.post img {

Automatic Size

Thursday, 10 December 2020

108 अंकाचे अध्यात्मातील महत्व

#विशालाक्षर
#108_अंकाचे_महत्व

नमस्कार मित्रहो..

धार्मिक विधींमध्ये परंपरेने चालत आलेले बरेच नियम आपण ऐकतो. पण 'हे असंच का?' हा प्रश्न मनात नेहमी डोकावायचा. म्हणूनच अशा प्रश्नांचा मागोवा घेण्याचा माझा हा प्रयत्न.  

आजचा आपला विषय आहे 'अध्यात्मामधे १०८ या संख्येचे महत्व'.  

कळते झाल्यापासून आपण हे ऐकतो आहोत, की ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करा, मंदिराला १०८ प्रदक्षिणा घाला, यज्ञात आहुती 108 वेळा द्यावी लागते. जप माळही १०८ मण्यांची असते. पण १००, १०१ का नाही? १०८ वेळाच का? हा प्रश्न मलाही खूप सतावत होता. मग इंटरनेटवर बरीच शोधाशोध केल्यावर हळूहळू त्याचा उलगडा होऊ लागला. आणि या आकड्याचं महत्व जेव्हा समजलं तेव्हा मी अक्षरशः अचंबित झालो.

तर १०८ ही संख्या खालील गोष्टींमध्ये आपलं अस्तित्व राखून आहे.

१) शरीर :-
अ) सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या एका लेखाच्या संदर्भानुसार, आपल्या शरीरात ७२,००० नाडी असून, त्या ११४ ठिकाणी एकमेकांना छेदतात. त्यांच्या छेदण्याच्या स्थानास चक्र असे म्हणतात. त्यातील २ चक्रे तुमच्या शरीराच्या बाहेर असतात, ४ चक्रे स्वयं चालतात. आणि राहिलेल्या १०८ चक्रावर तुम्हाला काम करावं लागतं.

२) नृत्य -
अ) शिव तांडव नृत्यामध्ये १०८ करणे म्हणजेच नृत्यस्थिती असतात. 

३) 'एक शून्य आणि आठ' हे अंक एकटे असताना एक म्हणजे अद्वैत, शून्य म्हणजे निर्वात पोकळी आणि आठ म्हणजे अनंत दर्शवतात म्हणूनच ते एकत्र मांडल्यावर ब्रह्मांडाचं सत्य आपल्यासमोर ठेवतात. म्हणजेच 'एक अनंत पोकळी.'

४) खगोलशास्त्र:- 
अ) सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सूर्याच्या व्यासाच्या १०८ पट आहे.
ब) चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे
क) सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट आहे.

माहितीसाठी-
सूर्य व्यास- १३.९२ लाख km
पृथ्वी व्यास- १२,७४२ km
चंद्र व्यास- ३,४७४ km
सूर्याचे पृथ्वीपासून अंतर- १५ करोड km
चंद्राचे पृथ्वीपासून अंतर- ३.८४ लाख km

ड) आपले दृष्य आकाश २७ नक्षत्रांमध्ये विभागले आहे. आणि प्रत्येक नक्षत्र चार पदांमध्ये विभागले जाते. म्हणजेच आपल्या आकाशाचे  (२७X४) १०८ भाग होतात. 

भलेही किलोमीटर, मैल ही आपण तयार केलेली परिमाणे असली तरी अंतर हे शाश्वत आहे. आपण असंही म्हणू शकतो सूर्य त्याच्या आकारानुसार पृथ्वीपासून १०८ पट दूर आहे, तसेच चंद्र पृथ्वीपासून १०८ पट दूर आहे. त्या exact अंतरामुळे पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत आहे किंवा चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे. पृथ्वी आणि सुर्यातले अंतर थोडे जरी कमी झाले किंवा वाढले तर जीवसृष्टी नष्ट होऊ शकते. १०८ या अंतरामुळे  विश्वात समतोल टिकून आहे असं म्हणू शकतो. अजून एक गोष्ट, सूर्याच्या ऊर्जेमुळे पृथ्वीवरील जीवन आहे तसेच चंद्र देखील पृथ्वीवरील जीवनाचे काही प्रमाणात नियमन करतो. सूर्य हा ईश्वराप्रमाणे आहे. भौतिकदृष्ट्या इतक्या अंतरावर की तिथे पोहचणे कदाचित अशक्यप्राय असेल किंवा पोहोचू तेव्हा ती ऊर्जा आपणास सहन करण्याची क्षमताही नसेल. पण इतक्या अंतरावरून तो इथल्या जीवांना जगण्याची ऊर्जा देतोय. तयार अन्न न देता, ते तयार करण्यासाठी फक्त ऊर्जा देतोय. प्रयत्न आपणालाच करावे लागतात. आणि रात्रीच्या कठीण समयी जेव्हा आपण त्यापासून दूर असतो तेव्हा त्याच पटीत पण खूपशा जवळ चंद्र आहे जो सूर्याची उर्जा काही प्रमाणात का होईना आपल्या पर्यंत पोहचवतो. तो चंद्र आपले गुरू, साधू संतांचं प्रतिक आहे.

