.post img {

Automatic Size

Tuesday 29 September 2020

सुंगी मुंगीची गोष्ट (भाग 1)

 एक ना, सुंगी नावाची मुंगी होती.. तिच्या सर्व मैत्रिणींमधे हिची शरीरयष्टी अगदीच तिडतीडीत. गी साखरेच्या दाण्यापेक्षाही लहानगी,पण भलतीच खोडसाळ मुंगी. किरकऱ्या स्वभावामुळे संकटांना सहपरिवार आमंत्रण देणारी. धाडसी खेळांमुळे बऱ्याचवेळा मरणाच्या दारातून तशी वाचली होतीच. अहो, यमराज जरी समोर उभे ठाकले असते, तरी त्याच्या रेड्याच्या कानात कडकडून चावा घेऊन पळवून लावलं असतं तिने. 

काल तर ती गजब संकटात सापडली. तर झालं असं. एका बलदंड बाईच्या घरी, किचनच्या फटीत मुंग्यांचं वास्तव्य होतं. ती बाई रोज धडाम धुडूम वाजवतच कामं करायची. मुंग्या बापड्या तिचा हात, पाय चुकवत कसंबसं आपलं उदरभरणाचं काम पार पाडीत. पण ती बाई अधूनमधून विषारी खडू मारून मुंग्यांना मारायचं काम करी. खडूच्या वासाने कितीतरी मुंग्या आपल्या प्राणाला मुकत. आज सुंगीसुध्दा त्या खडूवरून जाता जाता वाचली. त्या बाईच्या रागाने तिच्या मनात आता 'बदला घ्यायची' खूणगाठ पक्की झाली. कसंतरी करत, ती बाईच्या हातावरून मानेवर पोहचली. आणि सर्व ताकदीनिशी कडकडून चावा घेतला. चावून विजयाच्या खुषीत पुढचे पाय उचलणार, तोच बाईने तिला जोरात झटकले.

सुंगी उडून हवेतच पाच सहा कोलांट्या उड्या खात शेगडीवर ठेवलेल्या पातेल्याच्या काठावर पडली. सामान्यतः संकटातून वाचल्यावर आपला जीव भांड्यात पडतो, इथे मात्र सुंगी भांड्यात पडल्याने जीव वाचला. त्या बाईने शेगडी पेटवली आणि मान चोळतच हॉलमधे जाऊन टीव्हीपुढे बस्तान मांडलं. सुंगीला वाटलं, पटकन इथून बाहेर उडी घेऊ आणि घरी जाऊन बसू. पण तेवढ्यात पायाला चटके बसू लागले. आता मात्र तिला येऊ घातलेल्या गरम संकटाची जाणीव झाली. थोडं खाली यायचा प्रयत्न करू लागली पण जास्तच चटका बसू लागल्यावर, ज्या वेगानं खाली जात होती त्याच्या दुप्पट वेगानं वर आली. पुन्हा पातेलेच्या कडेवर विराजमान. 

आता मात्र उष्णता वाढत होती आणि बाहेर पडण्याची पटकन आयडिया काढणं क्रमप्राप्त होतं. त्या कडेवरून एकदा तिने पूर्ण फिरून कुठून उतरता येतंय का ते पाहिलं. उडी मारायचा विचार, खाली शेगडीच्या ज्वालेकडे पाहूनच गिळला. पायाला जास्तच चटके बसू लागल्यावर, आता मात्र ती रडकुंडीला आली.  

इतका वेळ सुटकेसाठी पातेल्याच्या बाहेर पहात होती, पण रडताना सहज तिची नजर पातेल्याच्या आत पडली. विस्तीर्ण असं पांढरं शुभ्र पटांगण पसरलं होतं. त्यावर काही बुडबुडे तर कुठे सुरकुत्या दिसत होत्या. तिच्या मनात आलं, "मरायचंच आहे तर त्या पांढऱ्या पटांगणातच मरू."  मनात मुंगीदेवीची प्रार्थना केली आणि त्या पातेल्यात घेतली एकदाची उडी. खाली पडेपर्यंत हवेत ऊब जाणवली आणि काही क्षणातच त्या मैदानात उतरली. खरं तर ते पटांगण गादीसारखं मऊ मऊ होतं. इवलेसे पाय हलकेसे रुतून गुदगुल्या होत होत्या. मघापासूनच्या त्रासाचा थोडाफार का होईना विसर पडला.

