लेखक- विशाल पोतदार
गाव- वाठार, तालुका- कराड
मोबाईल- 9730496245
गाव- वाठार, तालुका- कराड
मोबाईल- 9730496245
सालाबादप्रमाणे भैरोबाच्या माळावर आज जनावरांचा मोठा बाजार भरणार होता. साळगावचा हा बाजार दरवर्षी यात्रेच्या पाच दिवस आधी भरे. बाजारात जवळपास चार-पाच जिल्ह्यातील म्हशी, गायी, बैल विक्रीसाठी हजर केल्या जायच्या. त्या जागेला माळ म्हणत असले तरी पिंपळ, चिंच आणि वडाची मोठाली झाडं तिथं आपल्या सावलीचं छत्र धरून उभी होती. भर उन्हाळ्यातदेखील हा माळ थंड गारवा देत असे.
यंदा बाजारात बरीच गजबज होती. मैदानात एका भागात म्हैशी आणि अर्ध्या भागात गाय, बैल अशी विभागणी केली होती. जनावरांना विक्रीसाठी घेऊन येणारे, तसेच खरेदी करून घेऊन जाणारे टेम्पो, ट्रक सावली पाहून शांत पडून होते. जशी जनावरे आणली जात तशी ती तात्पुरत्या दावणीला बांधण्याची व्यवस्था केली होती. यंदा साळगावच्या नवनिर्वाचित सरपंचांनी जनावरांसाठी पाण्याची आणि चाऱ्याची अतिशय उत्तम सोय करून दिल्यामुळे लोकही खुष होते. चिंचेच्या झाडाखाली कांदाभजी, वडापाव, झुणका भाकर, सरबत विक्रेते यांच्या हातगाड्या लावायची लगबग चालू झाली होती.
बाजाराला लागूनच ग्रामदैवत भैरोबाचे मंदिर होते. मंदिराचा कळस जुनाट असला तरी गाभाऱ्याला लागूनच पुढे ५०-६० लोक मावतील असा हॉल गावकऱ्यांनी बांधला होता. आज त्या हॉलमध्ये एका सत्कारसमारंभाची लगबग सुरू होती. तिथे रोज संध्याकाळी प्रौढशिक्षणाचे वर्ग भरत असल्यामुळे फळा, टेबल, खुर्ची आयती मिळाली होती. फक्त शाल आणि श्रीफळ बाहेरून मागवावे लागले. सरपंच तसेच इतर मान्यवरांना बसण्यासाठी चार खुर्च्या आणि लोकांना बसण्यासाठी समोर सतरंजी मांडली होती.
जेमतेम तिशीत असणाऱ्या सरपंचांनी कारभार हातात घेऊन सहा महिनेच झाले होते. त्यांनी जत्रेच्या बैठकीत एक कल्पना काढली. तालुक्याच्या नुकत्याच जॉईन झालेल्या बी डी ओ चा सत्कार कार्यक्रम घ्यायचा, जेणेकरून गावात विकास योजना आणण्यास त्यांची मदत होईल. हा ठराव गावकऱ्यांनी लगेच पास केला आणि सरपंचांनी या कार्यक्रमाच्या तयारीची सूत्रं ग्रामसेवकाच्या हाती सोपवली. कार्यक्रम साधा आणि छोटा असला तरी तयारी अगदी उत्साहात चालू होती. आता फक्त फळ्यावर नावं लिहायची राहिली होती. आता लिहायचं काम कोण करणार या विचारात त्यांनी बाजूला मस्ती करणाऱ्या मुलांकडे नजर टाकली, आणि त्यातल्या त्यात वरच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला लिहायला सांगितले. फळ्यावर लिहायला मिळणार म्हणजे नशीबच म्हणून मुलाने मोठ्या अक्षरात लिहायला सुरुवात केली, 'मा. बी डी ओ नमिता पवार मॅडम यांचा सत्कार'. खाली सरपंच आणि इतर पुढाऱ्यांची नावं लिहू लागला पण ग्रामसेवकांनी एक धपका घालून, त्याचं लिखाण आता तिरकं होत असल्याचं सांगितलं. मग बिचाऱ्या पोराने राहिलेली नावं कशीबशी सरळ लिहिली.
सरकारी गाडीमधून नमिता साळगावला चालली होती. तिला बी डी ओ म्हणून जॉईन होणं अजूनही स्वप्नवत वाटत होतं. गाडी साळगावच्या फाट्यापासून आत वळली आणि आधी तुरळक वाटणारी गर्दी वाढताना दिसली. जनावरांना घेऊन जाणारी वाहनं दिसू लागताच तिला कळलं की इथे आज जनावरांचा बाजार दिसतोय. दोन-चार लोकांना रस्ता विचारून ती भैरोबाच्या माळावर पोहोचली. नमिताला स्वतःचं कौतुक करून घेणं आणि मिरवण कधी जमलंच नाही. एवढंच काय, एखाद्या लग्नसमारंभात देखील ती लाजून मागे एखाद्या कोपऱ्यात थांबायची. पण सिलेक्शन झाल्यापासून फोन आणि सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. आत्ता तर सत्कार समारंभाला जाताना अगदीच लाजल्यासारखे होत होते.
गाडीतून उतरून मंदिराकडे जाऊ लागली, तोच लोक बाजूला सरकून वाट करू लागले. मंदिराच्या सभागृहात पाय ठेवताच एकमेकांना खेटून बसलेले 50-60 लोक दिसले. गावचे सरपंच खुर्चीतून उभा राहूनच हात जोडून नमस्कार करू लागले. एवढ्या लोकांच्या गर्दीत तिला थोडं अवघडल्यासारखे वाटू लागले. तिचं बालपण खेडेगावातच गेल्यामुळे, गावातल्या लोकांच्या अघळपघळ पाहुणचाराची जाणीव होतीच. त्यामुळे तिला माहिती होतं की कितीही नाही म्हटले तरी हे गावकरी एकदम जय्यत सत्कार करणारच. नाईलाजाने सगळ्या सोपस्काराची तिने मनातून तयारी केली. ग्रामसेवक सर्वांना बसून घ्यायची विनंती करत होते तेवढ्यात सरपंचांनी हात वर करून आदेश देताच सर्व लोक अगदी शाळेतल्या पोरांसारखी गप्प बसली.
नमिता नर्व्हस असली तरी तिनं खुर्चीवर बसण्याआधी सर्वांना हसत नमस्कार केला. तिचं हास्य हे कुठल्याही व्यक्तीला आपलंसं करणारा जणू पहिला शब्दच असायचा. इकडे जॉईन झाल्यापासून प्लेन आणि फिकट साडी नेसायची हे आपसूक तिच्या स्वभावात आले होते. पण आज बंगाली ठेवणीतली लाल बोर्डरमधील पांढरी साडी, कोपरापर्यंत बाही असलेला ब्लाउज आणि केसांची सैलसर वेणी या पेहरावात तिचं व्यक्तिमत्त्व अगदी जाईच्या फुलासारखं परवलीचे पण तरी मोहक वाटत होते. आत्तापर्यंत लाजऱ्याबुजऱ्या अवस्थेत असलेल्या तिच्या मनाची, खुर्चीत बसताच भीड निघून गेली. समोरील लोक जणू तिला कुटुंबीयासारखे वाटू लागले.
ग्रामसेवकानी कार्यक्रमाची सुरुवात गावच्या सरपंचाची ओळख व गुणगाण करून केली आणि त्यांच्याकडे माईक सोपवून बोलण्याच्या जबाबदारीतून निसटले. सरपंचांना माहीत होतं की आता मॅडमवर गावाचं चांगलं इम्प्रेशन तयार करण्याची हीच वेळ आहे. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली,
"सत्कारमूर्ती नमिता पवार मॅडम, गावच्या हायस्कुलचे प्राचार्य, तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थमंडळी सर्वांना नमस्कार. असं क्वचितच घडतं की, बी डी ओ म्हणून जॉईन झालेली व्यक्ती मूळची आपल्याच तालुक्यातील आहे. पवार मॅडम मूळच्या ढवळे गावातल्या. साळगावच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या कामाचा त्या तालुक्यात ठसा उमटवतील याचा आमाला विश्वास आहे. मी आपल्या नवमहाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि आमचे मार्गदर्शक व्ही के जाधव सर यांना विनंती करतो की शाल आणि श्रीफळ देऊन मॅडमचा सत्कार करावा."
