.post img {

Tuesday, 6 November 2018

दिवाळीतील किल्ला - भन्नाट आठवणी

किल्ला.....

घराच्या आजूबाजूची दगडं आणि विटा जमा करायच्या...
नदीकाठची माती आणून मस्त चिखल करायचा... 
इतर दिवशी चिखलात खेळलं तर आई बाबा रागवायचे पण किल्ला बनवताना चिखलात हवे तसे खेळायचं लायसन्स च भेटायचं....
दगड रचून त्यावर चिखलफेक करायची.. आजकाल लोक, जी शब्दांतून एकमेकांवर चिखलफेक करतात तशी नाही... या चिखलफेकीतून किल्ल्याला आकार यायचा.

किल्ल्यावर राजांना बसायला उंच आसन.. टेहळणीचा बुरुज.. पायथ्यापासून ते शिखरापर्यंत पायऱ्या.. गुहा.. एखादं तळे ह्या गोष्टी तर हमखास असायच्या... हिरवळ तयार करण्यासाठी किल्ल्यावर मोहरी आणि हळीव टाकायची... दोन तीन दिवसानंतर किल्ल्यावर हिरवाईमुळं जान यायची. किल्ल्यावर पाणी मारण्यासाठी सलाईन ची पाईप घ्यायची. बॉलपेनची रिफील घासून घासून टोक काढायचं. आणि ती रिफील सलाईनच्या पाईपला जोडायची. असा आम्ही किल्ल्यावर पाणी मारण्याचा पंप तयार करायचो.

आता किल्ला तयार झाल्यावर सैनिक ठेवायचा टाईम आला. शिवाजी महाराजांची मूर्ती उच्च आसनावर, बुरुजावर तोफ आणि मावळे ठेवायचे. गुहेमध्ये वाघ आणि सिंह ठेवायचा. खरं तर त्यावेळी किल्ल्यावर बंदूकधारी सैनिक (A K 47, sniper इत्यादी) पण ठेवायचो... त्यावेळी किल्ल्याचं किंवा इतिहासाचं एवढं गांभीर्य नव्हतं.  पण जसं जसं मोठं झालो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला त्यावेळी किल्ल्याचं खरं महत्व समजलं...

राजे म्हणत, "माझा प्रत्येक सरदार एका किल्ल्यासमान आहे आणि माझा प्रत्येक किल्ला हा स्वराज्याचा पहारेकरी आहे. औरंगजेब केव्हा ना केव्हा लाखोंची फौज घेऊन दख्खन जिंकायला येईल हे नक्की. पण माझ्या सह्याद्रीमधला एक एक दुर्ग त्याला आयुष्यभर झुंजवत ठेवेल." आणि सत्यात मात्र घडलं तसंच. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या निर्वाणानंतर सुद्धा औरंगजेबाला हे स्वराज्य जिंकता आलं नाही. २० वर्षे त्याने जीवाची पराकाष्ठा केली कारण दख्खन जिंकली नाही तर दिल्लीच्या तख्ताची प्रतिष्ठा मातीत मिसळणार होती. शेवटी याच सह्याद्री ने औरंगजेबाला च सामावून घेतले.

किल्ल्यांच्या या यशामागे महाराजांची आणि स्वराज्याच्या सरदारांची चाणाक्ष कल्पना आणि दूरदृष्टी होती. किल्ल्यासाठी निवडलेले डोंगर भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या अचूक असायचे. गनीमाला चकवण्यासाठी फसवे दरवाजे. जास्त काळ किल्ला लढवण्यासाठी लागणारी धान्याची कोठारे आणि पाण्याचे बांधीव तलाव सुद्धा असायचे. आणि मूळ म्हणजे हे राज्य उभारण्यामागची शुद्ध भावना हे त्या कार्याला आणखी मजबूत बनवत होतं. म्हणून तर हे स्वराज्याचे पहारेकरी ३५० वर्षे काळाशी टकरा घेत अजूनही जिवंत आहेत. कारण त्यांच्या राजानंही आयुष्याच्या अखेरपर्यंत विश्रांती घेतली नाही.

दिवाळी ला किल्ला बनवायची प्रथा कधी आणि कशी सुरू झाली, याची माहिती मला कधी ऐकिवात नाही. पण खरंच ही प्रथा खूपच गरजेची आहे आणि अशीच सदैव चालू राहावी. आजकाल प्लास्टरचे रेडिमेड किल्ले भेटतात पण मला वैयक्तिकरीत्या तरी ते जास्त रुचले नाही. किल्ला हाताने करण्यातही एक creativity आहे आणि खूप महत्त्वाचा आनंद आहे. मला माझ्या पुतणीच्या हट्टा साठी यावर्षी किल्ला बनवावा लागला. आणि माझं लहानपण आठवलं.

टीप- आपला अमूल्य वेळ देऊन वाचलेत या बद्दल धन्यवाद. आवडल्यास जरुर शेअर करा.

यावर्षीच्या किल्ल्याचे फोटो-

No comments:

Post a comment