडायचा. मरतेवेळी त्यांच्या पत्नीनेच त्यांना तरुणपणाचाच लालचंद शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याची सूचना केली होती. हृदयात तिच्या जाण्याची धग, तिच्याच सुचनेचे पालन करून विझवण्याचा प्रयत्न करत होते इतकेच. यशोदा मोडक पैंटिंग्ज करायच्या. त्यांच्या चित्रांत हिरवळमधील प्रत्येक झाडाचे पोर्ट्रेट करून झाले होते. हिरवळमधील भिंतीही त्यांच्या रंगांनी सजल्या होत्या. कित्येक कला महाविद्यालयाचे विद्यार्थी इथे भेट देऊन कलेविषयी एक वेगळाच दृष्टिकोन घेऊन जायचे. कारण जीवनाच्या सुर्यास्तात असणारे आकाश अगदी अचंबित करणारे रंग विखुरत होते. सर्वांच्या स्वभावातही व्यावहारीकतेपेक्षा भावनेचा धागा विणलेला असायचा. 

हल्ली सुधीररावांची तब्येत बरी नसल्याने ते पुण्यात थोरल्या मुलाकडे राहायचे आणि धाकटा मुलगा अमेय हिरवळची सगळी व्यवस्था उत्साहाने पहायचा. तो तर लहानपणापासूनच इथल्या सगळ्या म्हाताऱ्यांचा लाडका होता. औषधे आणि व्यायाम याबाबत तो इतका कडक असे की सगळेजण त्याला हिटलर म्हणत. तो ही हसत उत्तर द्यायचा, "तुम्हा म्हाताऱ्यांपेक्षा लहान मुलं परवडली हो. ती तरी एखाद्याचं व्यवस्थित ऐकतात." 

तेवढ्यात कुणीतरी आजी म्हणायची, "याचं लग्न करून दयायला हवं म्हणजे हा जरा शांत होईल आणि आपल्या मागे औषधं घेऊन फिरण्यापेक्षा तिच्या मागे मागे फिरेल." आणि तो ही मग थोडासा लाजराबुजरा व्हायचा. 

इथे आल्यापासून तर जयंतराव आणि चारूलता यांच्या आयुष्याने कातच टाकलेली. इतक्या वर्षांच्या दगदगीच्या आयुष्यात एकांताचे मोजकेच क्षण हाती आले होते. कित्येक शब्दांचे ढग दाटूनही न बरसताच आल्या वाटे परतायचे, पण आता त्या ढगांना नात्यातली शीतलता लाभून शब्द सरींसारखे कोसळत होते. दोघे तासंतास बोलत बसायचे, त्या नवीन मित्र मैत्रिणींमध्ये रमायचे.

"अहो. बघा ना दिवस कसे धावत पळत निघून जातात. आपल्याला 'हिरवळ' मध्ये राहायला येऊनच वर्षही झाले. बघता बघता माझा नवराही आता साठीत गेला." 

"आपणही पंचावन्न ओलांडले बाईसाहेब. चेहऱ्यावर वय दिसत नाही, ही गोष्ट वेगळी म्हणा. (काहीतरी आठवून) बरं ऐक सुहास आणि महेश पोहचतीलच आता. मी रियाजाच्या खोलीकडे जातो."

वयोमानामुळे जयंतरावांना आता मैफिलीमध्ये सादरीकरण करणे शक्य होत नव्हते. परंतू गायनाची तालीम घेण्यास पुण्याहून दोन विद्यार्थी यायचे. मैफिल नसल्याने त्यांच्या हाती आपली ओंजळ पूर्ण रीती करत होते. मागील पाच-सहा महिने हंसध्वनी रागाची तालीम सुरू होती. आज हंसध्वनी शिकवण्याचा शेवटचा दिवस होता. पुढच्या आठवड्यापासून जयंतरावांचा आवडता, मारवा राग सुरू होणार. आजची तालीम संपली आणि जयंतरावांना काहीतरी महत्वाचे सांगायचे राहून गेले असे वाटले.

