.post img {

Automatic Size

Tuesday, 13 June 2023

डेड एन्ड (एकांकिका)

पात्र - 
दिक्षा (वय - ३०) विवाहित
तिमिर - वय ३२

(नेपथ्य- नायिका एका डांबरी रस्त्यावरून कार चालवत जाणार असल्याने, रस्ता असण्याची चिन्हे असावीत. तो रस्ता एका ठिकाणी संपत असून त्यापुढे झाडीच असेल. बसण्याकरीता रस्त्याकडेला एक कठडा.) 

दृश्य - रात्री ९ च्या आसपास
(दिक्षा कार चालवत असताना अचानक पुढे रस्ताच संपलेला जाणवतो आणि ती पटकन ब्रेक मारते.)
दिक्षा - शीट~~~

(दिक्षा कार मधून उतरते. मोबाईलवर नीट निरखून पाहते. रस्त्याच्या पुढे डोकावून, खरंच रस्ता संपलाय का हे पाहते. खूप वैतागलेली वाटते.)

दिक्षा - शे यार...  हे कसं पॉसीबल आहे? 
(असे म्हणत असतानाच ती रस्त्यातले दगड बाजूला अंधारात भिरकवायला सुरुवात करते.)

(इतक्यात तिथल्या अंधारातून एक मुलगा तिथे येतो.)

तिमिर - ओ~~ ओ~~ मॅडम ... लागला असता ना दगड.. कानापासून भिरभिर करत गेला माझ्या.  काय... नक्की काय प्रॉब्लेम काय आहे?

दिक्षा - प्रॉब्लेम म्हणजे? दिसत नाही का तुम्हाला हे.. हे.... 

तिमिर - हे ... हे काय.... आगे दाये बाये..  रास्ता बंद... 
आयुष्यच डेड... डेड एन्ड आहे....!! त्यात रस्त्याचं काय घेऊन बसलात.

दिक्षा - (स्वतःशी) साला वेडा बिडा आहे की काय..

तिमिर - ऐकू येणार नाही असं तर बोला..मी वेडा वगैरे नाही असं मला तरी वाटतं ..  तिमिर..... काळोख... what people mistakely call it as an absense of light... डार्कनेस..
by the way.... सॉरी बरं का... तुम्हाला घाबरवून सोडलं असेल तर ... मी पडलो लेखक माणूस.. अवसानातला विचार मिळाला की असाच सुसाट सुटतो. (हॅन्डशेक साठी हात पुढे करतो) मायसेल्फ तिमिर... आपण?

दिक्षा - अहो.... ही काय ओळख बीळख करून घ्यायची वेळ आहे का.. इथं प्रॉब्लेम काय आहे दिसतंय ना तुम्हाला? काय हो? तुम्हीही चुकून आलात का इथे? मध्येच असा डेड एन्ड कसा काय? मॅपमध्ये तर इथून रस्ता दाखवत होता. या शॉर्टकटच्या नादात मेन रस्ता सोडून मी वीसएक किलोमीटर आत आले. 

तिमिर - (जोरात हसतो) तुम्ही चुकून इथे आलात हो... मी मुद्दाम इथे येतो इथे. हजारो मैलांवरचा सॅटेलाईट तुमचा मॅप दाखवणार.. थोडासा ऊंनीस बीस चलेगा ना.... पण मॅडम मला काय वाटतं...माणूस जेव्हा डेड एन्ड ला येतो ना, तेव्हा तिथं विसावलं पाहिजे. आता तितकंच मागे जावं लागेल हे खरं. पण डेड एन्डला आलाच आहात तर मनातल्याही गाठी स्वाहा करून जा इथेच. (एकदम कुजबुजणारा आवाज करत) आणि हो, कोकणातला रस्ता आहे हा. जपून राहा बरं का. म्हणजे थोडी भुतंखेतं वगैरे. म्हणजे अगदी थोडीशी...

(घाबरत घाबरत त्याच्यापासून जरा लांब होत विचारात पडते.)

तिमिर - घाबरू नका हो... मी भूत बीत नाही...  नॉर्मल माणूस आहे. खरं तर नॉर्मल आणि माणूस हे विरुद्धार्थी शब्द आहेत ना? माणसासारखा abnormal जीव दुसरा कुणी नाही. (जोरात हसतो). कसं होतं वाक्य सांगा.. माझ्या एखाद्या कथेत वापरता येईल ना?

