.post img {

Automatic Size

Friday, 6 October 2023

कणादच्या बाबाची डायरी (१)

#विशालाक्षर
#बापाची_डायरी


तुझ्या जन्माआधीचं)

बाळा...तूझा जन्म होण्यास काही दिवसांचा अवधी आहे. काही दिवसांचा, की तासांचा? सध्या काहीच सांगू शकत नाही. तुझ्या आईचा जेव्हा फोन येतो तेव्हा असेच वाटते की तुझ्या येण्याची चाहूल लागली की काय? तसे तुझं येणं आमच्यासाठी तू पोटात असतानाच झालंय. जेव्हा तू आत वळवळ करून आम्हाला तुझं असणं दाखवून देऊ लागलास. अरे एवढ्याशा जागेत मावणारा तू. आणि त्यातच इतका विहार करायचा? जणू काही आत पूर्ण जग उपलब्ध आहे. सध्या तुला आत कसे वाटतेय. काही हुरहूर आहे का? अचानक एका समाधी अवस्थेतून कलकलाट असणाऱ्या जगात यायचंय. त्याआधी तुझी कशी तयारी चालू असेल कुणासठाऊक.! अरे आम्हीही तुझी ही अवस्था अनुभवली आहे, परंतु गर्भातले जीवन काहीच लक्षात राहत नाही. तुलाही राहणार नाही. पण आता या क्षणी तू तिथे आहेस. त्यामुळे तुला ते जाणवून द्यावे वाटले. आईच्या शरीरात वाढतोयस. बाहेरुन खूप काही आवाज, भावना जाणवत असतील. सगळं काही ग्रहण कर. पण उगीच सगळ्याची काही साठवन करत बसू नकोस. 

तुझी वाट पाहतोय..

२६ मार्च २०२३
कणाद आज आठ महिन्यांचा झालास. एक प्रामाणिकपणे सांगू? तूझ्या जन्माच्या आधी मला वाटायचं की आपल्याला मुलगीच व्हावी. मुलीवर बाप खूप माया करतो असं फील व्हायचं. पण तुला ज्याक्षणी पाहिलं ना तेव्हापासून हृदय तेवढंच पाघळलं, जितकं मुलीसाठी झालं असतं. तू त्या मातीच्या गोळ्यापासून, आता इतका सुंदर दिसतोयस ना की तुझ्या मम्माला आणि मला लकी असल्यासारखं वाटतं. माहितीये की सगळ्या आईबापाना आपलंच मूल क्युट वाटतं. पण वाटतं तर वाटतं. काही कळत नसतानाही दिसणाऱ्या तुझ्या लीला पाहत बसावं अशा आहेत. 

२ एप्रिल -
अरे सध्या तुला उभं राहायचं असतं. कुणीतरी तुला पकडून नुसतं उभं करणार आणि तू उड्या मारणार जोरात. तुझ्या उड्या मारून वाटतं की अख्ख्या आयुष्यात इतकं हललो नसेन कधी. तुला खाली ठेवलं की रडायला सुरुवात. चालायला वगैरे लागलास तर किती पळशील कुणासठाऊक.

७ एप्रिल २०२३

सध्या तुला फक्त रडण्या आणि हसण्याचीच भाषा येते. काही पाहिजे असेल तर रडायचं आणि ते मिळालं की हसायचं. इतकी साधी सरळ भाषा. परवाच तू, मी घ्यावं म्हणून मुद्दाम रडायचं नाटक करत होतास. लगेच कळत होतं ते नाटकी रडणं. छान अभिनय करत होतं माझं बाळ. आता तर सरपटत पायाशी येतोस आणि दोन्ही पाय धरून रडू लागतोस घ्यायला.. आणि तुझं दोन्ही हात समोर वल्हे मारल्यासारखे हलवत बम उचलून पुढे येणंच इतकं क्युट वाटतं की बस्स! तू असा मागे लागलास की पटकन उचलून घेतो मी. तुझी मम्मा म्हणते खूपच लाड करतो मी..! पण आहेसच ना रे तेवढा क्युट.


९ एप्रिल
काल आपण लोणीला आलो (तुझ्या आजोळी). तुला मी मुंबईवरून आणलेला नवा टी शर्ट घातला होता. किती क्युट दिसत होतास. 

आज सकाळी पहिल्यांदाच गुडघ्यावर आलास. म्हणजे रांगायच्या पोजमध्ये रे. छोटाश्या मनीमाऊसारखं. मनीमाऊ वरून आठवलं. माऊला किती घाबरतोस तू. तिच्या जवळ जात नव्हतास. कुत्रं दिसलं की झेप घेतोस त्याच्याकडे. अगदी त्याने मुका घेतला तरी घाबरत नाहीस आणि मनीमाऊमध्ये काय घाबरण्यासारखं वाटलं कुणासठाऊक.

१० एप्रिल 
ऑफिसमध्ये असताना तुझ्या मम्माचा मेसेज आला whatsapp वर. तुझा व्हिडिओ होता ज्यात तू चक्क मनीमाऊशी खेळत होतास. एका दिवसात मनीमाऊ ने अशी काय जादू केली कुणासठाऊक, घाबरणारं पोरगं खेळू लागलं तिच्याशी. तिला हात लावताना इतकं नाजूकपणे लावत होतास, की आजपर्यंत तिला इतकं हळुवार कुणी स्पर्श केला नसेल.

