.post img {

Automatic Size

Wednesday 24 February 2021

लघुकथा- पहाडा पलीकडचं काही

    कथा शिर्षक - पहाडा पलीकडचं काही
    लेखक - विशाल पोतदार
    पत्ता- कराड, जिल्हा -सातारा
    ई-मेल id- vishal6245@gmail.com
    संपर्क - 9730496245
    
    कथा-
    
"रखमे.... ए रखमे.... माझी रखमाई.... उठ लवकर... जायचं नं मला.."
    
"थांब ना आप्पा... दहा मिनिटं झोपू दे.."
    
 "आता लाडाला इवू नको बरं.. एक जरी ट्रेन चुकली तर शंभर रुपय बुडतील माजं."
    
    रुक्मिणीनं तोंडावरून वाकळ बाजूला केली. खिडकीतून केव्हाचा नजर ठेवून असलेला कवडसा आता तिच्या चेहऱ्यावर आला. संधीप्रकाशासमान सावळी कांती, कमानदार भुवया, सरळ नाक आणि कंबरेपर्यंत रुळणारे केस. का कुणासठाऊक पण तिचे डोळे इतके बोलके होते की एखाद्या व्यक्तीला त्यात सगळी उत्तरं सापडावीत. अळोखे पिळोखे देत एकदाची उठली. अंथरूण आवरलं. आणि ब्रश करत अंगणातल्या कट्ट्यावर बसली. 
    
    "रखमे.. जेवून घे लवकर. आणि कुटं भायर जाऊ नको. अजून चहा करावा लागला तर फोन करीन. मग न्यायला येईन मी." 
    
    सकाळचा स्वयंपाक करून ज्ञानबा चहाची मोठी किटली घेऊन स्टेशनला निघाला. तब्बल पंचवीस वर्षं झाली, ज्ञानबा स्टेशनवर चहा विकायचा. प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली रे आली की, स्लीपर कोच मधे शिरून 'माऊली, चहा घ्या. चाचा..चाची चाय लेलो' त्याचे हे कॅसेट सुरू होऊन जायचे. रुक्मिणी सातवी-आठवीत असतानाच तिच्या आईला देवाज्ञा झाली आणि तेव्हापासून ज्ञानबाच तिच्यासाठी आई आणि बाप होता. म्हणूनच तीसुद्धा सहज आपल्या बापाला अरे-तुरे करु लागली आणि त्यानंही तिला रोखलं नाही.
    
    ज्ञानबाचा स्वभावच मुळात चहासारखा गोड. त्याच्या हास्यात इतका निखळ आनंद असायचा की जणू 'सुखी माणसाचा सदरा असणारा माणूस हाच' असं वाटावं. पावली, आठ आणे, रुपया जोडत जोडत त्यानं रखमाईला शिकवलं. यंदा तिचं ग्रॅज्युएशनचं पूर्ण झालं. स्वतः कसंबसं दहावी शिकल्यामुळं त्याला पोरीचा विशेष अभिमान होता.
    
    रखमाई तशी अभ्यासातली गती मध्यमच. पन्नास-पंचावन्न टक्के मार्कांच्या वर येणं तिला कधी जमलं नाही. प्रत्येक पालकांप्रमाणे ज्ञानबालाही वाटायचं की आपल्या पोरीनेही इंजिनिअर डॉक्टर वगैरे व्हावं. पण तिची अभ्यासातली धाव पाहून, त्याने ते इरादे आवरते घेतले. त्याला जाणवलं की ही पोर काही चार भिंतींच्या खुराड्यात रमणारी नाही. तिला झाडं, शेत, डोंगर आणि दऱ्या आवडायचे. 
    