"बाळांनो, संगीत तुम्हाला एकवेळ पोट भरायलाही आधार देईल पण अधिक उत्पन्न काढण्यासाठी बैलाला जुंपल्यासारखे सुरांना जुंपू नका. दिवसभराचा व्यवहार सुरू होण्याआधी, पहाटेच्या रियाजात संगीताशी आपलेपणाने संवाद साधा. प्रामाणिकपणे संवाद साधता साधता सुरांप्रती मनाला, वेड्या प्रेमाने शिवापुढे बैठक मारलेल्या नंदीची निष्ठा मिळू द्या. त्यापुढे संगीत आणि समाधीचे अनोखे मिलन तुम्हाला अनुभवायला मिळेल. हे अनुभवायची घाईही नको आणि ज्यावेळी जाणवेल तेव्हा वेळही दवडू नका. चला.. भेटू पुढच्या आठवड्यात."

**************

आज सुर्यास्तानंतर जयंतरावांनी मारवा रागाचा रियाज संपवला आणि बाहेर आले. चारूलता कुठे दिसतेय याचा कानोसा घेऊ लागले, तोच पिंपळामागून मारव्यातली तीच बंदिश कुणीतरी गुणगुणत असल्याचे ऐकू आले. बऱ्यापैकी सुरात होती आणि गायनही मनापासून होते. कोण गातेय हे पाहण्यासाठी पायऱ्या उतरून पिंपळाजवळ आले, तर चारू तुळशीजवळ निरंजन लावत होती.

"चारू.. तू गुणगुणत होतीस आत्ता?"

"नाही.. ही तुळस गुणगुणत असेल. तुम्ही पण काहीही प्रश्न विचारता."

"अगं किती सुरेख गात होतीस. पुढचं गाऊन दाखव बरं."

"अहो.. मला तेवढंच येतं. तेवढीच ओळ आणि त्यानंतरची तुम्ही घेता ती तान खूप आवडते. पण पुढचं आजिबात नाही येणार."

"चारू तू गाणं का शिकत नाहीस? इतकी वर्षे मला हे का जाणवले नाही कुणासठाऊक."

"गाणं? नाही बाबा. माझ्या आवाक्यातलं नाही ते. तुमचं गायन ऐकणं स्वप्नमय आहे, पण गायचं ठरवलं की सुरेल स्वप्नातून मी माझ्या बेसूर जगात परतते. मघाशी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सूर आणि समाधी याविषयी सांगत होता. ते खरंच तसं कुणी अनुभवू शकेल?  तुमच्या नुसत्या बोलण्यातून ती अनुभूती घ्यावी असे वाटून गेले. पण शिकायचे म्हटले की तो शिवधनुष्य वाटतो हो."

"चारू मी सांगितलेली ओळ न ओळ अनुभूतीची होती. जीव लावून शिकले तर कुणीही तिथंपर्यंत पोहोचू शकते. आज तू गुणगुणलेल्या ओळी नकळत का होईना सुरात होत्या."

"शिकवाल मला? मी माझा पूर्ण प्रयत्न करेन आत्मसात करण्याचा."

" का नाही? चारू इतकी वर्षे गाणं तू इतकं आपलंसं करून ऐकलंयस की ते आत रुजलंय. आता फक्त त्याला एक वळण दिले की छान फुलेल बघ. आता आपण तुझं गायन सुरू करतोय."

चारूलताचा फुललेला चेहरा निरंजनाच्या मंद उजेडाने टिपला. आजपर्यंत आवाक्याबाहेर समजलेली आवडीची गोष्ट आता आपण शिकणार ही उत्सुकता शिगेला पोहचली.

"पण माझ्याकडे शिकण्याचे नियम अगदी कडक असतील एवढं लक्षात घे."

"(थोडीशी हसत) आता गुरू बनवलेच आहे तर सगळं सहन तर करावे लागेल."

"बघ... पहाटे ५ ला तानपुरा तयार रहायला हवा. तुझं स्वरज्ञान करून घ्यायला हवं. एक एक सूर आणि राग पूर्ण तयार झाल्याशिवाय सुटका नाही."

"हो.. हो.. गुरुमहाशय.... घाबरवता की काय आता...?"

"घाबरवत नाही गं... संगीत शिकायला तेवढं झोकून देशीलच ही खात्री आहे. मुळात वयाच्या या वळणावर तुला पुन्हा शिकावं वाटतंय हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर माझी नेहमीच एक सुप्त ईच्छा होती, की बायकोच्या आवाजात एखादी पूर्ण बंदिश ऐकावी. "

"अय्या खरंच? मग इतकी वर्षे बोलला नाहीत कसे?"