जरी आपण भौतिक दृष्ट्या देवाला नाही पाहू शकलो तरी भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे, 'त्याची ऊर्जा विश्वाच्या कणा कणातून वाहतेय.' फक्त त्याची आपल्याला जाणिव होणं गरजेचं आहे. त्यासाठी मन एकाग्र करून ईश्वराचे स्मरण करणे गरजेचे आहे, तेही समतोल साधणाऱ्या परिमाणात. म्हणजेच १०८ वेळा. पण जशी पृथ्वी एकच प्रदक्षिणा घालून थांबली नाही. हजारो, लाखो, करोडो वर्षे तीची भक्ती चालूच आहे. तशी आपली भक्ती अखंड हवी.

जपमाळेचा आपण मंत्र गणतीसाठी उपयोग करतो. त्यामुळे आपल्याला अंकाकडे लक्ष न देता मंत्रोच्चारणात चित्त लागते. माळ जपताना सुरुवातीपासूनच मन इकडे तिकडे भटकायला लागते. पण तुमच्या नकळत तुमचा मंत्रजप चालूच असतो. स्वतःच्या मनावर चिडचिड न करता मन पुन्हा जपावर आणावे. हळूहळू ते प्रत्येक उच्चारात रमू लागेल. आपण जेव्हा डोळे झाकून जपमाळ ओढत असतो त्यावेळी जपाचा आकडा आपल्याला माहीत नसतो. त्यावेळी १०८ जप कधी पूर्ण होईल हे मनात अनिश्चित असते जणू. मग जवळपास अर्धी माळ म्हणजे (५०-५५) झाल्यावर, असं वाटू लागतं की एव्हाना संपायला हवा होता जप. ती एकाग्रता तुटून मन चंचल होऊ लागते आणि डोळे उघडून पाहिले तर माळ अर्धीच झालेली असते. त्यावेळी मनाच्या असंयमीपणाची कीव न करता पुन्हा परत जपावर आलो. यावेळी मात्र मन मंत्रात रुजू होऊ लागते. माळ संपता संपता ते अधिक एकरूप होऊ लागते. आणि जेव्हा 108 वेळा जप पूर्ण होतो त्यावेळी मात्र त्याची गणना बंद करून अधिक खोल जाऊन मंत्रपठण करू वाटते. त्यावेळी जप गणन बंद केलंत तरी चालेल कारण तुम्ही एकेक पाऊल करत १०८ पाऊले टाकून ईश्वराच्या उर्जेमध्ये स्वतःला समाविष्ट करू लागला आहात. त्यानंतर होणारं भगवंताचे ध्यान आणि त्याच्याशी होणारा योग इतका खोलवर असेल की अद्वैत(१) होऊन एका पोकळीतून (०) अनंताकडे (८) धाव घ्यावी.

पण हा जप केल्यावर एका दिवसात लगेच चमत्कार होऊन सगळ्या मागण्या पूर्ण होतील असाही समज करू नये. त्यातला प्रत्येक उच्चार जेव्हा मनातून येईल, त्यावेळी एक मनःशांती, मनोबल नक्कीच मिळेल. त्या भक्तीत देव कोपेल या भीतीपोटी दिलेली खंडणी नसावी तर त्याला प्रेमाने दिलेली साद हवी. नाहीतर अगदी चंद्र सुर्याचेही अंतर जाणणाऱ्या आपल्या महान ऋषींनी केलेल्या अभ्यासाचं काहीच चीज होणार नाही. मग चला तर, डोळसपणे भक्ती करून आपलं मन भगवंताच्या चरणी अर्पू.

टीप- आपले अभिप्राय किंवा सूचना कमेन्ट बॉक्स मध्ये कळवा. कृपया हा लेख लेखकाच्या नावासहित शेअर करावा ही विनंती.

©विशाल पोतदार (संपर्क- 9730496245)

1 comment:

  1. खूप छान लिहिले आहे. नवीन माहिती मिळाली.

    ReplyDelete