.post img {

Automatic Size

Tuesday, 28 July 2026

कणादच्या बाबाची डायरी - जुलै २०२६ पासून

२६ जुलै २०२६) 
आज तुझा bday आहे बाळा.! तुला खूप शहाणपण, आनंद, समाधान आणि यश मिळो. तू आयुष्यात हेच शिक, तेच शिक असा आमचा कुठलाही दबाव नाही. पण कुठल्याही एका शिक्षणात, कलेत, खेळात इतकं मनापासून काम कर की तुला त्याचे समाधान लाभत राहो. 

आई आणि बाबाकडून खूप खूप प्रेम!!❤️🎈📚🖌️🖋️☀️

मी तुला सांगितले की मी केक घेऊन येतो. तेव्हा म्हणालास, "नुसता बाबा नाही जाणार.. कणाद आणि बाबा जाणार."

मग आपण दोघे गेलो. तो केक घेतल्या घेतल्या तुझ्या डोळ्यात असणारा आनंद अवर्णनीय होता. ३ वाजता केक आणला. आणि फ्रीजमध्ये ठेवला. तेव्हापासून मला सारखे विचारत होतास की happy bday पाहिजे खायला. मी म्हणायचो की अरे सगळे आल्यावर तू कट करणार मग आपण खाणार. तर या दोन तासात तू 10 वेळा रुसून बसलेला आहेस. आणि दोन वेळा फ्रीज मधून बाहेर काढून बॉक्स फोडायचा प्रयत्न केलास.😀

२८ जुलै २०२६)

 हा तुझ्या शाळेतून पाठवलेला फोटो. तुला मुले रांगेत बसतात तसे बसायला आवडत नाही. सकाळीच म्हणत होता की बाबा मला शाळेत बसायचं नाही. उभे राहायचेय..😀

१६ ऑगस्ट २०२६)
आज तुला पहिल्यांदा तुझी स्पंदने feel करायला सांगितली. 
"कणाद हे बघ.. छातीवर हात ठेव. कसं धडधड वाजतेय."
तू छातीवर हात ठेवलास आणि खुश होऊन म्हणालास "बाबा वाजतंय आत. काय आहे आत?" 
मी म्हटलं, "हृदय"
"हृदय..? तुला पण आहे?"
म्हटलं, "हो..सगळ्यांना असतं.! मग माझी आणि आईची दोघांची स्पंदने ऐकलीस." 
कालपासून दोन-तीनदा हात लावून म्हणालास..."बाबा.. हृदय वाजतेय."

By the way.. तुझं हृदय खूप प्रेमळ आहे!❤️


१७ ऑगस्ट)
तू ड ऐवजी र म्हणतोस. 
चल फुरं.. 
मी ररलो..

१८ ऑगस्ट)
२-३ दिवस झाले घरी सारखा जन-गण-मन म्हणतोयस..तेही continuous😀
त्यात भारत भाग्य विधाता ऐवजी बालक भाग्य विधाता म्हणतोस.

आणि मागच्या आठवड्यापासून पाऊस आला धो-धो-धो.. पाणी वाहिले सो-सो-सो.. ही कविता म्हणतोयस. तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात पाहिले तर ती जुलै च्या अभ्यासक्रमात. तू म्हटलेली पहिली कविता आहे ही.

०१ ऑगस्ट)
कधी कधी रोबोट च्या टोन मध्ये बोलतोस.. बा-बा- काय-- करतो-स--

सकाळी मी ऑफिसला जाताना रोबोटच्या टोनमधेच बाय.. सी यू.. आय ल्यू..म्हटलास.. मी म्हटलं मला रोबोट नाही कणाद पाहिजे.. हे कोण बोलतोय... तू म्हटलास रोबोट कणाद..(तेही रोबोट टोन मध्ये..)😀
मी म्हटलं नुसता कणाद पाहिजे मला... मग नॉर्मल टोन मध्ये म्हटलास मी नुसता कणादच आहे..😀😍

०२ सप्टेंबर)
सध्या एक पपेट स्पर्धा होती. त्यात एका ग्रुपमध्ये तुझंही नाव दिले होते. पण प्रॅक्टिस घेतल्यावर कळले की तुला त्यात इतका रस नाही. मग म्हणताना टाळाटाळ केली करत होतास. मग तुझे नाव काढून वेदूचे दिले. तुझ्यावर कुठलाच असा इच्छा नसताना लोड देऊ वाटत नाही आम्हाला.!

०८ सप्टेंबर)
तुझे प्रश्न..  ज्याची उत्तरे देणे अवघड आहे..

मी - कणाद.. तुझी आठवण येत होती..
तू - कशी?

तू - (साकेतच्या आईला) साकेत कुठाय?
साकेतची आई- झोपलाय तो..
तू - का??
काकी- झोप आली म्हणून झोपला..
तू - कशी?

१५ सप्टेंबर)
आज आपण गणपती देखावे पाहायला गेलेलो बाहेर. एक नरकासुराचा देखावा होता. आणि मोठ्ठा राक्षस होता. तो पाहून रडायला लागलास. आणि आईकडून माझ्याकडे आलास.मग मी तुला सांगितले की गणपती बाप्पा त्या राक्षसाला मारून टाकतो. तू विचारलेस.."का?" 
मी म्हटलं कारण तो लहान।मुलांना घाबरवतो..
"कसं मारलं"
"बाणाने"
कसे?
मी action करून दाखवले की असे...

मग तुला समजले.

आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर गेल्या गेल्या तू म्हटलास विदुला ताई... आम्ही राक्षस पाहिला. आणि मग सगळं इथंबूत सांगितलेस त्यांना.!

१७ सप्टेंबर)
आज तुझ्या शाळेला सुट्टी आहे म्हणून मी एकटाच ऑफिसला जायला निघालो होतो. आणि तू म्हटलास बाबा..."व्यवस्थित जा ऑफिसला.. आय ल्यू बाबा.."
किती emotional वाटलं मला🥺

१९ ऑक्टोबर)
आज आईचा जॉब सुरू झाला. आपण दोघेही तिला सोडायला ऑफिसपर्यंत गेलो होतो. आल्यावर शहाण्यासारखं खूप व्यवस्थित वागलास. एकदा म्हटलास की बाबा ... आई कुठेय?

आज शाळेत पाटीपूजन होते. छान कुर्ता वगैरे घालून तुला शालेत घेऊन गेलो. आत जाताना तू म्हणालास.." बाबा.. मला सोडून आता घरी जा काम करायला. ऑफिसला नको जाऊ."

मी म्हटले की जर सरांचा कॉल आला तर जाणार ऑफिसला ok?

तर तू म्हटलास की सरांचा कॉल कट करशील का तू?

**
किती गोड आग्रह असतो रे सोबत असण्याचा पिल्लू..🥺

२४ ऑक्टोबर)
आज तू खेळण्यातल्या पाईपचे काहीतरी बनवले होते. मला विचारलेस की बाबा.. इकडं बघ.. हे काय आहे?

मी म्हटलं.. बंदूक?
नाही..
ट्रॅक्टर?
नाही.. (तुझा आवाज वैतागलेला)
जिराफ?
तू- नाही (आता रडायला।लागलास)
मी - मग काय आहे? तू सांग..
तू - (रडत) नाही..... तू सांग..
मग मी म्हटलं... कुऱ्हाड?
तू - (रडतच) हो... का ओळखलं नाही तू लवकर?

तुझे शब्द आम्हाला लगेच कळावे, तू काय बनवलंस हेही आम्ही लगेच ओळखावं असं तुला वाटतं. आणि नाही ओळखता आले आम्हाला, तर मग तू रडतोस..

(चिकू तुझी खूप छान मैत्रीण झाली आहे)







Saturday, 3 January 2026

कणादच्या बाबाची डायरी ५ - २०२६


०१ जानेवारी २०२६)

Happy New Year कणूल्या...

आता तुझी नवीन फेज सुरू झाली आहे. सगळ्या गोष्टी स्वतःच्या हाताने/ स्वतः करायच्या. म्हणजे गाडीवर आम्ही उचलून नाही ठेवायचं, तर तुझा तू धडपडत चढून बसणार. मग त्यात 5 मिनिटे extra गेली तरी चालतील. गाडीवर बसलो की चावी तुला लावायची आणि चावी फिरवायची (तीही लवकर फिरत नाही) आणि मग स्टार्टर दाबायचा. चप्पल स्वतः घालायची. चप्पल घालताना हात न लावता तुला घालायची असते मग त्यात अजून वेळ लागतो. चुकून तू करण्याअशी आम्ही या गोष्टी केल्या तर मग जाम चिडतोस. कधीकधी तू रडत चिडत असलास तरी आम्हाला आमच्या कळत नसतं की नक्की तुला कसं हवं होतं. मग ते जाणून घ्या घ्यायला दमछाक होते. ही फेज थोडी कठीण वाटतेय,  पण आई-तू-मी आपण एकत्र पार करू..❤️

०२ जानेवारी) 
काल आपण अक्षरनंदन शाळेच्या प्रोसेससाठी गेलो होतो. ऋग्वेदही होता. खूप मज्जा केली नंतर आपण.! ऋग्वेद त्यांच्या गाडीवर बसून जातो तेव्हा तू वेदू पाहिजे आणि म्हणून रडतोस. मग सारखं सांगावं लागतं की ते बघ त्यांची समोर गाडी आहे.😀

०३ जानेवारी)
आज तू उठलास तेव्हा मी हॉल मध्ये होतो. तू खूप गोड हाक मारलीस... "बाबा?" मी ओ दिल्यावर म्हटलास "यं.."
किती प्रेमाने बोलावतोस रे!!❤️🦋

०७ जानेवारी)
तुझे ऍडमिशन अक्षरनंदनमध्ये करण्याची प्रोसेस चालू आहे. खूप उत्तम आणि नामांकित मराठी शाळा आहे. आम्ही दोघांनी विचारपूर्वक ठरवलेय की तुला मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करावे. पुढे आयुष्यात यश आले मिळणे आपल्या तिघांच्याही हातात आहे. आपण मज्जा करत शिकू. 

आज त्या शाळेची ग्रुप चर्चा झाली. तुला नेहा मावशीकडे ठेऊन आम्ही शाळेत गेलो. आम्ही दोघांनीही त्यात छान उत्तरं दिली. मनात इतकं दडपण होतं ना रे!! कारण आमच्या विचार तसेच बोलण्यावर तुझं ऍडमिशन अवलंबून आहे. तुझं भविष्य अवलंबून आहे. हे मनात आल्यावर खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली.


०९ जानेवारी)
कणाद..आपली मुल निरीक्षण साठी निवड झाली आहे. १२ तारखेला आपण तिघेही शाळेत जाणार.!

१२) आज आपण मूल निरीक्षण साठी अक्षरनंदन मध्ये आलो होतो. आजही खूप दडपण होते. पण मनात विचार केला की तुझ्यासाठी योग्य असेल तेच होईल. ही शाळा तुझ्यायोग्य असेल तर मिळेलच ऍडमिशन. 

छोट्या गटाच्या वर्गात आपल्याला सोडले. एकाच पालकाला आत थांबायची परवानगी होती. मग मी तुझ्यासोबत थांबलो. आधी ब्लॉक्सची गेम खेळलो. तिथल्या ताई तुला ब्लॉक असे लावू शकतो का, तसे लावू शकतो का यासाठी गाईड करत होत्या. तुही छान लावत होतास. लागत नसेल तर चिडत नव्हतास. 

त्यानंतर त्यांनी पाटीवर त्या ब्लॉक्सच्या घरासारखा आयत काढायला सांगितला. आधी तू नाहीच म्हणत होतास.पण थोड्यावेळाने तयार झालास आणि त्यांनी काढलेल्या आयताच्या बाजूला तुही आयत काढलास. त्याच्या पलीकडच्या बाजूलाही आयत काढायचा प्रयत्न केलास पण जागा कमी होती. पण त्यांच्या drawing मध्ये तू न जाता लाईन वळवून घेतलीस. हे त्यांना किती आवडले माहीत नाही, पण मला खूप आवडले. Proud of you!

१३ जानेवारी)
झोपताना तुला अजूनही आईचे पोट पकडायला आवडते. पोटाला तू पॉप पॉप म्हणतोस.

१४ जानेवारी)
आज शाळेत जाताना किती रेंगाळत होतास याचे उदाहरण देतो. म्हणजे शाळेतच नाही तर खाली जाताना तसाही रेंगाळतोसच! 

बाहेर निघायच्या चप्पल कुठलं घालायचं इथून सुरुवात. पिवळ्या रंगाचे चप्पल तुटलेय म्हणून तुला म्हटले लाल वाले घाल तर तुला पिवळ्याच रंगाचे घालायचे होते. मग खूप convince केल्यावर लाल चप्पल घालायला तयार झालास. पण ते स्वतःच घालायचे होते त्यात २-४ मिनिटे गेली. 

खाली जाताना सगळ्यांच्या बेल वाजवायच्या होत्या. आता मला माहिती झालेय की कुणा कुणाच्या बेल बंद आहेत. तुला त्या बंद बेलचीच बटणे मी दाबू देतो. पहिल्या मजल्यावरून खाली उतरलो इतक्यात तू रडत वर बोट करून .. "उडी मारायची म्हणू लागला.." मग मला कळले की वरून येताना पायरीवरून उड्या मारत यायचा विसरला. मग पुन्हा दुसऱ्या मजल्यावर आलो आणि मग एकेक पायरीवरून उड्या मारत आलो.

गाडीवर बसताना मी तुला उचलून वर ठेवायचे नाही तर तुला चढून वर जायचे असते. तुझ्या उंचीपेक्षा जास्त उंच गाडीची सीट आहे. मग चढायला अजून दोन मिनिटे आणि मग चावी लावून फिरवायला एक मिनिट आणि मग मी neutral केल्यावर तू स्टार्ट करणार आणि मग आपण निघणार.

तर इतका सोहळा असतो खाली जाण्याचा. हे कदाचित कंटाळवाणे वाटेल पण खरोखर हे पाहताना मज्जा ही असते.

१५ जानेवारी)
आज सकाळी मी तुला भात खाऊ घालत होतो. मग थोड्यावेळाने तुला खेळायचं होतं. मला म्हटलास.."बास... ठेव आता.."😀

१४ फेब्रुवारी)
सध्या घरात..."हे बघ.. हे बघ.." या शब्दांचा जप चालू असतो. सध्या तू काहीही करत असलास तरी आम्हाला ते दाखवायचं असतं.. खेळण्यातली सायकल भिंतीवर चालवली.. बसून चालवायची गाडी पुढून उचलली.. बेडवरून उडी मारण्याच्या आधी.. एका तासात १०० वेळा तरी हे बघ.. ऐकू येतं..बाब हे बघ... आय हे बघ..😀

१५ फेब्रुवारी) 
काल तुला तुझ्या प्रिता मामींनी माशाचे एक खेळणे दिले. त्यात खूप मासे असतात आणि ते फिरत असतात. मग त्यांचे तोंड उघडले की प्लास्टिकचे हुक तोंडात घालून त्यांना उचलून बाजूला ठेवायचे. सुरुवातीला जमत नव्हते तेव्हा खूप चिडत होतास. रडलास पण एकदा. पण ते फिरणे थांबवून मासे उचलायचा शॉर्टकट केला नाहीस. आता खूप छान खेळू लागला आहेस.

२८ फेब्रुवारी)

आपण एकदा बाहेर फिरत असताना, आपल्याला स्टोन ब्रेकर ने एक काका रस्ता फोडत असताना दिसलेले..तुला ते खूप आवडलेले. 

आज अंघोळ करताना आपण पाईप घेतल्या होत्या खेळायला. मग त्याचा ब्रेकर सारखा आवाज काढत ब्रेक केल्याचे नाटक करत होतास

०१ मार्च )
तुझ्या आईने ही वाळू आजीच्या घरून आणली. या वाळूत ती लहान असताना खेळली होती.

०२ मार्च)
तू आणि ऋग्वेद एकत्र मोठे होताहात. आपण अधेमधे भेटतो त्यावेळी भेटल्या भेटल्या दोघे खूष असता. पण नंतर एकच खेळणं दोघांना हवं यासाठी मग भांडता.. रडता.. मोठा असल्याने mostly वेदूला ऍडजस्ट करावं लागतं.

पण नंतर तुम्ही ही भांडणे विसरून पुन्हा हातात हात घेऊन चालत असता. तुमच्यातले प्रेम वाढत राहावं. मित्र व्हावात एकमकांचे.

१८ मार्च -

आज मी आणि आई खूप खूष आहोत.. त्याचे कारण इथे नाही देऊ शकत पण खूप मोठी आचिएव्हमेंट केली आहेस तू😀

५ एप्रिल)
नाचरे मोरा गाणं म्हणत असतोस सध्या सारखं. आणि त्यातली पुढची ओळ यायला लागले लागलीय म्हणायला. आभाळात छान छान.. सात रंगी कमान..
खूप गोड म्हणतोस!

आणि लकडी की काठी काठी पे घोडा. हे पण बोबड्या आवाजात म्हणतोस!


