#विशालाक्षर
#cinemagully
#nothing_personal_2009
चित्रपट - Nothing Personal (2009)
दिग्दर्शिका - Urszula Antoniak
काही सिनेमे पाहिल्यानंतर मन विचारात डुंबून जातं. रात्री झोपेपर्यंत आणि पुन्हा सकाळी उठल्यावरही मनात त्यातील प्रसंगांचा आणि पात्रांचाच बायोस्कोप चालू असतो. असाच एक चित्रपट.. Nothing Personal (2009)
यात मुळात नेहमी लिहिल्या जाणाऱ्या कथेचा फॉरमॅटच नाहीये. आयुष्यात नात्यांचे बंध तुटून गेल्यावर, एक मुलगी पाठीवर बॅग घेऊन भटकं आयुष्य जगू लागते. दिवसभर लिफ्ट मागून किंवा चालत भटकायचं, कुठे काही खायला मिळेल ते खायचं आणि अंधार होईल तिथे तंबू टाकायचा असं हे तिचं आयुष्य. फिरता फिरता तिला एकटंच असणारं घर दिसतं. आणि त्यात राहणारा पन्नाशीतील पुरुष, तोही तिच्यासारखाच एकटा. तो तिला कामाऐवजी जेवण अशी ऑफर देतो. पण तिच्या अटीप्रमाणे दोघात एक शाब्दिक करार होतो. दोघांनी एकमेकांना काही वैयक्तिक माहिती (अगदी नावदेखील) विचारायचं नाही. आणि जर हा नियम मोडला तर त्या व्यक्तीने गाणं म्हणायचं ही शिक्षा. एकत्र राहता राहता दोघांचं नातं उलगडत जाऊन नक्की कुठल्या अवकाशात पोहोचतं ह्या प्रवासाचा सिनेमा.
चित्रपटाचा मूड सेट करून घेण्याकरिता, दिग्दर्शिकेने कॅमेऱ्याचा उपयोग अत्यंत शिताफीने करून घेतलाय. भव्य अशा निसर्गात माणसाचं एकटेपण दर्शवण्यासाठी घेतलेले लॉंग शॉट्स, तसेच भावनांचे नाजूकसे पदर उलगडताना घेतलेले क्लोजअप्स खूप उत्तम. काही क्षण स्तब्ध राहणाऱ्या फ्रेम्स, तिथल्या मंद गतीने सरकणाऱ्या वेळेची जाणीव पाहणाऱ्यापर्यंत पोहचवतात. नुकताच बरसून गेलेला पाऊस आणि दाटून आलेलं आभाळ असं कुंद वातावरण, त्या दोघांच्या नाट्याला नेपथ्यच बहाल करतं. Lotte Verbeek आणि Stephen Rhea या दोघांनी जीव ओतून केलेल्या अभिनयाने त्या नेपथ्याला योग्य न्याय दिला आहे.
प्रत्येक व्यक्तीची आपल्या मनातील ओळख ही वैयक्तिक माहिती व आयुष्यातलील घटनाक्रमांशिवाय पूर्ण होत नाही. आपण ओळखीतल्या कुठल्याही व्यक्तीला आठवलं तर आपल्यासमोर त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्वाच्या पैलूंपेक्षाही जास्त त्याचं नाव, गाव, पदवी, नाती आठवतात. या चित्रपटात नावाप्रमाणेच आपल्यालाही त्या पात्रांचं वैयक्तिक आयुष्य कळू दिलं जात नाही. ओघाने आलेलं दुःख आणि त्यावर त्याचा मलम म्हणजे एकांत. एकांत आणि एकटेपण यातही फरक असतो. एकांत स्वखुशीने स्वीकारलेला असतो त्यात स्वतःचा स्वतःशी संवाद असतो, पण एकटेपण म्हणजे गर्दीतही वाटणारं पोरकेपण. प्रत्येक व्यक्तीला कुटुंब किंवा समाजस्थानानुसार वर्गीकरणात टाकलं जातं. पण प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून स्वतःचे असे स्वभावगुणांचे पदर आहेत ते जाणून घ्यावं. कधीतरी एकांतात राहून स्वतःशी संवाद साधता आला तर एकटंपण सोसायची वेळ येणार नाही.
मला जाणवलेली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एखाद्या नात्यात प्रेम करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीवर असलेल्या आपल्या अपेक्षांवर जास्त प्रेम असतं. जेव्हा ते नातं अपेक्षेच्या चाकोरीबाहेर जाऊ लागलं की नात्याला बुरशी लागत जाते. ते कधीच पुरत नाही. जर आपण समोरच्या व्यक्तीकडे स्वतंत्र माणूस म्हणून प्रेम केलं तर ते कधीच सरणार नाही. किंवा त्यातला ओलावा हटणार नाही.
तर ज्यांना संथ सरकणारा ड्रामा आवडतो, त्यांनी तर आवर्जून पहावा असा चित्रपट.
टीप - Kavita Datir यांनी पुण्यनगरीमध्ये लिहिलेल्या लेखामुळे या चित्रपटाबद्दल मला समजलं, त्यामुळे त्यांचे आभार.
©विशाल पोतदार
(संपर्क -9730496245)
No comments:
Post a Comment