.post img {

Friday, 28 September 2018

मुंबई लोकल फुटओव्हर ब्रीज - जीवाची आणि मृत्यूची शिडी

हे तर जगजाहीर आहे की देशातील इतर शहरे तास किंवा मिनिट काट्यावर फिरतात, पण मुंबई शहर सेकंद काट्यावर पळते. त्याच सेकंद काट्यावरच्या सर्कशीचा हा लेख.

जर तुम्हाला पायऱ्यांवर चढून वर जाण्यासाठी चढाओढ बघायची असेल तर मुंबई लोकल च्या "दादा" स्टेशन्स; म्हणजे ठाणे, घाटकोपर, दादर, कल्याण इत्यादी स्टेशन्स वर सकाळी किंवा संध्याकाळी पोहोचावे. तुम्ही म्हणाल सीएसटी किंवा चर्चगेट नाही का "दादा" स्टेशन्स? तर नाही.. ते स्टेशन्स चे देव आहेत आणि एवढ्या धकाधकीच्या च्या प्रवासातून त्या देवाच्या दारापर्यंत खूप कमी लोक पोहोचतात. 70% जनता मस्जिद बंदर आणि मरीन लाईन्स स्टेशन पर्यंत खाली उतरलेली असते.
तर मला ओव्हरब्रिज आणि त्याच्या पायऱ्यांबद्दल बोलायचं होतं. या दादा स्टेशन्स चे ओव्हरब्रिज म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दुथडी वाहणारी नदी बनते. लोकांची नदी. ती सुद्धा एकदम संथ. पायऱ्यांवर खालून वर जाणारे आणि वरून खाली येणाऱ्या लोकांचा सेम फोर्स असतो. सामान्यतः त्या पायऱ्या उतरणे किंवा चढण्यासाठी 08-10 सेकंद भरपूर झाले. पण सकाळच्या पुरावेळी 1 मिनिट पहिल्या पायरीपर्यंत पोहोचायला जातो आणि पुढची दोन मिनिटं वर चढायला किंवा खाली यायला लागतात. आजपर्यंत शिकलेल्या गणितानुसार, खरं तर एका पायरीवर जर एका वेळी 6 माणसं उभा राहू शकत असतील तर वरती 3 लोक जायला पाहिजेत, आणि खाली 3 लोक यायला पाहिजे. पण इथे होतं वेगळंच गणित, एका वेळी वर 1 माणूस पोहोचतो आणि खाली 1 माणूस उतरतो. एकंदरीत हे चित्र नरसाळ्यामधून खाली पडणाऱ्या पाण्यासारखं असतं.

गर्दीतून हळूहळू आपण पहिल्या पायरीकडे येऊ लागतो. तेवढ्यात बरोबर सेंटर चे मागचे लोक एक फोर्स लावून बाजूने पायरीकडे येऊ लागलेल्या लोकांना दूर ढकलतात. आणि मग बाजूच्या लोकांचं पायरी पर्यंत यायचं स्वप्न काही सेकंद दूर जातं. आणि एकदा का पायरीपर्यंत आले की मग ते ओव्हरब्रिज चा एव्हरेस्ट डोळ्यासमोर दिसत असून चढता चढता दमछाक होते. पुरुष असेल तर चूकून एखाद्या स्त्रीच्या अंगाला हात लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि स्त्री असेल तर त्या गर्दीतून पुरुषांचे होणारे चोरटे स्पर्श कसे टाळता येईल ते पाहावे लागते. गर्दीच इतकी असते की त्यात कुणाचे कुणाला पडलेलेच नसते. समजा चुकून शेजारी देव जरी येऊन उभा राहिला तरी आपल्या लक्षात येणार नाही. जर तो एकदम हळू हळू चालत असेल तर कुणाचा तरी taunt येईल, "अरे भाई, जलदी जलदी चलो यार. क्या ऐसा आराम से जा रहे हो, क्या गार्डन मे चल रहे हो क्या जा रहे हो." आणि ही अतिशयोक्ती नाही, खरंच एवढी हाईट होऊ शकते इथे. वरती ओव्हरब्रिज वर पोहोचेपर्यंत माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो आणि देवही रिटर्न वैकुंठात पोहोचू शकतो.