"बोलावं वाटायचं, पण असंही वाटायचं की ते उगीच तुझ्यावर लादल्यासारखी होईल."

"हो.. म्हणजे बायकोशी पण मन मोकळं करावं वाटलं नाही. काय हो तुम्ही. म्हणे लादल्या सारखं वाटेल.. असं काहीही विचार करता नेहमी तुम्ही.. नुसतं दुसऱ्याच्या मनाचा विचार करण्यात आयुष्य गेले.. अजूनही तसेच..."

"सॉरी..... पण आता ती संधी नाही दवडू देणार... उद्या गाण्याला सुरुवात करायची आहे. शिष्यत्व पत्करतेयस म्हणून किमान मला त्या नादाने तुला जरा दमात घेण्याची संधीतरी मिळेल. नाहीतर पूर्ण आयुष्य तुझे टोमणे ऐकत आणि डोळ्यांतून व्यक्त केलेला राग पाहत आलोय."

"(डोळे मोठे करून) खरंच जिभेला काही हाड? बारीक चेहरा करून असा आव आणायचा की एखाद्याला वाटेल की जगातला सगळ्यात गरीब माणूस हाच असेल. उगाच काहीतरी बोलायचं."

काही क्षण नुसतेच कोरे गेले आणि नंतर दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुटले. 

                        ◆◆◆ ● ◆◆◆
(एका वर्षापूर्वी)
जयंतराव आणि चारूलता, दोघेही गहन विचारात होते. आज त्यांनी पाहिलेल्या एका अनोख्या स्वप्नाचा निर्णायक क्षण आला होता. अवनीही आता तिच्या सासरी स्थिर स्थावर झाली होती. मागच्या महिन्यात जेव्हा त्यांनी अवनीला या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा तर ती अवाकच झाली. काही बोलवतच नव्हतं पुढे. ती असताना आईवडिलांनी वृद्धाश्रमात राहणे काही तिच्या बुद्धीला पटत नव्हते. इतकेच नव्हे तर तीचा नवराही आईबाबांना आपल्याकडे रहायला बोलवण्याच्या विचारांचा होता. जयंतरावांना मात्र तिला समजावता समजावता नाकी नऊ आले.

"अगं बच्चा. तू समजतेयस तसं नाहीये ते वृद्धाश्रम. आणि आम्ही काय कंटाळून किंवा निराधार आहे म्हणून नाही जात आहोत तिकडे." जयंतराव.

"बाबा, वृद्धाश्रमात काय हौस म्हणून जातात का? मी नाही तुम्हाला त्या अनोळखी लोकांत पाठवणार." अवनी.

"माझी बच्चू आता खरंच जाम रागावलेली दिसते. इकडं ये. माझ्याजवळ येऊन बस सगळं सांगतो, का जायचंय आम्हाला तिकडे."

अवनी लटक्या रागाने सोफ्यावर जयंतरावांच्या शेजारी बसली आणि हातात हात घेतला. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवुन प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. जयंतरावांनी त्यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या वेळेसची त्यांची "हिरवळ" वृद्धाश्रमातली भेट अगदी मन भूतकाळात हरवून कथन केली.

"अवू बाळा, त्या अगदी डोंगराच्या कुशीत, आणि कौलारु घरात आम्ही जेव्हा गेलो, त्याच वेळी आम्ही सुखावून गेलो होतो. तुझ्या आईने तर अगदी फिल्मी स्टाईल ने माझ्याकडून वचन घेतलं, की म्हातारपण इकडेच जगायचं. अगं या अनोळखी लोकांत आम्हाला नवीन सवंगडी शोधायचेत. त्यांच्या वेगवेगळ्या कलांमध्ये एक कल्पनेचा आविष्कार अनुभवायचा आहे. नवीन पाऊलवाटा आयुष्यात वेगळं काही दाखवण्याची शक्यता देतात. तीच ही एक पाऊलवाट. वाटल्यास असं समज की ही आमची ड्रीम लाईफ आहे."

"असं काहीतरी छान बोलून मला नेहमी हो म्हणायला लावता... पण पटलं तुमचं म्हणणं. याआधी गाण्यामधे तुम्ही बिझी असल्याने, तुम्हा दोघांना निवांत वेळ गवसलाच नाही ना. तुम्ही म्हणताय तसंच 'हिरवळ' सुरेख असेल तर मग माझी काही हरकत नाही. पण आधी मी येऊन सगळ्या सोई सुविधांची चौकशी करणार. नंतर पण आम्ही आलो तर चालेल ना अधून मधून तिथे..?"

