.post img {

Automatic Size

Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Thursday, 30 March 2023

शबरीचा राम (स्फुट)

#विशालाक्षर
#स्फुट
#शबरी_चा_राम

"रघूनंदना... डोहाकडच्या वाटेने येणारी तुझी आकृती क्षणोक्षणी स्पष्ट दिसत राहते.. अगदी मातंग ऋषींनी वर्णल्याप्रमाणे, 'विनयी राजहंस'च तू. पण ऐनवेळी माझ्या डोळ्यांचा पान्हा दाटून यायचा, आणि तू धूसर होत काही क्षणातच पुसला जायचास. हे जीर्ण शरीर, तुझ्या आगमनाची शहानिशा करायला, धावत पळत तिथं जायचं . पण... पण.. तिथे मात्र तुझी पाऊलखुणही उरलेली नसायची.

आजही तसंच झालं बघ. पहाटेच तुझ्यासाठी बोरं तोडून ठेवताना, ते झाडही माझ्याकडे पाहून कुत्सित हसलं. "शबरे.. तुला तो राम ओळखतो का तरी? तो कसा तुझ्या झोपडीत येईल?" मी तर त्याला ठणकावलेच बघ, "बोऱ्हाट्या.. माझ्या गुरुवर्यांचा शब्द असा थोडीच फुका जाईल? वाट पाहत मी मरून गेले, तर चितेला अग्नी द्यायला, माझा रामच येईल बघ." आणि आज.. आज.. पुन्हा तुझं आगमन होताना दिसलं. आज सोबत अजून कुणीतरी राजबिंडं होतं. म्हटलं रोजच्याप्रमाणे अजून एक नवा भास. अजून एक प्रतारणा...? एवढा विचार करून मागं फिरले. आणि तुझा तो स्तब्ध करणारा आवाज या क्षीण होत चाललेल्या वृद्ध कानांवर पडला. आणि या डोळ्यातून पाझरणारा झरा थांबणारा नव्हता..

"रामा... रामा.. खरंच हा तू आहेस? आणि हा लक्ष्मण का? का रे इतका वेळ लावलास? माझा राम आला. अरे बोऱ्हाट्या, हे बघ माझा राम आला. माझा बाळ..माझा देव.. आला. इथे बस.. नको.. थांब.. अरे आसनावर टाकायला काहीच मिळत नाहीये.. अरे हे काय असा खालीच कसा बसलास? इथे तुझ्या राजप्रासादाला न्याय देईल असं काही नाही रे.."

"माई.... राहू दे तो मान मरातब.. तुझी माया हवीय फक्त... आणि भूक लागलीय गं आता.. काहीतरी दे ना खायला. "

"ही बघ टोपलीभरून बोरं सकाळीच तोडून ठेवलीत. हे घे... थाम्ब थाम्ब.. खाऊन पाहू दे आधी अर्धं.. तू म्हणशील ही खुळी की काय.... उष्टी बोरं देतेय.. अरे पण..त्या बोऱ्हाट्यावर कसा विश्वास ठेवू. एखादं आंबट बोर असेल तर ते तुला कसं देऊ? माझ्या रामाला सगळं चांगलंच मिळायला हवं."

"माई.... इतकं प्रेम ओथंबून आलेला प्रेमाचा उष्टा घास.. ह्यासाठी नशीब लागतं गं.. गोड आहे बघ बोर खूप.."

"पण तू साजरी केलीस ही झोपडी.. तुझे पाय लागले आणि सुरुकुतलेली झोपडी फुलली. बोऱ्हाट्याला शिव्या देते मी, पण मनाने चांगलय खूप ते. माझी सोबत करून आहे इतकी वर्षं. तेही तुझ्याच वाटेवर नजर लावून अजूनही बहरतंय. तुझ्या सेवेसाठी.! ही शबरी आज ना उद्या जाईल. पण तिची उष्टी माया. ती राहील बघ. तुझ्या वाटेवर.!!"

"आई... येऊ आता..?"

"रामा... राहता येईल का रे इथे तुला? नाही.. माफ कर.. असं कसं म्हटले मी.. तुझी गरज तर पूर्ण जगाला आहे.. जा बाळा.. सुखी राहा.."

"मी एकटा कुठे चाललोय...? तुला हृदयात घेऊन चाललोय ना.. सोबत नेहमीच आहे... कायमचा आहे.. आता आसवं ओघळण्याआधी आज्ञा दे... येतो..!"

निरोप देणारे ते सुरूकुतले हात फुलांपेक्षाही जास्त दरवळत होते. आणि त्या वृद्ध डोळ्यांत आनंदी आसवांचा पूर आला होता.. शबरी.. राममय झाली.. राममय झाली..!!

©विशाल पोतदार

#राम #रामनवमी #रामलला #शबरी #मराठीसाहित्य #मराठीलेखक


Wednesday, 24 February 2021

लघुकथा- पहाडा पलीकडचं काही

    कथा शिर्षक - पहाडा पलीकडचं काही
    लेखक - विशाल पोतदार
    पत्ता- कराड, जिल्हा -सातारा
    ई-मेल id- vishal6245@gmail.com
    संपर्क - 9730496245
    
    कथा-
    
"रखमे.... ए रखमे.... माझी रखमाई.... उठ लवकर... जायचं नं मला.."
    
"थांब ना आप्पा... दहा मिनिटं झोपू दे.."
    
 "आता लाडाला इवू नको बरं.. एक जरी ट्रेन चुकली तर शंभर रुपय बुडतील माजं."
    
    रुक्मिणीनं तोंडावरून वाकळ बाजूला केली. खिडकीतून केव्हाचा नजर ठेवून असलेला कवडसा आता तिच्या चेहऱ्यावर आला. संधीप्रकाशासमान सावळी कांती, कमानदार भुवया, सरळ नाक आणि कंबरेपर्यंत रुळणारे केस. का कुणासठाऊक पण तिचे डोळे इतके बोलके होते की एखाद्या व्यक्तीला त्यात सगळी उत्तरं सापडावीत. अळोखे पिळोखे देत एकदाची उठली. अंथरूण आवरलं. आणि ब्रश करत अंगणातल्या कट्ट्यावर बसली. 
    
    "रखमे.. जेवून घे लवकर. आणि कुटं भायर जाऊ नको. अजून चहा करावा लागला तर फोन करीन. मग न्यायला येईन मी." 
    
    सकाळचा स्वयंपाक करून ज्ञानबा चहाची मोठी किटली घेऊन स्टेशनला निघाला. तब्बल पंचवीस वर्षं झाली, ज्ञानबा स्टेशनवर चहा विकायचा. प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली रे आली की, स्लीपर कोच मधे शिरून 'माऊली, चहा घ्या. चाचा..चाची चाय लेलो' त्याचे हे कॅसेट सुरू होऊन जायचे. रुक्मिणी सातवी-आठवीत असतानाच तिच्या आईला देवाज्ञा झाली आणि तेव्हापासून ज्ञानबाच तिच्यासाठी आई आणि बाप होता. म्हणूनच तीसुद्धा सहज आपल्या बापाला अरे-तुरे करु लागली आणि त्यानंही तिला रोखलं नाही.
    
    ज्ञानबाचा स्वभावच मुळात चहासारखा गोड. त्याच्या हास्यात इतका निखळ आनंद असायचा की जणू 'सुखी माणसाचा सदरा असणारा माणूस हाच' असं वाटावं. पावली, आठ आणे, रुपया जोडत जोडत त्यानं रखमाईला शिकवलं. यंदा तिचं ग्रॅज्युएशनचं पूर्ण झालं. स्वतः कसंबसं दहावी शिकल्यामुळं त्याला पोरीचा विशेष अभिमान होता.
    
    रखमाई तशी अभ्यासातली गती मध्यमच. पन्नास-पंचावन्न टक्के मार्कांच्या वर येणं तिला कधी जमलं नाही. प्रत्येक पालकांप्रमाणे ज्ञानबालाही वाटायचं की आपल्या पोरीनेही इंजिनिअर डॉक्टर वगैरे व्हावं. पण तिची अभ्यासातली धाव पाहून, त्याने ते इरादे आवरते घेतले. त्याला जाणवलं की ही पोर काही चार भिंतींच्या खुराड्यात रमणारी नाही. तिला झाडं, शेत, डोंगर आणि दऱ्या आवडायचे. 
    
    रखमाईचा बालपपणीचा एक मजेदार किस्सा होता. ती ज्ञानबाला नेहमी विचारायची, की गावाशेजारच्या भैरोबाच्या डोंगरापलीकडं नक्की  काय आहे. दोघे एकदा पलीकडच्या गावाला गेल्यावर ज्ञानबानं सांगितलं की, हे बघ डोंगराच्या पलीकडील ठिकाण. पण तिला तर ते डोंगरावर चढून पलीकडं पाहायचं होतं. त्यानं बरंच समजावलं, पण त्याची ही हट्टी राजकन्या ऐकेल तर शपथ! एकेदिवशी त्यानं खरंच नेलं की तिला डोंगरावर. सात आठ वर्षांच्या चिमुकलीचे नाजूक पाय. थोडी चालत, थोडी तिला खांद्यावर गेहेतबसत-बाप लेक  डोंगरमाथ्याला पोहचले. तिने त्यावेळी डोळे भरून पाहिलेला डोंगरापलीकडचा भाग. जणू ती एक उडणारी पक्षीण आणि खाली इवलीशी दिसणारी घरं तिच्या पंखाखाली होती. त्या दिवशी ती काही खाली उतरायला तयार नव्हती. ज्ञानबाने कित्येक विनवण्या केल्या तेव्हा महाराणी गडावरून खाली यायला तयार झाल्या. ती घरी परतली असली तरी तिचं मन मात्र त्या पहाडातच हरवलं होतं. 
    
    त्यानंतर तिच्या आयुष्यातला एक नवीन अध्यायच सुरू झाला. भैरोबाच्या डोंगरावर मैत्रिणींसोबत दोनवेळा जाऊन आली. पण नंतर कुणी मैत्रिणी सोबत यायला तयार नाहीत. शेजारचा अमितदादाचा ग्रुप सतत विविध किल्ल्यांना भेटी द्यायचा. तिनं दादाला लाडीगोडी लावत त्या ग्रुपमधे जागा बनवलीच. त्या क्षणापासून सह्याद्रीशी तिची खरी ओळख झाली. उन्हाळ्याच्या सुटीत विविध गडकिल्ल्यांच्या ट्रेकमधे सामील होऊ लागली. कडा चढण्यात तिची सहजता पाहून एखाद्याला वाटावं, की ते कातळ तिला बाहू पसरून कुशीत घेतायत. पण ती जेव्हा कुठल्या गडावर गेली की, इकडे ज्ञानबाचा जीव मात्र एखाद्या मोठ्या खडकाखाली सापडल्यासारखा व्हायचा. म्हणता म्हणता दहावीचं वर्ष सुरू झालं, पण तिच्या पायाची भिंगरी थांबायला कुठे तयार होती. रागावणे ही गोष्ट ज्ञानबाच्या गावीही नव्हती. मग त्याने आपली काळजी अमेयला बोलून दाखवली. शेवटी अमेयदादाने, दहावी पास झाल्यावर एका चांगल्या गिर्यारोहन ग्रुपमध्ये दाखल करण्याचे आमिष दाखवले. तेव्हा कुठे ह्या रुक्मिणीने कंबरेवरचा हात सोडून, हातात पुस्तक धरलं. शेवटी देवाला थोडासा नैवेद्य दाखवण्यापूरते पन्नास टक्के मिळवले. ती पास झाली यातच ज्ञानबा खुष होता. कारण त्याला माहित होतं की तिचं खरं पुस्तक तर डोंगर दऱ्या आहेत. त्यानं ते तिला हवं तेवढं वाचू दिलं. पुढे गिर्यारोहनाच्या ग्रुपमधून तिने सह्याद्रीतले कठीण समजले जाणारे कित्येक कडे, घळी पार केल्या. ग्रॅज्युएशन होइपर्यंत सह्याद्रीची ही घोरपड आता हिमालयातील शिखरांना कधी साद घालू लागली कळले देखील नाही. हिमाचलमध्ये 4-5 ट्रेक झाले. आणि मागील वर्षी भारतातल्या उंच शिखरांपैकी एक नंदादेवीची मोहिमदेखील यशस्वी केली. 
    
