.post img {

Sunday, 26 August 2018

समुद्र शून्य.. समुद्र अनंत...(कविता)

समुद्र शून्य, समुद्र अनंत...
कधी हा पोटात काळं गर्द विष असलेला नाग.. तर कधी हा अमृताचा कलश..
खारं मीठ वा मधुर जल..
सर्व याचीच देणगी..
तारणाराही हाच आणि कधी मारणाराही हाच..

समुद्र बालक, समुद्र अजाण..
सोम करी पहारा रात्रोप्रहर...
ठेवी या सागरास जागी..
मात्र खोडकर हे बालक येई भरतीशी...
पळे यथा तथा, चूकवून चक्षु त्याचे...

समुद्र गंधित, समुद्र धुंदीत..
वाऱ्याच्या प्रेमात अगदी दिवाना..
वाऱ्यासोबत च्या प्रणय खेळात मग होतो तो बेभान..
मयुराच्या पिसाऱ्यासारख्या भव्य लाटेच्या आडोश्यात...

समुद्र मातृ, समुद्र पितृ..
श्यामरंग उधळत.. तो रक्तचंदीत दिनकर..
शोधतो विसावा या भव्य सिंधूच्या गर्भात..
रोजचा जन्म आणि रोजचे मरण...
यज्ञातुन या जन्मे लाखो पुलकित चांदण्या...

समुद्र ऐकतो, समजतो आणि उमजतो देखील..
दडपतो मनाच्या गाभाऱ्यातली चिंता जोरदार लाटांनी..
काही क्षणांसाठी का होईना, करतो त्याच्या आश्रिताचं सांत्वन...

वसुंधरेच्या जीवनाचे आत्मचरित्र तू...
कोटी कोटी क्षण, दिन, वर्ष...
तू इथे, तू तिथे आणि सर्वत्र ..
समुद्र... सिंधू... सागर...
प्रणाम या भव्य सप्तसिंधुस..

                                ...... विशाल पोतदार


No comments:

Post a comment