.post img {

Automatic Size

Friday, 29 March 2024

कणादच्या बाबाची डायरी (२)

१२ मार्च)

आज पहिल्यांदाच तुझे केस कापले. म्हणजे जावळ काढले होते तेव्हा तुला इतकं काही कळत नव्हतं. आणि नाव्ही काकांनी पटकन मशीन ने कापले होते त्यामुळे रडला नव्हतास.

आज तिथे सलोनमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या दवाखान्यात पाऊल ठेवल्यासारखे तुझ्या चेहऱ्यावर डिफेनसिव्ह भाव आले. आणि जसे त्यांनी कात्री काढली तसा तू भोंगा पसरलास. मग तुझं डोकं दाबून धरून 10 मिनिटात कसेबसे केस कापले बाबा. तू खूप रडलास आणि प्रत्येक सेकंद माझ्यासाठी खूप अवघड होता.

पण पहिल्या वाहिल्या हेअरकट नंतर हिरो दिसतोयस आता. 


२९ मार्च)
मी कामानिमित्त भरुच (गुजरात) मध्ये आलोय. तुझी खूप आठवण येतेय. विशेषतः तुला जवळ घेऊन मिठी मारण्याची.

पण मी नसल्यावर मल तू मिस करत नाहीस (अजूनतरी).म्हणजे घरी मी जवळ असतो तेव्हा माझ्या मागे लागतोस पण मी बाहेरगावी असल्यावरही तू ओके असतोस. पण बापाची किती वेडी आशा असते बघ ना! असं वाटतं की मी असा बाहेर असताना, तू फोनवर म्हणशील... बाबा कधी येतोयस परत? आठवण येतेय तुझी...


३० मार्च)
आज मी घरी परत आलो. कधी एकदा तुला मिठीत घेतो असं झालेलं. मग आईने दार उघडलं आणि मला पाहिले तसा तू पळतच आलास. पायाला मिठी मारून पायालाच पप्पी दिलीस. आणि उचलून घेतल्यावर मग खूष झालास. त्यानंतर मग खांद्यालाही पप्पी दिलीस. अरे तुला चॉकलेट मिळाल्यावर किती खूष होतोस की नाही तेवढाच मी खूष झालेलो त्यावेळी...❤️

४ एप्रिल)
माझं wallet खेळायला घेतोस ना तेव्हा त्यातल्या नोट्स आणि कार्ड्स माझ्याकडे एकेक करून आणून देतोस. मी मग आनंदात हात नाचवत म्हणतो, "अरे वाह.. अरे वाह..मला दिलं... मला दिलं.. कणादने मला दिलं..." आणि हे तुला खूप आवडले. म्हणजे तुला वाटलं की मी काहीतरी छान गोष्ट बाबाला देतोय आणि बाबाला ते खूप आवडले. मग आता मला तू काहीही दिलंस तर मला तूच हात नाचवून तसं म्हणायला सांगतोस. आणि मी तसं केलं की मग खूष होतोस.

६ एप्रिल) 
माझं लक्ष नसेल आणी तुला जर मला बोलवायचं असेल तर मग तू "अद्दा.. अद्दा... " अशी हाक मारून बोलावतोस. ही मला तू मारलेली पहिली हाक. आता बाबा म्हणशील तेव्हा।म्हणशील.

१० मे)
तू 8-9 महिन्यांचा असल्यापासून मीच अंघोळ घालतो. आधी खूप छोटा होतास तेव्हा शांतपणे अंघोळ घालून घ्यायचास. आता तुला पाण्यात खेळायचं असतं. त्यात मग मध्ये पाणी भरून ओतून घ्यायचे. नळाचे तोंड दाबून पाणी उडवायचे. पाण्याचा मग भरून माझ्या अंगावर पाणी ओतायचं. हे असे खेळ चालू आहेत. आणि अंघोळ झाली तरी बाहेर यायला नाही म्हणतोस मग कसंबसं बाहेर काढतो.

आणि हो.. हा पूर्ण महिना थंड पाण्याने अंघोळ करतोयस. एकदाही अजिबात सर्दी झाली नाही.


२२ मे)
सध्या तू हातात फोन घेऊन आणि कधीकधी हातात जे असेल ते कानाला लावून फोनवर बोलल्याचं नाटक करतोस. तुला हॅलो म्हणता येत नाही मग तू "आऊ... आऊ" म्हणत असतोस. आणि ते इतकं क्यूट असतं की बस्स..!

३१ मे)
काल मी मुंबईहून मनूताईला घेऊन आलो पुण्यात. आल्या आल्या तू मोबाईल घेऊन बसला होतास त्यामुळे मी आल्यावर नेहमीसारखा बिलगला नाहीस. पण काहीवेळाने मी खाली बसल्यावर शांतपणे मांडीवर डोकं टेकवून पडला होतास. काहीही हालचाल नाही. इतकं शांतपणे की मीही तुझी कंपनी एन्जॉय करत होतो.

१० जून)
ज्या गोष्टी केल्यावर आम्ही दोघे चिडतो किंवा तुला रागवतो, त्या गोष्टी तू मुद्दाम चिडवण्यासाठी करतोस आणि ओरडल्यावर हसत पळून जातोस. उदाहरणार्थ - फ्रीज उघडणे, मोबाईल घेणे, रिमोट घेणे.