    रखमाईचा बालपपणीचा एक मजेदार किस्सा होता. ती ज्ञानबाला नेहमी विचारायची, की गावाशेजारच्या भैरोबाच्या डोंगरापलीकडं नक्की  काय आहे. दोघे एकदा पलीकडच्या गावाला गेल्यावर ज्ञानबानं सांगितलं की, हे बघ डोंगराच्या पलीकडील ठिकाण. पण तिला तर ते डोंगरावर चढून पलीकडं पाहायचं होतं. त्यानं बरंच समजावलं, पण त्याची ही हट्टी राजकन्या ऐकेल तर शपथ! एकेदिवशी त्यानं खरंच नेलं की तिला डोंगरावर. सात आठ वर्षांच्या चिमुकलीचे नाजूक पाय. थोडी चालत, थोडी तिला खांद्यावर गेहेतबसत-बाप लेक  डोंगरमाथ्याला पोहचले. तिने त्यावेळी डोळे भरून पाहिलेला डोंगरापलीकडचा भाग. जणू ती एक उडणारी पक्षीण आणि खाली इवलीशी दिसणारी घरं तिच्या पंखाखाली होती. त्या दिवशी ती काही खाली उतरायला तयार नव्हती. ज्ञानबाने कित्येक विनवण्या केल्या तेव्हा महाराणी गडावरून खाली यायला तयार झाल्या. ती घरी परतली असली तरी तिचं मन मात्र त्या पहाडातच हरवलं होतं. 
    
    त्यानंतर तिच्या आयुष्यातला एक नवीन अध्यायच सुरू झाला. भैरोबाच्या डोंगरावर मैत्रिणींसोबत दोनवेळा जाऊन आली. पण नंतर कुणी मैत्रिणी सोबत यायला तयार नाहीत. शेजारचा अमितदादाचा ग्रुप सतत विविध किल्ल्यांना भेटी द्यायचा. तिनं दादाला लाडीगोडी लावत त्या ग्रुपमधे जागा बनवलीच. त्या क्षणापासून सह्याद्रीशी तिची खरी ओळख झाली. उन्हाळ्याच्या सुटीत विविध गडकिल्ल्यांच्या ट्रेकमधे सामील होऊ लागली. कडा चढण्यात तिची सहजता पाहून एखाद्याला वाटावं, की ते कातळ तिला बाहू पसरून कुशीत घेतायत. पण ती जेव्हा कुठल्या गडावर गेली की, इकडे ज्ञानबाचा जीव मात्र एखाद्या मोठ्या खडकाखाली सापडल्यासारखा व्हायचा. म्हणता म्हणता दहावीचं वर्ष सुरू झालं, पण तिच्या पायाची भिंगरी थांबायला कुठे तयार होती. रागावणे ही गोष्ट ज्ञानबाच्या गावीही नव्हती. मग त्याने आपली काळजी अमेयला बोलून दाखवली. शेवटी अमेयदादाने, दहावी पास झाल्यावर एका चांगल्या गिर्यारोहन ग्रुपमध्ये दाखल करण्याचे आमिष दाखवले. तेव्हा कुठे ह्या रुक्मिणीने कंबरेवरचा हात सोडून, हातात पुस्तक धरलं. शेवटी देवाला थोडासा नैवेद्य दाखवण्यापूरते पन्नास टक्के मिळवले. ती पास झाली यातच ज्ञानबा खुष होता. कारण त्याला माहित होतं की तिचं खरं पुस्तक तर डोंगर दऱ्या आहेत. त्यानं ते तिला हवं तेवढं वाचू दिलं. पुढे गिर्यारोहनाच्या ग्रुपमधून तिने सह्याद्रीतले कठीण समजले जाणारे कित्येक कडे, घळी पार केल्या. ग्रॅज्युएशन होइपर्यंत सह्याद्रीची ही घोरपड आता हिमालयातील शिखरांना कधी साद घालू लागली कळले देखील नाही. हिमाचलमध्ये 4-5 ट्रेक झाले. आणि मागील वर्षी भारतातल्या उंच शिखरांपैकी एक नंदादेवीची मोहिमदेखील यशस्वी केली. 
    
    आज ज्ञानू घरी परतत असतानाच हौसामावशीने थांबवलं. हौसामावशी ज्ञानबाच्या शेजारीच राहायची. लांबच्या नात्यातली असली तरी त्याच्यासाठी ती सख्ख्या मावशीच्यावर होती. यशोदा गेल्यापासून हौसामावशीनंच तर रखमाईकडं लक्ष दिलं. पोरगी लहान असेपर्यंत ठीक होतं पण ती वयात आल्यावर तिच्या वयासोबत येणाऱ्या शारिरीक प्रश्नांना बाप तोंड देऊ शकला नसता. आणि ती बाजू मावशीने पुरेपूर सांभाळली. म्हणून ज्ञानबा कधी मावशीच्या शब्दाबाहेर नसायचा. 
    
