.post img {

Automatic Size

Saturday, 3 January 2026

कणादच्या बाबाची डायरी ५ - २०२६


०१ जानेवारी २०२६)

Happy New Year कणूल्या...

आता तुझी नवीन फेज सुरू झाली आहे. सगळ्या गोष्टी स्वतःच्या हाताने/ स्वतः करायच्या. म्हणजे गाडीवर आम्ही उचलून नाही ठेवायचं, तर तुझा तू धडपडत चढून बसणार. मग त्यात 5 मिनिटे extra गेली तरी चालतील. गाडीवर बसलो की चावी तुला लावायची आणि चावी फिरवायची (तीही लवकर फिरत नाही) आणि मग स्टार्टर दाबायचा. चप्पल स्वतः घालायची. चप्पल घालताना हात न लावता तुला घालायची असते मग त्यात अजून वेळ लागतो. चुकून तू करण्याअशी आम्ही या गोष्टी केल्या तर मग जाम चिडतोस. कधीकधी तू रडत चिडत असलास तरी आम्हाला आमच्या कळत नसतं की नक्की तुला कसं हवं होतं. मग ते जाणून घ्या घ्यायला दमछाक होते. ही फेज थोडी कठीण वाटतेय,  पण आई-तू-मी आपण एकत्र पार करू..❤️

०२ जानेवारी) 
काल आपण अक्षरनंदन शाळेच्या प्रोसेससाठी गेलो होतो. ऋग्वेदही होता. खूप मज्जा केली नंतर आपण.! ऋग्वेद त्यांच्या गाडीवर बसून जातो तेव्हा तू वेदू पाहिजे आणि म्हणून रडतोस. मग सारखं सांगावं लागतं की ते बघ त्यांची समोर गाडी आहे.😀

०३ जानेवारी)
आज तू उठलास तेव्हा मी हॉल मध्ये होतो. तू खूप गोड हाक मारलीस... "बाबा?" मी ओ दिल्यावर म्हटलास "यं.."
किती प्रेमाने बोलावतोस रे!!❤️🦋

०७ जानेवारी)
तुझे ऍडमिशन अक्षरनंदनमध्ये करण्याची प्रोसेस चालू आहे. खूप उत्तम आणि नामांकित मराठी शाळा आहे. आम्ही दोघांनी विचारपूर्वक ठरवलेय की तुला मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करावे. पुढे आयुष्यात यश आले मिळणे आपल्या तिघांच्याही हातात आहे. आपण मज्जा करत शिकू. 

आज त्या शाळेची ग्रुप चर्चा झाली. तुला नेहा मावशीकडे ठेऊन आम्ही शाळेत गेलो. आम्ही दोघांनीही त्यात छान उत्तरं दिली. मनात इतकं दडपण होतं ना रे!! कारण आमच्या विचार तसेच बोलण्यावर तुझं ऍडमिशन अवलंबून आहे. तुझं भविष्य अवलंबून आहे. हे मनात आल्यावर खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली.


०९ जानेवारी)
कणाद..आपली मुल निरीक्षण साठी निवड झाली आहे. १२ तारखेला आपण तिघेही शाळेत जाणार.!

१२) आज आपण मूल निरीक्षण साठी अक्षरनंदन मध्ये आलो होतो. आजही खूप दडपण होते. पण मनात विचार केला की तुझ्यासाठी योग्य असेल तेच होईल. ही शाळा तुझ्यायोग्य असेल तर मिळेलच ऍडमिशन. 

छोट्या गटाच्या वर्गात आपल्याला सोडले. एकाच पालकाला आत थांबायची परवानगी होती. मग मी तुझ्यासोबत थांबलो. आधी ब्लॉक्सची गेम खेळलो. तिथल्या ताई तुला ब्लॉक असे लावू शकतो का, तसे लावू शकतो का यासाठी गाईड करत होत्या. तुही छान लावत होतास. लागत नसेल तर चिडत नव्हतास. 

त्यानंतर त्यांनी पाटीवर त्या ब्लॉक्सच्या घरासारखा आयत काढायला सांगितला. आधी तू नाहीच म्हणत होतास.पण थोड्यावेळाने तयार झालास आणि त्यांनी काढलेल्या आयताच्या बाजूला तुही आयत काढलास. त्याच्या पलीकडच्या बाजूलाही आयत काढायचा प्रयत्न केलास पण जागा कमी होती. पण त्यांच्या drawing मध्ये तू न जाता लाईन वळवून घेतलीस. हे त्यांना किती आवडले माहीत नाही, पण मला खूप आवडले. Proud of you!

१३ जानेवारी)
झोपताना तुला अजूनही आईचे पोट पकडायला आवडते. पोटाला तू पॉप पॉप म्हणतोस.

१४ जानेवारी)
आज शाळेत जाताना किती रेंगाळत होतास याचे उदाहरण देतो. म्हणजे शाळेतच नाही तर खाली जाताना तसाही रेंगाळतोसच! 

बाहेर निघायच्या चप्पल कुठलं घालायचं इथून सुरुवात. पिवळ्या रंगाचे चप्पल तुटलेय म्हणून तुला म्हटले लाल वाले घाल तर तुला पिवळ्याच रंगाचे घालायचे होते. मग खूप convince केल्यावर लाल चप्पल घालायला तयार झालास. पण ते स्वतःच घालायचे होते त्यात २-४ मिनिटे गेली. 

खाली जाताना सगळ्यांच्या बेल वाजवायच्या होत्या. आता मला माहिती झालेय की कुणा कुणाच्या बेल बंद आहेत. तुला त्या बंद बेलचीच बटणे मी दाबू देतो. पहिल्या मजल्यावरून खाली उतरलो इतक्यात तू रडत वर बोट करून .. "उडी मारायची म्हणू लागला.." मग मला कळले की वरून येताना पायरीवरून उड्या मारत यायचा विसरला. मग पुन्हा दुसऱ्या मजल्यावर आलो आणि मग एकेक पायरीवरून उड्या मारत आलो.

गाडीवर बसताना मी तुला उचलून वर ठेवायचे नाही तर तुला चढून वर जायचे असते. तुझ्या उंचीपेक्षा जास्त उंच गाडीची सीट आहे. मग चढायला अजून दोन मिनिटे आणि मग चावी लावून फिरवायला एक मिनिट आणि मग मी neutral केल्यावर तू स्टार्ट करणार आणि मग आपण निघणार.

तर इतका सोहळा असतो खाली जाण्याचा. हे कदाचित कंटाळवाणे वाटेल पण खरोखर हे पाहताना मज्जा ही असते.

१५ जानेवारी)
आज सकाळी मी तुला भात खाऊ घालत होतो. मग थोड्यावेळाने तुला खेळायचं होतं. मला म्हटलास.."बास... ठेव आता.."😀