तो सत्कार स्वीकारताना नमिताचे मन गलबलून आले. गावच्या लोकांचा भाबडेपणा तिला नेहमीच आवडायचा. त्यात कृत्रिमता किंवा शिष्टपणा खूप कमी असतो. इथे जमलेले सगळेच लोक तिच्याशी अगदी आपल्याच घरची मुलगी असल्यासारखे आपुलकीने वागत होते. त्यानंतर सरपंचांनी नमिताला मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती केली. तिला हा जिव्हाळा पाहिल्यानंतर भरून आले होते त्यामुळे विचार मनमोकळे मांडताच येत नव्हते.
"ग्रामस्थ आणि मान्यवर, मी तुमचे आभार कसे मानू हे समजत नाहीये. खरं तर कॉलेज मध्ये असताना मी खूप भाषणं करायची आणि आताही काय काय बोलायचं ते ठरवून आले होते. पण तुमच्या प्रेमामुळे आता बोलताना भरून येतंय. तुमचे खूप खूप आभार. मी अधिकारी असले तरी काही दुसऱ्या जगातील व्यक्ती नाही. अधिकारीदेखील एक माणूसच असतो आणि त्या पदाचा कुठलाही बडेजाव न ठेवता मी एक सेवक म्हणूनच काम करेन. मी याच तालुक्यातील असल्यामुळे साळगाव हे मला अनोळखी नाही. या गावानं नेहमीच राजकीय वितुष्ट बाजूला ठेऊन विकासाची कास धरली हे अतिशय गौरवास्पद आहे. मी पुन्हा एकदा पूर्ण साळगाव ग्रामस्थांचे आभार मानते. गावात मी नंतर कधीतरी येईन तेव्हा भरपूर बोलेन पण आत्ता एवढंच बोलून माझे चार शब्द संपवते."
सत्कार समारंभानंतर गावात तिला सरपंचाच्या घरी जेवणासाठी व्यवस्था केल्याचे सांगितले. ती नाही म्हणत असताना सरपंचांच्या मातोश्रीनी खूप आग्रह केला आणि ती त्यांना डावलू शकली नाही. भैरोबाच्या मंदिरापासून अर्धा किलोमीटर वरतीच गावातली वस्ती सुरू व्हायची. सर्वांसोबत ती गावात जाण्यासाठी बाहेर पडली. समोर विस्तीर्ण असा जनावरांचा बाजार दिसला.
तिला जनावरांच्या बाजाराचा मनात तिटकारा होता. सौदा करणारे लोक त्यांची किंमत ठरवतात. किंमत कमी जास्त करताना म्हैस किंवा गायीचा दूध देण्याचा परफॉर्मन्स आणि कितवं वेत आहे हे लक्षात घेतले जाते. तिच्यासोबत रेडकू असेल तर आणखी किंमत वाढते. पण हे सगळं होत असताना त्या बिचाऱ्या जनावरांना यातल्या कशाचीच कल्पना नसते. विकलं गेलं की मालक बदलला. आज हे घर तर उद्या दुसरंच. नमिताला हे जाणवत होतं की व्यवहारी जगात या खरेदी विक्रीच्या गोष्टी अगदी नॉर्मल आहेत पण तिच्यातली बालपणीची नमिता हे विचार नॉर्मल ठरू देत नव्हते. विचारांच्या चक्रात ती थोडी बाजाराच्या बाजूला आली. एक म्हैस आणि तिचं रेडकू विक्रीसाठी उभं केलं होतं. त्या मालकाची छोटी मुलगी रेडकाला सारखी वैरण आणून घालत होती आणि माया करत होती. ती मुलगी आणि रेडकू दोन्ही इवल्याशा जीवांना माहिती नव्हतं की संध्याकाळी कदाचित त्यांच्या वाटा वेगळ्या असतील. बाजाराला पाहून तिला रंगीची आठवण आली. रंगी? आज किती वर्षानंतर आठवली.. ती विसरली नव्हती पण इतकी उत्कट आठवण आत्ता झाली..
ती विचारात हरवून गेली होती तेवढ्यात लोकांचा गलबला ऐकू आला.
"मॅडम..... हिकडं या... बाजूला या.. कुणाची तरी म्हैस उधळली हाय.."
आरोळी ऐकून ती भानावर आली. इकडे तिकडे पाहिलं तर काही अंतरावर दंगा चाललाय. एक म्हैस उधळून इकडे तिकडे पळतेय. जी दोन चार जनावरं मोकळी होती, ती पण पळतायत आणि बांधून ठेवलेली म्हसरं बिथरली आहेत. हे चित्र पाहताच ती बाजूला पळाली. दहा-बारा माणसं त्या म्हशीला आवरण्याचा प्रयत्न करत होते. सरपंचांनी गावातल्या पोरांना म्हैस आवरायला पाठवले आणि 10-12 ग्रामस्थ, सरपंच नमितासह गावात जेवणासाठी निघून आले. जेवण होईपर्यंत सूर्यनारायण डोक्यावर येऊन आग ओकत होते. सगळ्यांच्या तोंडी, 'यंदा तापमान किती भयंकर वाढलंय' हीच चर्चा होती. नमिताने सरपंचांना आता परत निघण्याविषयी सांगितलं.
"मॅडम.. जरा ऊन खाली झाल्यावर तुम्हाला आमच्या गावातील विठ्ठल रखुमाईचं मंदिर, आमची राज्यपुरस्कार मिळालेली शाळा आणि ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा दाखवायचा होता. पुन्हा पुन्हा बीडीओ आमच्या गावी येणार आहेत का?"
"अहो असं काही नाही.. " नमिता कोड्यातच पडली. पण एक पर्याय तिला सापडला. "बरं एक काम करू शकते की उद्या सकाळी पुन्हा येईन मी इकडे. मलाही ग्राऊंड लेव्हलला काम करताना ग्रामपंचायतीला काय चॅलेंजेस येतात ते पहायचे आहे.योजनेचा लाभ मिळालेला काही कुटुंबांना भेटायचं आहे."
साळगावमधून तिचं गाव जेमतेम अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर होते. जेव्हा तिची गाडी बाजाराजवळून जायला लागली तेव्हा तिने काच खाली घेतली. सुरुवातीला एक गरम हवेचा झोत चेहऱ्यावर आला. तिने बाजाराकडे नजर टाकली. दुपारच्या क्षणी तो माळ विसावला होता. कुणी झाडाखाली बसून, घरून आणलेली भाकर खातायत तर कुणी तोंडावर टोपी ठेऊन झोपले होते. ज्या जनावरांचे सौदे झाले आहेत त्यांना टेम्पो मध्ये चढवण्यात येत होते. आपल्या जुन्या मालकाला सोडून आता त्या जनावरांचा मुक्काम नवीन ठिकाणी हलणार होता. 'पण त्यांना कुठे मन असते? त्यांना कदाचित काही वाटतही नसेल कुणापासून तुटण्याचं दुःख. काय माहीत? असेल? रंगीला वाटलं असेल दुःख? नाही.. नाही सांगू शकत.. असावं .. नक्की असावं." विचारांची साखळी एकदा मनाला जखडू लागली तर ती आपण सोडवायचा प्रयत्न करू तेवढी जास्त जखडत जाते. आणि तिचंही तेच होत होतं.