    आज ज्ञानू घरी परतत असतानाच हौसामावशीने थांबवलं. हौसामावशी ज्ञानबाच्या शेजारीच राहायची. लांबच्या नात्यातली असली तरी त्याच्यासाठी ती सख्ख्या मावशीच्यावर होती. यशोदा गेल्यापासून हौसामावशीनंच तर रखमाईकडं लक्ष दिलं. पोरगी लहान असेपर्यंत ठीक होतं पण ती वयात आल्यावर तिच्या वयासोबत येणाऱ्या शारिरीक प्रश्नांना बाप तोंड देऊ शकला नसता. आणि ती बाजू मावशीने पुरेपूर सांभाळली. म्हणून ज्ञानबा कधी मावशीच्या शब्दाबाहेर नसायचा. 
    
    घोळवत घोळवत तिनं मनातल्या विषयाला हात घातलाच. रुक्मिणीसाठी एक नामी स्थळ चालू आलं होतं. ज्ञानूने रखमाईशी बोलतो म्हणून सांगितलं. पण ऐकेल ती हौसामावशी कुठली!
    
    "द्यानू... तिला काय कळणार. संसार काय, खेळ काय. या वयात लगीन उरकलंस तर बरं. नायतर पूना मिळतीली कसली बी पोरं." 
    
    "आगं पर...." ज्ञानूने विनवणीच्या सुरात म्हटलं.
    
    "पर नाय आन बीर नाय.. आरं पंधरा एकर जमीन हाय पाणस्थळ. पोराचा वडील सरपंच हाय गावचा. त्येंच्या सुनास्नि भाजी आणायलाबी भायर जावं लागत न्हाय बग. सगळं घरात आयतं मिळतंय.  पोरगी सुखात राह्यल. " हौसा मावशी आपला ठेका सोडायला तयार नव्हती.
    
    "मावशे..तुजं बरोबर हाय पर आपली रखमाई येगळी हाय अगं. पोरगी नाव कमावल बघ. कसं सांगू तुला आता. उडणाऱ्या पाखराला बंदिस्त ठेऊ व्हय."
    
    "पोरीच्या वर बापच येड्यासारखा वागाय लागल्याव काय म्हणायचं. हे डोंगार चढण्यात कसलं नाव कमावणं आलं. आन पोरीच्या जातीला शोभल का आता ह्ये आसले नाद. आणि आरं महादेव नुस्ती पोरगी आणि नारळ घील. मलाच मागं बोलता बोलता सांगून गेला व्हता. दुसरं मोठं स्थळ आल्याव तुला जमणार हाय का 7-8 लाख खर्च करायचं. बाय... यशोदी असती तर तिनं सोयरीक जमवूनच घेतली असती. आता आपलं म्हातारीचं कोण ऐकतंय म्हणा. तुझ्याकडे नंबर हाय महादेवचा. तूच सांग बघायचा कार्यक्रम कधी ठिवायचा ते. आणि नसल तर आता आमी काय हितुन पुढं स्थळं आणायचो नाय बाबा." 

    हौसा मावशीनं निर्वाणीचाच इशारा दिल्यावर ज्ञानबाच हतबल झाला. एकीकडं पोरीचं आयुष्य स्थिरस्थावर करणारं स्थळ. महादेव शिंदे म्हणजे लाखेगावातली मोठी असामी. आणि त्यांच्या मुलाच्या स्थळावर बऱ्याच मुलींच्या आई-बापाचा डोळा होता. त्यात महादेव शिंदे हौसामावशीचे पुतणे असल्याने ते काही तिच्या शब्दाबाहेर नव्हते. मुळात ज्ञानबाने तिच्या गिर्यारोहनाच्या वर्कशॉप तसेच विविध ट्रेकसाठी, जमवलेली पै खर्च केली होती. आपला असलेला छोटासा जमिनीचा तुकडा विकला, पण तिला कधी त्या शिखरावरून उतरायची वेळ येऊ दिली नाही. पण आता हौसा मावशी जे बोलून गेली ते कटू सत्य होतं. मुलीला चांगलं स्थळ मिळावं कुठल्या बापाला वाटणार नाही? आणि त्यासाठी 1 लाखापेक्षा जास्त खर्च करणं त्याच्याच्याने तरी जमणार नव्हतं. दुसरीकडे तिला सोन्याच्या पिंजऱ्यात पाठवतोय की काय असंही वाटत होतं. कधी कधी आपली मनोवस्था उलट्या पडलेल्या कासवासारखी असहाय होऊन जाते. कितीही पाय हलवले, धडपड केली तरी परिस्थिती जैसे थे. पण शेवटी बापाच्या मनानेच कासवाला सरळ केलं. ज्ञानबानं महादेव शिंदेना फोन करून पुढच्या आठवड्यात पाहायचा कार्यक्रम नक्की केला. 

    रुक्मिणीने अंघोळ वगैरे आवरली आणि जेवायला बसणार इतक्यात पोस्टमन एक लिफाफा घेऊन आला. उघडून पाहते तर काय. तिच्या आनंदाचा पारावार उरला नाही. तिला तर कधी एकदा कुणालातरी सांगतेय असं झालं होतं. अमितदादा पण सध्या जॉबसाठी मुंबईला होता. शेवटी मग तिच्या लाडक्या हौसाआजीला ती बातमी सांगायला निघून गेली.

    इकडे ज्ञानबाचं लक्ष काही आज कामात लागायला तयार नव्हतं. नुकतीच एक ट्रेन निघून गेली. तसे ज्ञानबा चहाचं काम सरसर करायचा. आज मात्र कशीबशी अर्धी किटलीच संपत आली होती. दोन पेसेंजरकडून तर पैसे घ्यायचेही ही विसरला. का कुणास ठाऊक त्याला घरी जाऊन रखमाईशी बोलावं वाटत होतं. जर तिला हेच हवं असेल तर? "हो. मी का इतका विचार करतोय. सरळ तिला सांगून टाकावं. तिचा अंदाज तरी घ्यावा. तिलाही आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आरामात जगावं वाटत असेल ना." विचार करत करत ज्ञानबा स्टेशनवरील पाण्याच्या टाकीजवळच्या कट्ट्यावर बसला. तिथं निरागस डोळ्यांचं एक कुत्र्याचं पिल्लू शोधक नजरेत आलं. पिल्लाची आई सोबत नव्हती. त्या छोट्याशा जीवाला तहान लागली असावी बहुतेक. भर उन्हातून आल्यानं त्याची तहान पराकोटीला गेली असावी. ओल्या झालेल्या फरशीलाच चाटू लागलं. ज्ञानबानं लगेच एक चहाचा मोकळा कप घेतला आणि पाणी भरून त्या पिल्लापुढं ठेवलं. पिल्लांनं जिभेने चटचट करत पटकन तो पाण्याचा कप संपवला आणि अजून पाहिजे म्हणून आर्जवी नजरेने ज्ञानबाकडं पाहिलं. त्यानंही हसून तो कप उचलून आणखी एकदा पाणी भरून ठेवलं. असं 4-5 वेळा केल्यावर कुठे ते पिल्लू खुशीत दुडूदुडू पळत गेलं. तेवढ्यात ज्ञानबाला दुसऱ्या चहावाल्यांने ट्रेन निघून गेल्याचं सांगितलं. पण पिलावर नजर रोखलेल्या ज्ञानबाचं लक्ष, शून्यात हरवलं होतं. कदाचित अजूनही रखमाईच्या काळजीत होतं. त्याच्या पिल्लासाठी नक्की 'योग्य काय' हा यक्षप्रश्न त्याच्यासमोर फेर धरत होता.

    संध्याकाळी घरात पाऊल ठेवतो तोच रखमाई भाकरी थापताना दिसली. ज्ञानबाला आज ही अवखळ पोरगी इतक्या लवकर जेवण करताना पाहून हसूच आलं. तिनं आप्पाला पाहताच हातातली किटली घेतली. आणि लाडीकपणे मिठी मारली. ज्ञानबाला आज त्या मिठीत एक गंभीरपणा जाणवत होता. म्हणजे नेहमीची काहीतरी चेष्टा मस्करी करणारी रखमाई वाटत नव्हती. तो विचारात पडला.

    "आप्पा.. कुठं हरवलास.... ?"

    ज्ञानबा ध्यानावर येत.." हा बोल...काय म्हणती आमची रखमाई.. एवढी शहाण्यासारखी वागाय लागली आज. काय विशेष गं."

    "काही नाही विशेष. तूच सगळं मनात ठेवतोस. हौसा मावशीनं त्या स्थळाबद्दल सांगितलं. कधी बोलवलंस पाहुण्यांना?"

    "म्हणजे तू तयार हायस? मी सकाळपासून ईचारात होतो तुला कसं सांगायचं? तू बिनसती की काय वाटत होतं. नेहमीप्रमाणं.. पोरगी जड झाली का वगैरे. "
    रुक्मिणी हसत. 

    "आरं.. आज नाही तर उद्या करावंच लागेल ना लग्न. आणि कधी पण झालं तरी हा वेडा नाद कुठल्या घरचे लोक सुनेला करून देतील. माझ्या मनानं आधीच तयारी केली होती या गोष्टीची. शिवाय हे लोक हुंडा वगैरे मागणार नाहीत. बघ ना. लहानपणापासून पाहतेय मी आप्पा तुला. शिक्षण असो.. खाऊ असो.. गिर्यारोहन असो.. तू स्वतःच्या डोक्यावर ओझं घेऊन मला काही कमी पडू दिलं नाहीस. मग या आयुष्याचा पार्ट 1 काहीतरी भन्नाट घडला ना.. मग आता पार्ट 2 जरा सिरीयस होईल. त्यात काय.?

    ज्ञानबा परिस्थितीने अगतिक होता. त्यानं आपल्या समजूतदार पोरीला अगदी मायेनं जवळ घेतलं. इवलीशी हुंदडणारी रखमी आणि आता बापाचा विचार करणारी रुक्मिणी. पण खरं तर ज्ञानबाला मात्र तिनं कधी रखमीची रुक्मिणी होऊच नये असं वाटत होतं. 

    असेच तीन दिवस निघून गेले. उद्याला पाहण्याचा कार्यक्रम होता. ज्ञानबाने दोन दिवस सुटीच घेतली होती. त्याचं ध्यान काही थाऱ्यावर नव्हतं. रुक्मिणी चेहऱ्यावर तसं दाखवत नसली तरी तिच्या वावरण्यात ज्ञानबाला एक अस्वस्थता जाणवत होती. तिनं गिर्यारोहनाचा त्याग करणं म्हणजे पक्षाने उडणं नाकारणं. ज्ञानबा विचारातच होता इतक्यात त्याला वर दोन पत्र्यांच्या मधे खोचलेला लिफाफा दिसला. जुना कागद असेल म्हणून टाकण्यासाठी त्याने काढला. तसं त्याला इंग्रजी फार काही यायचं नाही पण मोडकं तोडकंच वाचायचा. उघडून पाहतोच तर हा तर आत्ता काही दिवसांपूर्वीचा होता. वरती काही तरी मॉउंटनेरिंग फेडरेशन असं काही लिहिलं होतं. पुढचं लिहिलेलं काही कळलं नाही पण माउंटन या शब्दावरून गिर्यारोहनासंदर्भात काही तरी आहे इतकं कळालं आणि चमकलाच. रुक्मिणी हौसामावशीकडे बसली होती.  त्यानं पटकन तिला घरी बोलवलं. आल्याक्षणीच तिच्या हातात ते पत्र ठेऊन प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडं पाहिलं. आता ती आपल्या भावना नाही लपवू शकली.

    "रखमाई.. काय लिहलंय ह्यात? खरं खरं सांगायचं."