०७ एप्रिल )
आज मै तोता.. मै तोता गाणं म्हणायचा प्रयत्न करत होतास. मिटोटा..मिटोटा.. असे शब्द म्हणत होतास..😀

तुला लिफ्ट मधून जायला खूप आवडते. तिथली बटणेही तुलाच दाबायची असतात. तुझ्या आधी दुसऱ्या कुणी दाबले की रडायला लागतोस. पण आज घरी असताना खूप creative गोष्ट केलीस. तुझ्या हातात एक मोठी रिंग होती. ती चेहऱ्यापासून खाली घेत म्हणाला लिफ्ट ने चाललोय. म्हणजे तू ती वर जाण्याची action अशीच create केलीस.😍

२० एप्रिल)
काल क्रिकेट खेळताना बॉल जोरात tv ला लागला. मी म्हटलं की टीव्ही ला बॉल लागला जोरात.. तर तू म्हणालास.." नाही लागला जोरात..स्ट्रॉंग आहे टीव्ही.."

तुला काही लागले तर आम्ही म्हणतो की नाही लागलं कणादला. स्ट्रॉंग आहे कणाद. त्याचा केलेला हा creative use.


२३ एप्रिल)
गेले काही दिवस अधूनमधून "सोकोकोकोयू~~" असं अधूनमधून ओरडत होतास. कळतच नव्हतं नक्की काय शब्द म्हणायचा आहे तुला. मग एकदा युट्यूब वर एक दिवस व्हिडिओ पाहताना तू म्हणालास सोकोकोकोयू... तेव्हा कळलं की त्या विडिओ मधले ते एक character आहे. 😀

२४ एप्रिल)
आज रात्री 10 ला मला इस्त्रीची कपडे आणायला जायचे होते. मग तुला चल म्हटलं तर म्हणालास मोठा घोडा घेऊन ते जायचं बाहेर. नको नको म्हणत असताना तू काही ऐकले नाहीस आणि मग घोडा घेऊन खाली आलो. पायाने पुढं सरकवून तुझा पाय दुखायला लागला. मग मी म्हटले तू दोन्ही पाय वर ठेऊन बस आणि हात हातात दे. मग काय.. मी चालता चालता हात पकडला आणि तुझा घोडा तुला गाडी सारखा घेऊन निघाला.

०३ मे २०२६)
एका माणसाने काल आईला रस्ता विचारला आणि तिने सांगितले कसे जायचे ते! मग तू विचारलेस आईला की काय करतेस? आई म्हणाली, काकांना रस्ता सांगितला.

तू मला येऊन सांगितलेस की , "बाबा, आई ने रस्त्याला काका सांगितला."😛

०४ मे २०२६)
हे गाणं नाहीये, पण तू मधून हे म्हणतोस..."मोटोसायकल व्रुम व्रुम.... मोटोसायकल व्रुम व्रुम.... " आणि ते ज्या लयीत म्हणतोस ते भारी वाटतं

१५ मे २०२६)
आता आपण पुण्यात नारायण पेठेत राहायला आलोय. तुझे ऍडमिशन न्या. रानडे बालक मंदिर मध्ये केलेय. वेदू सुद्धा तुझ्यासोबत असणार. घर शिफ्ट केल्यावर इतक्या पसाऱ्यात तू ऍडजस्ट केलेस. काही त्रास दिला नाहीस.

१५ जून २०२६)
१ जून पासून तुला डे केअर मध्ये सोडत होतो. सोडून जाताना रडायचास. बाबा.. ऑफिसला जाऊ नको, थांब इथे असं म्हणायचास. तेव्हा मग एके दिवशी तुला इमोशनली सांगितलं की तू रडलास ना की मग बाबाला वाईट वाटतं आणि काळजी करतो. तू बाबाला हसत हसत बाय करशील का? आणि सांगायचं तर तू खरंच जबाबदारी घेऊन बाबाला हसून बाय केलंस.!! त्या दिवसापासून रडत नाहीस.! Proud of you.☺️

१० जुलै २०२६)


१५ जुलै २०२६)
आज मी ऑफिसमधून आलो. नेहमीप्रमाणे हाय केलेस. आणि म्हणालास, "थांब बाबा.. तुला पाणी देतो." मी आणि आई आश्चर्यचकित झालो. तू किचनमध्ये पाणी आल्यावर गेलास पण पाण्याचं तुझ्या हाताला येत नव्हते. मग मीच तुला वर घेतले आजी म्हटलं दे पाणी. तू पाणी दिलेस. मी थँक्स म्हटलं आणि मग तू म्हणालास, "लॅपटॉप दे ना बाबा.." मग तुझी strategy आम्हाला कळली आणि आम्ही खूप हसलो. म्हटलं म्हणून तू मला पाणी दिलेस कणाद? मग तू म्हटलास.." म्हणून तू मला लॅपटॉप दे.."😀
आमचा कणाद strategy लावायला शिकायला लागलाय😀🙏🏼

१६ जुलै २०२६)
शाळेत जाण्यासाठी अजूनही तू काचकूच करतो आहेस. सकाळपासून माझ्या मागे भुन भुन लावली होतीस. शाळेत नाही जायचं बाबा. मी विचारायचो, का नाही जायचे बाळा? मग तू एकदा म्हटलास भीती वाटतेय. मग म्हणालास आवडत नाही मला शाळेत. एकदा म्हटलास आई आणि बाबाला बोलावलंय शाळेत बसायला..😀

नंतर म्हणालास की बाबा मांडीवर झोपायचंय मला बाबाच्या. मग मांडीवर घेऊन बसलो थोड्यावेळ. तू अजून एकदा म्हणालास की बाबा शाळेत नाही जायचे. मी काही बोललो नाही. मग तू म्हणतोस, की विचार ना का नाही जायचं तुला? तू असा दुःखी असलास की मलाही कसतरी होतं बाळा! 

नंतर मी समजवले आणि शाळेत जाताना बाय करूनच गेलास!

Tuesday, 29 July 2025

कणादच्या बाबाची डायरी - ४


२६ जुलै २०२५)

आज तुझा तिसरा वाढदिवस.! गावी खूप छान bday केला तुझा. तांमी, आजी आणि आजोबा होते. टॉमचा।फोटो लावलेला केक आणला होता खूप आवडला तुला.

कसे पटपट 3 वर्षे गेली. किती बदलतोयस तू दिवसागणिक. आता खूप गोड बोलू ही लागलायस. खूप खूप खूप जीव बाळा.!! आय ल्यू.!! खूप जीव लावलायस माझ्यावर.!!


२९ जुलै २०२५)

कणादच्या दर्शनासाठी लागलेली देवांची रांग... कोणालाही VIP पास नाही. उंचीनुसार दर्शन मिळेल..😃

त्याच्या आईने त्याला विचारले कोण कोण आहेत हे?

तर बोट दाखवून असे सांगितले..
(विठ्ठल) बाबा
(रखमाई) आई
(गणपती) बाप्पा (आधी हत्ती म्हणायचा)
(अन्नपूर्णा) दिदी
(बाळकृष्ण) बेबी

अशी नावं सांगितली.

क्षणभर मजा वाटली आणि नंतर भरूनच आलं. त्याने ज्या विश्वासाने ही ओळख करून दिली, तेवढी कोवळी, निरागस भक्ती आपल्याला कधी जमेल?

सुरुवातीला तो हे देव घेऊन खेळायचा त्यावेळी "नको कणाद, बाप्पाबरोबर नाही खेळायचं" असं आपसूक म्हणायचो. पण नंतर वाटलं की का भीती दाखवायची देवाची. देवही तितक्याच आनंदात खेळत असेल ना त्याच्याशी.


५ ऑगस्ट)

संपदाकाकी ने तुला एक कलर बुक गिफ्ट केलेय ज्यावर पाण्याने ब्रश केला की आतली चित्रे दिसतात. तुला वाटतं की तूच कलर करतोयस.

आज ते करताना आम्हाला सांगत होतास.

"बाबा.. हेक्का (खेकडा).. कलं कलं (कलर कलर)."

"ऑक्टोपस... कलं कलं (कलर कलर)."


18 ऑगस्ट)
आज तू पूर्ण नाव सांगितलंस.. कणाद विशाल पोतदार😍
आईचं नाव अवघड वाटतं म्हणून घेत नाहीस..
 
०८ सप्टेंबर २०२५)
आपल्या टीव्ही वर माझ्या गुगल फोटो मधले फोटो दिसत राहतात. मग त्यात अचानक टॉम खेळणं होतं ना त्याचा।फोटो दिसला. मग तू मागे लागलास, 'टॉम पाहिजे.. टॉम पाहिजे आणि म्हणून. मग zepto वरून मागवून दिला. आता कालपासून भरपूर टॉमशी बोलणं चालू आहे तुझं.

१० सप्टेंबर)
अशा रीतीने टॉमला आपटून आपटून तू बंद पाडलेला आहेस. 

१४ सप्टेंबर)
एक आठवडा झाले तुझी दाढ दुखत होती. रात्री झोपताना तू दाढेकडे सारखं बोट दाखवत होतास. २ दिवस खूप कमी झोपत होतास. Almost रात्रभर जागे होतो आम्ही तुझ्यासोबत. दाढ किडली आहे तुझी. मग २-३ डॉक्टर्स कडे जाऊन फायनली पूर्वा नावाच्या डॉक्टर कडून त्यात सिमेंट भरून घेतलं. घरी आल्यावर तू शांत झोपलास हे पाहण्याचं सुख वेगळंच होतं रे.!

१५ सप्टेंबर)
एकदा तू ऋग्वेद कडे जायचं म्हणत होतास, मग मी सहज म्हटले की वेदू ला जीप द्यायची का तुझी? तर तू हो म्हणालास. आता कधीही वेदूची आठवण झाली की तू वेदू जीप.. वेदू जीप असं म्हणतोस. म्हणजे वेदू जीप याचा अर्थ तुझ्या मनात 'वेदूकडे जायचं असा आहे.

२३ सप्टेंबर २०२५)
सध्या तुला स्पायडर खूप आवडतोय. त्याला तू पायबर म्हणतोस. काल सकाळी उठल्यापासून स्पायडरच दाखव म्हणून मागे लागलास. मला तर कुठे दिसत नव्हता. त्यानादाने घरातल्या जाळ्या काढल्या मी. 😀 मग आपल्याला एक स्पायडर दिसला आणि तू खूष झालास.

२४ सप्टेंबर २०२५)
आज दूध देणाऱ्या काकाने दुधाची पिशवी बाहेर ठेऊन जाताना दार वाजवले. आणि तू म्हणालास "आदोबा.... (आजोबा)..." तुला आजोबा, आजी, तांमी, सानुदीदी, वेदू या सगळ्यांची सारखी आठवण होत असतेस. वेदू सोबत असताना खेळण्यावरून भांडता खूप, पण घरी आल्यावर मग सारखं वेदू वेदू करत असतोस.

२५ सप्टेंबर २०२५)

तुझी गाडी चालवायच्या आधी फ्रीजची चावी घेऊन गाडीला लावतोस आणि मग गाडी सुरू झाल्यासारखी वाटते आणि मग गाडी चालवतोस..😀


०७ ऑक्टोबर २०२५)
आज शाळेत सोडताना खूप रडत होतास. दोन्ही डोळ्यांतून धारा लागलेल्या. तू हट्ट म्हणून रडताना आणि दुःखी-अस्वस्थ असतानाचा फरक कळतो मला. खूप अस्वस्थ वाटलास म्हणून मग पटकन सोडून जावं वाटेना. उचलून घेऊन मिठी मारली. समजून सांगितले की तुला आई न्यायला येईल ना बाळा दुपारी. शांत होत आला. मग म्हटलं, "सॉरी कणाद, तुला सोडून जातोय." तर रडवेल्या सुरातच म्हटलास,"इट्स ओके." 

तुझं ते इट्स ओके खूप टणांची ओझं कमी करून गेले.😢

लव्ह यू पिल्लू..!!❤️

१० ऑक्टोबर)

आता कपडे ओले झाले तर सांगतोस... "ओलं झालं.."

गोगलगाय ला म्हणतोस "गोगं बै"

सीताफळच्या बी व्यवस्थित काढून खातोस.

२७ ऑक्टोबर)
आता तू पाहिजे शब्द म्हणतोस.. हाऊ बाहीजे.. पाणी बाहीजे.. आत्ता हे मी लिहित असताना म्हटलास रिमोट बाहीजे...

अजून "हे बघ", "हे लाव" हेही म्हणतोस.

०२ नोव्हेंबर)

आज आई मुंबईला गेलेली आणि आपण दोघेच घरी होतो. सकाळी तुला वरईची भगर खायला दिली. मग 11 वाजता बाहेर गेलो. येताना दही घेण्यासाठी डेअरीमध्ये थांबलो तर तिथे एक पेस्ट्री ठेवलेल्या होत्या. तू म्हटलास हॅपी बड्डे पाहिजे (म्हणजे केक). जास्त हट्ट करत नव्हतास पण खूप दिवस तुला केक दिला नव्हता तर मग पेस्ट्री घेतली. तिथेच दुकानाच्या पायरीवर बसून अर्धी खाल्ली आणि अर्धी घरी येऊन खाल्ली. घरी आल्यावर ती।प्लेट मध्ये काढून देऊ का म्हटले आहे तर नाही म्हणालास. तुला त्या त्रिकोणी पॅकिंग मधूनच खायची होती. छान एन्जॉय करत खाल्लीस.

दिवसभर किती शहाण्या बाळासारखा खेळत होतास. एकदा चोकोज आणि दूध दे म्हटलास तेवढाच काय तो हट्ट. आजकाल।तुला चॉकोज दुधात टाकून खायला आवडतात. एक खोलगट चमचा हातात दिला की बाऊलमधून दूध आणि चॉकोज मन लावून खात बसतोस. 

संध्याकाळी डायनॉसोर गार्डन मध्ये गेलो.  तिथे एक माझ्या पुढे पळत पळत खूप फिरलास. आणि एका ठिकाणी चिखल होता तिथे धपकन उताणा पडलास. लागले नाही पण मागे शर्ट आणि पॅन्ट चिखलात भरले. तिथे मग वॉशरूम मध्ये ते सगळं काढून धुतले. 

०५ नोव्हेंबर) 

कणाद, आता तुला पाहिजे ह्या शब्दाची ताकद कळली आहे. बायजे असं म्हणतोस. एखादी गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीचे नाव घेऊन त्यापुढे 'पाहिजे' असे म्हटले तर मग ती मागता येते हे कळलंय, तेव्हापासून जे काही दिसेल ते मागत राहतोस. गाडीवरून जाताना दुकान दिसले की 'वोईपॉप (लॉलीपॉप) बायजे'.. खेळण्याचे दुकान दिसले की, बोट दाखवून 'बायजे' म्हणतोस. घरात असताना दुदू, चहा, हाऊ (खाऊ) बायजे चालू असते.त्यादिवशी गॅलरीमधून चंद्र दाखवत होतो तर म्हणालास, 'चांदमामा बायजे'. जाम हसलो मी.. मी म्हटलो, "कसा द्यायचा चांदमामा तुला. किती लांब असतो तो." तर म्हणालास "बायजे" ... तुम्हा पोरांपुढे लॉजिक चालतच नाही!!

०७ नोव्हेंबर) 
आता तुला आयुष्यातला पहिला मित्र मिळाला आहे. देवांश.! आपल्या वरच्या फ्लोअरला राहतो. त्याची आई आणि तुझी आई संध्याकाळी खाली चालायला जातात, जेणेकरून तुम्हाला एकत्र खेळता यावं. देवांश जर भेटून जायला लागला तर तू रडू लागतोस. त्यादिवशी तू आणि देवांश खाली खेळत होता, मी गाडी चालवत घेऊन कुठेतरी चाललो होतो. इतरवेळी मी गाडीवरून कुठे जात असलो की तूला माझ्यासोबत यायचंच असते. पण आत्ता मी किती बोलावले तरी आला नाहीस. क्षणभर मला रागच आला. की मित्र मिळाला की बाबा महत्वाचा आहे नाही का! पण नंतर मन सावरले. कळले की तुझं वर्तुळ आता विस्तारत राहील. बिंदू असणारे आई-बाबा आता काहीसे लांब जातीलच. पण तरी मी प्रयत्न करत राहीन की तुझ्यापासून खूप लांब न जाण्याचा!

१३ नोव्हेंबर)
आज मी पहाटे मुंबईमधून गुजरातला जायला ट्रेन पकडायला चाललो होतो. टॅक्सीमध्ये होतो. अचानक काहीतरी missing जाणवू लागले. विचार केला की नक्की काय missing वाटतेय? तर तुझ्या स्पर्शाची आठवण होती. असे खूप लवकर आपण कुठे गावी जात असू तर तू सीटवर मला बिलगून झोपलेला असतोस. छातीशी कान असतात आणि माझा हात डोक्यावरून फिरत असतो. अधूनमधून डोक्यावर पप्पी घेतो. हे सगळं आत्ता एकटा असताना हवंहवंसं वाटत होतं. नंतर ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर चालताना तु माझे बोट पकडून चालत असल्याचा भास झाला. क्षणभर खूप भावनिक झालो मी...

 खूप खूप हवाहवासा आहेस तू कणाद!!

२२ नोव्हेंबर)
आपण विनूकाकाच्या लग्नाला आलोय. लग्न नांदेडला आहे. दिवसभर स्लीपर कोच बस मधून ट्रॅव्हल करून आलो. तू आणि sanvi दीदी ने खूप एन्जॉय केले. संध्याकाळी कार्यालयात तू माझ्यासोबत बसून स्वतःच्या हाताने किती शांतपणे जेवत होतास. सगळ्यांनी किती नावाजले तुला!