थोडी कामं आटोपावी म्हणून तालुक्याला पंचायत समितीमध्ये आली. आज लवकर निघायचा विचार केलाच होता पण कामाला काम वाढून निघेपर्यंत संध्याकाळ झाली. एकदाची घरी पोहोचली, आणि ड्रायव्हरला उद्या सकाळी दहा वाजता यायला सांगितले. तिचं घर कौलारुच असलं तरी मुबलक जागेत होतं. अंगण तर अगदी मोठाले आणि चौरस आकाराचे. घराचं तोंड पूर्वेला असल्यामुळे सूर्यास्त घरामागे व्हायचा. नमिताला लहानपणी असंच वाटायचं की सूर्य आपल्या घरामागे येऊन पडतो का? पण आता त्या कल्पना आठवल्या की तिला हसू यायचं. तिचे आप्पा जिल्हा परिषदेच्या शाळेवर प्राथमिक शिक्षक होते. त्यांना झाडं लावायचा एक छंद जणू. अंगणात चारही बाजूने कुठली ना कुठली फुलझाडं होतीच. प्रवेशदारातच मनसोक्त पसरलेली जास्वंदाची दोन झाडं. स्वागतासाठी उभी होती. आत जाताच उजव्या बाजूला म्हसरांचं सपार होतं. आता ते जळण आणि इतर टाकाऊ सामानाने भरले होते. ती पुण्यामधून जेव्हा जेव्हा घरी परतायची तेव्हा प्रत्येकवेळी ते मोकळं सपार खायला उठायचं. आज तर साळगावमधील बाजाराने जणू जखमेवरून खपली काढली होती. एखादया घरातील लोक बाहेर कुठेतरी गेले तर घर जसं मृतवत वाटतं तसंच ते सपार वाटत होतं. तिला नेहमी सगळे म्हणत की एवढं कुणी इमोशनल असतं का? प्राण्यांशी एवढं गुंतून राहतं का कुणी? मांजर किंवा कुत्र्याचं एवढं प्रेम ठीक आहे पण म्हशीचं रेडकू? त्यात काय एवढा जीव अडकायचा? नमिताचं मन भरून येत होतं.. 'असेन मी वेडी... पण ते माझं बालपण आहे.. होतं.. आता मी मोठी झालेय.. मी ही व्यवहारी व्हायला हवं.. हो कदाचित.. पण प्राण्याला कोण शिकवणार व्यवहारी व्हायला.. मी अशीच राहीन..'
तिचं मन वेळेची बंधनं तोडू लागलं आणि आठवणींच्या प्रदेशातील जुना काळ तिच्या समोर अगदी जसाच्या तसा उभा राहू लागला. समोरचं सपार आता सारवलेल्या कुडाच्या भिंतींचं दिसू लागलं. आत दावणीला एक म्हैस होती.. नमिताची बारा वर्षाची छोटी आवृत्ती समोर उभी होती. 'अरे ती म्हैशीच्या जवळ जातेय.. वैरण चारायचा प्रयत्न करतेय.. मारेल ना ती.. त्या छोट्या नमिताने वैरण म्हशीच्या समोर धरली तर म्हशीने जोरात हिसकवलीच आणि ती पुढं ओढली गेली. अगदी म्हशीच्या तोंडापाशी उभी. म्हैस मारायच्या पावित्र्यात येणार ते पाहून तिच्या पोटात गोळाच आला आणि पूर्ण जीवानिशी पळत बाहेर आली.' बऱ्याचवेळा भीती माणसाला स्वप्नातून किंवा आठवणीतून जागं करते. तशी नमिता भानावर आली. 'भलतीच आगाउ होते ना मी. कितीवेळा म्हशीच्या मारातून वाचले होते. यावेळी मात्र आजीने पाहिले होते. आजी धावतच आली. आता मात्र नमिता जाणून बुजून आठवणीत शिरत होती. समोर आजी दिसत होती.
"नमू, किती येळा सांगितलं तुला म्हशींम्होरं जाऊ नगो. शिंग लागल्याव केवड्याला पडल. थांब तुज्या आप्पाला सांगते."
"नको आज्ये... आता नाय जाणार मी तिच्यापुढं... मारकी कुटली तुजी मंगी..." आधीच घाबरलेली नमिता आता रागाचा आवेश आणून म्हणाली. तेवढ्यात तिची आईपण बाहेर आली.
"आगं.. आता परक्या माणसाला मारतं एखादं जनावर.. तुझी आजी मंगीला रेडकू आसल्या पासनं सांभाळती म्हणून आजीला नाय मारत."
नमिता अजूनही आजीला चिकटली होती. आता आई आणि आजीचा राग निवळला आहे हे पाहून तिनं गळ घालायला सुरुवात केली.
"मग मलापण पायजे एक रेडकू... मी पण सांभाळणार. मला ते मारणार पण नाही आणि खूप माया करणार."
आई आणि आजी दोघींनाही हसू आवरत नव्हते. तसे नमिताचे हट्ट नवीन कपडे, खाऊ, खेळणी याचे कधी नसायचे. उलट तिला शेतात जाणे, विटी दांडू सारखे खेळ, म्हशीला वैरण घालणे, वेगवेगळी पुस्तकं आणणे अशा गोष्टी तिला खूप आवडायच्या. घरच्यांना मात्र वाटायचं की मुलीच्या जातीनं अशा गोष्टीत कशाला रमावं? मग ते उगीच नवीन कपडे आणि खेळणी आणून तिची आवड बदलायचा प्रयत्न करायचे. आजी समजुतीने म्हणाली,
"नमु बाळा असा हट्ट नाही करायचा..."
"नाही...मला पाहिजे रेडकू.. मग तुला कशी मंगी दिलीय.. मला पण पाहिजे.."
यावर आई आणि आजी दोघीही निरुत्तर होत्या. आईच्या तोंडून आले,
"बरं.. देऊ हं तुला रेडकू.. मंगीला जेव्हा बाळ होईल तेव्हा ते तुला द्यायचं.."
नमिताचा चेहरा एखाद्या फुलला आणि लाहीसारखी तडतड उड्या मारत तिच्या मैत्रिणींना सांगायला जाऊ लागली. पण मधेच थांबून आईला प्रश्न केला,
"पण कधी होणार तिला बाळ... ?"
आईने असाच वेळ काढून नेण्यासाठी दिलेलं उत्तर होतं. त्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं याचा आईला प्रश्न पडला.
"हुईल हो.. तू पयला नंबर काडून म्होरल्या वर्गात गेल्याव मंगीला रेडकू होणार .." आजीनं सुनेचा पेच ओळखून उत्तर तयार केलं.
अजून एक वर्षे थांबायचं हा विचार करून नमिता जरा खट्टूच झाली. पण कसं बसं तिचं मन तयार झालं. तिच्या आई आणि आजीला देखील तिच्या हट्टाचं टेन्शन निघून गेलं. पण त्यानंतर दोन महिन्यातच मंगी गाभण राहिली. तोपर्यंत आई आणि आजी नमिताला दिलेलं आश्वासन विसरून गेले होते. पण नमिता मात्र ते विसरली नव्हती. घरच्यांच्या बोलण्यातून ही गोष्ट तिला समजली.
"आजी मग कधी होणार मंगीला रेडकू?"