    "आप्पा.. जाऊ दे ना.. उद्या पाहुणे येतायत आणि मला काय प्रॉब्लेम नाही त्यासाठी."

    "मी बाकीचं विचारलं का तुला. ह्यात काय लिहिलंय सांग फक्त."

    "दिल्लीची एक संस्था आहे गिर्यारोहनाची. त्यांचं के-2 या शिखराच्या चढाईसाठी नियोजन चालू होतं. आमच्या मुंबईच्या सरांच्या मदतीने मीही अप्लाय केलं होतं. पण मला नव्हतं रे माहीत की ते निवडतील मला. जगातलं दुसऱ्या नंबरचं आणि तितकंच अवघड असं उंच शिखर. मोहिमेचा संपूर्ण खर्च एक कंपनी करणार आहे. मग हौसाआजीनं स्थळाचं सांगितलं. काही हुंडा बिंडा घेणार नाहीत म्हणजे बघ ना."

    "आणि त्या मोहिमेसाठी जायचं कधी होतं?"

    "आज फोन करून त्यांना पक्कं सांगायचं होतं. मोहीम वीस दिवसानंतर सुरू होणार पण त्याच्या तयारीसाठी उद्याच निघावं लागणार होतं. नंतर तीन महिन्यानंतरच परतणार."

    "आणि मला न सांगता स्वतःचं स्वतः ठरवलं नाय जायचं म्हणून? मोठी झाली रखमाई माझी. मग खरंच लग्न करतोय ते बरोबरच म्हणायचं."

    "हूं...." रखमाई खाली पाहत म्हणाली.

    "काय गं येडी पोरगी तू.... लग्नाचा खर्च वाचतूय म्हणून तुझं लगीन करायचं होय." 

    रुक्मिणीनं ज्ञानबाला घट्ट मिठी मारली आणि मुसमुसून रडू लागली.

    "आणि आप्पा एक सांगू.. मी घाबरत नाय पण ते शिखर पार करण्याच्या प्रयत्नात बऱ्याच गिर्यारोहकांचा जीवही गेलाय. माझं तसं काही झालं तर तू कसा राहशील. सगळे पाहुणे, हौसामावशी, आजी आजोबा तुला नावं ठेवतील.. अगदी आयुष्यभर.. ते पण एक कारण होतं न जाण्याचं."

    ज्ञानबाची तिच्या भोवतीची मिठी अजून घट्ट झाली. हे त्याच्या कल्पितातही नव्हतं. पण त्याच्या काळजाचा तुकडा कधी जगात नसेल असा कधी विचारही मनात आला नव्हता. समोर तो भैरोबाचा डोंगर दिसला आणि त्यावर नाचणारी छोटी रखमाईदेखील. मन घट्ट करून एका निर्धाराने तो बोलला.

    "रखमाई... तुला माहितीय.. वारीतल्या वारकऱ्यांची इच्छा काय असती? एक तर त्या इठोबा रखमाईचं दर्शन व्हावं नायतर मरण यावं तर वारीच्या वाटेवर. तुला इठोबा डोंगराव दिसतो. आणि तसं काय वाईट झालंच तर मी म्हणन संसारातलं रोजचं मराण मरण्यापेक्षा माझी रखमाई फक्त जगली."

    "आप्पा..... " रखमाईला आपल्या बापाची उंची क्षणभर एव्हरेस्टपेक्षा मोठी वाटली. ज्ञानबाने डोळे पुसले.

    "बर चल.. आवरायला घे.. त्यांना फोन करून येतेय म्हणून सांग. मी पावण्यांना काय सांगायचं ते सांगतो आणि आमच्या स्टेशनवरच्या एजंटकडनं उद्याचं तिकिट काढून आलो. आणि अगं तुला खायला करायला हवं. चिवडा करू?"

    "आप्पा आता काय मी शाळेच्या सहलीला जाणार हाय काय? चिवडा बिवडा करायला." दोन चार दिवसांनंतर रुक्मिणीच्या चेहऱ्यावर सुंदरसं हसू उमटलं. आणि आप्पा देखील हसू लागला.

    ************

    ज्ञानबा रुक्मिणीला ट्रेनमधे बसवून आला. काल कितीही निर्धाराने बोलला असला तरी रखमाई डोळ्याआड होताच पुन्हा डोळे पाणावले. घरी पोहचणार इतक्यात हौसामावशी रागानं लालबुंद होऊन वाटेत उभीच होती. रखमाईला सोडलं पण आता कडकलक्ष्मीला तोंड देणं भाग होतं. महादेवरावांनी ज्ञानबाच्या कार्यक्रम कॅन्सल करण्याबद्दल तिला सांगितलंच होतं. ती खूप तणतणत बोलली. अगदी जीवाला लागण्याजोगं. ज्ञानबा मात्र कळवळून एकच वाक्य बोलू शकला.

    "मावशे.. भैरोबच्या डोंगरापलीकडं पाहण्याचा हट्ट करणारी माझी रखमाई आता त्या आपली नजर पोहचणार नाही एवढ्या उंचीवरणं सगळं जग पाहणार हाय. अगं. लगीन काय होईल गं.. भेटंल तिला असाच एखादा.. डोंगर आवडणारा विठोबा."
    
 ********** समाप्त ***********

©विशाल पोतदार
    
    

Tuesday, 20 October 2020

ओवी ज्ञानेशाची आयुष्याची

#विशालाक्षर
#ओवी_ज्ञानेशाची_आयुष्याची

ज्ञानेश्वरी, गीतेचा फक्त अनुवाद नव्हे, तर गीतेतील श्लोकांचा मतितार्थ घेऊन, समाधानी आयुष्य कसं जगावं हे सांगणारा मार्गदर्शक आहे. आणि त्या निरुपणात कुठेही आदेश, बडेजावपणा नाही. एखाद्या मित्राने खांद्यावर हात ठेवून सल्ला द्यावा इतकी त्या भाषेत सहजता, तर शब्दनृत्य करवणाऱ्या कवीइतकी अलंकृतता आहे.

खालील ओव्यांतून, ज्ञान धारण करण्यासाठी योग्य व्यक्तीची लक्षणे  सांगतात.

अध्याय १३:-क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग
ओवी:-
जातया अभ्रासवें । जैसें आकाश न धांवें ।
भ्रमणचक्रीं न भंवे । ध्रुव जैसा ।।८८।।
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा ।
कां नाहीं जेवीं तरुवरां । येणें जाणें ।।८९।।
तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकीं । भूतोर्मीं एकीं । चळिजेना ।।४९०।।

अर्थ:-
-कितीही जोरदार वारे वाहिले म्हणून, त्यासवे आकाश वाहून जात नाही. आकाशात कितीही बदल झाले तरी ध्रुवतारा आपलं स्थान कधीही सोडत नाही. वाटसरू कितीही चालला तरी रस्ता काही त्याच्या पावलांसोबत आपली जागा सोडत नाही. तसेच, आपला पंचमहाभुतांचा देह कितीही हालचाल केली तरी त्याची चित्तवृत्ती ढळू नये.
-मी माऊलींच्या समर्पक रूपके वापरण्याच्या कलेवर नेहमीच फिदा आहे. कारण ही उदाहरणे आपल्याला विचारांची खोली आणि उंची दोन्ही अगदी आरशातल्या प्रतिमेप्रमाणे निखळ दाखवतात.
- आपली चित्तवृत्ती कुठलाही विकार मनामध्ये न आणू देता आपण संसार व्यवहारात कसे शांतचित्त राहतो यामधे आपली ज्ञान ग्रहण करण्याची वा जीवन समाधानी करण्याची ताकद सामावलेली असते. विकार म्हणजे मनाचे रोग. (काम, क्रोध, मत्सर, भय इत्यादी).
-प्रॉब्लेम हा आहे की हे रोग बाह्य परिस्थितीमुळे डोकं वर काढतात जी आपण बऱ्याचवेळा बदलू शकत नाही. आपण स्वतःचं मन मात्र नक्कीच ताब्यात ठेऊ शकतो. आपल्या हातात आहे, मनाचा तोल ढळू देणं.

ओवी-
वाहुटोळीचेनि बळें । पृथ्वी जैसी न ढळे ।
तैसा उपद्रवउमाळें । न लोटे जो ।।४९१।।
दैन्यदु:खीं न तपे । भयशोकीं न कंपे ।
देहमृत्यु न वासिपे । पातलेनी ।।४९२।। ।

अर्थ-
- वावटळ आली म्हणून पृथ्वी हालत नाही. तसा तुला कुणाचा उपद्रव झाला म्हणून तू त्यासोबत वाहवत जाऊ नको. दुःख आलं, गरिबी आली म्हणून संतापू नको. भयभीत होऊन कापू नको. अगदी मृत्यू समीप आला तरी तूझी मनाची स्थिती कायम ठेव.
- आपण नेहमी विचार करतो की एखाद्या परिस्थितीत जास्तीतजास्त वाईट काय होईल. त्या वाईट परिस्थितीमधे मन शांत अचल ठेऊन पुरून उरायला हवं.

ओवी-
आकाश हें वोसरों । पृथ्वी वरि विरों ।
परी नेणे मोहरों । हृदयवृत्ती ।।४९५।।

अर्थ:-
-आणि ही ओवी अगदी मनाला इतकी उभारी देऊन गेली की ती सदैव डोळ्यासमोर ठेवावी.
-अगदी आकाश खाली निखळून पडो अथवा पृथ्वी विरून जावो. पण पार्था तरीही जर तू हृदयवृत्ती तशीच अचल राहू दिलीस तर जगातलं सर्व ज्ञान तुला नमन करेल.
-चित्तवृत्ती किंवा मनाची स्थिती कायम ठेवणे म्हणजे मतिमंद होणे असं नव्हे. तर एक तटस्थ भाव ठेवून त्या परिस्थितीला पाहता येणं. तटस्थ भाव असा असावा की तुम्ही त्या परिस्थितीत घुसून न राहता मनाला थोडंसं चार पावलं दूर आणावं. त्यावेळी मग भय,काळजी न वाटता त्या परिस्थितीवर मात मिळवण्याचे मार्गही दिसू लागतात.

माऊली...🙏🙏

©विशाल पोतदार (संपर्क-9730496245)

तळटीप: माऊलींच्या शब्दांना स्वतःच्या चिंतनात सांगड घालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. लेखनात जर अनावधानाने काही चूक असल्यास जरूर दर्शवून द्यावे.

Tuesday, 29 September 2020

सुंगी मुंगीची गोष्ट (भाग 1)

 एक ना, सुंगी नावाची मुंगी होती.. तिच्या सर्व मैत्रिणींमधे हिची शरीरयष्टी अगदीच तिडतीडीत. गी साखरेच्या दाण्यापेक्षाही लहानगी,पण भलतीच खोडसाळ मुंगी. किरकऱ्या स्वभावामुळे संकटांना सहपरिवार आमंत्रण देणारी. धाडसी खेळांमुळे बऱ्याचवेळा मरणाच्या दारातून तशी वाचली होतीच. अहो, यमराज जरी समोर उभे ठाकले असते, तरी त्याच्या रेड्याच्या कानात कडकडून चावा घेऊन पळवून लावलं असतं तिने. 

काल तर ती गजब संकटात सापडली. तर झालं असं. एका बलदंड बाईच्या घरी, किचनच्या फटीत मुंग्यांचं वास्तव्य होतं. ती बाई रोज धडाम धुडूम वाजवतच कामं करायची. मुंग्या बापड्या तिचा हात, पाय चुकवत कसंबसं आपलं उदरभरणाचं काम पार पाडीत. पण ती बाई अधूनमधून विषारी खडू मारून मुंग्यांना मारायचं काम करी. खडूच्या वासाने कितीतरी मुंग्या आपल्या प्राणाला मुकत. आज सुंगीसुध्दा त्या खडूवरून जाता जाता वाचली. त्या बाईच्या रागाने तिच्या मनात आता 'बदला घ्यायची' खूणगाठ पक्की झाली. कसंतरी करत, ती बाईच्या हातावरून मानेवर पोहचली. आणि सर्व ताकदीनिशी कडकडून चावा घेतला. चावून विजयाच्या खुषीत पुढचे पाय उचलणार, तोच बाईने तिला जोरात झटकले.