१२ एप्रिल
अरे आत्ता मी वाठारला चाललोय बसमधून. बाबांचं डोळ्याचं ऑपरेशन आहे ना उद्या. माझ्या शेजारी एक स्त्री बसलीये. तिच्या हातात एक छोटीशी मुलगी आहे आणि ती अगदी तुझ्यासारखी दिसली. तुझ्या आठवणीने जीव कळवळला क्षणभर. हे होतच नेहमी.

त्या मुलीची जन्मतारीख आहे २५ जुलै. तुझ्यापेक्षा एक दिवसाने मोठी.! किती योगायोग असतात ना? तुझं आणि त्या मुलीचं आयुष्य समांतर अगदी तेवढंच काळ चालू आहे. खूपशी आयुष्ये अशी समांतर चालतात. आपल्याला ओळखीची नसली तरी योगायोगाने आपल्याला भेटतात ते लोक.!

१७ एप्रिल

कणाद... आज तू मला चक्क घास चारलास. संध्याकाळी आपण तिघे बाहेर फिरायला आलो होतो. आम्ही पाणीपुरी खात होतो. तुला एक चपटी पुरी चघळायला दिली. आणि तू अगदी मन लावून ती तोंडात घोळत होतास. मम्माकडून मी तुला घेतलं आणि तू मला ती पुरी चारलीस. तुला ते कसं सुचलं कुणासठाऊक पण मला भरून आलं रे त्या क्षणाने. 

२२ एप्रिल
कणाद तू जे निर्मळ प्रेमाने हसतोस, माझ्याकडे पाहतोस ना त्यासारखं दुसरं सुखच नाही रे. मी आधीच भावनांमध्ये वाहणारा माणूस. आणि तूझ्या सारखी इतकी हळुवार झुळूक तर मन बरसूनच टाकायला लावतं. आजपर्यंत इतक्या प्रेमाने माझ्याकडे कुणीच पाहिले नसेल. असंच खूप निर्मळ राहणं आयुष्यात मुश्किल असतं पण जितकं निर्मळ भावाने दुसऱ्याशी बोलणं वागणं जमेल तितकं करत राहा.

२३ एप्रिल
कणाद तू कालपासून टाळ्या वाजवायला शिकलायस. तुझी लोणीची आजी तुला काही दिवसांपूर्वी शिकवत होती. त्यावेळी वाजवल्या नाहीस टाळ्या, पण कालपासून डाव्या हातावर तुझा उजवा हात नाजूकशी थाप देतोय. इतकं नाजूक की अगदी छोटीशी टाळी ऐकू येते. विठ्ठल विठ्ठल म्हटलंकी सुद्धा सुरू होतेय टाळी.

२४ एप्रिल
कणाद तू सकाळी सकाळी उठतोस तेव्हा तुझे डोळे नेपाळी लोकांसारखे दिसतात सुजल्यासारखे. तुझ्या मम्माला तू त्यावेळी वापरून गूळगुळीत झालेल्या अप्सरा खोडरबर सारखा वाटतोस. तिला मी म्हटलं नटराज खोडरबर सारखा नाही दिसत का? अप्सराच का? तिचं म्हणणं की अप्सराचा खोडरबर मऊ असायचा तुझ्यासारखा.

२७ एप्रिल
बाळा आपण यात्रेसाठी गावी आलो आहोत. 

१ मे
कणाद आज आपण आळंदीला गेलो होतो. आपल्याकडे आजी आजोबा, ताय आणि मनुदीदी राहायला आले आहेत सुटीचे. मग आज आळंदीला जायचा प्लॅन केला. इतक्या लहानपणी तुझं माऊलींचे दर्शन होत होते म्हणून कृतकृत्य वाटत होतं. एकादशीमुळे खूप गर्दी होती, त्यात तुला दर्शनाला न्यावं की बाहेरच घेऊन बसावं अशी शंका होती. पण म्हटलं जाऊ दे जास्तीतजास्त रडशील ना. पण खूप छान राहिलास तू गर्दीत पण. थोडासा रडत होतास मग राजगिऱ्याचे बिस्कीट चारले मम्मा ने. नंतर इतका छान झोपलास की दर्शन गाभाऱ्यात आल्यावर उठलास. मस्त डोकं टेकवून दर्शन घेतलंस. शहाणं बाळ आमचं.! तू मोठा झालास की ज्ञानोबांविषयी सांगेन.

३ मे)
अरे काल मी ऑफिसमधून घरी आलो. तू मम्मा सोबत खेळत होतास. मला बघून छानसा हसलास आणि सॅक काढून ठेवेपर्यंत वेळ गेला. तुला वाटलं मी घेणारच नाही तुला. मग असं भोकाड पसरलस की घ्यावंच लागलं तुला पटकन. आणि घेतल्यावर नेहमीसारखं बटण दाबल्यासारखं रडणं बंद. आणि आज घरी आजी , आजोबा, ताय, मनूदीदी सगळे होते पण तरीही माझ्याकडून दुसऱ्या कुणी घ्यायला लागलं की त्यांचा हात झटकून मला अजून चिकटायचास. अगदी ते माकडाचं पिल्लू आईला चिकटलेलं असतं तसं. इतकं काय, स्ने ला म्हटलं, तू घेऊन बघ. तिने घेतानाही तसंच केलंस. पिल्लू किती रे जीव लावतोस. भरून आलं मला. बापाचं बाळाशी शारीरिक कनेक्शन नसतं ना रे आईइतकं, आणि बाळ बापावर डिपेंडही नसतं. म्हणून बापाला एक काळजी असते की आपलं बाळ आवडीने येईल का आपल्याकडे. पण ती कसर भरून निघाली काल. 