"अजून 10-11 मासाने... तुझी पुढची परीक्षा व्हणार तवा... "
नमिताला मात्र इकडे 10-11 महिने दम निघणार होता काय? सारखं आजीला विचारणं चालूच होतं. कसे बसे 10 वा महिना अर्धा जाऊन मे महिना आला. उन्हाळ्याची सुटी चालू होती, सगळ्या पोरांचा धुडगूस चालू होता. नमिताच्या मावशीची आणि आत्याची मुलं मिळून घरात 6 जणांचा ग्रुपच झाला होता. रोज एक नवीन खेळ निघायचा. पण नमिताच्या डोक्यात, 'अजून रेडकू कसं झालं नाही' हा मोठा गहन प्रश्न होता. तिचा वाढदिवस एका दिवसावर येऊन ठेपल्यावर ती सगळ्यांना उद्या आपला वाढदिवस असल्याची आठवण करून देत होती. उद्याच्या प्रतीक्षेत ती आनंदात झोपी गेली. पण सकाळी साखरझोपेत असतानाच म्हशीचा हंबरडा ऐकू येऊ लागला. आप्पा, आजी आणि शेजारचे दोघाजणांचा आवाजही ऐकू येत होता. तिच्या चाणाक्ष बुद्धीने काय चाललंय ते बरोबर ताडलं आणि तशीच खाडकन उठून सपराकडे गेली. पाहतेय आजी आणि आप्पांच्या चेहऱ्यावर आनंद होता, आणि आजी म्हशीच्या डोक्यावरून हात फिरवत होती. नमिता अजून जवळ आली तर एक नुकतंच जन्मलेलं रेडकू उभं राहण्यासाठी धडपडत असलेलं दिसलं. तिनं टाळ्या वाजवत उड्या मारायला सुरुवात केली. उभा राहता राहता ते मटकन पडायचं तसा नमिताच्या काळजाचा ठोका चुकायचा. अंग पूर्ण भिजलेलं असल्यामुळे रेडकाचा काळा रंग तुकतुकीत चमकत होता.
"आजी, सारखं का गं पडतंय रेडकू?"
"आगं, बग अर्ध्या तासात कसं उभा राहतंय. तुला चालायला यायला 1 वरीस लागलं होतं."
तरी त्या छोट्या नमिताला रेडकाचा केविलवाणा प्रयत्न पाहून दया येत होती.
"माझं चिनुलं बाळ..... कसं पडतंय सारखं.. ये आजी हिचं नाव काय ठेवायचं..?"
तेवढ्यात आई म्हटली, "बघ आता... तुझंच आहे नं ते.. मग तूच ठरव.."
नमिता गहन प्रश्नात पडली. नावासाठी आपल्या सगळ्या मैत्रिणींची आणि नातेवाईकांमधील स्त्रियांची नाव आठवून पाहिली. पण कुठलंच नाव पसंद पडत नव्हतं. मग अचानक तिची ट्यूब पेटली.
"अं... हिच्या आईचं नाव मंगी... मग हिचं नाव... रंगी..."
"अरे वा... चांगलंच नाव ठेवलंय रेडीचं.. रंगी.." आजी.
नमिताला अजून एक गोष्ट सुचली.
"आता माझा आणि रंगीचा बड्डे एकाच दिवशी... "
"हो की गं.. नवलच की.." आईने सूर ओढला.
"आजी.. रंगीला वैरण घालू?" हिचे प्रश्न आज काही थांबणार नव्हते.
"आगं.. आता ही फक्त आयचं दूध पिणार.. मग काही महिन्यानं वैरण.."
तेवढ्यात ते रेडकू उभा राहिलं. नमिता ने अगदी निरखून पाहिलं त्याला. उन्हात अगदी वेलवेट सारखं चमकत होतं. जांभळासारखे टपोरे डोळे कधी न पाहिलेल्या जगाचा अंदाज घेत होते. चेहऱ्याच्या मानाने मोठाले असलेले कान उभा राहिलेले होते. नमिता जवळ यायला लागली तसं ते घाबरून इकडे तिकडे करायला लागले. तेव्हा तिला रेडकाच्या गुडघ्याच्या वर एक पांढरा पट्टा दिसला. तो पट्टा जणू एक नी-कॅप घातल्यासारखा दिसत होता. आजी ही म्हणाली की तिनेही कधी असे पाहिले नव्हते. मग तर काय नमिताला अख्ख्या गल्लीत जाहिरात करायला विषय मिळाला.
काही दिवस खरवसाची गोडी मनसोक्त लुटली. त्यांनतर खरवस द्यायला गेल्यावर शेजाऱ्यांना रंगीची जन्मकथा अगदी रंगवून सांगितली. एवढंच काय तर रंगी मोठी झाल्यावर ती कशी तिला रानात घेऊन जाईल याची स्वप्नं देखील रंगवली होती. आजी जेव्हा मंगीला रानात घेऊन जाई, तेव्हा दोरी हातात न धरता मंगीच्याच पाठीवर टाकत असे. मग 'मंगे चल' म्हणून ती पुढे गेली की मंगी आपसूकच आजीच्या मागे मागे जात असे, शिवाय दावणीला बांधल्यावर आजी सोडून दुसरं कुणीही समोर गेलं की मंगी मारत असे. नमिताला या गोष्टीसाठी आजीचा नेहमीच हेवा वाटत असे.
घरच्यांना आधी वाटले होते की नमिताचा रेडकाबाबतचा उत्साह महिनाभरात मावळेल, पण कुठलं काय? रंगीवर तिचा प्रेमाचा वर्षाव वाढतच चालला होता. अगदी सकाळी उठल्यापासून तिच्याच आसपास हिचा वावर असायचा. रंगीला दूध प्यायला थनाला सोडले की ती दूध जास्त पिऊ नये म्हणून आजी तिला जबरदस्ती बाजूला घ्यायची. ते बघून नमिता मात्र आजीला रागवूनच बोलली.
"पिऊ दे की माझ्या रंगी ला दूध अजून.. बघ ते आईकडं कसं पाहतंय."
"हं... बास तुझ्या रंगीचं कौतिक.. नाय वडलं तर कासंत दूध शिल्लक ठेवायची नाय.. आपुन डेरी मधी काय घालायचं मग.."
नमिता पाय आपटतच निघून जायला लागली.
"मंगी तुजी हाय म्हणून तू असं करतीयेस. रंगीला बाळ झालं की मी त्याला पायजे तेवढे दूध पिऊन देईन."
आजीला मात्र हसून हसून पुरेवाट झाली.
"हो करा हो.... ती मोठी झाल्यावर काय करायचं ते करा.."
नमिता नाराजीतच खेळायला निघून गेली. घरातल्यांना नमिताचे अधूनमधून काही तरी किस्से अनुभुवायला मिळेच. अजून एक गोष्ट म्हणजे आईने तिला निक्षून सांगितलं होतं की शाळेत जर पहिल्या तीन मधून नंबर खाली घसरला तर मग रंगीला कुणाला तरी देऊन टाकणार. आणि याचा परिणाम म्हणजे आठवीत चक्क पहिला नंबर पटकावला पोरीने. मग काय तिचा रंगीला सांभाळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
खरे तर रंगीलाही तिचा लळा लागला होता. ती आता एका वर्षाची झाली होती आणि नमितासारखी येता जाता वैरण घालणारी मालकीण असल्यामुळे अगदी धष्टपुष्ट झाली होती. नमिता शाळेत जायच्या वेळेस हिचं हंबरणं चालू व्हायचं. मग जाता जाता नमिता, 'रंगे आलेच मी शाळेत जाऊन' अशी समजवण्याच्या सुरात बोलून जायची. पण ती गेलीतरी काही वेळ रंगीचं हंबरणं चालूच असायचं. विशेष म्हणजे नमिता शाळेतुन येण्याच्या आधी पाच-दहा मिनिटापासून पुन्हा तिचं हंबरणं पुन्हा चालू व्हायचं. नमिताच्या आईला सुरुवातीला वाटलं की कदाचित हिला वैरण किंवा पाणी हवं असेल. पण सगळं काही दिलं तरी ही ओरडत राहायची आणि नमिता आलेली दिसली रे दिसली की दावणी भोवती उड्या मारायला लागायची. सुरुवातीला तर आई आणि आजी दोघीनी कपाळावर हात मारून घेतला की ह्या मुक्या जनावराला कसा हा वेळेचा अंदाज लागत असेल. पण नमिताचं निरागस प्रेम त्या मुक्या अंतःकरणात पोहचलं होतं हे नक्की.