सुंगी उडून हवेतच पाच सहा कोलांट्या उड्या खात शेगडीवर ठेवलेल्या पातेल्याच्या काठावर पडली. सामान्यतः संकटातून वाचल्यावर आपला जीव भांड्यात पडतो, इथे मात्र सुंगी भांड्यात पडल्याने जीव वाचला. त्या बाईने शेगडी पेटवली आणि मान चोळतच हॉलमधे जाऊन टीव्हीपुढे बस्तान मांडलं. सुंगीला वाटलं, पटकन इथून बाहेर उडी घेऊ आणि घरी जाऊन बसू. पण तेवढ्यात पायाला चटके बसू लागले. आता मात्र तिला येऊ घातलेल्या गरम संकटाची जाणीव झाली. थोडं खाली यायचा प्रयत्न करू लागली पण जास्तच चटका बसू लागल्यावर, ज्या वेगानं खाली जात होती त्याच्या दुप्पट वेगानं वर आली. पुन्हा पातेलेच्या कडेवर विराजमान. 

आता मात्र उष्णता वाढत होती आणि बाहेर पडण्याची पटकन आयडिया काढणं क्रमप्राप्त होतं. त्या कडेवरून एकदा तिने पूर्ण फिरून कुठून उतरता येतंय का ते पाहिलं. उडी मारायचा विचार, खाली शेगडीच्या ज्वालेकडे पाहूनच गिळला. पायाला जास्तच चटके बसू लागल्यावर, आता मात्र ती रडकुंडीला आली.  

इतका वेळ सुटकेसाठी पातेल्याच्या बाहेर पहात होती, पण रडताना सहज तिची नजर पातेल्याच्या आत पडली. विस्तीर्ण असं पांढरं शुभ्र पटांगण पसरलं होतं. त्यावर काही बुडबुडे तर कुठे सुरकुत्या दिसत होत्या. तिच्या मनात आलं, "मरायचंच आहे तर त्या पांढऱ्या पटांगणातच मरू."  मनात मुंगीदेवीची प्रार्थना केली आणि त्या पातेल्यात घेतली एकदाची उडी. खाली पडेपर्यंत हवेत ऊब जाणवली आणि काही क्षणातच त्या मैदानात उतरली. खरं तर ते पटांगण गादीसारखं मऊ मऊ होतं. इवलेसे पाय हलकेसे रुतून गुदगुल्या होत होत्या. मघापासूनच्या त्रासाचा थोडाफार का होईना विसर पडला.

 तिथे फिरताना मात्र तिला जाणवलं की जितकं मधोमध राहू तेवढा गरमपणा कमी वाटतोय. आता असेही आपल्यासोबत जे काही घडेल त्याची वाट पाहत राहणे हेच तिच्या हाती होतं. पण हळूहळू गादी जास्तच गुबगुबीत होऊ लागली. सुंगी स्वतःवरचं संकट विसरून त्या गादीवर पळत येऊन घसरणे, उड्या मारणे, लोळणे, डोक्यावर उभं राहणे इत्यादी खेळात रममाण झाली. खेळता खेळताच तिनं गादी चाखून पाहिली तर जामच चविष्ट लागली. आजपर्यंत तिनं इतकं चवदार असं दुसरं काही खाल्लं नव्हतं. मग काय? आवडतंय म्हटल्यावर हिने ती गादी खायला सुरुवात केली. थोडं खाल्ल्यावर पडलं ना छिद्र. त्या छिद्रातून धुरासारखं काहीतरी बाहेर येऊ लागलं. आत काय आहे हे डोकावून पाहताना, आतल्या पांढऱ्याशुभ्र गरम पाण्यात तिचा पाय गेला. त्यात पडून गटांगळ्या खाणार, इतक्यात तिनं कसाबसा तोल सांभाळला. आता मात्र ती मधे येऊन गपगार बसली. स्वतःच्या बालिशपणाची कीव आली. इतक्या मोठया संकटात आपला खाण्याचा मोह सुटेना याचा रागच आला. तिला ह्या पटांगणाचं कोडंच सुटत नव्हतं. मऊ पटांगण.. त्याच्या खाली उकळतं पांढरं पाणी...सगळं काही विचित्रच होतं.

आता तिनं शांत पवित्रा घेतला. यातून वाचायचं असेल तर संधीची वाट पाहावी लागेल. छोटीशी देखील संधी सोडता कामा नव्हती. ती चारी बाजूला बारीक लक्ष ठेऊन बसली. आता तिच्या मनातला अल्लड, आताताईपणा जाऊन समंजस, धाडसीपणा रोवला जात होता. काही वेळ शांतपणे गेला. अचानक काहीतरी अजबच घडायला सुरुवात झाली. आतून कुणीतरी ढकलल्यासारखं पटांगण मधोमध फुगू लागलं. फुगलेल्या पटांगणासोबत सुंगी जशी वर येत होती तसे भीतीने पाय लटपट कापत होते. तो अजस्त्र फुगवटा फोडून आता काहीतरी बाहेर येणार आणि तिला खाणार असंच वाटू लागलं. पण सुंगी आता हार मानणार नव्हती. एक पाय टेकवत दुसरा पाय उचलत ती तग धरून राहिली. एका क्षणी ती पटांगणासोबत इतकी वर आली की आजूबाजूचं सर्वकाही दिसु लागलं. तेवढ्यात हॉल मधून बलदंड बाईदेखील पळतच आली. सुंगीने तोल सावरत वेगानं पातेल्याच्या बाहेर जीवानिशी उडी घेतली. काहीक्षण ती हवेतच होती. खाली कुठे पडणार..? जिवंत राहणार की मरणार..? काही सांगता येत नव्हतं. पण वाचण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद मात्र होता. 

शेवटी तो क्षण आला जेव्हा ती शेगडीशेजारच्या डब्यावर दोन तीन कोलांट्या घेत पडली. त्या बाईने धावत येऊन शेगडी बंद केली आणि नवऱ्याला खेकसली, "अहो.. दूध उतू गेलं. . एखादं काम ही धड करता येत नाही बाई या माणसाला."

सुंगीचा आनंद त्या किचनमध्ये मावत नव्हता. लंगडत लंगडत घर गाठलं. दाराशीच आई बाबा उभे होते. आता ती पुन्हा लहानगी होऊन रडू लागली. बाबांनी तिला जवळ घेतलं, "कुठे होतीस गं सुंगे? तुला शोधण्यासाठी आम्ही किचनमधला डबानडबा धुंडाळला बघ." 

बाबांच्या कुशीत रडता रडताही सुंगीच्या डोळ्यातून हसू ठिबकत होतं. आणि एवढं होऊनही शहाण्या मुंगीसारखी गप्प बसेल, ती सुंगी कसली? तिच्या मनात अजून 'फक्त' एकदाच आपल्या खास मैत्रीण बुंगीलाही पटांगणावरचा फुग्यावर हुंदडायचं आणि त्यावर ताव कसा मारायचा याची आखणी तयार होऊ लागली.


 

Wednesday, 19 August 2020

#विशालाक्षर #मनाचा उच्छाद

जेव्हा माझ्या मनानं मेंदूपासून सवतं राहायला सुरुवात केली. तेव्हाच खरा उपद्व्याप चालू झाला. उपद्व्याप कसला.!!  उच्छादच.!!

नजर जाईल तिकडे याचा विचार चालू. त्या गोष्टीची या गोष्टीशी तुलना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करत राहते. दुर्दैव म्हणजे सरतेशेवटी बाकी कधी शून्य रहातच नाही. कारण बाकी शून्य राहिली तर विषय संपेल आणि विषय संपल्यावर चघळायला काही नसतं. 

या मनात दिवसरात्र मंथन चालूच असतं. अंतःपटलावर चित्र घोळत राहतं. विचाराला विषय मिळतो. विषयाला धुमारे फुटून काहीतरी तोडके मोडके शब्द फुलतात. पण प्रश्न राहतोच की पुढे येईल त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा का? की मनाला स्वतंत्र होण्यापासून रोखावं. पण मानवी अंश असण्याचं ते एक धडधडीत लक्षण नव्हे का? म्हणून मनाला वेगळं होण्याआधीच त्याला हाकलावं आणि पिटाळून द्यावं वाऱ्याच्या दिशेनं.  खाली गेलं तर तळ गाठावा, वर गेलं तर दिगंत धुंडाळावं आणि इथेच राहिलं तर जागृत रहावं. जाणीव जिवंत ठेवून, विचार वाढावा इतकंच!

या विचारातल्या पसाऱ्यातून दोनचार शब्द उचलले की तयार होतेच की लेख, कविता, कथा वगैरे वगैरे.

 ©विशाल पोतदार

Sunday, 9 August 2020

राधा अन सूर बासरीचे

कृष्णा .... आज असा उदासीचा सूर का? रोज तुझी बासरी इतके तेजस्वी स्वर बरसायची. पण आज असे रखरखीत का वाटतायत. खरंच तसं आहे की माझे कान आज दुर्भाग्या सारखे वागतायत. ते बघ ना तुझ्या गायी पण क्षणभर थबकल्यात. अगदी सैरभैर झाल्यात. तुझ्या सुरावळीमध्ये फक्त माझंच जीवन नाही रे अडकवलस, ह्या मुक्या प्राण्यांनाही खेचून घेत राहिले. लोक तुला मायावी म्हणतात, प्रभू म्हणतात ना तेव्हा मनात खुदकन हसू येते रे. त्यांना सांगावे वाटते की हा माणूस भगवंत थोडीच असू शकतो. निव्वळ एक उत्कृष्ट अभिनेता म्हणू शकतो. सदैव कुठलेतरी नाटक बसवणारा आणि स्वतः त्यात अगदी प्रसंगानुरूप बदलणारा. तुझी बासरी तशी तुझ्यासारखी नाही निघाली. आता तू नाहीयेस तर ती या गोकुळाच्या आताच्या भावनेचे स्वर ऐकवतेय एका विदारक रागाने.

त्या संध्येला तू भेटायला आलास तेव्हा मला जाणवलेच होते की आता हा काही तरी नवीन नाटक बसवतोय. पण यावेळी तू अभिनय नाही करू शकलास. तू प्रयत्न खूप केलास ते पात्र वठवताना. दूर जाताना दुसऱ्याला कळू न देता, त्या व्यक्तीच्या नकळत त्याचा निरोप घ्यायचा. तुला कसे वाटले रे की असं काही तुला जमू शकेल. तू पूर्ण मथुरा आणि गोकुळाला गुंगारा देऊ शकशील, पण मी किंवा या गायी नाही तुझ्या नाटकास फसलो. आम्ही तुझी मजा पाहत होतो. एवढी मोठी राजकीय खलबते करणारा मुत्सद्दी, आम्हांसमोर चक्क डोळे न मिळवता हसत होता, बोलत होता. तुझ्या त्या गायीला नाही रे बघवलं तुझं हे न सांगता निरोप घेण्याची तगमग. जवळ येऊन तुझ्या गालाला चाटत होती, आपला चेहरा तुझ्या कानाशी घुसळत होती. तुझं हृदय पिळवटलं असेल ना रे. म्हणूनच कदाचित कदंबाचा आधार घेऊन उभा होतास. त्यानं नेहमीच तुला मित्रासारखा आधार दिला, त्याच्या खांद्यावर हनुवटी ठेऊन मला म्हणालास...

"राधे.... ही बासरी ठेव तुझ्याजवळ.. लोकांना माहीत असलेला मुत्सद्दी, मायावी, भगवंत हा कृष्ण खरा नव्हे. माझं हळवं आत्मचरित्र फक्त या बासरीलाच माहीत. आणि हो आपली प्रत्येक भेट हिनं जपून ठेवलीय. कधी मी नसेन त्यावेळी विचार हिला."