"अगं. तुरुंग थोडीच आहे तो.. जेव्हा आठवण येईल तेव्हा यायचं तूम्ही दोघेही."

अवनीने होकार देताच दोघांनीही सुटकेचा श्वास सोडला. ही पोरगी एवढ्या सहजासहजी मानेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. जयंतराव म्हणाले, "चारू असं वाटतंय की जणू आपण लग्न करायला पळून चाललोय आणि सपोर्ट करण्यासाठी मी माझ्या आईलाच समजावतो आहे." दोघंही भरपूर हसले.

"हो ना... मग आता दुसऱ्या इनिंगसाठी तयार रहा मिस्टर जयंत. भारी वाटतंय मला.जसा चाळीस वर्षांपूर्वी मांडला होता, तसा नवा संसार आता मांडणार."

जयंतरावांचं लक्ष आता तिथे हजर नव्हते. ते तर कधीच हिरवळ मधल्या झाडांमध्ये लहान बाळाप्रमाणे बागडत होते. आणि आज बायकोच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचा एक एक कण मनात साठवून ठेवावासा त्यांना वाटला. चाळीस वर्षाच्या प्रवासानंतरसुद्धा ती अजून तशीच विलक्षण होती.

*************

(वर्तमान)
"हिरवळ"मध्ये येऊन आता यांना चार वर्षे झाली. चारुलताचे गायन वेग पकडत होतं. भूप, दुर्गा, यमन, बागेश्री या रागांशी ओळख झाली होती. तालाच्या आधाराने रागाचा संथपणे विस्तार करण्याचे कसब जयंतराव तिला बहाल करत होते. हिरवळमधील इतर सदस्य त्या नवरा बायकोचं नव्याने होऊ घातलेले गुरूशिष्याचे नाते कुतूहलाने पाहत होते. वयोमानाने तिला खाली मंद्र सप्तकात सूर आणताना अवघड जायचे, पण नेहमीच्या पट्टीतले सूर उत्तम लागत होते. 

काही दिवसांपासून जयंतरावांना पोटदुखीने घेरले होते. कधी पहाटे उठल्यावर किंवा जेवल्यानंतर लगेच सर्रकन कळ येऊ लागायची. पचनात बिघाड झाला असेल म्हणून सावंत सांगतील तसे घरगूती उपाय चालू होते. चारुलताला त्यांनी सांगितले नसले तरी तिला दोन-तीन वेळा दिसलेच. आणि मग तिने आपल्या गुरूला चांगलेच दमात घेतले.

"अहो पाच दिवस झाले, पोटात दुखतंय आणि मला न सांगता सावंतांचं ऐकून काही तरी घरगुती उपाय करत बसण्याची गरज आहे का? सावंत तबल्यावर उत्तम साथ करतात म्हणून काय आजारात डॉक्टर बनून साथ करणार का तुम्हाला. आज मी काही ऐकायची नाही. डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि येत नसाल तर मग अमेयला सांगते."

"बाई, त्याला कशाला सांगतेस? एवढ्याश्या कारणासाठी तो आश्रम डोक्यावर घेईल आणि मग सावंताचंही काही खरं नाही."

अमेय त्यांच्या मागेच उभा होता. "काका मी इथेच आहे बरं! ऐकतोय सगळं. जर असं कुणी तब्येतीची हेळसांड करताना दिसलं तर मी आश्रम डोक्यावर घेणारच ना. ते काही नाही, आज काहीही करून दवाखान्यात जाऊन यायचे. मी थोड्या वेळात गाडी अरेंज करतो. अहो तुम्ही आजारी असल्यावर इथलं सुरेल वातावरण बिघडून जाईल की आणि सावंत काकांना किती वेळा समजावलं आहे की घरचा वैद्य बनू नका म्हणून पण अजिबात ऐकणार नाहीत. आता काकूंनाच सांगणे हीच त्यांची शिक्षा."

त्याचं बोलणं ऐकून दोघेही हसायला लागले. हसताना जयंतराव मात्र पोटातल्या तीव्र वेदना लपवू शकत नव्हते. 