    घोळवत घोळवत तिनं मनातल्या विषयाला हात घातलाच. रुक्मिणीसाठी एक नामी स्थळ चालू आलं होतं. ज्ञानूने रखमाईशी बोलतो म्हणून सांगितलं. पण ऐकेल ती हौसामावशी कुठली!
    
    "द्यानू... तिला काय कळणार. संसार काय, खेळ काय. या वयात लगीन उरकलंस तर बरं. नायतर पूना मिळतीली कसली बी पोरं." 
    
    "आगं पर...." ज्ञानूने विनवणीच्या सुरात म्हटलं.
    
    "पर नाय आन बीर नाय.. आरं पंधरा एकर जमीन हाय पाणस्थळ. पोराचा वडील सरपंच हाय गावचा. त्येंच्या सुनास्नि भाजी आणायलाबी भायर जावं लागत न्हाय बग. सगळं घरात आयतं मिळतंय.  पोरगी सुखात राह्यल. " हौसा मावशी आपला ठेका सोडायला तयार नव्हती.
    
    "मावशे..तुजं बरोबर हाय पर आपली रखमाई येगळी हाय अगं. पोरगी नाव कमावल बघ. कसं सांगू तुला आता. उडणाऱ्या पाखराला बंदिस्त ठेऊ व्हय."
    
    "पोरीच्या वर बापच येड्यासारखा वागाय लागल्याव काय म्हणायचं. हे डोंगार चढण्यात कसलं नाव कमावणं आलं. आन पोरीच्या जातीला शोभल का आता ह्ये आसले नाद. आणि आरं महादेव नुस्ती पोरगी आणि नारळ घील. मलाच मागं बोलता बोलता सांगून गेला व्हता. दुसरं मोठं स्थळ आल्याव तुला जमणार हाय का 7-8 लाख खर्च करायचं. बाय... यशोदी असती तर तिनं सोयरीक जमवूनच घेतली असती. आता आपलं म्हातारीचं कोण ऐकतंय म्हणा. तुझ्याकडे नंबर हाय महादेवचा. तूच सांग बघायचा कार्यक्रम कधी ठिवायचा ते. आणि नसल तर आता आमी काय हितुन पुढं स्थळं आणायचो नाय बाबा." 

    हौसा मावशीनं निर्वाणीचाच इशारा दिल्यावर ज्ञानबाच हतबल झाला. एकीकडं पोरीचं आयुष्य स्थिरस्थावर करणारं स्थळ. महादेव शिंदे म्हणजे लाखेगावातली मोठी असामी. आणि त्यांच्या मुलाच्या स्थळावर बऱ्याच मुलींच्या आई-बापाचा डोळा होता. त्यात महादेव शिंदे हौसामावशीचे पुतणे असल्याने ते काही तिच्या शब्दाबाहेर नव्हते. मुळात ज्ञानबाने तिच्या गिर्यारोहनाच्या वर्कशॉप तसेच विविध ट्रेकसाठी, जमवलेली पै खर्च केली होती. आपला असलेला छोटासा जमिनीचा तुकडा विकला, पण तिला कधी त्या शिखरावरून उतरायची वेळ येऊ दिली नाही. पण आता हौसा मावशी जे बोलून गेली ते कटू सत्य होतं. मुलीला चांगलं स्थळ मिळावं कुठल्या बापाला वाटणार नाही? आणि त्यासाठी 1 लाखापेक्षा जास्त खर्च करणं त्याच्याच्याने तरी जमणार नव्हतं. दुसरीकडे तिला सोन्याच्या पिंजऱ्यात पाठवतोय की काय असंही वाटत होतं. कधी कधी आपली मनोवस्था उलट्या पडलेल्या कासवासारखी असहाय होऊन जाते. कितीही पाय हलवले, धडपड केली तरी परिस्थिती जैसे थे. पण शेवटी बापाच्या मनानेच कासवाला सरळ केलं. ज्ञानबानं महादेव शिंदेना फोन करून पुढच्या आठवड्यात पाहायचा कार्यक्रम नक्की केला. 

