चित्रपट- Gods must be crazy (1980)
लेखन, दिग्दर्शन- Jamy Uys
चित्रपटाची सुरुवात दोन भिन्न मानवी जमातींच्या तुलनात्मक नॅरेशनने होते. एका बाजूला कलाहरी वाळवंटात राहणारे आदिवासी, ज्यांचा आधुनिक जगाशी काही एक संबंध नाही. जमिनीवर मालकी हक्क दाखवावा अशी बुद्धी नाही. वेळ आणि काळाची संकल्पनाच नाही. आणि दुसऱ्या बाजूला सकाळी अगदी वाजता उठून कुठंतरी धावणारे आधुनिक (?) जग. सगळं काम, वेळ वाचवण्यासाठी चाललं असलं तरी यांना मोकळा वेळच नाही. या नॅरेशन नंतर आपल्याला प्रश्न पडतो की नक्की यात कथा काय असेल.
पण कथाबीज येतं ते कोकाकोलाच्या रिकाम्या बाटलीवरुन. छोट्या विमानातील एक वैमानिक कोकाकोला पिऊन बाटली खाली टाकतो. ती जेव्हा एका आदिवासीला मिळते तेव्हा त्याला ती वस्तू देवानेच टाकली असा समज होऊन ती घरी घेऊन येतो. त्यांना काच हा प्रकारच माहीत नसल्याने मग या बाटलीवरून खूप वेगळ्या धाटणीची कथा मूळ धरू लागते. (ती इथे सांगणार नाही, कारण थेट पाहताना आलेली मजाच वेगळी.)
कलाहरीच्या दुसऱ्या बाजूला जीव शास्त्रज्ञ (स्टेन) आणि शहरातून आदिवासी मुलांना शिकवण्यासाठी आलेली एक सुंदर मुलगी (केट) यांचं कथानक उभं राहत असतं. खरी मजा सुरू होते, जेव्हा बुशमॅनची भेट केट आणि स्टेनशी होते. त्याच्या बेसिक बुद्धीला ते चक्क देव वाटू लागतात. त्याला हे आधुनिक जग अगदी स्वप्नवत असतं. एक बंडखोर डाकू त्या वाळवंटात आल्यावर कथानक एका शिखरावरच पोहचतं.
मुळात ही कथा अतिशय मजेदार रीतीने सादर केल्याने मनोरंजन तर शंभर टक्के होतं. बरेचसे क्षण अगदी हसून बेजार करतात. पण उलटपक्षी काही प्रसंग आपल्या आयुष्यातील कित्येक बाबींचा पुनर्विचार करायला लावतात.
त्या आदिवासीच्या चेहऱ्यावरील सुंदर, निरागस, निर्विकार हास्य आणि कामात त्रासलेला स्टेन यांची तुलना, सु8खाची खरी व्याख्या काय? हा प्रश्न वारंवार समोर आणतो. 'सेपिअन्स' पुस्तकाप्रमाणे, "मानवाने वेळ वाचवण्यासाठी शेती करून एकाच ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आणि तेच त्याच्यासाठी चक्रव्यूह बनलं. कधीही न सुटणारे. वेळ वाचवण्याच्या नादात माणूस वेळच गमावून बसला."
हा एक अतिशय विलक्षण चित्रपट वारंवार पहावा असा आहे.
No comments:
Post a Comment