एका वर्षात चांगली दणकट रेडी झाली होती ती. मे महिन्याच्या सुटीत नमिताचा वाढदिवस आला. यावर्षी तिचा उत्साह कैकपटीने जास्त होता कारण रंगीचाही पहिला बड्डे त्याच दिवशी होता. पण अख्ख्या पंचक्रोशीत तरी रेडकाचा बड्डे कुणी केला नसेल तो नमिताने आईकडून जबरदस्ती रंगीला ओवळायला सांगून केला. सगळ्यांना तिचं रंगीविषयीचं प्रेम म्हणजे अवखळ वेडेपणा वाटत असला तरी आजीला मनोमन खूप बरं वाटायचं. कारण तीनं आयुष्यभर म्हसरं सांभाळली होती. पण इथून पुढच्या शिकल्या सवरल्या पिढीला जनावरं जपण्याची आवड निर्माण होईल हे तिच्या ध्यानी मनीही नव्हतं.
एकदा रविवारी घरी आलेल्या नमिताच्या आत्याच्या छोट्या मुलाने गंमत म्हणून मंगीच्या कासेला हात लावला. मग बचाव म्हणून मंगीने लाथ मारली. पोरगं खूपच रडायला लागलं आणि तिच्या आत्याने मंगीला शिव्यांची लाखोली वाहिली. पोराच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर काय अशा कित्येक गोष्टी बोलून दाखवल्या. बिचाऱ्या आजीला ते सहन नाही झालं नाही. तिनं एक दांडकं घेऊन मंगीला खूप मारलं. मंगी जशी हंबरत होती ते पाहून नमिता रडू लागली आणि तिनेच आजीला आवरलं. नमिता आजीवर चांगलीच रागावली. त्या रात्री आत्या तर निघून गेली पण आजीच्या तोंडी एक घास उतरला नाही. सकाळी मंगीला पाणी पाजताना गोंजरताना आजीचे डोळे पाणावले होते. तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवताना नमिताने पाहिलं आणि आजीच्या प्रेमाची जाणीव झाली. त्यादिवशी रंगीला तिनं बजावून ठेवलं. "रंगे.. तुझी कुणी खोड काढली ना तिला बिनधास्त मार.. आणि तुझी शिगं मोठी होतील तेव्हा चांगलं शिंगावर उचल त्या माणसाला. मी बघत्येच तुला कोण काय म्हणतं ते."
जनावरांचे आयुष्य वेगानं सरत जातं. जणू काही त्यांच्या काळाची व्याख्या आपल्यापेक्षा निराळी असते. नमितापेक्षा रंगी लवकर पोक्त होत होती. नमिताचं आता दहावीचं वर्ष होतं. नववीमध्ये फक्त एका टक्क्यामुळे पहिला नंबर घसरला होता. आणि आता काहीही करून दहावीला पहिलंच यायचं असा निग्रह करून अभ्यास सुरू केला होता. रंगीकडं सारखं लक्ष द्यायला जमणार नाही म्हणून तिने तिची काळजी घेण्याबद्दल आजीला बजावलं होतं. वर्षभर तिने अभ्यासात कुठलीच कसर ठेवली नाही तरी सराव परीक्षेत तिचा दुसराच नंबर आला. आता मात्र तिने कंबर कसली आणि रानात झाडाखाली जाऊन अभ्यास करू लागली. दुसरं काही सुचत नव्हतं. रंगीची येता जाता माया करायचीच पण नेहमीपेक्षा कमीच. एकदा का बोर्ड परीक्षा संपल्या तसे तिने सुटकेचा निश्वास टाकला. सुटीत बाकीच्या पोरी पत्ते, कॅरम इत्यादी खेळात रममाण असताना ही रंगीला घेऊन रानात जात असे आणि विशेष म्हणजे आता आजीसारखं तिने दोरी सोडून 'चल रंगे' म्हटले तरी रंगी तिच्या मागे यायची. त्या मुक्या प्राण्याला अगदी सगळ्या गमतीजमती तासनतास सांगत बसे. रंगीनेही तिला आपली मालकीण आणि मैत्रीण म्हणून स्वीकारले होते.
कानमंत्र दिल्याप्रमाणे रंगी नमिता सोडून दुसऱ्या कुणाला जवळ येऊ द्यायची नाही. रंगी जशी मोठी होऊ लागली तशी आजीनं वेसण घालणारा माणूस बोलवला. वेसण घालण्यासाठी एक छोटी दोरी नाकपुडीच्या मधल्या पडद्यातून आरपार घालवायची असते. नमिताला वेदनेची कल्पना करूनच, वेसण घालू द्यायचं नव्हतं. पण आजीने जेव्हा समजावलं की 'लहानपणी कसं तुझं नाक टोचलं होतं' तसंच आहे हे, तेव्हा कुठे तीने रंगीला वेसण घालायला परवानगी दिली.
सुटीचा कालावधी म्हणता म्हणता संपला आणि निकालाचा दिवस आला. सकाळपासूनच नमिता टेन्शनमध्ये होती. एकेक मिनिट तासासारखा जात होता. दुपारी शाळेत पोहचतेच तो तिचं फळ्यावर मोठाल्या अक्षरात नाव. 'नमिता पवार- 88% केंद्रात प्रथम क्रमांक'. बस्स तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. स्वारी अगदी खुशीतच घरी आली. घरी येताच तिने रंगीला मिठी मारली आणि मग घरातल्या सर्वांना. केंद्रात पहिली आल्यामुळे गावात तिचा बोलबाला झाला होताच पण तिच्या काकांनी पुढे अकरावी सायन्ससाठी तालुक्याला पाठवण्यापेक्षा पुण्याला त्यांच्याकडे पाठवण्याचे सुचवले. हा निर्णय आई, आप्पा आणि आजी या तिघांस देखील काळजावर दगड ठेऊन घ्यावा लागला. एकुलती एक मुलगी डोळ्याआड होणार म्हणून आईची जास्तच तगमग चालू होती. इकडे नमिताच्या मनाची अगदी संभ्रमावस्था झाली होती. कुणीही भेटेल ते, तिला सायन्स कर असा टॉपर साठी राखून ठेवलेला सल्ला देत असत. असे असताना तिनं आर्टस् ला ऍडमिशन घ्यायचे ठरवले होते. तिचं स्वप्न शासकीय अधिकारी व्हायचे होते आणि त्यासाठी आर्टस् करने फायदेशीर होईल हे शेजारच्या दिदीने पटवून दिले होते. तिच्या घरच्यांना यातलं काही समजत नसल्याने तो निर्णय पूर्ण तिच्यावर सोपवला होता. अजून एक संभ्रम म्हणजे पुण्याला काकांकडे जायचे का या निर्णयाचा. काकाची तर ती लाडकी होती पण तिचा अर्धा जीव आई, आप्पा, आजी आणि रंगीमध्ये अडकला होता. काका आणि काकीने खूप समजावलं की इकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किती पोषक वातावरण आहे. मग शेवटी हो नाही करत तिने मनाशी निग्रह केला आणि जायची तयारी सुरू केली.
ऍडमिशनची पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पुण्याला जायची वेळ आली. आप्पा तिला पुण्याला सोडायला येणार होते आणि बॅग हातात घेऊन तयार होते. नमिताचा जीव कासावीस झाला होता. जाताना तिनं रंगीकडं पाहिलं आणि डोळ्यात आसवं जमा झाली. जवळ येऊन तिनं तिच्या गळ्याला मिठीच मारली. रंगीची शिंगं आता जवळपास तळहाता एवढी लांब आली होती. अधूनमधून ती दोन्ही शिंगाना पकडून झुंज खेळल्यासारखं नाटक करी त्या खेळाची आठवण झाली. रंगी आता जोरात हंबरु लागली. आई आणि आजी तिला समजवताना म्हणत होत्या की म्हशी काय कुत्र्या मांजराइतक्या भावनिकरित्या जोडल्या जात नाहीत. पण आज तिला जे तिच्या निरागस डोळ्यात जी करुणा दिसत होती ते नेहमीच्या रंगीचे नव्हते. ते कुणाला सांगूनही कळणार नव्हते. मोठ्या जिकिरीनं रंगीचा निरोप घेतला.