पुण्यात डॉक्टरांकडे दाखवून आले. त्यांनीही बऱ्याच टेस्ट केल्या आणि आतड्याला थोडी सूज असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी सतर्कता म्हणून त्यांनी काही दिवस तरी रियाज टाळावा हेच सांगितले. इकडे जयंतरावांना चारूच्या गायनात काही खंड पडू द्यायचा नव्हता. 

"नाही गं. काहीतरी चुकतंय. पुन्हा घे बरं आलाप."

"अहो आता तिसऱ्यांदा घेतेय पण काय चुकलं ते तरी सांगा?"

"मारवा रागामध्ये मध्ये 'प' स्वर वर्ज्य असतो, मग तो येतोच कसा तुझ्या आलापामधे? रागाचा मूळ स्वभावच चुकवलास तर कसं होईल चारू? अजूनही अधेमधे  'रे' शुद्ध लागतोय. 'रे' कोमल हवा, हे सुद्धा चार वेळा सांगितले. तो वादी स्वर असल्याने तुझ्या रागविस्तारात तो वारंवार यायला हवा. त्याचवेळी त्याची हळूवारता तुझ्यात आणि मारव्यात भिनेल."

चारू काहीशी हताश झाली. 

"बरं... आता आणखी थोडा रियाज करते. पण का नाही हो जमत हे? सर्व नियम माहीत असताना, गाताना ती चुक लक्षातच येत नाही. माहीत नाही, का असं होतंय. तुमचा मारवा ऐकताना उत्कटततेपर्यंत पोहोचल्यासारखा वाटतो. मी मात्र तिथे पोहोचू शकत नाहीये."

"चारू.. आपलं मन जर गायनात उपस्थित नसेल तर गाणं मृगजळासमान भासतं. तू कितीही जवळ जाण्याचा प्रयत्न कर, ते तेवढीच पावले तुझ्यापासून दूर असेल. मला असं वाटतं की तूझं पूर्ण अवधानच गाण्यात नसते. माझ्या आजारपणाचा विचार करतेस हेही दिसतं मला. पण म्हणून तू गाण्याशी प्रतारणा नाही करू शकत. बालपणी, आपण खेळता खेळता कुठेही झोपलेलो असू, पण सकाळी जाग यायची ती आईच्या कुशीत! आईनं आपल्याला अलगद उचलून कधी घेतलं ते कळायचं देखील नाही. तसेच हे संगीत आहे. तू सगळं जग विसरून त्यात रम. मी किंवा तू आज किंवा उद्या जाणारच आहोत, मग कशाला फुकटची चिंता करतेस. मी जरी उद्या सोबत नसलो तरी संगीत जगण्याचे कारण बनेल."

चारुच्या डोळ्यात पाण्याची उपस्थिती जाणवू लागली. 

"करते मी प्रयत्न. नक्की."

"चारू. माझंही स्वप्न आहे की तुला भान विसरून मारवा गाताना पाहणं. सूर असे निघायला हवेत की क्षण स्तब्ध होतील. वाऱ्याचाही नाद सुरेल होईल आणि तुझ्या अलापाच्या लयीला साथ देईल. त्यात इतके झोकून दे, की एखाद्या मरणोन्मुख जीवात क्षणभर का होईना जान ओतावी त्या सुरांनी. आयुष्य कधीतरी संपणार होतंच, त्याची अजिबात भीती नाही. पण यावेळी....."

"थांबा... उगाच काहीबाही बोलू नका. काही नाही होत तुम्हाला. साधा अल्सर आहे. माझ्यासाठी तुम्ही अजून खूप वर्षे पाहिजे आहात."

"हे बघ मला मरणाचं दुःख किंवा भय नाहीये. डॉक्टर काही बोलत नसले तरी त्यांचा चेहरा सांगून गेला की त्यात काहीतरी किचकट प्रॉब्लेम आहे. उलट असं वाटतं, की ज्या माणसाला आपला शेवटचा दिवस कधी आहे याची कल्पना असते ना, तोच माणूस भारी आयुष्य जगू शकतो. आणि मी तेच करणार. मग तू ठरव, की मी अजून भरपूर जगेन या खोट्या आशेत नॉर्मल जीवन जगायचं, की मी कधीतरी जाणार आहेच या जाणिवेत माझ्यासोबत आयुष्यात राहून गेलेली सुरांची एकत्र सफर करायची."

