.post img {

Automatic Size

Sunday 25 February 2018

गुलाबजाम (2018) - समीक्षण

चित्रपट (पदार्थ)- गुलाबजाम
दिग्दर्शक  (chef) - सचिन कुंडलकर
कथा, पटकथा (भाजी)- सचिन कुंडलकर, तेजस मोडक
अभिनय - सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर आणि वेगवेगळे पदार्थ
छायाचित्रण - मिलिंद जोग
वेळ - 120 मिनिटात तयार
Rating -- खूपच चवदार (5/5)




समीक्षण--
अतिशय चविष्ट सिनेमा अशी कमेंट दिली तरी वावगी ठरणार नाही. मराठी सिनेमामध्ये स्वयंपाकावर आधारित असलेला पहिलाच प्रयोग असेल. पण या चित्रपटाचा आचारी आहे दिग्दर्शक. भाजी पटकथा, संवादाची आहे, छायाचित्रण म्हणजे ती भाजी वाढण्याची कला आहे पण सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर याचे मीठ आणि मसाला आहेत. बरोबर ना? मीठ आणि मसाल्याशिवाय जेवणाची कल्पना करा, म्हणजे मला त्यांच्या कामाविषयी वेगळं सांगायची गरज भासणार नाही.

सचिन कुंडलकरांनी या चित्रपटमार्फत आपल्याला सुंदर अशी गुरू शिष्य परंपरा, एक मैत्री/प्रेम याच्याही पलीकडे असू शकणारं नातं याचा एक अनुभव दिलाय.

कथा तशी साधी सोपीच आहे. लंडनमध्ये मोठ्या बँकेमध्ये गलेलठ्ठ पगारावर काम करणाऱ्या आदित्यला (सिद्धार्थ चांदेकर) मराठी पदार्थाचं रेस्टॉरंट सुरू करायची उपरती सुचते. आधीच स्वयंपाकाची आवड असलेला पण घरच्यांनी 'हे काम करायला तू काय बाई आहेस का' असे आपल्याकडे शिक्कामोर्तब असलेलं वाक्य म्हणत शिकू न दिलेला आदित्य. एकदा भारतात आल्यावर, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तो गुपचूप पुण्यात येऊन राहतो. त्याला शोधायचा असतो, मराठी पदार्थ शिकण्यासाठी गुरू. पण घरच्यांसाठी तो लंडन मध्येच असतो. मित्राच्या रूमवर आलेल्या डब्यातला गुलाबजाम खाल्ल्यावर त्याचं मन भावून जातं. स्वयंपाक शिकेन तर हा डबा बनवणाऱ्या स्त्रीकडूनच शिकेन, अशी प्रतिज्ञाच घेतो. तिथेच त्याला भेटते ती अतिशय तापट आणि माणसांचा तिटकारा असणारी राधा. खूप 'पापड बेलल्यानंतर' त्याला ती शिष्य म्हणून स्वीकारते. इथपर्यंत फक्त चित्रपटाची फोडणी पडलेली आहे, खरा चित्रपट मसालेदार आणि चवदार होतो इथून पुढं चित्रपट आदित्य आणि राधाच्या गुरुशिष्याच्या आणि एका अनामिक गूढ नात्याच्या जवळ जवळ जातो.

राधाच्या मते, स्वयंपाक म्हणजे जुळवाजुळव किंवा टाईमपास नाही तर ते एका आर्टिस्टच्या कुंचल्यातून सादर झालेलं चित्र किंवा एका कवीच्या लेखणीतून आलेल्या कवितेइतकीच  सुंदर कला आहे. स्वयंपाक करणाऱ्याने स्वतःला त्यात ओतून घेतलेलं असतं.

राधाच्या विक्षिप्त स्वभावाचं कारण, हळूहळू प्रेक्षकांसमोर येतं. तिच्या जीवनातील आठवणी जाग्या होताना आपल्याही मनाची घालमेल होते. सोनाली ने साकारलेली राधा पाहताना वाटतं हीच राधा आहे. तिच्यातला तिरसट पणा, घराबाहेर पडताना थोडा घाबरलेपणा, कधी थोडी बालीश या सर्व छटा खूप उच्चकोटीच्या अभिनयाने सादर केल्या आहेत. दिग्दर्शकाने character development अतिशय सचोटीने handle केलंय. राधाची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या सुरुवातीला कारल्यासारखी कडू असली तरी चित्रपट संपेपर्यंत गुलाबजाम सारखी गोड झालेली असते. व्यक्तिरेखेचा प्रवास इतका उत्तमरीत्या मांडलेला खूपच मोजक्या चित्रपटामध्ये असेल. सिद्धार्थने केलेला आदित्यही उत्तम जमलाय.

चित्रपटाचं तिसरं character म्हणजे पदार्थ. दोन तास आपल्यासमोर छान छान पदार्थ बनताना दिसतात. रसरशीत फोडणी, मस्त पुरणपोळी, भातावर घट्ट घट्ट वरण आणि तूप, ताजे उकडीचे मोदक, आणि पाकामध्ये पूर्ण बुडलेला गुलाबजाम तोंडाला पाण्याची धारच लावतात. जसा चित्रपटामध्ये संगीत दिग्दर्शक असतात तसे यात food दिग्दर्शक आहेत सायली राजाध्यक्ष आणि श्वेता बापट.  या दोघीनी चित्रपटाचा फूड section छानरीत्या सांभाळून,  आत्मा शांत ठेवलेला आहे. आणि त्यांना साथ आहे, छायाचित्रणाची. जे खूप वेगवेगळ्या angle ने पदार्थांची सैर घडवते.

या निमित्ताने आपल्या कुटुंबव्यवस्थेतला ऐरणीवरचा प्रश्न समोर येतो. आपल्या मुलांना आपल्या घरी स्वयंपाक शिकवायला आईवडिलांना का कमीपणा वाटतो. आपल्याकडे स्वयंपाक म्हणजे कला म्हणून नाही तर काम म्हणून पाहिलं जातं. आणि ते विशेषतः मुलींच्या गळ्यातच टाकलं जातं. जेवण म्हणजे आयुष्याचा अतूट भाग आहे. मग मुलगा असो वा मुलगी दोघांनाही ते शिकवायला हवं व यायलाच हवं.

एक मजेची गोष्ट म्हणजे youtube हा पण आता स्वयंपाक शिकण्याचा गुरू बनतोय. सगळ्या recipies available आहेत. पण चित्रपट हे दाखवून देतो की एखाद्याच्या सहवासात जितका छान स्वयंपाक शिकाल तेवढं इंटरनेटवर नाही शिकू शकणार. आणि राधाच्या मते, भाजी आणण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळं करत नाही तोपर्यंत खरा स्वयंपाक आला असं म्हणता येणार नाही.

खूप दिवसातून एक छान मराठी सिनेमा आलाय, नक्की  खा.... sorry नक्की पहा.. गुलाबजाम...

वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास तुमची कमेंट जरूर द्या आणि शेअर करा. पदार्थ दुसर्यांना वाटल्यास अजून गोडी वाढते.



No comments:

Post a Comment