११ मे)
काल रात्री मी आंब्याच्या फोडी खायला घेतल्या. इतक्यात तूलाही ते दिसलं आणि मला।पाहिजे म्हणून रडत मागायला लागलास. माझ्या हातातूनच फोड तुझ्या तोंडात दिली. तूझ्या दोन दातांनी थोडीशी खाल्लीस पण त्या फोडीवर ते इवलूसे दात उमटले होते. अगदी जसेच्या तसे .. 
इतकं भारी वाटत होतं ना यार. ते नाजूकसे दात अलवार उमटले होते. मला नंतर ते खाताना बुजवू वाटत नव्हते. पण फोटो काढून ठेवला. तुझ्या सगळ्या actions मध्ये cuteness वाटत असतो.

१९ मे)
अरे काल आपण तिघे नाटकाला गेलो होतो. अमृता, साहिर आणि इमरोज... आत गेलो आणि बाळाला हातात पाहून तिथल्या काही प्रेक्षकांनी तोंडं मुरडली... मग मम्माने बाहेर येऊन तुला झोपवण्याचा प्रयत्न केला पण तू काही झोपत नव्हतास. मग तिला म्हटलं तू पहा नाटक, मी कणादला घेऊन बाहेर थांबतो. अरे चक्क 2 तास आपण दोघेच होतो मस्त. खूप वेगवेगळी घरं, हॉटेल बाहेरचे लाईट्स दाखवले तुला. बाहेर येणारे जाणारे सगळेच तुझा लाड करत होते. मग दमून दमून माझ्या मांडीवर झोपलास तू. ते 2 तास बेस्ट होते माझ्यासाठी.

२६ मे)
आज सकाळी माझ्याकडे सरकत येताना excietment मध्ये येत होतास. आणि आबा..बा..बा... असं बडबडत होतास.. मी ऑफिसला जायला निघालो आणि जाता जाता तुला घेण्यासाठी बसलो. तुझी मम्मा म्हणाली की एकतर ऑफिसला उशीर होतोय आणि आता त्याला घेऊन का बसतोस. पण मी बसलोच..
तक्स
आणि पुढच्या क्षणी तू स्पष्टपणे .." बाबा.." म्हटलास... अरे इतका प्रचंड मोठा आनंदाचा क्षण होता ना रे.... वर्णनच नाही करू शकत नाही..

कानात.. मनात रेकॉर्ड झालाय तुझा तो शब्द..

३१ मे)
तू रोज अमेझॉन फायर स्टिक (टीव्ही) चा रिमोट तोंडात घालून कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज करत दातलत असतोस. मला वाटलेलं असेल 100-200 रुपयांचा रिमोट झाला खराब तर नविन आणू. पण आज त्याची अर्धी बटणे चालेनासी झाली. मी ऑनलाइन रिमोटची किंमत पाहिली तर चक्क एक हजार रुपये. मला तर टेन्शनच आलंय. तुझ्या हातात दिला नसता बरं झालं असतं असं वाटतंय.

१ जून) ,
आपोआप सुरू झाला रे रिमोट. त्याचं आवाज कमी जास्त करायचं बटण चालत नाहीये... पण ठिकेय कामापुरता चालतोय. तुझा बाबा खूष झाला. आता तुझ्या हातात मिळणार नाही अजिबात.

०४ मे
आजकाल चिडायचं कसं कळू लागलंय तुला. हातातून एखादी गोष्ट काढून घेतली की दोन्ही मनगटे समोर धरून मुठी आवळतोस आणि दात ओठ खाऊन ई~~~ असं करतोस. हे expressions तुझे त्रासातले असले तरी जाम क्युट वाटतात. मग आम्ही जाम हसतो. 

१५ मे)
आठ दहा दिवसांपूर्वी इतकं छान खायचास ना सगळं, आम्ही सगळीकडे सांगायचो आमचं बाळ किती छान जेवतं. एक घास संपायच्या आधी दुसरा हवा असतो. पण आता या आठवड्यात तुला चवीतलीनआवड निवड कळायला लागली आहे. पहिला घास नाही आवडला तर सरळ जीभ बाहेर काढून तोंडातला घास बाहेर टाकतो. आणि पुढच्या घासापासून तोंड फिरवतोस लगेच.

१६)
कणाद तुझं हसणं इतकं गोड आहे ना रे! लूपवर लावून ऐकत राहावं. आयुष्यात मुलांचं सुख काय असतं. तर हे हसणं ऐकण्याचं नशीबच रे.

२ जून)
आता सोफ्यावर चढायला शिकला आहेस. सोफ्यावर चढून जिथे टेकतो त्याला धरून उभं राहतोस. पडशील की काय भीती वाटत राहते सतत.

