#विशालाक्षर
#पुस्तक_रसग्रहण
#happening
नोबल प्राईज विजेती फ्रेंच लेखिका Annie Ernaux हिचं खऱ्याखुऱ्या अनुभवांवरचं खरंखुरं पुस्तक. ती म्हणते की, आहे असं मांडलं नाही ते अनुभव कसले? There is no thing as a lesser truth. लेखक म्हणून मला मिळालेला प्रचंड महत्वाचा धडा.!
सत्तरीच्या दशकात गर्भपात करणे हा फ्रान्समध्ये गुन्हा होता. तसे करणाऱ्या स्त्रीची आणि डॉक्टरची तुरुंगात रवानगी होत असे. अशावेळी कॉलेजमध्ये असताना Annie गरोदर राहते. कुणी तिला गर्भपात करून देण्यासाठी मदत करू शकेल का या शोधात प्रचंड अस्वस्थ अवस्थेत सगळ्या पर्यायांची चाचपणी करते.
मला वाटतं हे पुस्तक फक्त त्या पात्राच्या त्या प्रसंगापुरतं कथन करत नाही. गर्भपात ही फक्त तिच्या आयुष्यातली घटना आहे. आपणही आपल्या मनातील असंख्य विचार, काही गोष्टी abort करू इच्छित असतो आणि अस्वस्थ होऊन गुपचूपपणे भटकत राहतो मार्ग शोधत. तो प्रवास आणि एखादा मूलभूत हक्क नाकारल्यानंतर वाटणारी अगतिकता.. आयुष्याच्या त्या तुकड्याकडे कित्येक वर्षांनंतर पुन्हा पाहिलं, तर स्वतःविषयीच्या प्रसंगातही लेखिकेची तटस्थता जाणवते. लेखिका म्हणते, "आपल्या भूतकाळातील अनुभवांवरचं लेखन तेव्हाच प्रभावी होतं जेव्हा आपण तटस्थ राहूनही त्या काळाशी एकरूप होतं. जेव्हा असं वाटतं की, हे तर कालच तर घडलं होतं.!"
मनातलं मंथन अजिबात आततायी किंवा रडव्या सुरातलं नाही. तरीही अस्वस्थता खोलवर जाणवते. मधूनच ती कथेच्या प्रवाहातून बाहेर येत आपल्याशी काहीतरी संवाद साधते. या प्रसंगावेळी आपण डायरीमध्ये एन्ट्रीज काय केल्या होत्या हे ती सांगते. ती बोलत असते आणि आपण कान लावून ऐकत असतो.
प्रत्येक प्रसंगावेळी ती तारीख देते. तारखेबाबत ती म्हणते, "तारीख म्हणजेच, तो दिवस हा एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व घेऊन आलेला असतो. तारीख म्हणजे प्रसंगातील खरेपणा रिफ्लेक्ट करते. ती आयुष्यातील जिवंत आणि मेलेपणा वेगवेगळे करते."
फक्त ९५ पानी पुस्तक.... पण मंथन सागराइतकं करतं. आवश्यक तितक्याच शब्दांत.. जसं आहे... जितकं आहे तसं दिल्यामुळे कदाचित ते खूप खोल जातं..
तळटीप-
तिच्या बोलण्यातून खूप साऱ्या क्लासिक फ्रेंच लेखक कवींचे उल्लेख येतात. कधी त्यांची नावे ऐकलीही नव्हती. ते पुढील वाचनासाठी टिपून ठेवले आहेत.
©विशाल पोतदार
#booklover #bookworm #पुस्तक
No comments:
Post a Comment