२७ नोव्हेंबर)
या वयात हट्ट आणि मूड चे खूप up down असतात. आज सकाळी सकाळी उठलास तेव्हा तुला aple पाहिजे होते मग तेच पाहिजे म्हणून रडत होतास आणि आपल्या घरी तरी नव्हते. मग चॉकोज दिले तेव्हा गप्प बसलास. नंतर अंघोळीला चल म्हटलं तर यायला तयार नव्हतास मग मी रागावलो. अंघोळ झाली आणि शाळेत चल म्हटले तर तुला 2 फुटांची मोठी गाडी बॅग मध्ये घ्यायची होती. ती बसत नाही हे दाखवले तरी पटत नव्हते. मग छोटी गाडी घ्यायला तयार झालास. मग आपण खाली आलो तर म्हटला बाईकवरून नको, चालत जाऊ. पण मला तर ऑफिसला उशीर होत होता. मग खूप विनवण्या केल्यावर बाईकवर यायला तयार झालास. मग आपण बसलोच इतक्यात तुला खेळण्यातली बाईक हातात हवी याची आठवण झाली. पून्हा मग आईला ती गाडी वरून टाकायला सांगितली. आणि मी catch घेऊन तुला दिली. आणि फायनली कणाद शाळेत जायला तयार झाला. एवढी कसरत असते कधीकधी!!😀😀

२९ नोव्हेंबर)

सध्या तू 'का' आणि 'काय' म्हणायला शिकला आहेस. आणि ते इतकं भारी म्हणतोस ना, मी ते एकटं असताना आठवले तरी हसू येते. कणाद म्हणून हाक मारली की 'क्काय' अशी जोरात ओ।देतोस. आणि काहीतरी बोलताना "का" असं जोरात विचारतो..😀

३० नोव्हेंबर)
पेंग्विनला सॉक्सची टोपी घातलीयस कणाद तू!😀

०१ डिसेंबर)
हे घर करून त्यात एवढीशी जागा मोकळी ठेवून त्यातून स्कुलबस सोडत होतास..😀

०६ डिसेंबर)
आज संध्याकाळी तू आणि मी एका कवितांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मेट्रो ने पोहोचलो. आणि तिथे बालकवितांवर आधारित गाणी, छोटी drama असा मस्त कार्यक्रम होता. Theatre मध्ये जाऊन पाहण्याचा तुझा पहिलाच प्रसंग. खुप एन्जॉय केलंस तू.! 

०७ डिसेंबर)
आज आपण पर्वतीच्या टेकडीवर गेलो होतो. खूप मज्जा केली. फिरलो. दगडावर चढलो. चाफ्याच्या झाडावरही चढलेलास तू. पण इतका पळालास की संध्याकाळी आपण तिथून निघालो तसा पटकन झोपलास. 

एक गंमत म्हणजे तुला देवाला नमस्कार करायला सांगितला तर तुझ्या एका हातात लॉलीपॉप होता. मग फक्त एका हाताने नमस्कार केलास. म्हणजे दोन्ही हात जोडतो ना त्यातला एकच हात होता..😀


१३ डिसेंबर)
आजकाल तू शिकलेले विवीध भाषिक डायलॉग,

"क्या हुआ?"
"ओपन the door."
"उतर खाली.."😀

१४ डिसेंम्बर)
काल आपण बुक फेस्टिव्हलमध्ये होतो. खूप फिरलो आणि मज्जा केली. नेहा मावशी, ऋग्वेद आणि रामकाका भेटले. तू आणि ऋग्वेदने peppa।पिग चे मनानेच पुस्तक घेतले. तसे ते महाग होते. मग आई आणि मावशीमे तुम्हा दोघांना दुसरे पुस्तक घ्यायला convice करत होत्या. पण ते पुस्तक पाहिजे म्हणजे पाहिजेच होते. एक तर पोरगं पुस्तक मागतेय म्हटल्यावर मी emotional होऊन गेले घेणारच होतो ते पुस्तक. आणि घेतलेच.

नंतर मावशी- काका तिथून निघाले. तर त्यांचा हात धरून त्यांच्यासोबत जायचं होतं तुला. दोघेही खूप आवडतात तुला..!!








Saturday, 8 March 2025

Spring, Summer, Winter and Spring (2003)

Spring, Summer, Fall, Winter and Spring (2003)

दिग्दर्शक - कि-डुक किम (Ki-duk Kim)
भाषा - कोरियन

शांत तळ्यात तरंगत असणारा एक बुद्धविहार, त्या विहाराची देखभाल- पूजा करणारा मॉंक आणि त्याने सांभाळ केलेला एक लहानगा मुलगा... इतकासा कॅनव्हास असलेला सिनेमा. परंतु हा सिनेमा मनात जे अफाट चित्र उभारतो त्याला अंतच नाही. मॉंकने मुलाला दिलेली शिकवण, म्हणजे हा चित्रपट! ती शिकवण प्रवचनातून येत नाही, ती आयुष्याच्या वर्तुळातून येते. यात कुठेही तत्वज्ञान सांगणारे मोठे मोनोलॉग नाहीत. कुठेही दिखावा नाही. खडकावर पडणारा एकेक थेंब खडकाला भेदू शकतो अशी त्यातली एकेक फ्रेम आपल्या मनावर हळुवार आघात करत राहते. 

दिग्दर्शकानेच लिहिलेला हा चित्रपट. लिहिताना जणू काही त्या बुद्धविहारात बसून लिहिला असावा असा हळुवार आणि संथ! कथा संथ असली तरी खिळवून ठेवते. शेवटचे २-३ मिनिटे हा चित्रपट अजून थोडी कथा वाढली आहे, जे मला अनावश्यक वाटले.

तलाव, बुद्धविहार आणि तलावाबाहेर येण्यासाठी लागणारी होडी इतकेच काय सिनेमॅटोग्राफीचे घटक. परंतु सर्व ऋतुंमधून प्रवास करणारी कथा असल्याने, प्रत्येक ऋतूत नाटकातला सेट बदलल्याप्रमाणे दृश्य बदलत राहते. 

Oh Yeong Su हे कोरियातले जेष्ठ अभिनते! सध्याच्या गाजलेल्या Squid Game या सिरीजमध्येही त्यांचा अभिनय आहे. खूप सहज वावर आणि अभिनयात एक authority आहे.त्यांनी मॉंकच्या भूमिकेत एक मेडीटेटीव्ह भाव आणला आहे.  

विहारातून बाहेर येऊन जंगलात अन्न गोळा करण्यास, मॉंक आणि मुलाचा होडीमधूनचा रोजचा प्रवास अध्यात्म आणि जीवन याचा एक दुवा दाखवतो. त्या होडीशी असलेले नाते तुटले की माणूस सैरभैर होतो. त्याच्या आयुष्याची होडी भरकटत राहते. कदाचित तो मॉंक (शिक्षक) म्हणजे ती होडी आहे. जेव्हा तुमचा पिंड जीवनाच्या भट्टीत तयार होऊन अध्यात्मिक प्रवासासाठी तयार झाला की होडीचे काम संपते. हा सिन म्हणजे चित्रपटाचा कळस आहे. त्यासाठी winter या ऋतूचा केलेला वापर... अहाहा..! मास्टरक्लास..!!

महायन बुद्धीझम मधला प्रज्ञापरमिता स्तोत्र (Heart Sutra) यात आले आहे. यामध्ये बोधीसत्व शून्यता आणि शून्य होणे सांगतात.

शून्य हे आकार आहे... आकारही शून्य आहे..
काही निर्मित होत नाही.. काही नष्ट होत नाही...
सर्व काही अद्वैत आहे...

त्याची शेवटची ओळ आहे.....
गते गते पारगते पारसंगते बोधि स्वाहा  "Gone, gone, everyone gone to the other shore, awakening, svaha."

या चित्रपटामुळे या स्तोत्राची देण आपल्याला मिळते.


©विशाल पोतदार

तळटीप - 
● Sexual content alert - चित्रपटाच्या मध्यात काही सेकंदाचे सेक्शुअल सिन्स आहेत.
● हा चित्रपट ott वर उपलब्ध नाही. हवा असल्यास मला संपर्क साधा.

Saturday, 17 August 2024

कणादच्या बाबाची डायरी 3






१३ फेब्रुवारी २०२५)
सध्या तुझं गाडी प्रेम खूप वाढत चाललंय. कुठलीही खेळण्यातली गाडी घ्यायची आणि ती हाताने चालवत फिरवायची, एवढं काम सारखं करतोस.

काल आईने तुला डाळिंबाचे दाणे खायला दिले आणि ती किचनमध्ये गेली. बाहेर आल्यावर पाहते तर वाटी बऱ्यापैकी संपली होती. नंतर तिने तू काहीतरी करतोयस हे पाहिलं तर तू चक्क ते डाळिंबाचे दाणे गाडीच्या खिडकीतून आत भरत होतास. पूर्ण गाडी डाळिंबानेच भरली होती. 

मी गुजरातमध्ये कामानिमित्त गेलो होतो, त्यामुळे आईने डाळिंब भरतानाचा तुझा व्हिडिओ पाठवला आणि मो इतका हसलो की बस्स.!

१६ फेब्रुवारी)
आज तू मुंगीला 'गी' असं म्हटलास. कावळा दिसल्यावर काव एवढंच म्हणालास. तू शब्द बोलू लागलायस याचा आनंद वेगळाच आहे रे.!

२५ एप्रिल २०२५)
आपण आंबे आणायला गेलो होतो. मी आणि आई दुकानदाराला।रेट विचारत होतो. इतक्यात मागे पाहतो तो तू त्यातला एक आंबा घेऊन खायला सुरुवात केली होतीस. तो दुकानदार आणि आम्ही खूप हसलो. तो म्हणाला बच्चे ने लिया है. खाने दो, हम नही गिनेंगे.


१० मे)
आज तू पूर्ण वाक्य बोललास... "पाऊस आला..."


१६ मे २०२५) 
आज आई तुला झोपवत असताना, मी आत काहीतरी करत होतो. अशावेळी तू जनरली पप्पा .. पप्पा म्हणून हाक देत असतोस. पण आज तू "विशू.. विशू.. म्हणून हाक दिलीस.." माझी खूप इच्छा होती की तू मला नावाने हाक मारावीस. आज खूप खूप प्रेम दाटून आलं कणाद..!

२९ मे २०२५)
तुझे आत्ताचे शब्द -
नीना गाडी : अम्ब्युलन्स
नाना : केळ (बनाना)
सफरचंद : अँपु
ताई - तांमी
चमचा : चमचम
खाऊ : हाऊ
औषध लाव - औषन नेने औषन
झुझू - ट्रेन
तुकूतू - कोंबडी
इआ - पोतदार
चिचा - टीचर
हेलिकॉप्टर - हॉक्टर
विमान - मिमान
रिमोट - मिमोट

२० जून)
आता मला तू "बाबा" म्हणायला लागलायस. आधी इतके सांगूनही पप्पा म्हणायचास आणि आता अचानक बाबा म्हणायला लागलास. मी खूप खूष.!

२१ जून)
कालपासून "हो" म्हणायच्या ऐवजी ओके म्हणतोस.


Friday, 29 March 2024

कणादच्या बाबाची डायरी (२)

१२ मार्च)

आज पहिल्यांदाच तुझे केस कापले. म्हणजे जावळ काढले होते तेव्हा तुला इतकं काही कळत नव्हतं. आणि नाव्ही काकांनी पटकन मशीन ने कापले होते त्यामुळे रडला नव्हतास.

आज तिथे सलोनमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या दवाखान्यात पाऊल ठेवल्यासारखे तुझ्या चेहऱ्यावर डिफेनसिव्ह भाव आले. आणि जसे त्यांनी कात्री काढली तसा तू भोंगा पसरलास. मग तुझं डोकं दाबून धरून 10 मिनिटात कसेबसे केस कापले बाबा. तू खूप रडलास आणि प्रत्येक सेकंद माझ्यासाठी खूप अवघड होता.

पण पहिल्या वाहिल्या हेअरकट नंतर हिरो दिसतोयस आता. 


२९ मार्च)
मी कामानिमित्त भरुच (गुजरात) मध्ये आलोय. तुझी खूप आठवण येतेय. विशेषतः तुला जवळ घेऊन मिठी मारण्याची.

पण मी नसल्यावर मल तू मिस करत नाहीस (अजूनतरी).म्हणजे घरी मी जवळ असतो तेव्हा माझ्या मागे लागतोस पण मी बाहेरगावी असल्यावरही तू ओके असतोस. पण बापाची किती वेडी आशा असते बघ ना! असं वाटतं की मी असा बाहेर असताना, तू फोनवर म्हणशील... बाबा कधी येतोयस परत? आठवण येतेय तुझी...


३० मार्च)
आज मी घरी परत आलो. कधी एकदा तुला मिठीत घेतो असं झालेलं. मग आईने दार उघडलं आणि मला पाहिले तसा तू पळतच आलास. पायाला मिठी मारून पायालाच पप्पी दिलीस. आणि उचलून घेतल्यावर मग खूष झालास. त्यानंतर मग खांद्यालाही पप्पी दिलीस. अरे तुला चॉकलेट मिळाल्यावर किती खूष होतोस की नाही तेवढाच मी खूष झालेलो त्यावेळी...❤️

४ एप्रिल)
माझं wallet खेळायला घेतोस ना तेव्हा त्यातल्या नोट्स आणि कार्ड्स माझ्याकडे एकेक करून आणून देतोस. मी मग आनंदात हात नाचवत म्हणतो, "अरे वाह.. अरे वाह..मला दिलं... मला दिलं.. कणादने मला दिलं..." आणि हे तुला खूप आवडले. म्हणजे तुला वाटलं की मी काहीतरी छान गोष्ट बाबाला देतोय आणि बाबाला ते खूप आवडले. मग आता मला तू काहीही दिलंस तर मला तूच हात नाचवून तसं म्हणायला सांगतोस. आणि मी तसं केलं की मग खूष होतोस.

६ एप्रिल) 
माझं लक्ष नसेल आणी तुला जर मला बोलवायचं असेल तर मग तू "अद्दा.. अद्दा... " अशी हाक मारून बोलावतोस. ही मला तू मारलेली पहिली हाक. आता बाबा म्हणशील तेव्हा।म्हणशील.

१० मे)
तू 8-9 महिन्यांचा असल्यापासून मीच अंघोळ घालतो. आधी खूप छोटा होतास तेव्हा शांतपणे अंघोळ घालून घ्यायचास. आता तुला पाण्यात खेळायचं असतं. त्यात मग मध्ये पाणी भरून ओतून घ्यायचे. नळाचे तोंड दाबून पाणी उडवायचे. पाण्याचा मग भरून माझ्या अंगावर पाणी ओतायचं. हे असे खेळ चालू आहेत. आणि अंघोळ झाली तरी बाहेर यायला नाही म्हणतोस मग कसंबसं बाहेर काढतो.

आणि हो.. हा पूर्ण महिना थंड पाण्याने अंघोळ करतोयस. एकदाही अजिबात सर्दी झाली नाही.


२२ मे)
सध्या तू हातात फोन घेऊन आणि कधीकधी हातात जे असेल ते कानाला लावून फोनवर बोलल्याचं नाटक करतोस. तुला हॅलो म्हणता येत नाही मग तू "आऊ... आऊ" म्हणत असतोस. आणि ते इतकं क्यूट असतं की बस्स..!

३१ मे)
काल मी मुंबईहून मनूताईला घेऊन आलो पुण्यात. आल्या आल्या तू मोबाईल घेऊन बसला होतास त्यामुळे मी आल्यावर नेहमीसारखा बिलगला नाहीस. पण काहीवेळाने मी खाली बसल्यावर शांतपणे मांडीवर डोकं टेकवून पडला होतास. काहीही हालचाल नाही. इतकं शांतपणे की मीही तुझी कंपनी एन्जॉय करत होतो.

१० जून)
ज्या गोष्टी केल्यावर आम्ही दोघे चिडतो किंवा तुला रागवतो, त्या गोष्टी तू मुद्दाम चिडवण्यासाठी करतोस आणि ओरडल्यावर हसत पळून जातोस. उदाहरणार्थ - फ्रीज उघडणे, मोबाईल घेणे, रिमोट घेणे.

आणि तू पळून जाऊन लपून बसतोस. एक तर तू अशा जागी लपून बसतोस की तिथून पूर्ण दिसत असतोस. पण तू नजर चोरतोस आणि मग तुला वाटतं की आपण पाहत नाही म्हणजे दिसणारच नाही..

किती सुख आहेस रे तू... आम्ही दोघेही किती वेळा त्यासाठी नशीबवान समजतो.

२० जून)
आता तुला काही हवं असेल उदा. पाणी, खाऊ किंवा बेडवर खेळायला जायचंय, तेव्हा तू जवळ येऊन माझं बोट पकडतोस आणि उठायला सांगतोस. मग मी उठतो. तू बोट न सोडता तसेच मला जे हवं तिकडे नेतोस. त्यात इतका हक्क असतो ना रे. आणि तू बोट हातात घेऊन नेतोयस हे feeling इतकं छान असतं की मला कितीही कंटाळा आला असला तरी तुझ्यासोबत येतोच.

३ जुलै)
आपण लोणीमध्ये आलोय. इथे एक मांजर आलेलं आणि तू त्याच्याशी खेळत होतास. त्याची चक्क पप्पी घेतलीस. आणि त्याला म्याव म्याव असं नाही, तर ब्याव ब्याव असं बोलत होतास. खूप मजेदार होत ते. आम्ही खूप हसलो.