दिक्षा - whatever.... काहीही करा हो त्या वाक्याचं, पण मला इथून बाहेर कसं पडायचं ते सांगा. इतकं 20 km मागे जाण्यापेक्षा दुसरा कुठला रस्ता आहे का मेन रोडला जायला?  उशीर होतोय खूप..प्लिज हेल्प करा.. 
खूप भणभण व्हायला लागलीय डोक्यात...

तिमिर - आता पर्याय दिसतोय का काही... मग काही वेळ शांत बसा ना मॅडम.. की अशाच किरकिर करत असता तुम्ही सगळीकडे...

दिक्षा - मिस्टर तिमिर .... माईंड युअर लँग्वेज... काहीही काय बोलता..?

तिमिर -सॉरी हा.. मी खूप excitment मध्ये बोललो. पण एक ऐका ना. मी काय म्हणतो... आतापर्यंतच्या आयुष्यात शोधलेत की रस्ते. धावपळही केली असेल... घड्याळाच्या काट्याचीही गुलामी केली असेल ना.. थांबा जरा... बसा शांत... स्वतःला ऐकत..  स्वतःशी गुणगुणत..  इफ यू डोन्ट माईंड, एक गोष्ट सांगू? 

दिक्षा - काय?

तिमिर - आपली ओळख ना पाळख. तुमच्याबद्दल मला काहीही माहिती नाही पण का कुणास ठाऊक, असं वाटून गेलं, की तुमचा डेड एन्ड फक्त रस्त्यावर नाही तर आतही कुठेतरी आहे. मन अडून बसलंय पण सुटता येत नाहीये. 

(तीही शांत कट्ट्यावर बसते. आणि तो उभा असतो)

दिक्षा - दिक्षा... 

तिमिर- काय म्हटलात?

दिक्षा - माझं नाव... दिक्षा ..
आयुष्यातला डेड एन्ड... (पॉज) कधीकधी अनोळखी लोक आपली मनस्थिती परफेक्ट कशी ओळखतात कळत नाही. तुम्हाला ते कसं जाणवलं ते माहीत नाही. पण जाऊ द्या सगळंच काही शेअर करता येत नाही. बाय द वे तुम्ही लेखक आहात ना हो.. काय काय लिहिता आपण?

तिमिर - कथा, कविता, लेख... सगळं थोडं थोडं... पण सध्या नावाला जागून काळोखाविषयी काहीतरी लिहितोय... या स्पॉटला मी तासनतास बसतो. किर्रर्र एकांत मिळतो. (हसून) कधीकधी मॅपने चुकवलेले लोक येतात इथे त्यांना गाईडही करतो.

दिक्षा - म्हणजे या डेड एन्ड प्रॉब्लेमची हेल्पलाईन म्हणून जॉब आहे तर तुमचा.

तिमिर : सॉर्ट ऑफ.. आयडीया काही वाईट नाही पण.. माझ्या या सर्व्हिसेस चार्ज केल्या तर चांगला इन्कम होऊ शकतो. तसेही लेखकांना कुठे काय कमाई मिळते सध्या.

दिक्षा - हाहाहा..  करा ना चार्ज.. माझ्या नंतरच्या व्यक्तीपासून सुरुवात करा पण.. बाय द वे... काळोख? म्हणजे तुम्ही डार्क जॉनर लिहिता का? हॉरर वगैरे? 

तिमिर - हॉरर नाही, तर सॉर्ट ऑफ काळोख म्हणजे अंधारावर abstract असे लेख लिहितोय. काहीसे तत्वज्ञानाशी रिलेट करतात ते लेख.

दिक्षा - अच्छा.. पहिल्यांदा ऐकलं असं काही मी... आणि मघाशी काय म्हणत होतात? absence of light म्हणजे डार्कनेस असं चुकून लोक म्हणतात वगैरे... तसंच तर आहे ते.. कुठलाही रंग समोर नसतो त्यावेळीच काळा रंग असतो. बेसिक आहे.

