.post img {

Automatic Size

Saturday 9 October 2021

नवरात्री कथा - करडे प्रेम

#विशालाक्षर
#नवरात्र_कथा
#करडे_प्रेम

श्रद्धा आपल्या मैत्रिणीबरोबर मिलन दुकानासमोर आली. आज नवऱ्याच्या दुकानातून हक्काने दोन तरी साड्या घेणारच होती. नवऱ्याचे दुकान म्हणजे तो तिथे सेल्स सुपरवायजर होता. तो जॉईन झाला त्यावेळी साधं असणारे दुकान आता मोठे दोन मजली शोरूम झाले होते. आणि तोही या पाच वर्षात सेल्समनपासून सुपरवायजर झाला होता. ती दिमाखात आत आली. कॅश काउंटरवर बसलेल्या शेठजींनी तिला ओळखलं आणि हसून संतोष वरच्या मजल्यावर असल्याचे सांगितले. त्या दोघी जिना चढून वर पोहचल्या, इतक्यात तिने पाठमोऱ्या संतोषला पाहिले. साडीची डिझाइन कशी दिसेल याच्या प्रात्यक्षिकासाठी शर्ट-पॅन्टवरच साडी नेसून कस्टमरला दखवत होता. एक हात बायकांप्रमाणे साईडला करून उभा होता. त्याला पाहून श्रद्धा तिथेच स्तब्ध झाली. काही करावे सुचेना. मैत्रिणीला घेऊन तशीच शरमेने बाहेर पडली. मैत्रीण खूप समजावत होती. "त्यात काय हे त्याचं काम आहे. आणि तुही साडी घ्यायला जाताना कित्येकदा सेल्समनला नेसून दाखवायला लावायचीस." सगळं उमजूनही तिचं मन थाऱ्यावर येत नव्हतं. सुपरवायजर असताना आता त्याने साडी नेसून कशाला दाखवायची? घरी आली पण तिच्यासमोर सतत नवऱ्याचं साडीमधलं चित्र समोर उभा रहायचं. मन अगदी उसवल्यासारखे वागत होतं. 

ती त्याला पाहून पटकन परतली, हे त्यानेही ताडले होते. शिवाय शेठजीही त्याला या गोष्टीबद्दल बोलले. त्यालाही खूप राग आला पण घरी आल्यावर तोही काही बोलला नाही. जॉब सुरू केला तेव्हा मित्र चिडवायचेच आणि आता बायकोलाही त्यात अभिमान वाटावा असं काय होतं म्हणा. त्यादिवशी पासून दोघांचा रोजचा मोजका संवाद होत असला तरी मनाच्या पाठीमागे एक अदृश्य द्वंद्व चालू होतं. तिच्या ओठांवर कित्येकदा शब्द येऊन परतत होते. साठून साठून ते अजून जड होत होते. लग्नाला तरी तीनच महिने झालेले त्यामुळे दोघांनाही आपलं बोलणं कितपर्यंत पचेल हेही कळत नव्हते. पण तिला मात्र राहून राहून वाईट वाटायचं. आपण याला होकार देऊन चुकलो का? अजून काही चांगल्या जॉबवाल्या मुलांची स्थळ आली असती. पण आता हा विचार करून काय उपयोग. तो मनाने तरी समजूतदार आहेच की. सर्व सर्व विचार करूनही शेवटचा रिझल्ट तिचं उदास मन हाच असायचा. संतोषलाही काय करावं कळेना. तोही तसाच अभिमानी होता. त्याचं काम योग्यच आहे हे त्याचं ठाम मत असल्याने तिने ते समजून घ्यावे या मतावर ठाम होता. ती कधीतरी समजेल या प्रतीक्षेत तोही शांत शांत होता.

दहा बारा दिवस असेच विवंचनेत आणि दोघांमधील ऑकवर्ड सायलेन्समध्ये गेले. एके दिवशी ऑफिसच्या पायऱ्यांवरून उतरताना तिचा पाय घसरला. डोकं आपटता आपटता वाचले पण डावा हात फ्रॅक्चर. घरी तर दोघेच आणि ही अशी एका हाताची...दुष्काळात तेरावा महिना.. सगळं अवघड होऊन बसलं. धुण्याभांड्याला बाई लावली. जेवण संतोष बनवायचा. डबा बनवून सॅकमध्ये ठेऊन द्यायचा. ती ऑफिसला जाताना मनातल्या मनातच त्याचे आभार मानायची.