११ जुलै) 
आज माझे बोट धरून उठवलंस आणि आत बेडरूममध्ये घेऊन निघू लागलास. मला वाटलं की गादीवर तुला उड्या मारायच्या असतील. पण तू माझा हात हातात घेऊन वर टीशर्ट कडे नेत होतास. म्हणजे तुझं म्हणणं होतं की टीशर्ट घाल आणि बाहेर फिरायला ने. मग मी टीशर्ट घालून तुला घेऊन निघालो तर इतका खूष झालास की बस्स!

१७ जुलै)
मला पार्किंग मध्ये एक मोठा लोहचुंबक सापडला होता. मग त्याचे मी 3 तुकडे केले. तुकडे झाल्यावर त्याला दक्षिण उत्तर ध्रुव तयार झालेत. एक भाग खाली ठेऊन त्याच्या जवळ दुसरा नेला की मग पहिला वाला लांब पळतोय. तुला ते पाहून वाटलं की तो कुठला तरी जिवंत प्राणी आहे. आणि त्याला घाबरून पळायला लागलास. म्हणजे तुला भीतीपण वाटत होती आणि ते मॅग्नेटचं पळणे ही पहायचं होतं. मी थांबलो की मला ते करायला लावायचास आणि तू लांबून पाहत ओरडायचास. खूप मज्जा आली.

२० जुलै)
आता लोहचुंबक हातात घेतोस आणि माझ्यासारखे एक लोहचुंबक घेऊन दुसऱ्याला लांब पळवायचा प्रयत्न करतोस. तसं झालं की खूप खूष होतोस. आणि चुकून तो लांब असलेला AAमॅग्नेट तुझ्या हातातल्या मॅग्नेटला चिकटला की घाबरून टाकून देतोस.

२६ जुलै)
आज आमच्या बाळाचा वाढदिवस. दोन वर्षांचा झालास कणूल्या..! म्हणता म्हणता मोठा होऊ लागलायस. आज तुझा bday करायला आजीने वाठारला बोलावले पण तीच आजारी पडलीये अरे. ती हॉस्पिटलमधून घरी आली की आपण सेलिब्रेशन करू.

१० सप्टेंबर)
आपल्या बिल्डिंगच्या मागे झोपड्या बांधून राहतात आणि त्यांचे २ ट्रॅक्टर आहेत. सकाळी ते ट्रॅक्टर घेऊन जातात आणि संध्याकाळी परततात. ट्रॅक्टर सुरू केलेला आवाज आला रे आला की तू हातात जे काही असेल ते सोडून, तो बघायला गॅलरीत पळत जातोस आणि अगदी टक लावून तो जाईपर्यंत पाहतोस. आणि त्यांना बाय बाय देखील करतोस. तीच गोष्ट संध्याकाळी तो परतताना होते. 😀😀

१८ सप्टेंबर)
आता काही बोबडे शब्द बोलू लागलायस. ट्रॅक्टरचा आवाज आला की "टॅट्टर" असं म्हणतोस. आणि सफरचंदला अँप्पू म्हणतोस. इतकं गोड वाटतं ना रे तुझे पहिले वाहिले शब्द ऐकताना.!

३१ ऑक्टोबर)
आपण दिवाळीला गावी आलोय.

९ नोव्हेंबर)
बाईकवर कुठेही जाताना तुला पूढे बसवून नेत असतो. मागच्या काही दिवसांत तू हॉर्न वाजवायला शिकलास. गाडी चालवत असताना हॉर्न वाजव म्हटले की लगेच वाजवतोस. आणि आज तर गाडीचा स्टार्टर मारायला शिकलास. तुलाही तो आनंद भरपूर होता आणि मलाही. 

०५ डिसेंम्बर)
तुला इकडून तिकडे जाताना सगळ्या गाड्या सोबत न्यायच्या असतात. म्हणजे अंघोळीला जाताना, किंवा हॉल मधून बेडरूममध्ये जाताना वगैरे.. फक्त तुझा आग्रह असा असतो की त्या एकाचवेळी नेता याव्यात. असं नको की आत्ता दोन नेऊन ठेवल्या आणि नंतर येऊन एक घेतली असं पटत नाही. मग हात दुमडून हात आणि छातीच्या मध्ये पकडतोस आणि त्यावर एकेक ठेवत जातो. जर ते करताना शेवटची गाडी बसत नसेल तर मग चिडतोस.

०६ डिसेंम्बर)
आता अजून 2-4 शब्द बोलतोस. मला कधीकधी बाबा म्हणतोस. Tv मध्ये पाहून yellow म्हणायला शिकला आहेस. मी लव्ह यू म्हटलं की तुही आय ल्यू असं म्हणतोस. सुख आहे ते ऐकणं म्हणजे❤️

१५ जानेवारी)

सी यू ला सू ली...आणि केळाला नाना म्हणतोस (बनाना चा शॉर्टफोर्म)

१६) जानेवारी)
आज तुला खाली फिरायला नेले तेव्हा झाड, लाईट आणि कार हे म्हणायला शिकवले आणि तू म्हणत होतास.

१८ जानेवारी २०२५)

हाडाचे सापळे नाचतात तो व्हिडिओ खूप आवडतो. त्यात तो सापळा म्हणतो here i am, here i am... how do you do.....तू ते सारखं असं म्हणतोस "अबब हाऊ डु यू डु..." आणि त्याच टोन मध्ये तोंड बंद ठेऊन तेच म्हणायला पाहतोस.. यात तू इतके variation करशील असं वाटलं नव्हतं.

२७ जानेवारी २०२५)
काल आपण आईस्क्रीम खायला गेलो होतो. तुलाही थोडं थोडं देत होतो. पण तुला आईस्क्रीम कोन तुझ्या हातात हवा होता. मी दिला तर मग आईस्क्रीम सांडत होतं. म्हणून मग मीच भरवत होतो. आणि जास्त आईस्क्रीम होतंय असं वाटलं म्हणून मी मग तुझं लक्ष नसताना राहिलेले गपकन खाल्ले. तुला ते कळले पण सांगता येत नव्हते. मग आपण जेव्हा निघायला लागलो ना तेव्हा मग तू अजून आईस्क्रीम पाहिजे म्हणून रडायला लागलास. ते रडणं खूप सिरीयस नव्हतं तर हट्टाचं असं होतं. मग गाडीवरही तुझी भुणभुण चालूच होती. मी दटावलं.. "कणा~~द रडायचं नाही". तू शांत बसलास लगेच.

 नेहमी मी हॉर्न मार म्हटलं की हॉर्न वाजवतोस.. पण आज हॉर्न वाजव म्हटलं तर सरळ "अं~~ह" म्हणून नकार दिलास. नंतर कितीवेळा म्हटलं तरी हॉर्न काही वाजवला नाहीस. हा तू पुकारलेले असहकार आंदोलन.. 😀

टीप - नंतर तुला 10 रुपयाचं आईस्क्रीम घेऊन दिलं बरं का. मग मात्र तू हॉर्न वाजवलास.



Friday, 6 October 2023

कणादच्या बाबाची डायरी (१)

#विशालाक्षर
#बापाची_डायरी


तुझ्या जन्माआधीचं)

बाळा...तूझा जन्म होण्यास काही दिवसांचा अवधी आहे. काही दिवसांचा, की तासांचा? सध्या काहीच सांगू शकत नाही. तुझ्या आईचा जेव्हा फोन येतो तेव्हा असेच वाटते की तुझ्या येण्याची चाहूल लागली की काय? तसे तुझं येणं आमच्यासाठी तू पोटात असतानाच झालंय. जेव्हा तू आत वळवळ करून आम्हाला तुझं असणं दाखवून देऊ लागलास. अरे एवढ्याशा जागेत मावणारा तू. आणि त्यातच इतका विहार करायचा? जणू काही आत पूर्ण जग उपलब्ध आहे. सध्या तुला आत कसे वाटतेय. काही हुरहूर आहे का? अचानक एका समाधी अवस्थेतून कलकलाट असणाऱ्या जगात यायचंय. त्याआधी तुझी कशी तयारी चालू असेल कुणासठाऊक.! अरे आम्हीही तुझी ही अवस्था अनुभवली आहे, परंतु गर्भातले जीवन काहीच लक्षात राहत नाही. तुलाही राहणार नाही. पण आता या क्षणी तू तिथे आहेस. त्यामुळे तुला ते जाणवून द्यावे वाटले. आईच्या शरीरात वाढतोयस. बाहेरुन खूप काही आवाज, भावना जाणवत असतील. सगळं काही ग्रहण कर. पण उगीच सगळ्याची काही साठवन करत बसू नकोस. 

तुझी वाट पाहतोय..

२६ मार्च २०२३
कणाद आज आठ महिन्यांचा झालास. एक प्रामाणिकपणे सांगू? तूझ्या जन्माच्या आधी मला वाटायचं की आपल्याला मुलगीच व्हावी. मुलीवर बाप खूप माया करतो असं फील व्हायचं. पण तुला ज्याक्षणी पाहिलं ना तेव्हापासून हृदय तेवढंच पाघळलं, जितकं मुलीसाठी झालं असतं. तू त्या मातीच्या गोळ्यापासून, आता इतका सुंदर दिसतोयस ना की तुझ्या मम्माला आणि मला लकी असल्यासारखं वाटतं. माहितीये की सगळ्या आईबापाना आपलंच मूल क्युट वाटतं. पण वाटतं तर वाटतं. काही कळत नसतानाही दिसणाऱ्या तुझ्या लीला पाहत बसावं अशा आहेत. 

२ एप्रिल -
अरे सध्या तुला उभं राहायचं असतं. कुणीतरी तुला पकडून नुसतं उभं करणार आणि तू उड्या मारणार जोरात. तुझ्या उड्या मारून वाटतं की अख्ख्या आयुष्यात इतकं हललो नसेन कधी. तुला खाली ठेवलं की रडायला सुरुवात. चालायला वगैरे लागलास तर किती पळशील कुणासठाऊक.

७ एप्रिल २०२३

सध्या तुला फक्त रडण्या आणि हसण्याचीच भाषा येते. काही पाहिजे असेल तर रडायचं आणि ते मिळालं की हसायचं. इतकी साधी सरळ भाषा. परवाच तू, मी घ्यावं म्हणून मुद्दाम रडायचं नाटक करत होतास. लगेच कळत होतं ते नाटकी रडणं. छान अभिनय करत होतं माझं बाळ. आता तर सरपटत पायाशी येतोस आणि दोन्ही पाय धरून रडू लागतोस घ्यायला.. आणि तुझं दोन्ही हात समोर वल्हे मारल्यासारखे हलवत बम उचलून पुढे येणंच इतकं क्युट वाटतं की बस्स! तू असा मागे लागलास की पटकन उचलून घेतो मी. तुझी मम्मा म्हणते खूपच लाड करतो मी..! पण आहेसच ना रे तेवढा क्युट.


९ एप्रिल
काल आपण लोणीला आलो (तुझ्या आजोळी). तुला मी मुंबईवरून आणलेला नवा टी शर्ट घातला होता. किती क्युट दिसत होतास. 

आज सकाळी पहिल्यांदाच गुडघ्यावर आलास. म्हणजे रांगायच्या पोजमध्ये रे. छोटाश्या मनीमाऊसारखं. मनीमाऊ वरून आठवलं. माऊला किती घाबरतोस तू. तिच्या जवळ जात नव्हतास. कुत्रं दिसलं की झेप घेतोस त्याच्याकडे. अगदी त्याने मुका घेतला तरी घाबरत नाहीस आणि मनीमाऊमध्ये काय घाबरण्यासारखं वाटलं कुणासठाऊक.

१० एप्रिल 
ऑफिसमध्ये असताना तुझ्या मम्माचा मेसेज आला whatsapp वर. तुझा व्हिडिओ होता ज्यात तू चक्क मनीमाऊशी खेळत होतास. एका दिवसात मनीमाऊ ने अशी काय जादू केली कुणासठाऊक, घाबरणारं पोरगं खेळू लागलं तिच्याशी. तिला हात लावताना इतकं नाजूकपणे लावत होतास, की आजपर्यंत तिला इतकं हळुवार कुणी स्पर्श केला नसेल.

१२ एप्रिल
अरे आत्ता मी वाठारला चाललोय बसमधून. बाबांचं डोळ्याचं ऑपरेशन आहे ना उद्या. माझ्या शेजारी एक स्त्री बसलीये. तिच्या हातात एक छोटीशी मुलगी आहे आणि ती अगदी तुझ्यासारखी दिसली. तुझ्या आठवणीने जीव कळवळला क्षणभर. हे होतच नेहमी.

त्या मुलीची जन्मतारीख आहे २५ जुलै. तुझ्यापेक्षा एक दिवसाने मोठी.! किती योगायोग असतात ना? तुझं आणि त्या मुलीचं आयुष्य समांतर अगदी तेवढंच काळ चालू आहे. खूपशी आयुष्ये अशी समांतर चालतात. आपल्याला ओळखीची नसली तरी योगायोगाने आपल्याला भेटतात ते लोक.!

१७ एप्रिल

कणाद... आज तू मला चक्क घास चारलास. संध्याकाळी आपण तिघे बाहेर फिरायला आलो होतो. आम्ही पाणीपुरी खात होतो. तुला एक चपटी पुरी चघळायला दिली. आणि तू अगदी मन लावून ती तोंडात घोळत होतास. मम्माकडून मी तुला घेतलं आणि तू मला ती पुरी चारलीस. तुला ते कसं सुचलं कुणासठाऊक पण मला भरून आलं रे त्या क्षणाने. 

२२ एप्रिल
कणाद तू जे निर्मळ प्रेमाने हसतोस, माझ्याकडे पाहतोस ना त्यासारखं दुसरं सुखच नाही रे. मी आधीच भावनांमध्ये वाहणारा माणूस. आणि तूझ्या सारखी इतकी हळुवार झुळूक तर मन बरसूनच टाकायला लावतं. आजपर्यंत इतक्या प्रेमाने माझ्याकडे कुणीच पाहिले नसेल. असंच खूप निर्मळ राहणं आयुष्यात मुश्किल असतं पण जितकं निर्मळ भावाने दुसऱ्याशी बोलणं वागणं जमेल तितकं करत राहा.

२३ एप्रिल
कणाद तू कालपासून टाळ्या वाजवायला शिकलायस. तुझी लोणीची आजी तुला काही दिवसांपूर्वी शिकवत होती. त्यावेळी वाजवल्या नाहीस टाळ्या, पण कालपासून डाव्या हातावर तुझा उजवा हात नाजूकशी थाप देतोय. इतकं नाजूक की अगदी छोटीशी टाळी ऐकू येते. विठ्ठल विठ्ठल म्हटलंकी सुद्धा सुरू होतेय टाळी.

२४ एप्रिल
कणाद तू सकाळी सकाळी उठतोस तेव्हा तुझे डोळे नेपाळी लोकांसारखे दिसतात सुजल्यासारखे. तुझ्या मम्माला तू त्यावेळी वापरून गूळगुळीत झालेल्या अप्सरा खोडरबर सारखा वाटतोस. तिला मी म्हटलं नटराज खोडरबर सारखा नाही दिसत का? अप्सराच का? तिचं म्हणणं की अप्सराचा खोडरबर मऊ असायचा तुझ्यासारखा.

२७ एप्रिल
बाळा आपण यात्रेसाठी गावी आलो आहोत. 

१ मे
कणाद आज आपण आळंदीला गेलो होतो. आपल्याकडे आजी आजोबा, ताय आणि मनुदीदी राहायला आले आहेत सुटीचे. मग आज आळंदीला जायचा प्लॅन केला. इतक्या लहानपणी तुझं माऊलींचे दर्शन होत होते म्हणून कृतकृत्य वाटत होतं. एकादशीमुळे खूप गर्दी होती, त्यात तुला दर्शनाला न्यावं की बाहेरच घेऊन बसावं अशी शंका होती. पण म्हटलं जाऊ दे जास्तीतजास्त रडशील ना. पण खूप छान राहिलास तू गर्दीत पण. थोडासा रडत होतास मग राजगिऱ्याचे बिस्कीट चारले मम्मा ने. नंतर इतका छान झोपलास की दर्शन गाभाऱ्यात आल्यावर उठलास. मस्त डोकं टेकवून दर्शन घेतलंस. शहाणं बाळ आमचं.! तू मोठा झालास की ज्ञानोबांविषयी सांगेन.

३ मे)
अरे काल मी ऑफिसमधून घरी आलो. तू मम्मा सोबत खेळत होतास. मला बघून छानसा हसलास आणि सॅक काढून ठेवेपर्यंत वेळ गेला. तुला वाटलं मी घेणारच नाही तुला. मग असं भोकाड पसरलस की घ्यावंच लागलं तुला पटकन. आणि घेतल्यावर नेहमीसारखं बटण दाबल्यासारखं रडणं बंद. आणि आज घरी आजी , आजोबा, ताय, मनूदीदी सगळे होते पण तरीही माझ्याकडून दुसऱ्या कुणी घ्यायला लागलं की त्यांचा हात झटकून मला अजून चिकटायचास. अगदी ते माकडाचं पिल्लू आईला चिकटलेलं असतं तसं. इतकं काय, स्ने ला म्हटलं, तू घेऊन बघ. तिने घेतानाही तसंच केलंस. पिल्लू किती रे जीव लावतोस. भरून आलं मला. बापाचं बाळाशी शारीरिक कनेक्शन नसतं ना रे आईइतकं, आणि बाळ बापावर डिपेंडही नसतं. म्हणून बापाला एक काळजी असते की आपलं बाळ आवडीने येईल का आपल्याकडे. पण ती कसर भरून निघाली काल. 