४ जून)
अरे तुला काल टी शर्ट मागवला. खूप cute दिसत होतास त्यात. पण तुला त्या टी शर्टशी काही देणं घेणं नव्हतं. तुला त्याचं लेबल हवं होतं तोंडात घालायला. इतकं हसलो आम्ही दोघेही! बघ ना तुझ्या वयाची फेज कशी असते. तुला आपण कसे दिसतो, स्वच्छ आहोत का, कपडे घातलेत की नाही कशाची काही जाणीव नसते. तू चांगले कपडे घालावेत. क्युट दिसावं हे आम्हाला आमच्यासाठी वाटतं. खूप विरोधाभास आहे ना हा. पण आयुष्य असंच असतं. आपल्यामुळे आपण आनंदी राहतो त्यापेक्षा दुसऱ्यांचा आनंद आपल्यावर किती अवलंबून असतो.

२४ जून
The Box नावाच्या नाटक थीएटरमध्ये बऱ्याचवेळा नाटक पाहायला जातो. तू तिथे आत गेले की वेगवेगळे आवाज काढतोस त्यामुळे मी तुला बाहेर घेऊन बसतो आणि आई नाटक।पाहते. अरे तुला तिथे बाहेर घेऊन बसता बसता तुझ्याशी तिथल्या सिक्युरिटी म्हणूज काम पाहणाऱ्या काकांशीसुद्धा छान गट्टी जमली आहे. ते तुझ्याशी खेळतात (मोबाईल तुझ्या हातात देतात म्हणून तू जास्त खूष होतोस हे खरं.) परंतु काही बोलता न येणाऱ्या बाळालाही किती सुंदर नाती तयार करता येतात.

२६ जुलै)
कणाद आज एक वर्षाचा झालास रे. कालपर्यंत कुणीही विचारले की केवढा आहे हा मुलगा, तेव्हा तुझं वय महिन्यांमध्ये सांगायचो. पण आता सांगणार वर्षाचा झाला आमचा मुलगा. किती तरी पटकन वर्ष निघून गेलं. एवढंसं छोटं बाळ मोठं होतंय. एक हुरहूर आहे की तुझे आत्ताचे क्युट भाव जपून ठेवता येतील का मनात. कारण मागच्या महिन्यात माशासारखा सरकत सरकत फिरणारा मुलगा आता सराईतपणे रांगतोय. हे सराईत बदल पटकन डोळ्यांच्याही इतके अंगवळणी पडतात की वाटावं, तू सरकत होतास त्याला कित्येक महिने झाले. काही दिवसांत चालायला लागशील तेव्हा हेही जुनं होईल. असो.. तुझ्या या उत्क्रांतीला भावनिक निगेटिव्ह झालर लावणार नाही. तसेही मला तू केव्हा एकदा मस्त बोलायला लागतोस याची उत्सुकता लागलीय. आपण किती वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू. खेळू. कुठेतरी फिरायला गेलो की दृश्य पाहत शांत बसूही. 

तुझ्यासोबत आम्ही दोघेही वर्षाचे आई-बाप झालो. तसं पाहिलं तर तू आईच्या पोटात असताना हालचाल केलीस की तुझी आई पटकन दाखवायची, परंतु बापाला ते अनुभवता येत नसल्याने तो अगतिक असतो. त्यावेळी मला इतकीही जास्त attachment नव्हती. पण तू जेव्हा माझ्या हातात आलास तेव्हा मी बाप झालो.   तुझ्या किलकिल्या डोळ्यांनी क्षणात नातं गडद केलं. मी तुझ्यात उतरलो. या नात्यात तू मला माझ्यापेक्षा लहान वाटत नाहीस. मित्रच वाटतोस. आणि तसाच राहील.

आता तुझं आयुष्य खरं सुरू होतंय. आत्ता पर्यंत फक्त हसणं आणि रडणं हीच तुझी नैसर्गिक शिकलेली भाषा आहे. आता या पुढे जगाचे शब्द शिकशील. तुझ्यामागे अपेक्षांचं टूमणं लावत नाही आता. पण कणूल्या... माझ्या छोट्याशा बाळा.... वर्षाचा झालास रे..!!

14 ऑगस्ट)
आज मी तुला कडेवर घेतलं होतं. तुझ्या आईने येऊन माझ्या दंडाला पकडलं आणि खांद्यावर डोकं टेकवलं. तर तू चक्क पझेसिव्ह झालास आणि तिला बाजूला ढकलत होतास. तिने मुद्दाम बाजूला न जाण्याचं नाटक केलं तर तिला तू चक्क चावायला लागलास. तसं पाहिलं तर हे योग्य नाही पण माझं बाळ माझ्या इतक्या क्लोज आहे हे कळण्यातला आनंद वेगळाच रे.! गिल्टी प्लेझर म्हणू शकतो.

15 ऑगस्ट)
आज तू आणि आई लोणीला गेला आहेस. मी एकटाच घरी आहे. खूप खाली खाली वाटतं रे घर तुम्हा दोघांविना.  वाचन, लेखन, पेटी वाजवणे अशा कित्येक गोष्टी करू शकतो मी पण तरीही त्या सगळ्यांत तुझ्या आठवणींची पोकळी राहतेच. कणाद तुझं असणं खूप भरून राहिलंय आयुष्यात. 

३० ऑगस्ट)
कणाद आपण गावी गेलो होतो तेव्हा तुझं जावळ काढलं. टकलू केलंय पूर्ण. खव्याच्या पेढ्यासारखा गोड दिसतोयस.