तिमिर - खरं तर तुम्ही ब्रह्मांडाचा विचार केलात तर काळोख मला स्वयंभू वाटतो. पूर्ण ब्रह्मांडात उजेड नाही तर काळोख भरून राहिलाय. तो आहेच. प्रकाश disturbance आणतो. जशी या ब्रम्हांडातली पोकळी सर्वत्र आहे.  काळोखात एकदा उजेड आला सगळं लख्ख दाखवतो आणि आपण लेबल्स चिकटवत बसतो. माझ्यासाठी मनातला अत्यंत खोल कोपरा म्हणजे काळोख!!

दिक्षा - पण हे शेवटी बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं झालं ना. हे तत्वज्ञान.. तुमचं ते प्रकाश काळोखाचं परसेप्शन... ह्याचा रिअल लाईफमध्ये काय उपयोग हो. काळोख म्हटलं की मला तर आठवते भीती, गुन्हे आणि अस्पष्टपणा... तुम्ही काय लिहाल ते आता माहीत नाही. बरं निघायला हवं मला.. आधीच खूप वेळ गेला माझा ह्या रस्त्याच्या नादात.

(दिक्षा उठते आणि निघू लागते).

आणि हो....लिहिणं जितकं सोपंय तितके मनातले डेड एन्ड सोडवणे इतके सोपे नसतात . मनाचा एकतरी भाग असा असतो, जो डेडएन्ड पासून कधीच हलत नाही.. माघार घेत नाही.. बाय द वे चला.. ऑल द बेस्ट तुमच्या काळोखाच्या लेखनाला..

(दिक्षा गाडीपर्यंत पोहोचते. दारच उघडत असते इतक्यात..)

तिमिर - हातचलाखी... जादू... फसवणूक सगळ्यात बेस्ट उजेडात होत असते बरं का? जेव्हा आपल्याला वाटतं ना, की यावेळी आपण फसवलो जाऊ शकत नाही, तेव्हाच सगळी जादू घडते मिस दिक्षा.. उजेडाच्या कॉन्फिडन्समध्येच मन फसते.

(कारचं दार उघडून दिक्षा काही वेळ विचार करते. पुन्हा दार बंद करते आणि कारला टेकून हाताची घडी घालून शून्यात पाहत बसते. अचानक तिला रडू कोसळतं. तिमिर सांत्वनाच्या भावनेने तिच्या समोर येतो. ती हातानेच ओके आहे असं म्हणते.) 

तिमिर - ईट इझ ओके....

दिक्षा - बसू येथे थोडा वेळ?

तिमिर - offcourse... ही जागा अजूनतरी मी नावावर करून घेतलेली नाहीये. so न विचारता ही बसू शकता. 

(दिक्षा स्माईल करते.)

दिक्षा - लेखक महाशय, विनोदी लेखन करू नका कधी. खूप सुमार जोक्स करता.

तिमिर - एखादा जॉनर द्यायचा हो बाकीच्या लेखकांनाही. मी एकटाच किती काय काय लिहिणार ना. बाय द वे... मला अरे तुरे करू शकता. इथे या माळरानात, काळोखात कुठे formalities करायच्या संबोधनाच्या.

दिक्षा - hmmmm चालेल... असं लगेच एकेरी बोलावणं मला अवघड जातं खरं तर.. तिमिर.. हे नाव मात्र मी कुठे ऐकलं नाही. वेगळं वाटतंय खूप. 

तिमिर - पेन नेम...!! म्हणजे लेखनासाठी घेतलेलं नाव.

दिक्षा - ट्रान्सलेट करून सांगायची ती काय गरज? मुलींना काय नेहमीच येडपट समजता की काय राव.

तिमिर - (हात जोडून) सॉरी मॅडम.. माय बॅड.. असं काही समजत नाही मी. हे नाव खूप भारी वाटलेलं मला. शून्यत्व असल्यासारखं नाव. तिमिर.. काळोख..  नथींगनेस.. 

दिक्षा - पण नक्की लिहिताय काय या काळोखावर. एखादं काहीतरी वाचून दाखवा बरं. म्हणजे इफ यू आर ओके विथ ईट.!

