.post img {

Automatic Size

Saturday, 26 November 2022

पुस्तक परिचय - कृष्णदेवराय

#विशालाक्षर
#पुस्तक_रसग्रहण

शीर्षक - कृष्णदेवराय
लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली
प्रकाशक - मेहता पब्लिकेशन

मी आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून पुढच्या इतिहासाच्या आधारावर बेतलेल्या कादंबरी वाचल्या आहेत. यामध्ये शिवाजी सावंत, रणजित देसाई, ना.स. इनामदार, विश्वास पाटील या लेखकांची नावे प्रामुख्याने समोर येतात. परंतु ज्या हिंदू साम्राज्याकडे जिजाऊ आणि शिवरायदेखील प्रेरणास्थान म्हणून पाहत, त्या विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय यांच्यावरील लेखन काही गवसत नव्हते. नुकतेच लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे पुस्तक नशिबाने समोर आले आणि भारताच्या हिंदू साम्राज्याचा दैदिप्यमान इतिहासाचा मानबिंदू असणारा काळ डोळ्यासमोर झळकत उभा राहिला.  

ऐतिहासिक कादंबरी लिहायची असेल तर मुख्यतः त्यातून लढाया, राजकारण, कूटनीती कट कारस्थाने या नाटयमय घडामोडींवर भर देण्याचा लेखकाला मोह आवरत नाही, कारण वाचकाला खिळवून ठेवण्याची क्षमता अशा घटनांमध्ये असते. परंतू एखाद्या सम्राटाने लढाया करून राज्यविस्तार केल्यानंतर त्या राज्यात सुव्यवस्था, विद्याश्रय, कलाश्रय या गोष्टी कशा फुलवल्या हे त्याचे सर्वात महत्वाचे कर्तृत्व असते. आणि मला या पुस्तकातली सर्वात भावलेली गोष्ट हीच.! या पुस्तकातील खूपसा भाग कृष्णदेवराय यांचा काव्य, कला याचा व्यासंग, त्यांचा कुटुंबातील वावर, राज्यव्यवस्थेची नीती या भागासाठी समर्पित केला आहे. कृष्णदेवराय यांनी लिहिलेल्या 'अमूल्यमाल्यदा' ग्रंथाचे वर्णन तर अतिशय रसाळ शब्दांत केले आहे. त्याकाळातील इतर कवींची माहिती आणि वैशिष्ट्ये विविध संवादातून अलगद उतरवली आहेत. लेखकाची भाषाच इतकी मृदू आहे की आपण त्यात गुंतत जातो. काही संवादात त्यानंतरच्या काळात भाषेत आलेल्या म्हणी येत असल्याने तीच वाक्ये काहीशी खटकतात. परंतु इतर संवाद अलंकृत आणि आजची बोलीभाषा याचा सुरेख मेळ घालून अधिक प्रभावी केलेले आहेत. 

ऐतिहासिक कादंबरीमध्ये शृंगारीक प्रसंग मांडणे म्हणजे लेखनातील नाजूक भाग.! अशावेळी शब्दांना लगाम लावावा लागत असला, तरीही त्यात नाजूक बेफामता असावी लागते. योग्य शब्दांत आले तर ते गोड होते, परंतु वाहवत गेले तर हिरमोडही होऊ शकतो. लेखकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शृंगारिक प्रसंग इतक्या नाजूक पावलांनी येतात, की ते वावगे न वाटता खूप गोड वाटतात. 

त्यातील लढाई, राजकारण या प्रसंगातून नाट्यमयता येत राहिल्याने कथेचा प्रवाहही आपलं अवधान राखून ठेवतो. कृष्णदेवराय यांच्या व्यतिरिक्त येणारी महत्वाची पात्रे महाअमात्य तिम्मरसु, राणी चिण्णादेवी, साम्राज्ञी तिरुमालादेवी, तेनाली रामकृष्ण ही पात्रेदेखील ठसठशीतपणे मांडली आहेत. कादंबरीमध्ये प्रत्येक पात्राला न्यायपूर्ण स्पेस मिळत जाते. आजपर्यंत जितके काही वाचनात होते, त्यातून तेनालीराम यांचे पात्र फक्त हजरजबाबी, विनोदी इतकेच माहीत होते. परंतु ते देखील एक महान कवी होते हे या कादंबरीमुळे माहीत पडले.

इतिहासातील पात्रांची आताच्या वाचकांच्या मनातील प्रतिमा घडवण्याची किंवा बिघडवण्याची ताकद अशा कादंबरीमध्ये असते. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीमत्वामुळे भारावले गेल्याने त्यांचं चरित्र पूर्वग्रहाने मांडले जाते.  परंतू लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी, कृष्णदेवराय संदर्भांमधून जसे दिसले तसेच मांडले आहेत. सम्राटाची महानता जरी प्रामुख्याने दिसत असली तरी जिथे बोट ठेवण्याची गरज आहे तिथे तटस्थपणे असे प्रसंगदेखील मांडतात. मला वाटतं दृष्टिकोनातील तटस्थपणा हाच या कादंबरीचे मोठे शक्तीस्थान आहे.

असे पुस्तक आवडल्यावर लेखकाशी संवाद साधण्याचा मला नेहमी मोह होत असतो. लेखक लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी भौतिक जगाचा निरोप घेतल्याने ते शक्य नसल्याचे शल्य आहेच. पण लेखक आपला अंश शब्दांत पेरून जात असतो, हेही तितकेच खरे.

काळाच्या मातीआड गेलेले हे इतिहासातील झळकते पान म्हणजेच कृष्णदेवराय.!! नक्कीच वाचावे असे.

©विशाल पोतदार