.post img {

Automatic Size

Sunday, 16 June 2019

वटपौर्णिमा - जन्माचा फेरा (लघुकथा)

ठिकाणी बसेस बदलत ती कशीबशी प्रतीक्षानगरमध्ये पोहोचली. कालच्या तासाभराच्या पावसाने आज ट्रॅफिक जाम करून टाकलं होतं. तिच्या मनात आधीच पन्नास शंका आणि अनामिक भीती दाटली होती. त्यात ह्या रस्त्यावरील किचकीचीमुळं पैठणी चिखलात बरबटून गेल्यानं चिडचिड होत होती.

एका सोसायटी कंपाऊंडला लागून असलेला पोक्त वड ढगाळ वातावरणांत गडद हिरवा दिसत होता. त्याच्या अर्ध्या पारंब्या सोसायटीच्या आत तर अर्ध्या फुटपाथमध्ये गुडूप झाल्या होत्या. काही कोवळ्या पारंब्या आत्ता कुठे जमिनीकडे सरसावू लागल्या होत्या. काल ऑफिसमधून परतताना तिची नजर त्या वडावर पडली आणि मनोमन लगेच ठरवलं की उद्या पूजनाला इथेच यायचं. शिवाय घरापासून बरंच लांब. आणि इथे ना कुणी नातेवाईक, ना कुणी ओळखीचं नसल्यानं प्रतीक्षानगर योग्यच ठिकाण होतं.

बस मधून उतरताच पर्समधून नाजूकशी नथ काढली. रेखीव नाकाच्या सुंदरतेशी स्पर्धा करत नथ नाकाला नकळत बिलगली. मोबाईलचा फ्रंट कॅमेरा सुरू करून कमानदार भुवयांच्या मधोमध टिकली लावली. अशी मोठी टिकली लावली की ती भलतीच सुंदर दिसायची.

पुरुषांच्या चोरट्या नजरा आणि स्त्रियांचे मत्सराचे उसासे पार करत ती वडाजवळ आली. आधीच तिथे दोन बायका पूजन करत होत्या. पटकन पर्स मधून पूजेचे साहित्य काढुन ती पूजन करायला बसली. त्या बायकांनी क्षणभर तिच्याकडे अनोळखी नजरेने पाहिलं मात्र आपापली पूजा संपल्यावर त्या निघून गेल्या.

तिनं वडाची पूजा केली. दोऱ्याची गुंडीचा पर्सच्या झीपमध्ये अडकून गुंता झाला होता. तिला त्याचा राग आला पण गडबडीत गुंता सोडवण्याशिवाय पर्याय नव्हता. तशीही आयुष्यातले किती गुंते सोडवतच होती रोज. कसाबसा दोरा मोकळा केला आणि वडाला दोऱ्याचे एक एक वेढन देत फेरे मारू लागली. प्रत्येक फेऱ्यासोबत मनालाही विचारांचे वेढे बसत होते. असंख्य सुखद आणि दुःखद आठवणींच्या पारंब्या हृदयात रुतत होत्या. वडाच्या पसरलेल्या फांद्यांमधून निघालेल्या दोरखंडासारख्या पारंब्या पाहिल्या. वडाला आधार मिळावा म्हणून त्याच्या प्रेमापोटी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं होतं. का कुणासठाऊक तिला खूप हलकं वाटलं. मनात फक्त चांगल्या आठवणी आल्या आणि बघता बघता हातातला दोराही संपला. दोऱ्याचे टोक सोडताना, त्याचाच हात हातातून निसटल्या सारखा वाटला. मनात काहूर आणि डोळ्यात अश्रू दाटून आले.

वडापुढे गुडघे टेकून बसली, डोळे मिटून हात जोडले. अगदी हृदयाच्या धमन्यांना एकवटून आणि श्वास रोखून मनात म्हणाली, "पुढच्या जन्मात भेटशीलच, मी अशी सोडणार नाही तुला. पण त्यावेळी प्लीज असा अर्ध्यावरती सोडून नको रे जाऊ."

कसाबसा हुंदका आवरून तिथून जाऊ लागली. क्षणात काही आठवलं आणि चमकली. कपाळावरची टिकली आणि गळ्यातलं मंगळसूत्र तसंच होतं. पटकन ते काढून पर्स मध्ये टाकलं. समाजाच्या नियमावलीमध्ये तिचं सजणे पाप असलं तरी मनातल्या त्याच्या आठवणींनी क्षणोक्षणी सजूण मोहरत होती.




टीप- आपण कथा वाचलीत याबद्दल खूप खूप आभार. आपला अभिप्राय म्हणजे एक पर्वणी असते तर तो जरूर द्या. आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

4 comments:

  1. मस्त.
    पण कथा अपूर्ण वाटली.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद राम..... छोटीच लिहायचा प्रयत्न होता त्यामुळे कदाचित वाटली असेल..😊

      Delete
  2. सत्ययुगातली प्रेमकहाणी कलियुगात लिहली आहे. कारण तीन खरं प्रेम केलं आहे.ते एका पतिव्रताचे आत्मकथा आहे असं वाटतं. धन्यवाद !!

    ReplyDelete
  3. Anand kharat सत्ययुगातली प्रेमकहाणी कलियुगात लिहली आहे. कारण तीन खरं प्रेम केलं आहे.ते एका पतिव्रताचे आत्मकथा आहे असं वाटतं. धन्यवाद !!

    ReplyDelete