तिमिर - हे ऐकवत राहिल्यामुळे आधीच एक गर्लफ्रेंड सोडून गेलीय.. आपली नुकतीच ओळख होतेय. एवढी रिस्क घ्यावी का बरं?

दिक्षा - excuse me... married आहे बरं मी.! त्यामुळे घ्या रिस्क. आवडलं नाहीतर मलाही निघणं सोपं होईल इथून.

तिमिर - married असण्याचं disclaimer दिलंत ते एक बरं झालं. मी ही अत्ता माझ्या बेस्ट flurting लाईन्सची डायरी बाहेरच काढणार होतो. 

दिक्षा - हाहाहा... जाऊ दे.. जाऊ दे ते प्रयत्न.. तसेही तू अशा फालतू गोष्टींपासून detatched वाटलास म्हणून इथे थांबण्याचं धारिष्ट्य तरी झालं. बरं लेखक महाशय ऐकवा काहीतरी.

तिमिर - हो हो.... ऐकवतो... थाम्ब शोधतो मोबाईल मध्ये..

(मोबाईलमध्ये लेख शोधून वाचून दाखवतो).

तर हा एक स्फुट लेख आहे आपल्या आत्म्यांच्या प्रवासाविषयी.

दिक्षा - एवढ्या अंधारात आत्मे वगैरे का..? बरं वाच.

तिमिर -
बाय द वे खूप जड वाटलं तर सांग बरं..

"पात्रात अंधार भरून नदी कुठे चाललीय? तिला कदाचित असंख्य प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या त्या कृष्णविवरात विरून जायचंय. 

शरीरातून नुकतेच सुटका मिळवलेले आत्मेही या प्रवाहात दिसतायत. त्यांच्यासाठी पाठीमागे शोकसभांच्या फैरी झडताहेत आणि हे बापडे मात्र आनंदात तरंगतायत. हजारो वर्षे एकच स्वप्न उराशी..  यावेळीतरी मिळेल का मोक्ष? 

नदीच्या अंधारात त्यांचा पिंड, मुठीत पकडलेल्या काजव्यांसारखा असहाय वाटतो! युगांपासून कवटाळलेल्या संस्कारांचा काजवा अजूनही असहाय टीमटीमतोय. तोही जेव्हा विझेल, तेव्हा फक्त एक नग्न ऊर्जा राहील. तिलाच मिळेल मोक्ष. 

जा रे बाबा.. अंधारात शेवटची अंघोळ करून, त्वरीत निघायला हवं. अंधाराने सजून एक गर्भ वाट पाहतोय.! पुढच्या जन्मातील आईच्या पदरी दान दे.!

(हे ऐकता ऐकता दिक्षा स्वतःत हरवून जाते. तिला हुंदका भरून येतो आणि भरल्या स्वरातच म्हणते..)

दिक्षा - किती खोलवर आहे हे... थांबलास का? पुढे...?

तिमिर - सॉरी... तुझे डोळे भरून आले चक्क? 

दिक्षा - काही जखमा अशा भळभळत राहतात की त्या कधी जुन्या होतच नाही. असं काही वाचलं ऐकलं की आठवतं काहीतरी... 
तुझा काळोख हा इलेमेंट एक कॅनव्हास वाटतोय अनंत आकाराचा. अगदी काहीही लिहू शकशील यावर. 

तिमिर - काहीही लिहिण्यापेक्षाही, हे लिहिता लिहिता माझंच मन इतकं खोलवरच्या आयामात जातं की subconsious लेव्हलच्या विस्कटलेल्या गोष्टी सावरून ठेवता येतात. बोअर तर करत नाही ना मी?

दिक्षा - मी कुठे इथे मनोरंजन व्हावं म्हणून बसलेय. एकतर मला पुढे जाण्यासाठी आधीच पाऊल उचलत नव्हतं आणि मागे गेलं तरी मन झुरत राहणार. यार, फ्रीझ झालेय मी. डेड एन्ड हा अशावेळी आलाय ज्यावेळी खरंच मी काही ठरवू शकत नाहीय. उलट्या पडलेल्या कासवासारखं वाटतंय. हेल्पलेस.!

तिमिर - इफ यू डोन्ट माईंड... शेअर करू शकशील मनातलं द्वंद्व.? अनोळखी माणूस असलो तरी प्रयत्न करेन ते जाणून घेण्याचा. कधीकधी भावनांचा गुंता सोडवायला तटस्थ नजरेची गरज असते. 