०३ सप्टेंबर)
सध्या तू खूप जोरात किंचाळतोस.. कानठळ्या बसाव्या एवढ्या जोरात. एवढ्याशा जीवात एवढा मोठा आवाज कुठून येऊन बसतो कुणास ठाऊक. पण जेव्हा भुभू, एखादा पक्षी किंवा कीडा तुझ्या समोर आला तर त्यांना उद्देशून तू इतका हळुवार आवाज करतोस की त्यापेक्षा मऊ आवाज दुसरा कुठला नसेल. बघ ना तुझी जन्मापासून भाषा किती बदलत आली. सुरुवातीला फक्त रडणे आणि हसणे एवढीच भाषा. काही हवं असेल तर रडणं आणि खूष झालं की हसणं बस्स..! इतकं सोप्पं..! आता आवाजाचे चढ उतार करणे ही तुझी भाषा. आणि एकच शब्द तुझ्या तोंडात असतो तो म्हणजे "अद्दा".. त्याचा उगम आणि अर्थ काही माहीत नाही, पण कोणाशी तुला काही बोलायचं असेल तर तेवढाच शब्द वारंवार बोलतोस. आता तुला आमचे काही शब्द कळतात. बॉल, टीव्ही, पाणी.. हे म्हटलं की बरोबर त्याकडे पाहतोस.  म्हणजे आता आपण एका समान भाषेवर हळूहळू येतोय. 
हे किती गमतीचं आहे पहा ना. आतातरी आपण एका भाषेत बोलत नाही पण आपला एकमेकांवर लावलेला जीव मात्र भाषा जाणत नाही.

06 Oct
खूप दिवस लिहिलं नाही इथे. तुझ्यामुळेच कदाचित. जेव्हा घरी येतो तेव्हा तू मला kidnap करून टाकतोस आणि मग दुसरं काही करता येत नाही. 

सध्या तू काहीबाही बडबड करत असतोस. त्यातले शब्द काही वेगळेच असतात. ते इथे लिहिताही येणार नाही इतके वेगळे उच्चार अस्तर. आणि इतक्या कॉन्फिडंटली बोलतोस की ती एक खरी वेगळी भाषाच आहे.  आम्हाला प्रचंड हसू येतं तू असा बोलत असतोस तेव्हा.

07 Oct
काल आईला द बॉक्स मध्ये नाटकाला पाठवलं होतं. आणि आपण दोघे बाहेर थांबलो होतो. तिथल्या वॉचमन काकांनी नेहमीसारखे  खूप लाड केले तुझे. 
तुला त्या बेबीबॅग मध्ये बसवून आज चक्क गाडी चालवून आलो. आपल्या दोघांची पहिलीच अशी ट्रिप. आता आपण दोघे कुठे बाहेर जाऊ शकतो.

15 Oct
आपल्याकडे ठेवायचा प्लॅस्टिकचा मोठा डब्बा आहे. तो तू दोन्ही हातांनी जोरात वाजवत असतोस. काल तू वाजवत होतास. मी तीन तालाचे बोल (धा धिं धिं धा..) म्हणायला सुरुवात केली आणि चक्क तू त्या ठेक्यात वाजवायला लागलास. इतका परफेक्ट की एकही बीट चुकली नाही. तुझ्यातला रिदम पाहून खूप सुखावलो. व्हिडिओही काढलाय आणि कौतुकाने सर्वांना पाठवला. पुढे तू कशात प्रवीण होशील माहीत नाही पण जे करशील त्यात असा परफेक्ट रिदम येवो.

३० ऑक्टोबर)

आता खूप हट्टी बनत चालला आहेस तू. उदाहरणे सांगायची तर... 

तुला आता लाईटची बटणे दाबायला आवडू लागली आहेत. मग तुला तिथे घेऊन उभं राहायचं. कितीवेळा तू बटण चालू बंद करतोस. माझा हात भरून येतो तुला घेऊन तिथे उभं राहायला मग मी तिथून जायला निघालो तर हात पाय झाडत रडायला लागतोस.

त्यानंतर काल मला चष्मा घ्यायला दुकानात गेलो होतो. तिथे तुला खाली रांगत फिरायचं होतं. सोडलं नाही तर अंग खाली झोकुन देऊन किंचाळत होतास. 

पण ठिक आहे.. आत्ताच्या तुझ्या या हट्टामुळे आम्ही खूप हसतोही. 

०१ नोव्हेंबर )
कणाद अजून तू उभा राहत नाहीस किंवा चालायला शिकला नाहीस. आमच्या मनात हा समजूतदारपणा आहे की जसं तू पालथं व्हायला, रांगायला शिकलास तसा हेही आपोआप शिकशीलच. पण तरीही आता कधी एकदा तुला चालताना पाहतोय असंही वाटतंय. जनरली मुलं एक ते सव्वा वर्षात चालायला लागतात. त्यामुळे काळजीही वाटते की काही प्रॉब्लेम तर नाही होणार? पण तू हेल्दी आहेस आणि पकडून पकडून खूप काही मस्ती करतोस, कशावरही चढतो उतरतोस हे पाहताना ती काळजी निघून जाते.