चारूलता ने तानपुरा बाजूला ठेवला आणि जयंतरावांच्या बाजूला येऊन बसली. हातात हात दिला आणि आपला त्या सफरीला होकार कळवला.

"माझी विद्यार्थिनी मोठी आणि समजूतदार झाली म्हणायची आता."

"काहीतरीच काय?"

"अजून एक सांगू? मी गाण्यांच्या मैफिली करत जगभर फिरलो पण तुझ्याशी सुरांच्या गमती जमती शेअर करायला खास असा वेळच मिळायचा नाही. खूप दिवसातून घरी परतल्यामुळे पेंडिंग राहिलेले व्यवहारच पूर्ण करण्यात वेळ जायचा आणि मग तोपर्यंत पुढच्या कार्यक्रमाची आखणी झालेली असायची. तुझ्या वाट्याला नकळत मी व्यवहार आणि संसाराची पूर्ण जबाबदारी दिली ना गं."

"हो तर... पूर्ण जग तुमच्या मैफिलींचा अगदी समोरून आनंद घ्यायचे, मला मात्र कॅसेट वर ऐकावं लागायचं. हेवा वाटायचा त्या रसिकांचा. पण आता तर तुमचा प्रत्येक क्षण माझ्याजवळ आहे. याच्यापेक्षा काहीही नको मला. आता मात्र आता मी गाणं गाईन आणि तुम्ही रसिक व्हायचं. आतापासून हृदयाचा प्रत्येक कोपरा मी या सुरांच्या हवाले करते. एक सांगा. संगीतात तर कित्येक राग आहेत, पण तुम्हाला मारवा इतका का आवडतो?"

"किती बोलू या मारव्याबद्दल...तुला आता हे माहीत आहेच की संगीतात 'प' आणि 'सा' हे स्वर अचल असतात. शक्यतो हे दोन्ही स्वर कुठल्याच रागात वर्ज्य नसतो. फक्त मारव्यामध्ये 'प' वर्ज्य आणि 'सा' खूप कमी वापरला जातो. शास्त्रीय संगीताचा पूर्ण डोलारा हे 'प' आणि 'सा' सांभाळणारे हे स्वरच न जाणवल्यामुळे, मारवा राग अपूर्णतेचा स्पर्श घेऊनच जन्माला आलाय.  गायन झाले तरी 'हरवलेलं काहीतरी अजून गवसायचं आहे' याची जाणीव होते. ती पूर्ण करता करता गायक अजून गात राहतो आणि त्यात स्वतःलाच गवसतो.  मला गायकी येते, याचा अहंकार तो एखाद्या हट्टी मित्रासारखा जवळ बसून उतरवतो. पूर्ण गायकी कुर्बान या रागावर... "

चारुलताला तिचं आयुष्य काहीसं मारव्यासारखेच वाटले. त्यांच्या लग्नाची ४० वर्षे आनंदात जाऊन सुद्धा अजूनही काहीतरी शोधायचे राहूनच गेले होते. पण कुठेतरी तिलाच वाटलं, की खरं तर नात्यात अपूर्णता असणंच चांगलं. पूर्णत्व आलं की एकमेकांच्या चुका काढण्याशिवाय काही नावीन्य राहत नाही. अपूर्णता मात्र नात्याला काहीतरी उद्देश्य देत राहते."

"चारू... कुठं हरवलीस? काय विचार करतेयस?"

"अहो... मी कुठे. तुम्हीच हरवून गेलात मारव्याचा इतका अर्थ सांगताना. मला कळली आता या मारव्याची जादू. तुम्ही त्या रागाची फक्त पध्दतच नाही सांगितली तर तो का गावा यासाठी माझ्या आयुष्यात एक ध्येय दिलंत....  "

"आणि तुझं ध्येय पूर्ण व्हायची जीवापाड वाट पाहीन मी. ज्यादिवशी तुझ्या सुरेल मनावरची खिडकी उघडून पाहशील ना तेव्हा पलीकडे आपण एक झालेले दिसू तुला.  आपल्यात काहीच अंतर नसेल. असं गात रहा......"

चारुलता मात्र भरल्या मनामुळं काहीही बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यासमोर भरल्या पावलांनी सांज येत होती. पृथ्वी बिचारी झोपेच्या राज्यात प्रवेश करत असता, सूर्य आपली मिठी हळुवार सैल करत प्रस्थानाच्या तयारीत होता. 