    रुक्मिणीने अंघोळ वगैरे आवरली आणि जेवायला बसणार इतक्यात पोस्टमन एक लिफाफा घेऊन आला. उघडून पाहते तर काय. तिच्या आनंदाचा पारावार उरला नाही. तिला तर कधी एकदा कुणालातरी सांगतेय असं झालं होतं. अमितदादा पण सध्या जॉबसाठी मुंबईला होता. शेवटी मग तिच्या लाडक्या हौसाआजीला ती बातमी सांगायला निघून गेली.

    इकडे ज्ञानबाचं लक्ष काही आज कामात लागायला तयार नव्हतं. नुकतीच एक ट्रेन निघून गेली. तसे ज्ञानबा चहाचं काम सरसर करायचा. आज मात्र कशीबशी अर्धी किटलीच संपत आली होती. दोन पेसेंजरकडून तर पैसे घ्यायचेही ही विसरला. का कुणास ठाऊक त्याला घरी जाऊन रखमाईशी बोलावं वाटत होतं. जर तिला हेच हवं असेल तर? "हो. मी का इतका विचार करतोय. सरळ तिला सांगून टाकावं. तिचा अंदाज तरी घ्यावा. तिलाही आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आरामात जगावं वाटत असेल ना." विचार करत करत ज्ञानबा स्टेशनवरील पाण्याच्या टाकीजवळच्या कट्ट्यावर बसला. तिथं निरागस डोळ्यांचं एक कुत्र्याचं पिल्लू शोधक नजरेत आलं. पिल्लाची आई सोबत नव्हती. त्या छोट्याशा जीवाला तहान लागली असावी बहुतेक. भर उन्हातून आल्यानं त्याची तहान पराकोटीला गेली असावी. ओल्या झालेल्या फरशीलाच चाटू लागलं. ज्ञानबानं लगेच एक चहाचा मोकळा कप घेतला आणि पाणी भरून त्या पिल्लापुढं ठेवलं. पिल्लांनं जिभेने चटचट करत पटकन तो पाण्याचा कप संपवला आणि अजून पाहिजे म्हणून आर्जवी नजरेने ज्ञानबाकडं पाहिलं. त्यानंही हसून तो कप उचलून आणखी एकदा पाणी भरून ठेवलं. असं 4-5 वेळा केल्यावर कुठे ते पिल्लू खुशीत दुडूदुडू पळत गेलं. तेवढ्यात ज्ञानबाला दुसऱ्या चहावाल्यांने ट्रेन निघून गेल्याचं सांगितलं. पण पिलावर नजर रोखलेल्या ज्ञानबाचं लक्ष, शून्यात हरवलं होतं. कदाचित अजूनही रखमाईच्या काळजीत होतं. त्याच्या पिल्लासाठी नक्की 'योग्य काय' हा यक्षप्रश्न त्याच्यासमोर फेर धरत होता.

    संध्याकाळी घरात पाऊल ठेवतो तोच रखमाई भाकरी थापताना दिसली. ज्ञानबाला आज ही अवखळ पोरगी इतक्या लवकर जेवण करताना पाहून हसूच आलं. तिनं आप्पाला पाहताच हातातली किटली घेतली. आणि लाडीकपणे मिठी मारली. ज्ञानबाला आज त्या मिठीत एक गंभीरपणा जाणवत होता. म्हणजे नेहमीची काहीतरी चेष्टा मस्करी करणारी रखमाई वाटत नव्हती. तो विचारात पडला.

    "आप्पा.. कुठं हरवलास.... ?"

    ज्ञानबा ध्यानावर येत.." हा बोल...काय म्हणती आमची रखमाई.. एवढी शहाण्यासारखी वागाय लागली आज. काय विशेष गं."

    "काही नाही विशेष. तूच सगळं मनात ठेवतोस. हौसा मावशीनं त्या स्थळाबद्दल सांगितलं. कधी बोलवलंस पाहुण्यांना?"

    "म्हणजे तू तयार हायस? मी सकाळपासून ईचारात होतो तुला कसं सांगायचं? तू बिनसती की काय वाटत होतं. नेहमीप्रमाणं.. पोरगी जड झाली का वगैरे. "
    रुक्मिणी हसत. 

