.post img {

Automatic Size

Monday, 8 August 2022

हिरवे सुख

 #विशालाक्षर

#नवरात्री_कथा

#हिरवं_सुख


आज महिलामंडळाच्या भिशीचा दिवस. यंदा त्यांच्या ग्रुपमध्ये सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या बायकांनी नवरात्रीचा हिरवा रंग सेलिब्रेट करायचा ठरवला आणि भिशीला जमताना सगळ्या बायकांनी हिरव्या रंगाची साडी नेसून येण्याची घोषणा केली. शेजारच्या सुनंदेने ही गोष्ट सांगताच, अलकेच्या डोळ्यापुढं आईची जपून ठेवलेली साडी तरळली. तिने लगोलग वर ठेवलेली जुनी बॅग उचकटून हिरवी साडी बाहेर काढली. धागे विरून गेल्याने साडी बाहेर काढताना बॅगच्या चेनमध्ये अडकून टर्रकन फाटली. अलकाचं तोंड काळंठिक्कर पडलं. काहीक्षण तशीच शुन्यात पाहत बसली आणि उदासीने स्वतःशीच हसली. इतक्यात करपल्या वासाने भाजीने आपण तयार झाल्याचा निरोप तिच्यापर्यंत पोहचवला. ती चमकून उठली. पटकन पुन्हा ती बॅग भरली आणि स्वयंपाकघरात आली.


पटपट भाकरी थापली आणि संतूचा डबा भरु लागली. तब्बल महिन्याभर तहानलेल्या त्यांच्या शेताला विहिरीचं पाणी पाजण्यासाठी आज नंबर आला होता. मग उजेडतं न उजेडतं तोच, संतू रानाकडं पसार झाला होता. तरी तो निघताना म्हटलाच, "अलके, आज डबा आणत बसू नको. मी खायन हौसामावशीकडं काहीतरी. आज माझी बायकू नटून थटून मिरवणार, मैतरणींच्या घोळक्यात. मग चिखलात माखायला येऊ नको तिकडं. आराम कर."  अलकेला कशाचं रहावतंय. भराभरा जेवण बनवून, डबा पोहचवून लगेच भिशीला मागे येऊ, याचं घड्याळ मनात चालवून तयारीलाही लागली.  


त्यांचा मळा तसा घरापासून दीड दोन किलोमीटर लांब. साधीच साडी नेसून जेवण घेऊन निघाली. राहून राहून हिरवी साडी तिच्या मनात डोकावत होती. काळाच्या कात्रीत कातरलेल्या साडीने तिचं मन दाटून आलं होतं. तशी ही बया लहानपणापासूनच समजूतदार असल्याने, एखादी गोष्ट मिळत नसली की तिला मनातून पुसून दुसऱ्या गोष्टीवर आनंद मानायचा यात पटाईत होती. आज मात्र सगळा समजूतदारपणा कुठेतरी गुडूप झाला होता. आईची साडी होती ती.! आईने श्वास सोडल्यानंतर, अलकासाठी तिचं असणं या साडीमुळे होतं. अस्वस्थतेचे कितीही पापुद्रे काढले तरी आत तितकंच दुःख पुन्हा उभं राहत होतं.


वाटेत दोन बायका भेटल्या आणि त्यांनीही तिला भिशीला टायमिंगवर यायला सांगितलं. दोघीही किती खूष होत्या.! आज अलकेला ती सोडून सगळं जगच खूष वाटत होतं. मनातल्या मनात मुसमुसतच मळ्याकडे आली. तिचा नवरा पाणी पुढे जाण्यासाठी दारे धरत होता आणि तिची हाक तिथंपर्यंत पोहचतच नव्हती. त्याला हाका देता देता क्षणभर तिची नजर शेतात दाटलेल्या हिरव्या श्रीमंतीवर स्थिरावली. प्रेमाने वाकलेली मक्याची पानं कणसाला गोंजारत होती. वारा आला की डुलत होती. रानओव्या म्हणत नाचत होती. रोजच्या पाहण्यातली गोष्ट कधीकधी भलं मोठं रूप घेऊन समोर लख्ख दिसते असंच काहीसं घडत होतं. 


ती आता भारावल्या अवस्थेत पानांना गोंजरत संतुकडे निघाली. लोण्यागत मऊ चिखलात पाय रुततील तसं मन शांत होत होतं. आत जाईल तशी काळी माय तिला हिरव्या शालूत लपेटत होती. 


©विशाल पोतदार


(वरील कथेचे हक्क लेखकाअधीन आहेत. नावासहित शेअर करण्यास करण्यास काही हरकत नाही.)

No comments:

Post a Comment