 तिथे फिरताना मात्र तिला जाणवलं की जितकं मधोमध राहू तेवढा गरमपणा कमी वाटतोय. आता असेही आपल्यासोबत जे काही घडेल त्याची वाट पाहत राहणे हेच तिच्या हाती होतं. पण हळूहळू गादी जास्तच गुबगुबीत होऊ लागली. सुंगी स्वतःवरचं संकट विसरून त्या गादीवर पळत येऊन घसरणे, उड्या मारणे, लोळणे, डोक्यावर उभं राहणे इत्यादी खेळात रममाण झाली. खेळता खेळताच तिनं गादी चाखून पाहिली तर जामच चविष्ट लागली. आजपर्यंत तिनं इतकं चवदार असं दुसरं काही खाल्लं नव्हतं. मग काय? आवडतंय म्हटल्यावर हिने ती गादी खायला सुरुवात केली. थोडं खाल्ल्यावर पडलं ना छिद्र. त्या छिद्रातून धुरासारखं काहीतरी बाहेर येऊ लागलं. आत काय आहे हे डोकावून पाहताना, आतल्या पांढऱ्याशुभ्र गरम पाण्यात तिचा पाय गेला. त्यात पडून गटांगळ्या खाणार, इतक्यात तिनं कसाबसा तोल सांभाळला. आता मात्र ती मधे येऊन गपगार बसली. स्वतःच्या बालिशपणाची कीव आली. इतक्या मोठया संकटात आपला खाण्याचा मोह सुटेना याचा रागच आला. तिला ह्या पटांगणाचं कोडंच सुटत नव्हतं. मऊ पटांगण.. त्याच्या खाली उकळतं पांढरं पाणी...सगळं काही विचित्रच होतं.

आता तिनं शांत पवित्रा घेतला. यातून वाचायचं असेल तर संधीची वाट पाहावी लागेल. छोटीशी देखील संधी सोडता कामा नव्हती. ती चारी बाजूला बारीक लक्ष ठेऊन बसली. आता तिच्या मनातला अल्लड, आताताईपणा जाऊन समंजस, धाडसीपणा रोवला जात होता. काही वेळ शांतपणे गेला. अचानक काहीतरी अजबच घडायला सुरुवात झाली. आतून कुणीतरी ढकलल्यासारखं पटांगण मधोमध फुगू लागलं. फुगलेल्या पटांगणासोबत सुंगी जशी वर येत होती तसे भीतीने पाय लटपट कापत होते. तो अजस्त्र फुगवटा फोडून आता काहीतरी बाहेर येणार आणि तिला खाणार असंच वाटू लागलं. पण सुंगी आता हार मानणार नव्हती. एक पाय टेकवत दुसरा पाय उचलत ती तग धरून राहिली. एका क्षणी ती पटांगणासोबत इतकी वर आली की आजूबाजूचं सर्वकाही दिसु लागलं. तेवढ्यात हॉल मधून बलदंड बाईदेखील पळतच आली. सुंगीने तोल सावरत वेगानं पातेल्याच्या बाहेर जीवानिशी उडी घेतली. काहीक्षण ती हवेतच होती. खाली कुठे पडणार..? जिवंत राहणार की मरणार..? काही सांगता येत नव्हतं. पण वाचण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद मात्र होता. 

शेवटी तो क्षण आला जेव्हा ती शेगडीशेजारच्या डब्यावर दोन तीन कोलांट्या घेत पडली. त्या बाईने धावत येऊन शेगडी बंद केली आणि नवऱ्याला खेकसली, "अहो.. दूध उतू गेलं. . एखादं काम ही धड करता येत नाही बाई या माणसाला."

सुंगीचा आनंद त्या किचनमध्ये मावत नव्हता. लंगडत लंगडत घर गाठलं. दाराशीच आई बाबा उभे होते. आता ती पुन्हा लहानगी होऊन रडू लागली. बाबांनी तिला जवळ घेतलं, "कुठे होतीस गं सुंगे? तुला शोधण्यासाठी आम्ही किचनमधला डबानडबा धुंडाळला बघ." 

बाबांच्या कुशीत रडता रडताही सुंगीच्या डोळ्यातून हसू ठिबकत होतं. आणि एवढं होऊनही शहाण्या मुंगीसारखी गप्प बसेल, ती सुंगी कसली? तिच्या मनात अजून 'फक्त' एकदाच आपल्या खास मैत्रीण बुंगीलाही पटांगणावरचा फुग्यावर हुंदडायचं आणि त्यावर ताव कसा मारायचा याची आखणी तयार होऊ लागली.


 

No comments:

Post a Comment