०९ नोव्हेंबर)
रात्री मी टीशर्ट सोफ्यावर टाकला होता. सकाळी चहा करताना आत किचनमध्ये उभा होतो. तू बाहेर टीव्हीवर गाणी बघत होतास. अचानक तू माझा एका हातात टीशर्ट घेऊन तसाच रांगत आत यायला लागलास. तुझी आई म्हटली हा बघ टीशर्ट घेऊन कसा रांगतोय. मी पाहायला तुझ्या जवळ आलो. मग तू गुडघ्यावर येऊन तो शर्ट माझ्याकडे देत होतास. तेव्हा मला कळलं की तुझं असं म्हणणं आहे की, "टी शर्ट घाल आणि मला बाहेर फिरायला घेऊन जा.." मला इतकं भावुक झालं ना रे... की माझ्याशी आता चक्क बोलायला लागला आहेस. आणि इतकं कधी कळायला लागलं तुला?

तरी तुझी आई म्हणालीच.." कणादचा बाबा पाघळतोय लगेच..  जाईल लगेच खाली घेऊन.."

मग गेलोच ना तुला घेऊन खाली..

२२ नोव्हेंबर
आज कार्तिकी एकादशी. पिंपरीमधल्या एका विठ्ठल मंदिरात पहाटे ४ ला काकड आरतीला गेलो होतो. जाताना तू झोपला होतास. थंडी असल्याने गुंडाळून घेतलं होतं अगदी.

तिथे गेल्यावर भजनाच्या आवाजाने तू उठलास आणि डायरेक्ट टाळ्या वाजवत नाचू लागलास. पहाटेचं ते शुद्ध वातावरण, भजनाचे सूर आणि इतका क्युट नाचणारा तू. सगळे तुझ्याकडेच पाहत होते. नंतर मग विठोबा रखमाईला अभिषेक घालताना तूलाही हात लावायला लावला. विठोबा रखमाईवरून हात फिरला तुझा आणि मला पटकन भरून आलं.

10 डिसेंबर)
आपण अभिदादाच्या मुंजीसाठी बूध या गावी आलो. पुसेगाव स्टॉपला उतरल्यावर आपण सेवागिरी महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. तेथे एका कमरेइतक्या मोठ्या कट्ट्यावर शंकराची पिंड होती. तुला तिथे खेळतायेईल म्हणून ठेवलं आणि मी तुझे फोटो काढू लागलो. इतक्यात तू गपकन रांगत रांगत कट्ट्याच्या कडेला आलास पण.... आणि तू पडणार असं मला वाटेपर्यंत तुझा तोल पण गेला. मी क्षणात हात सरसावला आणि तुझा खांदा माझ्या हातात सापडला. तुझं डोकं फरशीवर टेकलेलंच होतं इतक्यात तुला उचलून घेतलं. हार्टबिट्स प्रचंड वाढले होते. तू जोरात रडत होतास. कुठे लागलेलं तर दिसलं नाही. 
तुला गप्प करत नेऊन मंदिराच्या सभामंडपात दुसरीकडे सोडलं आणि तिथे चक्क तू पुन्हा खूष होऊन खेळू लागलास.
तुझं आत्ताचं वय असं आहे की कुठलाही आनंद आणि दुःख चिरकाळ टिकणारं नसतं. 
आवडती गोष्ट दिसेनाशी झाली तरी काही क्षण रडून तू मूव्ह ऑन होतोस. मोठा झाल्यावर असंच मन असेल ना तर अजून समतेत राहतं माणूस.


१४ डिसेंबर)
काल तुला तीन वॅक्सिन दिले. एक दंडात आणि दोन्ही मांडीत एकेक. त्यामुळे आज तुला खूप ताप पण आला होता. नेहमी हसतमूख असणारा तू आज खूपच केविलवाणा वाटलास रे. कण्हत होतास. मांडीला चुकून हात लागला तरी रडायचास. तुला तसं पाहून खूप भरून येत होतं. त्रास होत होता म्हणून, रात्री झोपतही नव्हतास. मग माझ्या मांडीवर दीड तास घेऊन बसलो आणि तेवढ्यात तुझी छान झोप झाली. खूप खूप बरं वाटलं तुला झोपलेलं पाहून.

लस ही अशी गोष्ट आहे ना रे की माहिती असतं की बाळाला त्रास होणार आहे परंतु आयुष्यात ती खूप गरजेची गोष्ट आहे. खूप धर्मसंकट असतं खरं तर.

२० डिसेंम्बर)
काल आपल्याकडे संतोष मामा आणि प्रितामामी आले होते. तुला त्यांनी एक चालणाऱ्या कुत्र्याचं खेळणं दिलंय आणि तुला ते प्रचंड आवडलेय.

काल तू घोड्यावर स्वतः पाय टाकून बसलास आणि उतरलास पण. ही खूप मोठी achievement आहे.

10 जानेवारी)

आज सकाळी तुला एक पावाचा तुकडा खायला दिला. एक तुकडा तू व्यवस्थित हातात घेऊन खाल्लास आणि शेवटी एक तुकडा तू पायाचा चिमटीत पकडला आणि तसा पायाने खाल्लास.. हसून हसून पुरेवाट झाली.. experiment किती करावे याला काही सीमा नाही तुझ्या जगात.

14 जानेवारी)

मी इंदोर आणि भोपाळ ट्रिपवर असल्याने तू आणि आई लोणीला होता. मी घरी परतलो आणि आज तुम्हाला कधी एकदा भेटतो असं झालेलं. दुपारी बाईकवरून निघालो. मध्येच युट्युबवर काहीतरी लावण्यासाठी थांबलो आणि पाहतो तर आई ने तुझ्या चालण्याचा, तुझ्या पहिल्या पावलांचा व्हिडिओ पाठवला होता.