त्यानंतर तू पाठमोरा होऊन झरझर चाललास देखील. त्यावेळी तुझं मोरपीस देखील कललं होतं तुझे अश्रू पुसण्यास. आयुष्यात आवडत्या गोष्टीजवळ राहू न शकण्याचा शाप असावा तुझ्यासारख्या अखंड व्यक्तिमत्वाला. तू सोडून गेलास त्यास युगे लोटली पण तुझ्या बासरीला हातात घ्यायचं सामर्थ्य झालं नाही रे. आज शेवटच्या घटका मोजताना मात्र आज तिला मी कवटाळले. एवढ्या वर्षात मी विसरले होते की तीही माझ्याशी समदुःखी आहे. ती सुद्धा विरहिनी आहे.. ती अर्धं तुझं तर अर्धं माझं आत्मचरित्र आहे.....

   image source - betterphotography.in


                  --- विशाल पोतदार


Monday, 20 July 2020

पृथ्वीचे पत्र

दादा,

कसा आहेस रे? तशी तुझी किरणं वरवरची खबरबात सांगतातच. पण मनातल्या गोष्टी स्वतःच सांगायला हव्यास ना. नाहीतर, तुझ्या मनात काय चाललं असेल याचे तर्क लावत बसते आणि मन भूतकाळातल्या पापूद्र्यात हरवत जातं. काळाच्या पडद्यामागे, एकेठिकाणी बालपण गवसलं आणि हुरहुर वाटू लागली बघ. बालपणीच्या आठवणींनी मन दाटून येतं.

तसे सृष्टीचे निर्माते आपल्याला आईबाबा म्हणून लाभले. पण माझ्या नखऱ्यांनी मात्र आईबाबांच्या किती नाके नऊ आणले होते ना. आधी तर किती तरी वर्ष तापटच होते मी, आगीचा गोळाच जणू. जरा काही मनाविरुद्ध झालं की नाकावर ज्वालामुखीच जागृत व्हायचा. आई नेहमी म्हणायची, "दादा बघ कसा शहाण्यासारखा वागतो. स्वतः कितीही त्रासात असला तरी तसा दाखवत नाही. उलट दुसऱ्याला जगण्यास चालना देतो." या सुचनांमुळं सुरुवातीला राग यायचा, पण हळूहळू तू जसा कळायला लागलास, तेव्हापासून तुझा आदरच वाटला. आता तू म्हणशील, "इतकं आभार प्रदर्शन करतेयस, माझ्याकडून काही हवंय का?" पण नाही रे. तू आमच्यासाठी आजपर्यंत जे काही केलंस. ते बोलावसं वाटलं. नऊही लहान भावंडाचं आयुष्य स्वतःच्या प्रकाशाने उजळणारा तू. प्रत्येकजण कितीही दूर असला, तरी तूझ्याशी एका अदृष्य धाग्याने बांधला गेलाय. नाहीतर आम्ही अंतराळात कुठल्या कुठे गुडूप झालो असतो. तुझे केवळ आभार मानून चालणार नाहीच, आमचं आयुष्यच सदैव तुझ्या पायी अर्पण आहे.

आज तुझे आभार मानावे वाटले कारण मी आता अनुभवतेय की आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला सांभाळणे म्हणजे किती तारेवरची कसरतच असते. जे, आई बाबा आणि तुही केलंस. हल्ली माझा व्याप भयंकर वाढलाय रे. तुझी भाचेकंपनी आता खूपच अवकळ झालीये. लहानपणी मुलं बरी असतात. आपल्यावर अवलंबून असली तरी निरागस असतात. पण मोठेपणी मात्र निरागसता हरवून एक क्रूर व्यावहारिकता येते. मानवाचं अगदी असंच झालंय. बाकी सगळेजण शिस्तीत वागतात पण हा हुशार, शहाणा म्हणत आता खूपच स्वार्थीपणे वागतोय. झाड मात्र अगदी तुझ्यासारखं आहे बघ. दुसऱ्यांसाठी जगत राहतं. मानवाला मात्र, सगळं विश्व आपल्या मालकी हक्काचं असावं असं वाटतंय. कधी शिक्षा केलीच तर अजून उफाळून उठतो. कळतच नाही, याला समजवावे तरी कसे. तसा तो वाईट नाही रे. मायाळूसुद्धा आहे, सुंदरतेची दृष्टी आहे. पण ऐशोरामात राहावं या महत्वकांक्षेने इतका पछाडलाय की त्याला आपल्या भावंडांना इजा पोहचलेली देखील जाणवत नाही. असो, मागच्या काही वर्षापासून तू जरा तापून बोलतोयस, तेव्हापासून महाराज ताळ्यावर येत आहेत. तुझी दटावणी नेहमीच कामी येते. बघू आता मानवात काय बदल घडतात का?

अरे हो.. वर्षामावशी अजूनही नेहमीसारखी चार दिवस का होईना दिलखुलास राहून जाते. तिचं ते गडगडाटी हसणं अजूनही तसंच आहे. येताना कधी मोकळ्या हाती आली तर शपथ! मला अगदी हिरवा शालू, नद्या-तलावांच्या दागिन्यांनी नटवते आणि


काही क्षणांसाठी मी पुन्हा एक अवखळ छोटी मुलगी होऊन जाते. तिचा ओलावा काळजात ठेवूनच जाते.

हे तुझी नेहमीच आठवण काढतात. मानवाच्या नवनवीन यंत्रांच्या प्रदूषणामुळे त्यांची तब्येतही बिघडत चाललीय. प्राणवायू म्हणून मुलांच्या तनामनात वावरत, आयुष्यभर फक्त त्यांच्यासाठीच जगले ना रे ते. अजून काय काय सोसायचे. झाड मनापासून त्यांची काळजी घेतेय. पण मानव जर जबाबदारीने वागला तर त्यांची सगळी काळजी दूर होईल.

आता प्रकर्षाने असं वाटत राहतं की.. तुला भेटावं, मनसोक्त गप्पा माराव्या... भांडावं.. आणि रडत पुन्हा तुलाच मिठी मारून मनातली सुख दुःख सांगावी. पण निसर्गाने वेगळ्याच चक्रात अडकवले ना रे आपल्याला. कधीकधी असे भास होतात, की माझ्या सृष्टीचा विनाश होऊन सगळं भयाण झालंय. मी एकटीच आहे. तुझा हात सुटून मी अंतराळात कुठेतरी दूर दूर चाललीय. आणि तू दिसेनासा झाला की मन भानावर येते. का होत असेल रे असं?

माझ्या बाळांसाठी मला कितीही संघर्ष करावा लागला तरी करेनच. पण कधी असं अघटित घडलंच तर.. काठोकाठ भावनांनी भरलेल्या मनाने जीवाची पर्वा न करता तुझ्याकडे धाव घेऊन तुझ्यातच विलीन होऊन जाईन. त्यावेळी ही पृथ्वी तुझाच अंश


असेल. तीच असेल माझी तुझ्याप्रती कृतज्ञता.

आता लिहिवत नाही. इथेच थांबते. स्वतःची काळजी घे. उत्तराची वाट पाहते.

तुझी,

पृथ्वी



********* समाप्त **********

©विशाल पोतदार



Thursday, 11 June 2020

गुलमोहराचा झोका


आजचाही दिवस कसाबसा संपवला आणि खेळाचा पडदा पडल्यासारखा प्रकाशाने काढता पाय घेतला. गुलमोहर इवलीशी पानं मिटून झोपेची आराधना करू लागला. पण डोळा काही केल्या लागेना. ही आता रोजचीच कहाणी झाली होती. काळोखासोबत झोप हजर जरूर व्हायची, पण आल्या मार्गी दौडत परतायची. एकेकाळी बलदंड खोड आणि पिळदार फांद्यां लाभलेला सळसळता युवक. आता मात्र आयुष्यासारखीच शरीरातही पोकळता आलेली. मन तर नुसतंच भीरभिरायचं. 

काही वेळानं कुठूनतरी पिसासारखं हळुवारपणे गोंजारणारी वाऱ्याची झुळूक आली. मिटल्या पानांची झोपमोड न व्हावी, अशा अंगाईच्या लयीत गुलमोहराला झोका देऊ लागली. काजव्यांची टीमटीमती दिवटी मालवून लालभडक गुलमोहर काळ्याशार रात्रीच्या कुशीत शिरला. अंगाईचा प्रभाव दिसू लागला आणि रात्र अल्लद गडद होत असता रातकिड्यांच्या आवाजात तो घोरूही लागला. तरंगत तरंगत मनाच्या पैलतीरावर असलेल्या स्वप्नांच्या दुनियेत पोहोचला. स्वप्नात, कुणीतरी आपल्या पसरलेल्या बाहूच्या बेटकीला घट्ट झोका बांधलाय. नकट्या नाकाची आणि करवंदासारख्या डोळ्यांची छोटी परी धावत येऊन झोक्यावर स्वार झाली. थोडसं घाबरतच झोक्यावर उभी राहून, दोनचार झोके घेताच 'मी पडले तर माझे दातपण पडतील' ह्या विचाराने बाजूला येऊन हिरमसून बसली. गुलमोहराने तिच्यावर फुलांचा वर्षाव केला, फांद्या हलवून नाचून दाखवलं पण गाल फुगवून बसलेली ती ठमी उठायला तयार नाही. त्याने शक्कल लढवली आणि सारा बहर निथळून झोक्याखाली गालिचा अंथरला. परीने हळूच त्या मऊ दुलईवर पाय ठेवला आणि मग गुलमोहराची मज्जा तिच्या लक्षात आली. आता मात्र दोन्ही पाय झोक्यावर घट्ट रोवून, नाजूक हातांच्या मजबूत मुठी दोरीभोवती आवळल्या. पहिल्याच वेगवान झोक्याने गुलमोहर मोहरला. असं वाटलं की तिला कवेत घेऊन फांद्यांमधील फुलांमध्ये अलगद बसवावं. पण आता पूर्ण बहर तर तिच्या झोक्याच्या पायाशी होता. तिला झेलायला सत्वर तयार. ती तर झोक्यावर अशी बिनधास्त स्वार झाली की पुढच्या आवर्तनात एखादी चांदणीच मुठीत घेऊन परतेल की काय असं वाटावं. मुळात ती कधीच पडणार नव्हती पण त्या गालिचाशिवाय ती वाऱ्यावर स्वारही होणार नव्हती.

स्वप्नांच्या दुनियेत असतानाच कानात पक्षांची मंजुळ किलबिल प्रवेश करते आणि अजूनही झोपेत असणाऱ्या पापण्यांची कवाडे उघडू लागतात. पाहतो तर काय? रात्र फिकट होत त्याच्या अंगावरची चादर काढून घेत होती. कपाळी केशरी टिळा लावून डोंगर सजताहेत. पक्षांची किलबिल आता गोंगाटात बदलते आहे.. काही वेळ दंगा घालून ते आपापल्या मार्गी निघून जातात. 

वार्धक्यानं वाकून गेलेला गुलमोहर मात्र वाट पहातच राहतो. एकलेपणात हरवलेला. रोज खुललेला तांबूस बहर जमिनीवर विस्कटतो आणि त्याला निरस काळसर छटा येते. मात्र आज कर्रकर्र आवाज करत दोलवणाऱ्या आरामखुर्चीतून दाराबाहेर नजर रोवून बसले असतानाच मग रोज पडणारं स्वप्न एखाद्या दिवशी खरं होतं. छोटी परी धावतच येऊन त्याच्या फैलावलेल्या बाहूंच्या झोक्यात विसावते. तो पुन्हा बहरतो. बरसण्यासाठी.