    "आरं.. आज नाही तर उद्या करावंच लागेल ना लग्न. आणि कधी पण झालं तरी हा वेडा नाद कुठल्या घरचे लोक सुनेला करून देतील. माझ्या मनानं आधीच तयारी केली होती या गोष्टीची. शिवाय हे लोक हुंडा वगैरे मागणार नाहीत. बघ ना. लहानपणापासून पाहतेय मी आप्पा तुला. शिक्षण असो.. खाऊ असो.. गिर्यारोहन असो.. तू स्वतःच्या डोक्यावर ओझं घेऊन मला काही कमी पडू दिलं नाहीस. मग या आयुष्याचा पार्ट 1 काहीतरी भन्नाट घडला ना.. मग आता पार्ट 2 जरा सिरीयस होईल. त्यात काय.?

    ज्ञानबा परिस्थितीने अगतिक होता. त्यानं आपल्या समजूतदार पोरीला अगदी मायेनं जवळ घेतलं. इवलीशी हुंदडणारी रखमी आणि आता बापाचा विचार करणारी रुक्मिणी. पण खरं तर ज्ञानबाला मात्र तिनं कधी रखमीची रुक्मिणी होऊच नये असं वाटत होतं. 

    असेच तीन दिवस निघून गेले. उद्याला पाहण्याचा कार्यक्रम होता. ज्ञानबाने दोन दिवस सुटीच घेतली होती. त्याचं ध्यान काही थाऱ्यावर नव्हतं. रुक्मिणी चेहऱ्यावर तसं दाखवत नसली तरी तिच्या वावरण्यात ज्ञानबाला एक अस्वस्थता जाणवत होती. तिनं गिर्यारोहनाचा त्याग करणं म्हणजे पक्षाने उडणं नाकारणं. ज्ञानबा विचारातच होता इतक्यात त्याला वर दोन पत्र्यांच्या मधे खोचलेला लिफाफा दिसला. जुना कागद असेल म्हणून टाकण्यासाठी त्याने काढला. तसं त्याला इंग्रजी फार काही यायचं नाही पण मोडकं तोडकंच वाचायचा. उघडून पाहतोच तर हा तर आत्ता काही दिवसांपूर्वीचा होता. वरती काही तरी मॉउंटनेरिंग फेडरेशन असं काही लिहिलं होतं. पुढचं लिहिलेलं काही कळलं नाही पण माउंटन या शब्दावरून गिर्यारोहनासंदर्भात काही तरी आहे इतकं कळालं आणि चमकलाच. रुक्मिणी हौसामावशीकडे बसली होती.  त्यानं पटकन तिला घरी बोलवलं. आल्याक्षणीच तिच्या हातात ते पत्र ठेऊन प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडं पाहिलं. आता ती आपल्या भावना नाही लपवू शकली.

    "रखमाई.. काय लिहलंय ह्यात? खरं खरं सांगायचं."

    "आप्पा.. जाऊ दे ना.. उद्या पाहुणे येतायत आणि मला काय प्रॉब्लेम नाही त्यासाठी."

    "मी बाकीचं विचारलं का तुला. ह्यात काय लिहिलंय सांग फक्त."

    "दिल्लीची एक संस्था आहे गिर्यारोहनाची. त्यांचं के-2 या शिखराच्या चढाईसाठी नियोजन चालू होतं. आमच्या मुंबईच्या सरांच्या मदतीने मीही अप्लाय केलं होतं. पण मला नव्हतं रे माहीत की ते निवडतील मला. जगातलं दुसऱ्या नंबरचं आणि तितकंच अवघड असं उंच शिखर. मोहिमेचा संपूर्ण खर्च एक कंपनी करणार आहे. मग हौसाआजीनं स्थळाचं सांगितलं. काही हुंडा बिंडा घेणार नाहीत म्हणजे बघ ना."

    "आणि त्या मोहिमेसाठी जायचं कधी होतं?"

    "आज फोन करून त्यांना पक्कं सांगायचं होतं. मोहीम वीस दिवसानंतर सुरू होणार पण त्याच्या तयारीसाठी उद्याच निघावं लागणार होतं. नंतर तीन महिन्यानंतरच परतणार."