आणि तू पळून जाऊन लपून बसतोस. एक तर तू अशा जागी लपून बसतोस की तिथून पूर्ण दिसत असतोस. पण तू नजर चोरतोस आणि मग तुला वाटतं की आपण पाहत नाही म्हणजे दिसणारच नाही..

किती सुख आहेस रे तू... आम्ही दोघेही किती वेळा त्यासाठी नशीबवान समजतो.

२० जून)
आता तुला काही हवं असेल उदा. पाणी, खाऊ किंवा बेडवर खेळायला जायचंय, तेव्हा तू जवळ येऊन माझं बोट पकडतोस आणि उठायला सांगतोस. मग मी उठतो. तू बोट न सोडता तसेच मला जे हवं तिकडे नेतोस. त्यात इतका हक्क असतो ना रे. आणि तू बोट हातात घेऊन नेतोयस हे feeling इतकं छान असतं की मला कितीही कंटाळा आला असला तरी तुझ्यासोबत येतोच.

३ जुलै)
आपण लोणीमध्ये आलोय. इथे एक मांजर आलेलं आणि तू त्याच्याशी खेळत होतास. त्याची चक्क पप्पी घेतलीस. आणि त्याला म्याव म्याव असं नाही, तर ब्याव ब्याव असं बोलत होतास. खूप मजेदार होत ते. आम्ही खूप हसलो.

११ जुलै) 
आज माझे बोट धरून उठवलंस आणि आत बेडरूममध्ये घेऊन निघू लागलास. मला वाटलं की गादीवर तुला उड्या मारायच्या असतील. पण तू माझा हात हातात घेऊन वर टीशर्ट कडे नेत होतास. म्हणजे तुझं म्हणणं होतं की टीशर्ट घाल आणि बाहेर फिरायला ने. मग मी टीशर्ट घालून तुला घेऊन निघालो तर इतका खूष झालास की बस्स!

१७ जुलै)
मला पार्किंग मध्ये एक मोठा लोहचुंबक सापडला होता. मग त्याचे मी 3 तुकडे केले. तुकडे झाल्यावर त्याला दक्षिण उत्तर ध्रुव तयार झालेत. एक भाग खाली ठेऊन त्याच्या जवळ दुसरा नेला की मग पहिला वाला लांब पळतोय. तुला ते पाहून वाटलं की तो कुठला तरी जिवंत प्राणी आहे. आणि त्याला घाबरून पळायला लागलास. म्हणजे तुला भीतीपण वाटत होती आणि ते मॅग्नेटचं पळणे ही पहायचं होतं. मी थांबलो की मला ते करायला लावायचास आणि तू लांबून पाहत ओरडायचास. खूप मज्जा आली.

२० जुलै)
आता लोहचुंबक हातात घेतोस आणि माझ्यासारखे एक लोहचुंबक घेऊन दुसऱ्याला लांब पळवायचा प्रयत्न करतोस. तसं झालं की खूप खूष होतोस. आणि चुकून तो लांब असलेला AAमॅग्नेट तुझ्या हातातल्या मॅग्नेटला चिकटला की घाबरून टाकून देतोस.

२६ जुलै)
आज आमच्या बाळाचा वाढदिवस. दोन वर्षांचा झालास कणूल्या..! म्हणता म्हणता मोठा होऊ लागलायस. आज तुझा bday करायला आजीने वाठारला बोलावले पण तीच आजारी पडलीये अरे. ती हॉस्पिटलमधून घरी आली की आपण सेलिब्रेशन करू.

१० सप्टेंबर)
आपल्या बिल्डिंगच्या मागे झोपड्या बांधून राहतात आणि त्यांचे २ ट्रॅक्टर आहेत. सकाळी ते ट्रॅक्टर घेऊन जातात आणि संध्याकाळी परततात. ट्रॅक्टर सुरू केलेला आवाज आला रे आला की तू हातात जे काही असेल ते सोडून, तो बघायला गॅलरीत पळत जातोस आणि अगदी टक लावून तो जाईपर्यंत पाहतोस. आणि त्यांना बाय बाय देखील करतोस. तीच गोष्ट संध्याकाळी तो परतताना होते. 😀😀

१८ सप्टेंबर)
आता काही बोबडे शब्द बोलू लागलायस. ट्रॅक्टरचा आवाज आला की "टॅट्टर" असं म्हणतोस. आणि सफरचंदला अँप्पू म्हणतोस. इतकं गोड वाटतं ना रे तुझे पहिले वाहिले शब्द ऐकताना.!

३१ ऑक्टोबर)
आपण दिवाळीला गावी आलोय.

९ नोव्हेंबर)
बाईकवर कुठेही जाताना तुला पूढे बसवून नेत असतो. मागच्या काही दिवसांत तू हॉर्न वाजवायला शिकलास. गाडी चालवत असताना हॉर्न वाजव म्हटले की लगेच वाजवतोस. आणि आज तर गाडीचा स्टार्टर मारायला शिकलास. तुलाही तो आनंद भरपूर होता आणि मलाही. 




No comments:

Post a Comment