अज्ञात सुखाच्या शोधात, एखाद्या भुयारात खोलवर जात राहावं. कित्येक फाटे फुटत राहतात. तीच तीच वळणं पुन्हा पुन्हा दिसत राहतात. कुठलं वळण घ्यायचं ते बुद्धी ठरवते. जी काय कारणमीमांसा करायची, ती तिलाच करू द्यायची. भावनेची आडकाठी दूर ठेवून तिच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं.
पण खूप अंतर कापल्यावर अंधाराशिवाय काहीच दिसत नाही. अंधार दिसतो? की दिसण्याच्या अभावालाच अंधार म्हणायचा? असो.. इथे शब्दखेळ करत बसायला कुठे वेळ आहे. कारण आता धाप वाढतेय आणि जीवही गुदमरू लागलाय. हर एक श्वासाचंही ओझं वाटतंय. ऑक्सिजनही विरळ होत चाललाय. माघारी फिरावं वाटतं खरं, पण सुखाची आशाही वाईट असते. शेवटी अज्ञात सुखापेक्षा जीव महत्वाचा वाटून, एकदाचे माघारी धावू लागतो.
परतीच्या प्रवासात देखील पुन्हा तेच संभ्रमाचे फाटे. कुठल्या मार्गावर विश्वास ठेवावा? जर एखादी वाट पुन्हा आत खोलवर घेऊन गेली तर? हा यक्षप्रश्न समोर असला तरी वेळ दवडण्याला अर्थ नसतो. लालसेने मृत्यूच्या दारी नेणाऱ्या बुद्धीपेक्षा, विवेकी मनावर ही जबाबदारी घ्यावी असे वाटते. एका क्षणात मन निर्णय घेईल त्या वाटेला पळायचं. पुन्हा प्रवास... पुन्हा ती वाट तुडवणे. भुयारातली वाट म्हणजे एखाद्या मोठाल्या पाईपमधून गेल्यासारखे. की पाईपच आहे ही? एवढा कशाला आपण तर्क लावत बसतो, आत्ता बाहेर निघायचंय हेच मोठं सत्य आहे.
आता फक्त प्रकाशाची आस. प्रकाश हाच खजिना वाटू लागतो. एकदा का पुढच्या टोकाला प्रकाशाचं सूक्ष्म अस्तित्व जरी जाणवलं की बस्स. मग फक्त सरळ जावं लागेल. तोच शेवटचा मार्ग असेल. पण खूप वेळ झाला, अजून अंधारच आहे. ही गुहा खेळत तर नसेल माझ्याशी? इथेच नाही ना अडकून पडणार मी? बंद केलेल्या बिळातील उंदराला कदाचित असंच होत असेल?
नाही... नाही.... मी नाही फसणार या जाळ्यात.. मी चालणं सोडणार नाही..
व्वा... प्रकाशाचा धूसर बिंदू दिसतोय. आता फक्त त्यादिशेने पळत, चालत, रांगत किंवा सरपटत कसे का होईना जात राहायचे. बराच पुढे आलोय पण त्या प्रकाशाची प्रखरता कुठे वाढतेय. तो बिंदू अजून तेवढाच तर सूक्ष्म दिसतोय.. कदाचित या भुयाराचं तोंडच माझ्या गतीने पुढे पुढे सरकत असावं का... की माझ्याच 'गती' चा कुणी मनुष्य मशाल घेऊन बाहेर पडायच्या प्रयत्नात असावा? जाऊदे.. नको आता द्विधा मनस्थिती.. आपल्या शरीरापेक्षा मनच जास्त धावतंय. मुळात मी इथं आलो ते, या विचारचक्रामुळंच. थोडं थोपवायला हवं हे चक्री वादळ.
श्वास.. श्वासच यावरील गुरुकिल्ली. जीवनाचं एकमेव आणि अंतिम सत्य. एकदा का श्वास लयीत आल्यावर, थंड हवेची एक झुळूक मनाला गारवा देईल.
श्वासाच्या नुसत्या जाणिवेनेच, मन आता निश्चल झालंय. अगदी नदीच्या प्रवाहासारखं. भुयाराच्या तोंडाशी असलेला प्रकाश आता प्रखर होतोय. मी पोहचतोय. बाहेर गेल्यावर फक्त प्रकाशच असेल की अजून काही. जग बदललेलं असेल का? की तसंच दुःखानी माखलेलं असेल. पण मन समतेत असलं तर सुख काय किंवा दुःख काय, सगळंच अनित्य. त्यावेळी आसपास फक्त प्रकाशाची शुभ्र पीसं तरंगत असतील.. वाऱ्याहून हलकी.. अगदी या क्षणातल्या मनासारखी..
**********************
लेखक- विशाल पोतदार
मोबाईल- 9730496245
टीप- आपला अभिप्राय खूपच महत्वाचा असेल. आवडल्यास जरूर शेअर करा.
मन हे प्रचंड विस्तारित आहे,समूद्रासारखं पण काय तुम्ही बऱ्याच पैकी शब्दाच्या ओंजळीत घेतलंय... !!!
ReplyDeleteआपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार..😊
ReplyDeleteआता फक्त प्रकाशाची आस.... सर मस्त लिहीलेय
ReplyDelete