.post img {

Automatic Size

Sunday, 27 June 2021

दम लगा के हैशा - चित्रपट रसग्रहण

#cinemagully
#दम_लगा_के_हैशा
#यशराज_फिल्म्स

हल्ली चित्रपटांच्या विविधांगी बाजुंनी लिहिलेली रसग्रहण वाचनात येऊ लागल्याने एक वेगळाच phenomenon घडायला लागलाय. जे चित्रपट आपण 4-5-10 वर्षांपूर्वी निव्वळ करमणूक म्हणून पाहिले होते, ते आता पाहताना त्यात दडलेले तात्विक अर्थ, सृजनाचे पैलू नव्याने दिसू लागले आहेत.

'दम लगा के हैशा' च्या बाबतीतही अगदी असंच घडलं. राष्ट्रीय पुरस्कार विजेता म्हणून हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी पाहिला, तेव्हा विनोदी आणि सहानुभूतीच्या पैलूमुळे आवडला होता. काल तो पुन्हा बायकोसोबत पाहिला आणि खूप नवीन आयाम माझ्यापुढे उघडले गेले.

पूर्णतः प्रायोगिक वर्गीकरणात येत नसताना सुद्धा तो खूप काही वेगळेपण देऊन जातो. आयुष्यातला जोडीदार समाजात आपली मान उंचावणाऱ्यापैकी असावा ही अपेक्षा, व त्यामुळे तयार झालेल्या गूळगुळीत अपेक्षांचे धारदार कोपरे यांवर खूप प्रभावाने भाष्य करतो. 

नव्वदीतला सेटअप असणारी कथा. घरच्यांच्या दबावामुळे प्रेमला जेव्हा अंगापिंडाने जाड असणाऱ्या संध्याशी लग्न करावे लागते त्यानंतर त्याचं आयुष्य वाळवंटातल्या भेगाळल्या जमिनीसारखं होऊन जातं. सदैव चित्रपटातील गाणी कॅसेटमध्ये भरत त्याच जगात हरवलेल्या 'प्रेम'ला साहजिकच बायको अगदी सुंदर, कमनीय बांध्याची हवीय, जिच्यासोबत नुसती एक फेरी मारली तरी चार पाच जळजळीत मत्सराने भरलेल्या नजरा त्यांच्यावर पडाव्यात, अशी चुकीची असली तरी सर्वमान्य अपेक्षा असतेच. या कुठल्याच मापदंडात न बसणाऱ्या संध्यासोबत लग्न झाल्यावर त्याला आयुष्य हेच नरक वाटू लागतं. इतकंच नव्हे तिच्या बाजूला झोपणं, तिला स्पर्श करणेही त्याला किळसवाने वाटू लागते. त्याच्या नजरेतलं अंतर पाहताना दाटून आलेली संध्या आपल्याला हळवं करते. संध्याचं पात्र न्यूनगंड बाळगणारे नाहीये. उलट ती परिस्थितीला प्रत्युत्तर करणारी आहे. नवऱ्याला आपण आवडत नाही तर उगीच आयुष्य रेटत बसणारी संध्या न दाखवता लेखकाने तिला एक कणखर छटा दिली आहे. त्याच्या मित्रांपुढे तिला तो 'मोटी सांड' म्हणतो तेव्हा ती त्याच्या कानशिलात लगावते, सासर सोडून जाताना तेवढ्याच रागाने पण अदबीने त्याच्या कुटुंबाला म्हणते की 'मुझे तो उसपर नही आप लोगो पे गुस्सा आता आता है, की आपने अपने बेटे को पढाया लिखाया नही.' फक्त तिच्या जाडपणावर चित्रपट न तोलता संध्याच्या हुशार, समजूतदार, प्रेमाला आसुसलेल्या, स्पष्टवक्ती आणि रागीट अशा छटा दाखवल्याने ती अधिक आवडणारी होते. प्रेमचं पात्र सुरुवातीला संध्याला नाकारल्यामुळे आपल्यालाही नावडते होत जाते. जेव्हा तो पुन्हा दहावीची परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करतो, आणि नापास होतो त्यावेळी त्याचेही दुःख संध्याइतके मोठे वाटू लागते. कुठल्याही दोन यशस्वी व्यक्तींपेक्षा अयशस्वी, हरलेल्या व्यक्ती जास्त जवळ येतात. सुखापेक्षा कधीकधी दुःख आपल्याला जास्त जवळ आणतं. तसंच काहीसं या दोघांच्या बाबतीत होतं. आपण दहावीचा एकाही विषयात पास होऊ शकत नाही, तेव्हा कदाचित त्याला बीएड पास होऊन शारीरिक बेढबपणामुळे कमीपणा येणाऱ्या बायकोशी कुठेतरी relate होऊ लागते. तेव्हाच एक मला खुप प्रभावी वाटलेला scene आहे. इथे दिग्दर्शक शरत कटारियांचे मला खूप कौतुक वाटले. "एका खोलीची बाहेरची बाजू. तिच्या काटकोनातील दोन भिंतीकडच्या बाजू, दोन स्वतंत्र सेट असल्यासारख्या आहेत. एका बाजूस परीक्षेत काही लिहू न शकल्याने हार मानून हताश बसलेला प्रेम, आणि दुसऱ्या बाजूस तेवढीच दुःखी होऊन बसलेली संध्या. प्रेक्षकाला दोघेही दिसतात पण त्या दोघांना एकदुसरे दिसत नाहीत. त्यांना एकमेकांचं मुसमुसने ऐकून दुसऱ्या बाजूच्या आपल्या साथीदाराची जाणीव होते. तिथे कदाचित असे सुचवायचे असेल की त्यांचं जीवन समांतर नसून त्या दोन भिंतींसारखं ते कुठल्यातरी कोपऱ्यात जरूर भेटते. तो उठून तिच्या शेजारी जाऊन बसतो. आणि तिथून त्यांच्या नात्याला खरी सुरुवात होते." (दिग्दर्शकाला हेच अभिप्रेत असेल असेही नाही, पण मला हा अर्थ उमगला.)