जर हे दृष्य आपण थोडंसं उंचीवरून पाहिलं तर मुंग्यांची किंवा किड्यांची कुठंतरी चढण्यासाठी चाललेली चढाओढी सारखं दृष्य दिसेल. जर तुम्ही कधी मुंग्यांची गर्दी पाहिली असेल तर त्या सुद्धा एकदम शिस्तीत जाताना दिसतील. No ढकला ढकली. No चिरडा चिरडी. आणि कदाचित आपली तुलना कीडा मुंगीशी करण्यात त्यांचाच अपमान होईल. 

अश्याच गर्दीचा दुष्परिणाम मुंबईच्या लोकांनी खूप वेळा अनुभवला आहे. बरोबर 1 वर्षांपूर्वी, एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या ओव्हरब्रिज वर काळ अक्षरशः थैमान घालत होता. इथं त्याच्या हाती शस्त्र होतं "गर्दी", "पाऊस" आणि "लोकांची पावसात भिजण्याची भीती". त्या स्टेशन वर उतरनाऱ्या लोकांची संख्या वाढत होती, पण बाहेर जाणाऱ्या लोकांना पावसात भिजण्याची भीती होती. त्यातच पूल पडतोय अशी कुणीतरी आरोळी ठोकली आणि अक्षरशः बाहेर पडण्यासाठी त्या जीवांचा आटापिटा सुरू झाला. खरं तर पुलाला काही झाले नव्हते, पण त्या अफवेमुळे 24 जीव आपल्या घरी परत जाऊ शकले नाहीत. तिथेच आक्रोश करत त्याची प्राण ज्योत मालवली. मुंबई ज्या गर्दीचा आणि स्पिरिट चा गर्व करते ती गर्दीच ईथल्या जीवांना असहाय करतेय, आणि अशा दुर्घटना घडल्यानंतरचं जे 'स्पिरिट' आहे ते पोट भरण्यासाठी झक मारत दाखवावं लागतं. एलफिन्स्टन रोड स्टेशनची ती दुर्घटना चालू होती, आणि tv वर जीव पिळवटणारे विडिओ दाखवले जात होते. मुंबई मधला ट्रेन ने प्रवास करणारा प्रत्येक जीव आणि त्याचे जिवलग स्वतःला तिथे पाहत होता. प्रत्येक माणसाने आयुष्यात संघर्ष करत इथपर्यंत प्रवास केलेला असतो, अवघडात अवघड परिस्थितीला तोंड दिलेलं असतं. पण अशा ठिकाणी आणि अशा परिस्थितीत मरण यावं हे कुणाच्या मनाच्या आसपास ही फिरकलेलं नसतं. देवा असं होऊ नये रे. देव ही काय करणार, त्याचाही हात आता या गर्दीमध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीये.


मुंबईचाच एक भाग म्हणून, मी या गर्दीकडे आणि अश्या घटनांकडे पाहताना मन सुन्न होऊन जातं. पण एक खरं आहे, कुठलीही दुर्दैवी घटना घडल्यानंतर होणारं दुःख compulsory असते, पण मिळणारं शहाणपण optional असते. आपण शहाणपण जर घेतलं नाही तर अशा घटनाच Compulsory होऊन जातील. प्रशासनानं पुलांच्या रुंदीकरणाची कामं अजून वेगानं करायला हवीत. आपणही फक्त सरकार किंवा रेल्वे प्रशासनाला लाखोली न वाहता, काही गोष्टींना जरूर हातभार लावू शकतो. आपण सर्वजण गर्दीत बांधलेलो आहोत, फक्त आपल्या आजूबाजूच्या माणसाची काळजी घ्या. 
आपल्या बाजूचा किंवा समोरचा माणूस एक जीव आहे, त्याच्याकडे फक्त ट्रेन मध्ये चढण्याची स्पर्धा मानू नका.


रोज सकाळी कामासाठी बाहेर पडणारा माणूस "येतो गं" म्हणून निघतो. मग आपल्याच सारख्या त्या माणसाला घरी सुखरूप परतण्यासाठी जेवढं शक्य आहे त्यापेक्षा जास्त सहकार्य करू.
टीप: या लेखामध्ये लिहिलेले विचार, लेखकाचे वैयक्तिक मते आहेत. जर काही चुकभुल असेल तर आणि आवडलं तरी comments मध्ये कळवा.

No comments:

Post a comment