त्यात लिहिलं होतं की , "बाळ दोन तीन पावलं टाकू लागलंय...पण त्याचबरोबर त्याला आता "बाळ" नाही म्हणता येणार या विचाराने मला कसंसंच व्हायला लागलंय अरे. इतके दिवस आपण एकमेकांना दाखवत नसलो तरी त्याच्या चालण्याविषयी किती काळजी लागली होती आपल्याला. वॉकर आणला, वाजणारे बूट आणले...फारसा उपयोग नाहीच झाला. हा त्याचा अठरावा महिना. कणादने आज बऱ्याच वेळा 2-4 पावले टाकली तर मन अगदी फुलून गेलंय. 🤗
फार मनसोक्त रांगून घेतलं त्याने.  दुडूदुडू रांगत आला की "हे छोटं मनी माऊ कुठून आलंय" म्हणत , ती गोड क्षणचित्रे मेमरीत स्टोअर होऊन राहिली आहेत... त्याचं हे दीर्घकाळ चालू असलेलं रांगणं अविस्मरणीय आणि हृदयाच्या कप्प्यात कायमचा लॉक करून ठेवलेला सुखद सोहळा असणार आहे.❤️"

तिनं हे लिहिलेलं वाचलं आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहायला लागलं. त्यात अत्युच्च आनंद, गोड अस्वस्थता सगळं होतं. काही केल्या बांधच घातला जात नव्हता. म्हणजे मागचा एक महिना तुझी काळजी वाटत होती खूप. मनात असाही विचार यायचा, की तू चालायला विसरलाच तर? तुझ्या मनात ते इंड्यूसच नाही झालं तर? आणि मग पून्हा hopes आणायचो. आणि पुन्हा आनंदी व्हायचो.

पण आज असं वाटलं की एका क्षणात खूप मोठा झालास. परवा भोपाळमध्ये मी मानव संग्रहालय पाहत होतो ज्यात मानवी उत्क्रांतीचे टप्पे होते. मला वारंवार तुझी आठवण येत होती. मानवी उत्क्रांतीसारखे आधी जलचर, पून्हा सरपटणारे, पुन्हा चार पायावर रांगत, पुन्हा दोन पायावर आलेला प्रगत मानव. आज तू आयुष्यातला खूप मोठा टप्पा गाठलास. आणि माझ्या भावनांनी अजून हळूवारतेचा टप्पा गाठला.

27 जानेवारी
खूप दिवस स्ने म्हणत होती की बाळाला सोडून कुठे एकटीला जाता येत नाही. मलाही वाटलंच की आई म्हणून किती अडकून राहावं लागतं तिला. मी 2 दिवस म्हटलं तरी कुठेही जाऊन येऊ शकतो. पण ती दिड वर्षात एकटी मनसोक्त कुठेच फिरली नाही. मग म्हटलं 26 जानेवारीला मी कणादला सांभाळतो, तू ये फिरून. तिने फूरसुंगीला शॉपिंगला जायचं ठरवलं. 

कणाद... तुला सोबत घेऊन, आईला बसस्टॉप पर्यंत सोडायला आलो. ती बसमध्ये बसून निघाली आणि मला काहीसे नर्व्हस वाटू लागलं. तुला आत्तापर्यंत मी जास्तीतजास्त 2-3 तास एकट्याने सांभाळले असेल. तुला मी आवडतो त्यामुळे तू व्यवस्थित राहशील याची खात्री होतीच, पण थोडं टेन्शनही होतं. तुला आईची आठवणच आली. रडायलाच लागलास तर काय करायचं. तुला दुपारी झोपवायला जमेल का वगैरे वगैरे मनात घोळत होतं. पण तुझ्याशी खेळता खेळता जसा तासभर गेला ना तसा कॉन्फिडन्स आला. मोबाईल फक्त 10-15 मिनिटेच दिला. दूध भाकरी खाऊ घातली. साडे तीन वाजता मस्त झोपवलं. इतकं सगळं करता करता तुझ्याविषयी खूप प्रेम दाटून येत होतं आणि तुझी आई आणि बाप दोन्ही झाल्यासारखे वाटलं रे.

तू अजिबात त्रास दिला नाहीस की हट्टी वागला नाहीस. तू खूप शहाणं बाळ आहेस. 

१३ फेब्रुवारी)
तुला डे केअर मध्ये ठेवलं होतं अर्धा तास. तू तिथे असेपर्यंत आई आणि मी चहा प्यायला गेलो. खूप कसंतरी वाटत होतं तुला सोडून जाताना. नंतर तिथे फोन करून विचारले की तू रडतोयस का, तर ते म्हणाले अहो छान खेळतोय इथे कणाद. मग खूप रिलॅक्स झालो. आणि आम्ही चहा एन्जॉय केला.

१४ फेब्रुवारी)
आईने दुपारी ४ वाजता तुला डे केअर मध्ये सोडलं आणि मी संध्याकाळी ६ वाजता घ्यायला आलो. मला पाहून मुसूमुसू रडायला लागलास आणि पटकन जवळ आलास. 

१५ आणि १६ फेब)

दोन दिवस झाले तुला 2 तास डे केअर मध्ये ठेवतोय. मी सकाळी ऑफिसमध्ये जाताना ठेवतो आणि आई 1 वाजता घेऊन येते. 

