२६ जुलै २०२५)
आज तुझा तिसरा वाढदिवस.! गावी खूप छान bday केला तुझा. तांमी, आजी आणि आजोबा होते. टॉमचा।फोटो लावलेला केक आणला होता खूप आवडला तुला.
कसे पटपट 3 वर्षे गेली. किती बदलतोयस तू दिवसागणिक. आता खूप गोड बोलू ही लागलायस. खूप खूप खूप जीव बाळा.!! आय ल्यू.!! खूप जीव लावलायस माझ्यावर.!!
२९ जुलै २०२५)
कणादच्या दर्शनासाठी लागलेली देवांची रांग... कोणालाही VIP पास नाही. उंचीनुसार दर्शन मिळेल..😃
त्याच्या आईने त्याला विचारले कोण कोण आहेत हे?
तर बोट दाखवून असे सांगितले..
(विठ्ठल) बाबा
(रखमाई) आई
(गणपती) बाप्पा (आधी हत्ती म्हणायचा)
(अन्नपूर्णा) दिदी
(बाळकृष्ण) बेबी
अशी नावं सांगितली.
क्षणभर मजा वाटली आणि नंतर भरूनच आलं. त्याने ज्या विश्वासाने ही ओळख करून दिली, तेवढी कोवळी, निरागस भक्ती आपल्याला कधी जमेल?
सुरुवातीला तो हे देव घेऊन खेळायचा त्यावेळी "नको कणाद, बाप्पाबरोबर नाही खेळायचं" असं आपसूक म्हणायचो. पण नंतर वाटलं की का भीती दाखवायची देवाची. देवही तितक्याच आनंदात खेळत असेल ना त्याच्याशी.
५ ऑगस्ट)
संपदाकाकी ने तुला एक कलर बुक गिफ्ट केलेय ज्यावर पाण्याने ब्रश केला की आतली चित्रे दिसतात. तुला वाटतं की तूच कलर करतोयस.
आज ते करताना आम्हाला सांगत होतास.
"बाबा.. हेक्का (खेकडा).. कलं कलं (कलर कलर)."
"ऑक्टोपस... कलं कलं (कलर कलर)."
18 ऑगस्ट)
आज तू पूर्ण नाव सांगितलंस.. कणाद विशाल पोतदार😍
आईचं नाव अवघड वाटतं म्हणून घेत नाहीस..
०८ सप्टेंबर २०२५)
आपल्या टीव्ही वर माझ्या गुगल फोटो मधले फोटो दिसत राहतात. मग त्यात अचानक टॉम खेळणं होतं ना त्याचा।फोटो दिसला. मग तू मागे लागलास, 'टॉम पाहिजे.. टॉम पाहिजे आणि म्हणून. मग zepto वरून मागवून दिला. आता कालपासून भरपूर टॉमशी बोलणं चालू आहे तुझं.
१० सप्टेंबर)
अशा रीतीने टॉमला आपटून आपटून तू बंद पाडलेला आहेस.
१४ सप्टेंबर)
एक आठवडा झाले तुझी दाढ दुखत होती. रात्री झोपताना तू दाढेकडे सारखं बोट दाखवत होतास. २ दिवस खूप कमी झोपत होतास. Almost रात्रभर जागे होतो आम्ही तुझ्यासोबत. दाढ किडली आहे तुझी. मग २-३ डॉक्टर्स कडे जाऊन फायनली पूर्वा नावाच्या डॉक्टर कडून त्यात सिमेंट भरून घेतलं. घरी आल्यावर तू शांत झोपलास हे पाहण्याचं सुख वेगळंच होतं रे.!
१५ सप्टेंबर)
एकदा तू ऋग्वेद कडे जायचं म्हणत होतास, मग मी सहज म्हटले की वेदू ला जीप द्यायची का तुझी? तर तू हो म्हणालास. आता कधीही वेदूची आठवण झाली की तू वेदू जीप.. वेदू जीप असं म्हणतोस. म्हणजे वेदू जीप याचा अर्थ तुझ्या मनात 'वेदूकडे जायचं असा आहे.
२३ सप्टेंबर २०२५)
सध्या तुला स्पायडर खूप आवडतोय. त्याला तू पायबर म्हणतोस. काल सकाळी उठल्यापासून स्पायडरच दाखव म्हणून मागे लागलास. मला तर कुठे दिसत नव्हता. त्यानादाने घरातल्या जाळ्या काढल्या मी. 😀 मग आपल्याला एक स्पायडर दिसला आणि तू खूष झालास.
२४ सप्टेंबर २०२५)
आज दूध देणाऱ्या काकाने दुधाची पिशवी बाहेर ठेऊन जाताना दार वाजवले. आणि तू म्हणालास "आदोबा.... (आजोबा)..." तुला आजोबा, आजी, तांमी, सानुदीदी, वेदू या सगळ्यांची सारखी आठवण होत असतेस. वेदू सोबत असताना खेळण्यावरून भांडता खूप, पण घरी आल्यावर मग सारखं वेदू वेदू करत असतोस.
२५ सप्टेंबर २०२५)
तुझी गाडी चालवायच्या आधी फ्रीजची चावी घेऊन गाडीला लावतोस आणि मग गाडी सुरू झाल्यासारखी वाटते आणि मग गाडी चालवतोस..😀
०७ ऑक्टोबर २०२५)
आज शाळेत सोडताना खूप रडत होतास. दोन्ही डोळ्यांतून धारा लागलेल्या. तू हट्ट म्हणून रडताना आणि दुःखी-अस्वस्थ असतानाचा फरक कळतो मला. खूप अस्वस्थ वाटलास म्हणून मग पटकन सोडून जावं वाटेना. उचलून घेऊन मिठी मारली. समजून सांगितले की तुला आई न्यायला येईल ना बाळा दुपारी. शांत होत आला. मग म्हटलं, "सॉरी कणाद, तुला सोडून जातोय." तर रडवेल्या सुरातच म्हटलास,"इट्स ओके."
तुझं ते इट्स ओके खूप टणांची ओझं कमी करून गेले.😢
लव्ह यू पिल्लू..!!❤️
No comments:
Post a Comment