इकडे पुण्यात कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. गावातून एकदम पुण्यासारख्या शहरात येऊन पडल्यामुळे थोडं अवघडल्यासारखे जरूर वाटले. काकीने तर तिचे लाडच चालवले होते. नवीन कपडे, चमचमीत खाणं, रविवारी फिरायला जाणे असे काही काही सुरूच असायचे. इथंली शुद्ध बोली तर तिला साखर खाऊन बोलल्यासारखी वाटायची. तिच्या बोलण्यात बरेच गावरान शब्द यायचे ज्याची पुण्यातल्या मैत्रिणींना मजा वाटायची. हळूहळू ती नवीन वातावरणात मिसळायला लागली आणि मैत्रिणीदेखील जिवाभावाच्या झाल्या.
आपल्या मनाच्या नावेला आठवणींचे हेलकावे मिळत राहतात. मग ते हेलकावे कधी कधी सुखद झोपाळ्याप्रमाणे वाटतात तर कधी अगदी मनात वादळ उठतं. तसंच काहीसं नमिताचं व्हायचं. फोनवर बोलायचे म्हणजे शेजाऱ्यांच्या लँडलाईन वर फोन करावा लागायचा. त्या मार्गे आठवड्यातून एकदा घरी फोन व्हायचा तेव्हा बरे वाटायचे. पण तिचा जीव की प्राण असणाऱ्या रंगीला तर फोन वर बोलवू शकत नव्हती. तिच्या आठवणीने जीव कासावीस व्हायचा. येताना तिनं 'रंगीला अगदी व्यवस्थित संभाळण्याबद्दल' आजीकडून वदवून घेतलं होतं. आजीच्या सांगण्यानुसार तशी रंगी अगदी मजेत होती.
कसा बसा महिना गेला आणि काका तिला गावी दोन दिवसांच्या सुटीवर घेऊन आला. ती दिसताच रंगीनं अगदी दाव्याला हिसके द्यायला सुरुवात केली. खूप दिवसातून पोरगी घरी आल्यामुळे आई तिच्यावरून तुकडा ओवाळून टाकत होती. पण इकडे रंगीचं हंबरणं आणि दाव्याला हिसके देणे चालूच होते. नमिता तर धावतच गेली आणि तिचं दावं सोडलं. जशी मोकळी झाली तशी रंगी तिचा हात चाटू लागली. मुक्या जनावराचं हे भाबडं प्रेम पाहून घरच्यांनी तोंडात बोट घातलं. मग तिला आजीनं सांगितलं की ती पुण्यात गेल्यावर सुरुवातीचे काही दिवस रंगीने खूप धुमाकूळ घातला होता. नीट खायची नाही शिवाय गव्हाणीत ठेवलेल्या वैरणीची नासधूस करायची. पाण्याची बादली लवंडायची. जणू काही वेडीपीसी झाली होती. ते ऐकताच नमिताने रंगीला दटावले. ते ऐकून काका हसतच म्हणाला, "अगं भरपूर झाली शिक्षा.. बघ घाबरली तुझी रंगी. तुझ्यासारखीच आगाऊ आहे तीपण"
"आजी.. सांग की काकाला.. तिकडं पण मला चिडवतो असाच."
"बघतेच तुझ्या काकाकडं आता. दांडकंच घेते मारायला." आजी खोट्या रागात म्हणाली आणि तिघेही हसत हसत आत निघून गेले.
तिचं गावी 2-3 महिन्यातून एकदा जाणे व्हायचे. अकरावीचे वर्ष संपून बारावीचे वर्ष आले आणि आता सहा महिने तरी गावी येता येणार नव्हते. शाळा आणि अभ्यासिका यात ती अगदी गुरफटून गेली होती. गावी पावसाळा सुरू झाला होता. गावातलं वातावरण किती मोहक असेल याची कल्पना करून तिला मोहरून यायचे. पण या पावसाळ्याबरोबर अलगद पावलांनी तिच्या आयुष्यात काळही येत होता याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. एके दिवशी सकाळीच आप्पांचा फोन आला, आणि बातमी ऐकून काकाचे डोळे पाणावले. फोन ठेवून तो दोन क्षण स्तब्धच उभा राहिला. नमिता तिथंच होती, तिला जेव्हा हे सांगितलं गेलं तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या आजीने या जगाचा निरोप घेतला होता. बोलता बोलताच तिला ऍटॅक आला आणि अगदी सहज जीव सोडला.
लगेच पुण्याहून सगळे गावी आले. आजीचं दहन होणारा निश्चल देह पाहून, तिचा ऊर भरून आला. काही क्षण आपण एका काळ्याकुट्ट डोहात बुडतो आहोत असं वाटलं. तिला पुढचं काही दिसत नव्हतं. फक्त एक अंधार होता, तोही पाण्यासारखा हेलकावा खाणारा भयावह अंधार. सरणाची आग विझली तेव्हा शेवटी आजी नव्हतीच तिथं. फक्त शिल्लक होती पांढरीफटक राख. आजी आता पलीकडच्या दुनियेत गेली होती कधीही न परतण्यासाठी.
पाच दिवस उलटून गेले. आजीविना घर अगदी खायला उठत होतं. आजी म्हणजे तिच्या आयुष्यातली पहिली मैत्रीण, गुरू आणि आदर्श होती. मन मोकळं करण्याची हक्काची जागा होती. पण आता मनात दाटून आलेलं आभाळ ती कुणाजवळ मोकळं करणार होती. अलीकडे आजीला शेतातलं काम आणि म्हशींची देखभाल करता करता गुडघे दुखू लागत. आप्पा नोकरीला असल्यामुळे त्यांनाही जास्त लक्ष देता येत नव्हतं. आई-आप्पा दोघांनीही आजीला खूप वेळा म्हटले होते की म्हसरे विकून टाकू. पण आजीला ते मान्य नव्हतं, अगदी देह पडेपर्यंत तिला तिच्या मंगीला डोळ्याआड होऊ द्यायचं नव्हतं.
आता मात्र मालकीण दिसेनाशी झाल्यावर काहीतरी अघटित घडल्याची जाणीव मंगीला होऊ लागली होती. दावणीला हिसके देऊन उड्या मारत होती. कुणाला पुढे जायची हिंमत होत नव्हती. आप्पानी वैरण टाकण्याचा प्रयत्न केला पण ती त्यांच्यावर देखील धावून गेली. मंगी पहिल्यापासूनच मारकी असली तरी तिचं हे विक्राळ रूप निराळच होतं. नमिताने मंगीजवळ जायचं ठरवलं. घरचे नाही म्हणत होते पण प्रयत्न करणे भागच होते. नमिता थोडी पुढं गेली आणि मंगी दाव्याला हिसके देऊ लागली. एका हिसक्याबरोबर दावं तुटलं आणि मंगी नमिताकडे धाव घेतली. आप्पांच्या काळजात धस्स झालं आणि ते पुढे यायला धजावले पण नमिताने खुणेनेच त्यांना थांबवले. मंगी तिच्याजवळ आली आणि नुसतीच रागाने उड्या मारू लागली. जणू ती आपलं मन मोकळं करायचा प्रयत्न करत होती. कदाचित आपली मालकिणीला असं उचलून का घेऊन गेले होते, एवढे दिवस वैरण घालायला आणि पाणी पाजायला का येत नाही, वातावरण असं दुखी का होतं या प्रश्नांची उत्तरं हवी होती. तिला काहीही करून आपली मालकिणीला पाठीवर हात हवा होता. नमिताने आजीसारखी 'मंगे~~' म्हणून जोरात हाक दिली. आणि तिच्या मानेभोवती मिठी मारून रडू लागली.