१७ फेब्रुवारी)
आज मी ऑफिसला लेट जाणार होतो. मग तुला डे केअरला सोडले. आज पहिल्यांदा सोडून जाताना रडू लागलास. खूप कसंसंच वाटलं रे निघताना. पण घट्ट मन करून निघालो. पण पुन्हा लगेच 1 तासात न्यायला आलो. तिथे बाहेरून कडी वाजवल्यावर त्यांनी विचारले,"कोण आहे?" मी म्हणालो, "कणाद चा बाबा.." तेवढं ऐकताच तू आतून जोरात भोंगा।पसरलास. तुला माझा आवाज ओळखू आला हे पाहून खूप प्रेम आलं. नंतर मग तू जोरात रडत रडत येऊन बिलगलास. खूप भरून आलेलं मलाही.

तू तिथे असताना शांतपणे खेळतो असं त्या मॅडम सांगतात. पण तू आतून घाबरलेला किंवा बावरलेला असतोस का हे कोडं आहे माझ्या मनात. कारण लहानपणी मी कुठे एकटा राहिलो की मला अजिबात करमायचे नाही आणि आतून घाबरल्यासारखं वाटायचं. Sorry कणुल्या तुला काही त्रास झाला असेल तर. पण तूला थोडं वेगळं वातावरण मिळावं. Socialize व्हावंस म्हणून तिथे ठेवतोय.

१८ फेब्रुवारी)
तू चालत नव्हतास तेव्हा कधी एकदा चालतोस असं झालेलं. आणि आता एवढं चालतोस की आता तू रांगत नाहीस हे तुझी आई खूप मिस करते.😄

२० फेब्रुवारी)
युट्यूब वर जी गाणी ऐकतोस. त्यातल्या 1-2 गाण्यावर आता तू तशी action पण करायला लागलायस. Wheels on the bus go round round and round हे गाणं म्हटलं की तू हात असा round round फिरवायला लागतोस. Doors on the bus go open and shut म्हणताना त्याप्रमाणे दार उघड बंद झाल्याची action करतोस. Moms on the bus go shh shh shh हे करताना तोंडावर बोट ठेवतोस ते इतकं cute वाटतं ना.!! Tv वर लागलेल्या गाण्यात कुणी by by केलं की तू पण करतोस. या जगातली समज येण्याची ही एक पहिली खूण म्हणावी लागेल.

२२ फेब्रुवारी)
आता टाटा कर म्हटलं की तू नाजूकशा आवाजात आ~~~य (हाय) करत हात हलवतोस. आणि flying kiss देताना तोंडावर हात आला की पप्पी दिल्याचा आवाजही करतोस. आधी flying kiss ची action करताना तू बोंबलल्यासारखं हात जोरात तोंडावर मारायचास. पण आता तू पप्पी दिलीस की माणसाला जाऊ वाटणार नाही इतकं cute वाटतं. 

आता तुझा पुढचा टास्क म्हणजे गालावर पप्पी देणे..

२६ फेब्रुवारी) 
काल तुला खूप उलट्या होत होत्या. रात्री साडे अकराला दवाखान्यात नेलं. पण उलटी झाल्यावर तू नॉर्मल खेळायला लागायचास. 

२७ फेब्रुवारी)
अजून जुलाब आहेतच तुला. याआधी तू औषध इतकं छान घ्यायचास की बाटली माझ्याकडे आणून यातलं औषध दे म्हणायचास. पण काय झालंय कुणासठाऊक. या आठवड्यापासून औषधाची बाटली पाहिली तरी लांब पळतोयस. औषध पाजताना खूप रडतोस. पण पर्याय नाही ना रे आमच्याकडे.

२८ फेब्रुवारी)
आज आईने तू केलेली एक गंमत सांगितली. Gems गोळ्यांचं पाकीट फोडून तिला त्यातली एकच गोळी काढून द्यायची होती. पण चुकून सगळ्या खाली सांडल्या. तिने त्या वेचेपर्यंत गप्पकन तू 3 गोळ्या तोंडात टाकल्यास. आईने मग त्या गोळ्याच लपवून ठेवल्या. आणि नंतर त्या पाकिटाचा फाडलेला एक कोपरा सापडला तुला सापडला, तो तुकडा आईकडे नेऊन या गोळ्या दे म्हणून रडत होतास. ते ऐकून खूप हसलो मी..😝 तुला अजून बोलता येत नाही पण कसं सांगायचं हे पक्के माहीत आहे तुला. 

त्यांनतर रात्री दुकानात गेलो होतो. तिथे धुण्याचा साबण विकत घेतला. बाकी सामान घ्यायचं बाकी होतं. पण तुला तो साबणच हातात घ्यायचा होता. तोंडात घालशील म्हणून तो तुला द्यायचा नव्हता. पण रडून हट्ट करून घेतलासच तो. मग तो घेऊन तू पूर्ण दुकानात फिरत होतास. निघताना तो तुझ्या हातातून घेऊन बॅगमध्ये ठेवला तर इतक्या जोरात भोंगा पसरलास की बस्स..! तू रडताना कधी हसू येत नाही मला पण यावेळी तुझा हा हट्टी भोंगा पाहून मी जाम हसलो.















- तुझा बाबा


©विशाल पोतदार

No comments:

Post a Comment