******** समाप्त *********

लेखक - विशाल पोतदार
संपर्क - 9730496245

आपला अभिप्राय अमूल्य आहे


Friday, 22 May 2020

लॉकडाऊनमधील पत्रावळी

काळाकुट्ट रस्ता इतका तापलाय की डांबरबी आता पाघळून जाईल. पाच दिवस झालं हायवे तुडवत चाल्लूय. पुलिसांच्या भ्यानं कुटलंच व्हान थांबना. रस्ता मागं सरतूय तसं माज गाव जवळ येतंय. हायवेला झाड किंवा एखाद्या दुकानाची सावली घावती विरंगुळ्याला. पण दोन-तीन तास झालं एकादं झाडबी दिसलं नाय. छकुली माझ्या खांद्याव दोन्ही बाजूला पाय टाकून आणि गळ्याभोवती मुटकुळा मारून गपगार बसती. हू का चू नाय.

"छकुले.... डोक्यावचा टावेल काडू नको.. ऊन लय लागतंय.. आता मिळल बग पुढं जेवाया."

सकाळपासून भूक लागली आसल माज्या छकुलीला. तिला इचारल्यावर 'नाय लागली भूक' आसंच म्हणती. बारक्या पोरास्नी भूक लागलीली कळत नाय म्हणत्यात. छकुलीलाबी कळत नसल की 'कळती' झाल्यागत भूक लागलेली दावत नसल.  मुंबईत आसताना गोळ्या बिस्किटासाठी मागं लागणारी छकुली आता एवडी समजदार झाली. पर बापालाबी पोरीचा चेहरा वाचता येतूया. काल राती पेट्रोल पंपाभाईर, कुणीतरी दिलेलं केळ खाउन झूपली व्हती . मग आता पोटात कावळं हैदोस घालत नसतील काय? आपलं काय, कामाच्या जोमात भूक मारायची सवय आदीपासूनच हाय. पण तिनं हे सोसायला नगो. 

फकस्त घर डोळ्याफुडं ठिउन चालतुय. लोक आमाला यडे म्हनत आसतील. पण आमाला दुसरा काय पर्याय व्हता. शहरात आमी रोज दोन येळच्या जेवणाइतकं कमावतो. जितं गर्दीमधी श्वासपण उसना घ्यावा लागतुय तिथं पैसा साठवायला कुटनं मिळणार. आन काम बंद तर खायाचं तरी काय. त्यात छकुलीची आय दोन दिसासाठी म्हणून गावी गेली असता तिथंच आडकून बसली. इकडं तिकडं जानं बंद. चारी बाजूनी त्या रोगानं थैमान घातलेलं. पोरीची आबाळ नगो म्हणून आसा निगालो बगा. आपल्या पोरीला तिच्या आईशीजवळ पोचवल्याव बरं वाटल. म्हणून ही पायपीट. शेकडो मैल. 

आता थोडं फूडं गेल्याव कायतरी मिळल असं म्हणत म्हणत सूर्य डोक्याव आला. त्यवढ्यात एक निवारा दिसला. तात्पुरता मंडप घातलेला. ती सावली दिसल्याव पळतच पोचलो. ती देवमाणसं पाणी देऊन जेवणबी वाडत हूती. पत्रावळी फुडं आली आणि माझी छकुली इतकी गोड हासली म्हणून तुमाला सांगू. माझी भूक तिथंच भागली. 

चार दिसात फकस्त केळी, काकड्या, वडापाव आसं कायतरी मिळायचं. पण आज भात, वांग्याची आमटी, भाकर. तेही पत्रावळी भरून. वांगं तिला लय आवडतं. मी तिच्याकडं पत्रावळी सारली आणि खा म्हणलं. छकुलीनं पयला घास उचलला आन माझ्या तोंडाकडं आणला. बापाच्या डोळ्यातनं पाणी कसं काढावं हे माझ्या शान्या लेकराला ठाऊक. माजं कोकरू ते. ह्यो प्रवास तिला लय काय शिकवल. देवा फकस्त तुजा हात असू देरं डोसक्यावर, मग काय आसच हासत हासत पोचू बगा गावाला.

© विशाल पोतदार (मोबाईल- 9730496245)

फोटो स्रोत -अज्ञात

Friday, 1 May 2020

गायत्री मंत्र - उत्पत्ती, अर्थ आणि उच्चारण; Gayatri Mantra- Meaning

आजच्या कोरोना आपत्ती काळात आपण घरी थांबूनच लढा देतोय. पण दिवसेंदिवस मनात एक अनामिक भीती अस्वस्थता पसरतेय. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी भक्तीमार्ग अतिशय समर्पक. 

देवपूजा म्हणजे फक्त देवाची मूर्ती धुवून त्यांचा नट्टापट्टा करणे नव्हे. तर आपल्या मनातून त्याला प्रेमाने हाक देऊन, रोजचं कर्म पार पाडण्यासाठी एक मानसिक ऊर्जा मिळवणं. मूर्तीला अभिषेक करून गंध, धूप, फुल वाहनं हा पूजेचा एक दृष्य भाग आहे पण तद्नंतर नाम, मंत्रोच्चार हा मनाला देवाशी जोडण्याचा अमूर्त भाग येतो. मुळात मंत्र हे आपण स्वतः उच्चारले तरच ते आपल्या मनात जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करतात. आणि त्या मंत्रांचे अर्थ जर माहीत असतील तर ते पठण करताना, आपसूकच ती भावना आपल्या मनात जागृत होते. म्हणूनच गायत्री मंत्राचा अर्थ, योग्य उच्चारण आणि महती आपणापर्यंत पोहचावी यासाठी केलेला छोटासा प्रयत्न. 


अनेक महान मंत्रांपैकी सर्वश्रुत असा गायत्री मंत्र. आपल्या महान ऋषी मुनींनी अमोघ शक्ती असणारा हा मंत्र शरीर आणि मनाच्या रचनेचा विचार करूनच निर्मिले आहेत आणि त्या प्रत्येक मंत्राचा अर्थदेखील तितकाच गहन आहे. पण काळाच्या पडद्याआड आपल्यापर्यंत हे सगळं न पोहचता ते गाण्याच्या रुपात आलं. 

गायत्री मंत्राच्या जपाचा आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा जाणून घेण्यासाठी AIMS तसेच जर्मनी आणि अमेरिकेतील काही संस्थांनी वैज्ञानिक अभ्यास केला. या अभ्यासाअंतर्गत प्रत्येकी पंधरा व्यक्तींचे तीन ग्रुप केले. त्यातील एका ग्रुपने गायत्री मंत्राचा शास्त्रोक्त पद्धतीने रोज पहाटे जप केला, दुसऱ्या ग्रुपने गायत्री मंत्राच्या इंग्रजी भाषांतराचा जप केला आणि तिसऱ्या ग्रुपने कुठलाच जप केला नाही. आठवड्यातून एक दिवस त्यांच्या मेंदूचा एमआरआई टेस्ट, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याची तपासणी केली. हा प्रयोग तीन महिने केल्यानंतर त्यांनी सगळ्या टेस्ट्स आणि डाटा अभ्यासला. त्यातून असा निष्कर्ष निघाला की ज्या ग्रुपने गायत्री मंत्राचा शास्त्रोक्त पद्धतीने जप केला त्यांच्या रक्ताभिसरणामध्ये तसेच प्रतिकारक्षमतेत कमालीची सुधारणा झाली. मानसिक दृष्ट्या प्रसन्न वाटू लागलं. आणि मेंदूमधील न्यूरोकेमिकल्सचे डिस्ट्रीब्युशनमधील अस्थिरता कमी झाली. ज्याने मेंदूमधील ताण कमी झाला. पण बाकीच्या दोन्ही ग्रुप्स मध्ये हे फरक जाणवले नाहीत. यावरून गायत्री मंत्राची शक्ती सिद्ध झाली. आपण हे फक्त सिद्ध केलं. पण याची रचना करणारे ऋषीमुनी किती महान आहेत याची आपण कल्पनादेखील करू शकणार नाही.

ऋग्वेदामध्ये उल्लेख असलेल्या गायत्री मंत्राची रचना विश्वामित्र ऋषींनी केली. काव्यरचनेप्रमाणेच मंत्रदेखील विविध छंदांमध्ये रचले जातात. ऋग्वेदामध्ये अशा सात छंदांचा उल्लेख आहे. त्यातील 'गायत्री' छंदामध्ये रचलेल्या ह्या मंत्राला 'सावित्री मंत्र' असे देखील म्हटले जाते. त्याचे पुढे 'गायत्री मंत्र' असंच नाव रूढ झालं. ह्या चोवीस अक्षरी मंत्रामध्ये आठ मात्रांचे तीन पदे असतात.

मंत्र-











अर्थ -

1) ॐ - कुठल्याही मंत्राची सुरुवात ॐ या अद्याक्षराने केली जाते. ओम हा 'प्रणव' म्हणजेच ब्रह्मांडाचा प्रथम उच्चार आहे. मंत्र सुरू होण्यापूर्वी ओम उच्चार केल्याने आपल्या कंठापासून नाभीपर्यंत चेतना निर्माण करतो. ज्यामुळे पुढील मंत्राची कार्यकरिता उत्तम होते. फक्त तो उच्चार दीर्घ असावा जेणेकरून त्याची संवेदना तुम्हाला शरीरात जाणवू शकेल.

2) भू: भुव: स्व: -

हे तीन उच्चारदेखील मुख्य मंत्राच्या आधी उच्चारले जाणारे शब्द आहेत ज्यांना व्याहृती असे म्हटले जाते. वेदांमध्ये सात व्याहृतींचा उल्लेख आढळतो. त्यांचा अर्थ असा:
भू: - पृथ्वी, सृष्टी (शरीर)
भुव: - आकाश (बाह्यमन)
स्व: - स्वर्ग (अंतर्मन)
महा: ,जप:, तप: - ब्रह्मांडाच्या देखील वरच्या पातळीवर जाणारे स्तर (समाधीकडे)
सत्य: - अंतिम स्तर (समाधीवस्था)

3) तत् -ब्रह्म
4) सवितु: - निराकार निर्माता
5) वरेण्यम - पूजनीय
6) भर्गो: - अज्ञान निवारक
7) देवस्य - ज्ञानस्वरूप ईश्वराचे
8) धीमहि - ध्यान किंवा स्मरण करतो
9) धियो - बुद्धी, प्रज्ञा 
10) यो: - जे
11) न: - आम्हाला
12) प्रचोदयात - प्रकाशित करो

अर्थ -

हे ज्ञानाचा प्रकाशस्रोत असणाऱ्या पूजनीय ईश्वरा, ज्याने या सुंदर सृष्टीचे निर्माण केले. मी सदैव तुझे ध्यान करतो. मी प्रार्थना करतो की मला तुझ्या ज्ञानाने प्रकाशित करून सत्याच्या मार्गावर ने.

पठण समय-
प्रात: समयी पूजा करतेवेळी गायत्री मंत्राचं उच्चारण आपल्या मनात तसेच घरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करते.

गायत्री मंत्रोच्चारण योग्य प्रकारे कसं करावं यासाठी माझ्या व्हिडिओ ची youtube लिंक इथे दिली आहे. जरूर भेट द्या.

https://youtu.be/OoW5ny9CqeY

ही सर्व माहिती मी इंटरनेटवरून विविध वेबसाईटवरून मिळवली असून आपणास एखादा मुद्दा चुकीचा वाटला अथवा अजून काही नवीन माहिती द्यायची असेल कमेंटमध्ये जरूर सांगा. तर आपलं स्वागतच आहे.

Monday, 27 April 2020

मनातलं भुयार

अज्ञात सुखाच्या शोधात, एखाद्या भुयारात खोलवर जात राहावं. कित्येक फाटे फुटत राहतात. तीच तीच वळणं पुन्हा पुन्हा दिसत राहतात. कुठलं वळण घ्यायचं ते बुद्धी ठरवते. जी काय कारणमीमांसा करायची, ती तिलाच करू द्यायची. भावनेची आडकाठी दूर ठेवून तिच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं. 


पण खूप अंतर कापल्यावर अंधाराशिवाय काहीच दिसत नाही. अंधार दिसतो? की दिसण्याच्या अभावालाच अंधार म्हणायचा? असो.. इथे शब्दखेळ करत बसायला कुठे वेळ आहे. कारण आता धाप वाढतेय आणि जीवही गुदमरू लागलाय. हर एक श्वासाचंही ओझं वाटतंय. ऑक्सिजनही विरळ होत चाललाय. माघारी फिरावं वाटतं खरं, पण सुखाची आशाही वाईट असते. शेवटी अज्ञात सुखापेक्षा जीव महत्वाचा वाटून, एकदाचे माघारी धावू लागतो. 