"आजी गेली गं मंगे.... नाही येणार ती तुला वैरण घालायला.. पण तू शहाणी ना... शांत नाही झालीस तर आजीची शपथ तुला."
मुक्या जनावराला काय कळत असेल. माणूस जाणं काय असतं, शपथ काय असते. हे सगळं यांच्या जगाच्या बाहेरचं. पण कदाचित नमिताच्या स्पर्शाचा अर्थ तिला कळला असावा. मंगी अगदी शांत झाली आणि फक्त खाली नजर रोखून उभा राहिली. नमिताने तिला दावणीला बांधलं आणि वैरण आणून टाकली. पण तिनं दोन दिवस तरी काही खाल्लं नाही. नमिताने आपली चिकाटी सोडली नाही. मंगीशी आजीविषयी खूप बोलत राहायची. मंगी वैरण खाऊ लागली तेव्हा मात्र सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्या दहा-बारा दिवसात रंगीच्या सोबत पण राहता आलं. उत्तरकार्य पार पडताच ती पुण्याला परतली.
महिनाभराने आप्पांनी नमिताजवळ एक व्यथा मांडली. एका महत्त्वाच्या निर्णयासाठी त्यांना परवानगी हवी होती.
"नमू बाळा... माझे एक ढेरेगावचे मित्र , मंगी आणि रंगीला विकत घेण्याबद्दल विचारत होते. मला माहीत आहे तुला या गोष्टीचा धक्का बसेल. पण विचार कर, माझ्या शाळेमुळं आता त्यांचं व्यवस्थित पाहता येत नाही गं. त्यात तुझी आई पण हल्ली आजारी असते. बिचाऱ्या जनावरांचे हाल नको म्हणून...." पुढचे शब्द त्यांना बोलवत नव्हते.
इकडे नमिताचे डोळे भरून आले होते. शब्द फुटत नव्हते. तिलाही माहीत होतं, शेवटचा पर्याय असल्याशिवाय आप्पा असे करणार नाहीत. तसे पाहिले तर आप्पा हा परस्पर निर्णय घेऊ शकले असते पण त्यांच्या दृष्टीने दोन्ही जनावरावर पूर्णपणे नमिताचाच हक्क होता. फोनवर जणू कधीही संपणार नाही अशी शांतता पसरली. तिचा जसा म्हशींवर हक्क होता त्याच्यापेक्षा जास्त, तिचं संगोपन करणाऱ्या आई-आप्पांचा तिच्यावर होता. तिनं आपलं मन परिस्थिती समोर शरणागत केलं आणि दोघींना विकण्यासाठी होकार दिला. तिला माहीत होतं की या एका 'होकाराची' सल काळजाला आयुष्यभर पोखरत राहील. पण दुसरा पर्यायही दिसत नव्हता.
काही दिवसातच व्यवहार झाला आणि रंगी-मंगी दोघीही नवीन मालकाकडे रवाना केल्या गेल्या. दोघींनी त्यादिवशी खूप धुडगूस घातला. धड ओवाळता देखील आले नाही. कसे बसे टेम्पोमध्ये चढवले तेव्हा आप्पांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्या रात्री नमिताचा डोळाच लागला नाही. सतत रंगीचा तो जन्मल्या जन्मल्या उभं राहण्याच्या धडपडीचा प्रसंग दिसत होता. ते गोजिरवाणे रेडकू आणि वेलवेट प्रमाणे चमकणारे केस. पहिल्यांदा दिसलेले ते शिंगांचे टेंगुळ. सगळं बालपण अगदी चित्रफितीप्रमाणे डोळ्यासमोर सरकून गेले. आज बालपण जाऊन पोक्तपणाची शाल तिच्या खांद्यावर आली होती.
आता तिने स्वतःला अभ्यासात झोकून दिले. बारावीत बोर्डात येण्यासाठी फक्त एक टक्के मार्क कमी पडले. घरचे खुष असले तरी तिला वाईटच वाटलं. आता अजून तीन वर्षे बीए च्या अभ्यासक्रमासोबत राज्य स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील करायचा होता. ती बीए च्या पहिल्या वर्षाला असताना, आप्पा रंगीच्या नवीन मालकाला भेट देऊन आले होते. मंगी काही महिन्यांपूर्वी आजार होऊन मृत्यमुखी पडली, आणि रंगी गाभ राहिल्यावर त्या मालकांनी विकले होते. ऐकताना रंगीसोबत जोडलेला शेवटचा धागा देखील तुटल्यासारखे वाटले. सारं काही नाटकीय घडत होतं. आजपर्यंत नमिताला रंगी कुठे आहे हे तरी माहीत होतं पण आता तो धागा सुद्धा तुटला होता. त्यादिवशी ती मनसोक्त रडली. 'माझी रंगी आता आई होणार? किती मोठी झाली असेल... आता कदाचित ओळखणार पण नाही मला.'
काळ सरत राहिला आणि नमिताला बऱ्यापैकी रंगीचा विसर पडला. ध्येयाने पछाडून अभ्यास करत होती. बारावीत बोर्डात येण्याची हुकलेली संधी तिनं बीए मध्ये विद्यापीठात सुवर्णपदक मिळवून भरून काढली. एम पी एस सी चा अभ्यास तिनं पदवीच्या दरम्यान पूर्ण केला होता. ती पोस्ट मिळवणार ही काळ्या दगडावरची रेघ होती आणि तसंच झालं. गावाच्या कामकाजात अगदी फिल्ड लेव्हलला विकासकामे करायची ईच्छा असल्यामुळे तिने तहसीलदार या पदाऐवजी बी डी ओ पदाला प्राधान्य दिले. तिची निवड देखील झाली. त्यात दुर्मिळ घटना अशी होती की पोस्टिंग तिच्याच तालुक्यावर झाली होती. इतक्या वर्षे आईवडिलांप्रमाणेच प्रेम देणाऱ्या काका काकीला मात्र आता सोडावं लागणार होतं. तिला बऱ्याचवेळा, आयुष्यात कायम काहीच स्थिर का राहत नाही याचा राग मात्र जरूर यायचा. काही आपलंसं आहे असं वाटायला लागतं आणि तेवढ्यात ते दूर घालवायची तजवीज नियतीनं केलेली असते. माणसाची ओंजळ ती केवढीशी, आणि त्यात सर्वच नाही सामावू शकत.
कितीतरी वेळ ती सपराकडे टक लावून पाहताना आप्पांच्या नजरेस आले. त्यांनी हाक देताच नमिता आठवणींच्या पैलतीरावरून परतली. सपरात आता छोटी नमिता आणि रंगी दोघीही नव्हत्या. काळाच्या कुठल्यातरी पापुद्रयामध्ये त्यांचं खेळणं बागडणं चालू असेल ही कल्पना सुखावणारी होती.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती पुन्हा एकदा साळगावला आली. ग्रामपंचायतीचे कामकाज आणि राबवलेल्या योजना याचे रेकॉर्डस् पाहिले. तिला वाटले की लोकांशी देखील आपण संवाद साधायला हवा. योजनांची माहिती त्यांना मिळते का, त्याचा लाभ ते घेऊ शकतात का अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तिला घ्यायची होती. मग तिने दारिद्र्य रेषेखालील योजनेचा लाभ घेतलेली काही कुटुंबांची नावं निवडली. सरपंच आणि ग्रामसेवक हे तिला अशा कुटुंबांना भेटवत होते. चार कुटुंबांना भेटल्यावर शेवटचं कुटुंब महादेव तुंगार याचे होते.
"मॅडम.. ह्या तुंगाराच्या म्हशींनंच काल घोळ घातला बाजारात."
"म्हणजे?"
"अवो.. त्यानं म्हस इकायला आणली होती. एकतर म्हारकी म्हस आणि त्यात चुकून दावं सुटलं. पळाया लागली सुसाट एकदम." बाजारातला गोंधळ आठवून सरपंच आणि ग्रामसेवक हसू लागले.
