#विशालाक्षर
#ओवी_ज्ञानेशाची_आयुष्याची
ज्ञानेश्वरी, गीतेचा फक्त अनुवाद नव्हे, तर गीतेतील श्लोकांचा मतितार्थ घेऊन, समाधानी आयुष्य कसं जगावं हे सांगणारा मार्गदर्शक आहे. आणि त्या निरुपणात कुठेही आदेश, बडेजावपणा नाही. एखाद्या मित्राने खांद्यावर हात ठेवून सल्ला द्यावा इतकी त्या भाषेत सहजता, तर शब्दनृत्य करवणाऱ्या कवीइतकी अलंकृतता आहे.
खालील ओव्यांतून, ज्ञान धारण करण्यासाठी योग्य व्यक्तीची लक्षणे सांगतात.
अध्याय १३:-क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग
ओवी:-
जातया अभ्रासवें । जैसें आकाश न धांवें ।
भ्रमणचक्रीं न भंवे । ध्रुव जैसा ।।८८।।
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा ।
कां नाहीं जेवीं तरुवरां । येणें जाणें ।।८९।।
तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकीं । भूतोर्मीं एकीं । चळिजेना ।।४९०।।
अर्थ:-
-कितीही जोरदार वारे वाहिले म्हणून, त्यासवे आकाश वाहून जात नाही. आकाशात कितीही बदल झाले तरी ध्रुवतारा आपलं स्थान कधीही सोडत नाही. वाटसरू कितीही चालला तरी रस्ता काही त्याच्या पावलांसोबत आपली जागा सोडत नाही. तसेच, आपला पंचमहाभुतांचा देह कितीही हालचाल केली तरी त्याची चित्तवृत्ती ढळू नये.
-मी माऊलींच्या समर्पक रूपके वापरण्याच्या कलेवर नेहमीच फिदा आहे. कारण ही उदाहरणे आपल्याला विचारांची खोली आणि उंची दोन्ही अगदी आरशातल्या प्रतिमेप्रमाणे निखळ दाखवतात.
- आपली चित्तवृत्ती कुठलाही विकार मनामध्ये न आणू देता आपण संसार व्यवहारात कसे शांतचित्त राहतो यामधे आपली ज्ञान ग्रहण करण्याची वा जीवन समाधानी करण्याची ताकद सामावलेली असते. विकार म्हणजे मनाचे रोग. (काम, क्रोध, मत्सर, भय इत्यादी).
-प्रॉब्लेम हा आहे की हे रोग बाह्य परिस्थितीमुळे डोकं वर काढतात जी आपण बऱ्याचवेळा बदलू शकत नाही. आपण स्वतःचं मन मात्र नक्कीच ताब्यात ठेऊ शकतो. आपल्या हातात आहे, मनाचा तोल ढळू देणं.
ओवी-
वाहुटोळीचेनि बळें । पृथ्वी जैसी न ढळे ।
तैसा उपद्रवउमाळें । न लोटे जो ।।४९१।।
दैन्यदु:खीं न तपे । भयशोकीं न कंपे ।
देहमृत्यु न वासिपे । पातलेनी ।।४९२।। ।
अर्थ-
- वावटळ आली म्हणून पृथ्वी हालत नाही. तसा तुला कुणाचा उपद्रव झाला म्हणून तू त्यासोबत वाहवत जाऊ नको. दुःख आलं, गरिबी आली म्हणून संतापू नको. भयभीत होऊन कापू नको. अगदी मृत्यू समीप आला तरी तूझी मनाची स्थिती कायम ठेव.
- आपण नेहमी विचार करतो की एखाद्या परिस्थितीत जास्तीतजास्त वाईट काय होईल. त्या वाईट परिस्थितीमधे मन शांत अचल ठेऊन पुरून उरायला हवं.
ओवी-
आकाश हें वोसरों । पृथ्वी वरि विरों ।
परी नेणे मोहरों । हृदयवृत्ती ।।४९५।।
अर्थ:-
-आणि ही ओवी अगदी मनाला इतकी उभारी देऊन गेली की ती सदैव डोळ्यासमोर ठेवावी.
-अगदी आकाश खाली निखळून पडो अथवा पृथ्वी विरून जावो. पण पार्था तरीही जर तू हृदयवृत्ती तशीच अचल राहू दिलीस तर जगातलं सर्व ज्ञान तुला नमन करेल.
-चित्तवृत्ती किंवा मनाची स्थिती कायम ठेवणे म्हणजे मतिमंद होणे असं नव्हे. तर एक तटस्थ भाव ठेवून त्या परिस्थितीला पाहता येणं. तटस्थ भाव असा असावा की तुम्ही त्या परिस्थितीत घुसून न राहता मनाला थोडंसं चार पावलं दूर आणावं. त्यावेळी मग भय,काळजी न वाटता त्या परिस्थितीवर मात मिळवण्याचे मार्गही दिसू लागतात.
माऊली...🙏🙏
©विशाल पोतदार (संपर्क-9730496245)
तळटीप: माऊलींच्या शब्दांना स्वतःच्या चिंतनात सांगड घालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. लेखनात जर अनावधानाने काही चूक असल्यास जरूर दर्शवून द्यावे.
No comments:
Post a Comment