११ मे)
काल रात्री मी आंब्याच्या फोडी खायला घेतल्या. इतक्यात तूलाही ते दिसलं आणि मला।पाहिजे म्हणून रडत मागायला लागलास. माझ्या हातातूनच फोड तुझ्या तोंडात दिली. तूझ्या दोन दातांनी थोडीशी खाल्लीस पण त्या फोडीवर ते इवलूसे दात उमटले होते. अगदी जसेच्या तसे .. 
इतकं भारी वाटत होतं ना यार. ते नाजूकसे दात अलवार उमटले होते. मला नंतर ते खाताना बुजवू वाटत नव्हते. पण फोटो काढून ठेवला. तुझ्या सगळ्या actions मध्ये cuteness वाटत असतो.

१९ मे)
अरे काल आपण तिघे नाटकाला गेलो होतो. अमृता, साहिर आणि इमरोज... आत गेलो आणि बाळाला हातात पाहून तिथल्या काही प्रेक्षकांनी तोंडं मुरडली... मग मम्माने बाहेर येऊन तुला झोपवण्याचा प्रयत्न केला पण तू काही झोपत नव्हतास. मग तिला म्हटलं तू पहा नाटक, मी कणादला घेऊन बाहेर थांबतो. अरे चक्क 2 तास आपण दोघेच होतो मस्त. खूप वेगवेगळी घरं, हॉटेल बाहेरचे लाईट्स दाखवले तुला. बाहेर येणारे जाणारे सगळेच तुझा लाड करत होते. मग दमून दमून माझ्या मांडीवर झोपलास तू. ते 2 तास बेस्ट होते माझ्यासाठी.

२६ मे)
आज सकाळी माझ्याकडे सरकत येताना excietment मध्ये येत होतास. आणि आबा..बा..बा... असं बडबडत होतास.. मी ऑफिसला जायला निघालो आणि जाता जाता तुला घेण्यासाठी बसलो. तुझी मम्मा म्हणाली की एकतर ऑफिसला उशीर होतोय आणि आता त्याला घेऊन का बसतोस. पण मी बसलोच..
तक्स
आणि पुढच्या क्षणी तू स्पष्टपणे .." बाबा.." म्हटलास... अरे इतका प्रचंड मोठा आनंदाचा क्षण होता ना रे.... वर्णनच नाही करू शकत नाही..

कानात.. मनात रेकॉर्ड झालाय तुझा तो शब्द..

३१ मे)
तू रोज अमेझॉन फायर स्टिक (टीव्ही) चा रिमोट तोंडात घालून कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज करत दातलत असतोस. मला वाटलेलं असेल 100-200 रुपयांचा रिमोट झाला खराब तर नविन आणू. पण आज त्याची अर्धी बटणे चालेनासी झाली. मी ऑनलाइन रिमोटची किंमत पाहिली तर चक्क एक हजार रुपये. मला तर टेन्शनच आलंय. तुझ्या हातात दिला नसता बरं झालं असतं असं वाटतंय.

१ जून) ,
आपोआप सुरू झाला रे रिमोट. त्याचं आवाज कमी जास्त करायचं बटण चालत नाहीये... पण ठिकेय कामापुरता चालतोय. तुझा बाबा खूष झाला. आता तुझ्या हातात मिळणार नाही अजिबात.

०४ मे
आजकाल चिडायचं कसं कळू लागलंय तुला. हातातून एखादी गोष्ट काढून घेतली की दोन्ही मनगटे समोर धरून मुठी आवळतोस आणि दात ओठ खाऊन ई~~~ असं करतोस. हे expressions तुझे त्रासातले असले तरी जाम क्युट वाटतात. मग आम्ही जाम हसतो. 

१५ मे)
आठ दहा दिवसांपूर्वी इतकं छान खायचास ना सगळं, आम्ही सगळीकडे सांगायचो आमचं बाळ किती छान जेवतं. एक घास संपायच्या आधी दुसरा हवा असतो. पण आता या आठवड्यात तुला चवीतलीनआवड निवड कळायला लागली आहे. पहिला घास नाही आवडला तर सरळ जीभ बाहेर काढून तोंडातला घास बाहेर टाकतो. आणि पुढच्या घासापासून तोंड फिरवतोस लगेच.

१६)
कणाद तुझं हसणं इतकं गोड आहे ना रे! लूपवर लावून ऐकत राहावं. आयुष्यात मुलांचं सुख काय असतं. तर हे हसणं ऐकण्याचं नशीबच रे.

२ जून)
आता सोफ्यावर चढायला शिकला आहेस. सोफ्यावर चढून जिथे टेकतो त्याला धरून उभं राहतोस. पडशील की काय भीती वाटत राहते सतत.

४ जून)
अरे तुला काल टी शर्ट मागवला. खूप cute दिसत होतास त्यात. पण तुला त्या टी शर्टशी काही देणं घेणं नव्हतं. तुला त्याचं लेबल हवं होतं तोंडात घालायला. इतकं हसलो आम्ही दोघेही! बघ ना तुझ्या वयाची फेज कशी असते. तुला आपण कसे दिसतो, स्वच्छ आहोत का, कपडे घातलेत की नाही कशाची काही जाणीव नसते. तू चांगले कपडे घालावेत. क्युट दिसावं हे आम्हाला आमच्यासाठी वाटतं. खूप विरोधाभास आहे ना हा. पण आयुष्य असंच असतं. आपल्यामुळे आपण आनंदी राहतो त्यापेक्षा दुसऱ्यांचा आनंद आपल्यावर किती अवलंबून असतो.

२४ जून
The Box नावाच्या नाटक थीएटरमध्ये बऱ्याचवेळा नाटक पाहायला जातो. तू तिथे आत गेले की वेगवेगळे आवाज काढतोस त्यामुळे मी तुला बाहेर घेऊन बसतो आणि आई नाटक।पाहते. अरे तुला तिथे बाहेर घेऊन बसता बसता तुझ्याशी तिथल्या सिक्युरिटी म्हणूज काम पाहणाऱ्या काकांशीसुद्धा छान गट्टी जमली आहे. ते तुझ्याशी खेळतात (मोबाईल तुझ्या हातात देतात म्हणून तू जास्त खूष होतोस हे खरं.) परंतु काही बोलता न येणाऱ्या बाळालाही किती सुंदर नाती तयार करता येतात.

२६ जुलै)
कणाद आज एक वर्षाचा झालास रे. कालपर्यंत कुणीही विचारले की केवढा आहे हा मुलगा, तेव्हा तुझं वय महिन्यांमध्ये सांगायचो. पण आता सांगणार वर्षाचा झाला आमचा मुलगा. किती तरी पटकन वर्ष निघून गेलं. एवढंसं छोटं बाळ मोठं होतंय. एक हुरहूर आहे की तुझे आत्ताचे क्युट भाव जपून ठेवता येतील का मनात. कारण मागच्या महिन्यात माशासारखा सरकत सरकत फिरणारा मुलगा आता सराईतपणे रांगतोय. हे सराईत बदल पटकन डोळ्यांच्याही इतके अंगवळणी पडतात की वाटावं, तू सरकत होतास त्याला कित्येक महिने झाले. काही दिवसांत चालायला लागशील तेव्हा हेही जुनं होईल. असो.. तुझ्या या उत्क्रांतीला भावनिक निगेटिव्ह झालर लावणार नाही. तसेही मला तू केव्हा एकदा मस्त बोलायला लागतोस याची उत्सुकता लागलीय. आपण किती वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू. खेळू. कुठेतरी फिरायला गेलो की दृश्य पाहत शांत बसूही. 

तुझ्यासोबत आम्ही दोघेही वर्षाचे आई-बाप झालो. तसं पाहिलं तर तू आईच्या पोटात असताना हालचाल केलीस की तुझी आई पटकन दाखवायची, परंतु बापाला ते अनुभवता येत नसल्याने तो अगतिक असतो. त्यावेळी मला इतकीही जास्त attachment नव्हती. पण तू जेव्हा माझ्या हातात आलास तेव्हा मी बाप झालो.   तुझ्या किलकिल्या डोळ्यांनी क्षणात नातं गडद केलं. मी तुझ्यात उतरलो. या नात्यात तू मला माझ्यापेक्षा लहान वाटत नाहीस. मित्रच वाटतोस. आणि तसाच राहील.

आता तुझं आयुष्य खरं सुरू होतंय. आत्ता पर्यंत फक्त हसणं आणि रडणं हीच तुझी नैसर्गिक शिकलेली भाषा आहे. आता या पुढे जगाचे शब्द शिकशील. तुझ्यामागे अपेक्षांचं टूमणं लावत नाही आता. पण कणूल्या... माझ्या छोट्याशा बाळा.... वर्षाचा झालास रे..!!

14 ऑगस्ट)
आज मी तुला कडेवर घेतलं होतं. तुझ्या आईने येऊन माझ्या दंडाला पकडलं आणि खांद्यावर डोकं टेकवलं. तर तू चक्क पझेसिव्ह झालास आणि तिला बाजूला ढकलत होतास. तिने मुद्दाम बाजूला न जाण्याचं नाटक केलं तर तिला तू चक्क चावायला लागलास. तसं पाहिलं तर हे योग्य नाही पण माझं बाळ माझ्या इतक्या क्लोज आहे हे कळण्यातला आनंद वेगळाच रे.! गिल्टी प्लेझर म्हणू शकतो.

15 ऑगस्ट)
आज तू आणि आई लोणीला गेला आहेस. मी एकटाच घरी आहे. खूप खाली खाली वाटतं रे घर तुम्हा दोघांविना.  वाचन, लेखन, पेटी वाजवणे अशा कित्येक गोष्टी करू शकतो मी पण तरीही त्या सगळ्यांत तुझ्या आठवणींची पोकळी राहतेच. कणाद तुझं असणं खूप भरून राहिलंय आयुष्यात. 

३० ऑगस्ट)
कणाद आपण गावी गेलो होतो तेव्हा तुझं जावळ काढलं. टकलू केलंय पूर्ण. खव्याच्या पेढ्यासारखा गोड दिसतोयस.

०३ सप्टेंबर)
सध्या तू खूप जोरात किंचाळतोस.. कानठळ्या बसाव्या एवढ्या जोरात. एवढ्याशा जीवात एवढा मोठा आवाज कुठून येऊन बसतो कुणास ठाऊक. पण जेव्हा भुभू, एखादा पक्षी किंवा कीडा तुझ्या समोर आला तर त्यांना उद्देशून तू इतका हळुवार आवाज करतोस की त्यापेक्षा मऊ आवाज दुसरा कुठला नसेल. बघ ना तुझी जन्मापासून भाषा किती बदलत आली. सुरुवातीला फक्त रडणे आणि हसणे एवढीच भाषा. काही हवं असेल तर रडणं आणि खूष झालं की हसणं बस्स..! इतकं सोप्पं..! आता आवाजाचे चढ उतार करणे ही तुझी भाषा. आणि एकच शब्द तुझ्या तोंडात असतो तो म्हणजे "अद्दा".. त्याचा उगम आणि अर्थ काही माहीत नाही, पण कोणाशी तुला काही बोलायचं असेल तर तेवढाच शब्द वारंवार बोलतोस. आता तुला आमचे काही शब्द कळतात. बॉल, टीव्ही, पाणी.. हे म्हटलं की बरोबर त्याकडे पाहतोस.  म्हणजे आता आपण एका समान भाषेवर हळूहळू येतोय. 
हे किती गमतीचं आहे पहा ना. आतातरी आपण एका भाषेत बोलत नाही पण आपला एकमेकांवर लावलेला जीव मात्र भाषा जाणत नाही.

06 Oct
खूप दिवस लिहिलं नाही इथे. तुझ्यामुळेच कदाचित. जेव्हा घरी येतो तेव्हा तू मला kidnap करून टाकतोस आणि मग दुसरं काही करता येत नाही. 

सध्या तू काहीबाही बडबड करत असतोस. त्यातले शब्द काही वेगळेच असतात. ते इथे लिहिताही येणार नाही इतके वेगळे उच्चार अस्तर. आणि इतक्या कॉन्फिडंटली बोलतोस की ती एक खरी वेगळी भाषाच आहे.  आम्हाला प्रचंड हसू येतं तू असा बोलत असतोस तेव्हा.

07 Oct
काल आईला द बॉक्स मध्ये नाटकाला पाठवलं होतं. आणि आपण दोघे बाहेर थांबलो होतो. तिथल्या वॉचमन काकांनी नेहमीसारखे  खूप लाड केले तुझे. 
तुला त्या बेबीबॅग मध्ये बसवून आज चक्क गाडी चालवून आलो. आपल्या दोघांची पहिलीच अशी ट्रिप. आता आपण दोघे कुठे बाहेर जाऊ शकतो.

15 Oct
आपल्याकडे ठेवायचा प्लॅस्टिकचा मोठा डब्बा आहे. तो तू दोन्ही हातांनी जोरात वाजवत असतोस. काल तू वाजवत होतास. मी तीन तालाचे बोल (धा धिं धिं धा..) म्हणायला सुरुवात केली आणि चक्क तू त्या ठेक्यात वाजवायला लागलास. इतका परफेक्ट की एकही बीट चुकली नाही. तुझ्यातला रिदम पाहून खूप सुखावलो. व्हिडिओही काढलाय आणि कौतुकाने सर्वांना पाठवला. पुढे तू कशात प्रवीण होशील माहीत नाही पण जे करशील त्यात असा परफेक्ट रिदम येवो.

३० ऑक्टोबर)

आता खूप हट्टी बनत चालला आहेस तू. उदाहरणे सांगायची तर... 

तुला आता लाईटची बटणे दाबायला आवडू लागली आहेत. मग तुला तिथे घेऊन उभं राहायचं. कितीवेळा तू बटण चालू बंद करतोस. माझा हात भरून येतो तुला घेऊन तिथे उभं राहायला मग मी तिथून जायला निघालो तर हात पाय झाडत रडायला लागतोस.

त्यानंतर काल मला चष्मा घ्यायला दुकानात गेलो होतो. तिथे तुला खाली रांगत फिरायचं होतं. सोडलं नाही तर अंग खाली झोकुन देऊन किंचाळत होतास. 

पण ठिक आहे.. आत्ताच्या तुझ्या या हट्टामुळे आम्ही खूप हसतोही. 

०१ नोव्हेंबर )
कणाद अजून तू उभा राहत नाहीस किंवा चालायला शिकला नाहीस. आमच्या मनात हा समजूतदारपणा आहे की जसं तू पालथं व्हायला, रांगायला शिकलास तसा हेही आपोआप शिकशीलच. पण तरीही आता कधी एकदा तुला चालताना पाहतोय असंही वाटतंय. जनरली मुलं एक ते सव्वा वर्षात चालायला लागतात. त्यामुळे काळजीही वाटते की काही प्रॉब्लेम तर नाही होणार? पण तू हेल्दी आहेस आणि पकडून पकडून खूप काही मस्ती करतोस, कशावरही चढतो उतरतोस हे पाहताना ती काळजी निघून जाते.

०९ नोव्हेंबर)
रात्री मी टीशर्ट सोफ्यावर टाकला होता. सकाळी चहा करताना आत किचनमध्ये उभा होतो. तू बाहेर टीव्हीवर गाणी बघत होतास. अचानक तू माझा एका हातात टीशर्ट घेऊन तसाच रांगत आत यायला लागलास. तुझी आई म्हटली हा बघ टीशर्ट घेऊन कसा रांगतोय. मी पाहायला तुझ्या जवळ आलो. मग तू गुडघ्यावर येऊन तो शर्ट माझ्याकडे देत होतास. तेव्हा मला कळलं की तुझं असं म्हणणं आहे की, "टी शर्ट घाल आणि मला बाहेर फिरायला घेऊन जा.." मला इतकं भावुक झालं ना रे... की माझ्याशी आता चक्क बोलायला लागला आहेस. आणि इतकं कधी कळायला लागलं तुला?

तरी तुझी आई म्हणालीच.." कणादचा बाबा पाघळतोय लगेच..  जाईल लगेच खाली घेऊन.."

मग गेलोच ना तुला घेऊन खाली..

२२ नोव्हेंबर
आज कार्तिकी एकादशी. पिंपरीमधल्या एका विठ्ठल मंदिरात पहाटे ४ ला काकड आरतीला गेलो होतो. जाताना तू झोपला होतास. थंडी असल्याने गुंडाळून घेतलं होतं अगदी.

तिथे गेल्यावर भजनाच्या आवाजाने तू उठलास आणि डायरेक्ट टाळ्या वाजवत नाचू लागलास. पहाटेचं ते शुद्ध वातावरण, भजनाचे सूर आणि इतका क्युट नाचणारा तू. सगळे तुझ्याकडेच पाहत होते. नंतर मग विठोबा रखमाईला अभिषेक घालताना तूलाही हात लावायला लावला. विठोबा रखमाईवरून हात फिरला तुझा आणि मला पटकन भरून आलं.