"बरं.. ते ठिकाय.. मुकं जनावर ते, होतं असं बऱ्याचवेळा.. निघुया आपण?"
वाटेत चालता चालता नमिताने जेव्हा सरपंचाना सांगितलं की, ती देखील लहानपणापासून म्हैस सांभाळायची तेव्हा मात्र ते अवाक होऊन तोंडात बोटं घातली. कारण या आधी त्यांनी जेही अधिकारी पाहिले होते त्यांचा गावाशी काही संबंध नसायचा. तुंगारच्या घरी यांचा जथ्था पोहोचला तेव्हा त्याची बायको अधिकारी आणि सरपंच यांना पाहून घाबरलीच. घराच्या मागेच महादेव म्हशी चरायला घेऊन गेला होता. त्याच्या बायकोनं फोन करून लगोलग यायला सांगितलं. आधी तिला वाटले होते की कालच्या म्हशीच्या गोंधळामुळं हे सगळे जाब विचारायला आले आहेत. बिचारी लगेच स्पष्टीकरण देऊ लागली,
"मॅडम.. सरपंच अवो .. म्हस लईच आवकाळ हाय आमची.. यवढं किऱ्यानिष्ट जनावर बघितलं न्हाय वं आजपातूर.. माफ करा बाजारात लई धुडगुस घातला हिनं. गिऱ्हाईक मिळालं की लगीच इकणार आमी."
सगळ्यांना तिनं आत बसायला बोलवले. पण पत्र्याच्या घरात खूप गरम होईल म्हणून घरासमोरच्या पिंपळाच्या सावलीत ठेवलेल्या बाजावर नमिता आणि सरपंच बसले. तुंगारची बायको चहा ठेवायला आत गेली. तेवढ्यात महादेव तुंगार दोन म्हशींना घेऊन येताना दिसले.
"ह्यो बगा... आला महादू... " सरपंच रस्त्याचा अंदाज घेत म्हणाले. पांढरंफटक ऊन्ह रस्त्यावरून अगदी वाफा काढत होतं. पिंपळाची सावली मात्र थंडगार होती. महादू जसा जवळ येईल तशी त्याची आकृती हळूहळू स्पष्ट व्हायला लागली. पण अचानक त्याच्या म्हशीने हातातल्या दाव्याला हिसका दिला. तो ताकदीनं म्हशीला आवरण्याचा प्रयत्न करू लागला. पण म्हशींची ताकद त्याच्या कैक पट होती. शेवटी म्हैस हातातून सुटलीच आणि उधळतच तिनं पिंपळाकडं धाव घेतली. सरपंच आणि ग्रामसेवकाला तर समोर मरणच दिसलं. त्यांनी आजपर्यंत इतकी खवळून म्हैस पळताना पाहिली नव्हती. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच म्हैस काही फुटावर आली तसे ते दोघे बाजूला पळाले. नमिताला काही सुचले नाही आणि पळण्याऐवजी तिथंच स्तब्ध झाली. म्हशीच्या मागून महादू जीवानिशी पळत होता. नमिताला तर साक्षात मृत्यू समोर दिसला. काही फुटावरून हातांच्या अंतरावर म्हैस आली आणि नमिताने डोळे गच्च मिटून घेतले. काही क्षण गेले.. आत्तापर्यंत म्हशीने मारायला हवं होतं.. पण काय झाले? तिने डोळे उघडले. म्हैस जवळ येऊन थांबली होती. डोळ्यात मारायचा भाव नव्हता तर एक ओळख होती. नमिताला मनात जे वाटून गेलं ते सत्य नसावं असंच वाटलं. पण तिने म्हशीच्या पायकडं पाहिलं. गुडघ्याला लागलेला चिखलामुळे पुसटसा पांढरा पट्टा दिसला. पाणावलेले डोळे आणि चेहऱ्यावर हसू होतं. कित्येक वर्षात हा असा आनंद अनुभवलाच नव्हता.
"रंगे......."
हाक देताच ती हंबरली. आता ही अगदी पोक्त म्हैस झाली होती. शिंगं अगदी वळनदार आणि मजबूत. कित्येक वर्षांच्या गप्पा राहिल्या होत्या दोघींच्या.
तेवढ्यात पळून दमलेला महादू, सरपंच आणि ग्रामसेवक जे काही पाहिलं ते खरंच का याची खात्री करून घेत होते. तिनं सगळ्या आठवणी तिघांना सांगितल्या. तिघेही अवाक झाले होते.
"कधी आयकलं नव्हतं बा आसं.. म्हस यव्हढी वळख ठिवती? मला बळच पळीवलं हिनं." महादूचं बोलणं ऐकून नमिताला हसूच फुटलं.
"म्हजी.. बाजारात बी ही तुमच्यासाठीच पळाली असणार." सरपंचांनी अंदाज लावला.
"कदाचित असेलही.....पण मला माफ करा हं.. गावकऱ्यांना त्रास झाला रंगीमुळं."
"अवो.. माफी मागून लाजवता आमाला. उलट गावाला अभिमान वाटल की जनावरांवर एवढं प्रेम असणाऱ्या अधिकारी आमाला मिळाल्या." सरपंच.
"महादेव दादा.... एक विनंती होती.."
"ईनंती काय म्याडम .. आर्डर करा..."
"रंगी ला मी विकत घेऊ....? तुम्ही तयार असाल तर.."
"या जगात माणसं साथ देत न्हाईत तिथं ह्या मुक्या जनावरानं वळख सांडली न्हाय.. तुमचीच हाय ती... कवा बी न्या...."
तिनं आयुष्यात एखादा व्यवहार इतक्या पटकन कधीच केला नव्हता पण तिने हा व्यवहार क्षणाचाही विलंब न लावता केला. महादूने ही आडून जास्त पैसे घेतले नाहीत. घरी येऊन तिनं आप्पा आणि आईला ही गोष्ट सांगितली तेव्हा आप्पांना आपल्या खांद्यावरनं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटलं . मनातून अपराधीपणाची भावना निघून गेली.
चार दिवसातच नमिताने रंगीला घरी आणले. मंगीची मोकळी गव्हाण पुन्हा एकदा वैरणीनं भरली आणि तिची जागा आता रंगीने घेतली. नमिताला ते दृश्य पाहून विश्वास बसत नव्हता. आयुष्यात खूप गोष्टी गवसल्या आणि हरवल्या देखील. असं नाही की रंगी गेल्यापासून तिच्या जीवनाला काही अर्थ नव्हता पण एक रितेपणाची भावना कोपऱ्यात घर करून गेली होती. जीवनाच्या समुद्रात अनेक हेलकावे खात तिची छोटीशी होडी एका अशा बेटाला येऊन थबकली होती की जिथला प्रत्येक सूर्यास्त ओळखीचा होता. हरवलेले प्रत्येक क्षण आता पुन्हा पुन्हा जगायला मिळत होते.
नमिताचे बरेचसे रविवार रंगी बरोबर रानातच जायचे. रानातल्या त्या बालपणाच्या वाटेवरून हिंडताना, दूरवर कुठंतरी दोघींची आकृती एकमेकींत विरून जाई.. शेवटी एक छोटासा ठिपकाच दिसे.. अविभाज्य असा..!!
मस्त आहे... शेवटी डोळ्यांतून पाणीच आले... पिंपळाच्या खाली दोघी भेटल्यावर...
ReplyDeleteखूप आभार प्रमोद😊
Deleteखूप छान कथा...रंगी आणि नमिता यांच्यातला भावनिक बंध मला दहावी मध्ये मराठीच्या पुस्तकात वाचलेल्या एक धड्याची आठवण करून गेला...शेवट मस्तच...प्रेम फक्त माणसा माणसात नसून ते प्रणिमात्रात ही असते याचा प्रत्यय आला...
ReplyDeleteआपल्या अभिप्रायाबद्दल खूप आभार..😊
Delete