.post img {

Automatic Size

Monday 8 October 2018

झाडांची भाषा आणि त्यांचा आक्रोश....

नुकतंच अश्विन सांघी यांचं "Keepers of Kaalchakra" हे पुस्तक वाचलं. पुस्तकाची कथा जेवढी रंजक होती तेवढीच त्यात दिलेली माहिती अप्रतिम वाटली. त्यातून भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि पौराणिक तत्वज्ञान यांची सांगड घालणारी माहिती खूप छानरीत्या सांगितली आहे. त्यातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, 'झाडांच्या संवेदना'.


Cleve Backster (क्लेव्ह बॅकस्टर) हा माणूस अमेरिकन गुप्तचर संघटनेत (CIA) पॉलिग्राफ म्हणजेच lie डिटेक्टर टेस्ट करण्याचं काम बजावायचा. पॉलिग्राफी टेस्ट, एखाद्या माणसाचं विधान खरं आहे की खोटं हे जाणण्यासाठी असतं. खोटं बोलताना आपल्या शरीरातील स्ट्रेस लेव्हल वाढते आणि शरीरातला बदल sensing electrodes डायल वर दर्शवतात. 

Cleve Bacster

एकदा ऑफिस मधल्या झाडाकडे असेच टक लावून पाहताना त्याच्या डोक्यात सहज एक कल्पना आली. झाडं तर सजीव आहेत. त्यांची वाढ होते, प्रजनन होते, फुलं, फळं येतात. मग बाकी सजीवासारखं त्यांना मन किंवा मेंदू असेल का? त्यांची काही भाषा असेल का? त्यांना दिसत असेल का? हे जाणून घेण्यासाठी मग त्यानं एक प्रयोग करायचा ठरवला. त्याने पॉलिग्राफ मधले sensing electrodes झाडांच्या पानांना जोडले. त्याला वाटलं की, जर झाडांना आजूबाजूची परिस्थिती समजत असेल तर त्याच्या अंतर्गत काही तरी reactions होत असेल. मग त्यानं झाडाच्या त्या पानाला पाणी, माती अशा विविध पदार्थात बुडवून पाहिले. पॉलिग्राफ चा काटा काही जागचा हलला नाही.

त्याला हा प्रयोग म्हणजे पोरकटपणा वाटला आणि स्वतःच्याच मुर्खपणावर हसू आले. एवढा टाईम वाया घालवल्यावर पानाचे electrode काढणार तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक अजून कल्पना आली. "मी जर या झाडाला काही ईजा केली तर? त्यावेळी तरी नक्कीच झाडामध्ये काही reaction व्हायला हव्यात." त्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिलं तर त्याला लायटर दिसला. पानाला आग लावून पाहू असा विचार करून लायटर घेण्यासाठी सरसावला तोच पॉलिग्राफ चा काटा हलू लागला. हे तर त्याच्या विचारा पलीकडचं होतं. त्यानं तर झाडाला ईजा करण्याचा फक्त विचार केला होता, कृती तर लांबचीच गोष्ट होती. म्हणजे झाडं आपल्या विचारातील तरंग आणि त्याची स्ट्रेस लेव्हल detect करू शकतात? कलेव्ह चा आनंद गगनात मावत नव्हता. झाडांनाही एक भाषा असते, हे त्याला समजलं होतं.

त्याच्या ह्या प्रयोगाला सातत्याने 100% एकसारखा response मिळत नव्हता म्हणून science community ने त्याची 'Primary Perception थिअरी' नाकारली. पण त्या प्रयोगामुळे झाडांच्या भाषेच्या शोधावर काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. आणि झाडं आजूबाजूच्या परिस्थिती सेन्स करू शकतात हे समजले. आपला स्पर्श झाल्याबरोबर लगेच पानं मिटून घेणारं  लाजाळूचं झाड सर्वश्रुत आहेच. जर ते एखाद्या स्पर्शाने, एखाद्या प्राण्यांप्रमाणे हालचाल करत असतील तर जरूर त्याच्या अवयवांमध्ये एक प्रकारचं संभाषण आहे.

या सगळ्या प्रयोगातून झाडांना एक काहीतरी भाषा आहे हे समजतं. पण मला याचं वाईट वाटतं की झाडांनी स्वतःला असणारा धोका जरी ओळखला तरी स्वतःला वाचवण्यासाठी जास्त काही करू शकत नाही. हे या जीवाचं दुर्दैव नाही का? खरंच त्यांना जर मेंदू असता आणि स्वसंरक्षणार्थ अवयवांची हालचाल करण्याचं सामर्थ्य असतं तर? कुणी 'माई का लाल' झाड तोडण्यासाठी जवळ आला असता तर झाडांनी फांद्यांचे धाप धाप तडाखे मारले असते.