10 डिसेंबर)
आपण अभिदादाच्या मुंजीसाठी बूध या गावी आलो. पुसेगाव स्टॉपला उतरल्यावर आपण सेवागिरी महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. तेथे एका कमरेइतक्या मोठ्या कट्ट्यावर शंकराची पिंड होती. तुला तिथे खेळतायेईल म्हणून ठेवलं आणि मी तुझे फोटो काढू लागलो. इतक्यात तू गपकन रांगत रांगत कट्ट्याच्या कडेला आलास पण.... आणि तू पडणार असं मला वाटेपर्यंत तुझा तोल पण गेला. मी क्षणात हात सरसावला आणि तुझा खांदा माझ्या हातात सापडला. तुझं डोकं फरशीवर टेकलेलंच होतं इतक्यात तुला उचलून घेतलं. हार्टबिट्स प्रचंड वाढले होते. तू जोरात रडत होतास. कुठे लागलेलं तर दिसलं नाही. 
तुला गप्प करत नेऊन मंदिराच्या सभामंडपात दुसरीकडे सोडलं आणि तिथे चक्क तू पुन्हा खूष होऊन खेळू लागलास.
तुझं आत्ताचं वय असं आहे की कुठलाही आनंद आणि दुःख चिरकाळ टिकणारं नसतं. 
आवडती गोष्ट दिसेनाशी झाली तरी काही क्षण रडून तू मूव्ह ऑन होतोस. मोठा झाल्यावर असंच मन असेल ना तर अजून समतेत राहतं माणूस.


१४ डिसेंबर)
काल तुला तीन वॅक्सिन दिले. एक दंडात आणि दोन्ही मांडीत एकेक. त्यामुळे आज तुला खूप ताप पण आला होता. नेहमी हसतमूख असणारा तू आज खूपच केविलवाणा वाटलास रे. कण्हत होतास. मांडीला चुकून हात लागला तरी रडायचास. तुला तसं पाहून खूप भरून येत होतं. त्रास होत होता म्हणून, रात्री झोपतही नव्हतास. मग माझ्या मांडीवर दीड तास घेऊन बसलो आणि तेवढ्यात तुझी छान झोप झाली. खूप खूप बरं वाटलं तुला झोपलेलं पाहून.

लस ही अशी गोष्ट आहे ना रे की माहिती असतं की बाळाला त्रास होणार आहे परंतु आयुष्यात ती खूप गरजेची गोष्ट आहे. खूप धर्मसंकट असतं खरं तर.

२० डिसेंम्बर)
काल आपल्याकडे संतोष मामा आणि प्रितामामी आले होते. तुला त्यांनी एक चालणाऱ्या कुत्र्याचं खेळणं दिलंय आणि तुला ते प्रचंड आवडलेय.

काल तू घोड्यावर स्वतः पाय टाकून बसलास आणि उतरलास पण. ही खूप मोठी achievement आहे.

10 जानेवारी)

आज सकाळी तुला एक पावाचा तुकडा खायला दिला. एक तुकडा तू व्यवस्थित हातात घेऊन खाल्लास आणि शेवटी एक तुकडा तू पायाचा चिमटीत पकडला आणि तसा पायाने खाल्लास.. हसून हसून पुरेवाट झाली.. experiment किती करावे याला काही सीमा नाही तुझ्या जगात.

14 जानेवारी)

मी इंदोर आणि भोपाळ ट्रिपवर असल्याने तू आणि आई लोणीला होता. मी घरी परतलो आणि आज तुम्हाला कधी एकदा भेटतो असं झालेलं. दुपारी बाईकवरून निघालो. मध्येच युट्युबवर काहीतरी लावण्यासाठी थांबलो आणि पाहतो तर आई ने तुझ्या चालण्याचा, तुझ्या पहिल्या पावलांचा व्हिडिओ पाठवला होता.

त्यात लिहिलं होतं की , "बाळ दोन तीन पावलं टाकू लागलंय...पण त्याचबरोबर त्याला आता "बाळ" नाही म्हणता येणार या विचाराने मला कसंसंच व्हायला लागलंय अरे. इतके दिवस आपण एकमेकांना दाखवत नसलो तरी त्याच्या चालण्याविषयी किती काळजी लागली होती आपल्याला. वॉकर आणला, वाजणारे बूट आणले...फारसा उपयोग नाहीच झाला. हा त्याचा अठरावा महिना. कणादने आज बऱ्याच वेळा 2-4 पावले टाकली तर मन अगदी फुलून गेलंय. 🤗
फार मनसोक्त रांगून घेतलं त्याने.  दुडूदुडू रांगत आला की "हे छोटं मनी माऊ कुठून आलंय" म्हणत , ती गोड क्षणचित्रे मेमरीत स्टोअर होऊन राहिली आहेत... त्याचं हे दीर्घकाळ चालू असलेलं रांगणं अविस्मरणीय आणि हृदयाच्या कप्प्यात कायमचा लॉक करून ठेवलेला सुखद सोहळा असणार आहे.❤️"

तिनं हे लिहिलेलं वाचलं आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहायला लागलं. त्यात अत्युच्च आनंद, गोड अस्वस्थता सगळं होतं. काही केल्या बांधच घातला जात नव्हता. म्हणजे मागचा एक महिना तुझी काळजी वाटत होती खूप. मनात असाही विचार यायचा, की तू चालायला विसरलाच तर? तुझ्या मनात ते इंड्यूसच नाही झालं तर? आणि मग पून्हा hopes आणायचो. आणि पुन्हा आनंदी व्हायचो.

पण आज असं वाटलं की एका क्षणात खूप मोठा झालास. परवा भोपाळमध्ये मी मानव संग्रहालय पाहत होतो ज्यात मानवी उत्क्रांतीचे टप्पे होते. मला वारंवार तुझी आठवण येत होती. मानवी उत्क्रांतीसारखे आधी जलचर, पून्हा सरपटणारे, पुन्हा चार पायावर रांगत, पुन्हा दोन पायावर आलेला प्रगत मानव. आज तू आयुष्यातला खूप मोठा टप्पा गाठलास. आणि माझ्या भावनांनी अजून हळूवारतेचा टप्पा गाठला.

27 जानेवारी
खूप दिवस स्ने म्हणत होती की बाळाला सोडून कुठे एकटीला जाता येत नाही. मलाही वाटलंच की आई म्हणून किती अडकून राहावं लागतं तिला. मी 2 दिवस म्हटलं तरी कुठेही जाऊन येऊ शकतो. पण ती दिड वर्षात एकटी मनसोक्त कुठेच फिरली नाही. मग म्हटलं 26 जानेवारीला मी कणादला सांभाळतो, तू ये फिरून. तिने फूरसुंगीला शॉपिंगला जायचं ठरवलं. 

कणाद... तुला सोबत घेऊन, आईला बसस्टॉप पर्यंत सोडायला आलो. ती बसमध्ये बसून निघाली आणि मला काहीसे नर्व्हस वाटू लागलं. तुला आत्तापर्यंत मी जास्तीतजास्त 2-3 तास एकट्याने सांभाळले असेल. तुला मी आवडतो त्यामुळे तू व्यवस्थित राहशील याची खात्री होतीच, पण थोडं टेन्शनही होतं. तुला आईची आठवणच आली. रडायलाच लागलास तर काय करायचं. तुला दुपारी झोपवायला जमेल का वगैरे वगैरे मनात घोळत होतं. पण तुझ्याशी खेळता खेळता जसा तासभर गेला ना तसा कॉन्फिडन्स आला. मोबाईल फक्त 10-15 मिनिटेच दिला. दूध भाकरी खाऊ घातली. साडे तीन वाजता मस्त झोपवलं. इतकं सगळं करता करता तुझ्याविषयी खूप प्रेम दाटून येत होतं आणि तुझी आई आणि बाप दोन्ही झाल्यासारखे वाटलं रे.

तू अजिबात त्रास दिला नाहीस की हट्टी वागला नाहीस. तू खूप शहाणं बाळ आहेस. 

१३ फेब्रुवारी)
तुला डे केअर मध्ये ठेवलं होतं अर्धा तास. तू तिथे असेपर्यंत आई आणि मी चहा प्यायला गेलो. खूप कसंतरी वाटत होतं तुला सोडून जाताना. नंतर तिथे फोन करून विचारले की तू रडतोयस का, तर ते म्हणाले अहो छान खेळतोय इथे कणाद. मग खूप रिलॅक्स झालो. आणि आम्ही चहा एन्जॉय केला.

१४ फेब्रुवारी)
आईने दुपारी ४ वाजता तुला डे केअर मध्ये सोडलं आणि मी संध्याकाळी ६ वाजता घ्यायला आलो. मला पाहून मुसूमुसू रडायला लागलास आणि पटकन जवळ आलास. 

१५ आणि १६ फेब)

दोन दिवस झाले तुला 2 तास डे केअर मध्ये ठेवतोय. मी सकाळी ऑफिसमध्ये जाताना ठेवतो आणि आई 1 वाजता घेऊन येते. 

१७ फेब्रुवारी)
आज मी ऑफिसला लेट जाणार होतो. मग तुला डे केअरला सोडले. आज पहिल्यांदा सोडून जाताना रडू लागलास. खूप कसंसंच वाटलं रे निघताना. पण घट्ट मन करून निघालो. पण पुन्हा लगेच 1 तासात न्यायला आलो. तिथे बाहेरून कडी वाजवल्यावर त्यांनी विचारले,"कोण आहे?" मी म्हणालो, "कणाद चा बाबा.." तेवढं ऐकताच तू आतून जोरात भोंगा।पसरलास. तुला माझा आवाज ओळखू आला हे पाहून खूप प्रेम आलं. नंतर मग तू जोरात रडत रडत येऊन बिलगलास. खूप भरून आलेलं मलाही.

तू तिथे असताना शांतपणे खेळतो असं त्या मॅडम सांगतात. पण तू आतून घाबरलेला किंवा बावरलेला असतोस का हे कोडं आहे माझ्या मनात. कारण लहानपणी मी कुठे एकटा राहिलो की मला अजिबात करमायचे नाही आणि आतून घाबरल्यासारखं वाटायचं. Sorry कणुल्या तुला काही त्रास झाला असेल तर. पण तूला थोडं वेगळं वातावरण मिळावं. Socialize व्हावंस म्हणून तिथे ठेवतोय.

१८ फेब्रुवारी)
तू चालत नव्हतास तेव्हा कधी एकदा चालतोस असं झालेलं. आणि आता एवढं चालतोस की आता तू रांगत नाहीस हे तुझी आई खूप मिस करते.😄

२० फेब्रुवारी)
युट्यूब वर जी गाणी ऐकतोस. त्यातल्या 1-2 गाण्यावर आता तू तशी action पण करायला लागलायस. Wheels on the bus go round round and round हे गाणं म्हटलं की तू हात असा round round फिरवायला लागतोस. Doors on the bus go open and shut म्हणताना त्याप्रमाणे दार उघड बंद झाल्याची action करतोस. Moms on the bus go shh shh shh हे करताना तोंडावर बोट ठेवतोस ते इतकं cute वाटतं ना.!! Tv वर लागलेल्या गाण्यात कुणी by by केलं की तू पण करतोस. या जगातली समज येण्याची ही एक पहिली खूण म्हणावी लागेल.

२२ फेब्रुवारी)
आता टाटा कर म्हटलं की तू नाजूकशा आवाजात आ~~~य (हाय) करत हात हलवतोस. आणि flying kiss देताना तोंडावर हात आला की पप्पी दिल्याचा आवाजही करतोस. आधी flying kiss ची action करताना तू बोंबलल्यासारखं हात जोरात तोंडावर मारायचास. पण आता तू पप्पी दिलीस की माणसाला जाऊ वाटणार नाही इतकं cute वाटतं. 

आता तुझा पुढचा टास्क म्हणजे गालावर पप्पी देणे..

२६ फेब्रुवारी) 
काल तुला खूप उलट्या होत होत्या. रात्री साडे अकराला दवाखान्यात नेलं. पण उलटी झाल्यावर तू नॉर्मल खेळायला लागायचास. 

२७ फेब्रुवारी)
अजून जुलाब आहेतच तुला. याआधी तू औषध इतकं छान घ्यायचास की बाटली माझ्याकडे आणून यातलं औषध दे म्हणायचास. पण काय झालंय कुणासठाऊक. या आठवड्यापासून औषधाची बाटली पाहिली तरी लांब पळतोयस. औषध पाजताना खूप रडतोस. पण पर्याय नाही ना रे आमच्याकडे.

२८ फेब्रुवारी)
आज आईने तू केलेली एक गंमत सांगितली. Gems गोळ्यांचं पाकीट फोडून तिला त्यातली एकच गोळी काढून द्यायची होती. पण चुकून सगळ्या खाली सांडल्या. तिने त्या वेचेपर्यंत गप्पकन तू 3 गोळ्या तोंडात टाकल्यास. आईने मग त्या गोळ्याच लपवून ठेवल्या. आणि नंतर त्या पाकिटाचा फाडलेला एक कोपरा सापडला तुला सापडला, तो तुकडा आईकडे नेऊन या गोळ्या दे म्हणून रडत होतास. ते ऐकून खूप हसलो मी..😝 तुला अजून बोलता येत नाही पण कसं सांगायचं हे पक्के माहीत आहे तुला. 

त्यांनतर रात्री दुकानात गेलो होतो. तिथे धुण्याचा साबण विकत घेतला. बाकी सामान घ्यायचं बाकी होतं. पण तुला तो साबणच हातात घ्यायचा होता. तोंडात घालशील म्हणून तो तुला द्यायचा नव्हता. पण रडून हट्ट करून घेतलासच तो. मग तो घेऊन तू पूर्ण दुकानात फिरत होतास. निघताना तो तुझ्या हातातून घेऊन बॅगमध्ये ठेवला तर इतक्या जोरात भोंगा पसरलास की बस्स..! तू रडताना कधी हसू येत नाही मला पण यावेळी तुझा हा हट्टी भोंगा पाहून मी जाम हसलो.















- तुझा बाबा


©विशाल पोतदार

Wednesday, 16 August 2023

दिवार में एक खिडकी रहती थी (पुस्तक रसग्रहण)

#विशालाक्षर
#पुस्तक_रसग्रहण
#दिवार_में_एक_खिडकी_रहती_थी

मी वाचलेली पहिलीच हिंदी कादंबरी.. तीही विनोदकुमार शुक्ल यांचीच मिळावी हे भाग्य. मला नेहमी असंच वाटतं की पुस्तकं आपल्याला नशिबाने लाभतात. जी पुस्तके मिळत जातात त्यावरून आपलं आयुष्य कुठल्या पायवाटेवरून चालले आहे याची खात्री होते.. 

"दिवार में एक खिडकी रहती थी" हे विलक्षण शीर्षक, पुस्तक हातात घ्यायला भाग पाडतं. स्वप्नांच्या जगातली खिडकी रघुवर प्रसाद आणि सोनसी या नवदाम्पत्याच्या आयुष्यातला एक साधासा प्रवास, विलक्षण बनवते. परंतू लेखक येथे स्वप्न आणि वास्तव जगत यातली रेषा इतकी पुसट ठेवतात की आपण ते वर्गीकरणच करू शकत नाही. लेखक पहिल्या पानावरच एक कविता लिहितात.." उपन्यास में एक कविता रहती थी..." खरंच या कादंबरीत कविता लपलेली आहे. ती कविता म्हणजे आपल्या नेहमीच्या वाचक डोळ्यांना एक वास्तव आणि स्वप्नाच्या काठावर नेऊ शकणारी खिडकी आहे. 

यात नात्यांमधे एक ओलावा आहे. मुळं जोडली गेलेली असली की आपल्या माणसाचा त्रास वाटत नाही. म्हणूनच कदाचित सोनसीची सासू चार दिवस राहून परतू लागते तेव्हा दोघींच्या डोळ्यात आसवं जमा होतात. त्यांची रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत सोनसी दारातच थांबते.  ही अशी आयुष्ये इव्हेंटफूल नसली तरी समाधानी असतात. कुठलेही तरंग नसलेल्या शांत तळ्यासारखं.

रघुवर प्रसाद एक शिक्षक आहे. तो दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहू शकतो. घरून विद्यालयात जाण्याकरीता ते टेम्पोने जातात. त्या टेम्पो प्रवासाचा एक सुंदर पॅराग्राफ...

“टैम्पो में हमेशा की तरह गाँव की औरतों और बूढ़ों की भीड़ थी। एक बूढ़ा डंडा लिये हुए बैठा था। विद्यार्थी नहीं थे इसलिये रघुवर प्रसाद ने अंदर घुसने की कोशिश की। टैम्पो वाले ने जगह बनाने के लिये कहा। टेम्पो में जगह होती तो मिलती। ऐसा नहीं था कि बाहर मैदान से थोड़ी जगह ले लेते और टैम्पो में रख देते तो जगह बन जाती। बिना जगह के वे टैम्पो में घुस गये। जब टैम्पो चली तब उनको लगा कि दम नहीं घुटेगा। लड़्कियों-औरतों के बीच बैठे हुए आगे जब उनको कोई विद्यार्थी देखेगा तो अटपटा नहीं लगेगा, क्योंकि विद्यार्थी सोचेगा कि रघुवर प्रसाद के बैठने के बाद औरतें बैठी होंगी। औरतों के बाद रघुवर प्रसाद बैठे होंगे ऐसा विद्यार्थी क्यों सोचेगा।…"

काही दिवसांनी त्याच मार्गावर रघुवर प्रसादला हत्ती वरून जाणारा साधू दिसतो आणि त्याला तो साधू रघुवरला विद्यालयात ने-आण करण्यासाठी स्वतः गळ घालतो. हत्तीच्या माध्यमातून लेखक, आयुष्यात येणाऱ्या भव्यदिव्य आणि औत्सुक्यपूर्ण गोष्टींची जाणीव करून देतात.. त्याबाबत काही सुंदर ओळी....