परतीच्या प्रवासात देखील पुन्हा तेच संभ्रमाचे फाटे. कुठल्या मार्गावर विश्वास ठेवावा? जर एखादी वाट पुन्हा आत खोलवर घेऊन गेली तर? हा यक्षप्रश्न समोर असला तरी वेळ दवडण्याला अर्थ नसतो. लालसेने मृत्यूच्या दारी नेणाऱ्या बुद्धीपेक्षा, विवेकी मनावर ही जबाबदारी घ्यावी असे वाटते. एका क्षणात मन निर्णय घेईल त्या वाटेला पळायचं. पुन्हा प्रवास... पुन्हा ती वाट तुडवणे. भुयारातली वाट म्हणजे एखाद्या मोठाल्या पाईपमधून गेल्यासारखे. की पाईपच आहे ही? एवढा कशाला आपण तर्क लावत बसतो, आत्ता बाहेर निघायचंय हेच मोठं सत्य आहे. 

आता फक्त प्रकाशाची आस. प्रकाश हाच खजिना वाटू लागतो. एकदा का पुढच्या टोकाला प्रकाशाचं सूक्ष्म अस्तित्व जरी जाणवलं की बस्स. मग फक्त सरळ जावं लागेल. तोच शेवटचा मार्ग असेल. पण खूप वेळ झाला, अजून अंधारच आहे. ही गुहा खेळत तर नसेल माझ्याशी? इथेच नाही ना अडकून पडणार मी? बंद केलेल्या बिळातील उंदराला कदाचित असंच होत असेल? 

नाही... नाही.... मी नाही फसणार या जाळ्यात.. मी चालणं सोडणार नाही..

व्वा... प्रकाशाचा धूसर बिंदू दिसतोय. आता फक्त त्यादिशेने पळत, चालत, रांगत किंवा सरपटत कसे का होईना जात राहायचे. बराच पुढे आलोय पण त्या प्रकाशाची प्रखरता कुठे वाढतेय. तो बिंदू अजून तेवढाच तर सूक्ष्म दिसतोय.. कदाचित या भुयाराचं तोंडच माझ्या गतीने पुढे पुढे सरकत असावं का... की माझ्याच 'गती' चा कुणी मनुष्य मशाल घेऊन बाहेर पडायच्या प्रयत्नात असावा? जाऊदे.. नको आता द्विधा मनस्थिती.. आपल्या शरीरापेक्षा मनच जास्त धावतंय. मुळात मी इथं आलो ते, या विचारचक्रामुळंच. थोडं थोपवायला हवं हे चक्री वादळ.  

श्वास.. श्वासच यावरील गुरुकिल्ली. जीवनाचं एकमेव आणि अंतिम सत्य. एकदा का श्वास लयीत आल्यावर, थंड हवेची एक झुळूक मनाला गारवा देईल.

श्वासाच्या नुसत्या जाणिवेनेच, मन आता निश्चल झालंय. अगदी नदीच्या प्रवाहासारखं. भुयाराच्या तोंडाशी असलेला प्रकाश आता प्रखर होतोय. मी पोहचतोय. बाहेर गेल्यावर फक्त प्रकाशच असेल की अजून काही. जग बदललेलं असेल का? की तसंच दुःखानी माखलेलं असेल. पण मन समतेत असलं तर सुख काय किंवा दुःख काय, सगळंच अनित्य. त्यावेळी आसपास फक्त प्रकाशाची शुभ्र पीसं तरंगत असतील.. वाऱ्याहून हलकी.. अगदी या क्षणातल्या मनासारखी..

**********************
लेखक- विशाल पोतदार
मोबाईल- 9730496245


टीप- आपला अभिप्राय खूपच महत्वाचा असेल. आवडल्यास जरूर शेअर करा.

Saturday, 21 March 2020

तुझ्या शब्दांचे उत्सव (कविता)

बाल्कनीतला कोपरा हल्ली रिकामाच असतो,
तू होतीस, तेव्हा तिथे शब्दांचे उत्सव असायचे,
अंधुकशा संधीप्रकाशात, डोळे बारीक करून लिहायचीस,
अगदीच दिसेनासे झाल्यावर मी दिवा लावायचो,
आणि तू अचानक भानावर यायचीस..
तोपर्यंत तुझ्या कवितेची दोन कडवी मांडलेली असायची,

पुढचं लिहिण्याआधी..
डोळ्यावर जाड फ्रेमचा चष्मा चढवायचीस ना,
त्यावेळी तू,
सुंदरतेच्या पलीकडे जाऊन,
प्रगल्भ कवयित्री वाटायचीस..

तुझे मोकळे केस, कागदावर अलगद उतरून,
लिहिण्याची गुस्ताखी करू पहायचे..
त्यातलीच एक सोनेरी बट,
तुझ्या शब्दांना रेशमी करून टाकायची..

अजूनही बाल्कनीत बसलं की,
तुझ्या कवितेतले सांडलेले शब्द सापडतात,
मग मी अर्थ लावत बसतो,
नक्की ते शब्द सांडले होते,
की तू पेरून ठेवले होतेस..
कळत नाही..

अरे हो...
तू मुद्दाम प्रकाशित न केलेली,
कवितांची वही अजून आहे माझ्याकडे,
तू म्हटली होतीस,
यात फक्त आपल्या कविता आहेत..
पण तू सोबत नसल्यामुळे,
माझंही कधी वाचायचं धाडस झालं नाही...

आता वार्धक्य आलं..
पण तू कधी येशील माहीत नाही,
तरी मी म्हणतच राहीन..
एकदा ये ना इकडे, अगदी सहज..
इथलेच तुझे शब्द गोळा करून,
भरव ना पुन्हा, तुझ्या कवितेचे उत्सव..

                        - विशाल पोतदार




Sunday, 1 December 2019

जशी तू ... (कविता)

जशी तू...
तसं उन्ह..
तापट पण नितळ..

जशी तू..
तसा पाऊस,
ओला जिव्हाळा..

जशी तू..
तसं ते रान,
मनमोकळं..

जशी तू..
तसा सागर..
गूढ...अगम्य..


     - विशाल पोतदार

Thursday, 18 April 2019

हृदयातील वाटाड्या - २

(आपल्या आयुष्याची वाट तयार करणाऱ्या आई वडील, शिक्षक तसेच तीच वाट आपल्या काळजीने आणखी सुंदर बनवणाऱ्या पत्नीस आणि त्या प्रवासात चेष्टा मस्करी करून मजा आणणाऱ्या मित्रांसाठी हा लेख...)

लेखक - विशाल पोतदार
भ्रमणध्वनी-9730496245
Email id- vishal6245@gmail.com


वाटाड्याच तो...
जशी तो वाट दाखवू शकतो तशीच वाट लावूही शकतो.
कुणी काट्याकुट्यातून तर कुणी पायघड्या टाकलेल्या रस्त्यावरून नेईल तुला. तो जर काट्याकुट्यातून घेऊन गेला म्हणून दुश्मन असेल असे नाही आणि फुलांच्या पायघड्यावरून नेले म्हणून तो सच्चा मित्रच असेल असेही नाही. तिथं तुझ्या वाटाड्याचं मन किती खरं आहे हे महत्त्वाचं.

एखादा तुला नुसती वाट सांगेल आणि अगदी रस्त्याचा लेखाजोखा तुझ्यासमोर सादर करेल तर कुणी तुला त्या रस्त्यात पावलो पावली सोबत करेल. आयुष्यात तुला ठीक ठिकाणी पोहचवणारे लोक भेटतील. कुणी भक्तीचा अमृतानुभव देण्यास मंदिरात पोहचवेल तर कुणी नशेत साथीदार शोधत मदिरे पर्यंत नेईल. आणि हो, कुणीतरी पाठीत विश्वासघाताचा विखारी खंजीर खुपसून देवाघरी पाठवेल. विचार कर ना, मग किती महत्वाचा असतो वाटाड्या..!!

आधीच तयार असलेल्या वाटेवरून कसं जायचे हे सांगणारे सज्जन भेटतील पण जर वाटच अस्तित्वात नसली तर तुझ्यासाठी ती तयार करणारा तो अवलीया गर्दीतून आपसूक बाहेर येतो फक्त तुझ्याखातर. म्हणजे असं की, नदीच्या पैलतीरी ते ठिकाण आहे असं सांगण्यापेक्षा तो अवलीया होडी वल्हवत तुला पैलतीरी घेऊन येईल.

आयुष्यात कैक येऊन गेले आणि येतीलही असे वाटाडे. तुही निसंकोचपणे विचार त्यांना वाट आणि जर ते सोबत करत असतील तर जरूर दे  त्याच्या हाती तुझा हात. फक्त त्याआधी एक कर. सजगपणे त्याच्या हृदयाचा एकवार ठाव घे. कारण त्याचं सुप्त, स्वार्थी ईप्सित असेल तर आयुष्यभर राहशील मींधेपणाच्या चक्रव्युहात. पण जर त्याचं मन असेल सुंदर लख्ख प्रकाशाने भरलेलं तर मग झोकून दे स्वतःला त्या वाटेवर एक कवडसा बनून.

कारण वाट ही नेहमी सुरू होते हृदयातून..
मग ती रणरणत्या उन्हातून जावो की गर्द वनराईच्या सावलीतून, मंजिलीची ओढ संपुन प्रवासावर प्रेम जडेल. तुझे मन जीवनाच्या त्या संध्याकाळीसुद्धा डुबणारा सूर्य, खळ खळ वाहणारी नदी  आणि परतीच्या पक्षांचा चिवचिवाट अनुभवेल. सगळं काही निरव आनंदघना सारखं भासेल.

पण स्वप्नपूर्ती झाल्यावर आता त्या वाटाड्याला विसरू नको. त्यालाही आता परतीची वाट धरायची हुरहूर लागेल. तो परतायच्या आधी त्याचा हात घट्ट धर आणि  हक्कानं सांग की,

"परतीची वाट एकत्रच सांधू..."
मंजिल महत्वाची नव्हतीच मुळी..
महत्वाचा होता तो तुझ्या सोबतचा अविस्मरणीय प्रवास...
तू सोबत असशील तर अशा किती वाटा आणि किती मंजिली.. !!

Saturday, 16 March 2019

विद्युलता (कविता)

💐#विद्युलता#💐

चंद्र, चांदण्या आणि नक्षत्रे....
आकाशाला सजवता सजवता काय तो करती घमंड..

पण त्यांची घमंड उतरवण्या तूच एक हिकमती..

शलाका..

तुझं लखाकणं एक क्षणच..
पण उजळून टाकी पुरं आसमंत..
ब्रम्हांडाला छेदून करशी गगनभेदी फुत्कार..

तुझं ते तेजस्वी रूप पाहता..
लपून बसती सगळे तारे, गर्भी नभाच्या..
मग चंद्र, चांदण्या आणि नक्षत्र..
येती तूझं शरण..

आणि तेव्हाच तू विद्युलते..
संपवतेस अवतार कार्य क्षणात...
झोकुनी वसुंधरेच्या कुशी...


                - विशाल पोतदार




Friday, 15 March 2019

आठवणीतला कवडसा

*आठवणींचा कवडसा*

सूर्याच्याही नकळत,
फुटलेल्या कौलातून आलेला एक कवडसा,
हृदयाच्या एका कप्प्यात मी चोरून ठेवला.

तुझ्याही नकळत ऐकलेला तुझा सूर,
माझ्या स्पंदनांमध्ये बांधून घेतला..

सोबत त्या कवडश्याचा लखलखाट,
आणि तुझ्या सुरांची बंदिश हर एक श्वासात..
अजून जीवनी या काय मागावे..
सर्वकाही तुझसवे उमगते आणि तुझ्याशीच संपते..
 