झाडं इतर प्राण्यांप्रमाणे विचार करत असते, हालचाल करत असते तर ही दुनियाच खूप वेगळी असती. झाडांना इतकी सुंदर आणि सुगंधित फुलं, इतकी गोड गोड फळं येतात. पण त्या वेड्याना त्याची जाणीव असते की नाही काय ठाऊक. नसावी कदाचित. कारण जर तशी जाणीव असती तर मानवाप्रमाणे त्यांच्यात सुद्धा अहंकार जागृत झाला असता. त्यांच्यात देखील वर्णभेद आला असता. आंब्याचं झाड, गुलाब म्हणजे उच्चवर्णीय आणि कारल्याचा वेल म्हणजे अस्पृश्य ठरला असता. जर झाडा झाडामध्ये भांडणं झाली असती तर "क्षत्रिय" जातीच्या बाभळी वरचढ ठरल्या असत्या. गुलाबाकडं काटे आणि सौंदर्य दोन्ही असल्यामुळं, त्या एका राजकन्ये सारखं मिरवल्या असत्या. निवडुंग बांधावर वॉचमन म्हणून उभा राहिला असता तर नारळाच्या झाडाला टेहळणी साठी ठेवलं असतं. वेलींवरती अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल झाला असता. या वेली म्हणजे तर अजब असतात, मला तर कधी शंका येते की यांना आजूबाजूचं दिसतं की काय? म्हणजे बरोबर उंच आधार मिळेल तिकडं झेपावतात. नुसता आधार नाही घेत तर दुसऱ्याच्या घरात हात पाय पसरतात. हळू हळू ज्यानं आधार दिलाय त्यालाच गुदमरून टाकतात. काहीतरी मानवी गुण आहे यांच्यात मात्र.

वरच्या कल्पना मजेदार वाटतात खऱ्या, पण झाडांचा पृथ्वीवरचा रोल फक्त दातृत्वाचा आहे. मला वाटतं की निर्मात्याने खूप विचारपूर्वक त्यांना हा स्थितप्रज्ञासारखा गुणधर्म दिलाय. त्यांच्यावर जर वार केला, त्याची पानं, फुलं, फळं तोडली तर ईतर प्राण्यासारख्या तीव्र वेदना होत नाहीत. तडफडत नाहीत. ओरडत नाहीत. स्वसंरक्षण करत नाहीत. देवानं त्याला ह्या सगळ्या संवेदना उघड उघड दिल्या नाहीत. कारण अन्नसाखळी ची सुरुवातच ते आहेत. या जगात फक्त झाडांनाच आपलं स्वतःचं अन्न तयार करू शकण्याची क्षमता दिलीय.  ते जर शाकाहारी प्राणी जवळ आल्यावर स्वतःला वाचवण्यासाठी लांब पळाले असते तर जगात अंधाधुंद झाली असती.

त्यांचा धर्मच आहे दातृत्व...
त्यांचा दाता आहे या आकाशाचा बाप…
आपल्या सहस्त्र किरणांनी ब्रह्मांडाला दिशा दाखवणारा सूर्य.

बाकी सर्व प्राण्यांनी, वनस्पती जगताला त्रास न देता स्वतःच्या जगण्यासाठी उपयोग करून घेतला. मात्र झाडांच्या या अगतिकपणाचा सर्वात जास्त दुरुपयोग केला तो एकाच प्राण्याने. ते म्हणजे "मानव".

झाडांना जागचं हलता येत नाही, पण आपण त्यांच्या घरात गेलो. त्यांनाच उखडून स्वतःचं घर बनवण्यासाठी.

मी फेसबुक वर एक सुन्न करणारा फोटो आणि एक विडिओ पहिला.

फोटोचं नाव आहे... " मानवासोबतच्या युद्धात निसर्गाचा पराभव होतोय.." 


आणि विडिओ चं नाव आहे. "झाडं खाणारे यंत्र (Tree Eating Mahine)".. हे यंत्र मोठाली झाडं काही क्षणार्धात जमीनदोस्त करतं…

त्या व्हिडिओ ची लिंक खाली दिली आहे....

https://youtu.be/HIBHPT293MI

आणि त्याच्या विरुद्ध दुसरा व्हिडिओ अशा मशीन चा आहे की जे पूर्ण वाढलेले झाड आहे असे काढून दुसरीकडे लावू शकतो....

लिंक-
https://youtu.be/nLVdqnQPS7c

म्हणजे तंत्रज्ञान चांगल्या रीतीने पण वापरू शकतो आणि राक्षसी पद्धतीने ही वापरू शकतो. फक्त शहाणपणा वापरण्याची गरज आहे...

जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी, 'मानव' हे सपशेल विसरतोय की झाडं प्रतिकार करत नाहीत पण जसे जसे त्यांचं अस्तित्व कमी होतेय, तसे तसे आपलाही शेवट लिहिला जातोय…

कुठलंही झाड तोडण्या ऐवजी त्यातून मिळणारा पैसा आणि जागेचा विचार थोडा बाजूला ठेवा आणि फक्त तीन मिनिट श्वास रोखून ठेवा. नाही करू शकत ना?? मग विचार करा आपल्या पुढच्या पिढ्या कशा जगू शकतील जर ऑक्सिजन देणारे वृक्षच नष्ट होतील? आपण स्वार्थी आहोत त्यात काही शंका नाही, पण निसर्गाच्या अस्तित्वासाठी नाही तर निदान तुमच्याच भविष्यासाठी या निसर्गाची काळजी घ्या….

************ समाप्त **************

टीप- या लेखामध्ये मांडलेली मते, लेखकाची वैयक्तिक असून त्याच्याशी कुणाची काही फारकत असल्यास जरूर कळवा. चांगले आणि वाईट दोन्ही अभिप्राय स्वागतार्ह आहेत. आवडल्यास जरूर शेअर करा.

2 comments:

  1. खूप छान माहिती दिली विशाल .... मलाही कधी कधी वाटतं झाडांनाही भावना असतात फरक एवढाच माणसासारखं झाडांना बोलून व्यक्त होता येत नाही .

    ReplyDelete