                        ◆◆◆ ● ◆◆◆

दिवसेंदिवस जयंतरावांची तब्येत खालावतच चालली होती. काही दिवसांतच डॉक्टरांनी आतड्याचा कॅन्सरचे निदान केले. तोपर्यंत तो कॅन्सर आता वाव मिळेल तसा पसरत चालला होता. अवघडात अवघड तानही लीलया गाणारा हा गायक आज एकेक शब्द बोलताना वेदनांशी झुंजत होता. 

"चारू..... रियाज.... थोडाच वेळ करतेयस सध्या.... मला आवाज... येतो बर का.. तुला आधीच सांगितलं होतं की एकदा तानपुरा हातात घेतलास... की तू मलाच काय स्वतःलासुद्धा विसरून जायचं."

"अहो.... तुम्ही का बोलत राहता? पोटात दुखते ना बोलताना?"

"अगं... या वेदना म्हणजे, गाण्यात कधीतरी चुकारपणा किंवा आळस केला असेल त्याची शिक्षा आहे असं समजेन. आता कळतंय की सूर गळ्यातून येत नसतात. तर पोटातून येत असतात. पण तुझ्या रियाजाच्या आवाजाने खूप सुख वाटतं बघ. बडा ख्याल गाताना मात्र अजून सुरांच्या जागा चुकतात काही ठिकाणी.. पण शिकशील.. मला खात्री आहे.. आणि हो.. अवनीच्या होणाऱ्या बाळालाही संगीताचे धडे तूच द्यायचे. सुरात रडतं अगदी ते."

"नक्की देणार. पण आता झोपा ना. औषध काम करणार नाही मग."

चारुलताच्या मांडीवर त्यांचं डोकं टेकलं होतं आणि औषधांच्या गुंगीचे साम्राज्य शरीरभर पसरू लागले. खोलीत शांतता पसरली होती आणि कुठून तरी रेडिओवर लागलेली किशोरीताई आमोणकर यांची ठुमरी ऐकू येत होती.

चारुलताला अचानक जाणवले की जयंतरावांचा श्वास जड होऊ लागला आहे. काय करावे काही सुचेनासे झाले. अमेयला बोलवावे म्हणून पटकन बाहेर आल्या. अगदी वाऱ्याच्या वेगाने पळावे वाटत होते पण  पायातले अवसान गळून पडले होते. अमेयच्या केबिनपर्यंत पोहोचायला युगांचा वेळ लागत असल्यासारखे वाटले. त्यांना पळत येत असल्याचे पाहताच तोच पटकन बाहेर आला.

काही वेळातच डॉक्टर आणि गरज लागल्यास असावी म्हणून अँम्ब्यूलन्सही होती. पण जयंतरावांनी हॉस्पिटलमध्ये जायला स्पष्ट शब्दांत नकार दिला. काहीही झाले तरी आता जगून त्याच त्याच वेदना पुन्हा अनुभवायच्या नव्हत्या. संथ होत चाललेली नाडी पाहून डॉक्टरांनीही आग्रह केला नाही. जयंतरावांचे श्वास चालू ठेवण्याचे सोपस्कार देवावर सोपवण्याशिवाय उपाय नव्हता. आता फक्त परतीची वाट होती.

अँम्ब्यूलन्स आलेली पाहताच सगळ्यांनी जयंतरावांच्या खोलीकडे धाव घेतली. सगळे काळजीत होते. आजपर्यंत या वास्तूमधून त्यांनी बऱ्याच मित्रांना आयुष्यातून निरोप दिला होता आणि त्यातलेच अजून एक पान आज उलटत होते.

                        ◆◆◆ ● ◆◆◆

आज सुरांना अवचित जागा सापडत होती. चारुलताच्या गळ्यातून जणू हार्मोनियम आणि तानपुरा जीव हरपून गात होते. तिच्या हृदयाची स्पंदने आणि मारवा एकरूप झाले होते, कारण तिच्याही आयुष्यातुन एक अचल सूर शेवटचा श्वास घेत होता. 

"पिया~~~~ घर नही~~~~ आ~~~ये~~रे~~
मेरे~~~~~ पल~~ पल~~ छिने~~~ जाये ~~"

प्रत्येक शब्दात आणि आलापामध्ये जीवनाची चाळीस वर्षे उलगडत चालली होती. जलपर्णीने नदीला झाकोळून टाकावे, तश्या त्या आठवणी मनातल्या दुःखाला बंदिस्त करू पाहत होत्या. 

