#विशालाक्षर
#CinemaGully
#मी_वसंतराव
'मी वसंतराव' हा चित्रपट पाहून आलो. रात्री ८ चा शो होता, आणि बाहेर आल्यावर घड्याळाने ११चा काटा गाठलेले पाहिल्यावर विश्वासच बसला नाही, की आत आपण ३ तास होतो? कुठल्याही कलाकृतीने काळावर ताबा मिळवणे यापेक्षा त्याच्या उत्कृष्टतेची अजून काय पावती असावी.
कैवल्यगान असणारी ही कैवल्य चित्रकृती_! कैवल्य म्हणजे मोक्ष.. मुक्ती... एका स्वैर भिरभिरणाऱ्या कलाकाराला असे ३ तासांच्या बंदीशीत बांधूनही त्याला न्याय द्यायचा असेल तर तितक्याच तळमळीच्या कलाकारांनी प्रयत्न केल्याशिवाय जमणार नाही.
वसंतराव देशपांडेंचे गायन आमच्या पिढीपर्यंत जास्त पोहचले नाही, परंतु त्यांच्याच नातवाने त्यांच्या गाण्याचा आत्मा जागता ठेवला. राहुलला (हक्काने एकेरी बोलवतोय) वसंतरावांचे पात्र निभावताना वाटले की, खरे तर हा वसंतरावांची भूमिका कदाचित त्यांनी स्वतः केली नसती इतकी सुंदर झाली आहे. जेव्हा कलाकाराला ती गोष्ट पोहचवण्याची अतूट तळमळ असेल तेव्हाच असे conviction येते. राहुल देशपांडे, पुष्कराज चिरपुटकर, अनिता दाते, अमेय वाघ, इतकेच नव्हे तर ज्यांच्या पदरी दोन मिनिटांचा स्क्रीन टाइम आला आहे त्यांनीदेखील त्या वेळेचे सोने केले आहे. राहुल अभिनयातही इतका अव्वल आहे हे पाहून थक्क व्हायला होते. पुष्कराज पुलंची प्रतिमा सांभाळू शकेल असे आधी वाटले नव्हते, पण त्याने खरंच पुलं आपल्या जवळ आणलेत.
बायोपिक आहे म्हटल्यावर त्यात ६०-७० वर्षांचा कालावधी कव्हर केला जातो आणि हा बदलता काळ दाखवण्यात सिनेमॅटोग्राफीचा अत्यंत महत्वाचा रोल असतो. या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी अगदी तंतोतंत आहे. ब्रिटिशकालीन वातावरण, घरे, घरांची जुन्या स्टाईलची कुलपे, जुन्या गल्ल्या आणि शहरे जिवंत झाली आहेत. जर बारकावे सांगायचे तर जुन्या काळात मोठ्या दोन सेल्सचा वापरला जाणारा लांबुडका टॉर्च किंवा त्या काळातील जाड माईक अशा छोट्या गोष्टीसुद्धा दाखवण्याची काळजी घेतली गेलीय. यामुळे चित्रपटात कुठेही कृत्रिमता येत नाही आणि काळाला पुन्हा एकदा वर्तमानात पाचारण केले जाते.
राहुलने स्वतः संगीत देऊन त्या चित्रपटाला शोभेल अशी सुरावळ जमवली आहे. राम.. राम.. या अंगाईची ट्यून पूर्ण चित्रपटात महत्वाच्या क्षणी वाजत राहणे ही एक सुखावह वाटणारी गोष्ट! स्वतः इतके उत्तम शास्त्रीय संगीत गायक असून इतर संगीताला अस्पृश्य न समजणारे जसे वसंतराव तसाच राहुल देशपांडे आहे. कारण या चित्रपटात अंगाई, नाट्यसंगीत, लावणी, रागदारी, सुगम हे सर्वच प्रकार लीलया सादर केले जातात. कारण कुठल्याही प्रकारचे संगीत असले तरी ते बनते ते मुळात बारा सुरांनीच!
यातील संवाद म्हणजे शिरोमणी.. निपुण आणि उपेंद्र सिद्धये यांनी एकाच वेळी विनोद, कला तत्वज्ञान, अस्वस्थता, वैताग, प्रेम हे इतकं सहज भरलेय ना की गोधडी प्रमाणे तुकडे असूनही ते एकसंध वाटावे. पुलं हे पात्र संपूर्ण चित्रपटात वावरत असताना जसा यायला हवा तसा निखळ विनोदही आणलाय. वसंताची गुरू शोधतानाची धडपड आणि मास्तर दीनानाथ, लाहोर मधला फकीर असलेला गुरू यांचे तत्वज्ञान कलाप्रेमी, कलासाधक यांच्यासाठी जिवंत तत्वज्ञान आहे.
"वसंता.. आपल्याला गायची ईच्छा असणे आणि समोरच्याला ते ऐकण्याची इच्छा नसणे हे खूप मोठे दारिद्र्य!" मास्तर दीनानाथ.
"बेटा.. मारवा शाम के समय गाया जाता है ना.. उसको सुरावट समझ के मत गाना. उस समय दिन भी नही और रात भी नही. धुंधला धुंधला दिख रहा है, एक अजीब सी आहट होती है इस समय! इसेही सुरो मे बांधो तो मारवा हो जाता है." लाहोरच्या गुरूंचे वाक्य (मला आठवेल तसे मांडले).
दिग्दर्शनाकडे शेवटी येतो... निपुण धर्माधिकारी दिग्दर्शन उत्तम करतो हे माहिती होतेच पण आज त्याने फॅन बनवले. कॅमेरा अँगल्स कथानकाला नेहमी काहीतरी घडणार याचे सूतोवाच देतात. एखाद्या संवादाचे उत्तर संवादातून न येता थेट प्रसंगातून येते. बऱ्याचवेळा आपल्याला ब्रिटिशकालीन सेटअप असणाऱ्या चित्रपटात, (जेव्हा वीज उपलब्ध नव्हती) दिग्दर्शक रात्रीच्या दृश्यात अगदी मोठमोठे फ्लॅशलाईट्स वापरून त्यातली नैसर्गिकता घालवतात. परंतु या चित्रपटात अगदी कमी प्रकाश का असेना परंतु रात्रीची दृष्ये अगदी दिव्याच्या प्रकाशातच घेतली असावीत अशी मांडली आहेत आणि तरीही ती कलेच्या दृष्टीने लख्ख होतात. वसंतराव आणि पुलं जेव्हा एका स्थानिक लावणी गायिकेच्या झोपडीवजा घरात लावणी ऐकायला जातात, ते दृष्य मनात कोरले जावे असे आहे. निपुण या चित्रपट सृष्टीला अजून खूप काही देईल.
एक कलाकार म्हणून माझ्या मनात या चित्रपटाने खूप जाणिवा उघडल्या. कला ही खूप कळकळीने जपायला हवी.. आयुष्यात काहीही येवो, जाओ... कला आत्म्यात उतरायला हवी, कारण आपण त्यासाठी निवडलो गेलो आहोत. वसंतरावांप्रमाणे कलेची इच्छा जागृत रहायला हवी. कदाचित उद्या आपल्याला कोणी कला सादर करायला बोलवणारही नाही, हे मनात ठेवून आत्ता कलाकृती घडवायला हवी.
वसंतराव आणि पुलं या सूर- तालासारख्या दोस्तांस माझा सलाम_!
©विशाल पोतदार
No comments:
Post a Comment