फर्ममध्ये ती अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. ऑफिसमध्ये तिला साहेबांनी फ्रॅक्चर काढेपर्यंत येऊन नको म्हणून बजावलं होतं. पण घरी बसले की तिच्या मनात पुन्हा काहीबाही विचारचक्र सुरू व्हायचं. कधीकधी सगळ्या पाहुण्यांपुढे तो साडी नेसून दाखवतोय असा भास व्हायचा. तिला ते का खटकतंय तेही कळत नव्हतं. त्यापेक्षा ती ऑफिसमध्ये जाऊन एक हाताने जमेल ती कामे करायची.

इतक्यात नवरात्रीचा माहोल सुरू झाला. ऑफिसमध्ये तर नवरात्रीच्या रंगांची धमाल चालली होती. विरुद्ध टोकाच्या स्वभावाची माणसेदेखील किमान कपड्याच्या रंगाबाबतीत एकविचारी वागत होती. मग कुणी स्वीटस आणायचे कुणी समोसे, कुणी रांगोळी काढायचे.. आल्या आल्या सेल्फीज, ग्रुप फोटोज चालू असायचे. पहिले दोन दिवस श्रद्धा पिवळा आणि हिरवा कुर्ता घालून गेली. आज करडा रंग होता. लग्नाच्या काही दिवसआधी मॉल मधून घेतलेली कॉटनची ग्रे साडीची आठवण झाली. डार्क ग्रे काठावर पांढऱ्या रंगाची हत्तींची नक्षी होती. पदरावर काळ्या रंगांचे चेक्स होते. कॉटन अगदी सॉफ्ट असल्याने अंगाबरोबर घट्ट बसेल अशी तिची कल्पना होती. घडी मोडल्यावर कळेलच कशी बसते ते!

तिने अंघोळ उरकली. गळ्यात बांधलेला हात सोडवला आणि बेडरूममध्ये आली. संतोष किचनमध्ये चपात्या लाटत होता. तिने कपाटातून साडी काढली आणि घडी मोडली. नेसायचा प्रयत्न करू लागली. पण चिमटीत निऱ्या पकडता येत नव्हत्या. थोड्या प्रयत्नातच तिला समजले की हे आपल्याला जमणार नाही. भयंकर चिडचिड होत होती. पण हा राग.. ही अस्वस्थता.. चिडचिड कशाची होती? साडी नेसता येत नाही याची? की इतक्या दिवसातल्या अस्वस्थ शांततेची? त्याला हा जॉब सोडायला लावावा का? पण त्याने का सोडावा?  सगळं व्यवस्थित असूनही तिचं मन रडत होतं. तिला तिच्या प्रेमळ नवऱ्याबद्दल माणूस म्हणून जिव्हाळा वाटायचा पण पुन्हा साडी नेसलेली मुद्रा आठवली की कमीपणा वाटायचा. आता मात्र तिला राहवलं नाही. किचनच्या दाराकडे साडी फेकली आणि रडू लागली. 

तिचं मुसमुसने ऐकून त्याचं काळीज पाघळू लागले. काहीही झाले तरी ती 'त्याची' होती. त्याने साडी उचलली आणि बेडरूममध्ये आला. ती फक्त स्लिव्हलेस ब्लॉउज आणि परकरमध्ये बेडवर बसली होती. तो आल्यावर तिने लाजून अंग चोरले. त्याने तिला उभे राहायला खुणावले. साडी परकरमध्ये खोचली. रेखीव अशा निऱ्या केल्या बनवल्या. साडी नेसवता नेसवता तो कधी आई, कधी मोठी बहीण तर कधी मैत्रीण भासत होता. साडीनेही स्वतःला त्या सराईत हातांच्या स्वाधीन केले होते. नकळत होणारा त्याचा स्पर्श श्रद्धाला सुखावत होता. ती कपाटाच्या आरशासमोरच उभी होती. साडी नेसवून त्याने पदर खांद्यावर दिला. तिच्या पाठीमागे येऊन आरशातल्या तिला न्याहाळत थांबला. नक्षत्रही फिकं पडावं. करड्या रंगालाही झळाळी मिळावी इतकी ती सुंदर दिसत होती. 

त्याच्या नजरेने ती लाजली. नात्याची घडी उलगडत होती. तिचा ऊर प्रेमानं काठोकाठ भरला. करडा रंग.. ना पांढरा ना काळा.. तुझ्या माझ्या एक होण्याचा रंग.. ती मागे वळली आणि तिला न्याहाळणाऱ्या त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला. तोही हसला. ती त्याच्या मिठीत अलगद शिरली आणि पुन्हा रडू लागली. अपेक्षांच्या काळ्या पांढऱ्या काळ्या रंगांना प्रेम ओलांडत होतं. प्रेम ग्रे होत होतं.

◆● समाप्त ●◆

©विशालाक्षर- विशाल पोतदार

टीप - कथेचे हक्क लेखकाअधीन आहेत. नावासहित शेअर करण्यास काही हरकत नाही.

No comments:

Post a Comment