.post img {

Automatic Size

Sunday 18 April 2021

संगीत एकच प्याला- नव्या पिढीने केलेलं जतन

#विशालाक्षर
#संगीत_एकच_प्याला
#cinemagully

लेखन- राम गणेश गडकरी
निर्मिती - रंगशारदा 
दिग्दर्शन - विजय गोखले 
संगीत मार्गदर्शन - अरविंद पिळगांवकर
तबला - सुहास चितळे
हार्मोनिअम - केदार भागवत
मुख्य कलाकार - संग्राम समेळ, अंशुमन विचारे, शुभांगी भुजबळ, संपदा माने, शुभम जोशी

काल, दूरदर्शनने सादरीकरण केलेल्या 'संगीत-एकच प्याला' ह्या नाटकाचं सर्वात तरुण रूप पाहिलं. सर्वात तरुण यासाठी, की हे रा.ग. गडकरींनी १९१७ मधे लिहिलं असलं तरी बालगंधर्वांपासून सुरुवात झालेलं सादरीकरण प्रत्येक पिढीतल्या मातब्बर नटांनी पेललं आहे. एखाद्या पदार्थाची रेसीपी पिढी दर पिढी हस्तांतरित केली जावी आणि त्याची चव अगदी तशीच जपली जावी हेच एकच प्यालाच्या बाबतीत घडले आहे.

गडकरींच्या लेखनशैली विषयी काय आणि किती बोलावं? शिर्षकातच त्यांनी अर्धं युद्ध जिंकलं. 'एकच प्याला'.. नक्की किती पिणं म्हणजे वाईट? एकच प्याला.. मग तो पहिला प्याला की शेवटचा? पहिल्या प्याल्यापासून सुरुवात होते पण व्यसन लागतं ते फुल्ल बेहोष होण्यासाठी अजून 'एकच' म्हणत रिचवल्या जाणाऱ्या कित्येक प्याल्यांचे. 

तसं पाहिलं तर, कथाबीज अत्यंत सोपं आहे. एक बुद्धिमान आणि रुबाबदार सुधाकर, तळीरामाच्या संगतीमुळे दारूच्या व्यसनी जाऊन संसाराची वाताहत करून घेतो. पण गडकरींनी या दुःखद वाटणाऱ्या विषयाची हाताळणी विनोद, मार्मिक व गंभीर जीवनसत्य अशा मार्गाने केल्याने नाटकात आपण गुंतून राहतो. गडकरींनी बालगंधर्वांना एकदा म्हटले होते की तुम्हाला एकदातरी फाटकी लुगडी नेसायला लावीन. पण सिंधुचं पात्र स्वीकारताना बालगंधर्वांनी 'या सिंधूसाठी मी गोणपाट नेसूनही काम करायला तयार आहे' असे उद्गार काढले. हे खरे कलाकार आणि त्यांचं समर्पण.!!

तर आता आपल्या तरुण प्रयोगाकडे येऊ. संग्राम समेळ यांनी साकारलेला सुधाकर जागेपणी जितका रुबाबदार आणि तितकाच दारूच्या नशेत बेहोष होत जातो. दारू पिल्याचा अभिनय, दारू सोडुन नोकरी मागण्याची लाचारी असो, की सिंधूप्रती कधी रागीट कधी प्रेमळ मन ह्या तिन्ही रुपरेषेतले तरल बदल ते आपल्या अभिनयात उत्तम साकारतात. तळीराम हे पात्र खूप अंशी, वाईट गोष्टीना आपल्या सोयीनुसार सहजरीत्या योग्य वर्गीकरणात आणणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं. अंशुमन विचारे यांच्या अभिनयातील तळीराम, आपल्या मनात कधी हसू तर कधी द्वेष आणतो. एकेकाळी शरद तळवलकर यांच्यासारख्या सहज संवादफेक करणाऱ्या अभिनेत्याने साकारलेल्या या पात्राला अंशुमन दादांनी चार चांद लावले. 

आता येतं, कधीकाळी बालगंधर्वांनी पांघरलेलं सिंधुचं पात्र..! त्यावेळी स्त्रियांना अभिनय करण्यास मज्जाव असल्यामुळे या जादूगाराने स्त्रीची स्टेजवरची कमतरता भरून काढली होती. पण आज स्त्रिया नाटक सिनेमा करू शकतात. सिंधु सादर करणाऱ्या अभिनेत्रीवर किती दडपण असेल हे जाणू शकतो. त्यात त्यांच्या संवादात शास्त्रीय गायनात पदे देखील आहेत म्हटल्यावर ती कलाकार गायन आणि अभिनयाची सांगड असणारी हवी. संपदा माने यांनी सिंधू अक्षरशः जीव ओतून साकारली आहे. मला संपदाजी 'सूर नवा ध्यास नवा' या स्पर्धात्मक कार्यक्रमामुळे 'उगवत्या गायिका' म्हणून माहीत होत्या. पण इथे सिंधुची हुरहूर, व्यथा, सुधाकर दारू सोडेल ही आशा, अंतिम दुःखाने आलेली उदास शांतता, हे इतकं सहज आत्मसात केलं आहे की गायन आणि अभिनय अशी दुधारी तलवार सफाईने हाताळल्यासारखं आहे.

संगीत नाटकात प्रसंगानुरूप शास्त्रीय गायनाची पदं येतात. बालगंधर्वांच्या काळात नाटकं रात्र रात्र चालत असल्याने ही पदे वीस पंचवीस मिनिटांची असायची. पण आताचा बदललेला प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन या प्रयोगात दिग्दर्शक विजय गोखले यांनी अगदी न जाणवावे असे बदल करून ते सव्वा दोन तासात बसवले आहे. 

संपदा माने आणि शुभम जोशी यांचं गायन अगदी मंत्रमुग्ध करणारं आहे. शास्त्रीय संगीताच्या बैठकीत गायकास सूर पकडण्यासाठी एक वेळ मिळतो, ठेहराव असतो. पण संगीत नाटकात प्रसंग सादर करून लगेच सुरांवर उतरत ते पदही गावं लागतं. संपदा माने या कसोटीवर अगदी खऱ्या उतरल्या आहेत. पाण्याप्रमाणे प्रसंगानुरूप त्यांचा आवाज रंग बदलतो. अंगाई गाताना थोडासा खोल आणि हळुवार आवाज तर आनंदी प्रसंगी वरच्या पट्टीत जाणारी तान... वाह..! पुन्हा पुन्हा अनुभवावं असंच काहीसं..!!

संगीत नाटक, शास्त्रीय संगीत जपलं जातंय ही गोष्ट माझ्या रसिक मनाला सुखावून गेली. आपणही जरूर पहा. हे नाटक youtube वर आहे.

©विशाल पोतदार

https://www.facebook.com/1144393408943363/posts/3865969286785748/

http://vishalwords.blogspot.com/2021/04/blog-post.html

No comments:

Post a Comment