चित्रपट - आनंदी गोपाळ (२०१९)
निर्माते - झी टॉकीज
दिग्दर्शन - समीर विद्वांस
अभिनय- भाग्यश्री मिलिंद, ललित प्रभाकर
************************************
समीक्षण-
मध्यंतरी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि वाटलं की, अरे इतक्या छान विषयावर अजूनपर्यंत कुठल्या निर्मात्याला चित्रपट करावा का वाटला नसेल किंवा कसा राहिला गेला. पण त्याचबरोबर समाधान वाटलं की ठिकेय आजपर्यंत नाही पान उशिरा का होईना आनंदीबाईंच्या जीवनावर एक दमदार चित्रपट आला. कालतो या देही या डोळा अनुभवला सुद्धा आणि कळलं की कदाचित २०१९ मध्ये ही अशी अफाट कलाकृती घडणार असेल म्हणून कदाचित हा विषय या आधी राहून गेला असेल.काही व्यक्ती अश्या असतात, ज्या मिळालेल्या पदवी किंवा पुरस्कारापेक्षाही मोठ्या होऊन जातात. यापैकी एक म्हणजे आनंदीबाई गोपाळराव जोशी. जनरल नॉलेज म्हणून आपल्याला, 'देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर' एवढंच आपल्याला माहीत आहे. पण ज्या काळात मुलींनी प्राथमिक शिक्षण घेणं दुरापास्त असताना, आनंदीबाई डॉक्टर बनण्याचं स्वप्न काय बघतात आणि बुरसटलेल्या समाजाच्या नाकावर टिच्चून स्वप्न पूर्णही करतात. ते स्वप्न मिळवण्यासाठी जोशी दांपत्याला काय दिव्यातून जावं लागतं, हे 'आनंदी गोपाळ' उत्कृष्ट फ्रेम्स मधून दाखवतो.
आनंदीबाई जोशी |
आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या भूमिका भाग्यश्री मिलिंद आणि ललित प्रभाकर यांनी अगदी कोळून पील्यासारख्या वठवल्या आहेत. भाग्यश्रीच्या डोळ्यातले भाव आनंदीबाईंच्या जीवनातल्या प्रत्येक भावना जिवंत करतात. त्यांची नऊवारी साडी आणि नाकात नथ घातलेली हसरी, करारी मुद्रा अमेरिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाऊल ठेवते ते दृष्य डोळ्यासमोरून हलूच नये असं वाटतं. आनंदीबाईंच्या यशात गोपाळराव (पती) यांचा हट्ट आणि दृढनिश्चय याचा खूप मोठा वाटा होता. ललित प्रभाकर त्याच्या आयुष्यात एकदम अस्ताव्यस्त राहणारा, झोपाळू असा माणूस, पण गोपाळरावांची भूमिका पाहून असं वाटतं की त्याने व्यक्तिमत्त्वच बदलून उसने घेतलं की काय.
काही दृश्ये इतकी प्रभावी आहेत की पाहताना मन भरून येतं आणि डोळे डबडबतात. आपसूकच मनात आपण चित्रपट पाहायला आलो याचं सार्थक वाटतं.
हृषीकेश दातार यांचं संगीतही तितकंच गोड आणि साजेसं आहे. विशेषतः आनंदघन आणि तू आहेस ना ही गाणी तर मनाचा वेध घेतात.
चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर एका गोष्टीचं राहून राहून वाईट वाटत होतं. ते म्हणजे आपल्या देशातल्या स्त्रियांच्या असंख्य पिढ्यांसाठी. बालपणातच लग्न आणि पुढे चूल, मूल, प्रथा ,परंपरा यात घाण्याच्या बैलाप्रमाणे खाली मान घालून जीवन कंठायचं. किती ही वाईट परिस्थिती. पण ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, आगरकर, गोपाळराव-आनंदीबाई अश्या काही देवदूतांनी त्यांच्या पायातल्या साखळ्यांवर घाव घालायला सुरुवात केली. त्या काळात इतका समंजस आणि आधुनिक विचार करून आपल्या पत्नीला तिचं स्वप्न करणाऱ्या गोपाळरावाना सलाम..!!
चित्रपट जरूर पहा.. विशेषतः नवरा बायको ने तरी नक्कीच..!!
टीप - हे चित्रपट समीक्षण पूर्णतः लेखकाचं स्वतःचं मत आहे. आपला यावरचा अभिप्राय वा आक्षेप असेल तर जरूर कळवावा.
मला त्या मुव्ही मधलं गोपाळरावांचं एकच वाक्य खूप आवडलं ...
ReplyDeleteजेव्हा ते आनंदीबाईना शिक्षणासाठी support करतात तेव्हा समाज त्यांच्यावर बहिष्कार टाकतो तेव्हा ते म्हणतात .
" मी खूप हलकट माणूस आहो हो तुमच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही . "
छान लिहिलंय तुम्ही ....😊👏
या चित्रपटांमधील संवाद अप्रतिमच आहेत... खूप खूप आभार वाचल्याबद्दल...
Deleteअप्रतिम कलाकृती. मस्त सिनेमा. विषय पण खूप छान हाताळाला आहे. खूप आवडला.भावना प्रधान सिनेमा.असे गोपाळराव जर प्रत्येकाला मिळाला तर असंख्य आनंदीबाई जोशी तयार होतील...
ReplyDeleteखूप खूप आभार .....
Delete