“हाथी के जाने से एक बड़ी जगह निकल आयी थी। यह तो था कि हाथी आगे-आगे निकलता जाता था और पीछे हाथी की खाली जगह छूटती जाती थी।”

शुक्ल जी भाषा मांडतात, ती जाणिवेच्या एका वेगळ्याच प्रतलाला स्पर्श करणारी आहे. रोजच्याच obious म्हणून सोडल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकल्यावर खूपच आतल्या झोनमध्ये नेऊन ठेवतात.

“रघुवर प्रसाद कल की तैयारी में किताब खोलकर बैठ गये। पत्नी खाना बनाते-बनाते पति को देख लेती थी। हर बार देखने में उसे छूटा हुआ नया दिखता था। क्या देख लिया है यह पता नहीं चलता था। क्या देखना है यह भी नहीं मालूम था। देखने में इतना ही मालूम था कि इतना ही देखा था।”

रघुवर आणि सोनसीमधलं प्रेम निरांजनाइतकं प्रशांत आहे. त्यातली गोडी खूप भावते. त्यांच्या अवतीभोवती मन रेंगाळत राहतं. सोनसी जेव्हा काही दिवसांकरीता माहेरी जाते तेव्हा चिठ्ठी लिहिण्याबाबतचे  संवाद आकाशातल्या चांदण्यांशी गप्पा मारणारे असतात. त्याची चिठ्ठी वाचताना सोनसीला वाटते की रघूवरने दोन्ही हातांनी चिठ्ठी लिहिली असल्यामुळे त्याच्या आलिंगनात बसूनच आपण चिठ्ठी वाचतोय. कमाल आहे हे सगळं..!!

इतकं सांगितल्यावर देखील असं वाटतंय की पुस्तकाबाबतचा नक्की फील मी ऍक्युरेट सांगूच शकलेलो नाही.....  

फक्त सूर्यास्त झाल्यानंतरचा काळोख किती गडद होता हे सांगण्यासाठी लेखकाच्या ओळी देतो...

"अंधेरा घना था. एक सूर्यके डूबनेसे इतना अंधेरा नही होगा. कमसे कमी दो सूर्य डुबे होंगे.."

या ओळी सूचणं म्हणजे कहरच..!!


©विशाल पोतदार

#विनोदकुमार_शुक्ल

Tuesday, 13 June 2023

डेड एन्ड (एकांकिका)

पात्र - 
दिक्षा (वय - ३०) विवाहित
तिमिर - वय ३२

(नेपथ्य- नायिका एका डांबरी रस्त्यावरून कार चालवत जाणार असल्याने, रस्ता असण्याची चिन्हे असावीत. तो रस्ता एका ठिकाणी संपत असून त्यापुढे झाडीच असेल. बसण्याकरीता रस्त्याकडेला एक कठडा.) 

दृश्य - रात्री ९ च्या आसपास
(दिक्षा कार चालवत असताना अचानक पुढे रस्ताच संपलेला जाणवतो आणि ती पटकन ब्रेक मारते.)
दिक्षा - शीट~~~

(दिक्षा कार मधून उतरते. मोबाईलवर नीट निरखून पाहते. रस्त्याच्या पुढे डोकावून, खरंच रस्ता संपलाय का हे पाहते. खूप वैतागलेली वाटते.)

दिक्षा - शे यार...  हे कसं पॉसीबल आहे? 
(असे म्हणत असतानाच ती रस्त्यातले दगड बाजूला अंधारात भिरकवायला सुरुवात करते.)

(इतक्यात तिथल्या अंधारातून एक मुलगा तिथे येतो.)

तिमिर - ओ~~ ओ~~ मॅडम ... लागला असता ना दगड.. कानापासून भिरभिर करत गेला माझ्या.  काय... नक्की काय प्रॉब्लेम काय आहे?

दिक्षा - प्रॉब्लेम म्हणजे? दिसत नाही का तुम्हाला हे.. हे.... 

तिमिर - हे ... हे काय.... आगे दाये बाये..  रास्ता बंद... 
आयुष्यच डेड... डेड एन्ड आहे....!! त्यात रस्त्याचं काय घेऊन बसलात.

दिक्षा - (स्वतःशी) साला वेडा बिडा आहे की काय..

तिमिर - ऐकू येणार नाही असं तर बोला..मी वेडा वगैरे नाही असं मला तरी वाटतं ..  तिमिर..... काळोख... what people mistakely call it as an absense of light... डार्कनेस..
by the way.... सॉरी बरं का... तुम्हाला घाबरवून सोडलं असेल तर ... मी पडलो लेखक माणूस.. अवसानातला विचार मिळाला की असाच सुसाट सुटतो. (हॅन्डशेक साठी हात पुढे करतो) मायसेल्फ तिमिर... आपण?

दिक्षा - अहो.... ही काय ओळख बीळख करून घ्यायची वेळ आहे का.. इथं प्रॉब्लेम काय आहे दिसतंय ना तुम्हाला? काय हो? तुम्हीही चुकून आलात का इथे? मध्येच असा डेड एन्ड कसा काय? मॅपमध्ये तर इथून रस्ता दाखवत होता. या शॉर्टकटच्या नादात मेन रस्ता सोडून मी वीसएक किलोमीटर आत आले. 

तिमिर - (जोरात हसतो) तुम्ही चुकून इथे आलात हो... मी मुद्दाम इथे येतो इथे. हजारो मैलांवरचा सॅटेलाईट तुमचा मॅप दाखवणार.. थोडासा ऊंनीस बीस चलेगा ना.... पण मॅडम मला काय वाटतं...माणूस जेव्हा डेड एन्ड ला येतो ना, तेव्हा तिथं विसावलं पाहिजे. आता तितकंच मागे जावं लागेल हे खरं. पण डेड एन्डला आलाच आहात तर मनातल्याही गाठी स्वाहा करून जा इथेच. (एकदम कुजबुजणारा आवाज करत) आणि हो, कोकणातला रस्ता आहे हा. जपून राहा बरं का. म्हणजे थोडी भुतंखेतं वगैरे. म्हणजे अगदी थोडीशी...

(घाबरत घाबरत त्याच्यापासून जरा लांब होत विचारात पडते.)

तिमिर - घाबरू नका हो... मी भूत बीत नाही...  नॉर्मल माणूस आहे. खरं तर नॉर्मल आणि माणूस हे विरुद्धार्थी शब्द आहेत ना? माणसासारखा abnormal जीव दुसरा कुणी नाही. (जोरात हसतो). कसं होतं वाक्य सांगा.. माझ्या एखाद्या कथेत वापरता येईल ना?

दिक्षा - whatever.... काहीही करा हो त्या वाक्याचं, पण मला इथून बाहेर कसं पडायचं ते सांगा. इतकं 20 km मागे जाण्यापेक्षा दुसरा कुठला रस्ता आहे का मेन रोडला जायला?  उशीर होतोय खूप..प्लिज हेल्प करा.. 
खूप भणभण व्हायला लागलीय डोक्यात...

तिमिर - आता पर्याय दिसतोय का काही... मग काही वेळ शांत बसा ना मॅडम.. की अशाच किरकिर करत असता तुम्ही सगळीकडे...

दिक्षा - मिस्टर तिमिर .... माईंड युअर लँग्वेज... काहीही काय बोलता..?

तिमिर -सॉरी हा.. मी खूप excitment मध्ये बोललो. पण एक ऐका ना. मी काय म्हणतो... आतापर्यंतच्या आयुष्यात शोधलेत की रस्ते. धावपळही केली असेल... घड्याळाच्या काट्याचीही गुलामी केली असेल ना.. थांबा जरा... बसा शांत... स्वतःला ऐकत..  स्वतःशी गुणगुणत..  इफ यू डोन्ट माईंड, एक गोष्ट सांगू? 

दिक्षा - काय?

तिमिर - आपली ओळख ना पाळख. तुमच्याबद्दल मला काहीही माहिती नाही पण का कुणास ठाऊक, असं वाटून गेलं, की तुमचा डेड एन्ड फक्त रस्त्यावर नाही तर आतही कुठेतरी आहे. मन अडून बसलंय पण सुटता येत नाहीये. 

(तीही शांत कट्ट्यावर बसते. आणि तो उभा असतो)

दिक्षा - दिक्षा... 

तिमिर- काय म्हटलात?

दिक्षा - माझं नाव... दिक्षा ..
आयुष्यातला डेड एन्ड... (पॉज) कधीकधी अनोळखी लोक आपली मनस्थिती परफेक्ट कशी ओळखतात कळत नाही. तुम्हाला ते कसं जाणवलं ते माहीत नाही. पण जाऊ द्या सगळंच काही शेअर करता येत नाही. बाय द वे तुम्ही लेखक आहात ना हो.. काय काय लिहिता आपण?

तिमिर - कथा, कविता, लेख... सगळं थोडं थोडं... पण सध्या नावाला जागून काळोखाविषयी काहीतरी लिहितोय... या स्पॉटला मी तासनतास बसतो. किर्रर्र एकांत मिळतो. (हसून) कधीकधी मॅपने चुकवलेले लोक येतात इथे त्यांना गाईडही करतो.

दिक्षा - म्हणजे या डेड एन्ड प्रॉब्लेमची हेल्पलाईन म्हणून जॉब आहे तर तुमचा.

तिमिर : सॉर्ट ऑफ.. आयडीया काही वाईट नाही पण.. माझ्या या सर्व्हिसेस चार्ज केल्या तर चांगला इन्कम होऊ शकतो. तसेही लेखकांना कुठे काय कमाई मिळते सध्या.

दिक्षा - हाहाहा..  करा ना चार्ज.. माझ्या नंतरच्या व्यक्तीपासून सुरुवात करा पण.. बाय द वे... काळोख? म्हणजे तुम्ही डार्क जॉनर लिहिता का? हॉरर वगैरे? 

तिमिर - हॉरर नाही, तर सॉर्ट ऑफ काळोख म्हणजे अंधारावर abstract असे लेख लिहितोय. काहीसे तत्वज्ञानाशी रिलेट करतात ते लेख.

दिक्षा - अच्छा.. पहिल्यांदा ऐकलं असं काही मी... आणि मघाशी काय म्हणत होतात? absence of light म्हणजे डार्कनेस असं चुकून लोक म्हणतात वगैरे... तसंच तर आहे ते.. कुठलाही रंग समोर नसतो त्यावेळीच काळा रंग असतो. बेसिक आहे.

तिमिर - खरं तर तुम्ही ब्रह्मांडाचा विचार केलात तर काळोख मला स्वयंभू वाटतो. पूर्ण ब्रह्मांडात उजेड नाही तर काळोख भरून राहिलाय. तो आहेच. प्रकाश disturbance आणतो. जशी या ब्रम्हांडातली पोकळी सर्वत्र आहे.  काळोखात एकदा उजेड आला सगळं लख्ख दाखवतो आणि आपण लेबल्स चिकटवत बसतो. माझ्यासाठी मनातला अत्यंत खोल कोपरा म्हणजे काळोख!!

दिक्षा - पण हे शेवटी बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं झालं ना. हे तत्वज्ञान.. तुमचं ते प्रकाश काळोखाचं परसेप्शन... ह्याचा रिअल लाईफमध्ये काय उपयोग हो. काळोख म्हटलं की मला तर आठवते भीती, गुन्हे आणि अस्पष्टपणा... तुम्ही काय लिहाल ते आता माहीत नाही. बरं निघायला हवं मला.. आधीच खूप वेळ गेला माझा ह्या रस्त्याच्या नादात.

(दिक्षा उठते आणि निघू लागते).

आणि हो....लिहिणं जितकं सोपंय तितके मनातले डेड एन्ड सोडवणे इतके सोपे नसतात . मनाचा एकतरी भाग असा असतो, जो डेडएन्ड पासून कधीच हलत नाही.. माघार घेत नाही.. बाय द वे चला.. ऑल द बेस्ट तुमच्या काळोखाच्या लेखनाला..

(दिक्षा गाडीपर्यंत पोहोचते. दारच उघडत असते इतक्यात..)

तिमिर - हातचलाखी... जादू... फसवणूक सगळ्यात बेस्ट उजेडात होत असते बरं का? जेव्हा आपल्याला वाटतं ना, की यावेळी आपण फसवलो जाऊ शकत नाही, तेव्हाच सगळी जादू घडते मिस दिक्षा.. उजेडाच्या कॉन्फिडन्समध्येच मन फसते.

(कारचं दार उघडून दिक्षा काही वेळ विचार करते. पुन्हा दार बंद करते आणि कारला टेकून हाताची घडी घालून शून्यात पाहत बसते. अचानक तिला रडू कोसळतं. तिमिर सांत्वनाच्या भावनेने तिच्या समोर येतो. ती हातानेच ओके आहे असं म्हणते.) 

तिमिर - ईट इझ ओके....

दिक्षा - बसू येथे थोडा वेळ?

तिमिर - offcourse... ही जागा अजूनतरी मी नावावर करून घेतलेली नाहीये. so न विचारता ही बसू शकता. 

(दिक्षा स्माईल करते.)

दिक्षा - लेखक महाशय, विनोदी लेखन करू नका कधी. खूप सुमार जोक्स करता.

तिमिर - एखादा जॉनर द्यायचा हो बाकीच्या लेखकांनाही. मी एकटाच किती काय काय लिहिणार ना. बाय द वे... मला अरे तुरे करू शकता. इथे या माळरानात, काळोखात कुठे formalities करायच्या संबोधनाच्या.

दिक्षा - hmmmm चालेल... असं लगेच एकेरी बोलावणं मला अवघड जातं खरं तर.. तिमिर.. हे नाव मात्र मी कुठे ऐकलं नाही. वेगळं वाटतंय खूप. 

तिमिर - पेन नेम...!! म्हणजे लेखनासाठी घेतलेलं नाव.

दिक्षा - ट्रान्सलेट करून सांगायची ती काय गरज? मुलींना काय नेहमीच येडपट समजता की काय राव.

तिमिर - (हात जोडून) सॉरी मॅडम.. माय बॅड.. असं काही समजत नाही मी. हे नाव खूप भारी वाटलेलं मला. शून्यत्व असल्यासारखं नाव. तिमिर.. काळोख..  नथींगनेस.. 

दिक्षा - पण नक्की लिहिताय काय या काळोखावर. एखादं काहीतरी वाचून दाखवा बरं. म्हणजे इफ यू आर ओके विथ ईट.!

तिमिर - हे ऐकवत राहिल्यामुळे आधीच एक गर्लफ्रेंड सोडून गेलीय.. आपली नुकतीच ओळख होतेय. एवढी रिस्क घ्यावी का बरं?

दिक्षा - excuse me... married आहे बरं मी.! त्यामुळे घ्या रिस्क. आवडलं नाहीतर मलाही निघणं सोपं होईल इथून.

तिमिर - married असण्याचं disclaimer दिलंत ते एक बरं झालं. मी ही अत्ता माझ्या बेस्ट flurting लाईन्सची डायरी बाहेरच काढणार होतो. 

दिक्षा - हाहाहा... जाऊ दे.. जाऊ दे ते प्रयत्न.. तसेही तू अशा फालतू गोष्टींपासून detatched वाटलास म्हणून इथे थांबण्याचं धारिष्ट्य तरी झालं. बरं लेखक महाशय ऐकवा काहीतरी.

तिमिर - हो हो.... ऐकवतो... थाम्ब शोधतो मोबाईल मध्ये..

(मोबाईलमध्ये लेख शोधून वाचून दाखवतो).

तर हा एक स्फुट लेख आहे आपल्या आत्म्यांच्या प्रवासाविषयी.

दिक्षा - एवढ्या अंधारात आत्मे वगैरे का..? बरं वाच.

तिमिर -
बाय द वे खूप जड वाटलं तर सांग बरं..

"पात्रात अंधार भरून नदी कुठे चाललीय? तिला कदाचित असंख्य प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या त्या कृष्णविवरात विरून जायचंय. 

शरीरातून नुकतेच सुटका मिळवलेले आत्मेही या प्रवाहात दिसतायत. त्यांच्यासाठी पाठीमागे शोकसभांच्या फैरी झडताहेत आणि हे बापडे मात्र आनंदात तरंगतायत. हजारो वर्षे एकच स्वप्न उराशी..  यावेळीतरी मिळेल का मोक्ष? 

नदीच्या अंधारात त्यांचा पिंड, मुठीत पकडलेल्या काजव्यांसारखा असहाय वाटतो! युगांपासून कवटाळलेल्या संस्कारांचा काजवा अजूनही असहाय टीमटीमतोय. तोही जेव्हा विझेल, तेव्हा फक्त एक नग्न ऊर्जा राहील. तिलाच मिळेल मोक्ष. 

जा रे बाबा.. अंधारात शेवटची अंघोळ करून, त्वरीत निघायला हवं. अंधाराने सजून एक गर्भ वाट पाहतोय.! पुढच्या जन्मातील आईच्या पदरी दान दे.!

(हे ऐकता ऐकता दिक्षा स्वतःत हरवून जाते. तिला हुंदका भरून येतो आणि भरल्या स्वरातच म्हणते..)

दिक्षा - किती खोलवर आहे हे... थांबलास का? पुढे...?

तिमिर - सॉरी... तुझे डोळे भरून आले चक्क? 