दिक्षा - नको वाटतं रे मनातल्या जाळ्या जळमटं पुन्हा उघडी करायला. मनात पुन्हा ती चित्रफीत सुरू होते. खूप काही भलं मोठं असं दुःख नाहीये खरं तर. 

तिमिर - मग अशी कल्पना कर की तू काळोखात उभी आहेस. इतका गडद अंधार की तुझे डोळे उघडे आहेत की झाकलेले हे कळू नये. स्वतःचा हात डोळ्यांसमोरून फिरवला तरी कळू नये इतका काळोख. त्याला तटस्थपणे दाखव तुझी जाळ्या जळमटांची खोली. 

(दिक्षा डोळे बंद करते.)

दिक्षा -  पिंडदान... (आवंढा गिळते) पिंडदान करायला चाललीये मी गोव्याला. 

तिमिर - काय?

दिक्षा - ऐकलंस की... संपवणार एका बापाला आणि मुलीलाही.

तिमिर - का? 

दिक्षा - मनात हीच गाठ आहे. का? नक्की का? जगेल तितकं पक्की गाठ होत जाते. गळ्याभोवती इतकीच आवळते की जिवाने नुसतं तडफडत राहावं. 

तिमिर - 
कधीकधी गाठ स्वीकारावी ना.

दिक्षा - 
नाही स्वीकारता येत. इतकं सोपं नसतं.

तिमिर - तेच म्हणतो... शेअर करून तरी पहा. सांगितलंस तर क्लोझरच्या जवळ तरी जाऊ शकशील.

दिक्षा - काय सांगायचं रे..  एका हिजडयाची मुलगी आहे ही किळसवाणी गोष्ट सांगू? माझा बाबा... छक्क्यांच्या जमातीत राहायला गेला हे सांगू?

तिमिर - म्हणजे...?

दिक्षा - ऐकलंस ना... आणि वाटली ना किळस या वाक्याची. मग जगताना काय झालं असेल imagine कर..

तिमिर - किळस नाही गं... खूप वेगळं असं काही.. म्हणून reaction आली कदाचित.. आता खरंच सांग नक्की काय गाठ आहे ही.. सोडवायला हवीच ही..

दिक्षा - कुठून सुरुवात करावी हेही कळत नाही.. इतकं विस्कटलंय सगळं.. मी लहान होते तेव्हा.. बाबांची थोडीशी हालचाल बोलणं बायकी होतं पण ते सहसा न जाणवणारं.. असं आई सांगते.. मला तर आठवतही नाही.. मला आठवतात ते बऱ्याचवेळा शून्यात पाहत बसलेले माझे बाबा.. बायकोने त्याच गोष्टीवरून  कधीतरी अपमान केला म्हणून निराश झालेला नवरा.. घुसमट होत असावी कदाचित त्यांची..

एकदा मी नववीत असताना शाळेत जायला बस स्टॉपवर उभी होते. अचानक बाबा आले. त्यांच्याजवळ एक बॅग होती. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

पप्पा VO - बाळा... हे घे पैसे आणि चिठ्ठी आईला दे. खूप मोठी हो. खूष राहा. आयुष्यात एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. कशात अडकून पडू नको. स्वतःसाठी जग..

लहान दिक्षा VO - तुम्ही असे का बोलता? डोळ्यात पाणी का तुमच्या? इतके पैसे? पप्पा कुठे चाललात तुम्ही? चला ना घरी.

(दिक्षा डोळे मिटूनच उठते.)

दिक्षा - मी का थांबवलं नाही त्यांना. स्तब्ध होऊन राहिले. काही कळायच्या आत ते दिसेनासे झाले. त्यांचा हात घट्ट पकडला असता तर? मी हात सोडलाच नसता तर त्यांनी झटकलाही नसता. पायाला विळखा घालायला हवा होता. तिमिर तुझा काळोख काय सांगेल यावर? बाबा नका जाऊ. पुढे मला खूप पोकळी जाणवणार आहे बापाची. थांबा ... थांबा...damn it त्यांच्या रस्त्याला का नाही लागला असा डेड एन्ड... संपायला हवा होता त्यांच्या पुढचाही रस्ता..