    "आणि मला न सांगता स्वतःचं स्वतः ठरवलं नाय जायचं म्हणून? मोठी झाली रखमाई माझी. मग खरंच लग्न करतोय ते बरोबरच म्हणायचं."

    "हूं...." रखमाई खाली पाहत म्हणाली.

    "काय गं येडी पोरगी तू.... लग्नाचा खर्च वाचतूय म्हणून तुझं लगीन करायचं होय." 

    रुक्मिणीनं ज्ञानबाला घट्ट मिठी मारली आणि मुसमुसून रडू लागली.

    "आणि आप्पा एक सांगू.. मी घाबरत नाय पण ते शिखर पार करण्याच्या प्रयत्नात बऱ्याच गिर्यारोहकांचा जीवही गेलाय. माझं तसं काही झालं तर तू कसा राहशील. सगळे पाहुणे, हौसामावशी, आजी आजोबा तुला नावं ठेवतील.. अगदी आयुष्यभर.. ते पण एक कारण होतं न जाण्याचं."

    ज्ञानबाची तिच्या भोवतीची मिठी अजून घट्ट झाली. हे त्याच्या कल्पितातही नव्हतं. पण त्याच्या काळजाचा तुकडा कधी जगात नसेल असा कधी विचारही मनात आला नव्हता. समोर तो भैरोबाचा डोंगर दिसला आणि त्यावर नाचणारी छोटी रखमाईदेखील. मन घट्ट करून एका निर्धाराने तो बोलला.

    "रखमाई... तुला माहितीय.. वारीतल्या वारकऱ्यांची इच्छा काय असती? एक तर त्या इठोबा रखमाईचं दर्शन व्हावं नायतर मरण यावं तर वारीच्या वाटेवर. तुला इठोबा डोंगराव दिसतो. आणि तसं काय वाईट झालंच तर मी म्हणन संसारातलं रोजचं मराण मरण्यापेक्षा माझी रखमाई फक्त जगली."

    "आप्पा..... " रखमाईला आपल्या बापाची उंची क्षणभर एव्हरेस्टपेक्षा मोठी वाटली. ज्ञानबाने डोळे पुसले.

    "बर चल.. आवरायला घे.. त्यांना फोन करून येतेय म्हणून सांग. मी पावण्यांना काय सांगायचं ते सांगतो आणि आमच्या स्टेशनवरच्या एजंटकडनं उद्याचं तिकिट काढून आलो. आणि अगं तुला खायला करायला हवं. चिवडा करू?"

    "आप्पा आता काय मी शाळेच्या सहलीला जाणार हाय काय? चिवडा बिवडा करायला." दोन चार दिवसांनंतर रुक्मिणीच्या चेहऱ्यावर सुंदरसं हसू उमटलं. आणि आप्पा देखील हसू लागला.

    ************

    ज्ञानबा रुक्मिणीला ट्रेनमधे बसवून आला. काल कितीही निर्धाराने बोलला असला तरी रखमाई डोळ्याआड होताच पुन्हा डोळे पाणावले. घरी पोहचणार इतक्यात हौसामावशी रागानं लालबुंद होऊन वाटेत उभीच होती. रखमाईला सोडलं पण आता कडकलक्ष्मीला तोंड देणं भाग होतं. महादेवरावांनी ज्ञानबाच्या कार्यक्रम कॅन्सल करण्याबद्दल तिला सांगितलंच होतं. ती खूप तणतणत बोलली. अगदी जीवाला लागण्याजोगं. ज्ञानबा मात्र कळवळून एकच वाक्य बोलू शकला.

    "मावशे.. भैरोबच्या डोंगरापलीकडं पाहण्याचा हट्ट करणारी माझी रखमाई आता त्या आपली नजर पोहचणार नाही एवढ्या उंचीवरणं सगळं जग पाहणार हाय. अगं. लगीन काय होईल गं.. भेटंल तिला असाच एखादा.. डोंगर आवडणारा विठोबा."
    
 ********** समाप्त ***********

©विशाल पोतदार
    
    

No comments:

Post a Comment