दिक्षा - काही जखमा अशा भळभळत राहतात की त्या कधी जुन्या होतच नाही. असं काही वाचलं ऐकलं की आठवतं काहीतरी... 
तुझा काळोख हा इलेमेंट एक कॅनव्हास वाटतोय अनंत आकाराचा. अगदी काहीही लिहू शकशील यावर. 

तिमिर - काहीही लिहिण्यापेक्षाही, हे लिहिता लिहिता माझंच मन इतकं खोलवरच्या आयामात जातं की subconsious लेव्हलच्या विस्कटलेल्या गोष्टी सावरून ठेवता येतात. बोअर तर करत नाही ना मी?

दिक्षा - मी कुठे इथे मनोरंजन व्हावं म्हणून बसलेय. एकतर मला पुढे जाण्यासाठी आधीच पाऊल उचलत नव्हतं आणि मागे गेलं तरी मन झुरत राहणार. यार, फ्रीझ झालेय मी. डेड एन्ड हा अशावेळी आलाय ज्यावेळी खरंच मी काही ठरवू शकत नाहीय. उलट्या पडलेल्या कासवासारखं वाटतंय. हेल्पलेस.!

तिमिर - इफ यू डोन्ट माईंड... शेअर करू शकशील मनातलं द्वंद्व.? अनोळखी माणूस असलो तरी प्रयत्न करेन ते जाणून घेण्याचा. कधीकधी भावनांचा गुंता सोडवायला तटस्थ नजरेची गरज असते. 

दिक्षा - नको वाटतं रे मनातल्या जाळ्या जळमटं पुन्हा उघडी करायला. मनात पुन्हा ती चित्रफीत सुरू होते. खूप काही भलं मोठं असं दुःख नाहीये खरं तर. 

तिमिर - मग अशी कल्पना कर की तू काळोखात उभी आहेस. इतका गडद अंधार की तुझे डोळे उघडे आहेत की झाकलेले हे कळू नये. स्वतःचा हात डोळ्यांसमोरून फिरवला तरी कळू नये इतका काळोख. त्याला तटस्थपणे दाखव तुझी जाळ्या जळमटांची खोली. 

(दिक्षा डोळे बंद करते.)

दिक्षा -  पिंडदान... (आवंढा गिळते) पिंडदान करायला चाललीये मी गोव्याला. 

तिमिर - काय?

दिक्षा - ऐकलंस की... संपवणार एका बापाला आणि मुलीलाही.

तिमिर - का? 

दिक्षा - मनात हीच गाठ आहे. का? नक्की का? जगेल तितकं पक्की गाठ होत जाते. गळ्याभोवती इतकीच आवळते की जिवाने नुसतं तडफडत राहावं. 

तिमिर - 
कधीकधी गाठ स्वीकारावी ना.

दिक्षा - 
नाही स्वीकारता येत. इतकं सोपं नसतं.

तिमिर - तेच म्हणतो... शेअर करून तरी पहा. सांगितलंस तर क्लोझरच्या जवळ तरी जाऊ शकशील.

दिक्षा - काय सांगायचं रे..  एका हिजडयाची मुलगी आहे ही किळसवाणी गोष्ट सांगू? माझा बाबा... छक्क्यांच्या जमातीत राहायला गेला हे सांगू?

तिमिर - म्हणजे...?

दिक्षा - ऐकलंस ना... आणि वाटली ना किळस या वाक्याची. मग जगताना काय झालं असेल imagine कर..

तिमिर - किळस नाही गं... खूप वेगळं असं काही.. म्हणून reaction आली कदाचित.. आता खरंच सांग नक्की काय गाठ आहे ही.. सोडवायला हवीच ही..

दिक्षा - कुठून सुरुवात करावी हेही कळत नाही.. इतकं विस्कटलंय सगळं.. मी लहान होते तेव्हा.. बाबांची थोडीशी हालचाल बोलणं बायकी होतं पण ते सहसा न जाणवणारं.. असं आई सांगते.. मला तर आठवतही नाही.. मला आठवतात ते बऱ्याचवेळा शून्यात पाहत बसलेले माझे बाबा.. बायकोने त्याच गोष्टीवरून  कधीतरी अपमान केला म्हणून निराश झालेला नवरा.. घुसमट होत असावी कदाचित त्यांची..

एकदा मी नववीत असताना शाळेत जायला बस स्टॉपवर उभी होते. अचानक बाबा आले. त्यांच्याजवळ एक बॅग होती. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..

पप्पा VO - बाळा... हे घे पैसे आणि चिठ्ठी आईला दे. खूप मोठी हो. खूष राहा. आयुष्यात एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. कशात अडकून पडू नको. स्वतःसाठी जग..

लहान दिक्षा VO - तुम्ही असे का बोलता? डोळ्यात पाणी का तुमच्या? इतके पैसे? पप्पा कुठे चाललात तुम्ही? चला ना घरी.

(दिक्षा डोळे मिटूनच उठते.)

दिक्षा - मी का थांबवलं नाही त्यांना. स्तब्ध होऊन राहिले. काही कळायच्या आत ते दिसेनासे झाले. त्यांचा हात घट्ट पकडला असता तर? मी हात सोडलाच नसता तर त्यांनी झटकलाही नसता. पायाला विळखा घालायला हवा होता. तिमिर तुझा काळोख काय सांगेल यावर? बाबा नका जाऊ. पुढे मला खूप पोकळी जाणवणार आहे बापाची. थांबा ... थांबा...damn it त्यांच्या रस्त्याला का नाही लागला असा डेड एन्ड... संपायला हवा होता त्यांच्या पुढचाही रस्ता..

तिमिर - (तिच्या खांद्यावर हात ठेवत.) दिक्षा... दिक्षा.... तू काय करणार होतीस. एवढीशी पोरगी ती.. तिच्यावर नको ओझं टाकू... बस बरं खाली. 

(दिक्षा डोकं धरून खाली बसते.)

दिक्षा - अजून ऐकव ना काही.. तुझ्या काळोखातलं..

तिमिर - देवमाशाचा आवाज ऐकलायस का गं कधी?

दिक्षा - हे काय मध्येच.. देवमासा कुठून आला?

तिमिर - आजपर्यंत कुणाला बोललो नव्हतो पण मला त्याचा आवाज प्रचंड प्रचंड खेचून घेतो. आणि का तेही माहीत नाही. असं वाटतं की देव तत्वाचा आवाज असाच असेल. नुसतं ऐकूनच एक समाधी लागते आणि मनातलं साठलेलं सगळं तो पोटात घेतो..

दिक्षा - खरंच वेडा आहेस तू. मी कधी ऐकला नाही. ऐकलाही असेल animal planet वर वगैरे, पण आठवत नाही. एवढं काय खास आहे?

तिमिर - थाम्ब ऐकवतो. (तिमिर मोबाईल काढून युट्यूबमधून देवमाशाचा आवाज ऐकवतो. काही सेकंद ऐकल्यावर आवाज बंद करतो. ) 

दिक्षा - चालू राहू दे ना.... खरंच.. 
लेखक म्हणून तुला काय सुचतं रे नक्की हा आवाज ऐकल्यावर? 

तिमिर - दिक्षा मला नेहमी असं वाटतं की काळोखात मी कधीच हरवणार नाही. बघ ना, चुकायला इथे रस्ताही नाही, मंजिलही नाही आणि मुळात चुकलोय हे सांगणारे मापदंडच अस्तित्वात नाहीत. आपण आतला तळ अचल ठेवून पुढे जात रहावं... 

किर्रर्रर्र मनाने पुढे जाता जाता काही, काही आवाज मात्र ऐकू येतात. आहत अनाहत! मुंगीच्या श्वासापासून ते देवमाशाच्या हुंकारापर्यंत सगळं काही! देवमासा? म्हणजे समुद्र असेल का इथेही? आपल्या पोटात काळोख घेऊन बसलेला समुद्र जेव्हा पूर्ण काळोखात असेल तो क्षण कसा असेल...? असं वाटतं की या आवाजामागे जात राहावं. तळाशी... महासागराच्याही तळाशी. मनाच्या तळाशी.. तिथे सगळं काही गवसेल.  तिथे गवसतील फेस करू शकणार नाही म्हणून सोडलेले अर्धेमुर्धे प्रॉब्लेम्स, काही नात्यांचं सडलेपण, विकारांनी उष्टावलेला मनाचा तुकडा, आपल्यातला दानव... सगळं सगळं असं, जे आपण वर आणायला घाबरतो. 

देवमाशाने हुंकार देत रहा राहावं. फक्त.!

दिक्षा - बोलत राहावंस फक्त तू.. हे abstract ही म्हणवत नाही इतकं खरंय तुझं काळोखाचं जग.

तिमिर - थँक् यू... 

दिक्षा - बाबांनाही असंच काळोखाचं जग मिळायला हवं होतं ना..  त्यांना मापदंड लावले गेले स्त्री आणि पुरुषत्वाचे..

मागच्या वर्षी, आमच्या सोसायटीतल्या काकांनी बाबांना पाहिलं होतं. गोव्यात.. 
काका सोसायटीत आल्या आल्या आमच्या घरी आले.

काका VO - "अहो वहिनी ... आपल्या दामूला पाहिलं गोव्यात.. साडी नेसला होता.. भरपूर दागिने.. डोळ्यात काजळ घातलेलं .. किती वेळ वाटत होतं की हा तोच का? पण साला नजर चुकवत होता त्यावरून पक्कं कळलं की हा दामूच आहे.. खरं सांगायचं तर भयंकर वाटलं हो त्याचं "ते" रूप.. इतक्या दिवस सगळे समजत होते की परागंदा होऊन वेगळं बिऱ्हाड वगैरे केलं असेल. पण हे असं...? शिव~~ शिव~~ शिव~~ कल्पनेतही नव्हतं हो..  माझ्यापाशी खूप रडला.. तुमची आणि पोरीची चौकशी केली. कुणाला सांगू नका म्हणाला..."

दिक्षा- आई एकच वाक्य बोलली... भाऊजी हरवलेल्या माणसाला कायद्याने सात वर्षानंतर मृत समजलं जातं.. पंधरा वर्षे झाली आता.. मेलाय तो माणूस आमच्यासाठी.. 

मला नक्की feel काय करावं हेही कळत नव्हतं.. दिव्यावर हात पकडला तर आपण पटकन मागे घेतो. पण  कुणीतरी जबरदस्तीने हात पकडला तर? हात भाजून निघतोय... मनही भाजून निघतंय.... पण तिथून सुटता येत नाहीये..

बातमी वणव्यासारखी पसरली..  माझ्या सासरी कळलं.. नवऱ्यालाही लाज वाटायला लागली रे.. लाज... लाज वाटतेय हिजड्याच्या मुलीला आपलं म्हणायला.. याआधीचं प्रेम.. साथ देण्याची commitment वगैरे कुठं जातं रे लगेच यांचं... हेही हिजडेच ना.. परिस्थितीला पाठ दाखवणारे.. 

तिमिर - मग काय झालं? तिथे राहत नाहीस का? 

दिक्षा - त्याच्या आईने डवोर्स घ्यायला सांगितला. त्याने रोबोट सारखा मागितलाही.. आणि मी देतेय.. 

तिमिर - unbelievable..  मला सुचतच नाहीये काय बोलावं..

दिक्षा - (हसून...) चालायचंच... मीही इतका प्रयत्न करतेय बाबांचं तसं असणं accept करण्याचा पण नाही होत.. कचऱ्याचा डब्ब्याचं झाकण उघडून कचरा टाकेपर्यंत त्या वासाने जशी शीरशिरी उठते ना मनात.. तसं वाटतं त्यांना हिजड्याच्या रुपात आठवलं की.. म्हणून अत्ता तिकडे चाललेले त्यांना भेटून स्वतःचं आणि त्यांचं पिंडदान करायला.. संपवावं सगळं.. सगळंच..

(दोघेही देवमाशाचा आवाज ऐकत एकमेकांशेजारी काही क्षण बसून राहतात.)

तिमिर - दिक्षा..

दिक्षा - हं..?

तिमिर - एकदा काळोखाची सफर कर.. बघू तुझे बाबा सापडतात का तिथे.

दिक्षा - कसं करता येईल?

तिमिर - आपल्या आसपास असा काळोख आहे की जिथे तूला तूही दिसू नये.

(स्टेजवर पूर्ण काळोख.)

तिमिर - ती चौदा वर्षांची दिक्षा आपल्या बाबांना शोधतेय. 

दिक्षा - पण नाही दिसत ते. कुठल्या रुपात शोधावं तेही कळत नाही..

तिमिर - दिसणार नाहीत पण जाणवतील नक्की. ते समोर कधीच नव्हते. तुला ते नेहमीच जाणवत राहिलेत मनात. रूप.. लिंग.. जात.. सगळं चिकटलेलं आहे गं.. त्यांच्या आत्म्याला भेट.. त्यात फक्त आपल्या देशातपोरीवर प्रेम करणारा बाप असेल कदाचित.. ती छोटी दिक्षा बसलीये तिथे, त्यांच्या शेजारी...

(प्रकाशझोत दिक्षावर...)

दिक्षा - मनातुन वाटतं चेहऱ्यावर हात फिरवावा त्यांच्या. पण पुन्हा प्रचंड द्वेष वाटतो. त्यांच्यासोबत प्रेमाने नाही वागू शकणार मी... मी कचऱ्याच्या डब्ब्यात आहे असं वाटतंय.. नुसतं विद्रुप.. दुर्गंधी असणारं जग.. 

(बाजूला ठेवलेल्या पर्समधून दिक्षा एक चिठ्ठी काढते) ही बाबांनी काकांजवळ दिलेली चिठ्ठी.. फक्त मलाच द्यायला सांगितलं होतं.

(देवमाशाचा आवाज background ला चालू होतो.)

तिमिर - (भावनिक होऊन वाचतो जणू काहीकाही तिचे बाबा तिच्याशी बोलताहेत) दिक्षा... बाळा... माफ कर गं मी परतू शकलो नाही. कित्येकदा वाटायचं की यावं आणि माझ्या पिल्लाला मिठीत घ्यावं. मुके घ्यावेत पटापटा.. पण मी परतल्यावर सगळं जग डोळ्यात घृणा घेऊन मला आणि माझ्या कुटुंबाला पाहतंय असं वाटायचं. आता तर जीवनाच्या सोपस्कारातून जाणं भाग आहे. पण भेट गं मला माझ्या पोरी... निसर्गानेच पेचात टाकलेल्या या माणसाला तेवढंच हवंय गं आता.. शेवटची इच्छा समज..

दिक्षा - बाबा... घरी चला..  मला शाळेत सगळे विचारतात तुझे पप्पा कुठे राहतात. जेव्हा जेव्हा मला कशाचीही भीती वाटते, तेव्हाही तुम्ही हवे असता मला. बाबा खूप भीती वाटतेय मला... तुम्ही कशाही रुपात असा.. मला हवे आहात.. तुमची दिक्षा एकटी पडलीय हो.. बाबा.. (हमसून हमसून रडू लागते.. आणि तिमिरच्या पायांना पकडते..)

आता नाही सोडणार तुम्हाला.... आता नाही.. सॉरी... सॉरी... नाहीतर मीच इथे राहते.. आपण दोघे राहू..

(देवमाशाचा आवाज सुरू होतो.)

(ती उठून उभी राहते. तिमिर तिच्या जवळ येतो. आणि खांद्यावर हात ठेवतो. ती त्याच्या मिठीत जाऊन रडते.)

दिक्षा - तिमिर... मला जायचंय बाबांकडे.. कचरा नाही रे फुलांची बाग आहे रे ते..  (मिठीतुन बाहेर येत) सॉरी... 

तिमिर - डोन्ट वरी, अगं प्रत्येक मिठी sexual असते असं नाही. कसेय मन आता?

दिक्षा - देवमाशासोबत तरंगतय.! शांत झालंय....  बाबांना भेटायची आस लागलीये.. शोधून काढेन त्यांना.

तिमिर - आपल्याला एकाच दिशेला जायची इतकी खुमखुमी असते ना रे, त्यामुळे 'डेड एन्ड' हा डेड एन्ड वाटतो. मागे फिरायला यायला हवं. 

दिक्षा - बाय द वे.. थँक्स रे.. फॉर एव्हरीथिंग.. इन्कलूडिंग देवमासा.!

आता अजून एक काहीतरी ऐकव तुझ्या काळोखातलं.

तिमिर - (या संवादातला एकेक पॅराग्राफ संपेल तशी एकेक लाईट ऑफ होते. शेवटी पूर्ण काळोख राहतो)
काळोखाच्या प्रदेशात तुला नेहमी भेटावं म्हणतो. जेव्हा हे ठरवलं तेव्हा मात्र तुझी चुकामुक होऊ लागलीय. तुला म्हटलं होतं बघ, देवमाशाच्या आवाजाच्या चाहुलीकडे कान लावून ये. पुढे आलीस की तुझीच भाषा समजू येणारा प्रांत लागेल. तुझी भाषा.. तुझ्या हसण्याचे स्वल्पविराम, पूर्णविराम.! हो... समुद्रतळ सगळं साठवतो. 

अजूनही तुझा मागमूस नाही. कुठे अडलीस? समुद्राचा नकाशा तुझ्याच पावलांनी सजलाय बघ. कदाचित वेळ जरी लागला तरी, अस्सा तुझ्या समोर राहीन.! आपल्या प्रदेशात पुन्हा न्यायचंय तुला. रूप, रंग, स्त्री, पुरुष नाही तर मनाच्या भाषेचा प्रदेश. 

माझा समुद्र... सगळं नाही.. पण तुझं सर्व काही साठवतो.!