तिमिर - (तिच्या खांद्यावर हात ठेवत.) दिक्षा... दिक्षा.... तू काय करणार होतीस. एवढीशी पोरगी ती.. तिच्यावर नको ओझं टाकू... बस बरं खाली. 

(दिक्षा डोकं धरून खाली बसते.)

दिक्षा - अजून ऐकव ना काही.. तुझ्या काळोखातलं..

तिमिर - देवमाशाचा आवाज ऐकलायस का गं कधी?

दिक्षा - हे काय मध्येच.. देवमासा कुठून आला?

तिमिर - आजपर्यंत कुणाला बोललो नव्हतो पण मला त्याचा आवाज प्रचंड प्रचंड खेचून घेतो. आणि का तेही माहीत नाही. असं वाटतं की देव तत्वाचा आवाज असाच असेल. नुसतं ऐकूनच एक समाधी लागते आणि मनातलं साठलेलं सगळं तो पोटात घेतो..

दिक्षा - खरंच वेडा आहेस तू. मी कधी ऐकला नाही. ऐकलाही असेल animal planet वर वगैरे, पण आठवत नाही. एवढं काय खास आहे?

तिमिर - थाम्ब ऐकवतो. (तिमिर मोबाईल काढून युट्यूबमधून देवमाशाचा आवाज ऐकवतो. काही सेकंद ऐकल्यावर आवाज बंद करतो. ) 

दिक्षा - चालू राहू दे ना.... खरंच.. 
लेखक म्हणून तुला काय सुचतं रे नक्की हा आवाज ऐकल्यावर? 

तिमिर - दिक्षा मला नेहमी असं वाटतं की काळोखात मी कधीच हरवणार नाही. बघ ना, चुकायला इथे रस्ताही नाही, मंजिलही नाही आणि मुळात चुकलोय हे सांगणारे मापदंडच अस्तित्वात नाहीत. आपण आतला तळ अचल ठेवून पुढे जात रहावं... 

किर्रर्रर्र मनाने पुढे जाता जाता काही, काही आवाज मात्र ऐकू येतात. आहत अनाहत! मुंगीच्या श्वासापासून ते देवमाशाच्या हुंकारापर्यंत सगळं काही! देवमासा? म्हणजे समुद्र असेल का इथेही? आपल्या पोटात काळोख घेऊन बसलेला समुद्र जेव्हा पूर्ण काळोखात असेल तो क्षण कसा असेल...? असं वाटतं की या आवाजामागे जात राहावं. तळाशी... महासागराच्याही तळाशी. मनाच्या तळाशी.. तिथे सगळं काही गवसेल.  तिथे गवसतील फेस करू शकणार नाही म्हणून सोडलेले अर्धेमुर्धे प्रॉब्लेम्स, काही नात्यांचं सडलेपण, विकारांनी उष्टावलेला मनाचा तुकडा, आपल्यातला दानव... सगळं सगळं असं, जे आपण वर आणायला घाबरतो. 

देवमाशाने हुंकार देत रहा राहावं. फक्त.!

दिक्षा - बोलत राहावंस फक्त तू.. हे abstract ही म्हणवत नाही इतकं खरंय तुझं काळोखाचं जग.

तिमिर - थँक् यू... 

दिक्षा - बाबांनाही असंच काळोखाचं जग मिळायला हवं होतं ना..  त्यांना मापदंड लावले गेले स्त्री आणि पुरुषत्वाचे..

मागच्या वर्षी, आमच्या सोसायटीतल्या काकांनी बाबांना पाहिलं होतं. गोव्यात.. 
काका सोसायटीत आल्या आल्या आमच्या घरी आले.

काका VO - "अहो वहिनी ... आपल्या दामूला पाहिलं गोव्यात.. साडी नेसला होता.. भरपूर दागिने.. डोळ्यात काजळ घातलेलं .. किती वेळ वाटत होतं की हा तोच का? पण साला नजर चुकवत होता त्यावरून पक्कं कळलं की हा दामूच आहे.. खरं सांगायचं तर भयंकर वाटलं हो त्याचं "ते" रूप.. इतक्या दिवस सगळे समजत होते की परागंदा होऊन वेगळं बिऱ्हाड वगैरे केलं असेल. पण हे असं...? शिव~~ शिव~~ शिव~~ कल्पनेतही नव्हतं हो..  माझ्यापाशी खूप रडला.. तुमची आणि पोरीची चौकशी केली. कुणाला सांगू नका म्हणाला..."

