.post img {

Automatic Size

Saturday, 8 March 2025

Spring, Summer, Winter and Spring (2003)

Spring, Summer, Fall, Winter and Spring (2003)

दिग्दर्शक - कि-डुक किम (Ki-duk Kim)
भाषा - कोरियन

शांत तळ्यात तरंगत असणारा एक बुद्धविहार, त्या विहाराची देखभाल- पूजा करणारा मॉंक आणि त्याने सांभाळ केलेला एक लहानगा मुलगा... इतकासा कॅनव्हास असलेला सिनेमा. परंतु हा सिनेमा मनात जे अफाट चित्र उभारतो त्याला अंतच नाही. मॉंकने मुलाला दिलेली शिकवण, म्हणजे हा चित्रपट! ती शिकवण प्रवचनातून येत नाही, ती आयुष्याच्या वर्तुळातून येते. यात कुठेही तत्वज्ञान सांगणारे मोठे मोनोलॉग नाहीत. कुठेही दिखावा नाही. खडकावर पडणारा एकेक थेंब खडकाला भेदू शकतो अशी त्यातली एकेक फ्रेम आपल्या मनावर हळुवार आघात करत राहते. 

दिग्दर्शकानेच लिहिलेला हा चित्रपट. लिहिताना जणू काही त्या बुद्धविहारात बसून लिहिला असावा असा हळुवार आणि संथ! कथा संथ असली तरी खिळवून ठेवते. शेवटचे २-३ मिनिटे हा चित्रपट अजून थोडी कथा वाढली आहे, जे मला अनावश्यक वाटले.

तलाव, बुद्धविहार आणि तलावाबाहेर येण्यासाठी लागणारी होडी इतकेच काय सिनेमॅटोग्राफीचे घटक. परंतु सर्व ऋतुंमधून प्रवास करणारी कथा असल्याने, प्रत्येक ऋतूत नाटकातला सेट बदलल्याप्रमाणे दृश्य बदलत राहते. 

Oh Yeong Su हे कोरियातले जेष्ठ अभिनते! सध्याच्या गाजलेल्या Squid Game या सिरीजमध्येही त्यांचा अभिनय आहे. खूप सहज वावर आणि अभिनयात एक authority आहे.त्यांनी मॉंकच्या भूमिकेत एक मेडीटेटीव्ह भाव आणला आहे.  

विहारातून बाहेर येऊन जंगलात अन्न गोळा करण्यास, मॉंक आणि मुलाचा होडीमधूनचा रोजचा प्रवास अध्यात्म आणि जीवन याचा एक दुवा दाखवतो. त्या होडीशी असलेले नाते तुटले की माणूस सैरभैर होतो. त्याच्या आयुष्याची होडी भरकटत राहते. कदाचित तो मॉंक (शिक्षक) म्हणजे ती होडी आहे. जेव्हा तुमचा पिंड जीवनाच्या भट्टीत तयार होऊन अध्यात्मिक प्रवासासाठी तयार झाला की होडीचे काम संपते. हा सिन म्हणजे चित्रपटाचा कळस आहे. त्यासाठी winter या ऋतूचा केलेला वापर... अहाहा..! मास्टरक्लास..!!

महायन बुद्धीझम मधला प्रज्ञापरमिता स्तोत्र (Heart Sutra) यात आले आहे. यामध्ये बोधीसत्व शून्यता आणि शून्य होणे सांगतात.

शून्य हे आकार आहे... आकारही शून्य आहे..
काही निर्मित होत नाही.. काही नष्ट होत नाही...
सर्व काही अद्वैत आहे...

त्याची शेवटची ओळ आहे.....
गते गते पारगते पारसंगते बोधि स्वाहा  "Gone, gone, everyone gone to the other shore, awakening, svaha."

या चित्रपटामुळे या स्तोत्राची देण आपल्याला मिळते.


©विशाल पोतदार

तळटीप - 
● Sexual content alert - चित्रपटाच्या मध्यात काही सेकंदाचे सेक्शुअल सिन्स आहेत.
● हा चित्रपट ott वर उपलब्ध नाही. हवा असल्यास मला संपर्क साधा.