.post img {

Automatic Size

Sunday 14 March 2021

ॐ पूर्णमदः पूर्णमिदम् - अर्थ

 #विशालाक्षर

#वेदमंत्र

#निरामय_आरोग्यवर्धिनी


श्रुती-

ॐ पूर्णमदः पूर्णमिदम्

पूर्णात् पूर्णमुदच्यते |

पूर्णस्य पूर्णमादाय

​पूर्णमेवावशिष्यते ||

​ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||


ईशोपनिषद मधील या श्रुतीस शांती मंत्र असे देखील म्हटले जाते. श्रुतीचा सरळ सरळ अर्थ पाहिला तर मन संभ्रमात पडतं. खूप दिवस असं वाटत होतं की शब्दशः अर्थ कळून सुद्धा नक्की उकल काही होत नाहीये. मग इंटरनेटवरचे लेख पाहिले, थोडं चिंतन केलं तेव्हा आता जे मांडतोय त्या अर्थापर्यंत प्रवास झालेला आहे.


शब्दशः अर्थ-

ते परब्रम्ह पूर्ण आहे आणि मीही पूर्ण आहे. कारण पूर्णमधूनच पूर्ण उत्पन्न होते. पूर्णातून पूर्ण काढून घेतल्यानंतरही पूर्णच शिल्लक राहते.


मला समजलेला अर्थ-

मुळात पूर्ण म्हणजे काय? आपल्या सांसारिक भाषेत पूर्ण असं काही नसतंच ना? एक इच्छा पूर्ण झाली असं आपल्याला वाटतच असतं तर ती इच्छा अजून थोडी मोठी होऊन आपली अपूर्णता सिद्ध करते. दोन जीव लग्नानंतर येतात तेव्हा एकमेकांना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करतात पण मनुष्य क्षणोक्षणी इतका बदलत असतो की तेही पूर्ण होऊ शकत नाही. तर मग पूर्ण कशाला म्हणावं? की ब्रह्मांडात पूर्ण असं काही नाही. माझ्या मते, पूर्ण ती गोष्ट असते जिच्यामध्ये अजून काही इच्छा किंवा तृष्णाच शिल्लक राहिलेली नसते. माणसाचं शरीर किंवा संसार, भौतिक गोष्टींच्या गरजा पूर्ण केल्याशिवाय चालूच शकत नाहीत. म्हणून त्या कधी पूर्णत्वास जाऊच शकत नाहीत. त्या नष्ट होऊन शून्य होतील पण पूर्ण कधीच होणार नाहीत.


पूर्ण आहे आत्मा आणि परब्रह्म. परब्रम्ह नक्की काय आहे? कसे आहे? खूप ठिकाणी आपण अतिशय कल्पक वर्णनं ऐकतो पण खरं तर ज्या ऋषींना किंवा महापुरुषांना ब्रम्हाची अनुभूती झाली तेव्हा त्यांचं म्हणणं हे होतं की ब्रम्ह नक्की कसं आहे, याच शब्दांत वर्णनच करू शकत नाही. एखाद्या फुलाच्या सुवासाचं वर्णन आपण जास्तीतजास्त छान आहे इतकंच करू शकतो. तो सुवास नक्की कसा आहे हे आपल्याला सुवास घेऊनच पाहावं लागेल. 


या श्लोकात म्हटल्याप्रमाणे पूर्णातुन पूर्ण उत्पन्न झाले तरी ते पूर्णच असते. म्हणजे जे स्थायी अनादी अनंत पूर्ण आहे त्यातून नवीन काही जन्माला आल्याने विभाजन होऊन ते अपूर्ण बनत नाही. एखाद्या ज्योती मधून आपण असंख्य दिप प्रज्वलित केले तरी ती ज्योत किंवा बाकीचे दिप त्याच तेजाने जळतात (पूर्णच असतात). एखाद्या भांड्यातील पाणी छोट्या दोन भांड्यात घेतले तर ती दोन पूर्ण भरलेलीच पात्रं असतील. एखाद्या जीवमधून पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी पूर्णच शिल्लक राहतं. अगदी अशीच परब्रह्म आणि आत्म्याची गोष्ट आहे. आत्मा परब्रम्हाचा अंश असला तरीही तो परब्रम्हासारखाच कुठलीही तृष्णा नसलेला पूर्ण आहे. अहं ब्रम्हास्मि.. हे इथं खरं ठरतं. फक्त त्याला जाणून घेण्यास स्वतःच्या आत खोल डोकावणे जरुरी आहे.  मग जीवनातल्या चढ उतारांनी व्यथित न होता, आपल्यातल्या पूर्णत्वाचं स्मरण करून निर्विकार व्हा. पूर्ण व्हा.


©विशाल पोतदार

(संपर्क- ९७३०४९६२४५)

No comments:

Post a Comment