दिक्षा- आई एकच वाक्य बोलली... भाऊजी हरवलेल्या माणसाला कायद्याने सात वर्षानंतर मृत समजलं जातं.. पंधरा वर्षे झाली आता.. मेलाय तो माणूस आमच्यासाठी.. 

मला नक्की feel काय करावं हेही कळत नव्हतं.. दिव्यावर हात पकडला तर आपण पटकन मागे घेतो. पण  कुणीतरी जबरदस्तीने हात पकडला तर? हात भाजून निघतोय... मनही भाजून निघतंय.... पण तिथून सुटता येत नाहीये..

बातमी वणव्यासारखी पसरली..  माझ्या सासरी कळलं.. नवऱ्यालाही लाज वाटायला लागली रे.. लाज... लाज वाटतेय हिजड्याच्या मुलीला आपलं म्हणायला.. याआधीचं प्रेम.. साथ देण्याची commitment वगैरे कुठं जातं रे लगेच यांचं... हेही हिजडेच ना.. परिस्थितीला पाठ दाखवणारे.. 

तिमिर - मग काय झालं? तिथे राहत नाहीस का? 

दिक्षा - त्याच्या आईने डवोर्स घ्यायला सांगितला. त्याने रोबोट सारखा मागितलाही.. आणि मी देतेय.. 

तिमिर - unbelievable..  मला सुचतच नाहीये काय बोलावं..

दिक्षा - (हसून...) चालायचंच... मीही इतका प्रयत्न करतेय बाबांचं तसं असणं accept करण्याचा पण नाही होत.. कचऱ्याचा डब्ब्याचं झाकण उघडून कचरा टाकेपर्यंत त्या वासाने जशी शीरशिरी उठते ना मनात.. तसं वाटतं त्यांना हिजड्याच्या रुपात आठवलं की.. म्हणून अत्ता तिकडे चाललेले त्यांना भेटून स्वतःचं आणि त्यांचं पिंडदान करायला.. संपवावं सगळं.. सगळंच..

(दोघेही देवमाशाचा आवाज ऐकत एकमेकांशेजारी काही क्षण बसून राहतात.)

तिमिर - दिक्षा..

दिक्षा - हं..?

तिमिर - एकदा काळोखाची सफर कर.. बघू तुझे बाबा सापडतात का तिथे.

दिक्षा - कसं करता येईल?

तिमिर - आपल्या आसपास असा काळोख आहे की जिथे तूला तूही दिसू नये.

(स्टेजवर पूर्ण काळोख.)

तिमिर - ती चौदा वर्षांची दिक्षा आपल्या बाबांना शोधतेय. 

दिक्षा - पण नाही दिसत ते. कुठल्या रुपात शोधावं तेही कळत नाही..

तिमिर - दिसणार नाहीत पण जाणवतील नक्की. ते समोर कधीच नव्हते. तुला ते नेहमीच जाणवत राहिलेत मनात. रूप.. लिंग.. जात.. सगळं चिकटलेलं आहे गं.. त्यांच्या आत्म्याला भेट.. त्यात फक्त आपल्या देशातपोरीवर प्रेम करणारा बाप असेल कदाचित.. ती छोटी दिक्षा बसलीये तिथे, त्यांच्या शेजारी...

(प्रकाशझोत दिक्षावर...)

दिक्षा - मनातुन वाटतं चेहऱ्यावर हात फिरवावा त्यांच्या. पण पुन्हा प्रचंड द्वेष वाटतो. त्यांच्यासोबत प्रेमाने नाही वागू शकणार मी... मी कचऱ्याच्या डब्ब्यात आहे असं वाटतंय.. नुसतं विद्रुप.. दुर्गंधी असणारं जग.. 

(बाजूला ठेवलेल्या पर्समधून दिक्षा एक चिठ्ठी काढते) ही बाबांनी काकांजवळ दिलेली चिठ्ठी.. फक्त मलाच द्यायला सांगितलं होतं.