                   -- विशाल पोतदार


Tuesday, 5 March 2019

प्रेमकथा मावळत्या दिनकराची


(मी रेखाटलेला सूर्यास्त)

पूर्वेला रंगानी चिंब करून तो भास्कर आपली दिनचर्या निभावायला निघून गेला. नेहमीप्रमाणे दिवसभर धावून थकून गेला. मात्र आता थोडी चाल मंदावली.

पश्चिमेचा मात्र त्याच्या पूर्वेवरच्या मैत्रीवर जीव जळत होता. आल्यावर त्याच्यावर राग काढणारच होती. अचानक त्याची चाहूल लागली. मनात आणलेला लटका राग लगे कुठल्या कुठे पळून गेला आणि बाहेर काढून ठेवलेले रंग मुठीत भरून घेतले. 

त्याचे आगमन होताच रंगांची अशी काही चौफेर उधळण केली की सारे आसमंत एक रंगांची मयसभा बनली. तोही रंगात भिजला आणि ती सुद्धा. तो थोडासा रागवलाच. काहीतरी बोलणारच इतक्यात काही क्षण दोघांची नजर भिडली आणि दाटून आलेले प्रेम तिच्या डोळ्यामध्ये दिसले. दोघंही जवळ येऊ लागले, इतके की फक्त श्वासच ऐकू येत होते. प्रीती खुलत होती आणि अंधार दाटून येत होता. ब्रह्मांडाला आपल्या उष्णतेने जाळू शकणारा आणि प्रकाशाने दिपवून टाकणारा हा दिनकर पश्चिमेच्या शीतल मिठीत अस्त पावत होता......
                

                                     ---- ©विशाल पोतदार

टीप - वाचल्याबद्दल धन्यवाद. आवडलं?? मग अजून वाचकांशी शेअर करालच ही अपेक्षा..!!

Saturday, 9 February 2019

सप्तसिंधू महासागर - जीवसृष्टीचा पितामह

हे सप्तसिंधू, सागरा...

आकाशाची सुरुवात आणि अंत हे जिज्ञासेच्या पलीकडचं आहे पण त्याला कवेत घेणारं तुझं मन जरूर मोठं आहे. त्या आकाशाचाच निळा रंग पांघरून तू सोंगाड्या बनतोस. ते रागावून तुझ्यावर जेव्हा वादळाची मिजास आणि विजांचा आगलोळ सोडते, तेव्हा मात्र तू तांडव करतोस आणि दाखवून देतोस तुझ्यातली बलाढ्यता. त्यात आमची मात्र त्रेधातिरपीट उडते. हो मग, दोन हत्ती टकरा घ्यायला लागल्यावर पायाखालच्या मुंग्यांची ती काय गणती.

दिवसभर नुसता तिरसटपणा करत सगळ्यांवर राग काढणारा सूर्य, तुझ्या क्षितिजानजीक येताच किती मृदू होतो. त्या मावळत्या सूर्याला तुझ्यात डुंबताना पाहून असं भासतं की खूप जुने मित्र भेटून करोडो वर्षांच्या आठवणी एकमेकांसोबत वाटतायत. सूर्य तिथं थोडासा रेंगाळतो, काही क्षण वाटतं की तो जायचं विसरला की काय? पण ती मत्सरस्वभावी रजनी तुझ्यापासून त्याला पिटाळून लावते आणि ताबा घेते तुझ्या विस्फारलेल्या बाहुपाशांचा.

तुझ्यासोबतचा एक एक क्षण ती अगदी गहिऱ्या प्रीतीत जगते आणि तुही तिच्या प्रेमाला प्रतिसाद देऊन तिच्याच सारखा कृष्णवर्णी होतोस. तिच्या बिंदीमध्ये बसवलेल्या चंद्रखड्याचा मंद प्रकाश तुझ्या चेहऱ्यावर पडतो आणि ती फक्त तुझ्याकडंच पाहत राहते. तिच्या त्या घायाळ कटाक्षानं तुझ्या चेहऱ्यावर उमटतं भरती ओहोटीचं हास्य.

नक्षत्राला जेव्हा शृंगाराने नटून जायचं असतं तेव्हा तिला प्रतिबिंब दाखवणारा तू असतोस. तो हळूवारपना कुठून येतो रे? कवी, लेखक आणि चित्रकार अगदी या सगळ्यांना कल्पना तू देतोस. खरंच एक अवलिया आहेस तू.

करोडो वर्षे वसुंधरेची पाठराखण केलीस. तुझ्याइतके तिला कुणीच जाणत नसेल. अवकाशातून आग ओकणारा उल्कावर्षावाचा मारा असेल किंवा हवेलाही गोठवणारे हिमयुग असेल. याचा तू फक्त तटस्थ साक्षीदारच नव्हतास तर तुही हे सगळं सोसलस. अजूनही त्या खुणा तुझ्या अंतरंगात सापडतील. जणू काही हे तू लिहिलेलं तिचं आत्मचरित्रच आहे.

या वसुंधरेनं लाखो वर्षांच्या प्रसुती कळा सोसून एका सुंदर जीवाला जन्म दिला आणि अगम्य विश्वासानं तो सोपवला भ्रात्यासमान तुझ्या हाती. त्या विश्वासाला तू सार्थ ठरवलंस. त्या अर्भकाला प्रेमाचा घास भरवलास, लाटांच्या झोक्यावर खेळवलेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगायला शिकवलंस. जेव्हा ते सक्षम बनलं त्यावेळी उत्क्रांतीसाठी त्याला जमिनीवर पाठवताना तुला यातना झाल्या असतील ना रे? आज त्या जमिनीवर पाऊल ठेवलेल्या जीवाच्या अगण्य पिढ्यांनंतरचा "मी"..

पृथ्वीसारखं माझ्यातही जलतत्व आहे..
त्या जलतत्वाला स्मरूण तुला नमन...

*********** समाप्त *************

टीप - माझ्या लेखनास तुमचा अमूल्य वेळ दिलात याबद्दल मनःपूर्वक आभार.. आवडल्यास जरूर शेअर करा आणि प्रतिक्रिया कळवा...

Friday, 25 January 2019

पालवीहीन वृक्ष (लघुकथा)

आज तीन महिने झाले तो या जंगलात चालतोय. या वेड्या प्रवासात बऱ्याचश्या पायवाटा तुडवल्या, हिरव्या गालिच्यावर झोपला, गर्द सावलीत विसावला होता. उन्हाचा बदलता स्वभाव अगदी जवळून अनुभवला होता. पण आता तर फक्त पालवीहीन वृक्ष आणि त्या वृक्षांना मिठी मारलेल्या वेली दिसत होत्या. 
वेलींची घट्ट मिठी पाहून, त्याला फक्त 'ती' आठवली. ती सुद्धा अशीच घट्ट बिलगायची, अगदी थोड्या वेळासाठीही तिला सोडून न जाण्यासाठी याचना करायची.

त्याने वापरून जुना झालेला तंबू ठोकला. तंबूतल्या सावलीत जरा बरं वाटलं. तसेही, याआधी थोड्याश्या थंडी वाऱ्यात आजारी पाडणारा तो, आजकाल एवढ्या टोकाच्या वातावरणात टिकून होता. त्याने पाठ टेकवली आणि तिच्या पुस्तकाचा ड्राफ्ट वाचायला घेतला. तीन महिने त्याचं धाडसच झालं नव्हतं ड्राफ्ट उघडण्याचं. पहिलंच पान पाहिलं आणि डोळे पाणावले. तिचे शब्द म्हणजे पाण्याने भरलेले जांभळे ढग होते. पाण्याविना भेगाळलेल्या जमिनीवर त्या ढगातले चार थेंब पडावेत आणि वखवखलेल्या भूमीच्या कणाकणात मिसळून जावे तसे तिचे शब्द त्याच्या मनात सामावत होते.

पुस्तकाची प्रस्तावना अशी होती.

"
हे पुस्तक तुझ्या सोबतच्या प्रत्येक क्षणाला अर्पण..

"तुझ्याच प्रत्येक क्षणात माझा कण कण असेल..
तुझ्या हर्षात माझं हसणं असेल..
तुझ्या दुःखात माझं रडणं असेल..
माझ्याशिवाय हे आयुष्य फुलव..
रण रणत्या उन्हात देखील मी तुझ्या मिठीत असेन.."
"

आयुष्यातल्या शेवटच्या काही क्षण आधी तिनं त्याच्या हातात या पुस्तकाचा ड्राफ्ट सोपवला होता. सहा महिन्यांच्या तिच्या आजारपणात अगदी हाताच्या फोडाईतकी जपणूक केली होती तिची. शेवटी तीच्या जाण्यानं त्याची अवस्था पानझडीने काष्ठ झालेल्या झाडासारखी झाली होती.  त्याला बिलगणारी वेल तर त्याच्या आधीच निघून गेली होती. या दुःखातून थोडीशी सुटका म्हणून त्याने या तीन महिन्यांच्या हायकिंगला सुरुवात केली होती.

पुस्तक वाचता वाचता संध्याकाळ व्हायला आली, आसमंत रंगानी भरून गेला आणि वातावरण थंड हवेने भरू लागलं होतं. ते पुस्तक म्हणजे तिनं त्याचीच लव्ह स्टोरी लिहिली होती. पुस्तक बाजूला ठेवलं आणि टेंट मधून बाहेर पाहिलं तर दूरवर तीच जात होती. त्याच्या पासून दूर, अगदी त्याचा आवडत अबोली रंगाचा ड्रेस घालून. तिची ओढणी आणि केस वाऱ्यासोबत गप्पा मारत असल्यासारखे उडत होते. ती थांबली आणि त्याच्याकडं पाहून अगदी तशीच नेहमी सारखी हसली. शांत पाण्यात एखादा खडा टाकल्यावर सुंदर वलय निर्माण होतात तसं होतं तिचं हास्य. तिनं आयुष्यात हसायलाच शिकवलं होतं ना त्याला मग आता का तो रडत होता. मनात एक कल्लोळ होता तरी तो हसला. ती तशीच पुढे पुढे जात राहिली आणि दिसेनाशी झाली.

आणि तो मात्र त्या पालवीहीन वृक्षाकडं पाहत होता.



**************** समाप्त *************

टीप - वाचक म्हणजे लेखकाला शब्दाइतकेच महत्वाचे असतात. तुम्ही माझी कथा वाचलीत यासाठी मनःपूर्वक आभार. पण कशी वाटली ते सांगायला विसरू नका.

Friday, 11 January 2019

तू... आणि चंद्रकोर...

अंधाऱ्या रात्रीतली ती नभाची लाडकी चंद्रकोर ..
किती ती नशा, धुंदी आणि गर्व त्या सुंदरतेचा...

पाहता तिची तुच्छतेची नजर, वाटलं की घ्यावे रंग आणि रेखाटावा तुझा चेहरा त्या नभावरच अशा रीतीने...
की, ती चंद्रकोर असेल तुझ्या भुवयांच्या मधोमध...
तो चमचमणारा तारा तुझ्या नाकपुडी वर असेल, त्या नथीच्या निखळलेल्या मोत्याच्या जागी...

ती चंद्रकोरही होईल दिग्मूढ तुझ्या सावळ्या सौंदर्यापूढे आणि तारा ही राहील मोत्यासमान तुझ्या मुरडणाऱ्या नथीत...

तू म्हणशील की,
नभ, चंद्रकोर की तारा...
सगळ्या नुसत्याच कविकल्पना...

पण मी तरी काय करू..
तुझ्यामुळेच येतं त्या कल्पनांना उधाण...
तुझं अबोलीच्या फुलासारखं साधंच पण सुंदर दिसणं, आणि पारिजातकाच्या फुलांसारखं निरागस बोलणं...
आणि मी पाहताना, छानसं लाजत माझ्यावरच रागावणं..

सगळं सगळं अगदी स्वतःला विसरायला लावणारं..
मग ते नभ, चंद्रकोर आणि अजून काही..
वर्णायला अपुरंच पडतं....

                    - विशाल पोतदार