बडा ख्याल आता शेवटच्या तानेवर येऊन ठेपला. चारुलताच्या आवाजात एक धार आली. आज मुरकी, मिंड अशा हरकती सफाईदार येत होत्या. समाधिस्थ शिवाची वाट पाहत कित्येक युगे नंदीने द्वारावर बसून रहावे, असेच ते सूर ठेहराव घेऊन रेंगाळत होते.

एव्हाना सावंतांच्या तबल्यावरील ताल सुरांचे सांत्वन करू पाहत होता. तिथे उभे असलेल्या लोकांचे जीव कानात येऊन ठेपले होते. अवनीही धावत पळत आली आणि आईच्या गाण्याचा आवाज ऐकून भरल्या डोळ्यांनी दारातच थबकली. हवा जोरदार वाहू लागली आणि पावसाचे तुषारांनी अवेळी हजेरी लावली. चारुलताचा जीव आता कंठात आला होता. इतके सुरेल गाऊन तिच्या गुरूला आज ते कुठे ऐकू जाणार होते. तो तर रियाजाच्या बैठकीला शेवटचा नमस्कार घालून निघालाही असेल. कदाचित त्याचाही पाय निघत नसेल. 

अगदी काही सेकंदात ती बंदिश संपणार होती. पण त्या हवेत जे हरवत चालले होते ते मात्र तिला सापडत नव्हते. तिने शेवटची तान घेण्यासाठी सूर चढवला आणि तिची समाधी लागली. सगळं काही विस्मरण झाले, सगळे जग निरव झाले आणि त्याच क्षणी जयंतरावांच्या डोळ्यात एक चेतना आली. चारुकडे भरल्या डोळ्यांनी पाहिले. त्या डोळ्यातच एक प्रेमभरी हाक होती. चारुलता त्याच क्षणी गायची थांबली, आणि पूर्ण वातावरण अंधाराप्रमाणे निपचित झाले. तिचे मन अजूनही समाधिस्थ होते. इथले कटू सत्य पाहण्यासाठी त्याला परतूच वाटत नव्हते. इतक्यात तीव्र वेदनांशी झुंजत, अडखळत्या शब्दांनी जयंतराव शेवटचं एकच वाक्य बोलू शकले.

"शाब्बास चारू... शाब्बास... मारवा पूर्ण झाला... "

काही क्षणातच श्वासातला सूर अनंताच्या प्रवासात निघून गेला आणि चारुच्या आयुष्यातला "सोबत" हा अध्याय संपला.

©विशाल पोतदार

● ◆◆◆ ● ◆◆ समाप्त ◆◆ ● ◆◆◆ ●





3 comments:

  1. खूप छान स्टोरी होती.... खरंतर तुझ्या ह्या सूंदरअश्या स्टोरीच वर्णन करायला शब्द नाहीत माझ्याकडे... आयुष्यातील उतारवयाचा टप्पा म्हातारपण आणि पती पत्नीचं प्रेम तेवढंच हिरवळ सारखं ताजटवटवीत . लग्नाच्या दहाव्या वर्षी बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणारी ही जोडपी... आपली कला ही तिथे जोपासणारी त्या कलेत रमणारी... मला गाण्यातले राग वैगरे काही कळत नाही पण तू एवढ्या उत्कटतेने ते मांडले वाचताना मन खिळून गेलं होतं . तिच्या डोळ्यासमोर नाजूक पावलांनी सांज येत होती आणि संधीप्रकाश मागे खेचत सूर्य पृथ्वीभोवती घातलेली किरणांची मिठी सोडवत होता... सांजेच्या वर्णन करणाऱ्या ओळी खूप भन्नाट लिहिल्या तू .
    जीवन गाण्यातल्या त्या रागासारखंच आहे . आपण ते ताल छेडीत लयबद्ध ताण विसरून जगावे तसे .
    अगदी ,
    नाम गुम जायेंगा , चेहरा ये बदल जायेंगा...
    मेरी आवाज ही पेहचान है
    गर याद रहे....
    प्रमाणे 😊

    ReplyDelete
  2. Shriram mahanuni23 August 2019 at 10:09

    Mast....

    ReplyDelete