(देवमाशाचा आवाज background ला चालू होतो.)

तिमिर - (भावनिक होऊन वाचतो जणू काहीकाही तिचे बाबा तिच्याशी बोलताहेत) दिक्षा... बाळा... माफ कर गं मी परतू शकलो नाही. कित्येकदा वाटायचं की यावं आणि माझ्या पिल्लाला मिठीत घ्यावं. मुके घ्यावेत पटापटा.. पण मी परतल्यावर सगळं जग डोळ्यात घृणा घेऊन मला आणि माझ्या कुटुंबाला पाहतंय असं वाटायचं. आता तर जीवनाच्या सोपस्कारातून जाणं भाग आहे. पण भेट गं मला माझ्या पोरी... निसर्गानेच पेचात टाकलेल्या या माणसाला तेवढंच हवंय गं आता.. शेवटची इच्छा समज..

दिक्षा - बाबा... घरी चला..  मला शाळेत सगळे विचारतात तुझे पप्पा कुठे राहतात. जेव्हा जेव्हा मला कशाचीही भीती वाटते, तेव्हाही तुम्ही हवे असता मला. बाबा खूप भीती वाटतेय मला... तुम्ही कशाही रुपात असा.. मला हवे आहात.. तुमची दिक्षा एकटी पडलीय हो.. बाबा.. (हमसून हमसून रडू लागते.. आणि तिमिरच्या पायांना पकडते..)

आता नाही सोडणार तुम्हाला.... आता नाही.. सॉरी... सॉरी... नाहीतर मीच इथे राहते.. आपण दोघे राहू..

(देवमाशाचा आवाज सुरू होतो.)

(ती उठून उभी राहते. तिमिर तिच्या जवळ येतो. आणि खांद्यावर हात ठेवतो. ती त्याच्या मिठीत जाऊन रडते.)

दिक्षा - तिमिर... मला जायचंय बाबांकडे.. कचरा नाही रे फुलांची बाग आहे रे ते..  (मिठीतुन बाहेर येत) सॉरी... 

तिमिर - डोन्ट वरी, अगं प्रत्येक मिठी sexual असते असं नाही. कसेय मन आता?

दिक्षा - देवमाशासोबत तरंगतय.! शांत झालंय....  बाबांना भेटायची आस लागलीये.. शोधून काढेन त्यांना.

तिमिर - आपल्याला एकाच दिशेला जायची इतकी खुमखुमी असते ना रे, त्यामुळे 'डेड एन्ड' हा डेड एन्ड वाटतो. मागे फिरायला यायला हवं. 

दिक्षा - बाय द वे.. थँक्स रे.. फॉर एव्हरीथिंग.. इन्कलूडिंग देवमासा.!

आता अजून एक काहीतरी ऐकव तुझ्या काळोखातलं.

तिमिर - (या संवादातला एकेक पॅराग्राफ संपेल तशी एकेक लाईट ऑफ होते. शेवटी पूर्ण काळोख राहतो)
काळोखाच्या प्रदेशात तुला नेहमी भेटावं म्हणतो. जेव्हा हे ठरवलं तेव्हा मात्र तुझी चुकामुक होऊ लागलीय. तुला म्हटलं होतं बघ, देवमाशाच्या आवाजाच्या चाहुलीकडे कान लावून ये. पुढे आलीस की तुझीच भाषा समजू येणारा प्रांत लागेल. तुझी भाषा.. तुझ्या हसण्याचे स्वल्पविराम, पूर्णविराम.! हो... समुद्रतळ सगळं साठवतो. 

अजूनही तुझा मागमूस नाही. कुठे अडलीस? समुद्राचा नकाशा तुझ्याच पावलांनी सजलाय बघ. कदाचित वेळ जरी लागला तरी, अस्सा तुझ्या समोर राहीन.! आपल्या प्रदेशात पुन्हा न्यायचंय तुला. रूप, रंग, स्त्री, पुरुष नाही तर मनाच्या भाषेचा प्रदेश. 

माझा समुद्र... सगळं नाही.. पण तुझं सर्व काही साठवतो.!










 







No comments:

Post a Comment