या चित्रपटात तांत्रिक बाबी अतिशय उत्तम वठवल्याने कसर काहीच राहिली नाही. हरिद्वारच्या निमुळत्या गल्ल्या नव्वदीतल्या सेटअपला अधिक ठळक करतात. आजपर्यंत मी संगीतकार अनु मलिक म्हटलं की नाक मुरडायचो. पण मोह मोह के धागे या गीतासाठी त्याला संगीतातले आजपर्यंतचे आणि इथून पुढचे सर्व गुन्हे माफ असतील. Jokes apart, पण हे गाणं इतकं सुंदर कंपोज केलेलं आहे, मोनाली ठाकूर, papon यांचा वेगळा पोत असणारा आवाज निवडला आहे की क्या केहने..!! यावर वेगळा लेख लिहावा! 

आयुषमान आणि भूमी पेडणेकर या जोडीने प्रेम-संध्याची जुगलबंदी जिवंत केलीय. त्यांच्यासम तेच असं वाटावं. सहाय्यक भूमिकाही संजय मिश्रा, शिबा चढ्ढा, अलका अमीन यांनी कुठेच ढिल्या सोडल्या नाहीत. रेसमध्ये भाग घेण्यासाठी प्रेमच्या आईच्या भूमिकेत असणाऱ्या अलका अमीन, प्रेम नाही म्हणत असताना, "तू भागेगो..तू... भागेगो.. " हे जेव्हा ठणकावून सांगतात तेव्हाचा त्यांचा आवेशच वेगळा असतो. अशा एकेका सीन्स मधून ही पात्रं उठून दिसतात.

चित्रपटाच्या शेवटी एक 'दम लगा के हैशा' नावाची रेस दाखवली गेलीय. ज्यामध्ये नवऱ्याने बायकोला पाठीवर पेलून ती रेस पूर्ण करायची आहे. काहीशी unrealistic असली तरी ती क्लायमॅक्स सिक्वेलमध्ये जान ओतते. मला ती थोडी प्रतिकात्मक वाटली. आपल्याला नेहमी नवरा कुटुंबाला पाठीशी घेत जणू जीवनातल्या विविध अपेक्षा पूर्ण करताना दिसतो. पण खरं तर बायकोही त्या संसाराच्या शर्यतीत त्याच्या बरोबरीने उभी असते. ती त्याच्या पाठीवर असली म्हणून डिपेंडंट नसते. ती त्याला गाईड करते, पुढचा रस्ता सांगते. काही कुटुंबात पुरुषाच्या ठिकाणी स्त्री सगळं पेलत असते. परंतु एकमेकांविषयी आदर,प्रेम विकसित झाल्यावर मात्र संसाराचं ओझं राहतच नाही. तिच्याकडून प्रेमाचे दोन शब्द आल्यावर मात्र तो शर्यतीत जिंकण्यासाठी धावत नाही तर तिला खऱ्या अर्थाने मिरवण्यासाठी धावतो. ते मिरवणे रंग रूप, गुण-दोषांपलीकडे जाऊन प्रेमाचं जिव्हाळ्याचे असते. शर्यत संपली तरी तो तिला पाठीवर घेऊन धावतच राहतो. उशिरा का होईना प्रेमाची झाल्यावर आधी जाड वाटत असलेली बायकोही पिसाहून हलकी वाटते. तो धावत राहतो, ती हसत असते. दोघेही एकमेकांत वेडे होतात आणि इथे मला खूप भरून आलं........!!

©विशाल पोतदार

टीप- हा चित्रपट अमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment